नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग १

Submitted by संजय भावे on 21 January, 2024 - 10:02

अधिक श्रावण मास संपायला ८-९ दिवस शिल्लक राहिले असताना वडिलांनी निज श्रावणी सोमवारी पशुपतिनाथाचे दर्शन घेण्याची इच्छा आपल्या 'रावण' बाळाकडे व्यक्त केली. त्रेतायुगातील 'श्रावण बाळाला' आपल्या माता-पित्यांची तीर्थयात्रेची इछा पूर्ण करण्यासाठी कावड खांद्यावर घ्यावी लागली होती, पण कलियुगातील ह्या रावण बाळाला प्रवासासाठीचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने तेवढे कष्ट घेण्याची गरज नसल्याने त्याने त्वरित होकार भरला आणि त्यादृष्टीने तयारी सुरु केली.

श्रावणी सोमवारी 'पशुपतीनाथ दर्शन' निमित्तानं घडणाऱ्या नेपाळ सहलीसाठी अजून कोण कोण येणार ह्याची विचारणा कुटुंबातील अन्य सदस्यांकडे केल्यावर बहीण, भाऊजी, भाचा आणि बायको असे अन्य चार कुटुंबीय तयार झाले तर मोतोश्रींनी गुडघेदुखीच्या त्रासामुळे आता लांबचा प्रवास झेपणार नसल्याचे सांगून आपला असहभाग नोंदवला.

उत्साहाच्या भरात माझ्या ह्या आधीच्या नेपाळ भेटीत जाऊन आलो असल्याने, आणि माझ्यासहित कुटुंबातील कोणालाच आता वन्यपर्यटनात रस उरला नसल्याने 'चितवन'ला वगळून 'जनकपुर', 'काठमांडू', 'पोखरा' अशा ठिकाणांचा समावेश असलेला चांगला १४-१५ दिवसांच्या सहलीचा कच्चा कार्यक्रम मी तयार केला होता पण भाऊजी आणि आमच्या सौभाग्यवतींना रजा उपलब्ध असूनही काही पूर्वनियोजित कार्यालयीन जवाबदाऱ्यांमुळे अचानक सलग एवढे दिवस सुट्टी घेता येणे अशक्य असल्याने आम्हा सहाजणांची विभागणी तीन तीन जणांच्या दोन गटांत करून त्या कार्यक्रमत थोडे बदल करावे लागले.

सर्वात कमी वेळात (साडेतीन तासांत) मुंबईहून नेपाळला पोचण्यासाठी 'मुंबई ते काठमांडू' हवाई प्रवास हा सर्वोत्तम पर्याय असला तरी रस्तामार्गे आणि रेल्वेने असे अन्य वेळखाऊ पर्यायही उपलब्ध आहेत. उत्तराखंड मधल्या 'बनबासा', उत्तर प्रदेशातल्या 'सुनौली' बिहार मधल्या 'रक्सौल', आणि पश्चिम बंगाल मधल्या 'पानीटंकी', ह्या चार बॉर्डर क्रॉसिंग पॉईंट्स वरून बराचसा रेल्वेने + बसने किंवा स्वतःच्या वाहनाने रस्तामार्गे नेपाळमध्ये प्रवेश करण्याचे काही प्रचलित पर्याय आहेत. तसेच दिल्ली ते काठमांडू डेली बस सर्व्हिसचा पर्यायही उपलब्ध आहे पण तो प्रवासही तीस ते बत्तीस तासांचा आहे त्यामुळे मुंबईपासून प्रवासास सुरुवात करायची असल्यास एकंदरीत पाहता हे सर्व पर्याय थोडेफार कमी खर्चिक असले तरी नुसते वेळखाऊच नाही तर खडतरही वाटतात.

आधीच्या नेपाळ ट्रीपमध्ये बघायचे राहून गेलेल्या 'जनकपूरला' ह्यावेळी मला आवर्जून भेट द्यायची होती, पण ते वरीलपैकी कुठल्याच मार्गावर येत नसल्याने वरील सर्व पर्याय आमच्यासाठी निरुपयोगी होते. मग त्या अनुषंगाने शोधाशोध केल्यावर पवन एक्स्प्रेसने मुंबईतील 'लोकमान्य टिळक टर्मिनस' ते बिहार मधील 'जयनगर' असा प्रवास भारतीय रेल्वेने आणि 'जयनगर' ते 'जनकपूर' हा प्रवास नेपाळ रेल्वेने करून जनकपूरला पोचण्याचा झकास पर्याय सापडला. ह्या एकूण प्रवासाचा कालावधी ४५-४६ तासांचा असला तरी कल्याण ते जयनगर पर्यंतचा ३७-३८ तासांचा प्रवास टू टायर एसीने (मग सहा-साडे सहा तासांचा मोकळा वेळ) आणि त्यापुढचा 'जयनगर ते जनकपूरधाम' पर्यंतचा सव्वा ते दीड तासाचा प्रवास एसी चेअरकारने करण्याचे ठरवून हाताशी वेळ कमी असल्याने सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाईटवरून मी, वडील आणि भाचा अशा तिघांची 'कल्याण ते जयनगर' रेल्वे तिकीटे बुक केली आणि मग मागून येऊन काठमांडू पासून आम्हाला जॉईन होणाऱ्या तिघांची 'मुंबई ते काठमांडू' थेट विमान प्रवासासाठी 'इंडिगो'ची तिकिटे बुक केली.

नेपाळ मधली हॉटेल्स भारतातून ऑनलाईन बुक केल्यास रुमच्या भाड्याच्या जवळपास निम्मा कर भरावा लागत असल्याने ती फार महाग पडत असल्याचे लक्षात आल्यावर हॉटेल बुकिंग तिथे पोचल्यावरच करण्याचा निर्णय घेऊन पुढील सर्व विमान प्रवास म्हणजे आम्हा तिघांच्या 'जनकपुर ते काठमांडू', तिथून पुढे आम्हा सहा जणांची 'काठमांडू ते पोखरा' आणि 'पोखरा ते काठमांडू' अशा प्रवासांसाठी नेपाळ मधली आंतरदेशीय विमान वाहतूक कंपनी 'बुद्धा एअर'ची तर परतीच्या प्रवासासाठी 'काठमांडू ते मुंबई' ह्या प्रवासासाठी 'इंडिगो'ची तिकिटे बुक केली.

भारत आणि नेपाळची आंतरराष्ट्रीय सीमा खुली असल्याने उभय देशांच्या नागरिकांना आपल्या शेजारी देशात जाण्यासाठी 'व्हिसा' लागत नसल्याने ते एक काम वाचले होते. सर्वसाधारणपणे भारतीय चलन नेपाळमध्ये सर्रास स्वीकारले जात असल्याचा मला पूर्वानुभव होता, पण आता ती परिस्थिती थोडी बदलली असल्याचे तसेच अनेक ठिकाणी तिथले मनी एक्सचेंजर्स भारतीय ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारत नसल्याचे त्या दरम्यान वाचनात आले असल्याने त्याची खात्री करून घेण्यासाठी थोडी चौकशी केल्यावर त्या माहितीत तथ्य असल्याचे लक्षात आले (आणि पुढे जनकपुरमध्ये काही ठिकाणी भारतीय चलन स्वीकारले जात असल्याचा, तर काठमांडू आणि पोखरामध्ये ते अजिबात स्वीकारले जात नसल्याचा अनुभवही आला).

चलनाच्या बाबतीत दुसरी समस्या म्हणजे आपल्या इथले एजंट्स नेपाळी चलनाचा फारसा साठा ठेवत नाहीत त्यामुळे त्यांचा आणि बँकांचा विनिमय दर जास्त असतो तसेच भारतीय डेबिट आणि क्रेडीट कार्ड्स नेपाळ आणि भूतानमध्ये चालत नाहीत (तसा स्पष्ट उल्लेख आपल्या कार्डांवर असतो),'ट्रॅव्हलर्स चेक्स' वगैरे सारख्या जुनाट संकल्पना व्यवहारातून अगदीच बाद झाल्या नसल्या तरी तो खटाटोप करण्यासाठी वेळ आणि इच्छा नसल्यास भरपूर रोख रक्कम १०० आणि २०० व थोडीफार ५०० भारतीय रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात आपल्या जवळ बाळगावी लागते. आमच्या नेहमीच्या एजंटने देखील आम्हाला भारत-नेपाळ सीमेवरील जयनगरला किंवा जनकपुरला आणि विमानाने येणाऱ्यांना काठमांडू एअरपोर्टवर चलन बदलून घेण्याचा सल्ला दिला होता.

अर्थात आम्ही तिघे पुढे जाणार असल्याने मागून येणाऱ्यांना चलनाची फारशी समस्या येणार नव्हती पण किमान आम्ही जनकपुरला पोचताना आणि बाकीची मंडळी काठमांडूला पोचताना अगदी थोडेफार का होईना पण नेपाळी चलन बरोबर असावे असा विचार करून आमच्या सोसायटीच्या नेपाळी वॉचमनला 'जमल्यास पाच हजार नेपाळी रुपयांचा बंदोबस्त' करून द्यायला सांगितले, आणि त्यानेही इमाने इतबारे त्याच्या अन्य सवंगड्यांकडून जमवाजमव करून ते आणूनही दिले होते. अशाप्रकारे सहलीची पूर्वतयारी करून झाल्यावर मग प्रवासाला निघण्याच्या दिवसाचे वेध लागले.

दुपारी १२ वाजून १२ मिनिटे ह्या निर्धारित वेळेपेक्षा पंधरा-वीस मिनिटे उशिराने 'पवन एक्स्प्रेसचे' कल्याण स्टेशनवर आगमन झाले. आपापल्या स्थानांवर आसनस्थ होता होता गाडीने प्लॅटफॉर्म सोडला आणि एका प्रवासी कुटुंबाचा लहान मुलगा गाडीत चढलाच नसल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यापैकी कोणीतरी साखळी ओढल्याने स्टेशनवरून पूर्णपणे बाहेर पडण्या आधीच गाडी पुन्हा थांबली. त्या मुलाला गाडीत चढवल्यावर आणि साखळी ओढल्यानंतर होणारे सर्व सोपस्कार पार पडण्यात आणखीन वीस-पंचवीस मिनिटे गेल्याने कल्याणलाच गाडी सुमारे पाउण तास 'लेट' झाली होती. अर्थात गाडी जयनगरला पोचल्यावर पुढचा 'जयनगर ते जनकपुर' प्रवास सुरु होईपर्यंत आम्हाला जवळपास सहा तास टाईमपास करायचा असल्याने गाडी चार-पाच तास लेट झाली तरी आम्हाला फरक पडणार नव्हता उलट तसे झाल्यास ते आमच्या पथ्यावरच पडले असते!

जवळजवळ भारताच्या नैऋत्येच्या एका टोकाकडून ईशान्येच्या एका टोकापर्यंत, महाराष्ट्र - मध्य प्रदेश - उत्तर प्रदेश आणि बिहार अशा चार राज्यांतून घडलेला 'कल्याण ते जयनगर' हा अनेक वर्षांनी केलेला ३७ तासांचा दीर्घ रेल्वेप्रवास गाणी ऐकत, भरपूर झोपा काढत, कधी नावेही न ऐकलेली अनेक सुंदर स्टेशन्स बघत मजेत पार पडला. नेहमीचा चहा, कोरा चहा, अद्रकवाला/मसाला चहा, कमी साखरेचा चहा, बिनसाखरेचा चहा, हाजमोला टी/लेमन टी इतके चहाचे वेगवेगळे प्रकार आता गाडीत मिळतात हे पाहून गंमत वाटली. पॅन्ट्रीचे जेवण आणि नाश्ता फारसा समाधानकारक वाटला नसला तरी डब्यातली स्वच्छता मात्र वाखाणण्यासारखी होती. कल्याणपासून सुमारे १९२५ किलोमीटर्सचा हा रेल्वेप्रवास पूर्ण करून मध्यरात्री दोन वाजता आम्ही भारत-नेपाळ सीमेवरील भारतातले शेवटचे रेल्वेस्थानक असलेल्या 'जयनगर'ला पोचलो.

जयनगरहुन जनकपूरधामला जाणारी गाडी सकाळी साडे आठ वाजताची होती आणि ती नेपाळ रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्याने तिचे IRCTC किंवा अन्य कुठल्या वेबसाईटच्या माध्यमातून आगाऊ तिकीट काढता येत नाही आणि तिचे तिकीट काउंटर गाडी सुटण्याच्या एक तास आधी म्हणजे सकाळी साडे सात वाजता उघडणार होते त्यामुळे साडे पाच-सहा तास स्टेशनवरच्या वेटिंगरूम मध्ये बसण्यापेक्षा वडिलांना थोडा आराम करता यावा ह्या उद्देशाने स्टेशनपासून ७०-८० मीटर अंतरावरच्या एका लॉजमध्ये एक रूम घेतली आणि त्यात वडील आणि आमच्या सामानाची व्यवस्था लावून मी आणि भाचा टाईमपास करण्यासाठी पुन्हा स्टेशनवर आलो.

पूर्वी दरभंगा पर्यंत असलेल्या लांबच्या आणि पॅसेंजर गाड्या आता जयनगर पर्यंत करण्यात आल्याने आणि त्या इथून अशा आडवेळी सुटत असल्याने मध्यरात्र असली तरी स्टेशन परिसरात आणि प्लॅटफॉर्म्सवर प्रवाशांची वर्दळ बऱ्यापैकी होती. स्टेशनबाहेर तर मध्यरात्रीचे अडीच वाजलेत ह्यावर विश्वासच बसणार नाही असे वातावरण होते. प्रवासी, टांगेवाले, ऑटो/सायकल रिक्षावाले, चहा-नाश्त्याच्या गाड्या आणि उपाहारगृहे देखील चालू होती.

स्टेशनसमोरच्या एका उपहारगृहात चहा-पाणी झाल्यावर नेपाळी चलनाविषयी त्याच्या मालकाला विचारल्यावर त्याने किती रुपये बदलून हवेत असे विचारले, आणि दोन-तीन हजार रुपयांपर्यंत तो स्वतः बदलून देऊ शकत असल्याचे सांगून जास्त हवे असल्यास पाच वाजेपर्यंत थांबा, 'चाचाजी' आल्यावर तुम्हाला जितके हवे तितके चलन बदलून मिळेल अशी माहितीही दिली!

आम्हाला अर्थातच जास्त रक्कम हवी असल्याने ते महामहिम 'चाचाजी' येईपर्यंत आणखीन थोडावेळ टाईमपास करण्यास आम्हाला काही अडचण नव्हती. इकडे तिकडे भटकत, थोड्या थोड्या वेळाने चहा पित पहाटे पाच वाजताच फट्ट उजाडेपर्यंत टाईमपास केल्यावर एकदाचे ते 'चाचाजी' आले असल्याचे कळले.

जयनगर स्टेशनच्या प्रवेशाच्या कमानी खालीच समोरच्या टेबलवर मोठी सुटकेस ठेऊन खुर्चीत बसलेला पासष्ट-सत्तरीच्या एक इसम म्हणजेच 'चाचाजी' ते होते. त्यांच्याभोवती चलन बदलून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक प्रवाशांचे कोंडाळे जमले होते त्यामुळे थोडावेळ समोरच्या गाडीवर परत एकदा चहा पित थांबून ती गर्दी कमी झाल्यावर त्या चाचाजींकडून वीस हजार भारतीय रुपये बत्तीस हजार नेपाळी रुपयांत परावर्तित करून घेतले.

'एका भारतीय रुपयास एक नेपाळी रुपया आणि साठ पैशांचा' भाव त्या चाचाजींनी दिला. हा भाव पुढच्या सर्व सहलीत आम्हाला नेपाळमध्ये सरकारी व्यवस्थापनात असलेल्या पर्यटनस्थळांचे प्रवेश शुल्क आणि पशुपतीनाथ मंदिरात दिलेली देणगी ह्या व्यतिरिक्त अन्य कुठेही मिळाला नाही, अन्यत्र सर्वठिकाणी कमाल 'एका भारतीय रुपयास एक नेपाळी रुपया आणि पन्नास पैशांचा तर किमान एक रुपया आणि तीस पैशांचा भाव मिळाला. त्यावेळी आणखीन दोनेक लाख रुपये त्यांच्याकडूनच बदलून घेतले असते तर सरासरी पंधरा पैशांचा फरक गृहीत धरला तरी किमान तीस हजार नेपाळी रुपये आम्हाला अतिरिक्त मिळाले असते, असो!

एकंदरीत मध्यरात्री केलेल्या स्टेशन परिसरातील भटकंती आणि भेटलेली बिहारी लोकं पहाता बिहार बद्दल जे काही चित्र आपल्या मनात माध्यमांतून आणि चित्रपट पाहून तयार झालेले असते ते कितपत खरे आणि कितपत खोटे असावे ह्याबद्दल शंका निर्माण झाली! अर्थात दुर्गम आणि ग्रामीण भागातील परिस्थिती कदाचित वेगळी असू शकेल.

जयनगर स्टेशन परिसरातील काही छायाचित्रे:

.

खेचर जोडलेले टांगे
.

सायकल रिक्षा
.

आडवारून झोपलेला माकडवाला आणि बसल्या बसल्या झोपलेले त्याचे माकड 😀
.
चलन बदलून घेण्याचे काम झाल्यावर मग नेपाळ रेल्वेचा प्लॅटफॉर्म आणि तिकीट काउंटर जे भारतीय रेल्वेच्या प्लॅटफॉर्म्स पासून थोड्या अंतरावर आहे, ते बघून ठेवण्यासाठी एक लांबलचक ब्रिज पार करून तिथे पोचलो. तिकीट काउंटर अजून बंद असल्याने तिथे व प्लॅटफॉर्मवर एक चहावाला आणि पाच-सहा प्रवासी सोडले तर फार कोणीच नव्हते.


.

.

.

.

.

वास्तविक भारत आणि नेपाळ मधल्या वेळेत फरक असण्याचे तसे काही भौगोलिक कारण नाही, परंतु नेपाळ माउंट एव्हरेस्टच्या प्रमाणवेळेचे पालन करत असल्याने आपल्या आणि त्यांच्या स्थानिक वेळेत पंधरा मिनिटांचा फरक आहे. त्यांचे घड्याळ आपल्यापेक्षा पंधरा मिनिटे पुढे असल्याने नेपाळी रेल्वेचे भारतातील तिकीट काउंटर देखील आपल्या इथल्या साडे सात ऐवजी त्यांच्या वेळेनुसार पंधरा मिनिटे आधी म्हणजे आपल्या इथल्या सव्वा सात वाजता उघडणार होते. साडेसहा वाजून गेले होतेच त्यामुळे भाचा आधीच तिकिटासाठी पहिला नंबर लावून काउंटरवर उभा राहिला आणि मी तोपर्यंत लॉजवर जाऊन आमचे सामान आणि वडिलांना घेऊन परत तिथे आलो तोपर्यंत सव्वा सात वाजले होते आणि प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या गर्दीने फुलुन गेला होता.


पहिला नंबर लावून भाच्याने तिकिटेही पहिल्या तीन क्रमांकाची मिळवली 😀

ह्या गाडीला एसी चेअरकारचा एकच डबा असून तो फुल झाल्यास 'स्टँडिंग' अलाऊड नसल्याने जनरल डब्याचे तिकीट काढावे लागते, आणि ते डबेही कमी असल्याने त्यात प्रचंड गर्दी होते आणि मुंबईच्या लोकल ट्रेन्स प्रमाणे बसलेल्या पेक्षा उभ्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक अशी परिस्थिती निर्माण होते. नेपाळी प्रमाणवेळेनुसार साडे आठ वाजता येणारी गाडी फार नाही पण पाच मिनिटे उशिराने आली तेव्हा आपल्या इथे आठ वाजून वीस मिनिटे झाली होती. आमच्या जागांवर स्थानापन्न होऊन दहा मिनिटे झाली तरी गाडी काही सुटायचे नाव घेईना, शेवटी आणखीन पाच-सात मिनिटे गेल्यावर एकदाचा तिने प्लॅटफॉर्म सोडला.


चेअरकार
.

'कल, आज और कल' 😀

जयनगर सोडल्यावर नेपाळ मधले लागणारे पहिले स्टेशन 'इनार्वा' आणि मग त्यापुढची 'खजूरी', 'महिनाथपूर', 'वैदेही', 'परवाहा' अशा एकूण पाच स्टेशन्स नंतर जेमतेम दिड तासात आम्ही 'जनकपूरधाम'ला पोचलो. हा संपूर्ण प्रवास 'तराई' क्षेत्रातून म्हणजे गंगेच्या सपाट मैदानी प्रदेशातून झाला, त्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत फक्त सपाट जमीन, हिरवी गार शेते आणि झाडे दिसत होती, ह्या क्षेत्रात डोंगर किंवा टेकड्या चुकूनही कुठे दृष्टीस पडत नाहीत.


.

.

.

.

.

.

"मुस्कुराते रहिये, आप नानिहाल मे है" अर्थात "हसत रहा, तुम्ही आजोळी आला आहात" अशा शब्दांत मिथिला नरेश 'जनक' राजाची प्राचीन राजधानी आणि 'सीतामाईचे' जन्मस्थान असलेल्या 'जनकपूरधाम' नगरात पर्यटकांचे स्वागत करणारी जनकपूर रेल्वे स्टेशन वरची पाटी!

जनकपूर स्टेशनवर उतरल्यावर कस्टम्स वाल्यांकडून सामानाची तपासणी झाल्यावर आम्ही बाहेर पडलो आणि ई-रिक्षाने मुक्काम करण्यासाठी ठरवलेल्या 'जानकी मंदिर' परिसरात पोचलो. वडील आणि भाच्याला एका उपहारगृहात नाश्ता-कम-जेवण करण्यासाठी बसवून आसपासच्या दोन-चार हॉटेल्स पैकी चांगले वाटलेल्या 'हॉटेल विवान' मध्ये तिघांसाठी एक रूम बुक करून त्यांच्या बेलबॉयला सोबत घेऊन पुन्हा त्या उपहारगृहात आलो आणि नाश्ता-कम-जेवण करून झालेल्या दोघांना सामानासकट त्या बेलबॉय बरोबर हॉटेलवर पाठवून दिले आणि माझा नाश्ता-कम-जेवण उरकल्यावर थोड्या वेळात मी पण हॉटेलवर पोचलो. रात्रीचे जागरण विचारात घेऊन आज दिवसभर फक्त आराम करायचा आणि संध्याकाळी भटकायला बाहेर पडायचे असे आधीच ठरवले होते, अंघोळी-पांघोळी उरकल्यावर मग त्याची अंमलबजावणी करत आम्ही तिघेही सरळ झोपून गेलो.

संध्याकाळी उठून आवरल्यावर पाच- साडे पाचच्या सुमारास आम्ही आसपासच्या परिसरातल्या भटकंतीसाठी बाहेर पडलो.

हेच ते जनकपूरचे भव्य आणि अतिसुंदर असे 'जानकी मंदिर'. उद्या, म्हणजे २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या निमित्ताने ह्या महाल सदृष्य भव्य मंदिरावरही विशेष रोषणाई करण्यात येणार असल्याचे वाचनात आले आहे (असेही हे मंदिर रोजच संध्याकाळी रोषणाई केल्याप्रमाणे सुंदरच दिसते त्यामुळे विशेष रोषणाई केल्यावर ते किती सुंदर दिसेल ह्याचा विचार करतोय 😍) त्यामुळे जानकी मंदिर आणि परिसरातील भटकंती विषयी २२ जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर ह्या मालिकेचा दुसरा भाग प्रकाशित करून त्यात लिहितो.

।। जय श्रीराम ।।

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

क्रमशः
पुढचा भाग - नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग २ (जानकी मंदिर)

Group content visibility: 
Use group defaults

अरे वाह
फारशा माहीत नसलेल्या भागाची सफर
सुंदर सुरुय

मस्त नेपाळला ट्रेनने गेलात ग्रेट. आता बाकीच्या भागाची उत्सुकता वाढली.
'कल, आज और कल' बद्दल - भाग्यवान आहात.

मस्त लिहिलं आहे! पुढी भागांच्या प्रतिक्षेत.

जनकपूर बद्दल फार काही माहित नव्हतं. तसच जयनगर पासून नेपाळला रेल्वे आहे हे ही माहित नव्हतं. पुढे लिहा पटापट.

झकासराव | mandard | Sparkle | मेघ | चिन्गी | पराग
प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे मनःपुर्वक आभार _/\_

पुढचा भाग - नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग २ (जानकी मंदिर)