सोबत

Submitted by रघू आचार्य on 12 January, 2024 - 08:56

वैधानिक इशारा : शीर्षकावरून गुलजारचा चित्रपट असल्याचा गैस होईल. पण लेखक पॅरानॉर्मल गुलजार अर्थात रामसेंचा चाहता आहे तसेच भयंकर आळशी आहे. हा भाग लिहायला सहा+ महीने लागलेले आहेत. पुढचा भाग कधी येईल सांगता येत नाही. आयडी उडाला नाही तर तीन तास ते कधीही. आपल्या जबाबदारीवर वाचायला सुरूवात करावी
#############################

भ्या चढाच्या वळणावर इंजिननं झटके मारले..

वातावरण कवितेतल्याप्रमाणे पावसाळी असलं तरी घन ओथंबून नाही तर गद्यातल्याप्रमाणे टरारून फुगून आलेले होते.
अजून दिवसाचा एक प्रहर शिल्लक होता तरीही अंधारून आलेलं होतं. कुठल्याही क्षणी मुसळधार पाऊस सुरू होईल असे वाटत होते.
सुस्तावलेल्या अजगरासारखा लांबच लांब रस्ता वळणं घेत घेत वाकुल्या दाखवत होता.
एक तर अरूंद रस्ता. एका बाजूला खाई.दुसर्‍या बाजूला डोंगर. खाईच्या बाजूला दाट झाडी.

एखाद्या वळणावर अंदाज चुकला तर खाईत जाऊ कि झाडाला आदळू याचं कसलंच जज्जमेण्ट येत नव्हतं. थोड्या वेळापूर्वीच सिंगलचा कार्यक्रम उरकण्यासाठी झाडीत गेलो तेव्हां पाय घसरला होता. खाली दरी होती कि खाईत डोंगराला उगवललेला एखादा छज्जा कळायला मार्ग नव्हता. मुरूमात शूज रूतला आणि धरायला फांदी मिळाली, नाहीतर मग हे सांगता आलं असतं का ?

अंगाला थंड कापरं भरलं म्हणून सिगरेट काढली. ओठात ठेवली. पण ओली असल्यानं पुन्हा खिशात ठेवून दिली. लायटरने पण मान टाकली होती.
ओव्हरनाईट किंवा जास्त जायचं असेल तर ठरलेल्या सामानात माचिसचा बॉक्स असतो. पण त्याचीही वेगळी अवस्था नसणार. सर्वांगाचा कंप थांबल्यावर विरूद्ध बाजूला जाऊन हलकं होऊन घेतलं होतं.

हा उशीरच नडला.
घाट आणि जंगलाचा हा रस्ता अजून तीन चार साडेचार तास शिल्लक होता असं मघाशी रेंज मधे गुगल मॅपने सांगितलं होतं. साधारण तासभर गाडी चालवली असेल. अजून साडेतीन तास तरी शिल्लक होता रस्ता.

रस्त्याने चिटपाखरू नव्हतं असे अशा वर्णनात म्हटलेले असते. पण नाही. विचित्र आवाजाचे किडे आणि काही पाखरं दिसतात. काचेवर, हेडलाईटवर सातत्याने आदळत असतात. अधून मधून टोळधाड यावी तसे चतुरांचा थवा येतो. त्याने व्हिजिबिलिटीत आणखी फरक पडतो. कुठे तरी दोन डोळे लुकलुकताना दिसतात. मुक्तपीठ असतं तर ते उंदीर,कुत्रं निघतात.

पण इथे रिअ‍ॅलिटी होती. इथे बिबळ्याचा मुक्त वावर असतो. कुणी कुणी ढाण्या वाघ सुद्धा पाहिल्याचे छाती ठोकून सांगितलेले असते.
काही वर्षांपूर्वी याच भागात कुठे तरी आलेलो नाही का ?

मी पाठीमागे बसून भैरवी बरोबर हास्य विनोद करत होतो. तिला इथल्या ऐकीव भूताखेताच्या गोष्टी सांगत होतो. तेव्हां ती घाबरत होती आणि त्यामुळे हसायला येत होतं. अशा प्रवासात असं घाबरणारं कुणी असलं कि चेव चढतोच. त्यातून स्त्री गिर्‍हाईक मिळाल्याचा आनंद औरच असतो. मजा येते खरी पण बायका खरंच घाबरतात कि आपल्याला वेड्यात काढून स्वत:चा सीक्रेट टाईमपास करतात हे कोडंच आहे. म्हणजे आपण घाबरलो कि हा किती चेकाळतो याचा अदमास घेणं हा बायकांचा राखीव टाईमपास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा यांचा जन्म अदमास घेण्यासाठीच असतो. ( पोलीस सुद्धा तपास करताना बायकांची मतं बारकाईने विचारात घेतात).
अशा वेळी एव्हढा विचार न करता आपापल्या रोल शी प्रामाणिक राहून आपले मनोरंजन करून घ्यायचे. तिचं ती करून घेईल. तिचा विचार करून आपल्या डोक्याची मंडई होऊ द्यायची नाही. काहीच तासांची ओळख आणि तितकीच सोबत होती तिच्याशी. आता तर चेहराही अंधुक सुद्धा आठवत नव्हता.

त्या वेळी ड्रायव्हर गाडी चालवत होता.
आज कळत होतं एकट्याने चालवताना.
त्या ड्रायव्हरला तरी काय म्हणायचं ? उगाच त्याला ओरडलो होतो. त्या वेळी शाळेत मुक्काम लावून दिला होता सरपंचांनी. बाई माणूस म्हणून तिची सोय बायकांनी व्यवस्थित केली होती. रात्री सरपंचाकडे जेवण उरकल्यावर सरपंच साहेब,त्यांची माणसं आणि ड्रायव्हर, गावातला एक पोलीस असे सगळेच फतकल मारून बसलेले होते. मग कसली झोप ?

रात्रभर गप्पा. त्यातूनच वाघ, बिबळे, लांडगे, रानडुक्कर यांच्याबद्दल समजलं. भेकर पण असतं इथे. त्याची शिकार करतात लोक. ससे पण मारून खातात. ऐकलं होतं. पण हरीण, ससे असे सुंदर आणि गरीब प्राणी मारून खाणार्‍यांबद्दल थोडा वेळ चीडच आली. आणि मग हमखास निघणारा विषय !

भुताखेतांचा !
चकवा, डाकीण, हडळ अशी विविध भूतं या संपूर्ण भागात होती. तसा घाट आणि जंगलाचा हा भाग म्हणजे खूप मोठा पट्टा. जवळपास दोनशे किमीचा. त्यात वळणं. अशा रस्त्याला वाहनचालकांना आलेले अनुभव ऐकत रात्र कधी सरली समजलंच नाही.
त्या वेळी असंच फिरणं असायचं. अशा मैफिली रंगायच्या. तरीही दुसर्‍या दिवशी डोंगर,शिखर सर करायची कामगिरी पार पडायची. आता रात्र जागून असं काही करण्याची हिंमत आणि ताकद दोन्ही उरलेलं नाही.

डोळ्यापुढे अंधेरी आलेली दोनेक वर्षांपूर्वी. शुगर काठावर निघाली.
साहसी मोहिमा बंद पडल्याचं वाईट वाटत होतं. सगळेच सवंगडी पांगले होते.
मुळात बायकोला हे असं घरदार टाकून डोंगर चढायला जायचं आवडत नव्हतं. कधी काय होईल ही तिची भीती.
शेवटी जोडीदाराच्या अपेक्षांना फाट्यावर मारून चालत नाही. यात कुठलेच स्पेस वर आक्रमण वगैरे मानून घ्यायची गरज नसते. प्रेम असतं त्यात. मुलाबाळांची काळजी असते. धोक्याची घंटा वाजत असते डोक्यात.

जबाबदार्‍या आलेल्या असताना आपल्या छंदासाठी असं रानोमाळ भटकायचं तर सडाफटिंग रहावं किंवा मग आधीच न विसरता सांगायला हवं होतं. किंवा त्यातल्याच कुणाशी तरी संसार थाटलेला बरा असतो. पण विरूद्ध आवडी सुद्धा विजातीय चुंबकासारख्या ठरतात कधी कधी संसारात.

निसर्गाने शुभ्र कापसाची रजई ओढून घ्यावी असे दृश्य आजूबाजूला होते. दरीत ढग उतरलेले होते. डोक्यावर काळे ढग होते. समोर नजरेच्या टप्प्यात दरीत पाऊस चालू होता. तो कधीही इकडे सरकेल आणि रस्त्याला झोडपून काढेल ही भीती होती.
आता किमान चौथ्या गिअरवर गाडी ठेवावी आणि जेव्हढा पल्ला कापता येईल तेव्हढा कापावा.

रस्त्यात कुठे वस्ती दिसली तर मुक्कामच करावा हे अशा वेळी बेस्ट असतं. किमान एखादं चहाचं खोपट तरी लागतं अशा ठिकाणी. थोड्या वेळापूर्वी याच परीसरातल्या लोकांना सोडून आलो होतो. गेल्या खेपेला शोधासोध करताना त्यांची खूप मदत झाली होती. त्या मोहिमेची आठवण झाली आणि अंगावर शहारा आला.

आणि जे होऊ नये ते झालं.
पावसाची भुरभुर सुरू झालेली होती.

आयडलला किंवा खालच्या गिअरला गाडी बंद पडत होती सारखीच. महिनाच झाला होता एक्स्टर्नल हायब्रीड कीट बसवून. ईसीयू ने कुठलीही एरर दिली नव्हती. मित्रांनी एक्स्टर्नल किट नको म्हणून दिलेले सल्ले धुडकावून जरा जास्तीची बॅटरी टाकली होती. इंजिन नसतं तर लोड कमी झाल्याने जवळच्या प्रवासाला रोजच्या रोज वापरता येईल इतपत बॅटरीवर झाली होती. पण इंजिनच्या धुडामुळे ५० ते १०० किमी इतकी रेंज मिळत होती. पण एकच अडचण म्हणजे इंजिन चालू ठेवावं लागत होतं आणि बॅटरीवर टाकावी लागत होती. थोड्या वेळाने इंजिन आपोआप बंद व्हायचं. महिनाभर अगदी व्यवस्थित चालली गाडी.

आता मात्र तिने चालू व्हायला नकार दिला.थोड्या वेळात संध्याकाळ होईल आणि लागलीच रात्रीचा अंमल सुरू होईल.
तसा दिवस अंधाराने खाल्लाच होता. रेनकोट च्या ऐवजी छत्री होती. तिचा फारसा उपयोग नव्हता.

बॉनेट उघडलं. पदवीने इंजिनियर असून उपयोग नसतो. अशा वेळी मेकॅनिकच कामाला येतो.
तरी स्पार्कप्लग चेक केले. कॉईल, केबल चेक केली. मोबाईलचा टॉर्च जितका कमी वापरावा तितके अशा प्रवासात चांगले असते. मागून किंवा समोरून एकही वाहन अद्याप आलेले नव्हते. या भागात अमावस्या पौर्णिमेला लोक प्रवास करणे टाळतात. ऐकलेले आत्ता आठवले.
केबल शॉर्ट होती. ब्लेडने छिलून तिथे सामानातली तांब्याची तार टाकली. वरून टेप गुंडाळली. एव्हढ्याने काम झालं तर झालं. चिंब भिजलो होतो.

कुणी बघत नाही हे बघून छत्री घेतली. तसंच झाडाखाली कपडे बदलले. ओले कपडे पिशवीत ठेवले. ती मागे डिकीत टाकून दिली.
गाडीत येऊन बसलो. स्टार्टर दिला आणि पहिल्याच फटक्यात गाडी स्टार्ट झाली. अंदाजपंचे दहाव्वोदरसे हा जुगाड कामाला आला होता.
आता कोणत्याही परिस्थितीत सुसाट जाणे आवश्यक होते. केबलला आणखी काही झालं तर तारही शिल्लक नव्हती. ना जागा उरली होती तार घालायला.

पण हाय रे कर्मा !
केव्हढा तरी खराब रस्ता पुढ्यात होता. पावसाने पुण्यातल्या रस्त्यांचे डांबर उखडून जावे आणि पुणेकरांनी मनपाचा उद्धार करावा तसंच आत्ता मी रस्ते बांधणार्‍यांचा उद्धार करत होतो. कधीतरी हा राज्य महामार्ग होता आणि दोन राज्यांना जोडतही होता. पण नंतर एक्स्प्रेसवेज झाल्याने पब्लीक हा जंगलचा रस्ता टाळून लांबच्या एक्स्प्रेसवे जात होतं.

इथे म्हणूनच रहदारी कमी. स्थानिक आणि दर्दी लोकांची.
त्यात निसर्गाचं सौंदर्य टिपणारे येत. काही साहस म्हणून येत.
काहींना इथल्या डोंगरांचा अभ्यास करायचा असायचा. लाव्ह्यातून बनलेला बेसॉल्ट खडक.
रत्नांची खाण असते अशा ठिकाणी. ट्रेझर हंट वालं पब्लीक सुद्धा असतं.
आणि अवैध वाहतूक, अंमली पदार्थांचे व्यापारी यांच्यासाठी हा रस्ता राजमार्ग होता..
तसाच तो पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटीज वाल्यांसाठी सुद्धा खुणावत होता. हल्ली तर या रस्त्यावर असे लोक आणि युट्यूबर्स खूप वाढले होते.

पाच ते दहाच्या वेगाने बराच काळ कार पळत होती. अजूनही बॅटरीवर घेतलेली नव्हती.
निघताना टाकी फुल्ल होती. पण कच्च्या रस्त्याने आणि चढामुळे बरंच पेट्रोल खाल्लं गाडीने. मधे काही लोक गाडीत घेतले होते. मागे कधी तरी त्यांच्याकडे गेलेलो. त्यांना त्यांच्या गावात सोडून आलो. अशा सर्व उपद्व्यापामुळे पेट्रोलचा अंदाज चुकणार होता.

घाट संपल्यावर जंगलात काही गावं लागतात. तिथे कुठेतरी पेट्रोलची व्यवस्था होईल. पण नेमकी कुठे ते सांगता येत नव्हतं. कार अशी पळवली तर फ्युएल इंडीकेटर झटक्याने मान टाकत टाकत जीव सोडण्याची शक्यता दाट दिसत होती.
मोबाईलची रेंज केव्हांच गेली होती. तास दीड तास झाला.
ऑडोमीटर पाहिला तर फक्त पंचवीस किमी अंतर कापले होते.

बर्‍यापैकी डांबरी रस्ता सुरू झाला. चढण बंद होऊन आता सपाट रस्ता होता. बहुतेक घाटमाथा होता. आता कधीतरी उतार सुरू होईल. मग पेट्रोल वाचेल आत्ता वाया गेलेले.
म्हणून आता गिअर टाकणार इतक्यात ....
समोर धोक्याचे वळण आले. एकदम शहाण्या मुलासारखा वेग कमी करून थांबलो.
हेच ते वळण. गेल्या वेळी ड्रायव्हरकडून कार घेऊन सुसाट चालवताना....
त्या आठवणीने घाम फुटला.

एक्सलेरटेरवर प्रेशर देताच इंजिनाचे ठोके धडधडू लागले.
पावसाने वळण अधिकच धोक्याचे झाले होते. समोरची दरी फक्त पांढर्या रंगाची झाली होती.
डाव्या बाजूला डोंगराचे आकार त्यातून उगवलेले होते. एलईडी हेडलाईटने हार मानली होती.
नजर या वातावरणाला सरावत असताना समोर...

समोर त्या वळणावर एक मनुष्याकृती उभी असल्याचे अस्पष्टसे दिसले.
कोण ?

(क्रमशः)
ताक : आयडी नवीन नाही. कुणी तरी आचार्य "असल्या" कथा लिहीतात यामुळे भावना दुखावू नये म्हणून आयडीत बदल केला आहे.
पुढच्या भागाकडे जाण्यासाठी
https://www.maayboli.com/node/84563

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात एकदम जबरदस्त..!

कथानायकाला चकवा लागणार असं वाटतेयं.
जास्त उत्सुकता ताणून न धरता कथालेखक वेळेत कथा पूर्ण करतील अशी आशा बाळगते.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!

शेवटी जोडीदाराच्या अपेक्षांना फाट्यावर मारून चालत नाही. यात कुठलेच स्पेस वर आक्रमण वगैरे मानून घ्यायची गरज नसते. प्रेम असतं त्यात. मुलाबाळांची काळजी असते. धोक्याची घंटा वाजत असते डोक्यात.<>>> हे आवडलं.

रूपालीताई साहेब,
तुम्ही दुष्ट आहात. जर कुणीच वाचली नाही तर लोळत पडता आले असते. एकाने जरी वाचली ( आणि तसे कळवले) कि पूर्ण करत नाही तोपर्यंत अपराधी असल्यासारखे वाटत राहील. तुम्ही कामाला लावलंत कि ओ Sad
Light 1

मनापासून आभार आपले. __/\__

आपण घाबरलो कि हा किती चेकाळतो याचा अदमास घेणं हा बायकांचा राखीव टाईमपास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा यांचा जन्म अदमास घेण्यासाठीच असतो. >>
निरीक्षण विचारप्रवर्तक Happy

हा भाग वाचला, आवडला. येऊ द्या.
बाकी, आपल्याला असं वाटतं की गोष्ट आपण लिहितोय किंवा लिहिण्याचा निर्णय घेतोय. पण आपण माध्यम असतो.
म्हणजे बऱ्याचदा गोष्टीलाच स्वतःला उघड करायची इच्छा होते, आणि ती त्यासाठी एखाद्या माध्यमाच्या शोधात असते. आपण तिला सापडतो. आणि तशी तिनं एकदा मानगूट पकडली की मग तुम्ही तिला अर्धवट सोडायला स्वतंत्र राहत नाही. Happy

बाकी, 'हिंदू'वाले खंडेराव वस्ताद म्हणतात की 'तू गोष्टच सांगत जा राव..!'
त्यांचं तरी तुम्ही ऐकलं पाहिजे.

जबरदस्त जमली आहे कथासाहसाची आवड असलेला आणि नसलेला पार्टनर याबद्दल वाचताना आमचीच आठवण आली.
लवकर लवकर पुढचे भाग येउद्यात.

वैधानिक इशारा Lol
जबरदस्त आवडला हा भाग. निसर्गाचं वर्णन, बायकोची काळजी आणि स्त्री-स्वभावाचा 'अदमास'ही अफाट. Happy

-----------------

कुणालाही घाबरत नाहीत स्त्रिया, तो टाईमपासच असतो. Wink

संप्रति, अगदी. लेखनच आपल्याकडं येतं, आपण उगा निवांत बसायचं. आपण त्यामागं धावाधाव केली की दुसऱ्याची पोतडी 'आपलीच' समजून घेऊन येतो, तिथून मग माती व्हायची दाट शक्यता समजा...! Happy

भारी..
हा भाग लिहायला सहा+ महीने लागलेले आहेत. पुढचा भाग कधी येईल सांगता येत नाही. आयडी उडाला नाही तर तीन तास ते कधीही.>> असं नका हो बोलू. आता कथा पुर्ण केल्या शिवाय तुमची सुटका नाहीच. Light 1
मुक्तपीठ असतं तर ते उंदीर,कुत्रं निघतात. >> Lol
मुपि वरच्या मांजरवाल्या ताई आठवल्या.

आयडी नवीन वाटला पण वाचायला सुरुवात केल्यावर अंदाज आलाच. Proud

सर्वांचे धन्यवाद.

बाकी, आपल्याला असं वाटतं की गोष्ट आपण लिहितोय किंवा लिहिण्याचा निर्णय घेतोय. पण आपण माध्यम असतो.
म्हणजे बऱ्याचदा गोष्टीलाच स्वतःला उघड करायची इच्छा होते, आणि ती त्यासाठी एखाद्या माध्यमाच्या शोधात असते. आपण तिला सापडतो. आणि तशी तिनं एकदा मानगूट पकडली की मग तुम्ही तिला अर्धवट सोडायला स्वतंत्र राहत नाही. Happy

सामो, आभारी आहे.

असं नका हो बोलू. आता कथा पुर्ण केल्या शिवाय तुमची सुटका नाहीच. >> वीरू Rofl

बाकी, 'हिंदू'वाले खंडेराव वस्ताद म्हणतात की 'तू गोष्टच सांगत जा राव..!'
त्यांचं तरी तुम्ही ऐकलं पाहिजे. >> क्या बात है , संप्रति ! असा कधी विचारच नाही केला. अर्थात एखादा भुरटा चोर आणि शालिमार मधला आंतरराष्ट्रीय दर्जाचा चोर यात जो फरक असतो तसाच लेखक आणि माझ्यात आहे.

अस्मिता - हुरूप वाढवण्यासाठी धन्यवाद मनापासून. एखाद्या आळशी मुलाकडून हुषार क्लासटीचर जसा होमवर्क करून घेते तसंच Happy

किल्ली,मी_अनु, आबा,श्रद्धा धन्यवाद सर्वांचे.