बकेट लिस्ट

Submitted by nimita on 27 December, 2023 - 11:51

दर वर्षी नव्याने बनवते मी माझी ‘ बकेट लिस्ट ‘

काठोकाठ भरून जाते इच्छा आकांक्षानी माझी ती बकेट

अगदी तळाशी असतात – सरल्या वर्षाच्या अपूर्ण इच्छा

अर्ध्यातच उन्मळून पडलेले स्वप्नांचे धुमारे

असतात कितीतरी संकल्प – स्वतःच स्वतःसाठी ठरवलेले

बघता बघता अर्धी बकेट भरून जाते त्या निरर्थक ओझ्याने

उरलेल्या जागेत मात्र मी बरंच काही टाकत राहते

जसं लक्षात येईल तसं; जिथे जागा दिसेल तिथे

खूप काही कोंबत राहते

काय नसतं त्या अवजड, बोजड झालेल्या बकेट मधे…

बाबांशी गप्पा मारायला राखून ठेवलेला एक दिवस

आईच्या कुशीत, तिच्या पदराआड लपलेली ती शांत झोप

बरसत्या श्रावणात हातात हात गुंफून चिंब भिजलेलं ते निरागस मैत्र

स्वतःच्याच सहवासा साठी आसुसलेलं ते माझं एकाकी मन

माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेला तो एक उनाड दिवस

मधूनच डोकावते एका सुरेल गाण्याची बेसूर लकेर –

आठवण करून देते त्या अपूर्ण राहिलेल्या युगलगीताची

जणू काही सुचवत असते मला –

‘ एकदा आळवून बघ त्या ओळी… निदान मनातल्या मनात तरी ‘

मग मी ही ठरवते – या वर्षी ही बकेट नक्की रिकामी करायची

मनातली प्रत्येक इच्छा, डोळ्यांतलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं

पण… पण आता त्या बकेट मधे दुसराच पसारा दिसतो

इतरांच्या अपेक्षांचा, माझ्या कर्तव्यांचा अतूट गुंता असतो

खूप प्रयत्न करते तो गुंता सोडवायचा…

त्याखाली अडकलेली माझी बकेट लिस्ट शोधायचा

पण त्या गुंत्याचं ते मोकळं टोक काही केल्या सापडत नाही

आणि मग त्या सगळ्या गुंत्यात मीच गुंतून पडते

हळुवार हाताने एक एक धागा मोकळा करताना

ते पूर्ण वर्ष मात्र पुन्हा एकदा गमावून बसते

पण मग नव्या वर्षी पुन्हा नव्याने सापडते मला

माझी ‘ बकेट लिस्ट ‘

त्या बकेटच्या तळाशी विसावलेली –

नव्या उमेदीने माझी वाट बघणारी

माझी स्वतःच स्वतःसाठी बनवलेली ‘ बकेट लिस्ट ‘

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छाने

छान.