भांगड्यांचा भांग-डे

Submitted by अजित केतकर on 18 March, 2022 - 05:09

आम्ही पाचवी-सहावीत असताना आमच्या सोसायटीतल्या उत्साही मंडळींना एकदा तरी भांग प्यायची इच्छा झाली. सगळ्यांनाच कंड फार होती त्यामुळे भांग जास्तीत जास्त चढायला शक्य असलेले सगळे प्रकार करायचे ठरले. पहिला म्हणजे विकतच्या गोळ्या, पावडर किंवा आयती दुधातून मिळते तशी नको, त्यात भेसळ असेल. आपल्याला एकदम "पीवर पायजे" म्हणून भांगेचा पाला आणून सुरुवात करायचे ठरले. योगायोगाने बाबांच्या एका भय्या मित्राने अलाहाबादहून भांगेचा पाला आणून द्यायचे कबूल केले आणि सोसायटीतल्या मंडळींना भांग विषय चढला.

भांगेचा पाला आला. सलग दोन दिवस सुट्या पाहून त्या आधीची संध्याकाळ ठरली.. बाकीचा खानपानाचा बेत पण चढाईशीर ठरला.

"जाम चढली पाहिजे" यावर आम्हा उत्साही मंडळींचे एकमत होते. माझ्या आईने तिच्या आजोळी भांग प्रकार चांगलाच पहिला होता. त्यामुळे आम्हाला ती गूढ हसून सांगायची, "तुम्ही करा आणि प्या हव्वी तेवढी, मी अज्जिबात पिणार नाही. पण तुम्हाला हवी ती मदत करीन आणि दुसऱ्या दिवशी भरपूर पोळ्यांची चळत बडवून ठेवीन." आईने आणखीन दोन काकूंना तिच्या बाजूने करून घेतले आणि त्या तिघी सोडून आम्ही बाकी सगळे तराट व्हायची वाट पाहू लागलो.

सकाळी भांगेचा पाला वाटायला घेतला. सगळ्यांचे म्हणणे.."मिक्सर मध्ये नको, त्यात रस नीट उतरत नाही, पाट्यावर वाटू..... जाssम चढली पाहिजे". पाटा वरवंटा काढून त्यावर वाटायला बसलो. 'वाटणाऱ्याला वाटतानाच चढायला लागते' असे ऐकले असल्याने वेगळ्या उत्साहात काम चालले होते. पण प्रत्यक्षात तसा अनुभव आला नाही. आळीपाळीने आम्ही दोघातिघांनी मिळून सगळा पाला छान गुळगुळीत वाटला. बाकी काही जण दूध आटवत होते. दुपारी दुधात साखर, वेलची, मसाला, खसखस, जायफळ आणि शेवटी वाटलेला पाला मिसळला आणि स्वकष्टाची थंडाई तयार झाली. 'त्यात तांब्याचा पैसा टाका आणि ताणा म्हणजे आणखीन चढेल' अशी आईने पुडी सोडली. त्यामुळे दोन चार तांब्याची नाणी पातेल्यात टाकली. भांग ताणणे म्हणजे ती एका भांड्यातून उंचावरून धार सोडत दुसऱ्या भांड्यात ओतणे..पण आमच्यातल्या कोलेजवाल्या दादा मंडळींना हे पुरेसे नव्हते "हँ, तू चल गच्चीवर" म्हणत दोन्ही पातेली घेऊन आम्ही गच्चीवर गेलो. धार उंच उंच करत शेवटी ओतणारा पाण्याच्या टाकीवर चढला आणि खाली पातेल्यात धार ओतली..एकाच ध्यास "जाssssम....."

बैठक सजली, भांगेच्या दुधाची - थंडाईची पातेली, प्याले, भाज्यांची ताटे, पुरी भाजी, जिलब्या यांनी मधला भाग सजला आणि भोवताली २०-२५ (होऊ घातलेले) भांगडे आपला भांग डे साजरा करायला उत्सुकतेने बसलेले.

जय भोलेनाथ करून भांगप्राशनाला सुरुवात झाली.. सजवलेल्या आटीव दुधामुळे थंडाई खूपच छान लागत होती. ग्लास रिकामे होत होते. वर "अरे, भजी सरकव ती.... जाssssम......." हे चालू होते.
पातेल्यातील थंडाई खाली खाली जाऊ लागली आणि आम्हा भांगड्यांचे रंग बदलू लागले..
भांगेची नशा 'गांडू नशा' आहे म्हणतात त्याची प्रचिती येऊ लागली. कोणी हसायला लागले तर हसतच बसले. कोणी बसल्या जागी सतत डुलायला लागले :). माझ्याहून एक लहान मुलगा मात्र रडायला लागला. डोळ्यापुढे वेड्या वाकड्या रंगीत फ्रेम दिसतायत... मला नको हे..करून झोपायला गेला पण झोप लागली नाही. शेजारचे काका आमच्या दुसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीत खाली वाकून हात हालवत होते.. जमिनीला हात लागतोय बघ..सांगत होते. एकजण थंडाईच्या पातेल्यात बराच वेळ डाव ढवळतच बसला होता. काय करतोय विचारले तर "अरे ग्लासात भरून घ्यायची आहे पण घेता येत नाहीये" म्हणाला. भांगेच्या नशेमध्ये चालू क्रियेत बदल करणे कठीण होऊन बसते आणि माणूस तीच तीच क्रिया बराच वेळ करत रहातो. शुद्धीतल्या तिघी जणी हसत हसत सगळ्यांवर लक्ष ठेऊन होत्या. अगदीच कोणी खरोखरीच बेचैन झाला तर त्याची उतरवायला चांगले आंबट लिंबू पाणी करून ठेवले होते.

आपलीच मजा होतेय हे कळत होतं पण थांबवता येत नव्हते. सगळे मजा घेत होते पण कुठेतरी "आता बस्स" असे वाटायला लागले. रात्रभर कोणीही झोपायचे नाही आणि कोणाला झोपू द्यायचे नाही असे आम्ही ठरवले होते पण हळूहळू एकेक विकेट पडायला लागल्या. मोठ्या मुश्किलीने काही जण आपापल्या घरी गेले (असावेत Happy ), काही आमच्याच घरी बसल्या जागी आडवे झाले. तोंड धुवायला गेलो तर बेसिन पाशी भाऊ ब्रशकडे पहात उभा आणि नळ सोडलेला. काय प्रकार आहे विचारले तर म्हणाला "ब्रश हवाय पण हात वर जात नाहीये". मोठ्या प्रयासाने शेवटी त्याला ते जमले. कसे बसे चटया, सतरंज्या टाकून आम्हीही झोपलो. सकाळी ११ वाजता भुकेने जाग आली. अजून नशा पूर्ण उतरलेली नव्हती. पण बरेचसे ठिकाणावर आलो होतो. आईची हाक आली "उतरली असेल तर बसा खायला" तिला आमच्या भांगोत्तर भुकेचा पक्का अंदाज होता. नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट पोळ्या रिचवल्या. एकीकडे आई सांगत होती "गावाला कोणाच्या कार्यात गमतीत फजिती करायची असेल तर तुमच्यासारख्या आठ दहा टोणग्यांना असे भांग देऊन शेवटच्या पंक्तीला जेवायला बसवायचे. वाढपी शेवटी भांडी वाजवत हात जोडून आलाच पाहिजे Happy . भांगेची नशा वाईट.. पण भांग खूप गुणकारी.. रक्त शुद्धी होते, भूक चांगली लागते". मला अधून मधून थोडा डुलताना पाहून शेवटी आईने प्रश्न टाकलाच "मग, आता पुनः केव्हा बेत?" मला निरुत्तर करून आईने उत्तर मिळवले. सगळ्या "जाsssम चढली पाहिजे" वाल्या उत्साही मंडळींची हौस फिटली होती. पण एकदा या गमतीदार त्रासाची मजा अनुभवायची सगळ्यांची इच्छा मात्र १००% पूर्ण झाली .

पुढे ८-१० दिवस सोसायटीत स्वतःच्या फजित्या सांगणे आणि दुसऱ्यांच्या ऐकणे याशिवाय दुसरा विषय नव्हता. अजूनही त्या आठवणी मन भांगडू भांगडू करून टाकतात.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रोचक अनुभव आहे. वाचताना फारसं विनोदी नाही वाटलं, पण तुम्हाला त्या वेळची परिस्थिती आठवून हसू येत असणार नक्की!

काही वर्षांपूर्वी बनारसला गेलो होतो
माझ्या मित्राने भांग लायसन्स शाॅपमधून आणायला सांगितली.
सुकामेव्यात भांग मिक्स केलेले पेढे(गोला) घेउन आलो होतो.

त्याने त्यातील एक मला खायला लावला होता.
मग काय काही वेळात असे वाटू लागले की माझे पाय जमिनीवर न पडता नसून मी हवेत चालतोय Wink

(आजकल पाव जमींपर नहीं पडतें मेरे)

एकदा तरी आयुष्यात प्रत्येकाने घ्यावा असा अनुभव Happy