योग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर

Submitted by मार्गी on 14 October, 2017 - 07:13

योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर

२९ सप्टेंबर. काल चांगली झोप झाली. आज ह्या प्रवासाचा दुसरा दिवस. आज एक घाटही आहे. पण आता बोगद्यामुळे कात्रज घाट फक्त साधा चढ उरला आहे. तरीपण सुरुवातीला सलग बारा किलोमीटर चढ असेल आणि त्यानंतर सलग पंचवीस किलोमीटर उतार आणि मग थोडा चढ- उतार असेल. आणि आज माझ्यासाठी अगदी नवीन असलेला रस्ता सुरू होईल.

सकाळी निघताना वाटलं की, धुक्यामुळे कदाचित थोडं उशीरा निघावं लागेल. पण वेळेवर निघालो. सामान नीट बांधताना थोडी अडचण येतेय. ते परत परत ठीक करावं लागलं. सकाळी इतक्या लवकर म्हणजे सव्वा सहाला माझी एक वाचिका मैत्रीण मला शुभेच्छा द्यायला भेटली! माझ्या लेखनामुळेच तिच्याशी ओळख झाली आहे! लवकरच बोगद्याच्या आधीचा चढ सुरू झाला. पूर्वी इथे केलेल्या काही राईडस आठवत आहेत. सकाळची प्रसन्न हवा आणि किंचित थंडी! त्यामुळे चढ काही विशेष वाटला नाही. हळु हळु पुढे गेलो. एका जागी थांबून ब्लिंकर सुरू केलं. हा जवळपास १४०० मीटरचा बोगदा असेल. त्यानंतर नजारा एकदम बदलून जाईल व खूप विस्तृत कॅनव्हास समोर येईल आणि मोठा उतारही मिळेल. हा चढ चढतानाच एक सुंदर तळं दिसलं. पण आता हळु हळु आता ते शहराने गिळंकृत केलं आहे.


जांभुळवाडी तळे किंवा त्याचा उरलेला भाग..

... हा बोगदा पूर्वी तीनदा सायकलवर केला आहे. पण तरीही थोडी धाकधुक वाटतेय. ब्लिंकर असल्यामुळे मागून येणा-या वाहनांना माझी सायकल दिसते आहे. आणि सकाळची वेळ असल्यामुळे वाहतुकही फार नाहीय. पण तरी मध्ये मध्ये हॉर्न वाजवणारी वाहनं! वाढलेला श्वास! आणि कुठे कुठे डोंगरातून गळणारं पाणी! हळु हळु बोगदा पार झाला आणि समोरून उजेड यायला लागला. आणि संपला बोगदा! आता मोठ्या उताराची मजा! सलग चोवीस किलोमीटर उतार!

इथून नेहमी सिंहगड दिसतो, पण आज धुकं/ ढग असल्यामुळे दिसत नाहीय. सिंहगड माझा सायकलिंगचा सोबती आहे! सिंहगड! मराठा इतिहासाचा एक मूक साक्षीदार!! आज थोड्या वेळाने कपूरहोळ गावातून जाईन. इतिहासात हे गावही महत्त्वाचं आहे. कारण ह्याच गावच्या धाराऊंनी संभाजी राजांना दुध पाजलं होतं. ह्या विचारात पुढे निघालो. 'योग- ध्यानासाठी सायकलिंग' बोर्ड लावल्याचा उपयोग होतोय. अनेक लोक ते वाचत आहेत. तसंच माझ्या शर्टावर लिहिलेलं 'योग- ध्यान' सुद्धा बघत आहेत.

थोड्या वेळाने नाश्ता करावासा वाटला. कारण त्यामध्ये जास्त गॅप व्हायला नको. पण मग वाटलं की, अजून पुढे जाऊन करेन. तरी पण एक चिक्की खाल्ली. उताराचा आनंद घेत पुढे गेलो. शेवटी‌ कपूरहोळ गाव गेल्यानंतर हायवे सोडताना नाश्ता केला. इथून भोर फक्त चौदा किलोमीटर आहे आणि अजून सकाळचे नऊसुद्धा वाजलेले नाहीत. म्हणजे मी आजसुद्धा खूप लवकर पोहचेन. अर्थात् इथून पुढे थोडा चढही लागेल. पण तरीही सहज पुढे जात गेलो.

हायवे सोडल्यानंतर भोरचा रस्ता घेतला, तसा नजारा आणखीन सुंदर झाला. अगदी शांत परिसर आणि शानदार रस्ता! आणि दूर दिसणारे डोंगर! मध्ये मध्ये छोटी गावं आणि कालवे लागत आहेत! चांगला नाश्ता केल्यामुळे थकवाही वाटत नाहीय. एक नदी ओलांडल्यानंतर चढ सुरू झाला. बहुतेक आता धरणापर्यंत असा चढ असेल. तरीही विशेष चढ नाहीय, त्यामुळे आरामात जात राहिलो. मनमोहक नजारे सुरू झाले आहेत! उद्या मी ज्या मांढरदेवीच्या डोंगरावर जाईन, तिकडचे डोंगर दिसत आहेत. निरा नदीचं रमणीय दृश्यही दिसलं. नंतर भाटघर धरणाची भिंत लागली. पण धरणाकडे जाणारा रस्ता बंद आहे.


निरा नदी व धरणाची भिंत

भोर यायच्या अगदी आधी एका मॅकेनिककडे जाऊन सायकलचा एक नट टाईट करून घेतला. त्यामुळे आता सामान घसरणार नाही. लवकरच भोरमध्ये मित्राच्या घरी पोहचलो. आधी इथे एका लॉजमध्ये राहणार होतो, पण त्यांनी त्यांच्याकडेच बोलावलं. मग तिथेच थोडा आराम केला. दुपारी माझं कामही केलं.

संध्याकाळी मित्र दत्ताभाऊंसोबत भोरमध्ये व धरणाजवळ फिरायला गेलो. खूप गप्पाही झाल्या. दत्ताभाऊ जवळजवळ पंधरा वर्षांपासून पुण्यातल्या मैत्री संस्थेसोबत जोडलेले आहेत. माझी त्यांच्याशी मैत्रीसुद्धा मैत्रीच्या एका टीममध्येच झाली होती! त्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाला. त्याशिवाय त्यांनी इतक्या वर्षांमध्ये संस्थेसोबत केलेल्या कामाची माहिती मिळाली. ते सगळं ऐकताना वाटलं की, प्रामाणिकपणे एखाद्या विषयासाठी काम करणारे कार्यकर्ते असावेत तर असे! नंतर त्यांनी त्यांच्या ट्रेकिंगच्या जुन्या आठवणीही सांगितल्या. आज आपण ज्या ग्रामीण जीवनाला पारखे होत आहोत, अपरिचित होत आहोत, त्याच्या स्वर्णिम काळातील आठवणी ऐकून मस्त वाटलं! जो माणूस जितका संघर्ष करतो, जितक्या आव्हानात्मक परिस्थितीतून जातो, तितके त्याच्यात नेतृत्व गुण विकसित होतात! त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, असं वाटलं.

रात्रीही भोरमध्ये थोडं फिरलो. दत्ताभाऊ त्यांच्या घराच्या मागून वाहणा-या निरा नदीकडे घेऊन गेले. काय दिवस जातोय हा! ह्या मोहीमेतला दुसरा दिवसही अगदी अपेक्षेनुसारच गेला. सकाळचा प्रवास अगदी लवकर झाला, कमी थकलो! आता उद्या भोरवरून मांढरदेवी मार्गे वाई! उद्या माझी पहिली परीक्षा असेल. भोरमधून निघतानाच चढ सुरू होईल आणि मांढरदेवीचा चांगला घाटही लागेल. बघूया कसं होतं!


आजचा टप्पा- ४७ किमी| आज चढ होता, पण उतार त्याहून जास्त होता.

पुढचा भाग- योग ध्यानासाठी सायकलिंग ४: भोर- मांढरदेवी- वाई

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत- www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ आशुचँप, तो एका वेगळ्या लेखाचाच विषय आहे. सायकलिंगसाठी स्ट्रेचिंगबरोबर प्राणायाम, पायाची आसने, तितली आसन, हलासन ह्यांचा फार उपयोग होतो. स्वतंत्रपणे लिहेन.