इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय
उत्तमातले उत्तम ऐसे ज्ञान सांगतो पुन: तुला
जे मिळता किति मुनिवर गेले परमसिध्दिच्या मोक्षाला १
या ज्ञानाचे सहाय्य घेउन मजसि पावती तादात्म्य
जन्ममॄत्युच्या चक्रामधुनी विमुक्त होती, धनंजय २
महाब्रम्ह ही माझी योनी, गर्भ ठेवितो मी तीत
आणि भारता, जन्मा येI त्यातुन हे सारे जगत ३
कौंतेया, सार्या योनींतुन जन्माला येती जीव
महाब्रम्ह योनींची योनी आणि मजकडे पितॄत्व ४
प्रकॄतीतल्या सत्व-रजो-तम या त्रिगुणांच्या संगाने
देहामधल्या जीवांवरती, पार्था, पडती नियंत्रणे ५
निर्मल अन् निर्दोष सत्व देI प्रकाश त्या जीवाना
सौख्यबंधने, ज्ञानबंधने पडती रे, निष्पापमना ६
प्रीतीमधुनी रजोगुणाची उत्पत्ति असे, धनंजया,
आकांक्षा अन् आसक्तीने बांधि जिवा तो, कौंतेया ७
अज्ञानातुन तम जन्मे जो पाडि जिवाला मोहात
तसेच आळस, निद्रा, आणिक प्रमाद यांच्या बंधात ८
सत्व सुखाने, रज कर्माने, तम अज्ञानावरणातून
प्रमाद करण्या भाग पाडिती जीवाला, कुंतिनंदन ९
तम नि रजाच्या पाडावाने सत्व कधी वरचढ होते,
कधि तम-सत्वावर रज आरूढ, रज-सत्वापर तमहि तसे १०
सर्व इंद्रियांमधि ज्ञानाचा प्रकाश निर्मल जधि येतो
जाण, सत्वगुण त्या समयाला मनात वॄध्दिंगत होतो ११
भारतश्रेष्ठा, रजोगुणप्रभावामधि लोभारंभ असे,
कर्मकांड प्रिय बनुनी इच्छा अतॄप्तीची वाढ वसे १२
तसे तमाने, हे कुरूनंदन, आळस अंगी बाणवतो
निष्क्रियता, मूर्खता, मोह यांच्या आहारी नर जातो १३
सात्विकता अंगिकारता मग जेव्हा होई देहान्त
मनुष्य जातो निर्मल ऐशा ज्ञानि मुनींच्या लोकात १४
रजोगुणातिल मॄत्यूनंतर कर्मलिप्तसा जन्म पुन:
तमातल्या मरणाने निश्चित पशुयोनीमधि ये जनना १५
पुण्यकर्म फल सत्वामधले विशुध्द असते हे जाण
रजातले फल दु:खप्रद अन तमातले दे अज्ञान १६
सत्वामधुनी ज्ञानोत्पत्ती येई, लोभ रजामधुनी
प्रमाद आणि मोह तमातुन, तसेच अज्ञानहि येई १७
सात्विक पोचे उच्च स्तरावर, राजस खालोखाल वसे
घॄणाकारि गुणवॄत्ति तामसा अधोगतीची वाट असे १८
त्रिगुणांखेरिज करविता नसे दुजा कुणी हे कळे जया
त्या द्रष्टयाला सन्निधता मम निश्चित लाभे, धनंजया १९
त्रिगुणांच्या पलिकडे पाहि जो असा देहधारी भक्त
जरा, दु:ख अन् जननमरण या चक्रातुन होई मुक्त २०
अर्जुन म्हणाला,
देहधारि हा काय करोनी त्रिगुणाच्या जाई पार,
कैसे लक्षण? कैसे वर्तन? त्याचे कथि मज, मुरलिधर २१
श्री भगवान म्हणाले,
मनुजाला फळ प्राप्त असे जे सत्व, रज, नि तम त्रिगुणांचे
ना अव्हेरी, ना त्यांस्तव झुरी, हे वैशिष्टय असे त्याचे २२
उदासीन त्रिगुणांप्रत राही, होइ न विचलित त्यांपायी
स्वीकारूनि अस्तित्व तयांचे अलिप्त त्यांपासुन राही २३
सुखदु:ख तसे प्रियअप्रिय वा स्तुतिनिंदा, मातीसोने
समान मानी ही सारी अन् स्वस्थ राही तो धैर्याने २४
तसेच मान, अपमान आणखी शत्रु, मित्र या दोन्हीत
भेद न मानी कर्मयोगी जो त्याला म्हणती गुणातित २५
एकनिष्ठ राहुनि माझ्याशी करि मम सेवा भक्तीने
अशा गुणातीतास लाभते ब्रम्हपदी स्थायिक होणे २६
अमर्त्य, अव्यय ब्रम्हाचे, भारता, अखेरीचे सदन
शाश्वत धर्माचे, सुखपरमावधिचे, मी आश्रयस्थान २७
अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय पूर्ण झाला
**********
अध्यायांसाठी दुवे:
अध्याय आठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479
प्रिय मित्रांनो,
माझ्या इतर कवितांसाठी माझ्या http://mukundgaan.blogspot.com या ब्लॉगवर भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
-मुकुंद कर्णिक.
कर्णिक
कर्णिक तुमच्या ह्या भगवदगितेवरुन प्रेरणा घेउन मी भगवद्गिता वाचायला घेतली आहे. सध्या दुसरा अध्याय चालु आहे.