सिंधुताई सपकाळ अर्थात माईंशी अनौपचारिक गप्पा

Submitted by क्ष... on 23 February, 2009 - 00:04

IMG_2782.jpg

साहित्य संमेलनासाठी माई येणार आहेत हे कळल्यापासुन संमेलनाला जायची इच्छा प्रबळ होत चालली होती. पण तारखांचा घोटाळा असल्याने ते शक्य होणार नाही म्हणुन बरेच हळहळूनही झाले होते. चिन्मयने माईंबद्दल लिहिलेला हा लेख - http://www.maayboli.com/node/3468 वाचुन माझा नवरा देखील बराच प्रभावीत झाला होता त्यामुळे त्याला देखील त्यांना भेटायची इच्छा होती. तो संमेलनामधे बराच 'अ‍ॅक्टीव्ह' असल्याने त्याची भेट होण्याची शक्यता जास्त होती. शनिवारी द्पारी एका कार्यक्रमाआधी त्या ग्रीनरूममधे बसलेल्या त्याला दिसल्या तो लगेच त्यांना जाउन भेटला. त्यांना 'सिंधुताई' अशी हाक मारताच त्या म्हणाल्या 'माई म्हण रे लेकरा! शिंधुताई कशापाई म्हणतोस. सगळी मला माईच म्हणत्यात.' मग त्याने लेख वाचला प्रभावीत झालो वगैरे सांगितले. गप्पा चालु असताना माई म्हणाल्या त्या वर्ध्याजवळील एका खेड्यातल्या वर्‍हाडी बोलणार्‍या. मग काय लगेच दोघानी वर्‍हाडी भाषेत हितगुज चालु केले. मग याने हळुच त्यांना सांगितले की आम्ही खानदेशी भाषेत बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा कार्यक्रम करतोय. मग काय माईनी त्याला बहीणाईच्या २-३ कविता म्हणुन दाखवल्या. तुझा कार्यक्रम नक्की पाहीन असे त्यांनी त्याला आश्वासन दिले आणि ती भेट संपली. दुसरे दिवशी माईंनी त्याचा कार्यक्रम अगदी पहिल्या रांगेत बसुन पाहिला आणि मागे ग्रीनरूममधे येऊन सांगितले 'लेकरा! तुझा कार्यक्रम पाहिला रे लेकरा अगदी पहिल्या रांकेत बसुन पाहिला! ती बहिणाबाई झाल्याली ती अक्शी बहिणाबाईवाणीच दिसत होती.' बाकी कोणी पाहिला वा न पाहिला नवर्‍याला त्याच्या कार्यक्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

त्यानंतर मग महाराष्ट्र मंडळाच्या बाकिच्या कार्यकर्त्यांशी बोलुन आमच्या घरी साधा एक गप्पांचा कार्यक्रम करावा का असे नवर्‍याला वाटले म्हणुन मग त्याने लगेच विचारुन घेतले. पण अ‍ॅग्रीमेंटनुसार मंगळवारपर्यंत त्यांना कोणता कार्यक्रम करता येणार नाही तेव्हा बुधवारनंतर बघ असे त्याला सांगण्यात आले. त्यानुसार माईंच्या सोयीने गुरुवारची संध्याकाळ ठरवली. मग तसे काही मित्रमंडळीना सांगितले. जेवणाची थोडीबहुत सोय केली आणि आमच्याकडे भेटायचे असे ठरले. वर्किंग डे असल्याने बर्‍याच लोकाना जमण्यासारखे नव्हते त्यामुळे साधारण २०-२२ लोक आले. आणि सुरु झाला गप्पांचा कार्यक्रम. पुढचे साधारण दोन-अडीच तास आम्ही विचारु त्या प्रश्नाचे त्या मनमोकळेपणाने उत्तर देत होत्या. सगळेच लिहिणे मला वेळेअभावी शक्य नाही पण १-२ आठवणी तरी लिहाव्यात असे वाटले म्हणुन हा ललितप्रपंच!

माईनी साहित्यसंमेलनात नवरा-बायको यांच्यासाठी सायकलची अ‍ॅनॉलॉजी दिली. आम्हा तिथे न गेलेल्यांसाठी त्यांनी ते परत सांगावे असे मंडळाच्या एका कार्यकर्त्याने त्यांना विनती केली. ती अ‍ॅनॉलॉजी जशीच्या तशी पुढे देतेय -
माई - आता तुम्ही लोक सायकलमधले कुठले चाक बायकोला द्याल?
जनता - पुढचे?
माई - बर! तुम्ही द्याल ओ पुढचे पण बाईला विचारले तर बाई कधिच पुढलं चाक घेनार नाय! ती घेनार मागलंच चाक. आता तुम्ही म्हनाल का? कसं? तर पुढलं चाक घेतलं तर मागलं काय बी दिसत नाय! आनी बाईला ते पसंत पडत नाय. आता बघा सायकलची सीट कुनच्या चाकावर असतिया? मागल्या! कॅरीअर - मागल्या! बरं झालच तर पेड्ल लावलेली चेन ती बी असतीया मागच्याच चाकाला. डायनेमो तो बी बघा असतुया मागल्याच चाकाला. हाय का नाही सांगा?
(हे सगळे चालू असताना लोक हासुन हासुन लोळुन पडायच्याच बेतात आणि उत्तरे पण देत होतो)
माई - सायकल उभा करायचा स्टँड तो बी असतुय मागल्याच चाकावर आणि कुलुप बी तिथच. आनी ब्रेक? त्यो जर पुढला लावला तर काय हुनार? सपशेल कोलंटीउडी! हाय का नाय? म्हनुन बाई असतीय सायकलीचे मागले चाक.
आता बघु पुढल्या चाकावर काय असतय ते? एक हँडल आणि एक घंटा - हँडल म्हणजे मेरे पिछे पिछे आओ आणि घंटा म्हणजे ट्रिंग ट्रिंग - हम आपके है कौन! हे असं जरी असलं तरी एकदा मागं वळुन बघा आणि तिला म्हणा थकलीस का? पण प्रेमाने म्हणा. मग ती काय उत्तर देते ते बघा. मी ही गोष्ट निफाडला नाशिकजवळ आहे तिथे सांगितली. एका पैलवानाने ऐकली आणि ताडताड घरी गेला की आणि बायकोला हाक मारली, 'बाहेर ये!' ती घाबरतच आली की बाहेर. हा तिला म्हणातो कसा, 'तिच्या मायला तिच्या! थकलिस का?' अता हे असं विचारल्यावर ती थकली असली तरी काय हो म्हणणार? तवा प्रेमाने विचारा. पण प्रेमाने विचारले तर ती लगेच भाळते (ती तशी बावळटच असते इती एक तिथे बसलेली मुलगी.) हे असं विचारल्यावर बघा ती काय म्हणते. मी कशापाई थकतेय पण तुमचाच थोबडा किती उतरलाय बघा. खरं असलं नसलं तरी म्हणायला काय जातय. हा असा असतो संसार. आता असं म्हणलं तर काय तोटा नाहीच झाला तर फायदाच आहे.

आता तुम्ही सगळ्या कमवत्या मुली पण कसं असतं आई असते घरचे मांगल्य आणि बाप म्हआण्जे दाराचे अस्तित्व. ज्या घरात बाप नसल त्या घरावर कोणीबी दगड मारतो. ही जगण्यातली बांधिलकी आहे घराची बांधिलकी आहे. पोरगं पास झलं म्हणुन सांगत येतं तेव्हा आई त्याला पोटाशी घेउन रडते पण बिस्किटांचा पुडा बापच घेउन येतो. असं असतंय.

पुढे माई म्हणाल्या, ते भाषण झाल्यावर जो तो येत होता आन आपल्या बायकोची वळख करुन देत व्हता, 'माई! हे माझं मागलं चाक!'

एकीने त्यांना विचारले तुम्हाला इतका शारिरीक त्रास झाला सासरी तरी काही तुटलं नाही का तुमचं? आत तुटल्या सारखं झालं नाही का? त्यांनी दिलेलं उत्तर खरोखरी विचार करण्याजोगे होते. त्या म्हणाल्या, 'तुटलं तर! सगळंच तुटलं इतकं की न तुटल्याबिगर काही राहीलंच नाही. पण ते कसं असतं हाडं तुटली तरी त्यांच्यामधुन जाणारी एक नस असते. ती नस कधी तुटू द्यायची नाही. ती नस असंल तर तुम्ही मनात आणलं तर काय बी करु शकताय. तवा एक करायचं ती नस नाय तुटु द्यायची नाही.' हे ऐकताना विचारणारी आणि आम्ही सगळे डोळे पुसत होतो.

प्रश्न - तुमची पहिली संस्था कुठे व कशी चालू झाली?
माई - पहिली संस्था चालु झाली चिखलदर्‍याला. पण मी संस्था चालु करायला मी गेले नव्हते तिथं. मी गेले होते आत्महत्या करायला. कंटाळा आला होता जगायचा. पोरीला असं पोटाला बांधुन घेतलं होतं. कारण आपल्यानंतर तिचं कोण करणार ही भीती होतीच. त्यामुळे तिला असं पोटला बांधुन घेतलं होतं आणि मी एका झाडाखाली उभी होते. त्या भागाला नाव आहे भीमकुंड. पौराणीक जागा आहे. विराट नगरी इथंच पांडवांनी अज्ञातवासाची २ का एक वर्षं?
उत्तर - १ वर्ष
माई - एक वर्ष काढलं, भीमाने किचकाचा वध केला तिच ही जागा. तर मी भीमकुंडाच्या जवळ झाडाखाली उभी होते. निसर्ग मला वेगवेगळे आवाज ऐकवत होता. ते ऐकत ऐकत मी मरायचच आहे न अजुन १० मिनीटाने मेले तर काय होतंय. अजुन अर्ध्या तासाने मेले तर काय होतेय असे करत ते निसर्गाचे संगीत ऐकत उभी होते. असा किती वेळ गेला काय माहीती. थोड्या वेळाने माझं लक्ष वर गेले झाडाकडे तर त्या झाडावर नुकतीच कोणीतरी कुर्‍हाड मारुन गेलं होतं आणि तिथुन लालसर द्रव झिरपत होता. मला असा भास झाला की ते झाड मला सांगतय की बघ माझ्यावर आत्ताच कोणीतरी घाव घालुन गेलेय पण तरी मी तुला सावली देतोय की नाही आणि तू आत्महत्या करायला निघालीस? आणि अशा तर्‍हेने मी चिखलदर्‍यात राहीले. तिथे मला आदिवासींनी सहारा दिला. मला फार भुक लागायची आणि मग तिथली मुलं सांभाळते म्हणुन मग मला ते आदिवासी त्यांच्यातली कोरभर भाकरी, ताक असलं काय काय द्यायचे. अशी तिथल्या संस्थेची सुरुवात झाली.

प्रश्न - तुमचे भांडवल काय?
माई - भांडवल काय? भाषण हेच भांडवल. भाषण नाय तर राशन नाय.
प्रश्न - खुप सहन करावे लागले असेल ना?
माई - हो खुप सहन करावं लागलं.
प्रश्न - खुप सहन केलं म्हणुन तुम्ही मोठ्या झालात.
माई - नाही लोकानी मला मोठं केलं. कधी कधी भिती वाटते. हम डर जाता है. फिर हम वहासे भाग जाता है.

प्रश्न - तुम्ही एवढ्य कविता शांताबाई शेळके, हे हिंदी शेर बगैरे कुठे शिकलात? या भाषा कुठे शिकलात?
माई - मला वाचायचा खूप नाद. पण सलग असं कधी वाचलं नाही. कायक कागदाचे तुकडे, टाकलेली कगदं वाचायचे. सलग पहिलं पुस्तक वाचलं ते म्हणजे अविनाश धर्माधिकारी यांचं 'अस्वस्थ दशकाची डायरी'. तवर सगळी कागदच सलग काहीच नाही. माझी मुलगी कधी कधी म्हणते मला 'आई तुझ्या ह्या कागदांसाठी एक रूम करायला पाहीजे तू म्हातारी होशील तेव्हा.' अशी कागदं वाचते मी अन आठवते.

प्रश्न - तुमचे शिक्षण किती?
माई - मी चौथी पर्यंत शिकलीय. पण शिक्षण म्हणजे कसं तर सकाळी म्हशी सांभाळायच्या आणि दुपारी शाळंला जायचं.
प्रश्न - आम्हाला आश्चर्य अशाचे वाटतेय की हे कसे शक्य हाले म्हणजे सगळे अशक्यच वाटतेय.
माई - आश्चर्य कसलं आलंय त्यात. मला जरा तरी लिहिता वाचता येत होतं बहिणबाईला तर अज्जिबतच येत नव्हतं तिनं नाही का किती लिहुन ठेवलं. तिनं जातं बघुन, जातं माहिती आहे ना? ते पीठाचे असतय ते? तर ते बघुन बहिणाबाईला प्रश्न पडला की यातुन तर पीठ येतं मग याला जातं का म्हणायचं असला मोठा विचार तिनं केला. हे शिक्षण नसतं ते आतुन यावं लागतं. ते तिला येत होतं. माझं असलं आश्चर्य.

प्रश्न - तुम्हाला असे वाटते का की साहित्य असं आतुन यावं लागतं? की प्रयत्नांनी पण मिळावता येतं? साहित्य म्हणजे कविता वगैरे.
माई - कसं असतं ना जे तुम्हाला कळतंं, तुम्ही जे वाचता ते असं प्यायला पाहिजे. नुसते वाचुन काय खुप उपयोग होत नाही. पण ते असं प्यायला पाहिजे म्हणजे ते असे शोषले जाते. मग त्याचं मोठं झाड होतं.
पण मला कधी साहित्य संमेलनाचं निमंत्रण आलं नाही. मीच आपली जायची हे साहित्य कसं असतं बघायला. जायची आणि गुरुगुरु भइरुन माघारी यायची. तर थाण्याचं संमेलन चालु होतं आणि कवितांचा कार्यक्रम चालेलला होता. मी तिथं गेले. तर लोकांनी मला पाहिलं. आणि तेव्हा माझे टीवीवर कार्यक्रम व्हायचे आकाशानंदांच्यामुळे दिवाळीला २-३ वर्षे लक्ष्मीपुजनाच्यावेळी सकाळी माझा कार्यक्रम असायचा. त्यामुळे लोकांना मी माहित झाले होते. लोकांनी मला पहिल्यावर लोक म्हणाले सिंधुताईना एक गाण म्हणु द्या. तर तिथे होते संकर वैद्य आणि कवी पी. सावळाराम. तर शंकर वैद्य म्हणाले की त्यांनी आत्त लिहायला चालु केलंय. इथे बरिच वर्षे लिहिणारे रांगेत आहेत. त्यामुळे त्यांना आत्ता गाणं म्हणता येणार नाही. लोकांनी खुप गोंधळ केला. एकानं मला खुर्ची दिली आणि म्हणाला, बसा. मी तिथं बसुन घेतलं. लोक सांगुनही शंकर वैद्य आणि सावळाराम ऐकत नव्हते. शेवटी सावळाराम म्हणाले 'असं कोणी म्हणा म्हणले म्हणुन कवी होत नसतं' मग लोकांनी जे गोंधळ केला आणि त्यांचा कार्यक्रम बंद पाडला. आणि मला खालि बसुन गाणं म्हणायला लावलं. मी म्हणलं. दुसर्‍या दिवशी पेपरमधे बातमी - काव्य संमेलनाचा कार्यक्रम लोकांनी बंद पाडला. माझ्याकडे कात्रणं आहेत. तर असं मग मला विश्व साहित्य संमेलनाचे निमंत्रण आले तर खरं वाटेना. हे तर विश्व साहित्य संमेलन. इथं येईपर्यंत विश्वास बसत नव्हता.

प्रश्न - तुम्ही कुणाची गाणी गाता?
माई - गाडगे महाराज, राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज आणि बहिणाबाई यांची गाणी जास्त म्हआणली जातात. मी भीक मागत मागत खानदेशात गेले तेव्हा मला बहिणाबाई कळल्या. मला फार भुक लागायची मग मी काय करायची गावत कुठं भजनाचा कार्यक्रम असल तर तिथं जायची. मला गाण्याचं वेड होतं. आपण भजन म्हणवं असं खुप वाटायचं. अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी जाउन मी मग त्या लोकांच्या मागं लगायची एकतरी भजन म्हणु द्या की म्हणुन कारण मग त्यांच्याबरोबर खायला मिळायचं. एक दोन वेळ ते लोक ए उठ ग म्हणायचे एखादेवेळा गाउ पण द्यायचे. मग असं गाण एकदा ऐकलं की मग जाताना सांगुन जायचे की उद्या इथं इथं या म्हणुन. मग मी तिहं जायची जेवायला मिळायचं ना. आजुनही तिथले बरेच लोक मला भजनवाली बाई म्हणतात पण आता मला नाही आवडत ते कारण आता मला भुक नाही ना. आता जेवायला मिळतं.

प्रश्न - तुमच्या सध्याच्या कार्याबद्दल काही सांगा ना?
माई - सध्या सासवडला एक संस्था आहे. जो मुलगा पहिल्यांदा सापडला ना त्याच्या घरच्यांचा शोध लागला. मी शोधतच होते. तर त्याचे घरचे ते सासवडचे. त्या मुलाच्या आजोबानी, ते गेले आता, त्यांनी या मुलाच्या नावाने जागा ठेवली थोडी. त्याचं गणगोत सापडलं पण तो मला सोडुन गेला नाही. मग त्या जागेवर आम्ही संस्था काढली. पण पुण्यातल्या लोकाना काही मदत करायची झाली तर मग लोकांचे ५-६ तास जायला लागले तास जायला २ तास यायला आणि एक दोन तास तिथं. मग लोक म्हणाले इथे काही सोय करता का? एक आहे मात्र पुण्यासारखा देता नाही आणि माझ्यासारखा घेता नाही. मग मंदार लॉज म्हणुन आहे तिथल पत्त दिला. मग लोकानी तिथे गोष्टी आणुन द्यायला सुरुवात केली. पण त्यांना तो एक तापच झाला. पण ते करत बिचारे काही म्हणत नव्ह्ते. मग आमीच एक जागा घेतली मग तिथे लहान लहान मुलांची सोय केली. पण पोरं भरी दंगा करणार. मग त्या मालकांना आजुबाजुच्या लोकांना तो त्रास व्हायला लागला. मग सध्या एका शिक्षकाची जागा म्हणजे घरच आहे त्याचं कर्ज काढुन बांधलय ते आम्ही आत्ता भाड्याने घेतलं. तो शिक्षक स्वतः झोपडपट्टीत रहातो आणि प्रेमाखातर आम्हाला जागा दिलिय वापरायला. पण आता संस्थेची इमारत बांधायला घेतलिय ती जागा पण तिथुन जवळच आहे. मग तिथे लक्ष द्यायला पण बरं पडतं. ती जागा बांधुन झाली की मग मोठ्या मुलींची सोय चिखलदर्‍याला, मोठ्या मुलांची सोय वर्ध्याला, मधल्या गटातल्या मुलांची सोय सासवडला करायची. आणि अगदी जी लहान लहान मुलं आहेत त्यांची सगळ्यांची सोय पुण्याला करायची. कारण माझा मुक्कम असतो पुण्यात. मुक्काम म्हणजे काय रात्री येऊन सकाळी परत फिरती.

प्रश्न - संस्थेची अजुन स्वतःची जागा नाही का?
माई - नाही अजुन नाही. काय आहे मला ३ मोठे पुरस्कार मिळाले एक महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार. एक लता मंगेशकरांकडुन आनंदमाई पुरस्कार आणि तिसरा स्त्पाल मित्तल पुर्स्कार लुधियाना पंजाब इथला २ लाखाचा. तर या पैशात मी पुण्यात हडपसर जवळ एक जावा घेतली नऊ गुंठे अडुसष्ट हजार रुपये गुंठा या दराने आता त्याच जागेची किंमत आहे एक कोटी रुपये. एक जण परवा विचारायला आला होता विकता म्हणुन. मी म्हणलं जगा विकुन काय करु माझ्या पोरांना कुठं सोडु? तर पुरस्काराचे आलेले पैसे मी पोरांना म्हणले आपण खायचे नाही. आपण जागा घेउ. तशी ती जागा घेउन मग तिथे आता संस्था बांधतोय. एक तळ्मजल्याचा स्लॅब झालाय अता अजुन एक झाला की मग आमचं भागतंय. माझा मुक्कम असतो पुण्यात कारण पुण्यातुन जाणं येणं बरं पडतं. आणि कसंय लहान मुलांना आई लागते म्हणुन मग लहान लहान मुलं मग ती सगळी पुण्यात रहातील माझ्याजवळ.

अजुन एक प्रश्न विचारला त्यांना, 'आम्ही पैशाव्यतिरिक्त अन्य कोणती मदत करु शकतो?'
माई - कपडे देता येतील. पण पुण्यात सध्या खुप कपडे मिळतात. तेव्हा माझ्या लेकरांची जेवणाची सोय करा.
प्रश्न - अजुन काय करु शकतो?
माई - त्यांचे कुणी नातलग नसतात. त्यांचे नातलग व्हा. म्हनजे त्यांची सुख-दु:खे ती तुमचीच.

अजुनही बरेच बोलणे झाले. वेळेअभावी मला जेवढे लिहिता आले ते लिहिले. मी पूर्ण न्याय देऊ शकलेय असे अजिबात नाही. पण जे ऐकले ते सगळ्यांबरोबर शेअर करावे वाटले येवढेच.

गुलमोहर: 

खुप छान लेख.

पण ते कसं असतं हाडं तुटली तरी त्यांच्यामधुन जाणारी एक नस असते. ती नस कधी तुटू द्यायची नाही. ती नस असंल तर तुम्ही मनात आणलं तर काय बी करु शकताय>>> खुप भावलं

अजुन येऊद्या ना असेच लेख

धन्यवाद !
त्यांच्याबद्दल अधिक माहीती, अनुभव, त्यांच्याबरोबर झालेला संवाद याबद्दल अधिक वाचायला आवडेल.

मस्तच वाटलं वाचून. वेळ होईल तसं तसं अजून लिही.

मस्तच आठवणी मिनोती. सायकलची तर एकदम मार्मिक.

वेळ मिळाला तर आणखीन शेअर कर.

मिनोती,
छान वाटलं वाचुन, या लिखाणात जमेल/आठवेल तशी भर घालत रहा.

छान. अजून लिहिलंस तर वाचायला आवडेल.

मिनोती, महान आहेत माई. आणखी लिही वेळ काढून.

मिनोती छान. अजून वाचायला नक्की आवडेल.

गेल्या नोव्हेंबरमध्ये माझा नवरा पुण्याला गेला असताना त्यांना भेटून आला होता. ( अर्थात हे सगळ चिनूक्सच्या लेखामुळे). त्या त्याला घेऊन त्यांच्या एका संस्थेच्या ब्रँचला गेल्या. तिथल्या सगळ्या मुलांना तो भेटला. मुलांशी गप्पा मारल्या. तेथील प्रत्येक मुल त्यांच नाव लावत. म्हणजे दिपक सिंधुताई सपकाळ असं.

त्यांना खर तर पैसे जमवायला BMM ला यायच होतं त्यांनी सगळ literature नवर्‍याबरोबर पाठवल होत. म्हणून आम्ही BMM ला contact केलं पण BMM च्या एकानेही आम्हाला उत्तर दिल नाही. शक्य नसेल तर तसही उत्तर द्यायला हरकत नव्ह्ती. पण त्यामुळे ह्या खेपेला BMM मनातून उतरल हे तेवढच खरं.

खूप आवडली मुलाखत. जमेल तसं आणखी लिही. टेप केली असेल तर ऑडिओ फाईल टाकु शकशील का?

मिनोती, खूप आभार. हे इतकं तरी लिहिलत. खरच आठवेल तसं, वेळ मिळेल तसं पुढलं लिहीत रहा. (ते मागचं चाक इतकं आवडलय की... ही प्रतिक्रिया द्यायच्याही आधी नवर्‍याला प्रश्नं विचारला....)

सगळ्यांचे आभार.

खुप त्रोटक लिहिलेय पण जमेल तसे आठवेल तसे अजुन नक्कीच लिहिन. आम्ही रेकॉर्डींग केलेय पण काही ठिकाणी बराच गोंधळवगैरे आहे मुलांचा त्यामुळे तशीच्या तशी ऑडिओ फाईल इथे टाकणे बरोबर नाही.

BMM च्या बद्दल मला खुप ठावुक नाही पण महाराष्ट्र मंडळ बे एरिया यांनी आपणहून त्यांना बोलवले होते त्यांच्यासाठी मदत करण्याच्या हेतुनेच इथे बोलावले होते.

आर्चने लिहिलेला मुद्दा त्यांच्याकडे येणार्‍या मुलांची नावे त्या पूर्वी कोणतेही आडनाव, वडीलांचे नाव देत. पण आडनाव शक्यतो असे देत की त्यांना सरकारी नोकरी तरी कमित कमी मिळेल. आयुष्यभर त्यांना झगडायची गरज नाही. आता नविन कार्यकर्ते मात्र मुद्दाम आर्चने लिहिलेय त्याप्रमाणे दीपक सिंधुताई सपकाळ असे देतात.

सध्या त्यांची गरज पुण्यात स्वतःची इमारत असणे ही आहे. त्यांना हडपसरला जागादेखील मिळाली आहे पण बांधकामाच्या पैशांची जुळवणी चालू आहे.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

मिनोती - छानच. अजून विस्ताराने लिही ना.

>>तुम्ही जे वाचता ते असं प्यायला पाहिजे. नुसते वाचुन काय खुप उपयोग होत नाही. पण ते असं प्यायला पाहिजे म्हणजे ते असे शोषले जाते. मग त्याचं मोठं झाड होतं.

क्या बात हैं! मिनोती, खूप छान लिहिले आहेस.

तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन थोडे जास्त लिहिलेय. Happy

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

विस्तार चांगला झाला आहे.

धन्यवाद.

आणि आधीची विनंती इथेही विस्तारीत करतो. Happy

सही आहे Happy मस्त वाटतंय वाचायला. फोटोही सुरेख आलाय..
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!

मिनोती, छान लिहीलं आहेस ग. खूप प्रेरणादायी.

धन्यवाद मिनोती.
खूप छान माहिती आमच्यापर्यंत पोचवलीस.
फोटो पण छान. मूर्तिमंत वात्सल्य!
-अनिता

खूपच छान. त्यांच्याबद्दल माहिती कळली. आता अजून माहितीसाठी चित्रपट पहायची उत्सुकता लागलिये.

धन्यवाद मिनोती अनुभव शेअर केल्याबद्दल. मध्यंतरी माईंची मुलाखत पाहिली होती अवधूत गुप्तेने घेतलेली. माई म्हणजे मूर्तीमंत वात्सल्य !! "लेकरा.." हाक अगदी भिडते काळजाला. भग्यवान आहात काही काळ का होईना त्या माऊलीच्या सहवासाचा लाभ झाला तुम्हाला.

Pages