सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ३ नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ४ जोशीमठ दर्शन
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ५ अलकनंदेसोबत बद्रिनाथच्या दिशेने. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ६ औलीला जाण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि तपोबन भ्रमण
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ७ हिमालयाचा निरोप घेत ऋषीकेशकडे प्रस्थान
ऋषीकेश दर्शन
२० डिसेंबरची सकाळ. चांगला आराम झाला. आज कुठे दूर जायचं नाहीय. त्यामुळे निवांत तयार झालो. हॉटेलजवळच गंगेचा किनारा आहे. सकाळचं ताजं वातावरण आणि शांत वाहणारी गंगेची धारा. . . आज फक्त ऋषीकेशमध्येच फिरायचं आहे. काही निश्चित योजना नाही. फक्त ऋषीकेशमध्ये डिव्हाईन लाईफ सोसायटीचा आश्रम बघायचा, इतकंच निश्चित आहे. त्याशिवाय गंगेच्या किनारी फिरेन.
काल मोबाईलमध्ये बातम्या बघितल्या आणि परत बाहेरच्या जगाशी संपर्क झाला, तेव्हा १६ डिसेंबरला दिल्लीत झालेल्या बलात्कार कांडाची माहिती मिळाली. खरोखर आपण किती रुग्ण समाजात राहतो, हे जाणवलं. मनात हाच विचार आला की, ह्या अत्याचाराच्या कृत्याला कोणी अज्ञात गुन्हेगाराचं कृत्य मानून सोडून द्यायला नको. उलट आपल्यातलाच- तुमच्या- माझ्यासारखा कोणी एक किंवा अनेकांची टोळी असा गुन्हा कसा करू शकते, असा विचार आला. एक माणूस असं कसं काय करू शकतो- माझ्यासारखाच कोणी एक जण असं कसं करू शकतो, जणू मीच हे कसं करू शकतो, हे बघायला हवं, हा विचार मनात आला. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, जी व्यक्ती रोज रागावते; ती रागाचा संचय करत नाही. तिचा राग सतत वाहत असतो व मोकळा होत असतो. पण कोणी जर राग करत असेल आणि त्याला दाबून ठेवत असेल; तर तो ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला असतो. हीसुद्धा तशीच बाब आहे. एक गुंतागुंतीची सामाजिक रुग्णता. . .
हळु हळु दिवस पुढे सरकतोय. हॉटेलमध्ये सजावट चांगली आहे; बागेत चांगली फुलं आहेत. गंगेचा मंद निनाद सतत ऐकू येतोय. हिमालयाच्या चरणतली पहुडलेली विश्रांत धारा! ह्या वातावरणात मन शांत न झालं तरच नवल. ह्या हॉटेलमध्ये थांबल्यामुळे ह्या नजा-याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो! नाश्ता केल्यानंतर ऋषीकेशमध्येच असलेल्या डिव्हाईन लाईफ सोसायटी आश्रमात गेलो. ऋषीकेशमध्ये गर्दी कमी आहे आत्ता, पण तरीही अनुभव एका शहराचाच येतोय. पूर्वी हे स्थान अजून शांत असलं पाहिजे. डिव्हाईन लाईफ सोसायटी आश्रमाची स्थापना स्वामी शिवानंदांनी केली होती. दक्षिण भारतातून आलेले स्वामी शिवानंद पूर्व आशियातील मलायामध्ये डॉक्टर होते आणि तिथूनच ते साधनेच्या शोधात हिमालयात आले आणि नंतर ह्या आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं.
आश्रमाच्या अगदी समोर हे हॉस्पिटल
स्वामीजींचा संक्षिप्त जीवनक्रम
आश्रमात शांतता आणि साधेपणा आहे. ह्या प्रकारचा आश्रम पहिल्यांदाच इतक्या जवळून बघतोय. बघण्यासारखा आहे. स्वामीजींच्या जीवनाबद्दल माहिती दिलेली आहे. त्यासह प्रार्थना कक्ष, सभागृह आणि ध्यान कक्षही आहे. एक शीतल वातावरण जाणवतं आहे. दुपारपर्यंत त्याच आश्रमात बसून ध्यान केलं. नंतर कंप्युटर रूममध्ये सिडीवर स्वामीजींच्या जीवनावर फिल्म बघितली.
दुपारी आश्रमाच्या बाहेर येऊन गंगेच्या काठावर फिरलो. इथे अनेक घाट आहेत. सामान्य लोक, पर्यटक, साधी सगळे फिरत आहेत. गंगा नदी स्वत:च्या मंद लयीत वाहते आहे. हिमालयाचे काही डोंगर- जसे द्वारपाल- समोर दिसत आहेत. खूप वेळ तिथेच बसून राहिलो. नंतर थोडा वेळ आश्रमात येऊन ध्यान केलं. जेव्हा जावसं वाटलं तेव्हा चालत चालतच हॉटेलात आलो आणि आराम केला. रात्री आश्रमात प्रवचन होणार आहे; तिथे जाईन.
संध्याकाळ गंगा नदीसोबतच घालवली. गोमुखमध्ये एका थेंबाने उद्गम होणारी धारा. . . इथे युवावस्थेत दिसते आणि जेव्हा हीच नदी गंगासागरला पोहचते, तेव्हा सागरच होते. नदी खरोखर जीवनाच्या वाहत्या- गतिमान प्रवाहाचं सुंदर प्रतिक आहे. नदी जीवनातलं सातत्य दर्शवते. नदी जीवनाचा प्रवाह दर्शवते. आपल्या भाषेमध्ये नदीसारखाच एक शब्द आहे- नाडी. नाडी शरीरातल्या ऊर्जेचा प्रवाह असतो. तशीच नदी जीवनाचा प्रवाह. आणि जेव्हा आपण अशा शांत, हळुवार वाहणा-या नदीजवळ येतो, तेव्हा आपोआप तसाच अनुभव आतमध्येही जाणवतो.
जेवणानंतर परत आश्रमात गेलो. थंडी वाढते आहे. डोंगरात दिवे दिसत आहेत. आश्रमामध्ये एक प्रवचन आहे. सामान्य माणसांसाठी खुलं आहे. ते बघता बघता ध्यानही होऊन जाईल. स्वामी शिवानंदांना जवळून बघणारी एक शिष्या अनुभव सांगते आहे. जेव्हा ती लहान होती, तेव्हा तिला स्वामीजींना जवळून बघता आलं होतं. सांगणं सामान्य होतं तरी आवडलं. आश्रमाच्या वातावरणात आणखी शांत वाटलं. कार्यक्रम संपता संपता साडेनऊ झाले आहेत. थंडी वाढली आहे. आताही हॉटेलपर्यंत पायी पायीच जातो. तीन- चार किलोमीटर अंतर असेल.
चालता चालता ऊर्जा मिळत गेली. शहरातही आता शांतता पसरते आहे. हॉटेलजवळ रात्री गंगेचं पाणी प्रकाशात चमकतं आहे. आजचा दिवसही मस्त जातोय. खरोखर जीवन किती किती गोष्टी समोर घेऊन येतं! आता उद्या इथून निघायचं आहे. पिथौरागढ़मधून नातेवाईक निघाले आहेत आणि उद्या ते दिल्लीला पोहचतील. मीसुद्धा त्यांना तिथेच भेटेन. आजची रात्र हिमालयाजवळची शेवटची रात्र. . .
पुढील भाग: अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेशमधून प्रस्थान
हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
बापरे किती छान लिहिलस. एकदम
बापरे किती छान लिहिलस. एकदम वेगळे चित्र टाकलेस जे इतर वर्णणात कधी पाहिले नाहीत आधी.
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय>> ह्याचा अर्थ काय होतो?
मी खूपदा पाहिले आहे तुम्ही लेखक लोक संस्कृत श्लोक वगैरे लिहिता पण हे गृहीत धरता का की सर्वांनाच त्याचा अर्थ माहिती आहे. अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय>> ह्याचा अर्थ माहिती नाही. पण बहुतेक - उत्तर दिशेला हिमालय नावाचा पर्वतांचा राजा आहे असा काहीतरी अर्थ लागतो.
वेगळाच पण छान भाग !
वेगळाच पण छान भाग !
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! @
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@ बी जी, अर्थ तुम्ही बरोबर ओळखला आहे. अर्थात् अर्थामधून फार काही कळत नाही! प्रत्यक्ष जो हिमालय आहे, त्याचं ते फक्त एक प्रतिक तर असतं!
धन्यवाद.