कल्हई

Submitted by इब्लिस on 5 October, 2013 - 05:10

कित्येक वर्षांनंतर आज सकाळी आमच्याकडे 'येईऽ कल्हईऽ वालेऽ' अशी हाळी ऐकू आली.

लहानपणी कल्हईवाले दर ८-१५ दिवसांत येत असत, अन अंगणातल्या झाडाखाली त्यांचा वर्कशॉप मांडून शेजारपाजारच्या अनेक घरांतील भांडी कल्हई लावून चकाचक करुन देत असत. आम्ही लहान मुले रिंगण करून कल्हई करण्याची गम्मत पहात असू. आजकाल तांब्या पितळेची भांडी इतिहासजमा झालीत तसेच घरोघरी येणारे कल्हईवाले देखिल. आजकालच्या मुलांना दाखवता यावे म्हणून कल्हई करण्याचे फोटो, व्हिडिओ काढून ठेवावेत, म्हणून मुद्दाम कल्हईवाल्यांना बोलावून घेतले. अन मायबोलीवरच्या मुलांनाही दिसावे म्हणून इथे लिहितो आहे.

कल्हई :
म्हणजे पितळेच्या वा तांब्याच्या भांड्याला आतून कथील नामक धातूचा (टिन. Sn) पातळ थर देण्याची प्रक्रिया. कथिल गंजत नाही, व या थरामुळे भांड्यांत ठेवलेले आंबट पदार्थ, वा इतरही खाद्यपदार्थ 'कावळून' खराब होत नाहीत.

तर हे कल्हईवाले सुभाष देवरे, अन त्यांचं पोर्टेबल वर्कशॉप :

kalhai (1).jpg

अंगणातल्या झाडाखाली एक छोटा खड्डा खणून त्यात एक हँडलवाल्या पंख्याची नळी सोडली आहे. पूर्वी कॅनव्हासच्या पिशवीचा भाता असे. समोर मांडलेल्या भांड्यांची 'ऑपरेशन पूर्वी' स्थिती पाहून ठेवा.

*

कल्हईसाठीचे मुख्य रासायनिक घटक.

kalhai (3).jpg

चौकोनी पांढरी वडी दिसतेय तो नवसागर. अन शेजारी चकचकीत धातूची पट्टी आहे, ते कथिल.
नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड. (NH4Cl). गरम भांड्यावर नवसागराची पूड टाकली, की त्याचे विघटन होऊन हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. यामुळे भांडे स्वच्छ होण्यास मदत होते, तसेच नवसागरामुळे कथिल लवकर वितळते व पातळ होते. पातळ झालेल्या कथिलाचा थर कापडी बोळ्याने भांड्याला आतून पसरवतात.

*

भांडे आधी चांगले तापवायचे :

kalhai (4).jpg

*

मग त्यात टाकायचा नवसागर, अन भांडे स्वच्छ करून घ्यायचे :

kalhai (5).jpg

नवसागराचे अपघटन होऊन अमोनिया वेगळा होतो. तापलेल्या भांड्यावर किंचित जळलेल्या चिंध्यांच्या वासात मिक्स होऊन त्याचा एक स्पेशल वास तयार होतो. हा कल्हईचा वास ज्यांनी कल्हई पाहिली आहे ते कधीच विसरणार नाहीत.

*
या ठिकाणी तापलेल्या भांड्यातून नवसागराचा धूर येत असतानाच कथिलाची काडी त्या भांड्याच्या बुडाशी घासतात. कथिल वितळून भांड्यात रहाते. पितळेचे पिवळे भांडे तापून लाल झालेय हे नोट करा.

kalhai (6).jpg

*

वितळलेल्या कथिलाचा थर भांड्यात पसरवताना :

kalhai (7).jpg

मोठं भांडं असेल तर अधून मधून नवसागर टाकत रहातात, ज्याने कथलाच्या गोळ्या न होता ते पातळ रहाते, तसेच भांडे तापवत रहातात.

*

कल्हई करून पूर्ण झाली.

kalhai (8).jpg

आता हे भांडे पट्कन पाण्यात बुडवायचे. अचानक थंड केल्याने कल्हईला चमक येते. नाहीतर ती चमकत नाही.
(कल्हईचे फोटो काढण्याच्या नादात मी बादली जवळ उभा होतो, भसकन भांडे पाण्यात बुडवणे हा प्रकार माझ्या पायापाशीच झाल्याने नेमका तो फोटो हलला.)

*

हा आहे "ऑपरेशन नंतरचा" फायनल रिझल्ट :

kalhai (9).jpg

याला म्हणतात कल्हई! इतकी चमक असल्यावर हे भांडे आतून दिसायला चांदीला भारी पडते, अन चांदीसारखे कळकत नाही हा वेगळा फायदा.

(माबोवर इतिहास शोधला तेव्हा कल्हईवरचा हा एक छान लेख सापडला.)

ता.क.
कल्हईचा व्हिडिओ. खाली प्रतिसादात दिलेला आहे, तो सगळ्यांना दिसला नसेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा ! थोडक्यात छान माहिती दिलीत, तीही फोटोसहित. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

घरात पितळेची भांडी वापरणे जवळपास सद्ध्या नामशेष झाले आहे.
गेल्या १५ वर्षात मी कल्हईवाल्याचा आवाज ऐकलेला नाही.

चाकू, सुर्‍या, कात्र्या इ. उपकरणांना धार लावणारा देखील क्वचितच दिसतो.

भारी इब्लिस! कित्येक वर्षात बघितली नाहीये कल्हई करताना. आता एकदम सगळं अगदी त्या वासा सकट आठवलं. खरच गंमत वाटायची कल्हई करताना बघायला. धन्यवाद! Happy

छान स्मरणरंजक लेख. कल्हईचा वास अगदी नाकात घमघमला. आमच्याकडे जुनी मोठमोठी पातेली, टोप आहेत. पण कल्हईवाले एकेका भांड्याचे शंभर-दीडशे-दोनशे रुपये असा काहीही भाव सांगतात. 'अडला हरी कल्हईवाल्याचे पाय धरी' असे होते. खरे तर आम्हीच त्या कल्हईवाल्यासाठी त्याचे ब्रेड-विनर् असतो. पण कथलाचा भाव खूप वाढलाय असे काहीबाही सांगून त्याची दुर्मीळता तो बरोबर एन्कॅश करून घेतो. आम्ही सदा-हरी. कायम कुणाचे ना कुणाचे पाय धरीत असतो. असो. लुप्तप्राय झालेल्या एका परंपरेचे डॉक्युमेंटेशन केलेत हे बरे झाले.

नॉस्टॅलजिक..खूपच छान! लहानपणीची तांब्या-पितळेची भांडी आठवली. कल्हई करणे तसेच चिंच+ मीठाने साफ करणे आठवले. धुतल्यानंतर वाळत घालणे आणि अलगद उचलून जाग्यावर लावणे हे सारे डोळ्यासमोर तरळले.

नॉस्टॅलजिक..खूपच छान! लहानपणीची तांब्या-पितळेची भांडी आठवली. कल्हई करणे तसेच चिंच+ मीठाने साफ करणे आठवले. धुतल्यानंतर वाळत घालणे आणि अलगद उचलून जाग्यावर लावणे हे सारे डोळ्यासमोर तरळले.

मस्त.. Happy

ठाण्याला गावदेवी मार्केटमध्ये अजूनही एक कल्हईवाला बसतो.
तिथून जवळच राहतो. दोन्ही ठिकाणी पुर्ण सेटप तयार आहे. Happy

सायो,
थोडी शोधाशोध केली, पण शब्द कुठून आला समजला नाही.
'कल्हई करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ भांडण करणे या अर्थी शब्दकोषात सापडला. १-२ इंग्रजी लेखांतही kalaiwala असा उल्लेख दिसला.
कल्हई केलेल्या भांड्यांचा वापर मात्र खूप जुना आहे असे दिसले. आतून बाहेरून कल्हई केलेली भांडी देखिल दिसली. आपल्याकडे फक्त आतून करतात. थोड्या फुरसतीत उत्खनन करून माहितीत भर घालता आली तर बघतो.

इब्लिस, फारच सुरेख डॉक्युमेन्टेशन Happy
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.

इब्लिस, लई भारी! Happy

सेनापती, आता नाही दिसत तो कल्हईवाला गावदेवी मार्केटजवळ. त्याने ठिकाण बदललं आहे का? मला जरा कुठे बसतो त्या खाणाखुणा सांगून ठेव इथे. गेली २ वर्षं कल्हईवाला शोधतेय. १ भलं मोठ आणि २ मध्यम पातेली कल्हईविना पडून आहेत.

मस्त माहिती आणि फोटो ! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पहिला फोटो तर मस्त आला आहे. आपला कुणी फोटो काढतो, याचा निरागस आनंद त्याच्या चेहर्‍यावर दिसतो.

मस्त लेख. कल्हईचा तो एस्पेश्यल वास आठवला.

आमच्याकडे चाकू छुरी तेज करणारा महिन्या दोन महिन्यातून येऊन जातो. कल्हईवाला पण एकदा दिसला होता, पण पितळेची भान्डी सर्व रत्नागिरीला ठेवली आहेत. Sad कधी जमलं तर एखादंतरी बुडकुलं घेऊन येईन इकडे.

खूपच सुंदर लेख आणि फोटो, nostalgic झाले, लहानपणी कल्हईवाला आलाकी मजा वाटायची हे सर्व बघायला.

हो अकोल्यात देखील यायचे. आता माहिती नाही येतात की नाही. आम्ही तर त्याण्च्याकडून पितळीची भांडी देऊन देव घडवून घेतले होते.

बी,
ते देव घडवणारे लोक वेगळे. घिसाडी असं म्हणतात त्यांना. आपल्यासमोरच लाल वाळूसारख्या मातीचा साचा बनवून त्यात अ‍ॅल्युमिनियम वा पितळ वितळवून ओततात अन मुर्ती वगैरे घडवून देतात. हा त्यांचा मेन बिझिनेस असतो. कल्हई करणे साईड बिझिनेस. माझ्याकडेही तशी बनवलेली लक्ष्मीची एक मूर्ती आहे. रफ फिनिश असतो त्याचा.
नॉर्मल कल्हईवाल्याकडे ते धातू वितळवता येतील अशी 'मूस' नसते.
वितळलेला धातू चपळाईने साच्यात ओतणे गरजेचे असते. वितळलेल्या धातूचे प्रचण्ड तापमान अन या कामासाठी हवे असलेले प्रेसिजन पहाता, त्या धातूतज्ञांच्या चपळाईला 'घिसाडघाई' म्हणणे हा गमतीचा भाग असावा.

***

दिनेशदा,
तुमची सूचना छान आहे. तसा एक धनुकलीवाला दिसतो अधुनमधून. सापडला तर नक्कीच व्हिडिओ अपलोड करीन. तो ट्वुंईऽट्वुंईऽ आवाज, ती तात कंप पावावी म्हणून वापरायचा डंबबेल सारखा धोटा.. सगळं आठवतंय. बघतो.
टाकवून घ्यायला पाटा वरवंटा नाही घरी सध्या. जुनं जातं आहे. चक्की वाले त्यांचे दगड टाकवत असतातच.टाकवण्याची क्रीया तरी रेकॉर्ड करता येईलच.
जात्याची माखणी, खुंटा, भरडगं, अन जात्यातला फरक, या सगळ्याच गोष्टी काळाच्या उदरात चाल्ल्यात. डॉक्युमेंट करून ठेवायला हव्यात नक्कीच.

अरे हो!
धागा वाचून भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचेच मनापासून आभार. प्रत्येकाचे नांव घेत नाही, राग मानू नये ही विनंती.

नाही, भास्कराचार्यजी. कापुस पिंजून गादी/उशी/दुलई भरून देणारे पिंजारी लोक असतात ते. आजकालच नव्हे, कित्येक वर्षांपासून ही प्रोसेस मशिनने होते,

लेख सुंदर झालाय. फोटोंमुळे मजा आली. कल्हईवाल्यांच्या चेहेर्‍यावर कसले मस्तं भाव आहेत! वाचून, फोटो बघून, मन भूतकाळात गेलं.

कॉलनीत एखाद्या घराच्या अंगणात धुनी (?) पेटवली की आजूबाजूच्या ४-६ घरांमधली भांडी कल्हईला येणार. त्यामुळे त्या घराशी भांडण झालेल्यांची गैरसोय आणि शेवटी 'कल्हई' या कारणानं दिलजमाई झालेली बघितली. ते आठवलं. Happy

आताच्या नॉनस्टिक कोटिंगच्या भांड्यांच्या जमान्यात फारतर पुढल्या एखाद्या पिढीला कल्हईप्रकरण समजू शकेल.

>>'या कामासाठी हवे असलेले प्रेसिजन पहाता, त्या धातूतज्ञांच्या चपळाईला 'घिसाडघाई' म्हणणे हा गमतीचा भाग असावा'
इब्लिस, गमतीचा नाही, खराच असावा. तुम्हीच उत्तर दिलंय: >>वितळलेला धातू चपळाईने साच्यात ओतणे गरजेचे असते.
एकूणच वितळलेल्या धातूबरोबर काम करताना 'घाई' आवश्यक. त्यातून या अशा कामचलाऊ, न तापवलेल्या साच्यांमधून मूर्ती घडवताना धातू पातळ राहणं आवश्यक. कमीतकमी वेळात करणं महत्त्वाचं. म्हणून घिसाडघाई शब्द आला असावा.

मस्त! लहानपणी अनेक वेळेस बाजूला उभे राहून बघितलेल्या कल्हया आठवल्या. 'ऑपरेशन पूर्वी" वगैरे शब्दरचना आवडली Happy

ते हॅण्डलने फिरवून काय करतात ते पाहिल्याचे आठवते, पण विसरलो.

घिसाडींबद्दलची माहिती आवडली. तेही एक दोन दा पाहिलेले आहे. आमच्याकडे ही होती अशीच मुर्ती.

सुंदर लेख. आवडला आहे.
तुमचे डॉक्युमेंटेशन करून ठेवायला हवे हा अ‍ॅप्रोच खूप महत्त्वाचा आहे.
हे लेखन मराठी विकीवर पण टाकता येईल का?
प्रचि प्रताधिकार मुक्त करता येतील का? अर्थात प्रताधिकार मुक्त न करताही विकीवर टाकता येतात!

Pages