स्वप्न

Submitted by करकोचा on 9 November, 2008 - 00:53

कालच्या स्वप्नाप्रमाणे आजही येशील का ?
अन उद्याही जाग येता पापण्या भिजतील का ?

वाटते भीती अताशा झोप येण्याची मला
वास्तवासम सोडुनी स्वप्नातही जाशील का ?

पाठशिवणीचा असा का एकतर्फी खेळ हा ?
जीवघेणा खेळ आहे, राज्य तू घेशील का ?

ओढुनी घेतेस हातातून माझ्या पदर तू
वाहत्या अश्रूंस ओठाने तरी टिपशील का ?

जिंकण्यासाठी तुला मी सर्व काही हारलो
मी पणाला लागलो; मीपण तुझे हरशील का?

गुलमोहर: 

मतला आणि पदर हे शेर फारच छान आहेत!!
गझल आवडली...