"क्या दगडूशेट, सुबह सुबह लॉलीपॉप.."
ह्यॅं ह्यॅं ह्यॅं अंड्या, तू नाही सुधारणार बघ बोलत दगडूने शेवटचा झुरका मारत दातात खोचलेल्या बिडीचे थोटूक रस्त्याकडेच्या गटारात फेकले आणि अण्णाला कटींगचा आवाज देतच आमच्या दुकानात एंट्री मारली.
डोळ्य़ांच्या खाचा अन पोटाचे खळगे, आयुष्यातील खाचखळग्यांचे चेहर्यावर उमटलेले प्रतिबिंब, खुरटलेली दाढी अन डोक्यावरची उरलीसुरली चांदी, हसले की गंजलेल्या करवतीसारखी दिसणारी दंतपंक्ती, असा आमचा टिपिकल लोअर मिडलक्लास म्हातारा दगडूशेट. पण जसे गांधीजींचे स्केच काढताना ते चष्म्याशिवाय पुर्ण होऊ शकत नाही किंवा ते कमीतकमी ओळींमध्ये रेखाटताना गोल चेहर्यावर एक चष्मा दाखवणे पुरेसे ठरते तसेच आमच्या दगडूरावांचेही व्यंगचित्र (कोण कशाला रेखाटतेय ती पुढची गोष्ट, पण...) रेखाटलेच तर तोंडातली बिडी आणि ती दातात पकडायची स्टाईल मस्ट’च. त्याशिवाय कोणी दगडूचा खरा फोटोही ओळखू नये. सकाळी सकाळी उठून गाड्या धुण्याची ताकद वयोमानानुसार संपली तसे रात्री पावभाजीच्या गाडीवर प्लेटा धुवायचे अन दिवसभर पडेल ते काम. थोडक्यात पोट हातावर पण तरीही उपाशी झोपेन पण चार बिड्या नक्की चोपेन हे त्याने आजवर पाळलेले तत्व. सतत दात काढायच्या सवयीने या दातांनी आजवर काय काय भोगलेय आणि दगडूने काय काय उपभोगलेय हे त्याच्याकडे पाहता प्रथमदर्शनीच लक्षात यायचे.
दगडूकडून कोणतेही काम करवून घ्यायचे असेल तर त्याला एखादे बिडीचे पुडके दिले की बस. तसा म्हातारा वरवर गावंढळ वाटत असला तरी बरेच काम की चीज आहे. ‘अक्कल नाही काडीची पण खबर अख्ख्या वाडीची’ यातली गत. बस तुम्ही फक्त सोय करा बिडीची. दगडूसाठी बिडी हे व्यसन नक्कीच नाहिये. त्याची ती सवय झाली असावी, किंवा छंद.. हो, कदाचित छंदच हा समर्पक शब्द ठरावा अश्या आवडीने तो बिड्या फुंकत असतो. लहान मुले जमवलेले रंगीत दगडगोटे अन शंखशिंपल्या जसे आवडीने परत परत बघतात आणि मोजतात तसे याचे अधूनमधून खिशातल्या बिड्यांची मोजदाद चालू असते. एखाद्याने याला वीस रुपये देऊ केले आणि दुसर्याने पाच रुपयांचे बिडीचे पुडके, तर बिडी देणार्याचे काम हा पहिला करेल. पैश्यांच्या हिशोबाच्या पलीकडे जपला जाणारा हा छंद नाही तर आणखी काय.
जसा अंड्याला एक छंद लागलाय हल्ली, लिखाणाचा. ज्याची सारे मिळून खिल्ली उडवतात तरीही त्याचे मात्र आपले चालूच असते. आताही दगडूने आल्या आल्या माझ्या टेबलावर पडलेल्या वहीकडे एक नजर टाकत विचारले, "काय अंड्याशेट आज शुदलेखन नाही का?" दुकानातले मामा आणि गण्या देखील दात काढून हसायला लागले.
"अंड्या तू पुस्तक कधी छापतोयस रे?" गण्याने उगा उचकवायला खडा टाकला.
"येईल येईल, म्हातारा होईस्तोवर येईल एखादे", पुढे मामांनी जोडले.
"बस काय मामा एखादे पुस्तक, तेव्हा तर आपला अंड्या मोठा लेखक वगैरे झाला असेल. बालभारतीच्या पुस्तकात त्याच्यावरच एक धडा असेल." इति गण्या.
"एक सांग अंड्याशेट, हे असे लिहूनशान किती कमाई होती रे?" दगडूने मात्र थेट मुद्द्यालाच हात घातला.
"दिवसाला खाऊनपिऊन चार बिड्याची पाकिटे सुटतात" त्याला समजेल असाच हिशोब मी दिला.
बरं बरं करत तो तर कटला, मात्र अंड्या विचार करू लागला. एखादा छंद ज्याचा व्यवसाय देखील होऊ शकतो तर त्याला नेहमी पैश्यातच का मोजले जावे. एखाद्या प्रथितयश लेखकाला त्याच्या लिखाणाची किंमत पैश्यांमध्ये भरमसाठ मिळत ही असेल. मात्र एखाद्या नवोदित किंवा हौशी लेखकासाठी लिखाणातून मिळणारा आनंद त्यापेक्षा जास्त मोल ठेऊन असू शकत नाही का. एखाद्याला विडिओगेम खेळायचा छंद असतो त्याला आपण कधी विचारतो का की अमुक तमुक हायेस्ट स्कोअर करून तुला कुठले मोठे इनाम मिळणार आहे. उलट तो खेळण्यासाठी तू आपलाच वेळ आणि पैसा खर्ची घालत आहेस. हे देखील तसेच नाही का. लिखाण हे छंद म्हणून घेतले तर त्यातून मिळणार्या निर्मळ आनंदाला इतर कशाचे मोल आहे का..
सध्या माझ्या या छंदामागे घरचे हात धुवून लागले आहेत याचे मुख्य कारण म्हणजे अंड्या वयात आला आहे आणि त्याच्यासाठी स्थळे यायला सुरुवात झाली आहे. मुलींच्याकडून पहिला प्रश्न हाच विचारला जातो की मुलगा करतो काय? यात तो छंद जोपासण्यासाठी म्हणून नाही तर पोटापाण्यासाठी करतो काय हे विचारले जाते. अर्थात यात काही वावगे नाही, लोकांनी ‘आधी पोटोबा मग विठोबा’ बोलत देवाच्या भक्तीलाही दुय्यम स्थान दिले आहे तिथे छंदाचे काय घेऊन बसलात. पण अंड्या मात्र समोरच्या पार्टीचे छंद काय आहेत हे आवर्जून बघणार, नव्हे बघतोच.
पण हे छंद देखील फार फसवे असतात राव. नुकतेच माझ्या चुलत भावासाठी एक स्थळ आले होते. मुलगी होती भली कम्पुटर ईंजीनीअर पण बायोडाटा मध्ये छंद म्हणून चक्क स्वयंपाक टाकले होते. त्याला म्हणालो लागलीच नकार कळव रे बाबा नाहीतर फोटो बघून भुलशील उगाच. स्वयंपाक ही एक कला असते, अगदीच कलागुण अंगात नसले तरी सवयीने जमण्यासारखा असावा. छंद म्हणून कोण जोपासणारी असेल तर वेगवेगळे फसलेले प्रयोग आले. आतड्याचे वेटोळे आणि पोटाचे वाटोळे कोण करून घेणार. पण आजकालच्या मुलींना खरेच हा छंद वाटतो. मला माझ्या भावाचे भवितव्य साफ दिसायला लागले. साधी डाळभात, भाजी, चपाती बनवायचे त्या मुलीचे वांधे असणार म्हणून घरच्या घरी जेवणाच्या जागी पिझ्झा, पराठा अन पाणीपुरीचे बेत आखले जाणार. ते खाऊन आमचे बंधुराज कंटाळले की मग हॉटेलिंग सुरू. ती स्वत: कमावती असल्याने जास्तीच्या खर्चाबद्दल हा काही चकार शब्द काढू शकणार नाही. वरचेवर बाहेर खाणे स्वास्थ्यासाठी चांगले नाही बोलत आरोग्याचा मुद्दा उचलल्यास जेवणात कच्च्या भाज्यांच्या सलाडची काय ती भर पडणार. सरतेशेवटी हार मानत त्याला हवे ते पचवायची मनाची तयारी करावी लागणार किंवा स्त्री-पुरुष समानतेची कास धरत स्वत:ला स्वयंपाकघरात उतरावे लागणार, नाहीतर आयुष्यभर मोलकरणीच्या लाटलेल्या पोळ्या चापाव्या लागणार.
पण आजघडीला लग्नाच्या बाजारातील सर्वात घातक असा छंद कुठला म्हणून विचाराल तर डेली सोप सिरीअल बघणार्या मुली. पण या ओळखू येणे कठीण असते राव. मोठमोठ्या ऑफिसात मॉडर्न बनून फिरणार्या मुली घरी टी.व्ही.समोर चिकटल्या की कधी त्यांच्या काकूबाया होतात त्यांचे त्यांनाही समजत नाही. पुरेशी काळजी घेतली नाही तर काहीजणींना हा छंदरोग लग्नानंतर ही लागण्याची शक्यता असते. बरं, बदलत्या जमान्याला अनुसरून या मालिकांचा ढाचाही बदलला आहे. आजकालच्या मालिकेत बहुराणी झालेल्या हिरोईनी सासूशी प्रेमाने वागतात मात्र नवर्यावर संशय घेतात. त्यामुळे पुरुषांच्या डोक्याचा ताप आणखीनच वाढलाय. एकदा सहज फेसबूकवर मी टाकले, "सिरीअल न बघणारी बायको हवी." समोरून एका मुलीचे उत्तर आले, "क्रिकेट न बघणारा नवरा हवा." घ्या राव, आता क्रिकेट म्हणजे आमचे पॅशन की काय बोलतात ते आणिक यांना छंद वाटून राहिला.
फेसबूक वरून आठवले. आजकाल लग्नासाठी स्थळ आले की त्याचे छंदप्रताप बघायला आधी फेसबूक अकाऊंट चेक केले जाते. एखाद्याचे बॅंक अकाऊंट चेक करण्यापेक्षाही जास्त फायदेशीर असते असे म्हणतात. एखाद्याचे कॅरेक्टर तर समजतेच पण त्याच्या आवडीनिवडींचा देखील अंदाज बांधता येतो. एखादा फ्लर्टींग किंवा चमकोगिरीचा छंद बाळगून असणारा त्यात अस्सा पकडला जातो. फ्रेंडलिस्टमध्ये ५०० च्या वर मित्र दिसले की अश्यांना पहिले ब्लॅक लिस्टमध्ये टाकायचे. त्यातही मुले किती आणि मुली किती याचे प्रमाण देखील काही जण लगे हाथ मोजून घेतात. अश्यातच मग एखादा ‘आज का अर्जुन’ निघतो ज्याला पोपट किंवा पोपटाचा डोळा न दिसता केवळ मैनेवरच त्याचा डोळा असतो. जरी निव्वळ आणि शुद्ध मैत्री असली तरी मित्र जमवण्याचा छंद देखील सुखी संसारासाठी वाईटच. प्रेमात कोणी भागीदार बनो ना बनो आपल्याला दिल्या जाणार्या वेळेत तरी नक्कीच बनतो.
याच फेसबूकवर स्वताचे वाजवीपेक्षा जास्त फोटो अपलोड करण्याचा छंद असणारे देखील घातकच. नाहीतर लग्नानंतर कुठे फिरायला जा आणि त्या प्रेक्षणीय स्थळाचे सौंदर्य नजरेत साठवण्याऐवजी आपल्या गळ्यात जे स्थळ पडलेय त्याचेच सौंदर्य कॅमेर्यात कैद करत राहा. फेसबूक अपडेट्समध्ये चारोळ्या अन कविता जिलेबी सारखे सोडणारे तर या पेक्षाही घातक. त्या तेव्हाच चांगल्या वाटतात, पण एकदा का प्रेयसीची बायको झाली की मग एखाद्या पक्वानातील नेमके मीठ काढून घेतल्यावर जे होईल तश्या त्या चारोळ्या अळणी वाटू लागतात. उगाच नाही आमचे मामा बोलत, "ती लिहिते छान हे मला तिची प्रेमपत्रे वाचून माहीत होतेच पण ती गातेही छान हे लग्नानंतर समजले..... हल्ली मी तिचीच रडगाणी ऐकत असतो."
गाण्यावरून आठवले, हा गाण्याचा छंद असलेल्या जोडीदाराबद्दल न बोललेलेच बरे. ज्याला झेलता येते त्यानेच या फंदात पडावे. कारण इथे हातावर आठाणे टेकवून पुढे जा बोलायचीही सोय नसते. तसे पाहता आपल्या सर्वांनाच थोडाफार गाण्याचा किंबहुना गुणगुनण्याचा छंद असतो. पण आमच्या वाडीतील सावंत वहिनींना जरा जास्तच होता. सावतांनी पण बघून बघून एक क्लृप्ती योजली. जेव्हा केव्हा वहिनी गुणगुणायला सुरुवात करायच्या हे सहज ऐकले न ऐकल्यासारखे करून त्यांना विचारायचे, ह्म्म काय बोलतेयस.. बस्स.. आपण काहीतरी बोलत नसून तालासुरात गुणगुणत होतो हे आता स्वत:च्या तोंडाने कोण कसे सांगणार. चारपाच वेळा असे घडल्यावर हल्ली म्हणे सावंतवहिनी फारश्या बोलायच्या देखील बंद झाल्यात. हे म्हणजे असे झाले, डास मारायच्या औषधाने झुरळांचाही नायनाट..
चला खूप झाले हे छंदाछंदाचे फंडे.. सहज आठवले म्हणून एक परवाचीच घटना सांगतो..
दादा वहिनीबरोबर शॉपिंग साठी म्हणून अंधेरीला जात होतो. शॉपिंग त्यांचीच, मी सामान उचलायला तेवढा. ट्रेनमध्ये आपसात त्या नवराबायकोंचे बोलणे चालू होते. विषय देखील त्यांचा खाजगीच, म्हणजे वहिनींच्या माहेरचा. तर मी कशाला उगाच मध्ये लुडबुड करा म्हणून थोडासा सरकून आजूबाजूच्या लोकांकडे निरीक्षण करत बसलो होतो. समोरच्याच सीटवर एक प्रेमी युगुल बसले होते. मुलगी कसलेतरी पुस्तक वाचण्यात मग्न होती. कदाचित वाचनाचा छंद असावा. या छंदाबद्दल मात्र अंड्याची काही तक्रार नाही. लोक वाचणारच नाहीत राव तर आपण लिहिणार कोणासाठी. मुलाला मात्र कोणताही छंद दिसत नव्हता. किंचित आश्चर्यच वाटले. किमान चाळा म्हणून हातात मोबाईल तरी अपेक्षित होता. थोडा वेळ तसाच गेला. मध्येच त्याने एक नजर उजवीकडे फिरवली, एक डावीकडे फिरवली. पुन्हा एक नजर उजवीकडे फिरवली. नाही नाही, ट्रेनमध्ये रस्ता क्रॉस करत नव्हता तो. पुढे तर ऐका. तर मग त्याने दोन्ही हातांचे तळवे समोर धरून अलगद बोटे दुमडली आणि कसलेसे निरीक्षण करू लागला. जणू काही एखादी मुलगी नेल पॉलिश चेक करतेय असे वाटले. एक एक बोट निरखून पाहता अचानक एका बोटावर नजर पडून त्याचा चेहरा किंचित उजळल्यासारखा वाटला. तिथेच मला त्याचा डाव कळला. त्या बोटाचे वाढलेले नख खायला म्हणून त्याने ते तोंडाजवळ नेले आणि इतक्यातच.......
फाssट्ट करून एक फटका त्या हातावर पडला. ओशाळल्यागत झाला बिचारा. हात पुन्हा खाली गेला. शेजारून जिथून फटका आला ती त्याच्या बरोबरची मुलगी पुन्हा पुस्तकात आपले डोके खुपसून बसली. मुलाची मात्र चुळबुळ चालूच होती. थोड्यावेळाने त्या मुलाने खिशातला फोन काढून कानाला लावला आणि त्या मुलीला आलोच पाच मिनिटांत बोलून उठला. त्या मुलीला आता तो दिसत नव्हता मात्र माझी नजर त्याच्या मागावरच होती. दारावर थंडगार वारा खात तो उभा होता, कानाला लावलेला फोन केव्हाच परत खिशात गेला होता आणि खिशात घातलेला हात मात्र तोंडात आला होता. एका हाताने ट्रेनचा दांडा पकडून दुसर्या हाताची नखं खायची इच्छा तो पुर्ण करत होता. ही सवय नव्हती, हे व्यसन नव्हते, आवडीच्या ही पलीकडे असलेला, हा खरा छंद होता.
- आनंद उर्फ अंड्या
------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------
अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://www.maayboli.com/node/41484
अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास - http://www.maayboli.com/node/41751
------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------
>> नाहीतर लग्नानंतर कुठे
>> नाहीतर लग्नानंतर कुठे फिरायला जा आणि त्या प्रेक्षणीय स्थळाचे सौंदर्य नजरेत साठवण्याऐवजी आपल्या गळ्यात जे स्थळ पडलेय त्याचेच सौंदर्य कॅमेर्यात कैद करत राहा.

मस्त! आवडले!
मस्त! आवडले!
आवडेश
आवडेश
चांगलं लिहितोस रे.
चांगलं लिहितोस रे.
लगे रहो अंड्या.. फ्रेश आणि
लगे रहो अंड्या.. फ्रेश आणि उमदं लिखाण.. तीन ही भाग एकेक करून वाचले.. हलकेफुलके पंचेस सहीच.. मजा आली..
आपल्या सर्वांचे प्रतिसाद
आपल्या सर्वांचे प्रतिसाद आवडले.
हा ही भाग छान रे... लगे
हा ही भाग छान रे... लगे रहो... फंड्यांना नावे द्यायला पण जमलं ...
धन्यवाद सोनूताई, नाव देणे
धन्यवाद सोनूताई,
... पण हे मायबोलीवाले वाचून प्रतिसाद देऊन हुरूप वाढवतील तर ना.... 
नाव देणे जमवावं लागल कारण अजून अंड्याचे फंडे बरेच येतील असे वाटतेय...
अंड्या, फंडे मस्तच राव.
अंड्या,
फंडे मस्तच राव.
धन्यवाद अनिलभाई... काय दिवस
धन्यवाद अनिलभाई...
काय दिवस आलेत.. एकेका प्रतिसादाला धन्यवाद बोलावे लागतेय..
मस्त. "क्रिकेट न बघणारा नवरा
"क्रिकेट न बघणारा नवरा हवा.">>>>>>>>>>>>>
काश मैने भी ऐसीही अट रखी होती.
वॉव अंड्या. भारी लिहिलयं.
वॉव अंड्या. भारी लिहिलयं. असाच छंद जोपासत रहा
मस्त .
मस्त .
अंडे के फंडे बहुत पसंद हैं!!!
अंडे के फंडे बहुत पसंद हैं!!!
अजून लिही रे!!!
पण हे मायबोलीवाले वाचून प्रतिसाद देऊन हुरूप वाढवतील तर ना....
मस्त रे अंड्या.. अजुन लिहत
मस्त रे अंड्या.. अजुन लिहत रहा.. आवडेश अंड्याचे फंडे
देवा... अचानक पाच-सहा
देवा... अचानक पाच-सहा प्रतिसाद वाढलेले बघून वाटले होते की कोणी दोन मायबोलीकरच आपसात भांडून तीन-तीन पोस्ट टाकून गेले के काय...
पण बघतो तर पाच जणांचे पाच .. ते ही कौतुकाचे प्रतिसाद.. अंड्या भरून निघाला हो..
अंड्या हा घे अजुन एक! आवडला
अंड्या हा घे अजुन एक!
आवडला हो लेख!
नाही खरंच मनापासुन आवडला! आधीचे ही वाचले होते पण मला रोमात रहायला जास्त आवडतं!
अजुन फ़ंड्यांची वाट पाहते आहे.. येऊ देत....
अंडे का फंडा मस्तच
अंडे का फंडा मस्तच ..
"क्रिकेट न बघणारा नवरा हवा." हे आवडलं. आधी का नाही सुचले म्हणून जरा चुट्पुट लागली.
छान लिहितोस्...मजा आली वाचायला.
अजुन फ़ंड्यांची वाट पाहते
अजुन फ़ंड्यांची वाट पाहते आहे.. येऊ देत.... >>>>>+१
तोडलस भावा...! सहिचं !!
तोडलस भावा...! सहिचं !!
अंड्या, तुझे हे फंडे सॉलिड
अंड्या, तुझे हे फंडे सॉलिड आहेत. ते मांडण्याची स्टाईलही आवडली. पुर्वी टि.व्हीवर अॅड लागायची... संन्डे हो या मंन्डे रोज खाये अंन्डे ...तसे तुझे हे फंन्डे संन्डे ते मंन्डे वाचायला नक्कीच आवडतील. मस्त!
अजुन बाकीचे भाग वाचायचे आहेत.
एक नम्बर आहे हा लेख!
एक नम्बर आहे हा लेख!
. आतड्याचे वेटोळे आणि पोटाचे
. आतड्याचे वेटोळे आणि पोटाचे वाटोळे कोण करून घेणार. >>>>>>>>>>> हेहेहेहे!
अंड्याके सब फंडे ...................फारच भारी!
हाहाहा
हाहाहा
वरील सर्व प्रतिसादांचे
वरील सर्व प्रतिसादांचे धन्यवाद...... अन महिन्याभरापूर्वीचा लेख वर काढणार्या सहेलीचे विशेष आभार..
खुप मस्त लेख
खुप मस्त लेख
उमदं लिखाण
उमदं लिखाण