काही जालीय मित्रांसमवेत मुकेशने गायलेल्या कित्येक सुमधुर गाण्यांच्या संदर्भात चर्चा चालू असताना राजकपूरशिवाय अन्य कोणकोणत्या अभिनेत्यासाठी मुकेशने पार्श्वगायन केले आहे याची यादी आठवत असतानाच त्यातील एका मित्राने त्याला मुकेशचे "रजनीगंधा" चित्रपटातील 'कई बार यूं भी देखा है...' हे गाणे खूप आवडीचे वाटत असल्याचे म्हटले. जे कोणत्याच अभिनेत्याच्या तोंडी नसून नायिकेच्या सैरभैर मनस्थितीच्या वर्णनासाठी पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटात या गाण्याचा मार्मिकपणे वापर केला गेला आहे. हे गाणे माझ्याही अत्यंत आवडीचे आहे. त्या अनुषंगाने सलिल चौधरी यांच्या त्या गाण्याविषयी काही लिहावे...विशेषतः गीतकार 'योगेश' यांच्या एरव्ही गद्य वाटू शकणार्या गीतांविषयी....असे मनात आले.
तोच हा प्रयत्न !
हृषिकेश मुखर्जी यानी १९५९ मध्ये राज कपूरला घेऊन तयार केलेला 'अनाडी' आणि त्यातील गाणी खूप गाजल्याचे इथल्या सर्वच चित्रपटप्रेमी सदस्यांना माहीत आहेच. अनाडीच्या यशाने प्रेरित होऊन हृषिदांनी राज कपूर यालाच केन्द्रस्थानी ठेवून 'आनंद' ची जुळवाजुळव सुरू केली होती. इतकेच नव्हे तर अनाडीच्या वेळेसच आनंदसमवेत गाजलेले 'बाबू मोशाय' हे सहाय्यक पात्राचे नावही नक्की झाले होते...त्याला कारण म्हणजे राजकपूर हृषिकेश मुखर्जी याना सेटवर नेहमी 'बाबू मोशाय' याच नावाने हाक मारीत असे. गीतकार म्हणून अर्थातच शैलेन्द्र, ज्यानी 'अनाडी' साठी लिहिलेली गाणी संगीतप्रेमींच्या तोंडात बसली होती. पण त्याच वेळी स्वत:च्या 'आर.के.प्रॉड्क्शन'च्या 'जिस देश मे गंगा बहती है' मध्ये राजकपूर इतका व्यस्त झाला की त्याला 'आनंद' साठी तारखा देणे शक्य झाले नाही. पुढे त्या पाठोपाठ 'संगम' आला...त्यात तब्बल ५ वर्षे गेली...संगम गाजत असतानाच राजकपूरने त्याच्या महत्वाकांक्षी 'मेरा नाम जोकर'मागे लागल्यावर मग तर 'आनंद' साठी तो मिळणार नाही हे पक्केच झाले आणि निराश झालेल्या हृषिदांनी 'आनंद' ची कथा आणि निर्मिती विचार आपल्या फडताळात ठेवून दिला...कारण त्याना त्या भूमिकेसाठी राजकपूरशिवाय अन्य अभिनेता सुचत नव्हता. [विशेष म्हणजे ज्यावेळी 'आनंद' तयार झाला त्यावेळी हृषिकेश मुखर्जी यानी तो चित्रपट 'राजकपूर आणि मुंबई शहर' याना अर्पण केला].
पुढे 'आराधना' नंतर राजेश खन्ना युग आल्यावर आणि त्याच्या अभिनयाची धाटणी त्यावेळी सर्वानाच 'आल्वेज हॅपी काईंड फेलो' अशी वाटू लागल्यावर हृषिदांनी त्याला घेऊन 'आनंद' सुरू केला. 'अनाडी' ची संगीतकार जोडी शंकर-जयकिशन संपले होतेच...पण कथानकातील गाण्यांसाठी हृषिदां ज्या नावावर ठाम होते, ते नाव...शैलेन्द्र...हे देखील परलोकवासी झाले होते. संगीतासाठी सलील चौधरी ठरले आणि मग त्यानाच 'शुद्ध हिंदी लिहिणारा', साहित्याची जाण असणारा, कवी-गीतकार शोधण्यास सांगण्यात आले...[कारण शैलेन्द्रनंतर त्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत जे काही गीतकार होते...उदा. मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी, नक्श लायलपुरी, शकील बदायुनी, अंजान, आनंद बक्षी, एच.एस.बिहारी आदी...यांच्यावर उर्दू भाषेचा फार प्रभाव होता, नेमका तोच हृषिदांना नकोसा झाला होता....]आणि इथे प्रवेश झाला तो त्या गरजेला पुरेपूर उतरणारा एक युवा कवी 'योगेश गौड'.
दुर्दैव म्हणा वा दुर्लक्ष म्हणा हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकारांना त्यांच्या चालीसाठी 'कवी' नको 'गीतकार' हवा असतो, शिवाय तो 'साहित्या'च्या प्रांतातील तर बिलकुल नको असतो...कारण बैठकीच्यावेळी तो शिरजोर होईल अशी भीती या संगीतकारांच्या मनात असते. त्यामुळेच की काय योगेश या साहित्यिक कवीला चित्रपटसृष्टीने जसे 'समीर' ला भरभरून स्वीकारले तसे कधीच आपलेसे केले नाही. असे असले तरी योगेश यानी जी काही मोजकी कामे केली त्यात एरव्ही गद्य वाटू शकणार्या त्यांच्या गीतांनी जी काही लोकप्रियता मिळविली ती हजारभर चित्रपट करणार्या समीरला मिळू शकत नाही.
लखनौच्या एक सुसंस्कृत कुटुंबात जन्म झालेल्या योगेशचे शिक्षणही तिथेच झाले आणि पदवीपूर्वीच वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबासाठी नोकरीचाकरी करण्याची वेळ आली...साल होते १९६०. काही मित्रांच्या सल्ल्यावरून योगेशने मग मुंबई महानगरीत आपले नशीब आणि प्रतिभा अजमावण्याचा निर्णय घेतला. उत्तर भारतातून या मोहनगरीत येणार्या प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते ते चित्रपटसृष्टीत आपल्या साहित्यिक कलागुणांना वाव मिळतो का ते पाहाण्याचे. त्यावेळी लखनौमधील त्याचे एक मित्र सत्यप्रकाश मुंबईतच चोप्रा फिल्म्सच्या पटकथा विभागात उमेदवारी करीत होते. साठच्या दशकात मुंबईतील ओशिवारा इथे टिपिकल अशा एका चाळीतील सिंगल रूममध्ये अशी ही तीनचार धडपडे युवक पाठ टेकण्यासाठी जमत आणि दिवसभर केलेल्या पायपिटीची उजळणी रात्री तिथेच स्टोव्हवर केलेल्या जेवणासोबत एकमेकाला सांगत. योगेश त्यातीलच एक. सत्यप्रकाशने योगेशला दोनचार सहाय्यक संगीत दिग्दर्शकाकडे 'चित्रपट गाणी लिहिण्याच्या शिकवणी'साठी नेले. त्यावेळी ह्या युवकाला समजले की संगीत दिग्दर्शकाकडे गाण्याची 'चाल' अगोदर तयारच असते आणि ती हार्मोनियमवर गीतकाराला ऐकविल्यावर त्याच्या आधारे कथानकातील त्या जागेला पूरक अशी शब्दरचना लिहायची....[किंवा तयार करायची...]. हा प्रकार 'कवी' म्हणून वयाच्या नवव्या वर्षापासून लिखाण केलेल्या योगेशच्या पचनी पडणे कठीण होते...कारण हा तर मुक्त छंदाचा प्रेमी...शिवाय 'ट' ला 'ट' जुळवून 'एबीसीडी छोडो..प्रेम का साथ जोडो...' अशी शुष्क गाणी लिहिणेही याला नामंजूरच होते. तरीही सत्यप्रकाशने त्याला 'जीना यहाँ मरना यहाँ..' हे मंजूर असेल तर चालीवरच गाणी लिहिली पाहिजेसच तू...अशी धमकीवजा सूचना दिल्यावर तो तयार तर झाला, पण त्याने 'तशा पद्धतीची गाणी लिहिताना मी माझ्या कवितेवरील भक्तीला दूर करणार नाही..' असा मनोमनी निश्चयही केला. सत्यप्रकाशने मग 'सी' दर्जाच्या चित्रपटांना संगीत देणार्या रॉबिन बॅनर्जीकडे योगेशला नेले. त्या काळात दारासिंगला आलेला भाव पाहता सी ग्रेड निर्मातेही धडाधड तसलेच चित्रपट बाजारात आणत होते...'सखी रॉबिन, मार्व्हल मॅन, फ्लाईंग सर्कस, रॉबिनहूड..." अशी चित्रपटांची नावे जरी वाचली तर ते काय दर्जाचे होते याची कल्पना होती. या सार्या चित्रपटांचे संगीतकार होते रॉबिन बॅनर्जी. अशा चित्रपटांतील गाणी गाजली काय किंवा न गाजली काय...निर्मात्याला कसलाही फरक पडत नसायचा. कारण त्यांच्या दृष्टीने हाणामारी, कोलांट्याउड्या, राजकन्येचे अपहरण, खलनायक सेनापती, एखादा जादूगार, मग एक तगडा नायक, त्याची तलवारबाजी...बस्स..झाले काम. अधुनमधून तोंडी लावण्यापुरती हेलेन-लक्ष्मीछाया-मधुमती-राणी यांचे एखाददुसरे नृत्य...मग त्यावर कसलेही शब्द गाण्यासाठी असले तरी काही फरक पडत नव्हता. योगेशने अशातर्हेच्या चित्रपटासाठी गाणी लिहून दिली एका गाण्याला २० रुपये अशा दराने.. निदान महिन्याभराचे रेशन तरी खोलीवर आपल्या पैशातून आले याचाच योगेशला जास्त आनंद.
रॉबिन बॅनर्जीच्या रूमवर संगीत बैठकीसाठी येणार्यामध्ये गीतकार 'अंजान' [लखनौचेच लालजी पांडे...प्रसिद्ध गीतकार समीरचे वडील] यांच्याशी त्याची मैत्री जुळली. कारण एकच.. दोघेही धडपडे आणि तितकेच उपाशीही. योगेशला मिळालेला पहिला चित्रपट जसा आपटला, तितकाच अंजान याना मिळालेला 'गोदान'ही...ज्याला पं.रविशंकर यांचे संगीत लाभले होते. मात्र त्या अपयशाने दोघांची मैत्री जुळली आणि कामे शोधताना एकमेकाची साथ 'बेस्ट' द्वारा सुरू राहिली.
'अंजान' आणि सलील चौधरी यांची दाट मैत्री होती पण सलीलदा यांच्या संगीतप्रकृतीला मानवेल अशी गाणी अंजान लिहू शकत नव्हते. तथापि त्यांच्या मैत्रीत काही फरक आला नव्हता...त्याला कारण म्हणजे सलीलदा यांची पत्नी सविता ह्या साहित्यप्रेमी होत्या. अंजानसमवेत घरी येणार्या योगेशसमवेत सविता चौधरींची चांगलीच मैत्री जुळली. सविताने त्याची कविताची वही पाहिली....[योगेश यांच्या याच कवितेच्या वहीचा उपयोग हृषिकेश मुखर्जी यानी 'आनंद' च्या त्या एका प्रसंगात केला आहे...ज्यात एक मोरपीस ठेवलेले असते.. जे पाहून राजेश खन्ना हळुवारपणे 'कही दूर जब दिन...' गाणे म्हणतो] आणि योगेशच्या सहजसुंदर गद्य कवितांनी त्या भारावून गेल्या...त्या रात्री त्यानी सलील चौधरींना योगेशची ती वही दाखविली आणि मग तिथेच सलील, हृषिकेश मुखर्जी याना अभिप्रेत असलेला 'शैलेन्द्र' सापडला.
दुसर्या दिवशी तात्काळ मुखर्जी यांच्याकडून अंजानला निरोप गेला की त्या युवकाला घेऊन सलील चौधरीच्या घरी येणे. हृषिकेश मुखर्जी हे नाव किती दबदब्याचे आहे हे अंजान, सत्यप्रकाश याना अर्थातच माहीत होती. ती संधी अजिबात घालवू नकोस असे योगेशला वारंवार सांगून त्याला सलीलदांच्या घरी आणले. तिथे प्रमुख कलाकार वगळता चित्रपटाशी संबंधित सर्वच घटक होते...अगदी कॅमेरामन जयवंत पाठारेसुद्धा....कथानक वाचन सुरू झाले...आणि सायंकाळच्या सुमारास योगेश यानी त्या वातावरणालाच जणूकाही अनुसरून ऐकविलेल्या चालीवर गीत रचले :
"कहीं दूर जब दिन ढल जाये
सांझ की दुल्हन बदन चुराये, चुपकेसे आये..."
गायिले मुकेशने आपल्या तरल आवाजात...सोनेच केले या रचनेचे.
चित्रपट पूर्ण झाल्यावर त्या एका गाण्याने तसेच दुसरे..."जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसांए...कभी ये रुलाये !" [जे मन्ना डे यानी गायले होते]...यानी अतोनात प्रसिद्धी मिळविली...'आनंद'शी निगडित सारेच घटक एका रात्रीत देशात लोकप्रिय झाले. योगेश आणि सलील चौधरी असे समीकरण छान जुळले. पुढे 'अन्नदाता...आनंदमहल...अनोखा दान' असे काही चित्रपट या जोडीने दिले...पण या सर्वात आगळावेगळा होता तो म्हणजे 'रजनीगंधा'.
चित्रपट 'आर्ट फिल्म' म्हणून समीक्षक आणि रसिकांना उचलून धरला. अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा ही दोन नावे हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलीच रुजली. यातील संगीत तर सर्वतोमुखी झाले. योगेश यानी ह्यासाठी दोन गाणी लिहिली...तितकीच होती 'रजनीगंधा' मध्ये :
१. "रजनीगंधा फूल तुम्हारे..." लता
२. "कई बार यूं भी देखा है...ये जो मन की सीमा रेखा है".. मुकेश.
[मुकेश याना त्यांच्या दीर्घ अशा पार्श्वगायन प्रवासात फक्त एकदाच 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला....तोही शंकर-जयकिशन तसेच राजकपूरसमवेत केलेल्या चित्रपट गायनासाठी नव्हे तर...योगेशच्या याच गीतासाठी, हे एक विशेषच म्हणावे लागेल.]
दोन्ही गाण्यांतील हळवेपणा विलक्षणच...शिवाय अतिशय शुद्ध हिंदीचा वापर...मुक्त छंदाचा उपयोग...आणि लता मुकेश यांच्या आवाजाची दैवी करामत. इथल्या सर्व सदस्यांनी ही दोन्ही गाणी जरूर माहीत असतील...ऐकलीही असणार, पण दोन्हीचे एक वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक बासू चटर्जी यानी कलात्मकतेने ही गाणी नायिका नायकाच्या तोंडी न देता त्यांचा 'पार्श्वसंगीत' म्हणून उपयोग केला आणि नायिकेच्या मनी असलेल्या भावनांना त्याद्वारे 'चित्रित' केले. हा एक अनोखाच प्रयोग होता...जो बासू चटर्जीसारखाच दिग्दर्शक करू जाणे. बासूदा यानीच मग पुढे 'छोटी सी बात', 'प्रियतमा', 'दिल्लगी', 'बातो-बातो मे' आणि "मंझिल" या चित्रपटासाठी योगेश यानाच गीतकार म्हणून करारबद्ध केले. या सार्या चित्रपटातील गाणी तितक्याच सघन अर्थाने आणि मधुरतेने चिरपरिचित झाली आहेत. 'मंझिल' मधील अमिताभ बच्चन आणि मौशुमी चटर्जी यांचे गेटवे ऑफ इंडिया समोरील भर पावसातील 'रिमझिम घिरे सावन...' हे गाणे तर उत्कृष्ट छायाचित्रणाचा एक सुंदर नमुना ठरला आहे. 'छोटीसी बात' मधील लताचे 'न जाने क्यों होता है, ये जिन्दगी के साथ अचानक ये मन किसी के जाने के बाद....' हे गाणे तर पत्रलेखन केल्यासारखेच गद्यमय आहे...लताने म्हटलेही आहे अत्यंत नाजुकपणे.
...पण काळाच्या ओघात ह्या मोहमयी मायावी चित्रदुनियेतून जिथे हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, सलील चौधरी आदी मागे पडले, बर्मन पितापुत्रही कैलासवासी झाले...मारधाड आणि गाण्यातील शब्दांना कसलाही आगापिछा नसला तरी चालते असे दिवस आल्यावर 'योगेश' यांच्यासारख्या 'कवी-गीतकारा'ने या प्रेमाला रामराम करणे हे क्रमप्राप्तच होते....झालेही तसेच.
१९४३ साली जन्मलेले योगेश गौड आज बरोबर ७० वर्षाचे झाले असून त्यानी चित्रपटलेखन संन्यास घेतला आहे.
आहाहा.. हे गाणं तर अजरामर
आहाहा.. हे गाणं तर अजरामर झालंय.. माझ्यापुरतं तरी..
अतिशय सुरेख लेख..
पुन्हापुन्हा वाचावासा वाटणारा.. म्हणून माझ्या आवडत्या दहात..
माझं अतिशय आवडतं गाणं......
माझं अतिशय आवडतं गाणं...... हे गाणं लागलं की नॉस्टॅल्जिक व्हायला होतं.
फार छान लेख.
मस्तच..
मस्तच..
वा! वा! छानच लिहिलंय.
वा! वा! छानच लिहिलंय.
उर्दूविरहित शुध्द हिंदी काव्य - ही बाब कधी लक्षात आली नव्हती.
मात्र, शीर्षकात नमूद केलेलं गाणं (आणि त्यातला मुकेशचा आवाज) मला विशेष आवडत नाही.
मामा लेख आवडला. हे गाणं मी
मामा लेख आवडला. हे गाणं मी ऐकलंय पण मला आवडत नाही फारसं.
फारच सुंदर लेख, "कवी योगेश"
फारच सुंदर लेख, "कवी योगेश" या व्यक्तिमत्वाबद्दल सुरेख पद्धतीने माहिती दिल्याबद्दल अशोकरावांना अनेकानेक धन्यवाद.
मामा मस्त माहितीपर लेख.
मामा मस्त माहितीपर लेख. यासाठीच आम्हा भाचरांना तुम्हाला आणी तुमच्या सर्वकष ज्ञानाला सा. नमस्कार करावा वाटतो.
ललिता....आणि
ललिता....आणि दक्षिणा....
गाण्याबद्दलचे तुमचे मत झटदिशी लपवून ठेवा....वर वर्षू-नीलचे मत वाचलेत का ? तिने जर तुमचे प्रतिसाद वाचले तर ती चीनमधून लागलीच भारतात परतेल आणि तुमच्या दारात उभी राहील....आणि काय करेल त्याचा गंभीर विचार करा....मुलींनो.
शशांकजी....धन्यवाद. खुद्द योगेश गौड आकाशवाणीवरून [विविध भारती] युनूस खान यांच्याशी बोलताना म्हणाले होते की, 'व्यवसायासाठी स्वतःमधील कवीला मारून टाकणे फार क्लेशदायक अनुभव असतो.... त्यामुळे जे संगीतकार आपल्या गीतांना न्याय देवू शकतील असे वाटायचे त्यांच्याकडूनच येणार्या निरोपाची मी वाट पाहत बसे." ~ मला वाटते 'कामासाठी तडजोड' न करणे हेच खर्या कवीचे लक्षण असावे.
दीपाली....ग्रेट...नमस्कार-बिमस्कार बिलकुल नको श्यामबाले !!
अशोक पाटील
अप्रतीम लेख,
अप्रतीम लेख,
आई ग्गं... दक्षी>>>>>>>>>>
आई ग्गं... दक्षी>>>>>>>>>> 'हे गाणं मी ऐकलंय पण मला आवडत नाही फारस''...........


अशोक ने म्हटल्याप्रमाणे.. खरंच आत्ता येऊन तुझे कान पिळले असते...
दक्षु प्लीजच हा सिनेमा बघून मगच प्रतिसाद दे...
तू ही हा सिनेमा फक्त या
तू ही हा सिनेमा फक्त या गाण्याकरताच बघ...
लले.. ,'उर्दूविरहित शुध्द हिंदी काव्य,''... लिहिणार्यांमधे नीरज चं काव्य जर्रूरच वाचणे..
सुंदर लेख. या गाण्यांचे शब्द
सुंदर लेख. या गाण्यांचे शब्द सूरातच वाचावे लागतात, अशी जादू आहे.
आधी अशी जूनी गाणी ऐकण्यासाठी आकाशवाणीला पर्याय नव्हता, आता यू ट्यूबमूळे हि गाणी ऐकताच नव्हे तर पाहताही येतात.
तूम्ही गोदानमधल्या सर्वच गाण्यांबद्दल लिहा.
जिया जरत रहत दिनरैन ( मुकेश- राग हमीर ), बिरजमे होली खेलत नंदलाल ( रफी - राग काफी ) जाने काहे जिया मोरा डोले ( लता ) पिपरा के पटवा ( रफी ) ओ बेदर्दी क्यू तडपाये ( महेंद्र कपूर, गीता दत्त ) हि सर्वच गाणी यू ट्यूबवर आहेत.
क्या बात है! प्रतिक्रियेत
क्या बात है! प्रतिक्रियेत दुसरं काही नकोच लिहायला. आवडला लेख.
माझं अतिशय आवडतं गाणं... लेख
माझं अतिशय आवडतं गाणं... लेख आवडला.
मस्त..माझपण खूप आवडत गाण..
मस्त..माझपण खूप आवडत गाण.. किसको मीत बनाउ, किसकी प्रीत भुलाउ..
अशोकजी वाह ! कवी योगेश यांची
अशोकजी वाह !
कवी योगेश यांची अशी छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
सुरूवातीच्या काळात हिंदी चित्रपटातले संवाद, गीते यावर उर्दूचा खुप मोठा प्रभाव होता.
नंतर शुद्ध हिंदीत कविता, गीते लिहिणारे लोक येऊ लागले,
त्यामधे प्रामुख्याने योगेश, निरज, भरत व्यास, इंदिवर हे लोक होते.
शुद्ध हिंदी गीतांचे लक्षात असलेले एक उदाहरण म्हणजे,
चंदनसा बदन चंचल चितवन
अशोककाका, लेख अप्रतिम
अशोककाका, लेख अप्रतिम जमलाय... सुंदर. छान माहिती.
पण मुकेशच्या एकुणात गाण्याबद्दल... मला कायम आश्चर्यच वाटत आलय. आवाजात एक सच्चेपणा ह्यापलिकडे मला तरी अनेकदा काहीही सापडलेलं नाही. त्याचमुळे अगदी सरळसोट चाल असेल तर, काहीच नायक किंवा ह्या गाण्यासारखी सिच्युएशन... अशाच वेळी मुकेश चाललाय.
मुकेशच्या आवाजात चंदनसा बदन ऐकताना मला असं वाटतं - ते झावळं-सावळं चंदनशिल्पं पाण्यात उतरलय, लाजून आता विरघळेल की काय अशी अदा समोर असताना... साहेब पूलच्या काठावर मांडी घालून बसलेत आणि जोरजोरात हाताने मांडीवर ताल देत नुक्ती क्लासमधे शिकलेली रागाची चीज म्हणून दाखवतायत.
चंदन साबदन चंचल चितवन
धीरेसे तेरा ये मुसकाना
(मुझे दोष न देना जग्वालो)२
इथून पुढे मी हे गाणं ऐकायचं टाळायला लागते. पण इलाज नसतो... आमच्या घरात मुकेशभक्तं आहेच.
मुकेशला "अहो" वगैरे न म्हणून अनादर दाखवत नाहीये. किशोरही "अरे"च आहे.
सॉरी... सार्या मुकेशप्रेमींची (माझा नवरा सोडून) माफी मागते
@दाद : ठीक हय माफ किया
@दाद : ठीक हय माफ किया
आमच्या वाड्यात एक होते प्रभुणे..ते म्हणे मुकेश गेला तेव्हा रडले होते
विविध भारती वर गाणी लागली की हे सुद्धा सुरु होत..
मुकेश चे ये दिन क्या आए लगे फूल हसने पण मला खूप आवडते
मुकेशचंद माथुर यांच्या आवाजात
मुकेशचंद माथुर यांच्या आवाजात जो सच्चेपणा, भक्तिभाव होता त्याला तोड नाही !
छान लिहिलय. रजनीगंधातील सगळीच
छान लिहिलय.
रजनीगंधातील सगळीच गाणी आवडतात. पण खास हेच
कई बार यूं ही देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोडने लगता है
अंजानी प्यास के पीछे
अंजानी आस के पीछे
मन दौडने लगता है
'मुकेशच्या आवाजात चंदनसा बदन
'मुकेशच्या आवाजात चंदनसा बदन ऐकताना मला असं वाटतं - ते झावळं-सावळं चंदनशिल्पं पाण्यात उतरलय, लाजून आता विरघळेल की काय अशी अदा समोर असताना... साहेब पूलच्या काठावर मांडी घालून बसलेत आणि जोरजोरात हाताने मांडीवर ताल देत नुक्ती क्लासमधे शिकलेली रागाची चीज म्हणून दाखवतायत.' >>>> हा हा हा!!! (मला खरेतर खळाळून हसणारी बाहूली इथे टाकायची होती. पण कशी टाकायची ते ठाउक नाही... घोर अज्ञान!!!) दाद, तुमच्या मताशी मीही अंशतः सहमत आहे. पण मुकेशची बरिचशी गाणी मला खुप आवडतात. त्यांच्या आवाजापेक्षाही त्या गाण्यातल्या शब्दांमुळे...
लेख खुपच आवडला! उपरोक्त गाणं माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी आहे. धन्यवाद अशोक!!!
काय लेख लिहिलात.... अप्रतिम
काय लेख लिहिलात.... अप्रतिम ... कालच हे गाणं ऐकलं नवर्याच्या तोंडुन ( तो चांगला गातो), आणि आज माबो उघडते तर तुमचा लेख !!! काय योगा योग आहे!!!!
मला ह्या सिनेमातली ( छोटीसी बात, बातो बातो में, रजनी गंधा=) ह्यां मधली सगळी गाणी प्रचंड आवडतात... आनंद तर कळस आहे..... संगीतकारा बद्दल फारसे माहित नव्हते ते आज कळले.... धन्स....
शिर्शकातल्या गाण्याला विषेश महत्व आहे कारण त्या सिनेमातली त्या वेळची सिच्युएशन !!!! फार सुरेख अर्थ आहे.... आणि त्या साठी मुकेशचा थोडा उतरलेला, जड, अलिप्त आवाज एकदम बाजी मारुन जातो. कदाचित दक्षि आणि लली ने तो सिनेमा पाहिला नसावा.
( रच्याकने.... मामा, शेवटच्या पॅरा मध्ये न जाने क्युं .. हे गाणं सिनेमा " छोटी छोटी बाते" मधिल आहे अश्या ऐवजी "छोटीसी बात" करायला हवय....बाकी अप्रतिम लेख)
'मुकेशच्या आवाजात चंदनसा बदन
'मुकेशच्या आवाजात चंदनसा बदन ऐकताना मला असं वाटतं - ते झावळं-सावळं चंदनशिल्पं पाण्यात उतरलय, लाजून आता विरघळेल की काय अशी अदा समोर असताना... साहेब पूलच्या काठावर मांडी घालून बसलेत आणि जोरजोरात हाताने मांडीवर ताल देत नुक्ती क्लासमधे शिकलेली रागाची चीज म्हणून दाखवतायत.>>>>> दाद तू पण नां! नाट्यसंगीताच्या स्पर्धा आठवल्या मला.
मुकेशच्या आवाजातलं यहुदी
मुकेशच्या आवाजातलं यहुदी मधलं " ये मेरा दिवाना पन है " आणि पूरब और पश्चिम मधलं " कोई जब तुम्हारा ह्रिदय तोड दे" ह्या दोन गाण्यां साठी त्याला माझ्या तर्फे जहागीरी बक्षिस.....
( रच्याकने मुकेश ची धाकटी सुन मराठी आहे, नीशीगंधा नाटेकर , नंदू नाटेकरांची मुलगी. आर्टिकल शीप चं पहिलं ऑडिट मी हिच्या बरोबर केलं आहे.... ती मला ४-५ वर्ष सीनीयर होती)
मस्त!! कई बार यूं ही देखा है.
मस्त!! कई बार यूं ही देखा है. >> मला फार फारच आवडते हे गाणे. गाण्यासाठी म्हणुन शोधून काढून पिक्चर पाहिला होता.
मस्त लेख. आवडला. गुलजार
मस्त लेख. आवडला.
गुलजार यांच्या आनेवाला पल जानेवाला है चे संगीतकार होते पंचमदा. योगेश यांच्या कभी कुछ पल जीवन के, लगता है कि चलते-चलते कुछ देर ठहर जाते हैं याचेही संगीतकार पंचमदाच होते. दोन्ही गाणी जबरदस्त.
माझी आणखी दोन आवडती गाणी म्हणजे 'आये तुम याद मुझे, गाने लगी हर धडकन' व 'ना जिया लागे ना, तेरे बिना मेरा कहीं'
छान गाणं आणि छान लेख
छान गाणं आणि छान लेख
मुकेशच्या आवाजातल यहुदी मधलं "ये मेरा दिवाना पन है" हे माझही आवडतं गाणं.
एक छोटासा बदल कराल का? ते 'कई बार यूं भी देखा है' अस आहे.
सुंदर लेख आणि माहितीही.
सुंदर लेख आणि माहितीही.

मुकेशच्या आवाजातल यहुदी मधलं "ये मेरा दिवाना पन है" हे माझही आवडतं गाणं.>>>>>>>>>>>+१
छान लेख. गीतकार योगेश यांचे
छान लेख.
गीतकार योगेश यांचे मला पूर्ण पाठ असणारं गाणं... चंद्रकांताचं टायटल साँग.
चंद्रकांता म्हण्जे ती सिरेल??
चंद्रकांता म्हण्जे ती सिरेल?? उपर अंबर निचे धरती??
Pages