झाडे चहूकडे, पण----

Submitted by सतीश देवपूरकर on 5 May, 2012 - 11:34

झाडे चहूकडे, पण----

झाडे चहूकडे,पण छाया कुठेच नाही!
गर्दीत माणसांच्या माया कुठेच नाही!

कळसावरीच होतो वर्षाव कौतुकांचा;
कळसास पेलणारा पाया कुठेच नाही!

झिजणे स्वत:च साठी, जळणे स्वत:च साठी;
कापूर वाटणारी काया कुठेच नाही!

चारित्र्य शुद्ध झाले की, ते सुगंध देते;
चारित्र्य शुद्धतेचा फाया कुठेच नाही!

उगवेल सूर्य थेंबाथेंबामधून आता;
जाणार रक्त माझे वाया कुठेच नाही!

वात्सल्य, प्रेम, निष्ठा, आस्था दिसेल कोठे?
आई कुठेच नाही, आया कुठेच नाही!

-------प्रा. सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

''आकंठ''च्या २००८ च्या गझल विशेषांकात ह्या गझलेस पारितोषिक मिळाल्याचे स्मरते.

कळसावरीच होतो वर्षाव कौतुकांचा;
कळसास पेलणारा पाया कुठेच नाही!....... हा शेर आवडला.

खूप सुंदर गझल ....परिपूर्ण वाटली .....
आपल्या लेखनावरून असे वाटले की आपण एक जुनेजाणते व कुशल गझलकार आहात .....यात शंकाच नाही !

खूप छान !!

कळसावरीच होतो वर्षाव कौतुकांचा;
कळसास पेलणारा पाया कुठेच नाही!>> छानच

झिजणे स्वत:च साठी, जळणे स्वत:च साठी;
कापूर वाटणारी काया कुठेच नाही!>> आवडला

चारित्र्य शुद्ध झाले की, ते सुगंध देते;
चारित्र्य शुद्धतेचा फाया कुठेच नाही!>> शेर मस्त

उगवेल सूर्य थेंबाथेंबामधून आता;
जाणार रक्त माझे वाया कुठेच नाही!>>>

सूर्य अनेकदा येतो आपल्या गझलेत Happy

थेंबाथेंबामधून येथे पॉझ घेताना अडखळलो

जाणार रक्त माझे वाया कधीच नाही - अशी ओळ म्हणावीशी वाटली

धन्यवाद

जाणार रक्त माझे वाया कधीच नाही - अशी ओळ म्हणावीशी वाटली<<<

अरे ? परवाच ही अशीच ओळ वाचनात आली एका दुसर्‍याच गझलेत. काहीतरी घोळ असावा. Lol

पहिला आणि कळसाचा शेर आवडला. बाकीचे पण ठीक वाटतायेत पण समजले नाहीत.
"चारित्र्य शुद्ध झाले की, ते सुगंध देते;
चारित्र्य शुद्धतेचा फाया कुठेच नाही!"
आणि असे पहिल्या ओळीतले शब्द दुसर्या ओळीत फारच दमदार कारण असल्याशिवाय रिपीट झाले की interest जातो माझा. Sad