लहान असताना नेहमी आयुष्य म्हणजे एक मोठ्ठीच्या मोठ्ठी फॅक्टरी आहे असं वाटायचं. अजूनही वाटतं.
आमच्या ओळखीत एक काकू आहेत. त्यांचं नाव मी फॉर्म्युला काकू ठेवलंय. फॉर्म्युला काकू ना, सगळ्यासाठी फॉर्म्युले तयार करतात. आयुष्यात यशस्वी व्हायचे एकशेएक फॉर्म्युले त्यांच्याकडे आहेत. त्यांची मुलं शाळेत नेहमी खूप अभ्यास करायची. कारण खूप अभ्यास करणे हा त्यांच्या फॉर्म्युल्यातील मोठा घटक होता. तो नेहमी न्यूमरेटरमध्ये जायचा. त्यामुळे जितका जास्ती अभ्यास, तितकं जास्ती यश. आणि यात फक्त खूप अभ्यास करून मागल्या वर्षीपेक्षा जास्त मार्कं मिळवायचे अशी अट नव्हती. खूप अभ्यास करून मागल्या वर्षी जो पहिला आला होता, त्याच्यापेक्षा जास्त मार्कं मिळवायचे. आणि मग त्यांच्या आजूबाजूला जमणार्या सगळ्या सवंगड्यांपेक्षा ती किती पुढे आहेत यांचे अडाखेपण असायचे. आणि अभ्यास पण कसा? तर आठवीपासूनच दहावीच्या प्रश्नपत्रिका कशा असतात ते तपासून, त्याच साच्यात बसणारा अभ्यास करायचा. अवांतर अभ्यास बारावी नंतर. आणि मैत्री सुद्धा अभ्यासू मुलांशीच करायची. कारण ढ मुलांशी मैत्री केली तर ती डिनॉमिनेटरमध्ये जायची. आणि त्यामुळे आयुष्यातील अंतिम यशात कपात व्हायची.
नाटक, वक्तृत्व, वादविवाद वगैरे असायचे फॉर्म्युल्यात पण त्यांच्या आधी अपूर्णांकातले, एका पेक्षा कमी असलेले कोएफीशीयंट्स असायचे. त्यामुळे या गोष्टी खूप जास्ती केल्यानी आयुष्यातील अंतिम यशात फारसा फरक पडायचा नाही. आणि नेहमी या क्षेत्रात पुढे असलेल्या मुलामुलींचा अभ्यासाचा आकडा दाखवून, अभ्यास कसा श्रेष्ठ आहे याचं उदाहरण देण्यात यायचं. अवांतर वाचन अभ्यासाच्या आकड्यानुसार न्यूमरेटर नाहीतर डिनॉमिनेटर मध्ये जायचं. पण आठवीनंतर ते खालीच असायचं. दहावीनंतर भाषाकौशल्याला सुद्धा खालच्या मजल्यावर धाडण्यात यायचं. आणि आठवी ते दहावी सायन्सला जाणं कसं महत्वाचं आहे यावर खूप प्रवचन व्हायचं. त्यामुळे फॉर्म्युला काकूंची मुलं फॅक्टरीच्या असेम्बली लाईनवर छान टिकून राहिली. प्रत्येक व्यंगचाचणीतून फॉर्म्युला काकूंची मुलं अगदी माशासारखी सुळकन पुढे जायची. अशी कांगारूसारखी उड्या मारत मारत फॉर्म्युला काकूंची मुलं कुठच्या कुठे गेली! आम्ही बघतच राहिलो. आम्हीपण होतो फॉर्म्युला काकूंच्या मुलांच्या सवंगड्यांमध्ये. पण आम्हाला तसा फारसा भाव नव्हता. कारण आम्ही नेहमी त्यांच्या आलेखाच्या मुळाशी बरोब्बर पंचेचाळीस अंशाचा कोन करून उड्डाण करणार्या त्या लायनीच्या खाली, नाहीतर वर असायचो. जिथे आम्ही वर असायचो ना, ती क्षेत्रं फॉर्म्युल्यात खाली असायची. आणि वर असलीच तर नगण्य असायची.
मग जशी जशी स्पर्धा वाढू लागली, तसं अर्थातच आमच्यात आणि फॉर्म्युला काकूंच्या मुलांच्यात असलेलं अंतर वाढू लागलं. फॉर्म्युला काकूंची मुलं नेहमी आमच्या पुढे असायची. आणि कधीही त्यांना भेटायला गेलं की आम्हाला सहानुभूतीपर भाषण मिळायचं. त्यात एकदा आयुष्यात अभ्यासातील यशाचा कसा कमी वाटा आहे यावर भाषण देताना, धीरुभाई अंबानींचं उदाहरण आम्हाला देण्यात आलं. मग अर्थात आमच्या नापास झालेल्या, दु:खी (पण चाणाक्ष) मनात असा विचार आला, की फॉर्म्युला काकू त्यांच्या मुलांना अंबानी व्हायला का नाही शिकवत? आणि कदाचित आपण इतके गटांगळ्या खातोय म्हणजे कधीतरी आपणही अंबानी होऊ शकू काय , अशीही एक सुखद शंका आली. पण फॉर्म्युला काकूंच्या फॉर्म्युल्यात जोखीम पत्करणे हे भल्या मोठ्या लाल अक्षरात खालच्या मजल्यावर आहे. खालच्या मजल्यावरच्या बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण कुठल्याही प्रकारची जोखीम घेणे म्हणजे काकूंचा फॉर्म्युला अस्थिर करण्यासारखं आहे. आणि यात त्या फॉर्म्युल्यातील इतर घटकांना तपासून बघण्याची जोखीमही धरलेली आहे. अशा प्रकारे फॉर्म्युल्याचा पाया अगदी पक्का करण्यात आलाय. फॉर्म्युला काकूंच्या गणितांनी बिल गेट्स किंवा अंबानीकडे नोकरी मिळवणे हे बिल गेट्स किंवा अंबानी होण्यापेक्षा जास्त यशस्वी मानलं जातं. याचं कारण म्हणजे फॉर्म्युला काकूंच्या स्पर्धेत अंबानी कुठेच येत नाहीत. कारण त्यांनी फॉर्म्युला काकुंचे सगळे नियम अगदी लहान वयातच झुगारून टाकले. पण याला फॉर्म्युला काकू नशीब असं गोड नाव देतात. आणि त्यांच्या मते नशीबवान नसणार्या माणसांनी अशी जोखीम पत्करू नये. आणि त्यांच्या मुलांनी मात्र काही झालं तरी पत्करू नये.
फॉर्म्युला काकूंची मुलं जेव्हा घासून, पुसून चकचकीत होऊन फॅक्टरीबाहेर पडली तेव्हा त्यांनी मोठ्ठा, हसरा श्वास घेऊन इकडे तिकडे पाहिलं. आणि त्यांचं यशस्वी फॉर्म्युला जीवन जगायला सुरुवात केली. पण आता करायला अभ्यास नव्हता आणि आजूबाजूला असलेली गर्दी वेगवेगळ्या क्षेत्रातून, देशांतून, भाषांतून आणि अनुभवांतून आली होती. त्यातील फॉर्म्युला काकुंसारख्या आयांची मुलं सोडता बाकी सगळ्यांनी वेगळेच मार्ग घेतले होते. काही जण फॉर्म्युला काकूंच्या मुलांपेक्षा लहान असूनही खूप पुढे गेले होते. काही जण खूप वेळा हरून आले होते. पण प्रत्येक तोट्याचा अभ्यास करून मस्त टगेपण बाळगून होते. काहीजण असं काही व्यक्तिमत्व घेऊन आले होते की फॉर्म्युला काकूंच्या लायनीच्या दोन्ही बाजूंचे लोक त्यांच्यामागून मंत्रमुग्ध होऊन चालू लागायचे. काही जण कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता, अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे. काही जण आयुष्यभर तपस्या करून निवडलेला मार्ग अचानक सोडून देणारे, आणि नवीन मार्गावर त्याहीपेक्षा वेगाने पुन्हा प्रगती करणारे. काही लोक फॉर्म्युला काकूंच्या फॉर्म्युल्यात कणभरही नसलेल्या एखाद्या गुणावर आयुष्य बहाल करणारे. कुणी जैविक भाजीवाला, कुणी सात्विक खानावळवाला, कुणी लोकांच्या भिंती स्वत:च्या कल्पनेनी रंगवणारा असे अनेक यशस्वी लोक बघून फॉर्म्युला काकूंची मुलं पार भांबावून गेली. आणि आयुष्यातल्या लहान अपयशानेदेखील त्यांना कानठळ्या बसू लागल्या.
फॉर्म्युला काकूंच्या सगळ्या फुटपट्ट्या खर्या जगात तुलनेसाठी अपुर्या पडू लागल्या. कारण खर्या जगातील सगळी खरी माणसं काही फॉर्म्युला काकूंच्या फॅक्टरीतून आली नव्हती. आणि जी फॉर्म्युला काकूंच्या फॅक्टरीतून आली होती ती सगळी काहीतरी एकसारखं करत होती. पण फॉर्म्युला काकूंचा एक फॉर्म्युला मात्र खरा उतरला बरंका. त्यांच्या मुलांना खूप लवकर, खूप जास्ती पैसा मिळाला. लगेच काकूंनी त्यांना मिळालेला पैसा वाढवण्याचाही फॉर्म्युला दिला. आणि मग अभ्यासाची जागा पैशांनी घेतली.
फॉर्म्युला काकूंच्या सुना, जावई आणि मुलं यांनी इतर फॉर्म्युला दांपत्यांशी स्पर्धा सुरु केली. पण यामुळे काय झालं की फॉर्म्युला काकूंच्या मुलांसारख्या मुलांचा एक बुडबुडा तयार झाला. त्या बुडबुड्यात एक छोटी शाळाच तयार झाली जणू. आणि इतर फॉर्म्युला लोकांशी तुलना करता करता फॉर्म्युला मुलांचे फॉर्म्युला आई बाबा झाले. अणि असा एक मोठ्ठा संघ तुलना करण्यात मग्न झाल्यामुळे सगळेच हळू हळू दु:खी होऊ लागले. असं कसं बरं झालं? लौकिक यश विरुद्ध आनंद असा आलेख केल्यावर मात्र फॉर्म्युला लोक अत्यंत यशस्वी परंतु कमी आनंदी निघू लागले. आणि फॉर्म्युला काकूंना अचानक आपला फॉर्म्युला चुकला की काय असं वाटू लागलं. पण अर्थात त्यांनी हे कुण्णालाही बोलून दाखवलं नाही. पण आतल्या आतच त्यांना सारखी हुरहूर लागून राहिली. आपल्या मुलांनी तर सगळे बॉक्सेस टिक केले होते. मग त्यांना असं अपुरं अपुरं का वाटतंय?
पण काकूंचा फॉर्म्युला चुकला नव्हता. फॉर्म्युला यशस्वी आयुष्याचा होता. आणि तो त्याच्या सगळ्या परिमाणांवर चोख उतरला होता. पण काकूंचं एक असमशन चुकलं होतं. ते म्हणजे, या सगळ्या यशाच्या पलीकडे गेलं की आपण आनंदी होऊ. आणि दुसर्यांपेक्षा यशस्वी झाल्याने आपण त्यांच्यापेक्षा जास्त आनंदी होऊ. आनंद नेहमी भविष्यकाळात कुठेतरी मृगजाळासारखा धावत सुटणारा, कधीही हाताला न लागणारा पदार्थ आहे असं फॉर्म्युला काकूंचा फॉर्म्युला सांगतो. आणि अचानक धावता धावता धाप लागून असं लक्षात येतं, की आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी करणारे, कुठल्याही प्रथापित गणितांना भीक न घालणारे, मनाला वाटेल ते, वाटेल तेव्हा आणि वाटेल तस्सं करणारे, अपयशाची फिकीर न करता हृदयाला भिडणर्या सागरात उडी मारणारे लोक कधी कधी जास्ती आनंदी असतात. कारण कदाचित आपली आता कुणाशीच तुलना होऊ शकत नाही, आणि कुणाच्याही तुलनेत आपण आनंदी किंवा दु:खी असू शकत नाही, या जाणीवेतच त्यांना आनंद मिळतो.
हा टेड नक्की ऐका!
http://www.ted.com/talks/shawn_achor_the_happy_secret_to_better_work.html
http://www.ted.com/talks/shawn_achor_the_happy_secret_to_better_work.html
छान लिहीलय!
छान लिहीलय!
_________/\_________. Ajun
_________/\_________. Ajun kaay bolu?
छान लिहीलय.
छान लिहीलय.
मस्त
मस्त
छान लिहिलय
छान लिहिलय
सुरेख. मला मनातल्या मनात कधी
सुरेख.
मला मनातल्या मनात कधी कधी भिती वाटते मी फॉर्म्युलाकाकू होइन की काय अशी
आवड्या
आवड्या
कालच तुझी आठवण झाली एव्हढ्यात
कालच तुझी आठवण झाली एव्हढ्यात तू काही लिहीलं नाहीस म्हणुन!
आता वाचते!
सॉल्लीड तुमचे ऑलमोस्ट सगळेच
सॉल्लीड
तुमचे ऑलमोस्ट सगळेच लेख रिलेट करता येतात.शैली तर अप्रतिम !! असं सगळं थोडं सोप्या भाषेत सांगून लोकांचं प्रबोधन करावं अशी जाम सुरसुरी येते मनात, जेव्हा जेव्हा तुमचे लेख वाचते तेव्हा

मस्तच गं! हा पण आवडला!
मस्तच गं! हा पण आवडला!
छान लिहिले आहे, पण
छान लिहिले आहे, पण नेहमीपेक्षा 'फॉर्म्युला' थोडा कमी वाटला!!!
सेव्हन हॅबिट्समधले एक वाक्य आठवले- असे लोक यशाच्या पायर्या भराभर चढतात आणि वर पोचल्यावर त्यांना कळते की ही शिडीच चुकीच्या ठिकाणी नेणारी होती.
छान लिहिलयसं , दुर्दैवाने अशा
छान लिहिलयसं ,
दुर्दैवाने अशा फॉर्म्युला काकु / काकांच प्रमाण जरा जास्तच वाढलयं.
सई.................. ब्येस्ट
सई.................. ब्येस्ट लिहिलय.
तुस्सी..........
छान लिहिलं आहेस...
छान लिहिलं आहेस...
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.
खूप छान लेख. अगदी टायगर मॉम
खूप छान लेख. अगदी टायगर मॉम वाट्ते आहे ती काकू. काय होत असेल बरे अश्या लोकांचे?
छान लिहिलंय. शेवटचा पॅरा मस्त
छान लिहिलंय. शेवटचा पॅरा मस्त (नेहेमीप्रमाणे)
खूप छान!
खूप छान!
सॉरी सई. हा तेवढा नाही आवडला.
सॉरी सई.
हा तेवढा नाही आवडला. काहीतरी कमी पडले आहे.
सई... लै भारी... !!!! अगदी
सई... लै भारी... !!!! अगदी ... !!!! If possible please publish this artical in mukta peeth section of newspaper..!!!
" टिपीकल सँपल" छानच सादर
" टिपीकल सँपल" छानच सादर केलंय !
<< पण यामुळे काय झालं की फॉर्म्युला काकूंच्या मुलांसारख्या मुलांचा एक बुडबुडा तयार झाला. ..... ...अणि असा एक मोठ्ठा संघ तुलना करण्यात मग्न झाल्यामुळे सगळेच हळू हळू दु:खी होऊ लागले. >> मला वाटतं, अशा बुडबुड्यातली मंडळी मग आपापसांत बाहेरच्या आनंदी माणसाना हंसण्यातच आनंद मानतात; बुडबुडा फुटूं नये म्हणून केलेली केविलवाणी धडपडच असावी ती !!!
मस्त.... माधवी देसाईंच नाच गं
मस्त.... माधवी देसाईंच नाच गं घुमा मधलं एक वाक्य आठवलं..
"शेवटी सुखाची व्याख्या काय? सुख हा एक फसवा आभास आहे. मुळात माणसाची सुखाची कल्पना नक्की हवी. दोघे असलो तरी दोघे असण्याचे दु:ख आणि एकटे असलो तरी एकाकीपणाचे, मग सुख आहे तरी कशात? माणसाने अंतर्मुख होऊन मनाचा तळ ढवळून याच उत्तर शोधायला हव नाहीतर सुख म्हणजे काय हे न समजता दुसर्यांच्या सुखाच्या कल्पनेमागे आपण धावतो आणि होते फक्त दमछाक..आयुष्यभर.."
आवडलं
आवडलं
एकदम समर्पक. अशा काकु होत्या
एकदम समर्पक.
अशा काकु होत्या आमच्या शेजारी. त्यांच्या घरी घेलं की सहानुभुतीपर डोस मिळायचे.
रैना + १.. मला तर ते
रैना + १..
मला तर ते फॉर्म्युला शब्द वाचून वाचून डोकेच भंजाळले एकदम.
सर्व formuala based यशस्वी
सर्व formuala based यशस्वी माणसे एका टप्प्यावर दु:खी होतात आणि सर्व formula-less माणसे खुप आनंदी असतात,ह्या formuala ला वापरुन सोडवलेले गणित आहे हा लेख म्हणजे.
<<ह्या formuala ला वापरुन
<<ह्या formuala ला वापरुन सोडवलेले गणित आहे हा लेख म्हणजे.>> तसं गणित किंवा समीकरण नसावं हा लेख म्हणजे; अनेक जण फॉर्मुलातून यशस्वी होतानाच खराखुरा आनंदही चाखायला शिकतातच व कांही formula-less माणसे आपण यशस्वी न झाल्याचं दु:खच कुरवाळतही बसतात. [ कांही माबोकरच फॉर्मुला डोसळपणे वापरून यशस्वी झालेले पण साहित्य, संगीत इ. इतर आवडीच्या क्षेत्रात प्रगति करून स्वतःला व इतराना आनंद देताना दिसतातच ना !]. केवळ यशासाठीच स्वतःला पूर्णपणे फॉर्मुलात जखडून घेवून खर्याखुर्या आनंदाला मुकण्याचा दुराग्रह, यावर या लेखाचा रोख असावा असं आपलं मला वाटतं.
फॉर्म्युला फॅमिलीबद्दल केलेलं
फॉर्म्युला फॅमिलीबद्दल केलेलं तुझं गृहितक थोडसं भलतीकडे गेलं आहे बहुतेक. फॉर्म्युला काकुंची मुले शिकण्यात पटाईत आहेत. ती पुढं जाऊन भांबावली तरीदेखील नवीन फॉर्म्युला शिकणार नाहीत, बनवणार नाहीत हे कशावरून?
एकंदरीत लेख नेहेमीएवढा नाही आवडला.
धन्यवाद! दोन्ही प्रकारचे
धन्यवाद! दोन्ही प्रकारचे अभिप्राय बघून छान वाटलं.
हा लेख एक्स्पेरिमेंटल आहे.
मधला मार्ग, समतोलाने धरणारे लोक आहेतच. पण या लेखात फक्त दोन टोकाच्या भूमिका मांडल्या आहेत.
लेखाच्या खाली एक लिंक दिली आहे. कदाचित ती ऐकून माझ्या लेखाचा सूर स्पष्ट होइल.
लेख वाचताना मजा आली पण तरी
लेख वाचताना मजा आली पण तरी त्यातला लेखाचा सूर असलेला गृहितक फॉर्म्युला खटकेश.
एक भयाण फॉर्म्युला पुस्तक आठवलं मात्र. दोन्ही मुलांना १० वी आणि १२ वी च्या बोर्डात आणायचंच अशी शपथ घेऊन मोठ्या मुलीच्या इयत्ता आठवीपासून धाकट्या मुलाच्या १२ वी पर्यंत मुलांचे आखलेले आयुष्य आणि सगळ्यांनी घेतलेले कष्ट अश्या टाइपचं. दोन्ही मुलं १० वी- १२ वी ला बोर्डात आल्यानंतरच लिहिलं होतं पुस्तक. कुणीतरी कुठेतरी लिस्टीतून गळाले असते तर बहुतेक त्या सगळ्या कुटुंबाने काय केले असते कोण जाणे.
अर्थात एकाच घरातून दोन मुले दोन्ही बोर्डाच्या परिक्षांना मेरिटात यापलिकडे दैदीप्यमान त्यांनी काय केले माहित नाही.
त्यातली मोठी मुलगी माझ्या बॅचची. आणि मुलगा दोन बॅच नंतर. पुस्तक मात्र भयाण होते. ते वाचून असला काही येडचापपणा न केल्याबद्दल पालकांचे आभार मानले होते मी.
Pages