'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

Submitted by जिप्सी on 21 February, 2012 - 23:40

'कोकणमय'

=======================================================================
=======================================================================
कोकणमय या मालिकेतील हा पहिला भाग Happy या भागाची सुरुवात करण्याआधी कोकण फिरण्यास/जाणुन घेण्यास मायबोलीकर नीलू, भाऊकाका नमसकर, अतुलनिय, विवेक देसाई, नीलवेद, यो रॉक्स, साधना यांनी मोलाची मदत केली. आभार परक्यांचे मानायचे असतात म्हणुन त्यांचे आभार मी मानणार नाही. खरंतर याचा उल्लेख प्रस्तावनेच्या धाग्यात यायला हवा होता, पण राहुन गेलं. Happy
=======================================================================
=======================================================================

"योग्या, हे माझ्या गावचे फोटो" नरेश त्याच्या गावचे फोटो दाखवत होता.
कुठंल रे गाव?
कुडाळ जवळील "सरंबळ""
नरेशच्या गावचे फोटो पाहत होतो. कोकण म्हटल्यावर जसं चित्र समोर येतं तसंच ते गाव फोटोत भासत होतं. (आधीच्या भागातील प्रचि ०२ Happy ) तीच ती लाल मातीतली वाट, काजुच्या बागा, विहिर, अंगणातले पक्षी (हॉर्नबिल आणि स्वर्गीय नर्तकाचे काही फोटो होते :-))
"चलो तर मग यंदाची कोकण भटकंती तुझ्या गावातुनच सुरू करू."
साधारण नोव्हेंबर मध्ये कोकण भटकंतीचा प्लान शिजला. पण तारीख ठरत नव्हती. डिसेंबर हरीश्चंद्रगड आणि इतर भटकंती, जानेवारीमध्ये दोघांच्याही प्रचिंचे प्रदर्शन, राजमाची आणि दिनेशदा गटग यामुळे प्लान पुढे जात होता. शेवटी कुठल्याही परीस्थिती फेब्रुवारीमध्ये जायचेच ठरले. ऑफिसमधील आम्ही सहा आणि नरेशचे दोन मित्र असे आठजण तयार झालो. प्लान तयार झाला आणि गुरूवारी ९ फेब्रु. ला रात्री निघुन मंगळवारी १४ ला पहाटे परत परतायचे ठरले. यात कुडाळ (सरंबळ), धामापूर, वालावल, निवती, वेंगुर्ला, अरवलीचा वेतोबा, रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा, मालवण, आंगणेवाडी , सिंधुदूर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर आणि शेवटी विजयदुर्ग असा भरभक्कम बेत होता. Happy निघण्याच्या आदल्यादिवशी एक टांगारू निघाला. शेवटी आम्ही सातजण ठरल्याप्रमाणे (आरामात ;-)) गुरूवारी रात्री १०:३० - ११ च्या सुमारास विक्रोळीहुन क्वालिसने निघालो. सुरूवातीला गप्पाटप्पात रमलेल्या एकेकांची विकेट रात्री १-२ नंतर पडु लागली (अर्थात ड्रायव्हरच्या बाजुला बसलेला सोडुन Wink ). सकाळी साधारण ७-८ च्या सुमारास आम्ही कुडाळमार्गे सरंबळला पोहचलो. घर बंदच असल्याने सकाळी सगळ्यांनी मिळुन आधी घर स्वच्छ केले. बॅगा टाकल्या आणि चुल पेटवून आंघोळीसाठी पाणी ठेवले. चुलीवरच्या गरम पाण्यात एक वेगळाच गंध असतो तो मला स्वतःला खुप आवडत असल्याने आंघोळ झाल्यावर अधिकस फ्रेश वाटु लागले. Happy शुचिर्भुत होऊन मी आणि नरेश गावात एक फेरी मारण्यास निघालो. खरंच गाव खुप सुंदर होते. दुरंगी बाभुळ, रीठा, काजुच्या बागा पहात/ फोटो काढत फिरत असतानाच हॉर्नबील, कोतवाल, अजुन एका सुंदर पक्ष्याने दर्शन दिले (फोटो काढता आला नाही Sad ).

प्रचि ०१
(दुरंगी बाभूळ, रीठा आणि काजू)

गावात फिरून परत घरी येईपर्यंत इतरजणांची तयारी झाली होती. नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, त्याआधी सरंबळ गावच्या श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. मंदिराचे काम चालु होते पण मंदिर आणि परीसर खुपच सुंदर होता. ("सातेरी" म्हणजे "वारूळ".)

प्रचि ०२
श्री देवी सातेरी मंदिर (सरंबळ, कुडाळ)

प्रचि ०३
श्री देवी सातेरी

सरंबळ गावातुन धामापुरला जाण्यासाठी एक रस्ता आहे तेथुनच आम्ही धामापुर, वालावल मार्गे निवतीला (मुक्काम) पोहचणार होतो. पण त्या रस्त्याचे काम चालु असल्याने आम्हाला पुन्हा गावाला वळसा घालुन कुडाळ-धामापूर रस्त्याने जावे लागले. इथे थोडीशी गफलत झाली. खरंतर पहिल्यांदा धामापूर करून नंतर वालावल आणि मग पाट मार्गे निवती असं केलं असत तर वेळ वाचला असता पण आम्ही पहिल्यांदा वालावल नंतर धामापूर आणि परत वालावलला येऊन पाट मार्गे निवतीला गेलो. अर्थात याचा एक फायदाच झाला. आम्हाला नेरूर या निसर्गरम्य गाव पाहता आले. Happy
सरंबळहुन थोड्याच वेळात आम्ही श्री लक्ष्मीनारायणाच्या दर्शनासाठी "वालावल" गावी पोहचलो. आजपर्यंत वालावल गावाबद्दल जे ऐकल होतं अगदी तसाच परीसर पाहत होतो. (यावेळी आमच्या कडे कॅनन 1000D आणि 1100D असे दोन कॅमेरा असल्याने एका कॅमेर्‍याला 75-300 लेन्स आणि दुसर्‍याला 18-55 लेन्स लावली होती, सारखी लेन्स बदलायला नको म्हणुन :-), अर्थात याचा फायदाच वालावल तलावाजवळ किंगफिशर, नीलपंख टिपण्यासाठी झाला.)
वालवल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर:
कुडाळ शहरापासुन १५ किमी अंतरावल असलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. गर्द वनराईने नटलेलं वालावल गाव आणि मंदिरालगतचा सुंदर व शांत तलाव मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. हे मंदिर सुमारे आठशे वर्षापूर्वेचे असल्याचे जाणकार सांगतात. या मंदिराचं बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभुदेसाई या महापराक्रमी बंधूंनी केले. त्यांची स्मारके श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील दीपमाळांजवळ कल्याण पुरूष म्हणुन उभी आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असुन याची रचा त्रिस्तरीय आहे. मुख्य देवळी पुरातन असून या मंदिराच्या बांधकामामध्ये पूर्णतः सागवानाचा वापर केला आहे. सभामंडपातील त्याकाळी बसवलेली लादी कारागीरांचे कसब दाखविणारी आहे. या अतिप्राचीन मंदिरात असलेले कोरीवकामाचे स्तंभ देखणे असून मंदिरात अतिशय सुंदर आणि देखणी अशी श्री लक्ष्मीनाराययाची मूर्ती आहे. मंदिराचा सभागार प्रशस्त असुन येथील दगडी खांबावर व तुळईवरही कोरीवकाम केलेले आढळते. मुख्य दरवाजा उंचीला कमी असून, त्यावर अप्रतिम कमळांच्या फुलांचे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या समोरील द्वारपाल तसेच डोक्यावरील विष्णूची मूर्तीही प्रेक्षणीय आहे. रामनवमीला येथे नऊ दिवस यात्रा असते. वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही, असा गावचा रिवाज आहे. मला स्वतःला सर्वात आवडलेलं ठिकाण म्हणजे वालावल.
मुंबई ते कुडाळ अंतर ~३९५किमी. कुडाळ ते वालावर अंतर ~१०-१२ किमी.

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

(प्रचि: नरेश)

प्रचि १९

(प्रचि: योगेश)

वालावल गावच्या निसर्गमय मोहपाशातुन स्वत:ला नाईलाजाने सोडवून घेत आम्ही धामापूरला निघालो. वाटेतच नेरूरपार हे अतिशय शांत व रमणीय गाव लागले. नेरूरपार नदीच्या पुलावरून नदीचे आणि गावचे अतिशय मनमोहक सौंदर्य दिसते. वाटेतच कलेश्वराचे मंदिर आणि त्याच्या जवळच असलेल्या आणि कमलपुष्पांनी भरलेल्या तलावाने मोहिनी घातली आणि गाडी कलेश्वर मंदिराकडे वळवली.

प्रचि २०

प्रचि २१
नेरूर कलेश्वर:
कुडाळ तालुक्यातील कलेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर असुन कोरीव कलाकुसरेने नटलेले आहे. चौकोनी आकाराची शिवपिंडी हे येथील वैशिष्ट्य आहे (कलेश्वर मंदिरातील फोटो घेण्यास मनाई होत). मंदिरात सहा खांब अप्रतिम कोरीवकामाने सजवले आहेत. या मंदिरा शेजारीच असलेले दुसरे व स्वतंत्र मंदिर आहे ते श्री ब्रह्मदेवाचे. ब्रह्मदेवाची मंदिरे फारशी नाहीत त्यामुळे हे मंदिर अतिशय वेगळे आणि आवर्जुन पाहण्यासारखे आहे. भारतात ब्रह्मदेवाची तीन मंदिरे असुन त्यापैकी एक नेरूर येथे असुन ब्रह्मदेवाशेजारी विष्णू-लक्ष्मी, सावित्री व गायत्री देवता आहेत. ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवतांची मंदिरे असणारे हे एकमेव प्रसिद्ध
देवस्थान.

प्रचि २२
कलेश्वर मंदिर

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
ब्रह्मदेवाचे मंदिर आणि मूर्ती
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

नेरूरपार गावच्या निसर्गसौंदर्याचा पुरेपुर आस्वाद घेत आमची गाडी निघाली धामापूरच्या भगवती मंदिराकडे.

कोकणातील धामापूर हे अजुन एक अत्यंत निसर्गसंपन्न गाव आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुप्रसिद्ध धामापूरचा तलाव. सुरूवातीला आपल्याला दिसते ते येथील श्री भगवती देवीचे मंदिर. मंदिराच्या थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर श्री भगवती देवीचे दर्शन घडते. हे हि मंदिर पुरातन असुन कोरीव कलाकुसर केलेले आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून भगवती देवीची मूर्तीही अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराला लागुनच अंडाकृती रचनेचा अतिशय सुरेख तलाव आहे. पाण्यात उतरण्यासाठी पायर्‍यांची सोय केलेली आहे. या तलावाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी - फार पूर्वी धामापूरमध्ये ज्यांच्या घरी लग्नसमारंभ असेल, ती व्यक्ती लग्नाच्या आदल्या रात्री फुलांनी बनविलेले दागिने एका परडीत घालून ते तळ्यात सोडत असे. दुसर्‍या दिवशी त्या परडीतील दागिने सोन्याचे झालेले असत. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर दुसर्‍या दिवशी ते दागिने पुन्हा तळ्यात सोडले जात असत. खूप वर्ष असं चाललं. मात्र, एका व्यक्तीला दागिन्याचा लोभ झाला आणि त्याने ते दागिने तळ्यात न सोडता स्वतःकडेच ठेवले. त्यावेळी भगवती देवीचा कोप होऊन हि प्रथा पुढे बंद झाली. स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये बोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही.
कोकणातील मंदिरे मला का आवडतात हे कुणी विचारल्यास माझे उत्तर असेल, शांत, निवांत आणि स्वच्छ मंदिर व परीसर आणि तेथील आख्यायिका. Happy

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

निसर्गसौंदयाने ओतप्रोत भरलेल्या या गावांची भेट आम्हाला पर्यटन आणि तिर्थाटन या दोन्हीचा अनुभव देऊन गेली. या तीनही गावांना भेट दिल्यावर कि मला वि.स.खांडेकरांच्या एका कवितेची प्रकर्षाने आठवण झाली.

रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन फुलुनि

मंजुळ घंटा सांजसकाळी
गोकुळ गीते गातिल सगळी
होउनि स्वप्नी गौळण भोळी
वहावे यमुनेचे पाणी

रंगवल्लिका उषा रेखिते
सिंदुर भांगी संध्या भरते
रात्र तारका दीप लावते
पहावे अनिमिष ते नयनि
रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन फुलुनि.......

वालावलच्या श्रीलक्ष्मीनारायणाचे, नेरूरच्या कलेश्वराचे आणि श्री भगवती देवीचे दर्शन घेतल्यावर आम्ही पाट मार्गे "निवतीला" मुक्कामासाठी निघालो.

(तटि: मंदिराची माहिती "कोकण पर्यटन" पुस्तकातुन साभार)

(क्रमशः)

गुलमोहर: 

वा! जिप्सी, तूच जग पाहत राहा आणि दर्शन आमचे करव.

काय एकसे एक फोटो काढले आहेस! आवडलेत.

शाब्बास.

तुझ्या फोटोजबाबात काय बोलणार आम्ही पामर! एकापेक्षा एक आहेत! तुझं 'कोकणमय' आणि शैलजाचं 'कोकणसय' दोन्ही ऑल टाईम निवडक १० रे!

>> या महाशिवरात्रीला कोकणात जाणं जमलं नाही म्हणून हळहळत होतों; हळहळ खूपच सुसह्य झाली अप्रतिम प्र.चि. पाहून... पहात राहून !
असेच म्हणतो. कलेश्वराचा तो रथ आता जत्रेला सजून धजून बाहेर येईल! सु रे ख! नेरूरपारातला तो कर्ली नदीवरचा पूलही मनात घर करून राहिलेला आहे. खरंच सुरेख दिसतो गाव त्या पुलावरून. वालावल, नेरूरपार, काळसे-धामापुरातून पाय निघता निघतच नाही. तसं सगळीकडेच होतं म्हणा! Happy

खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या! काही वर्षांपूर्वी कट्ट्यापासून सुरू करून धामापूर काळसे, नेरूरपार, वालावल, चेंदवण (देवी माऊली), पाट (रामेश्वर), परुळे (आदिनारायण), पिंगुळी, मठ, वेंगुर्ला, निवती, भोगवे, मालवण, आंगणेवाडी, कट्टा अशी मस्त 'राऊंड ट्रिप निसर्ग-तीर्थयात्रा' केली होती ती खूपच आठवली! Happy

>> मुंबई ते कुडाळ अंतर ~३९५किमी.
माझ्यामते किमान ५०० किमी अंतर असावंच NH17 (रूट ६६ झालं का याचं. तसं नामकरण करणार होते म्हणे!) मार्गे. सागरी महामार्गाद्वारे अंतर कमी झालं असल्यास कल्पना नाही.

जिप्सी, नेहेमीप्रमाणेच अप्रतिम फोटो.

जागूले एका कमळाबरोबर एक मगर फ्री येते. ती कुठे ठेवणारेस ?>>>> Lol

जिप्सी फोटो परत पाहीले आणी सगळे आवडलेच पण नं १०, ११, १२ १३ , १४ सगळ्यात जास्त आवडले. माहीती पण छान दिली आहेस.

या महाशिवरात्रीला कोकणात जाणं जमलं नाही म्हणून हळहळत होतों; हळहळ खूपच सुसह्य झाली अप्रतिम प्र.चि. पाहून... पहात राहून !
भाऊकाकांनू, हळ्हळ कमी झाली की वाढली??... माझी वाढली..!! रथसप्तमीक जावूक व्होया होता परुळ्याक!
जिप्स, डोक्याला शॉट देणारे फोटोझ..
पाटाच्या वेतोबाकडे.. परुळया़क आदिनारायणाकडे ..वालावलीला लक्ष्मीनारायणाकडे .. वरच्या माऊलीकडे.. करमळीच्या गणपतीकडे लहानपणीच्या सुट्ट्यांत पडीक असायचो. माझं जन्मगांव म्हणून प्रसिद्ध व्हायच्या आत परुळयाला जाऊन आलास ते बरं केलंस!! Happy

जिप्स्या कायच्या काय नशिबवान आहेस लेका , आम्ही कोकणात राहुन काहीच नाही बघितल, हे सर्व बघायला भाग्यच लागत, मला हे तुझ्यामुळे प्रचितुन दिसतय हे ही काही कमी नाही.
खरच मस्त आहेत प्रचि.
७,१०,२६,३२ क्लास्स्स्स्स्स्स Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

कलेश्वराचा तो रथ आता जत्रेला सजून धजून बाहेर येईल!>>>>अगदी अगदी Happy

सागरी महामार्गाद्वारे अंतर कमी झालं असल्यास कल्पना नाही.>>>देवचार, आम्ही मुंबई-गोवा हायवेनेच गेलो होतो. साधारण तेव्हढेच अंतर होते (नक्की नाही माहित Sad )

परूळे गावाहुन मालवणला गेलो पण परूळे गाव थांबून, निवांतपणे पाहता नाही आले. पुन्हा कोकणात जायला काहितरी निमित्त Wink

सुप्रभात.
<< परूळे गाव थांबून, निवांतपणे पाहता नाही आले >> जिप्सीजी, कोकणातल्या बर्‍याच गांवात मुख्य गांवाला जोडून पंचक्रोशीतल्या छोट्या वस्त्याही त्या गावाचाच भाग असतात- त्याना त्या मुख्य गांवाच्या "वाड्या" म्हणतात. परुळे मुख्य गांव लहान वाटलं तरी त्याच्या अशा लांबवर पसरलेल्या ३२ वाड्या आहेत; निवति, भोगवं, कुशेवाड इ.इ. ह्या परुळ्याच्याच वाड्या आहेत ;त्यामुळे तुम्ही "परुळे" निवांतपणे पाहिलंच नाही, असं नाही. आणि,<< पुन्हा कोकणात जायला काहितरी निमित्त >> कशाला ? येवा, येत रवा,कोकण आपलांच आसा !!! Wink

जिप्सीजी, कोकणातल्या बर्‍याच गांवात मुख्य गांवाला जोडून पंचक्रोशीतल्या छोट्या वस्त्याही त्या गावाचाच भाग असतात- त्याना त्या मुख्य गांवाच्या "वाड्या" म्हणतात. परुळे मुख्य गांव लहान वाटलं तरी त्याच्या अशा लांबवर पसरलेल्या ३२ वाड्या आहेत; निवति, भोगवं, कुशेवाड इ.इ. ह्या परुळ्याच्याच वाड्या आहेत >>>>भाऊकाका, ह्या अधिक माहितीबद्दल धन्यवाद. हे माहितच नव्हतं. Happy

< पुन्हा कोकणात जायला काहितरी निमित्त >> कशाला ? येवा, येत रवा,कोकण आपलांच आसा !!>>>>नक्कीच Happy

मित्रा काय सुंदर फोटोज् आहेत रे एक-एक...
प्रचि ४, १५, १६ मधला मंदिराचा परिसर तर अफलातुन...
एकदम परिकथेतला वाटतोय...
फारच सुंदर रे...

जिप्सी.....

मस्तच रे!!!! काय सुरेख आहे सगळे....

एक शंका : माझे सासरे कोकणातले आहेत. त्यांचे ( म्हणजे आमचे!!!) गाव शेजवली, खारेपाटण जवळ. त्यांच्या बोलण्यात नेहेमी ब्रम्हदेवाच्या मंदिराचा उल्लेख येतो. पण ते म्हणतात की "कोर्ल्याच ब्रम्हदेव मंदिर". तु दिलेला फोटोत नेरुरपार असे गावाचे नाव आहे ना!! आणि इतर ३ ठीकाणं कोणती ब्रम्हदेव मंदिराची?

आता लग्नाला १६ वर्ष झाली पण नीट पणे कोकण पाहिलच नाही. आर्थात ह्याला कारण आमच्या गावातल्या घराची अवस्था फारच बीकट आहे. आणि नेहेमी प्रमाणे त्यावर कोर्ट कज्जे चालु असल्याने दुरुस्त कोण करणार? हा प्रश्ण आहेच. सध्या ऑफिस च्या कामा साठी ३-४ वेळा देवगड आणि सावंतवाडी ला गेले होते. फारच मुग्ध करणारा निसर्ग. आता ह्या दिवाळीमध्ये कोकण ट्रीप नक्की.

सर्कसवाल्या वालावलकरांचो घर आसां वालावलीत..
नदीपल्याडच्या काळशातून धामापूरात चालतही जाता येतं.
'श्वास' चित्रपटाचं शुटींग परुळे-वालावलीत झालंय. टायटल्सच्या वेळचा गोफनाच श्रीदेवआदिनारायणाच्या प्रांगणातला.. शांतारामांच्या 'चानी' चं शुटींगही वालावलीतलं.

जिप्सी,

तुमची प्रचि म्हणजे डोळ्यांना मेजवानी! Happy (पक्षी: असेच खा खा खाऊन माजायला आवडेल!! :फिदी:)

रच्याकने,

>> श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे.

पण प्रचि ०४ मधली वास्तू हेमाडपंती दिसत नाही. प्रचि ०५ मधल्या ५ दीपमाळांपैकी केंद्रस्थानाची नव्या वळणाची वाटते. चार कोपर्‍यातल्या चार जुन्या धाटणीच्या वाटतात. पण त्यांना हेमाडपंती म्हणावं का असा प्रश्न पडतो. कोणी प्रकाश टाकेल काय? (वरदाताई जरा बघून सांगा! :-))

आ.न.,
-गा.पै.

'श्वास' चित्रपटाचं शुटींग परुळे-वालावलीत झालंय. टायटल्सच्या वेळचा गोफनाच श्रीदेवआदिनारायणाच्या प्रांगणातला.. <<<
परश्याचं घर (जोशींचं घर), परश्याची आई फोनवर बोलते त्या दोन फोनपैकी पहिला फोन(डॉ. सामंतांचं घर), गोफनाच आणि दशावताराची दृश्ये (आदिनारायण मंदिरातले नव्हे. पोस्ट ऑफिसच्या जवळ जे मंदिर आहे तिथले), साकवावरून परश्या-आजोबा चालतायत तो साकव आदिनारायण मंदिरामागचा - परूळ्यातली.
चित्रपटाचा क्लायमॅक्स;परश्या परत येतो ऑपरेशननंतर - काळशे, वालावल आणि मधली खाडी
सजवलेल्या दिपमाळांचा सीन - वालावलच्या आदिनारायण मंदिरातला.
मुक्त धावणारा परश्या आणि थव्याने उडणारे पक्षी हे देवबाग-भोगव्याच्यामधे समुद्रात वाळूचा जो पॅच तयार होतो फेब-मार्च मधे तिथे.
परश्या धावत येतो आणि तो पडणार इतक्यात आजोबा त्याला सावरतात. खाली बघतात खोल टोकेदार कातळ कडा आणि समुद्र - निवतीचा किल्ला.

बाकी मग थोडं काही वरती चिपीच्या माळावर, वेगवेगळ्या शेतांच्यात, कलंबिस्त आणि शिरशिंगेमधे पण केलंय.

बरी आठवण करून दिलीत. त्या निमित्ताने जरा नॉस्टॉल्जिक व्हायला झालं Happy

जिप्सी, कोकणाचे फोटो आणि त्यात तु काढलेले मग काय 'दुग्धशर्कराच योग'. कोकण म्हणजे आम्हासारख्या मूळ कोकणवासियांचा तर एक हळवा कोपराच असतो.
फार सुंदर फोटो आणि वर्णन.. दोन छोट्या दुरुस्त्या सुचवायच्या होत्या..सुचवू का?
१)<<<कुडाळ तालुक्यातील कलेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर असुन कोरीव कलाकुसरेने नटलेले आहे. चौकोनी आकाराची शिवपिंदी हे येथील वैशिष्ट्य आहे ....>>>> ह्यातील शिवपिंडी असा शब्द पाहिजे ना?
२)<<<< स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये वोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही.>>>>
वोटिगची सोय म्हणजे तिथे पण इलेक्शन होते का? Light 1

माधव, चंदन, मीरा, गापै, रोमा, प्रज्ञा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! Happy

प्रज्ञा Proud दुरूस्ती केली Happy

गामा पै>>>> कोकण पर्यटन पुस्तकात हेमाडपंथीच दिले आहे. कदाचित मूळ मंदिर हेमाडपंथी असेल Happy

नीधप, मस्तच Happy आता यासाठी "श्वास" पुन्हा एकदा पहायलाच हवा. Happy

धामापुरची देवी भगवती माझी कुलदेवता. तळ्याची दागिन्यांची गोष्ट कोठुन कळली तुम्हाला याचे आश्चर्य वाटले, ती जुनी आख्यायिका आहे पण तशी नोंदवलेली नाही.

नुकतेच भारतवारीत...... मालवण/धामापूर ला जायचा योग आला. धामापूरला आम्ही पोचायच्या आधी २ दिवसपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता...... आम्ही गेलो त्या दिवशी मात्र सुंदर वातावरण आणि पावसाच्या काही खुणा.
अद्भुत वातावरण होते. अजून अंगावर रोमांच येतात ते आठवले की.
Happy

केव्वळ अप्रतिम फोटो नेहमीप्रमाणेच Happy

सोबतची माहितीपण उत्तम.. Happy

तु नेहमीच फोटो बरोबर छान महिती देतोस .. आणि त्यात कधी कधी अविट गाणी नाहीतर अश्या सुंदर सुंदर कविता...

मनलं रे बाबा तुझ्या रसिकतेला आणि संशोधक वृत्तीला Happy

<< नदीपल्याडच्या काळशातून धामापूरात चालतही जाता येतं. >> सक्काळी धुक्यातून काळशाहून वालावलीच्या नदीकडे मळा ओलांडून, नारळांच्या बागेतून चालत येणं हा एक आनंददायी अनुभवच. तो शब्द-चित्रबद्ध करायचा केविलवाणा प्रयत्नही मी इथं केला होता [ जिप्सींच्या सुंदर प्र.चि.ना गालबोट लागण्याचा धोका दिसत असूनही संदर्भ देण्याचा मोह आवरत नाही ] -
http://www.maayboli.com/node/25655

निलिमा, निशदे, अगो, लाजो प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

भाऊकाका गालबोट नाही, चारचांद लागतील Happy
कोकणमय मधील कुठलाही एक फोटो तुमच्या जादुई कुंचल्यातुन पहायला नक्की आवडेल. Happy

Pages