सेक्स हॅज नथिंग टू डू विथ लव्ह - सोना

Submitted by बेफ़िकीर on 13 February, 2012 - 02:13

आपले एक अतिशय साधे तत्व आहे जगण्याचे. ते अंगी बाणल्यावर अनेक चिंता नष्ट होतात.

कर्तव्य करताना मजा करत असल्यासारखे करावे आणि मजा ही कर्तव्य पार पाडत असल्यासारखी करावी.

अनेक चिंता नष्ट झाल्या.

आयुष्य हा एक भुलभुलैय्या आहे. जेथून सुरू झालो ते ठिकाण आठवत नाही, जेथे पोचायचे आहे ते ठिकाण प्रत्येक पावलाला बदलतच राहते आणि जिथे आहोत तिथे आपल्याकडे असलेल्या सर्व उत्तरांनंतरही दैवाकडे एक प्रश्न असतोच जो अनुत्तरीत राहतो. त्याचे उत्तर मिळाले की / तर पुढचा प्रश्न असतो.

लांबच्या नात्यातील माणसे जवळ राहतात त्या विभागाला कोथरुड म्हणतात.

जवळची माणसे लांब असल्यासारखी वागणे याला बाकीचे जग.

बार, देशी दारूचे दुकान, भाजी मंडई, अवाढव्य ऑफिसेस, प्रशस्त अपार्टमेन्ट्स, पान टपर्‍या, जीम्स, दुकाने, हॉटेल्स, यच्चयावत देवांची मंदिरे, यच्चयावत राजकीय पक्षांची कार्यालये, मैदाने आणि गर्दी असूनही गर्दी नसल्याची जाणीव हे जगात एकाच ठिकाणी पाहायला मिळणारे ठिकाण फक्त कोथरुड आहे.

एक महत्वाचा घटक राहिला.

पुणेरीपणा! हाही आता कोथरुडमध्ये सदाशिव पेठेहून अधिक आहे.

माझ्या मनाचा पाया सदाशिव आणि शनिवार पेठांच्या जुनाट, वाळवी लागलेल्या आणि केव्हाही कोसळतील असे वाटणार्‍या लाकडी पायर्‍यांनी बनलेला आहे. मनाचा कळस कवितेचा घुमट लावून फिरतोय. पाया आणि कळस यात भिजलेली, पोळलेली, गारठलेली, वितळलेली आणि हरवलेली अनंत वर्षे आहेत. मी एक माणूस नाही. माझ्यात खूप माणसे. त्यातला एक अभ्यासू, हुषार आणि आईच्या धाकातला मुलगा येथपासून ते मध्यरात्री अडीच वाजता भरधाव वेगाने गाडी चालवून दारूचा वास वडिलांना येऊन त्यांना उगाचच वाईट वाटणार नाही ना या चिंतेने लॅच उघडून आत येऊन हळूच झोपून जाणारा व्यसनी पुरुष येथपर्यंत सर्व काही. निपुत्रिक, नोकरदार, खर्चाळू, उधळू, व्यसनी, कवी, बोलबचन, लाईनमारू, रडवेला, हळवा, कोणाचे वाईट न पाहू शकणारा, कोणाचा हेवा न वाटणारा, नवरा म्हणून रोषास पात्र, मुलगा म्हणून टीकेस पात्र, लष्कराच्या भाकर्‍या भाजणारा, मुशायरे अन व्यासपीठे गाजवणारा, उर्मट, तापट, अनंतकाळचा प्रवासी, श्रद्धाळू, अनप्रेडिक्टेबल आणि स्वतःचाही विश्वास गमावून बसलेला असे अनेक लोक या एकाच शरीरात सामावताना जी ससेहोलपट होते ती शब्दात सांगणे शक्य नाही. म्हणजे तोपर्यंत शक्य नव्हते.

नंतर सोना भेटली.

लांबची नातेवाईक जवळ राहात होती.

नवरा भोसरीत नोकरीला, एक मुलगा शाळेत, दुसरा कडेवर. ओळख नीट होणे हा प्रकार एका कॉमन नातेवाईकाच्या फंक्शनला झाला.

सोना सुंदर या सदरात मोडत नाही. ती माझ्यापेक्षा बरीच बुटकीही आहे. उजळ रंग, पाठीपर्यंत असलेल्या केसांना एकच गाठ मारून सोडण्याची सवय आणि शोभेल असा पेहराव इतकेच वर्णन करणे चुकीचे ठरेल. सोनाचे डोळे अप्रतीम आहेत. तिने नजर मिसळल्यावर आपल्यातील खोटे बोलणारा माणूस मरतो. त्याच्याच बरोबर सज्जन माणूसही मरतो. जिवंत राहतात आपले दोन डोळे, आपला मेंदू आणि हिप्नोटाईझ्ड मन.

रस्त्यात अनेकदा हाय हॅलो झाल्यावर एकदा ती आणि मी नेमके एकाच दुकानात भेटलो. तेथे काही काळ गप्पा झाल्या त्या सर्वच कॉमन नातेवाईकाच्या चौकशीशी निगडीत होत्या. पण तेव्हा माझे डोळे पहिल्यांदा गुंतले होते. लोकांना हे असे होते हे माहीत असल्यामुळेच की काय सोना सहसा कोणाकडे न बघताच बोलत असावी.

आडनांव तरी काय च्यायला.

जवळगीकर.

आडनांवही सेक्सी असल्याचे माझ्या माहितीतील हे एकमेव उदाहरण.

तिच्या मोठ्या मुलासाठी तबला आणायचा होता असे तिच्या बोलण्यात आले. मी उगीचच मेहेंदळे वगैरे नावे टाकली. तिला ते सगळे माहीत असावे. तिने फारसे स्वारस्य दाखवले नाही. दुकानातून निघून जाताना मात्र 'बाय' ज्या शैलीत म्हणाली ती शैली पाहून मला क्षणभर फारच स्वारस्य निर्माण झाले.

डोळे तिचे असे की... डोळ्यातली तिच्या मी
डोळ्यांवरी तिच्या त्या .. भाळून पीत आहे

चार सहा महिन्यात नुसतेच दहा पाच वेळा समोरासमोर भेटूनही कोणालाच काही वाटत नव्हते.

पण एक दिवस तिची चूक झाली.

तिच्या भिसीतील ग्रूपसाठी तिने माझा नंबर त्या नातेवाईकाकडून मिळवून माझा घरगुती गझलचा कार्यक्रम ठेवला.

नंतर माझ्या चुका झाल्या.

आणि शेवटी दोघांच्याही.

श्वास पहिल्यासारखे ही माझी स्त्रीमुखी गझल सोनाली जवळगीकरवर रचलेली आहे. अर्थात, त्या कार्यक्रमानंतर ती गझल रचलेली असल्याने त्यात ती गझल नव्हतीच.

त्यातील हा शेर तिला मी नंतर ऐकवला तेव्हा तो आवडूनही ती रागावलीच होती.

कष्टणे दिवसा... तुझे झोपू न देणे रातचे
एकदा व्हावेत सासुरवास पहिल्यासारखे

पण त्या कार्यक्रमानंतर माझी आणि तिची मैत्री व्हायला लागली. नंबर्स शेअर केले गेले. तिच्या मित्र मैत्रिणींनाही तो कार्यक्रम 'तसा' बरा व ठीकठाक वाटल्यामुळे त्यांच्यापैकीही एक दोन जणांचे नंबर्स शेअर झाले वगैरे.

मग मी नवीन शेर केला की तिच्यासकट त्या एकंदर चार जणांना तो एसेमेस करायला लागलो. तेव्हाच्या माझ्या गझला मी आज वाचल्या की मला वाईट वाटते. अतिशय सुमार शेर करायचो तेव्हा मी. आता त्यातील अतिशय हे विशेषण जरा किंचित बोथट झाले असेल इतकेच.

सुरुवातीसुरुवातीला सर्वांचेच उत्तर एसेमेसवर यायचे. नंतर मग सोनाली आणि एक हर्षद म्हणून त्या ग्रूपमधील होता त्यांचीच उत्तरे फक्त यायला लागली. हर्षद एकटाच उत्तर देतोय तर त्याला कशाला एसेमेस करा म्हणून मी शेवटी फक्त सोनालीलाच एसेमेस करायला लागलो. आणि त्यानंतर पुन्हा एका कॉमन फंक्शनला भेट झाली. तेव्हा सगळ्यांचेच चेहरे आनंदीत होते. मी, ती, माझी बायको, तिचा नवरा इत्यादी. कारण माझा कार्यक्रम झाल्याने व तो बर्‍यापैकी आवडल्याने माझे आणि तिचे रिलेशन केवळ एक कार्यक्रम करणारा व एक रसिक इतकेच होते हे सर्वांना ज्ञात होते. पण माझी बायको एका वेगळ्या ग्रूपमध्ये गेल्यावर आणि तिचा नवरा मुलांना काहीतरी आणायला गेल्यावर तिने एक प्रश्न विचारला.

"नवीन गझल नाही का झाली काही दिवसात?"

मी जन्माला आल्यानंतर बावळट हा शब्द निर्माण झाला आहे. तो त्याआधी मराठीत नसणार.

या प्रश्नाचा अर्थ मला समजला नाही. मी आपला म्हणून गेलो.

"झाल्या की, दोन तीन झाल्या"

तेव्हा मी रोज एक गझल करायचो. पण तिच्या उत्तरानंतर तिच्या आधीच्या प्रश्नाचा अर्थ मला समजला.

"मला वाटलं एसेमेस नाही म्हणजे गझल झाली नाही की काय"

असे म्हणून मंद हासत तिने दुसरीकडे पाहिले.

स्मोकिंगमुळे माझ्या हृदयाचे ठोके बरेचवेळा चुकतात. मला त्याहीवेळेस तेच कारण वाटले.

नंतर जरा अधिक जवळीक निर्माण झाली. एसेमेसना गझलेशिवाय इतरही विषय असतात हे समजू लागले. मग जरा अधिकच जवळीक होऊ लागली. तिला अनेक त्रास असावेत असे तिच्या एसेमेसमधून दिसू लागले. त्रास नसतात कोणाला तिच्यायला? मी का दाखवत नाही कोणास ठाऊक मला त्रास आहेत असे? पण तिने दाखवले.

वैशाली या फर्ग्यूसन रोडवरच्या हॉटेलचा मला मुक्तछंदाइतकाच तिटकारा आहे. एक तर चव इतर हॉटेलसारखीच, त्यात दर बरेच जास्त, पार्किंगची सोय नाही आणि वेटिंग??????????????

पण वैशालीत आम्ही खूप वेळ वगैरे बोललो. तिचा लहान मुलगा मी कोण आहे हे बापाला सांगू न शकण्याच्या वयाचा होता. मी कोण आहे हे तिला जितके माहीत होते तितके मला माहीत नव्हते आणि ती कोण आहे हे तिच्या नवर्‍याला. अशक्य बोलायचो आम्ही. म्हणजे नंतरही खूप वेळा असेच बोलत बसायचो. कुठेही.

एकदा तर म्हणाली अम्याने, म्हणजे तिच्या लहान मुलाने बोबड्या आवाजात चेरी खाल्ल्याचे बापाला तिच्यासमक्ष सांगितले. मी विचारले की चेरी कुठे होती? ती म्हणाली काल तिने घेतलेल्या व्हेज सॅन्डविचबरोबर चीप्स आणि दोन चेरीज आलेल्या होत्या. तेव्हा माझे लक्ष बहुधा कोमेजलेल्या चाफ्याचा वास येणार्‍या तिच्या क्लिव्हेजकडे असावे.

आम्हाला कोणीच कधीच पाहिले नाही. पाहिले असल्यास बोलले नाही. आणि बोलले असल्यास आम्ही ऐकले नसेल. एकदा बीएमसीसीच्या जवळपास असाच संवाद झाला.

" परदेशात??? म्हणजे कुठे?????"

"अबुधाबी"

".... अबुधाबी? म्हणजे तू जाणार?"

"मी? मी कसली जातीय? ही मुलं आहेत ना दोन"

"मग तो एकटाच जाणार?"

"मग तो एकटाच जगतोय की तसाही? यायला दहा वाजतात, साडेदहाला जेवण झाले की सव्वा अकराला टीव्ही पाहून आडवा. मुलांचे काय झाले, काय चालले आहे, काहीही नाही. मी एक मूर्ख. आणि त्याला दिवसा कंपनीत फोन केले की म्हणतो आत्ता बिझी आहे, रात्री बोलू. कोणत्या रात्री बोलायचा त्याचा प्लॅन आहे हे मला माहीत नाहीये"

"हो पण एकदम अबुधाबी?"

"चौपट पगार आहे"

"मग तू काय करणार?"

"मी आत्ता करतीय तेच करणार. मुले वाढवणे"

"हे तू मला आत्ता सांगतीयस?"

"मग कधी सांगू? त्याने मला सांगितल्यावर त्याच्यादेखत तुला फोन करू?"

"पण.. धिस इज नॉट राईट"

माझ्यातील साळसूद बोका उद्गारला.

"सिग्रेट टाक ती"

मी अर्ध्याहून अधिक उरलेली सिगारेट टाकून विझवली.

"सोना, पण एक सांगू का? तू नको जाऊस प्लीज... म्हणजे मला माहीत आहे की मी म्हणतोय ते चुकीचे आहे, पण... तू निघून गेलीस तर मला ... मला नाही.. माझं नाही मन रमणार इथे..."

"लाडकी बायको आहे ना घरी?"

"अवर रिलेशन इज डिफरन्ट"

"मला कुठे नेतोय तो?"

"म्हणजे त्याने नेले तर जाणार तू?"

"मग इथे एकटी राहू?"

"म्हणजे तो नेत नाहीये म्हणून थांबतीयस?"

"तसं नाही रे.. प्लीज अन्डरस्टॅन्ड.. मी कशी एकटी राहीन इथेच? .. मुलांचं काय?? त्यांना नको का बाबा?"

"तुमच्या संसारात माझं स्थान नसणारच म्हणा"

"माझ्यासाठी तू महत्वाचा आहेस.. "

"असं दिसत नाहीये.."

"असं सगळं सांगता येत नाही... "

"तुझं त्याच्यावर प्रेम असणार हे मला माहीत आहे गं, माझंही आहेच की हिच्यावर? पण आपलं रिलेशन वेगळंच आहे. त्याला नांव नाही आहे"

"म... माझं... आमचं नाहीये प्रेम वगैरे.."

"फेकू नकोस... दोन मुलं झालीयत की प्रेमातून??"

"सेक्स हॅज नथिंग टू डू विथ लव्ह"

"काहीही, तुम्हाला झालेली मुलं आपण भेटायच्या आधी झालेली आहेत... तेव्हा काय होतं आपल्यात??"

"तू बावळट आहेस.. मुले होणे हा अतिशय वेगळा भाग आहे.. "

"हो पण ती तुम्हाला दोघांना हवी होती म्हणूनच झाली ना?"

"नाही, अम्याच्या वेळेस मी नको म्हणालेले होते.. त्याने मला ऐकायला लावलं..."

"वाह वाह, ऐकायला लावलं.. तुला नकोच होतं नाही का?"

"तुला नाही रे बाबा समजणार... "

"मला काय नाही समजणार? यू आर ओईन्ग टू गो, आय नो "

" खरं सांगू का? मला जायचंच नाहीये, पण मला जावं लागेल असं मात्र वाटतंय कारण या मुलांना बाबा दिवसातून काय एकदा दिसतात ते तरी दिसायला हवेच आहेत.. "

"तुझं नाहीये प्रेम त्याच्यावर???"

"तुला वाटतंय तसं प्रेम नाहीये.. तुमच्या दोघांचं जसं आहे तसं तर मुळीच नाहीये... "

"अशी कोणती पातळी येते सोना वैवाहिक आयुष्यात की प्रेम असतं पण नसल्यासारखं वाटतं?"

"मला काय हवं असणार आहे सांग ना तू? की त्याने दिवसातून एकदा विचारावं की अम्या खेळतोय का झोपलाय? एकदा विचारावं की साळेत गेला का देवांग? एकदा म्हणावं की मला सारखा उशीर होतो म्हणून तुला एकटीला किती पडतं. इतक्याच साध्या असतात ना अपेक्षा?"

"म्हणजे हे इतकं तो म्हणायला लागला की तू मला विसरून जाणार"

"गप्प बस रे.. हा तुझा माझा विषय नाही आहे... "

"मी तुला सांगू का सोना? यू आर कन्फ्युझ्ड, तुला काय हवं आहे हे तू ठरवू शकत नाही आहेस..."

"चूक आहे हे. मला व्यवस्थित माहीत आहे मला काय हवं आहे, तू मात्र दोन्ही डगरींवर आहेस..."

"आपण दोघांनी एकमेकांना कबूल केलेलं आहे की आपण आपापल्या संसारांना काहीही झळ न पोचवता एकमेकांवर प्रेम करणार"

"दॅट्स ओक्के, पण मी एक बाई आहे, बायको आहे त्याची, मला तो म्हणेल ते ऐकावं तर लागणारच ना? तो जर म्हणाला की तिकडे त्याने सगळी सोय केलेली आहे आणि मुले मस्त शाळेत जाऊ शकतात तर मी कोणत्या बेसिसवर नाही म्हणू त्याला?"

"मग मी काय करू??"

"आपण फोनवर बोलू शकतोच ना?"

"फोनवर बोलून काय करणार? "

"का? मला विसरून जाशील??"

"एकच लावीन...तू जायचंच नाही आहेस असं म्हणतोय मी..."

"माहीत नाही, काय होणार ते, परवापर्यंत समजेल.."

"का? परवापर्यंत काय आहे??"

"उद्या त्याला त्यांची डिटेल्ड ईमेल येईल, आज म्हणे तिकडे सुट्टी आहे, उद्या माझे सासू सासरे येतील मुंबईहून, डिस्कशन आहे घरी"

"ते तर म्हणणारच सोनालीला अन मुलांना घेऊन जा"

"तेच काय, माझ्या मुलांसाठी मलाही म्हणायला लागणार आहे.. ह्यालाच त्याचं काही नाहीये.. "

"आर यू शुअर सोना की तो तुला न्यायला नाही म्हणतोय??"

"खरं सांगू? चेहरा तर असा करतोय की जणू किती दु:ख होतंय माझ्याशिवाय जायला, पण मनातून त्याला तेच हवंय"

माझा चेहरा किती उजळला हे मी तिला दाखवले नाही.

"तुमच्यात काहीच नाही आहे?"

"तुला सारखा त्याच विषयाचा का उल्लेख करावासा वाटतो? "

"मला असं वाटतं की माझ्याशी खूप गप्पा मारून शेवटी रात्री तू त्याच्याबरोबर सुख मिळवतेस"

"मग? मिळवलं तर काय? नातंच तसं आहे ना? तुमचं पण दोघांचं आहे ना तसंच? तुमचं तर लव्ह मॅरेज आहे ना? मग मी वाईट वाटून घेते का? मुळात मला काही वाटतच नाही त्याचं. तू इतका पझेसिव्ह होण्याचं कारण काय? "

"मला ती... फसवणुक वाटते.."

"का? तुम्ही दोघं करता तेव्हा माझी फसवणूक नाही वाटत?"

"वाटतेही, पण... "

"पण ती गरज असते... सांगितले ना? सेक्स हॅज नथिंग टू डू विथ लव्ह.. "

"तसं नाही,... एका विशिष्ट कालावधीनंतर येणार्‍या सातत्याला प्रेम म्हणता येणार नाही, ती केवळ तात्कालीन गरज म्हणता येईल"

"मग दोन दोन मुले झालेल्या संसारात असे केल्यास काय म्हणता येईल म्हणे?"

"कुठेही चाललाय विषय"

"तूच नेतोयस कुठेही... तू माझ्या घरी येतोस, आपल्यात अनेक गोष्टी होतात, याला मी नकार देते? जर माझे इतके प्रेम असते त्याच्यावर तर तुला मी इतक्या जवळ येऊ दिले असते का?"

" पण दोघांवरही असू शकते की प्रेम"

"ते तुमचे पुरुषांचे असू शकेल...बायकांच्या मनातून एकदा एखादाजण उतरला की तो उतरला.."

"असं अगदी उतरायला वगैरे काय झालंय तो तुझ्या मनातून? गोंडस मुले आहेत, मोठा फ्लॅट आहे, गाडी आहे, अजून काय पाहिजे? "

"संसारात इतकेच असते का? बाकी काही नसते? कम्युनिकेशन नको? देवाणघेवाण, समजूतदारपणा, काहीच नको?"

"तो तर चांगला निर्व्यसनी आहे"

"व्यसनी चालेल एखादवेळेस पण जाणीव नको कशाची? नुसते काम काम आणि कंपनी? सुट्टीच्या दिवशी बाहेर गेलो तर तो मुलांशीच बोलत बसतो.. माझ्याशी बोललाच तर मुलांच्याच बाबत बोलतो... मग मी कोण आहे??.. मुलांना जन्म देऊन वाढवत बसणारे मशीन?? आणि आता तर काय.... प्रश्नच नाही उरलेला... आता तो तिकडे म्हंटल्यावर तर सगळे माझ्यावरच... पुन्हा सासू सासरे म्हणायला मोकळे.. आमचा मुलगा कष्ट करतोय आणि तरी संसारापासून त्याला लांब राहावे लागते आहे... "

"मला तुझा प्रॉब्लेम समजतच नाही सोना.. "

"चला मग घरी जाऊ आता.. "

"तसं नाही गं.. तुला एकाचवेळेस तो तुझ्याशी खूप प्रेमाने वागायला हवा आहे आणि तुझ्याभोवती असायला हवा आहे आणि तरीही तुला मीही हवा आहे.... हे मला समजतच नाही इक्वेशन..."

"तुला समजत नाही हे इतकं विचित्र आहे... अरे मी तुझ्याबरोबर घालवते ते क्षण मला नाही पुरत दिवसभर.,.मला दोन गोड शब्दही हवे असतात... पाठीवर थापही हवी असते की छान संसार करतीयस... तू आणि मी भेटणे हे मैत्रीची पातळी ओलांडून पुढे गेले आहे आणि ते मलाही हवे आहेच... पण इथून घरी गेले की घर खायला उठते.. मुलांच्या शाळा आणि त्यांच्यासाठी राबणे इतकेच आयुष्य होऊन बसते माझे.. त्याला फोन केला तर त्याला वेळ नसतो... भिसीचा ग्रूप सारखा कंपॅनियन म्हणून नसतो... सासू सासरे कसेही असले तरी आमच्याबरोबर असते तर निदान भांडणं तरी झाली असती... पण तेही नसतात..,. अशा वेळेस मी फक्त माझ्या आणि तुझ्या प्रेमाची खरी न होऊ शकणारी स्वप्ने बघत नाही जगू शकत... तुझे आणि माझे हे घरी समजले तर तर काय होईल याची कल्पनाच करू शकत नाही मी... पण इथून घरी गेल्यावर सोनाली जवळगीकर या व्यक्तीचे इतर सर्व रोल्स इफेक्टिव्ह व्हायला लागतात... ती तुझी मैत्रीण या भूमिकेतून क्षणार्धात बाहेर पडते... तिच्यावर दोन अबोध मुलांची, तीही स्वतःच्या पोटच्याच मुलांची जबाबदारी असते.... स्वच्छता असते, बाई येणार असते, स्वयंपाक असतो, भाजी आणायची असते... लाँड्री द्यायची अन आणायची असते... सतरा कामे असतात... त्या कामांचेही काहीही नाही... पण मला त्यात मनाने गुंतावे लागते... वरवर कामे करून ऑफीससारखे सटकता येत नाही... माझ्या संसाराला अर्थ आहे हे जगासमोर सिद्ध करावे लागते.. नवर्‍याचे मन जिंकण्याच्या प्रयत्नात माझा एक एक दिवस जात असतो... मन जिंकण्याचा अर्थ वेगळा घेऊ नकोस... केवळ त्याला माझ्याबद्दल सहानुभुतीची जाणीव होणे ह्याला मन जिंकणे म्हणतीय मी... तसे तर काय मला त्याला कधीच जिंकायची इच्छा आता उरलेली नाही... ते दिवस केव्हाच गेले.. ती स्वप्ने केव्हाच संपली... त्याचा जॉब आणि माझी मुले या दोघांनी आम्हाला दिलेले आयुष्य हे जोडीचे आयुष्यच नाही आहे... आमचे एकमेकांवर खूप प्रेम असले तरी ते प्रेम आता कपाटात लग्नात एकदाच नेसलेल्या शालूसारखे कुजत पडलेले आहे... त्याला उर्जितावस्था येणारच नाही आहे कारण ही मुले आता मोठी होत जाणारेत... मुलांनी भरलेला संसार तुला सुखी संसार वाटतो ना? पण तो तेव्हा सुखी असतो जेव्हा मुलांचे आई आणि वडील असे दोघेही एकमेकांना आणि मुलांना मिळत असतात... इथे मला काय मिळतंय? त्याला त्याची बायको मिळतीय.. मुलांना आई मिळतीय... पण मला मुले किती वर्षे मिळणार आहेत? सुट्टी सुट्टी होईपर्यंत आई आई करतील.. नंतर काय? तेव्हा मला कोण उरलेले असेल? मला नवरा मिळतोय का? अजिबात नाही.. अज्जिबातच नाही... त्याला माहीतच नाही की मला हे सगळं सोसतंय की नाही... तुला वाटतं ना आम्हाला दोन मुले झाली म्हणजे आमचे नवरा बायकोचे रिलेशन अगदी सुंदर असेल?? आठवडा आठवडा तो मला हात लावत नाही..; कधी आलाच जवळ तर पंधरा मिनिटांत उरकून घोरायला लागतो.... त्याला गरज वाटेल तेव्हाच मलाही गरज वाटते असे त्याचे गृहीत असते... मला एरवी काही वाटत असेल असे त्याला माहीतही नसल्यासारखा वागतो... आणि येणारे संबंध हे केवळ त्याची एकट्याची गरज पुरवण्यासाठी आल्यासारखे असतात.. त्यात एक प्रकारची गडद कृत्रिमता असते... तू मला असे काय दिले आहेस की मला तू जास्त आवडतोस??? तर खरे तर तसे काहीच नाही... पण तू मला ऐकून घेतोस... माझ्याशी बोलतोस... ज्या विषयांवर मला बोलायचे असते त्या विषयांवर तू माझ्याशी बोलतोस... एवढे करूनही माझ्या मुलांवर प्रेम करतोस.. असे कुठे काय आहे की दर महिन्याला तू मला गिफ्ट देतोस की बाहेर फिरायला नेतोस??? आपण बोलायला बसतो कुठे तर ह्या असल्या निर्मनुष्य ठिकाणी जिथे बसायची नीट सोयही नाही तिथे... नाहीतर चोरून माझ्या घरी दुपारी भेटतो... ह्या एवढ्याच आनंदामुळे मला तू आवडतोस... हा एवढाच आनंद मला माझ्या नवर्‍याने आधीपासून दिला असता तर आपण या थराला गेलोच नसतो... आणि आता जिथे गेलो आहोत तिथून कोणत्याच कारणाने अपण परतूही शकत नाही... म्हणून मी तुला नेहमी हेच म्हणते ... सेक्स हॅज नथिंग टू डू विथ लव्ह... त्याचे आणि माझे कधीकाळी येणारे संबंध आणि ही झालेली दोन मुले हे प्रेमाचे प्रतीक नाहीत.. माझे मन जिथे गुंतते तिथे मला प्रेम मिळते.. तुझेही तसेच झालेले आहे... मला विचारलेस तर आयुष्यात तू जिथे आहेस तिथून कुठेही जायची माझी आता इच्छा नाही.... पण मी बद्ध आहे... मला स्वातंत्र्य नाही... आता इक्वेशन समजले का माझे??????"

सोना कधीच अबुधाबीला गेली नाही... तिचा नवरा तीन महिन्यातून काही दिवस असा येत राहिला... पण मुलांसाठी तिचे सासू सासरे मात्र येऊन राहिल्यावर आमचे प्रेम एसेमेसच्या पातळीला येऊन ठेपायची सुरुवात झाली... हळूहळू भेटी कमी होत गेल्या.. कधीकाळी मी घरी गेलोच तर केवळ तिच्या मुलांसाठी गेल्यासारखे दाखवू लागलो. अम्याही बालवाडीत जायला लागल्यावर मग सोनानेही जॉब करायला सुरुवात केली. घराला घरपण आल्याने तिच्या मादक डोळ्यांमधले गहिरे भाव आता माझ्यासाठी कमी झाले की काय असे मला वाटू लागले होते...

'आपण जिथे आहोत तिथून कोणत्याच कारणाने आपण परतूही शकत नाही' हे तिचे वाक्य आता खोटे ठरायला लागले.... तिच्या कंबरेला विळखा घालून तिला जवळ ओढल्यावर मिळणार्‍या कोमेजलेल्या चाफ्याच्या उबेला आता नुकत्याच उमलेल्या चाफ्याचा सुगंध यायला लागला असावा अशा कल्पनेत मी असतानाच...

"आपण आज भेटूयात का?"

सोनाचा फोन आला.

आम्ही माझ्या कारमधून लोणावळ्यापर्यंत जाऊन परत यायचे ठरवले. तेवढेच दिड दोन तास.

इतक्या महिन्यांनी अचानक तिला आज भेटावेसे का वाटले हे चांदणी चौकातच समजले.

नवरा परत येत होता काही दिवसांत... त्याला 'वर्क फ्रॉम होम' स्वरुपाची संधी मिळाली होती...

आता एसेमेसवरही गदा येण्याची चिन्हे निर्माण झालेली होती...

... खूप बोललो... खूप वचने दिली... घेतली...

एक शेवटचे आलिंगन... ज्यापुढे बरेच काही करण्याची पूर्वी इच्छा व शक्यता दोन्ही असायच्या... आज त्या आलिंगनाला सांगतेचा गंध येत होता...

सोडले तेव्हा त्या डोळ्यांमधील सर्व भाव काही क्षणांपुरते माझे होते... रडलो कोणीच नाहीत... पण सगळे जवळपास संपल्यातच जमा झाले होते...

तो आल्यावर कित्येक दिवस एसेमेसची तीव्रता पराकोटीची होती... मग हळूहळू तेही कमी होत गेले...

... मग मलाच जाणवू लागले... की माझे आणि तिचे रिलेशन फक्त क्षणभराच्या शरीरसुखासाठीच होते की काय????

ती म्हणत होती तेच खरे होते की काय??? सेक्स हॅज नथ्थ्थिंग टू डू विथ लव्ह???? तिला तिचे लव्ह परत मिळाले होते??????

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो

-'बेफिकीर'!

(नांवे काल्पनिक)

=========================================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217

एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399

मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963

जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो - http://www.maayboli.com/node/31177

ठरशीलही निष्पाप तू, म्हणतीलही पापी मला
पण कृत्य जे केलेस... मी त्यालाच शोषण मानतो - http://www.maayboli.com/node/31976

====================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

लांबच्या नात्यातील माणसे जवळ राहतात त्या विभागाला कोथरुड म्हणतात.

जवळची माणसे लांब असल्यासारखी वागणे याला बाकीचे जग.

बार, देशी दारूचे दुकान, भाजी मंडई, अवाढव्य ऑफिसेस, प्रशस्त अपार्टमेन्ट्स, पान टपर्‍या, जीम्स, दुकाने, हॉटेल्स, यच्चयावत देवांची मंदिरे, यच्चयावत राजकीय पक्षांची कार्यालये, मैदाने आणि गर्दी असूनही गर्दी नसल्याची जाणीव हे जगात एकाच ठिकाणी पाहायला मिळणारे ठिकाण फक्त कोथरुड आहे.

एक महत्वाचा घटक राहिला.

पुणेरीपणा! हाही आता कोथरुडमध्ये सदाशिव पेठेहून अधिक आहे.

मस्त..... Happy

"फेकू नकोस... दोन मुलं झालीयत की प्रेमातून??"

"सेक्स हॅज नथिंग टू डू विथ लव्ह"

हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.............

आमचे एकमेकांवर खूप प्रेम असले तरी ते प्रेम आता कपाटात लग्नात एकदाच नेसलेल्या शालूसारखे कुजत पडलेले आहे... त्याला उर्जितावस्था येणारच नाही आहे कारण ही मुले आता मोठी होत जाणारेत...

फार छान..

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो
.. Happy

एकूण काय... पुन्हा एकदा सुन्न जहालो.

सोनासारखी व्यक्तीमत्वे बरीच जाणवतात.... पण आपल्या लेखनातून मूर्त रुपात दिसतात.

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

आता पुन्हा ट्रॅकवर आलात........ मधली एक दोन प्रकरणं २४ च्या सिरिजमध्ये ठेवण्यालायक नव्हती.....

आवडलं.

बेफी मला नेहमीच एक प्रश्न सतावतो.
तुझी सौ. तुझे २४ विबासं मुकाटपणे सहन करन्याचे कारण काय?
किंवा तु तद्दन खोटे वा काल्पनिक विबासं रेखाटतोयेस यावर सौ. ठाम आहे की काय?

बकासूर | 13 February, 2012 - 15:14 नवीन
बेफी मला नेहमीच एक प्रश्न सतावतो.
तुझी सौ. तुझे २४ विबासं मुकाटपणे सहन करन्याचे कारण काय?
किंवा तु तद्दन खोटे वा काल्पनिक विबासं रेखाटतोयेस यावर सौ. ठाम आहे की काय?>>>>>

विचारून सांगतो हां तिला!

आवडलं. लेखन शैली मस्तच.

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो.

>>>>>>>>> हे सगळ्यात जास्त आवडलं.

बेफी, लिखाण आवडलं, त्यातला गाभा आवडला नाही आवडला काही फरक पडत नाही. पण तुमची लिखाणाची स्टाईल जबरदस्त आहे. Happy

>> मी एक माणूस नाही. माझ्यात खूप माणसे. त्यातला एक अभ्यासू, हुषार आणि आईच्या धाकातला मुलगा येथपासून ते मध्यरात्री अडीच वाजता भरधाव वेगाने गाडी चालवून दारूचा वास वडिलांना येऊन त्यांना उगाचच वाईट वाटणार नाही ना या चिंतेने लॅच उघडून आत येऊन हळूच झोपून जाणारा व्यसनी पुरुष येथपर्यंत सर्व काही. निपुत्रिक, नोकरदार, खर्चाळू, उधळू, व्यसनी, कवी, बोलबचन, लाईनमारू, रडवेला, हळवा, कोणाचे वाईट न पाहू शकणारा, कोणाचा हेवा न वाटणारा, नवरा म्हणून रोषास पात्र, मुलगा म्हणून टीकेस पात्र, लष्कराच्या भाकर्‍या भाजणारा, मुशायरे अन व्यासपीठे गाजवणारा, उर्मट, तापट, अनंतकाळचा प्रवासी, श्रद्धाळू, अनप्रेडिक्टेबल आणि स्वतःचाही विश्वास गमावून बसलेला असे अनेक लोक या एकाच शरीरात सामावताना जी ससेहोलपट होते ती शब्दात सांगणे शक्य नाही. << हा पॅरा प्रचंड आवडला.. Happy आपल्या डोक्यातला विचारांचा गुंता नेमक्या शब्दात मांडता येण्याची कला आहे तुमच्याकडे.

शिवाय अशी कित्येक नाती आयुष्यात येतात आणि जातात. लोक ती जपत नाहीत, थोडे दिवस आठवून नंतर विसरून जातात. जपणूक करून शब्दात मांडणारे तुम्हीच. Happy

कर्तव्य करताना मजा करत असल्यासारखे करावे आणि मजा ही कर्तव्य पार पाडत असल्यासारखी करावी. >>>>

क्या बात हॅ,......जीयो Happy

तुमच्या या २४ च्या मालिकेत लेखांचा मुख्य विषय वगळून जीवनावर केलेले प्रासंगीक भाष्य खूप आवडते...!
लिहित रहा!!! शुभेच्छा!!!!

दे_दणादण | 15 February, 2012 - 00:31 नवीन
विषयातलि सन्कल्पना ठळकपणे समोर येत नाही.सबब लिखाण मनास भावले नाही.>>

आपण कुठे असता? ही संकल्पना मायबोलीवर अती ठळक होऊन बसली आहे

सर्व दिलखुलास प्रतिसादकांचे आभार

-'बेफिकीर'!

हर्षद एकटाच उत्तर देतोय तर त्याला कशाला एसेमेस करा म्हणून मी शेवटी फक्त सोनालीलाच एसेमेस करायला लागलो

>>>> Rofl

सोना ....शेवटी काहीतरी अनपेक्षित वळण मिळेल असे वाटत होते....
पण नाही ...लाइफ मधे प्रत्येक गोष्ट "हॅपनिंग " होत नसते
बाकीच्यान् विषयी माहीत नाही ....पण ही नक्कीच सत्यकथा असणार Happy

आवडली !!

लिखाण आवडलं. परवाच वाचलं होतं पण प्रतिसाद द्यायला वेळ नव्हता मिळाला.

>>लेखांचा मुख्य विषय वगळून जीवनावर केलेले प्रासंगीक भाष्य खूप आवडते...!
लिहित रहा!!! शुभेच्छा!!!!

शामभाऊंना अनुमोदन.

>>ती म्हणत होती तेच खरे होते की काय??? सेक्स हॅज नथ्थ्थिंग टू डू विथ लव्ह???? तिला तिचे लव्ह परत मिळाले होते??????
असं काही नसावं. तुमची ही सिरीज फॉलो केली तर असं दिसून येतं की अशा प्रकरणात स्त्रीला जेव्हा हवं तेव्हा ते सुरु होतं आणि तिला जेव्हा संपावं असं वाटतं तेव्हाच ते संपतं. कथानायकाला/पुरुषाला उगाच वाटत राहत की ते प्रेम का कायसं होतं वगैरे.

सेक्स हॅज नथ्थ्थिंग टू डू विथ लव्ह?
>>
हाच तिच्या आयुष्यातला प्रॉब्लेम आहे.
कथा छानच आहे स्वतःबद्दलचे (तुम्ही कसे बनला आहात याबद्दल) स्वगत पण आवडले.

हायला मस्तच!!!! आज मला नवीन साक्षात्कार झाला... मला चक्क बेफीकीर यांचे लेखन आवडु शकते... Lol ... बेफी दिवा घ्यालच..;)

दिवा कशासाठी आहे? तुम्ही बोललात ते खोटे असूनही खरे मानावे यासाठी की खरे असूनही त्यात पुन्हा एक कोपरखळी आहे यासाठी? Wink

धन्यवाद

बेफी ....सहि ...एकदम आवड्या.... जरा हटके.... सध्याच्या काळात हे नोर्मल असेल ही ...पण मला हटकेच वाटले ....मस्त....

खूपच वास्तववादी!

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो

>>> __/\__

Pages