छत

म्हणे जातो, जातो, जातो
तरी पण जात नाही
कुडीच्या या बावीतच
घुम्या घुमतच राही

कुजबुज कुजबुज
आजुबाजुच्या कानात
उभे पीक अंदाजाचे
भविष्याच्या अंधारात

बेरजा ये आयुष्याच्या
सवे घोंगावे सोयरे
सुतकाच्या त्या हाळीत
सारे सुतकी चेहरे

पथिकास कुठे घाई
खोळंबले बघणारे
पाठी राशी कर्माच्या
आडाखे ते चुकणारे

कुणी वाहतो पुरात
बघा, छत ढासळलं
काल नांदल तोर्‍यात
आज भुई विसावलं


सुंदर कविता आहे कौतुक.
शेवटचं कडवं मन हळवं करून जातं...



सुरेख...



कविता खुपच आवडली



कौतुक... अप्रतिम लिहितोयस.



अत्यंत आभारी.