मी आणि माझी बालमैत्रीण आम्ही दोघी आमच्याच ग्रूप मधल्या एका मैत्रीणीच्या मुलाच्या लग्नाला बीडला गेलो होतो. लग्न झाल्यानन्तर जेवण वगैरे करून आम्ही दोघी एस.टी. स्टँड वर आलो. डोक्यावर कडक उन .......पावसाचा पत्ता नव्हता. स्टँड वर चौकशी केल्यावर कळले की पुण्याला जाणार्या दोन्ही गाड्या एशियाड नव्हत्या. येताना आम्ही नॉन एशियाड गाडीचा भयंकर अनुभव घेतलेला असल्यामुळे आम्ही साधारणपणे स्वछ आणि जरा कंफ़र्टेबल् अश्या एशियाड गाडीची वाट पहात होतो...........
त्याचे असे झाले .........माझी मैत्रीण पुण्याहून माझाकडे नगरला आली. आम्ही जेवलो आणि दुपारच्या बीड गाडीत बसलो. गाडीत चढतानाच लक्षात आले की बसच्या पायर्या आणि डावीकडची बाजू थुंकलेले असल्यामुळे घाण झाली आहे. चढत असतानाच किळस आली. पण इलाज नव्हता. दुसरी गाडी नव्हती. आम्ही दोघी स्थानापन्न झालो. मी खिडकीजवळ बसले होते. पण खिडकीपासून चार इंच अंतर ठेऊन बसायला लागले. कारण खिडकीखालचा भागही थुंकून थुंकून भयानक घाणेरडा झालेला होता. कधीतरी लक्ष गेले तर असे लक्षात आले की "येथे थुंकू नये" असे जिथे लिहिले होते त्यावरच थुंकून थुंकून ती अक्षरे पुसट झाली होती. बस सुरू झाल्यावर लक्षात आले की डावीकडच्या पहिल्या सीटवरून कंडक्टरमहाशयच सारखे मान थोडीशी पुढे काढून पायर्यांवर कंटीन्युअस थुंकत आहेत! काय बोलणार? आम्हीही दोघी खूप दिवसांनी भेटल्यामुळे तिकडे काणाडोळा केला आणि आमचे गप्पांचे सत्र सुरू झाले. प्रवासाच्या सुरवातीचा उत्साह मनात होता. पण मनात किळस होतीच.
तर येताना एशियाड बस नाही हे कळल्यावर आम्ही विचार करत होतो की काय करावे? तेवढयात एका प्रायव्हेट बसचा माणूस ’पाशिंजर’ गोळा करण्यासाठी फ़िरत होता त्याची नजर आमच्यावर पडली ...... ! पुण्याला जायचं का विचारू लागला. आम्ही सावधपणे त्याला विचारू लागलो की बस कुठे आहे, कधी निघणार, मधे किती स्टॉप आहेत..........वगैरे........कारण आता दुसरा पर्याय दिसत नव्हता. तो म्हणाला .." ती काय तिथे बस आहे....चला माझ्याबरोबर..." म्हणत घाईघाईत पळू लागला. आम्ही दोघी.....हातात एकेक बॅग व खांद्याला पर्स .......त्याच्यामागे भराभर चालू लागलो. डोक्यावर कडक उन.... पोटात लग्नाचे जेवण........! "अरे कुठाय तुझी ती बस? आम्हाला उन्हाचं किती पळवतोयस?......" असं वैतागून बोलत घाईघाईत त्या माणसामागे आम्ही दोघी एस.टी. स्टँड च्या आवाराच्याही बाहेर आलो. तरीही ती बस कुठेच दिसेना. पण डावीकडे मात्र एक रिकामी बस उभी दिसत होती. तीही जवळ नव्हतीच. आता हा माणूस एकदम जोरात पळायला लागला........उजवीकडे......"ताई चला लवकर ....ती पहा बस.....सुटेल आता नाहीतर..." असं तोंडाने म्हणत तो पळत राहिला. आम्ही जागेवरच थांबलो. लांबवर हळूहळू सुटलेली बस दिसली. आम्ही दोघी कितीही जोरात पळालो असतो तरी ती बस आम्हाला मिळालीच नसती. शेवटी तो बसच्या मागे हातवारे करत ’थांबा थांबा’ ओरडत थोडसं पळाला. म्हणजे थोडंसं पळाल्यासारखं केलं. आणि धापा टाकत परत आला.
आम्ही दोघी वैतागून उन्हात घामाघूम उभ्या! आमच्याजवळ आला व म्हणाला "ती बस गेली. तुम्ही लवकर आला नाहीत. पण काळजी करू नका .....आपली दुसरी बस आहे ना....ती काय तिकडे......." म्हणत त्याने लांब डावीकडे उभ्या असलेल्या त्या दुसर्या बसकडे बोट दाखवले.
मग लक्षात आले की जी बस सुटली ती बस आधीच भरलेली होती. पण दुसर्या बससाठी हातचे गिर्हाईक सोडायचे नाही म्हणून हे सगळे नाटक.
" अरे आता साडेबारा झालेत. ही बस कधी सोडणार? " आम्ही विचारले.
"हे काय आता दहा मिनिटात सोडणार". त्याने लावून धरले होते. आम्ही दोघीच फ़क्त बसला गिर्हाईक होतो. एकमेकींकडे पहात होतो. शेवटी बसमध्ये चढलो . बसलो आणि हुश्य केले. कारण खूप वेळानी आम्ही बसलो होतो आणि निदान डोक्यावर सावली.
हळूहळू लोक येत गेले. एक वाजून गेला. गाडी हलण्याचे चिन्ह दिसेना. आम्ही आपलं, " अरे कधी सोडणार गाडी? दीड वाजायला आला." असं अधून मधून विचारत होतो. आता तो आमच्याकडे लक्ष देइनासे झाला. कारण आत्तापर्यंत त्याने आमची तिकिटेही फ़ाडली होती!!
आम्हाला दिसत होते...... तो अजूनही बाहेर " चला नॉनस्टॉप नगर पुणे......" म्हणत ओरडत पाशिंजर गोळा करत होता. आत्तापर्यंत गाडीत एक विचित्र घाण वास यायला लागला होता. कसला होता कुणास ठाऊक !
बरीच सिटं भरली होती. शेवटी जवळ जवळ दोन वाजता बस सुटली. आणि हा आमचा कंडक्टर कम जो कोणी होता तो रस्त्यात दिसणारा, हात करणारा, पुण्याच्या रस्त्यात लागणार्या प्रत्येक गावाला उतरणारा, प्रत्येक माणूस, अक्षरश: तो वेचत चालला होता. आम्ही कंटाळलो होतो. प्रवासाला निघतानाचा उत्साह मावळला होता. आम्ही दोघी अधून मधून डुलक्या काढू लागलो. आम्ही दोघी पहिल्याच रांगेत डावीकडे बसलो होतो. यावेळी मैत्रीण खिडकीकडे बसली होती. ती मध्येच एकदम जागची उठली आणि ओरडली ....एका हाताने चेहेर्याचा डावा भाग खसाखसा पुसू लागली.....
........ बसवले होते. ड्रायव्हरच्या केबिनमध्ये डावीकडे व्यवस्थित सीट टाकलेले होते. ड्रायव्हरच्या केबिनमध्ये सात आठजण बसवले होते. त्यावरचा एकजण खिडकीबाहेर तोंड काढून खूप जोरात थुंकला होता. खरं म्हणजे ड्रायव्हरच्या केबिननंतर लगेच बसचे दार होते....त्यानंतर आमची खिडकी होती. पण तो इतक्या जोरात थुंकला होता की मैत्रीण बसली होती ती खिडकी पूर्ण खराब झाली. मैत्रीणीच्या चेहेर्यावर सुद्धा खूपच घाण उडली.
ती खूपच अपसेट झाली. खूप चिडली. तिकिटे काढणार्या मुलाला हाक मारली. त्याला सांगितले ..."कोण थुंकलय ते पहा". तो आपलं वरवर विचारू लागला. सगळे.... मी नाही मी नाही....... करू लागले . मैत्रीण उठू लागली पण ती खिडकीकडे होती....बसही जोरात चालू होती. मलाही खूपच चीड आली होती. मग मीच उठले. ड्रायव्हरच्या केबिनपाशी गेले. सगळ्यांवर नजर टाकली. कोण थुंकलं असेल लगेच कळलं. पंचविशीतला मुलगा होता. त्याला म्हटलं "तूच थुंकलास ना?" नाही नाही म्हणायला लागला. त्याला तोंड उघडायला लावले. खूप रागावले. "अरे अजून लहान आहेस तू.......गुटखा खाऊन मरायचं आहे का तुला? गुटक्यामुळे कॅन्सर होतो माहित नाही का तुला? अरे निदान ज्या बसमधून आपण बसून जातो त्याच बसवर थुंकायला लाज नाही वाटत तुम्हाला? जा आणि बघ ती खिडकीची काच किती घाण झालीये ती" तो मान खाली घालून बसला होता.
मी जागेवर आले. मैत्रीण अजूनही स्वता:च्या रुमालाने खसखसून तोंड पुसत होती. तिच्या कानातही घाण गेली होती. ती म्हणाली,"आता हा रुमाल टाकून देणार आहे. पण आधी त्या मूर्खाला या रुमालाने ही खिडकी पुसायला लावणार आहे". शक्यतो कधीही न चिडणारी, कधीही अपशब्द न वापरणारी मैत्रीण खूपच चिडली होती.
मी जागेवर जाऊन बसले. एका धाब्यावर बस थांबली. सगळे खाली उतरू लागले. ड्रायव्हरच्या केबिनमधली मंडळीही बाहेर आली व खाली उतरू लागली. त्यात तोही होता. आम्ही आमच्या जागेवरच बसलो होतो........त्याची वाट पहात! तो आला .........त्याला आम्ही थांबवले. मैत्रीणीने त्याला चार शब्द सुनावले व त्याच्या हातात स्वता:चा रुमाल दिला. म्हणाली "सगळी काच स्वच्छ पुसून घे." तो काच पुसून मग खाली उतरला. आमची तोंडे चालूच होती. "गुटखा खाऊन कॆन्सर होतो.....सगळे कानी कपाळी ओरडतायत तरी का खातात कुणास ठाउक......खायचा तो खायचा आणि वर सगळीकडे थुंकून घण करून ठेवायची". ..........वगैरे.
त्या धाब्यावर साधारणपणे अर्धा तास थांबून बस चालू झाली. आणि हळूहळू लक्षात आले की बसमधले तीन चतुर्थांश लोक गुटखा खात होते!!! म्हणूनच तो विचित्र वास बसमध्ये भरून राहिला होता.
आता आणखी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली.......मी नगरला उतरून जाणार......मग पुढे मत्रीण पुण्यापर्यंत एकटीच! आणि बसच्या या स्पीडने पुण्याला पोचायला नक्की आठ साडेआठ होणार. रात्री अंधारात एकदा बसमधून खाली उतरल्यानंतर त्या गुटखाबहाद्दराने जर तिला काही त्रास दिला तर..........? मनातून जरा भीति वाटायला लागली. मग मी तिला म्हटले," तू फोन करून कुणाला तरी बोलावून घे. आणि घरी पोचल्यावर मला कळव."
नगर आल्यावर मी उतरले. तो काही उतरलेला दिसला नाही. पण नंतर रात्री साडेआठ नऊच्या सुमारास मैत्रीण सुखरूप घरी पोचल्याचा फोन आल्यावर माझ्या जिवात जीव आला.
मुंबईचे शांघाय, मुंबईचे शांघाय, सध्या खूपच कानावर पडतय. पण आज या लग्नाच्या निमित्ताने खेडयाचे जे काही दर्शन झाले ते आजिबातच आशादायक नव्हते.
खेडोपाडी काहीच सुधारणा नाही आणि नुसत्या मुंबईचे शांघाय करून काय होणार?आणि ते तरी होणे शक्य आहे का?
अगदी खरं
अगदी खरं आहे. छान लिहिला आहे अनुभव आणि कुणाला चांगल शिकवायचीही भीति!
ही भयंकर
ही भयंकर डोकेदुखी आहे. खुप चांगले लिहीले आहे. अशा लेखांना मोठी प्रसिद्धी मिळायला हवी (शंभर लोकं वाचतील-विसरतील पण चार लोकांवर तर काही फरक पडेल). त्या मुलाला त्याच्याच सदर्याने पुसायला सांगायचे. हे लोकं व्यसनाच्या एव्हढे आहारी जातात की साधी विचार करण्याची बुद्धी पण गमावुन बसतात. स्वत: चैन करायची पण शिक्षा मात्र दुसर्याला.
रेल्वेमधे प्रवास करतांना सोबत सिगारेटचे धुराडे पण असते. मी भारतात असतांना तर जाम वैतागायचो ह्या वागण्याने. महाराष्ट्र शासनाने बंदी (आहे का सध्या अस्तित्वात?) आणल्यावर मध्य प्रदेशातुन यायचा माल, पण सहज गत्य मिळायचा.
अतिशय
अतिशय विदारक अनुभव. पण तुमच्या मैत्रिणीच्या धैर्याला सलाम.
माझा मोठा भाऊ एकदा गाडीवरुन चालला होता. तेवढ्यात शेजारुन एक बस गेली आणि बसमधला एक माणूस पचकन थुंकला. ते नेमकं माझ्या भावाच्या शर्टावर उडालं. भावानी गाडी जोरात पुढे घेतली आणि बस थांबवली. त्याने थुंकणार्या माणसाला पाहिलं होतं. बसमधे चढून त्याने त्या माणसाला काडकन मुस्काडात मारली. पण अशी हिंमत दाखवणारे विरळेच.
http://sucheltas.blogspot.com
उदय, अर्च
उदय, अर्च आणि सुचेल ..........
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बसमध्ये तर
बसमध्ये तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या गुटख्यांच्या वासांचे जे मिश्रण तयार झालेले असते, त्यामूळे तर अगदी ढवळून येते. आता हे लिहितानाही मला अगदी उलटी होईल असे वाटते आहे..
ही थुंकसंस्कृती बंद होईल तो दिन सोनियाचा.
होय
होय दीपक
मला लिहिताना वाटत होते आपण किती वेळा थुंकणे हा शब्द लिहितोय. लिहून लिहून सुद्धा मळमळायला लागलं होतं. आणि हे लोक खुशाल जिथे तिथे थुंकत जातात.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
स्मिता
स्मिता माइनकर छान लिहिलाय्.वाचताना चित्र उभे राहते. हे सर्व कधी बदलनार बघुया.
वाट्टेल
वाट्टेल तिथे थुंकणे नि भर रस्त्यावर प्रातर्विधि करायला बसणे ही फक्त भारताचीच व्यवच्छेदक लक्षणे आहेत!
स्मिता
स्मिता मायबोलीवर स्वागत!
प्रतिसादाबद्दल आभारी.
कसं काय वाटतय मायबोलीवर?
हो ना...... हे
हो ना...... हे कधी सुधारणार कुणास ठाऊक.
झक्की .......प्रतिसादाबद्दल धन्यवाद.