द करंट अफेअर - आसावरी

Submitted by बेफ़िकीर on 12 December, 2011 - 08:00

"बोअर होतंय, काहीतरी ऐकव"

"अं... ऐकवून झालंय सगळं तुला.."

"जुनेही चालेल.."

"थांब .. परवाच एक गझल रचली होती... काही शेर ऐकवतो.."

"ईर्शाद.."

"ईर्शाद म्हणताना तुझा खालचा ओठ फार सॉलिड हालतो"

"सॉलिड म्हणजे?"

"म्हणजे त्याच्यावरच एखादा शेर सुचावा असा"

"मग त्याच्यावर ऐकवतोयस की काय?"

"ह्यॅ! हा काय चॉईस आहे??"

"तुझा काय चॉईस आहे तो तर ऐकव??"

"एक मतला सुचलाय, पण तो मी गझलेत घेतलाच नाही आहे... कारण.. "

"घेतलाच नाही आहे म्हणजे??"

"म्हणजे मतल्याशिवायचे बाकीचे तीन चार शेर फक्त प्रकाशित केले.."

"का??"

"कारण... मतला तुझ्यावरचा आहे.."

"ओह... मग असं चालत नाही का? मतला नसला तर??"

"हां म्हणजे त्याला गझल नाही म्हणता येत मग.."

"हो पण मला ऐकवायला काय हरकत आहे??"

"ऐकवतो की??"

" ईर्शाद... हा हा हा "

मुद्दाम खालचा ओठ नेहमीपेक्षा अधिक बाहेर काढून मान वेळावत मला चिडवून हासत आसा म्हणाली.

" मतला ऐक.... हे सांग ना म्हणतेस तितकी जर खरी आहेस तू"

"हम्म... हे सांग ना??...."

"हे सांग ना म्हणतेस तितकी जर खरी आहेस तू.."

"हे सांग ना म्हणतेस तितकी जर खरी आहेस तू... बरं... हं??"

"त्याची तरी आहेस का ज्याच्या घरी आहेस तू"

कोरड्या ठण्ण आकाशात अजिबात नोटिस न देता क्षणार्धात ढग जमावेत तसे झाले.

आसाची मान विरुद्ध दिशेला फिरली तेव्हाच मी ओळखले की ती गंभीर होऊन माझ्यावर चिडलेली असणार आणि आता लेक्चर मिळणार!

चूक माझीच होती. हा मतला तिला ऐकवायला नको होता. त्यापेक्षा 'वाचून नाही होत ती कादंबरी आहेस तू' हा शेर अधिक आवडण्यासारखा होता. पण आता त्या गझलेचा तो शेर ऐकवण्याची वेळच येणार नव्हती.

हर्ट नजरेने माझ्याकडे पाहात आसा म्हणाली.

"कोणीतरी कोणाचेतरी असले किंवा पुर्वी तरी कोणाचेतरी होते ही ओळख अत्यावश्यक असते नाही?"

"तो कुठे आहे आज?"

"राजन?? अहमदाबाद"

"आत्ता सांगतीयस??"

"का? तुला सांगून काय होणार होते??"

आता माझ्या चेहर्‍यावर विदाऊट नोटिस ढग जमा झाले. पण तिला त्याची कधीच फिकीर नसते. ती नशेत जगते नशेत! दारूच्या नाही, मनातील विचारांच्या!

तिची आणि माझी डिस्कशन्स म्हणजे काहीच्या काही असतं! दोन दोन तास, अडीच अडीच तास!

"हो ना, मीही तुला न सांगताच सातार्‍याला आलो असतो तरी काय होणार होते"

"चिडण्यात काही अर्थ नाही... एक्ष, वाय झेड आणि टाईम"

"माहितीय"

"मिळालेला वेळ मजेत घालवावा... "

"आपण स्वतः जे इतरांना शिकवता ते स्वतः कोठे फॉलो करता पण??"

"म्हणजे??"

"तू पण चिडलीसच की??"

"मी?? मी अजिबात चिडले नाही.. माझ्या मनात खूप खूप विचार आले एकदम"

"अच्छा... मला सांग... काय काय विचार आले ते..."

"केवळ योगायोग म्हणून झालेल्या भेटींना आकर्षणाच्या झुळुका स्पर्शून गेल्या की ओढीचे निखारे फुलतात"

"टुकार विधान आहे हे"

"तू, तुझा हा निळा टीशर्ट, हा समोरचा पसरलेला सातारा... एव्हरीथिंग इज टुकार"

"मान्य, पण तू राजनची नाही आहेस आणि त्याच्या घरी राहात आहेस... आणि तू पूर्णपणे माझीही नाही आहेस"

"मी पूर्णपणे माझी नाही आहे हा माझा प्रॉब्लेम आहे"

"तो सगळ्यांचाच असतो..."

"ठीक आहे, पण तुला काय वाटतं माझ्याबद्दल??"

"या... या क्षणी म्हणालीस तर तुला ओढून जवळ घ्यावसं वाटतंय.."

"हं! आणि मला काय वाटतंय??"

"तुला माझा राग आला आहे... गझलेत तुझ्या वैयक्तीक आयुष्याचा उल्लेख रोखठोकपणे आला म्हणून"

"त्याचा राग नाही आला मला... तुझी गझल वाचून आणि ऐकून कोणाला समजणार आहे की ती माझ्यावर आहे??"

"गझल अशी कोणावर वगैरे नसते"

"ते जाऊदेत... पण मला राग दुसर्‍याच गोष्टीचा आला.."

"कसला??"

"तुला माझ्या वर्मावर बोट ठेवावसं वाटलं आणि त्याच्यासाठी तुला अवगत असलेल्या मार्गाचा तू अवलंब केलास"

"म्हणजे?? मी एस टी स्टॅन्डवर फलक लावण्यापेक्षा माझ्या कवितेत माझ्या भावनांना स्थान देणे हेच योग्य नाही का??"

"मी काय करावं??"

"म्हणजे??? काहीही कर! लिही, माझ्याशी बोल, एखाद्या मैत्रिणीला स्वतःच्या भावना सांग"

"म्हणजेच व्यक्त हो... "

"हो... मग??"

"माणुस एका विशिष्ट चौकटीमध्येच जे काय करायचे ते करू शकतो"

"मग??"

"तुला मला जवळ घ्यावसं वाटणं याच बरोबर एक अपराधी भावनाही मनात येणे हे निसर्गाच्या विरुद्ध आहे"

"मी तुला सांगू का आसा?? तुला माझी गझल आवडणे आणि तुलाही कवितेत स्वारस्य असणे ही आपल्या जवळ येण्याची कारणे आहेत हे तद्दन फालतू समर्थन आहे... द बॉडी लाईक्स बॉडी... दॅट्स ऑल"

"ओके, मग मला सांग... मी जेव्हा तुझ्या सान्निध्यात नसते तेव्हा मला का फोन आणि एसेमेस करतोस? तेव्हा तर बॉडी मिळणारच नसते"

"ती माझी इन्व्हेस्टमेन्ट असते, जेव्हा कधी सातार्‍याला येईन तेव्हा तू मला निराश करू नयेस म्हणून केलेली"

"वेल सेड, आणि आपण प्रत्यक्ष भेटतो तेव्हा मला हात लावायची भीती वाटते ती कशामुळे??"

"कारण ज्यासाठी आपण इथे आलो आहोत ते स्वेच्छेने उपलब्ध झाल्यावर माझ्यातील समाजाची फिकीर करणारा माणूस पुढाकार घेऊन मला अक्कल शिकवतो"

" म्हणजे काय?"

"आसा, माझा एक मोठा प्रॉब्लेम आहे. जे मला हवे असते ना? ते मिळवण्यासाठी मी अथक परिश्रम करतो, पण ते मिळणार असे वाटू लागले की माझा त्यातील रसच जातो"

"याचे कारण काय माहीत आहे??"

"काय??"

"इगो! आपल्याला हे मिळू शकत नाही असे वाटल्यामुळे ठेचला गेलेला इगो तुला ते मिळवण्यासाठी अथक परिश्रम करायला भाग पाडतो आणि मिळाल्यावर किंवा मिळेल असे वाटू लागल्यावर तो शिकवतो की आता काय, मिळालेलेच आहे, झाले आपले काम! असे"

"म्हणजे अशा, या अशा गोष्टीतही, ज्यात एका पुरुषाला नितांत रस असतो अशा गोष्टीतही हा इगो असाच वागेल?"

"नाही, अशा वेळेस तो सुखावेल आणि गुडुप होईल आणि मग जन्म घेईल समाजाची भीती"

'सगळ्यांचेच असे होते??"

"राजनचे नाही होत, माझ्याबाबतीत तरी... कारण तो त्याचा हक्कच आहे"

" मला एक सांग... नवर्‍याचा बायकोवर या बाबतीत हक्क असावा का??"

"खरे म्हणजे... म्हणजे माझे मत विचारशील तर नसावा... पण असतो खरा... म्हणजे मानला तरी जातोच"

"पण का??"

"कारण नवयाचाही हक्क मान्य नाही केला तर बायका कोणालाच हात लावून देणार नाहीत.. "

"कॅहीही... बायका सोज्वळ का??"

"तसे नाही... स्त्री आणि पुरुषाच्या मनाच्या, म्हणजे.. हसू नकोस.. मेंदूच्या मेंदूच्या... "

मागे एकदा मन आणि मेंदू यावर घणाघाती चर्चा झाली होती आमची, आणि त्यात ती जिंकली होती नेहमीप्रमाणे! मन नसतेच आणि मेंदूलाच आपण मन मानतो हा तिचा मुद्दा तिने खरा करून दाखवला होता. एम एस सी होती ती! लॉजिकल थिंकिंगचा मूर्तीमंत पुतळा!

"हं.. बोल... "

"मेंदूच्या रचनेतच फरक असतो.."

"काय फरक असतो??"

"स्त्रीला तिचे समाजातील स्थान टिकवण्यासाठी आवश्यकता असते ती प्रेम, आदर व स्त्री म्हणून सतत न बघितले जाण्याची"

"मग पुरुषालाही प्रेम आणि आदर हवाच असतो की??"

"होय, पण तो सहसा ते ओरबाडून किंवा तनमन अर्पण करून मिळवतो"

"आणि स्त्री??"

"स्त्री वागणुकीतून अपेक्षा प्रकट करते आणि अपेक्षाभंग झाला तर त्यावर जशी रिअ‍ॅक्ट होते ती पद्धत पुरुषाच्या पद्धतीपेक्षा प्रचंड भिन्न असते"

"हो पण म्हणून काय?? ध्येय एकच ना?? महत्व मिळायला हवे हे??"

"नाही रे... ते जे काय म्हणतात ना?? लज्जा आणि त्याग हे स्त्रीचे दागिने बिगिने आहेत... ते दुर्दैवाने सत्य आहे."

"युएस्मधे असे थोडेच असणार??"

"हां, तेच मी म्हणत होते... की स्त्री कोठलीही असो, त्यागाची भावना तिच्या मेंदूत बर्‍यापैकी प्रमाणात बिल्ट इन च असते "

"म्हणून राजन तुला ओरबाडू शकतो, तू ते करू देतेस, मी तुला हात लावताना दहादा विचार करतो आणि तू मलाही ते काही वेळा करू देतेस... हे सगळे कसे काय त्यामुळे सिद्ध होते??"

आसा माझ्याकडे वळली. टेरेसमध्ये गेली आणि थंडगार हवेत टेरेसच्या कठड्यावर हात टेकवून बाहेर बघत बसली.

सातार्‍याच्या त्या सुनसान कॉलनीत सुनसान शांतता पसरलेली होती. रात्रीचे सव्वा दहा! कच्च अंधार होता. समोर मोकळे माळरान होते.

मला निघायला हवे होते. मगाशी तिला मारलेल्या मिठीमुळे तिच्या कॉस्मेटिक्सचा वास माझ्या शर्टच्या दोन्ही बाह्यांना येत होता. तिच्या नकळत तीनतीनदा तो वास घेऊन मीही टेरेसमध्ये आलो.

"जाऊ का??"

"का??"

"तू टेरेसमध्ये आलीस म्हणजे आता खाली उभ्या असलेल्या कोणालाही समजणार की आज जोगळेकर गावाला गेल्यावर कोणीतरी एक जण आला होता बाईंकडे!"

"तुला माझ्यात सगळ्यात काय आवडते??"

"ट्रान्स्परन्सी" तिच्या गाऊनच्या पाठीवर माझे ओठ ठेवत मी म्हणालो.

" गाऊनची?"

"विचारांची"

"आणि??"

"आणि गाऊनचीही"

आत तिचा सेलफोन वाजला तसा आत जाऊन तिने तो घेतला. राजनशी दोन तीन मिनिटे बोलून फोन ठेवून ती वळली तेव्हा मी पुन्हा आत आलेलो होतो.

"काय म्हणतोय तो??"

"कोण काय म्हणणार हे ठरलेलेच असते... एक सांगु का तुला?? अतिशय अनप्रेडिक्टेबल असा माणूसच मला भेटलेला नाही आहे... म्हणजे आधीच कळते की एखादा आता काय म्हणणार? काय वागणार?"

"तुला असंभव गोष्टी आवडतात??"

"छे... त्या तर असंभव असतात... मला अनाकलनीय वागणारी माणसे आवडतात... आणि त्यात तुझा नंबर बराच वर आहे... "

"काहीतरी बोलतीयस तू... मी एकटा कधीही कोठेही प्रवास करू शकतो आणि तुझ्याशी कम्युनिकेट करून येथे येऊ शकतो त्यामुळे मला आणि तुला आपण दोघेही केवळ याचसाठी आवडतो की आपण एकमेकांची शारिरीक गरज भागवू शकतो... राजनही तुला जवळ घेऊन रोज झोपतच असेल... मीही तसेच करतो... "

"पूर्णपणे मान्य आहे... पण हे आवडण्याचे एकमेव कारण नाही आहे... "

"मग??"

"मी तुला आणि तू मला पूर्णपणे कधीच न कळणे यात खरी मजा आहे... "

"आपण एकमेकांना कळलेलो नाही आहोत असे मला वाटत नाही आसा.."

"मध्यंतरी तीन वेळा तो अहमदाबादला गेलेला असताना मी तुला न सांगणे याचा अर्थ काय होतो??"

"फारशी इच्छा नसावी तुझी... भेटण्याची... मला..."

"दोन वेळा तुला तो अहमदाबादला गेल्याचे माहीत असूनही तू सातार्‍याला न येणे याचा अर्थ काय होतो??"

"मला आणि तुला एकमेकांची तितकी गरजच नसावी.. "

"मग राजनने मला अर्ध्या रात्री घराच्या बाहेर हाकलल्याचे समजल्यावर निरेहून मध्यरात्री तू सातार्‍याला येऊन ठेपलास हे कसे एक्स्प्लेन करायचे?"

"एकट्या स्त्रीसाठी असा काहीतरी पराक्रम केला की ती पटकन भाळेल असा माझा विचार होता... "

"जी स्त्री त्या आधी कित्येकदा नवरा गावाला गेल्यावर तुला इथे बोलावून पराक्रम करतच होती त्या स्त्रीसाठी?"

"अंहं, नुसते तसे नाही, त्या स्त्रीला... किंवा मुळातच एखाद्याला असे वाटणे की हा माणुस आपल्यासाठी वाट्टेल ते करू शकेल हे माझ्यासाठी आवश्यक आहे.. माझ्यावर एखाद्याचा पूर्ण विश्वास असणे ही माझी एक गूढ मानसिक गरज आहे ... तो विश्वास मला कधीच ब्रेक करावासा वाटत नाही... नाहीतर माझेच मन मला खात राहते.. तो विश्वास निर्माण करण्यासाठी मात्र असे काहीतरी विचित्र करत राहतो मी.. "

"म्हणजे ड्रिंक्स घेऊन इतक्या निर्मनुष्य रोडवरून एकट्याने मध्यरात्री ड्राईव्ह करून येणे ही तुझी केवळ स्वतःची गरज होती?? माझ्यासाठी त्यात काहीही स्थान नव्हते??"

"तुझे स्थान हेच होते की तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटू लागावे म्हणून मी ते करत होतो. तू त्या गोष्टीचे कारण होतीस... तुला प्राप्त करण्यासाठी ते सगळे केलेले होते मी... ठीक आहे की त्याही आधी आपण इथेच अनेकदा भेटलेलो होतो... म्हणजे एका अर्थाने प्राप्त तर तू मला आधीच झालेलीही होतीसच... पण त्या परिस्थितीत तुझ्यासाठी काहीच न करणे हे मला मी स्वार्थी असल्यासारखे वाटले असते... जो मी नाही आहे..."

"आणि तू इथे पोचतानाच तुला माझा एसेमेस आला की त्याने मला पुन्हाघरात घेतलेले आहे आणि सातार्‍याला येत बसू नकोस तेव्हा तुला काय वाटले ??"

"प्रचंड राग आला.. तू मला दिसलीसुद्धा नाहीस म्हणून... अर्थातच... मला सातार्‍यातच राहावे लागले कारण झोप अत्यावश्यक होती... म्हणून दुसर्‍या दिवशी सकाळी राजन युनिटवर गेल्यावर मी तुला फोन केला आणि खालून येऊन तुला टेरेसमध्ये पाहून हात करून निघून गेलो... वर आलो नाही... कारण तुमच्याकडे कोणीतरी आलेले होते... पण मला अतिशय राग आला की माझ्य त्या पराक्रमाबाबत तू काहीही बोलली नाहीस.."

"हाच तो स्वार्थ... हाच तो इगो... हाच तो स्त्री पुरुषामधील फरक... तुला जर पुण्यात काही प्रॉब्लेम आला असता तर मी घरातून साधा एसेमेसही करू शकले नसते माझा नवरा असता तर... पुण्याला रात्री बेरात्री निघून येणे तर स्वप्नातही शक्य नाही... पण माझा जो आतल्याआत तडफडाट झाला असता तो मी तुला कधी दाखवलाही नसता.. मला जे वाटले असते त्याबद्दल तुझी कौतुकाची थाप मिळावी ही अपेक्षाही ठेवली नसती... फक्त संधी मिळाल्यावर प्रॉब्लेम सुटला का इतकीच चौकशी केली असती.. पण तुला तू केलेल्या अनावश्यक पराक्रमाचे कौतुक करून हवे होते... "

"तुला त्याने पुन्हा घरात घेतले म्हणून माझा सातार्‍याला येण्याचा प्रकार अनावश्यक ठरला.."

"नाहीतर मला घेऊन कुठे जाणार होतास तू??"

"निदान तुझ्याशी बोललो तरी असतो ना??"

"शुद्धीवर ये... मी घराच्या खाली उभे होते... तो वर होता.. केव्हाही टेरेसमध्ये येऊन त्याने तुला पाहिले असते तर काय झाले असते?? मी तुला भेटलेच नसते... "

"तुला काय म्हणायचं काय आहे?? तुझे वागणे त्यागी वगैरे आणि मी यडचाप का??"

आसाने मला तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपवले..

असे काही झाले की मलाही विरघळल्यासारखेच होते... वर तिच्याकडे बघत म्हणालो..

"ऐक ना... तुझ्यावर असला काही प्रसंग ओढवला की मला ... वाईट वाटते..."

"मी जॉबसाठी अ‍ॅप्लिकेशन्स पाठवली हे त्याला विचारायला हवे होते... मला वाटले नुसती घरात बसले आहे तर करेन एखादी नोकरी.. एवढे क्वॉलिफिकेशन आहे तर... पण तो मोठा वाद झाला... त्याला मान्यच नव्हते मी घराबाहेर पडणे... "

"माझे तर स्पष्ट मत आहे आसा... आई वडिलांनी आपल्या मुलीला शिक्षण दिलेले असते.... ते घरात कशाला कुजवायला लावायचे तिला... तिला जर नोकरी करायची असली तर करू देत की?? पण तुमच्या दोघात इतका वाद होण्यासारखे काय होते?? "

"जिथे मी अर्ज पाठवले त्यातला एक जण त्याचा सप्लायर होता... त्याच्याहीपेक्षा लहान युनिट असलेला.. "

"इगो..."

"हम्म्म..."

"आय लव्ह यू..."

"सो डू आय.. "

मी उठून बसलो आणि म्हणालो...

"पुढचे शेर ऐकायचेत??"

"हं..."

"खुलते तुझ्या रंगात ती अलवार साडी नेस तू... झटकायला येऊन जा गच्चीत ओले केस तू.. "

"अरे वा??"

"एकेक पानाची नशा कित्येक वर्षे राहते.. वाहून नाही होत ती कादंबरी आहेस तू... "

" वा वा?? .. कादंबरी... मस्तच.. लिहिली आहेस कुठे??"

" आसा... आजच इथे येताना मला हे शेर सुचले.. "

"कॉफी???"

"चहा मारू च्यायला... "

"रात्री ??"

"मी किती वेळ थांबले तर चालणार आहे? "

"कितीही... "

"मॅचचं काय झालं गं आज??"

"सुरू कुठे झालीय अजून??"

आसाच्या मिश्कील स्वरातील आव्हान ओळखून मी तिला किचनमधून ओढत पुन्हा बेडवरच आणले.

"थांब... ती उठली बहुतेक.."

मास्टर बेडरूममध्ये झोपवलेल्या तन्वी या आपल्या मुलीला थोडेसे जोजवून आसा परत आली..

"झोपली का??"

"हं.."

"आसा... मला फार वाईट वाटते.. "

"कसले??"

"तू आणि मी आपापल्या कुटुंबाला फसवतो आहोत.. "

"मला तर काही समजतच नाही त्याला कधी कळले तर काय होईल... "

"काय करेल तो??"

"तसा मनाने चांगला आहे.. समजावून सांगेल बहुतेक... "

"हो ना.. मीच वाईट आहे मनाने.."

हे वाक्य ऐकून आसाने बरसात केली माझ्यावर! पुन्हा सिरियस होत म्हणाली...

"ज्याच्या घरी आहे त्याची मी नाही आहे हे तू कवितेत म्हणणे मला अजिबात आवडले नाही. मी त्याची असते तर तुझ्याशी कशाला मैत्री केली असती?? तू ते म्हणणे ही खिल्ली उडवणे वाटते. "

"अगं पण म्हणूनच मी तो मतला वगळलाच... "

"तुला तसं का करावसं वाटलं?? "

"म्हणजे.. मला असं वाटलं की ते... फार ऑब्व्हियस होईल.."

"हं... म्हणजे इगोपाठोपाठ स्वार्थही... "

'जसं काही तुला काही नाहीच आहे.. इगो.. स्वार्थ... "

आसा चहा टाकायला गेली. मी टेरेसमध्ये जाऊन कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने बसून राहिलो.

चहा घेताना ती कुजबुजत्या आवाजात म्हणाली.

"हे नाते कोठे जाऊन संपणार आहे माहीत नाही... पण शेवटपर्यंत टिकेल असे हे नातेच नाही... तुला मी आठवत राहीन का??"

"खरे सांगु का?? मलाही असेच वाटते की हे नाते पुढे राहणारच नाही... पण... माझ्या मनात जे स्थान तुला आहे ते कधीही जाणार नाही.. "

बराच वेळ एकमेकांच्या बाहुपाशात नुसते बसून राहिलो होतो आम्ही! अगदी परवाचीच गोष्ट आहे ही!

तिच्या मुलायम शरीराचे टेम्परेचर मात्र संगमरवरी फरशीसारखे थंड असते. कोणाची गरज म्हणून हे नाते आहे असा विचार सारखा मनात येत होता.

"आसा... आपण केवळ हपापलेले आहोत म्हणून भेटतो... "

"विचारांना शरण जाण्यात भलाई असते... विकारांचे विचार असले तरी... कोणासाठी जन्मलो आहोत?? जन्मलो आहोत म्हणून आहोत ना?? हे सगळे काय आहे?? त्याची खुण म्हणून जगात तन्वी आहे... मला झालेली... आणि आत्ता मी तुझ्याबरोबर आहे.. हे त्याला माहीत नाही... तुझ्या बायकोला माहीत नाही... आपण दोघे हे आत्ता या क्षणाचे सत्य आहोत.. काळ ही चौथी डायमेन्शन आहे.. मला तुझ्या जवळ बरे वाटत आहे... तू निघून जातोस तेव्हा उदास होते.. तन्वीकडे बघत जागीच राहते.. राजनचा संसार करते तेव्हा अलिप्त नसते.. खूप हासते... हासवते... पण मनाच्या तळाशी जिवंत झर्‍यासारखी तुझी आठवण वाहात राहते.. तिचे तुषार चेहर्‍यापर्यंत उडतात... तुझ्या या पाठीच्या हाडांचे पीठ करणार्‍या मिठीची धगधगती ओढ रात्र रात्र जागी ठेवते मला.. नवर्‍याचा यंत्रासारखा संभोग उरकून पाठी वळवून घोरताना तुझा रोखठोक आश्वासक आणि अर्धवट खोलपणा तडफडत ठेवतो... तुझ्या आठवणींच्या गुदगुल्या आत आतपर्यंत भिनत राहतात... निरर्थकतेतून अर्थ एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी मानवाला मेंदू देण्याचे औदार्य देवाने दाखवले आहे... या क्षणाचे राज्य तुझ्यामाझ्या मनावर आहे... एखादा क्षण आयुष्यभर आठवण्याच्या लायकीचा असू शकतो आणि आयुष्य काही वेळा एक क्षणभरही आठवण्याच्या लायकीचे नसू शकते.. मन मन असे काहीही नसते... जे काही असते ते हे मंदिर... देह नावाचे... तन्वीला कुशीत घेऊन झोपताना आम्हाला दोघींना जे सुख मिळते ते शारिरीकही असते... मायेचा स्पर्श ही कायिकच भावना ना? घाबरते तर मी तुझ्याहूनही जास्तच... पण अवलंबून असते तुझ्यावर... कारण मी तुझ्याकडे नाही येऊ शकत... मला हवा तेव्हा तू मला मिळत नाहीस... कित्येकदा दुपारी विचारांनी मेंदू ठणकतो... अशी वेळ येते की तुला फोन करावा आणि चार शब्द तरी बोलावेत.. तुझा आवाज माझा कान व्हावा... तुझे खांदे माझी हनुवटी... हे सर्व ... ही सर्व व्याकुळता हपापलेपणाच असतो रे... पण तो माणसाला डिफाईन करतोच की?? उद्या मला अ‍ॅडमीट केले तर तू बघायलासुद्धा येऊ शकणार नाहीस... सातार्‍याच्या कोणत्यातरी कवितेच्या कार्यक्रमात झालेली ओळख इतक्या थराला गेलेली असेल हे राजनला माहीत असणे तर सोडच... स्वप्नात येणेही शक्य नाही.. पण मग... हवा असतेच ना... विश्वात बाकीचे तारे आहेतच ना?? मग हे नाते पण आहेच ना??"

हवेसारखेच नाते आहे. दिसत नाही कोणालाही, पण आहे खरे!

हपापलेपणाला वक्तृत्वाचा शोभिवंत मुखवटा मिळाल्यामुळे साहसांना जोर आला.

कोणी घडी मोडायची करणार नाही धाडसे
माझी गझल नेसेल इतकी भरजरी आहेस तू

थर्मल इक्विलिब्रियमने श्वास आणि नि:श्वास यांच्या कॅरॅक्टरिस्टिक प्रॉपर्टीजची एकच व्याख्या लागू केली तेव्हा सगळे जग निद्रेत बुडालेले होते आणि आम्ही एकमेकांत!

साडे चार??????

पहाटेचे साडे चार वाजल्याचे जाणवले तशी हबकून ती उठ्न बसली. त्याही दिवशी खिडकीतून मला हळूच हात करून ती काहीच झाले नसल्याच्या आविर्भावात तन्वीला जवळ घेऊन झोपली असेल तेव्हा...

.... मी नवीनच झालेल्या अ‍ॅम्बेसिडर हॉटेलकडे अंधारातच चाललेलो होतो...

'अंधारातच' या शब्दाला महत्व आहे...

.... अजूनही उजाडलेलेच नाही आहे... हे नाते जगाच्या दृष्टीने अजून अंधारातच आहे.. शेवट कसा होणार याची भीतीयुक्त उत्सुकता आहे खरी...

चमत्कारीक माणसाकडे पाहावे तसे माझ्याकडे पाहात असलेल्या रूमबॉयला दहाची नोट घेऊन मी आत जाऊन पडलो आणि गझलचा 'मक्ता' तिला एसेमेस करून .... झोपून जायचा प्रयत्न करत होतो.... पण नाहीच आली झोप...

रात्रीसवे येते उषा ज्याची असा मी 'बेफिकिर'
होते पहाटे ती खुळी आसावरी आहेस तू

आसावरी या शब्दाचा अर्थ घनगर्द संध्याकाळ!

वैताग आला परत रूमवर आल्याचा... हे पहाटे अंधारणारे किंवा अंधारात उजाडणारे नाते हवेहवेसे होऊ लागले आहे... अधिकच... अधिकाधिकच....

काय सोडावे आणि काय धरावे हे माहीत नाही... एक नशीली आणि वेडी बेफिकीरीची धुंद मनावर चढलेली आहे... मी चालत आहे ती वाट मानवी कल्पनेतील सर्वात तिरस्करणीय मुक्कामाला जात असेलही.... पण खडतर वाट चालून स्वर्गीय मुक्कामी पोहोचून नगण्य ठरण्यापेक्षा मला स्वर्गीय वाट चालून तिरस्करणीय मुक्कामी पोहोचणे अधिक महत्वाचे वाटते.... मी एक 'आज'चा माणूस... काळ ही चौथी डायमेन्शन आहे... ती वाढत वाढत कुठे जाणार आहे या भीतीने मला 'आज' घालवायचा नाही... मी एक 'आज'चा माणूस...

जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो

-'बेफिकीर'!

(नांवे काल्पनिक)

======================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217

एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399

मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963

==================================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

बेफी, जबरदस्त लेखन. आजपर्यंतच्या या मालिकेतलं माझ्या आवडीत तिसर्‍या स्थानावर असलेलं.
(सर्वांचे एकमत हे एक आणि सीमा गैलाड हे दुसरं)

>>त्याची तरी आहेस का ज्याच्या घरी आहेस तू

क्या बात है!!!!!!!!

>>"स्त्री वागणुकीतून अपेक्षा प्रकट करते आणि अपेक्षाभंग झाला तर त्यावर जशी रिअ‍ॅक्ट होते ती पद्धत पुरुषाच्या पद्धतीपेक्षा प्रचंड भिन्न असते"

पटलं!! अगदी पटलं!!!

फारच सुंदर....मंदार जोशी यांच्याशी सहमत...
मालिकेतील सर्वाधिक आवडलेल्या प्रकरणांपैकी एक

कोणी किती बायकांबरोबर अथवा पुरुषांबरोबर झोपावं यासाठी समाजाची भीती बाळगावीच असं नाही पण जी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून तुमची होऊन तुमच्याशी लग्न करते तिचा विश्वासघात कशाला करायचा? नुसते शरीरं मिळवायचे असतील तर उगाच लग्न वगैरे भानगडीत कशाला पडायचं?

व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून तुमची होऊन तुमच्याशी लग्न करते तिचा विश्वासघात कशाला करायचा
अनुमोदन .

त्याची तरी आहेस का ज्याच्या घरी आहेस तू >>> क्या बात है बेफी... एका वाक्यात विचार करायला लावणारं तुमचं लिखाण.. मस्त.. मी एक पंखा..:)

कोणी किती बायकांबरोबर अथवा पुरुषांबरोबर झोपावं यासाठी समाजाची भीती बाळगावीच असं नाही पण जी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून तुमची होऊन तुमच्याशी लग्न करते तिचा विश्वासघात कशाला करायचा? नुसते शरीरं मिळवायचे असतील तर उगाच लग्न वगैरे भानगडीत कशाला पडायचं?
>>>>>>>>>>>> पटलं.

बेफिकीर तुमचे लेखन अचाट आणि आवडले.
पण असावरीने सांगितले जे इगोबद्दल ते तितकेसे खरे नाही असा नवरा कोण्या स्त्रीचा समस आल्यावर तडकाफडकी निघुन गेला तर बर्याचश्या बायका पुन्हा घरात घेणार नाहित. तिची भिती ही तिच्या स्त्रीपणापेक्षा परिस्थितीवर आधारलेली आहे.

खडतर वाट चालून स्वर्गीय मुक्कामी पोहोचून नगण्य ठरण्यापेक्षा मला स्वर्गीय वाट चालून तिरस्करणीय मुक्कामी पोहोचणे अधिक महत्वाचे वाटते....
Purn sahamat mast....

कोणी किती बायकांबरोबर अथवा पुरुषांबरोबर झोपावं यासाठी समाजाची भीती बाळगावीच असं नाही पण जी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून तुमची होऊन तुमच्याशी लग्न करते तिचा विश्वासघात कशाला करायचा? नुसते शरीरं मिळवायचे असतील तर उगाच लग्न वगैरे भानगडीत कशाला पडायचं?
purn asahamt
vishwasghatacha prashn kuthe yetoy? Bayakansobat zopane hach kasakay vishwasghat hou shakato? Lagn vagaire bhangadit padane ha jyacha tyacha swatacha vishay ahe.. Ani vyaktinusar vishwasghatachi vyakhya badalate ase mala vatat...,.

"तसे नाही... स्त्री आणि पुरुषाच्या मनाच्या, म्हणजे.. हसू नकोस.. मेंदूच्या मेंदूच्या... " !! > इथे आपण वाद न जिंकण्यातच आपले यश सामावले आहे Proud

कोणी किती बायकांबरोबर अथवा पुरुषांबरोबर झोपावं यासाठी समाजाची भीती बाळगावीच असं नाही पण जी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून तुमची होऊन तुमच्याशी लग्न करते तिचा विश्वासघात कशाला करायचा? नुसते शरीरं मिळवायचे असतील तर उगाच लग्न वगैरे भानगडीत कशाला पडायचं?
यातलं शेवटचं वाक्य मी मुद्दाम ठळक केलंय.. या वाक्याचा अर्थ निव्वळ असा होतो की लोक शरिरं मिळवण्यासाठी लग्न करतात असाच होतोय. खरं आहे का हे? Uhoh लग्न केलेल्यांनी उत्तरं द्या.

बेफी
हे ही लेखन वाचलं. तुमच्या एकूण वाचलेल्या सर्वात ही स्त्री थोडी इंटेलिजंट वाटतेय. कारण खुलेपणाने तिला तिचे विचार मांडता आलेत, शिवाय तिने काही कळीचे विचारलेले प्रश्न आणि त्यांना तुम्ही दिलेली उत्तरं सुद्धा.. तितक्याच ताकदीची आहेत.
निदान मला तरी हे नातं निव्वळ शरीर मिळवण्यासाठी केलं गेलेलं नातं नाही वाटत.
वैचारीक भागीदारी प्रचंड आहे.

नवरा बायकोचं मिलन हे सामाजीक संस्कार आहे ईथे मनाला मोल नसते. पण प्रियकराचा प्रवास हा मनोमिलनातून तनोमिलनाकडे नेणारा असतो. या नियमा प्रमाणे पाहिल्यास नवरा बायकोचं नातच अपवित्र. कारण त्या नात्यात मिलनाचा नि मनाचा काहीएक संबंध नसतो. कारण कित्येक वेळा बायकांच्या मूक किंकाळ्यात नवरा शरीरसुखाचे उसासे टाकत असतो.
पण मनोमिलनातून जुडलेलं नातं जरी शरीरसुखाचा टोक गाठत असला तरी त्याचं अधिष्ठान हे मनोमिलन अधोरेखित करणारं असतं. त्यासाठी हे नातं पवित्र नि समर्थनीयच आहे.
याची दुसरी बाजू अशी की हे नातं ज्या समाजात आकार घेत आहे त्या समाजाच्या सामाजीक प्रगतीनूसार निष्कर्षाची दिशा ठरत असते.

पण खडतर वाट चालून स्वर्गीय मुक्कामी पोहोचून नगण्य ठरण्यापेक्षा मला स्वर्गीय वाट चालून तिरस्करणीय मुक्कामी पोहोचणे अधिक महत्वाचे वाटते

____________/\____________

सुंदर !!

बेफिकीर,

कथा खूप अगोदर वाचली होती. बरेच दिवस कळंत नव्हतं नक्की काय प्रकार आहे हा ते! जेव्हा कळल्यासारखं वाटलं तेव्हा जरासा चरकलोच! आयला काय भयानक बाई आहे ही!!

तिला आवडत्या पुरुषाकडून हवी ती गोष्ट कशी काढून घ्यावी याचं पुरेपूर ज्ञान आहे. ती कोणालाही हां हां म्हणता गुंडाळू शकते.

मात्र असं असलं तरी तिला आंतरिक मर्यादाही आहेतंच. स्त्रीपणाच्या आहेत त्या बाह्य झाल्या. मनात आणलं तर ती राजनबरोबर सुखाने संसार करेलही. मात्र नाही करवत तिला. तिचं मन लेखकाकडे ओढ घेतं. पण स्वत:ला मन आहे हे ते तिला मान्य करायचं नाहीये. शरीरं आकर्षित होतात असा पळपुटा अर्थ काढून स्वत:ची समजूत घालायचा प्रयत्न करते. ही तिची स्वत:विरुद्धच्या संघर्षातली हार आहे.

तिची शक्ती समोरच्याचे विचार (छुपेपणाने) बदलण्यात आहे. तिच्या विचारांचा लेखकावर जबरदस्त प्रभाव पडलाय. आणि ते तिला कळलंय. यालाच ती विजय धरून चालते. यामुळे 'आपण काहीही मिळवू शकतो' अशी तिची स्वप्रतिमा दृढ होतेय.

'मी पूर्णपणे स्वत:ची नसते' ही तिची समस्या वरवर पाहता स्त्रीजन्य बाह्य मर्यादांमुळे उत्पन्न झालेली वाटते. पण खरी अडचण तिच्या स्वप्रतिमेत आहे. बेफिकीरकडून काय आणि कसं घ्यायचं हे तिला चांगलं समजतंय, पण स्वत:ला हेच हवं होतं का याबद्दल संभ्रम आहे. आयुष्याचं सिंहावलोकन तिने केलेलं (दिसत तरी) नाही.

मात्र असं असलं तरीही मी तिला स्वार्थी म्हणू इच्छित नाही. मन प्रभावित करणारी ताकद असली तरी उगीच कोणा परपुरुषाकडे ती जाणार नाही. तिला आवडलेल्या पुरुषालाच ती जवळ येऊ देईल. याच अर्थी ती चालू नाही. म्हणूनंच स्वार्थीही म्हणवत नाही.

सीमा गैलाड उघड होती. ही छुपी आहे. म्हणूनंच हिला भयानक म्हणालो मी. रम्य वाट चोखाळून तिरस्करणीय मुक्कामावर ती चाललीये. आणि लेखकालाही चालवत्येय. लेखकाची नैतिक बंधप्रणाली पार मोडून टाकण्यात ती यशस्वी झालीये. का कुणास ठाऊक पण सीमाच्या बाबतीत असं झालं नव्हतं. हिच्या बाबतीतच का झालं? कारण लेखक त्याच्या नकळत तिच्यासारखाच विचार करू लागलाय! यातंच तिचं वेगळेपण उठून दिसतं, नाहीका?

म्हणूनंच आसावरी ही आजवरच्या व्यक्तीरेखांत सर्वात प्रभावशाली (पॉवरफुल) वाटते. भयानक! तद्दन भयानक!!

आपला नम्र चाहता,
-गामा पैलवान

नवीन पतिसादक, किरण्यके, दक्षिणा, बकासूर, पंत व गामासाहेब यांचे मनापासून आभार!

दक्षिणा - आपले विशेष आभार!

बकासूर -

<<मनोमिलनातून जुडलेलं नातं जरी शरीरसुखाचा टोक गाठत असला तरी त्याचं अधिष्ठान हे मनोमिलन अधोरेखित करणारं असतं. त्यासाठी हे नातं पवित्र नि समर्थनीयच आहे >> पटले.

गामा पैलवानसाहेब -

<<<<

सीमा गैलाड उघड होती. ही छुपी आहे. म्हणूनंच हिला भयानक म्हणालो मी. रम्य वाट चोखाळून तिरस्करणीय मुक्कामावर ती चाललीये. आणि लेखकालाही चालवत्येय. लेखकाची नैतिक बंधप्रणाली पार मोडून टाकण्यात ती यशस्वी झालीये. का कुणास ठाऊक पण सीमाच्या बाबतीत असं झालं नव्हतं. हिच्या बाबतीतच का झालं? कारण लेखक त्याच्या नकळत तिच्यासारखाच विचार करू लागलाय! यातंच तिचं वेगळेपण उठून दिसतं, नाहीका?

म्हणूनंच आसावरी ही आजवरच्या व्यक्तीरेखांत सर्वात प्रभावशाली (पॉवरफुल) वाटते. भयानक! तद्दन भयानक!!
>>>

अतिशय पटले

धन्यवाद

Pages