ओथंबलेले

ओथंबलेले... साजिरे..सावळे
आज अंबरात, चित्र हे आगळे
स्तब्ध स्तब्ध का घन जाहले ?
बरसण्याचे का भान नुरले ?

नभाची निळाई, दिसे ना जराही
शालु अंधाराचा, नेसली धराही
अजब हुरहुर
कातळ आतुर
लोचनांना का वेध लागले ?

लागते चाहुल, वाजे न पाऊल
वार्‍यात शहारे, मनाला कबुल
जाणिवा अधीर
जाणिवा बधीर
भावनांनी का हात गुंफले ?

अनंत या स्मृती, संधी साधती
एकल्याच जीवा, त्या कवटाळीती
अंतरात पिंगा
अंतरात दंगा
पापण्यातुनी का दवं साचले ?


आहा! कौतुक, सुरेखच.
मस्तं गीत होऊ शकतील अशा असतात तुझ्या कविता.

ह्यातलं 'लागते चाहुल...' कडवं (त्यातलं मनाला कबूलचा अर्थ न कळूनही) आवडलच आवडलं.



दाद आभार. पाऊस येणार याची चाहुल लागलीय. पण त्याचे पाऊल अजुन वाजले नाही. आभाळ फक्त भरलयं. वार्‍यात गारवा वाढु लागलाय. त्याची बोच अंगावर शहारे निर्माण करतेय. पावसाच्या येण्यासाठी ही बोच सुद्धा मनाने कबुल केलीय. अशा वेळी मनाची अनेक आवर्तने जाणवतात. 'हे ' की 'ते' हा संभ्रम असतोच. एकाचवेळी वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ होतो. यात दुसरा अर्थ अभिप्रेत आहे तो येणार्‍या जिवलगाचा. तो सांगायची गरज नाही असे वाटतं.
कविता अनाकलनीय नसावी, हा माझा नेहमी प्रयत्न असतो. पण यावेळेस झाली बहुधा. क्षमस्व. पुढच्या प्रयत्नात सुधारेन स्वतःला. पुन्हा एकदा आभार.