समस्या

Submitted by nikhilmkhaire on 20 August, 2008 - 03:36

जगातील यच्चयावत् समस्या माझ्या समोर याव्यात, ही श्रींची इच्छा!

मी सकाळी जागा होतो,
तेच मुळी समस्या घेऊन.

चाळीच्या संडासासमोरची प्रागैतिहासिक रांग,
गळके डबे, फाटकी पॅंट, न पेटणारा स्टोव्ह,

महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनासाठी जागोजागी खोदलेले खड्डे,
केवळ कुत्र्यांच्या सोयीसाठी उभारलेले वीजेचे निर्जीव खांब,
गच्च भरुन वाहणार्‍या बसेस, गटार तुंबावं तसं तुंबलेलं ट्रॅफीक,
स्टेशनातून बाहेर पडणार्‍या माणसांच्या लोंढ्यांसारखं बाहेर
पडणारं गटराचं पाणी,

घरोघरी जाऊन कोलांटी उडीचं प्रात्यक्षिक देणारे आदरणीय नेते,
लाल, निळे, हिरवे, भगवे, पांढरे बावटे,
कायम कावणारा साहेब, न ऐकणारा शिपाई,
रोजच महागणार्‍या भाज्या, इत्यादी, इत्यादी, इत्यादी.

अशी सकाळपासून सुरू होणारी समस्यांची रांग
संध्याकाळपर्यंत माळेचे रुप घेते आणि माझा गळा आवळू लागते.
मी गुदमरतो.
पण मरत नाही.
हीदेखील माझी एक समस्या आहे.

झोपेतदेखील मी दचकून जागा होतो.
कुणी एक गुंड माझ्या बायकोची छेड काढतो आहे
आणि मी त्याला बेदम बडवतो आहे.
पोलिसही मला मदत करतो आहे.

असं स्वप्न पहाटे पहाटे पडू लागलं आहे.
ही आणखी एक समस्या, मी काळजीत पडतो.
अंगाला घाम सुटतो.

अंगावरचं फाटकं कांबळं
बायको आणि पोराच्या अंगावर टाकून
मी चाळीच्या गच्चीमध्ये येतो.

संडासापुढे तुरळकच गर्दी असते.
आपला क्रमांक वरचा लागणार
या आनंदात गळकं डबडं घेऊन
मी तिकडे जायला निघतो
तेव्हा माझा चेहरा एका समस्येवर
तात्पुरत्या का होईना मिळालेल्या
विजयाच्या आनंदानं फुललेला असतो.

--
निखिल.

गुलमोहर: 

निखील, आधुनिक बा. सि. मर्ढेकर झालास का रे?

आरे बाप रे!
मर्ढेकर आजच्या कवींच्या १०० वर्षे पुढचं लिहून गेले आहेत.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

--
निखिल.

कविता मस्तच आहे निखिल... फुल्याच्या म्हणण्यावर अग्रक्रमाने विचार व्हावा, ही विनंती!

आवड्ले

छान फुलवली आहे...
मर्ढेकर आजच्या कवींच्या १०० वर्षे पुढचं लिहून गेले आहेत.
>> अनुमोदन!!