नमस्कार! या कुप्रसिद्ध २४ मालिकेतील हे अकरावे प्रकरण! अनेकवेळा काल्पनिकतेचा आधार घेऊन काही सत्य गोष्टींना वाचनीय करण्याच्या प्रयत्नात काही मने दुखावली जात असतील तर दिलगिरी! सत्य सगळेच वाचनीय नसते आणि शुद्ध कल्पनाविलास हा या मालिकेचा हेतूच नाही अशा विचित्र फ्रेमवर्कमध्ये केलेले हे लिखाण! आज सहज ही प्रस्तावना लिहावीशी वाटली कारण अनेकांनी या मालिकेची स्तुतीही केली, अनेकांना प्रोत्साहनही दिले आणि अनेकांनी नाकेही मुरडली. प्रश्न त्या रिअॅक्शन्सचा किंवा त्याबाबत मी रिअॅक्ट होण्याचा नाही. दिलखुलासपणे ही मालिका स्वीकारणार्यांचे मनःपुर्वक आभार व मायबोली प्रशासनाचे ऋण मानतो की असा विषय प्रकाशित होऊ दिला. ऋत्विका मुनोतची कथा येथे लिहीत आहे.
-'बेफिकीर'!
============================================
तुम्हाला काय वाटतं? उथळ, खोल, वास्तव, अवास्तव, रंजक, कंटाळवाणे, रंगीन, बेरंगी, आव्हानात्मक, सरळ, थेट, अस्पष्ट यातील कोणतं आयुष्य जगावसं वाटतं?
तसंही आपल्या हातात काही नसतंच! 'उद्या भेटू' म्हणणारा आजची भेट संपवून घरी जाताना दुर्दैवाने मरूही शकतो.
नाकासमोर चालताना वाटच वाकडी असू शकते ही शक्यता डावलली जाऊ शकते.
किंवा नाकही!
काय ठरवायचं या आयुष्यात? कसलंही प्लॅनिंग करत नाही मी! फक्त नोकरीत साहेबाच्या आणि संसारात बायकोच्या कमीतकमी शिव्या खाव्या लागाव्यात ही एक बाब सोडली तर! कशाचं आणि का प्लॅनिंग करायचं? कोणासाठी? मुलांच्या शिक्षणासाठी जी नाहीच्चेत? आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी जिथपर्यंत पोचण्याची शक्यता आणि इच्छा जवळपास नाहीच्चे?
नियोजनाला घटकाभर आपला सर्वात जवळचा शत्रू मानून बघा, आयुष्य साष्टांग नमस्कार करावासा वाटावा इतकं आनंददायी होतं!
हवा आहे, पाणी आहे, भाजीपाला आहे, घर आहे, कपडे आहेत! द बेस्ट थिंग्ज इन नेचर आर फ्री म्हणे! हवा, पाणी, पाने इतके तर फ्री आहेच. संन्यास घेण्याबाबत बोलत नाही आहे मी! मी संन्यास घेणे हे मल्लिकाने सात्विक भूमिका करण्यापेक्षा अवघड आहे. पण खरच, काही वेळ कसलंही प्लॅनिंग करू नका, नुसते 'हवे ते करा'! बघा! प्रथम छंद आणि मग वेड लागते.
आणि मग जगाला वेड लागते, ते आपल्याला वेडे म्हणायला लागते. आणि शेवटी आपण मनाशीच हसून जगू लागतो.
नशा शराबमे होता तो नाचती बोतल!
"आईये ना" हे दोन शब्द इतक्या घुसणार्या शैलीत मी आजवर कोणालाही म्हणताना पाहिलेले नाही.
ऋत्विका मुनोतच्या मानेवरच्या पावडरमिश्रीत घामाला मोगर्याचा वास आपोआप येतो. तिला किंवा आपल्याला काही करावे लागत नाही. बहुधा त्यामुळेच बारामतीला मोगर्याचे गजरे विकणारे कोणी नसावेत.
विहिरीवर बसून खालच्या नितळ पाण्यात खडे टाकण्यापेक्षा वरून सरळ उडीच मारावी असे वाटूनही पोहता न येणार्यांची एक जमात या मानवसृष्टीत मोठ्या प्रमाणावर आहे.
भरतभाई मुनोत त्यांचा कॅप्टन!
पोहता मलाही येत नाही, पण ते प्रत्यक्ष पोहण्याबद्दल!
जी एल सामतांच्या तबल्याच्या क्लासला अतिशय घाबरून जायचो मी पहिली काही वर्षे! बेकार कडक होते. सुई वगैरे टोचायचे करंगळी उचलली तर! म्हणजे तबल्यावर असायला हवी ती करंगळी उचलली तर! बाकी करंगळी उचलावी अश्याच शिव्या बसत असायच्या सर्वांना! सात वर्षे तबला शिकल्याला अठ्ठावीस वर्षे झाली तरी त्यांची भीती मनात अजूनही तशीच आहे. बरोब्बर सांगितले की नाही की मी इतका इतका तबला शिकलोय! एकदा असाच मी तेथे गेलेलो असताना त्या वेळी येणार्या इतर तिघांपैकी काही ना काही कारणाने कोणीच आले नाही. आणि मी सरांना घाबरून कसाबसा तबला वाजवू लागलो. मी एकटाच असल्याने त्यांच्या मनात मला रागावण्याचे विचार येऊ शकले नाहीत कारण शिष्यहीन तास घालवण्यापेक्षा एखादा शिष्य असलेला तरी बरा! त्यामुळे काहीतरी काम करताना मधेच ते माझ्या एखाद्या तुकड्याच्या जागेवर मान हालवून 'वा' म्हणू लागले आणि दहा मिनिटांनी त्यांनी मला विचारले.
"कुठपर्यंत झालंय रे तुझं??"
या प्रश्नाचे विविध वयात विविध अर्थ असतात. त्या वयात 'तबला कुठपर्यंत शिकून झाला आहे' असा अर्थ होता.
"तुकडे सगळे झाले सर..."
"नवीन काय शिकायचंय का?"
प्रचंड घाबरून मी पुटपुटलो, मला काहीही शाश्वती नव्हती की ते मान्य होईल पण याची शाश्वती होती की शिव्या बसणार!
"पेश.... पेशकारा...."
"पेशकारा??? पेशकारा खरं म्हणजे... इतक्यात नाही शिकवत मी... बरं असूदेत.. दे वही..."
आपल्याकडच्या एका वहीत ते स्वहस्ताक्षरात सगळे लिहून द्यायचे. अगदी खाणाखुणांसकट आणि मात्रांसकट!
चक्क पेशकारा लिहून दिला. धिंक्डधिंता.... ता धिंता... तिकधा धातीत... धा धा तिन्ना... तिक घिडान धा तिन्ना धिन्ना... धाक्ड धातीत... धाधा तिरकिट... "
कसेबसे तोंडातून काढलेले नांव आता माझे झाले. पेशकारा! सोबत्यांवर भाव मारता येणार होता आता उद्यापासून!
वो गदा जिसका न हो खूं-ए-सवाल अच्छा है
न मागता मिळाले तर फार मजा येते. आणि जो मागत नाही तो भिकारी अधिक चांगला! आपण सगळेजण पंचमहाभूतांचे भिकारी आणि सतत काही ना काही मागतही असतो. गदा म्हणजे भिकारी!
ऋत्विका मुनोत न मागता स्वतःहून जवळ यायची.
भरतभाईला टॅन्क टाकायचा होता बारामतीत, क्रायोजेनिक! सर्वात जवळचा सोर्स म्हणजे आमची कंपनी आणि त्यामुळे मी! कारण ते प्रॉडक्ट मी बघतो. तो भिगवण रोडला राहायचा. चांगला प्रशस्त बंगला! अनेक फेर्या झाल्या माझ्या त्याच्याकडे! टॅन्क त्यानेच ऑर्डर करायचा होता. ऑर्डर केल्यापासून सीसीओईच्या सर्व कायदेशीर बाबी होईपर्यंत जवळपास तीन महिने जातात आणि मग सप्लाय सुरू होतो. पण माझा अनुभव असल्याने त्याने मलाच विचारून सगळे करायला सुरुवात केली. अगदी टॅन्क कोण देते इथपासून ते सीसीओईला कोण माणूस पटवायचा हे सगळेच मी सांगितले. बरेचदा त्याच्याच घरी मीटिंग व्हायची. तेव्हा फार ओळख नव्हती. ती आपली इकडून तिकडे जाताना दिसायची इतकेच! फक्त पहिल्या वेळेस ओळख करून दिली होती तेवढेच! पण सीसीओईसाठी त्याच्या नागपूरला फेर्या सुरू झाल्या तेव्हा इकडे टॅन्क कमिशनिंगसाठी मी फेर्या मारू लागलो आणि काही ना काही कारणाने तो नसताना दोन तीन वेळा घरी जाणे झाले. मुलगा पाचवीत होता.
बहकण्याच्या अनेक पातळ्या असाव्यात असा माझा संशय आहे.
काही लोक मानसिक पातळीवर बहकतात तर काही वैचारीक! वैचारीक म्हणजे काही जण फक्त इतकाच विचार करतात की हा हा किंवा ही ही आपला / ली पार्टनर असता / ती तर? मानसिक म्हणजे फॅन्टसायझिंग!
शारिरीक पातळ्यांवर बहकणारे अनेक पुरुष व स्त्रिया मी पाहिल्या. मीही बहकलो आहे.
समुद्राच्या लाटेवर स्वार होऊन समुद्रसपाटीपेक्षा अधिक उंची मिळवण्यात जे समाधान आहे त्यापेक्षा समुद्रातच राहून एक नगण्य थेंब असण्यात अधिक आहे.
हिंदी भाषा इतकी गोड असते हे मला आधी माहीत होते, पण इतकी जास्त गोडपणे बोलता येते हे माहीत नव्हते.
गेल्या शतकातील व्यक्त होण्याच्या मानसिकतेपेक्षा हल्लीची मानसिकता अधिक प्रखर आहे. एकत्र कुटुंब पद्धती जवळपास नष्ट पावलेली आहे. निदान शहरी भागात तरी! पैसा वाढलेला आहे. सगळेच नोकरी व्यवसाय करू लागलेले आहेत. 'से' आलेला आहे प्रत्येकाला! प्रत्येकाला महत्व मिळू लागलेले आहे या नवीन शहरी संस्कृतीत! पुर्वी कदाचित काही ठिकाणी बायका सासर्यासमोर पदर डोक्यावर घेतल्याशिवाय जात नसतील, आता सासराच वचकून असतो असा प्रकार बघायला मिळतो. हे चांगले वाईट वगैरेबाबत मला काही मतच नाही आहे. प्रश्न वेगळाच आहे.
प्रश्न हा आहे की पुर्वी लोक जितके काही बाबतीत गप्प असायचे तितके आता नसतात.
ऋत्विका मुनोतने मला चौथ्याच भेटीत सांगितले होते की भरतभाई जेमतेम झोपायला मध्यरात्री घरात येतो आणि सकाळी निघून जातो. त्याला घरात काय चालले आहे ते माहीतही नसते. मीटिंग असली तर मीटिंगच्या खोलीत असण्यापुरता मात्र घरात असतो इतकेच! बाकी फिरतच असतो.
मी हे सगळे ऐकत असताना रंगांच्या पौर्णिमेकडे, पंचमीकडे नव्हे आणि सुगंधाच्या उधळणीकडे बघत बसलो होतो.
स्त्रीने जितक्या ठिकाणी दागिना घालावा त्या सर्व ठिकाणी ऋत्विकाने दागिना घातलेला होता. साधाच, पण मोठा आकर्षक असा!
तिच्या कांतीला ते फार शोभायचे. अगदी कानात तो काय वेल का काय असतो तिथपासून ते जोडव्यापर्यंत आणि पैंजणपर्यंत सगळे! नेलपॉलिश, दोन्ही हातात मिळून पाच एक अंगठ्या, अनेक रंगीबेरंगी बांगड्या! हे रोज!
पण हे सगळं फिक्कं पडावं असं तिचं वागणं असायचं! अगदी जवळ येऊन बोलणे, श्वास भरून उच्चार करणे आणि बिनधास्त डोळ्यात डोळे गुंतवणे!
पागल होणार माणूस!
नैसर्गीक उर्मींना व्यक्त व्हायला वाट देणे हा मोक्ष मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
लोक कुत्रा वगैरे पाळतात तसे मी मला पाळतो.
स्वतःचे लाड करणे हे मोठे पुण्य आहे. अर्थात, नॉट अॅट द कॉस्ट ऑफ समथिंग, एक्सेप्ट वन्स ओन हेल्थ!
निसर्गाने धडधाकट शरीर दिले आहे ते दगडाच्या मूर्तीपुढे वाकवून समाजाच्या नीतीमत्ता पाळायला माणूस म्हणजे बिनडोक प्राणी आहे की काय?
मला एक समजत नाही, की लोकांना ते स्वतः किती टक्के दुसर्याच्या आणि किती टक्के स्वतःच्या मताप्रमाणे जगतात हे लक्षात कसे काय येत नाही?
आखलेल्या चौकटीतही खूप खूप रंजकता असते.
ऋत्विका मुनोतच्या नुसत्या समीप येण्यातही नोकरीत प्रमोशन मिळाल्याचा आनंद व्हायचा.
अगदी फक्त स्वतःसाठी जगण्यात एक विलक्षण आनंद असतो.
झाडाची भोळी पिवळी पाने येणार्या झुळुकेला घाबरून डांबरी रस्त्यावर पडतात. त्यांना नुकतीच उमलत असलेली पालवी छद्मीपणे हासते. आकाशातील रंग बदलत असतात आणि आकाश आपले दिवस रात्र ठरवत राहते. सूर्य रोज तीच फेरी मारल्याचा भास निर्माण करत पृथ्वीला स्वतःभोवती फिरवतो. रस्त्याच्या एका कोपर्यात नेहमी बसणारा म्हातारा भिकारी त्याच्याहीपेक्षा गरीब भिकारी जवळ आलेला दिसल्यास त्याला हाकलून देतो.
निसर्गात स्वार्थ ओतप्रोत भरलेला आहे.
त्याशिवाय निसर्ग चालणारच नाही. मी मी आहे ही भावनाच नष्ट झाली तर काय??
संतांना विमाने आली पण त्यापुर्वी सावकारी खते नदीन बुडवावी लागली आणि मोह सुटल्याचे सप्रमाण सिद्ध करावे लागले.
ऋत्विका मुनोतच्या कंबरेला विळखा घालून तिच्या गळ्यावर ओठ टेकवताना मी लाच घेण्याच्या मोहाने विमाने आली तरी परत पाठवीन!
क्षणांची चुंबने देतात कालातीत संतुष्टी
मला जाणायची नाही तुझी माया तुझी सृष्टी
म्हणजे मग मी कोण? वासनांधच की? प्रतारणा करणाराच की?
मान्य आहे.
लोक म्हणाले तर राग का येतो?
राग येतो कारण पन्नास टक्के जबाबदारी त्या स्त्रीची असते हे मला माहीत असते. पन्नास टक्के कारणे तरी तिची असतातच! पन्नास टक्के आवश्यकता तिलाही असते.
पण मुळात याच समाजात राहून याच समाजाच्या चौकटीबाहेर कसे राहता येईल?
मुलगा अचानक घरी आला तेव्हा दोघांनाही हाच प्रश्न पडला होता. पण ऋत्विकाने अलगद सोडवला तो प्रश्न, माझा हात जसा सोडवायची तसाच!
"अंकलको नमस्ते करो... "
काही झालेच नाही अशा थाटात त्याला काहीतरी खायला देऊन ती गप्पा मारायला समोर येऊन बसली. काहीतरी जाणवले मला! आत किचनमधून मुलगा माझ्याकडे काहीश्या विचित्र साशंक नजरेने पाहात होता. जे दिसते आहे ते पपांना समजले तर त्यांना मान्य होईल की नाही हे त्याचे त्याला ठरवता येत नव्हते. कारण तो मला तसा कोणीच नसताना तिथे आल्याचे पहिल्यांदाच पाहात होता. अस्वस्थता आली मनात !
भरतभाईचे खूप कौतुक केले मग मी बोलताना! तीही हासत होती.
मुलगा खेळायला निघून गेला. त्यावेळेस मात्र त्याला खेळणे महत्वाचे वाटले. दार उघडेच ठेवले तिने अर्थातच!
नंतरही काही वेळा भेटलो.
विजेत्याची देहबोलीच अनेकदा विजय खेचून आणते हे खरे ठरवायची ऋत्विका नेहमी! जणू तिने मला जिंकलेच आहे असे वागायची. अतिशय सॉफ्ट आवाजातील कुजबूज आणि मुख्य म्हणजे विनोदाची अतिशय चांगली जाण!
बोलण्यात हजरजबाबी! खूप हसायचो आम्ही!
तसा नाही हासलो नंतर कधीच!
हासण्याची आठवण काढताना रडू येते हा दैवदुर्विलास!
आणि रडण्याची आठवण काढताना रडूच येते हा बकवास!
एकदा असेच भेटलो आणि आवेग ओसरल्यावर गप्पा सुरू झाल्या. माझं हिंदी होतं त्यापेक्षा बरं होणे हा ऋत्विका मुनोत प्रकाराचा साईड इफेक्ट होता.
डार्क हिरवी साडी नेसली होती ती!
कोणती, तर दोन महिन्यांपुर्वी मीच दिलेली!
अचानक तिचे लक्ष तिच्याच फोनकडे गेले. बावळटने तो व्हायब्रेटरवर ठेवलेला होता. व्हायब्रेटरचाही आवाज जाणवला तेव्हा आमचे लक्ष गेले. सहा मिस्ड कॉल्स! भरत!
हिने फोन लावला. दचकून मी बाहेरच्या खोलीत येऊन माझा फोन व्हायब्रेटरवर ठेवला.
मिनिटाने ती भराभर बाहेर आली आणि दार उघडले, पंखा लावला आणि सरळ चहा टाकायला आत गेली. तिथूनच म्हणाली.
"वे आरहे है... मैने कहां है तुम अभी आये हो... ठीक है??... बाल देखो अपने..."
थरथरत होतो मी! भांग पाडताना अनेक प्रश्न विचारले तिला! तो बारामती स्थानकापाशी पोचलेला होता. दहा मिनिटात घरी पोचलाच असता.
नंतर पेपर घेऊन अगदी दारापासच्या खुर्चीवर वाचत बसलो. आलं ध्यान काही वेळाने! त्याच्या डोक्यात काही नाहीच! त्यामुळे तो कूल आणि माझी हालत वाईट! बघतो तर ही मस्त हसून बोलतीय!
रहस्य हा स्त्रीच्या मनाचा सर्वात मोठा भाग व्यापणारा प्रकार आहे हे मला लक्षात आलं!
रहस्य असलं की स्त्री अधिक खुलून दिसते हेही!
माझ्यातला चांगलाबिंगला माणुस रात्री पुण्याला परतताना जागा झाला नेहमीप्रमाणे!
आपण भरत मुनोतच्या मैत्रीचा फायदा घेतोय वगैरे!
पण एक मात्र होतं!
इतर कोणत्याही कथेतील स्त्रीपेक्षा... ऋत्विका मुनोतमध्ये मी अधिक म्हणण्यापेक्षा... पूर्णतया अडकलेलो होतो...
तिच्यात गुंतलेलं मन माझ्याकडे परत येतंच नव्हतं!
ती होतीच तशी!
विमानात बिझिनेस क्लास मिळाल्यावर वाटावे तशी वाटवत राहणारी! सेक्स हा त्या नात्यातील एक जवळपास दुय्यम भाग झालेला होता. हासणे, गप्पा आणि नुसतीच जवळीक! कितीकिती वेळ तसेच!
प्रेम!
कोणत्याक्षणी आपल्या मनातील एखाद्याबद्दलच्या भावनेचे स्वरूप 'प्रेम' असे होते ते न समजणे ही आयुष्यातील सर्वात सुंदर बाब आहे.
ऋत्विकाचे नंतर माझ्या एक लक्षात आले.
अगदी नीट, एकेका गोष्टीचा विचार केल्यावर!
नवर्याच्या तक्रारी लाडीकपणे सांगत राहणे आणि चहापाणी करून थोड्या गप्पा वगैरे मारणे हे अत्यंत प्राथमिक प्रकार तिने ज्या कमी वेळत केले ते माझ्या लक्षात आले. कोणत्या क्षणी आपण भांबावून गेलो हे आठवले तेव्हा लक्षात आले की ती हिरमुसली होऊन आपल्या शाब्दिक आधाराची अपेक्षा करत असताना आपण चार शब्द बोललो होतो. तिने पुढे मांडलेले चित्र अतिशय वेगळेच होते. तो घरात काही बघतच नाही इथपासून ते त्याच्यासाठी आता ऋत्विका काहीही नसून केवळ मुलाबाबत आस्था उरलेली आहे असे! हळूहळू लक्षात यायला लागले की अगदीच काही तसे असल्यासारखे वाटत नव्हते. भरतभाईच्या बोलण्यात अनेकदा इकडे तिकडे कुटुंबाला घेऊन गेल्याचे वगैरे उल्लेख आलेले होते. व्यवसायाचा व्याप वाढवल्यामुळे आणि एकटाच असल्यामुळे त्याला वेळ्कमी मिळत होता हे खरे असले तरी ऋत्विका अगदीच सात्विका नव्हती हेही खरे होतेच! त्य दिवशी अचानक तो आल्यानंतरसुद्धा तिची देहबोली जितकी बावरायला हवी होती त्याच्या एक टक्काही तशी झालेली नव्हती. सिड्यूस! 'द' सिड्यूस!
मी हा विचार करण्याचे कारण मात्र अतिशय सर्वसामान्यच होते. आपल्याला तिची अधिक जरूर असेल की तिला आपली ही एक असुरक्षिततेची भावना मला हा विचार करण्यास प्रवृत्त करत होती. पण जसजसा तो विचार मी करू लागलो तसे मला जाणवायला लागले की जाळ्यात अडकवणे हाही प्रकार थोडाफार तिच्याकडून झालेला आहेच. मग एक मन म्हणाले की पण तयची तिने कुठे काय किंमत मागीतली? किंवा असे कुठे झाले की तुला तिने कोणताही मनस्ताप दिला? मग दुसरे मन उत्तरले की ते काहीही असले तरी तिला मी हवा होतो आणि त्याबाबत तिने पद्धतशीर पावले उचलली इतपत तरी तुला मान्य आहे का? मग पहिले मन म्हणाले की तसे असले तरि आजतागायत तिने तुला कोणताच आग्रह केलेला नाही, काहीच मागीतलेले नाही, मग तुला काळजी करायचे कारण काय? पुन्हा दुसरे मन म्हणाले की काळजी करायची वेळ केव्हाही येऊ शकेल हे काळजी करण्याचे कारण आहे.
आणि दुसरा धक्का बसला.
ऋत्विकाचा मला संध्याकाळी मी माझ्याच घरी असताना मला फोन आला. एकदम नंबर पाहून दुसर्या खोलीत वगैरे जाणे अत्यंत चुकीचे दिसले असते. मी तिथेच बसून फोन घेतला.
"पडोसकी दादी है ना?? वो पूछ रही थी की बीचबीचमे कौन आता है तुम्हारे यहाँ??"
"हं... "
"मेरा खयाल है थोडा खयाल रखना चाहिये हमे... "
"हं.."
"कहां हो??"
"घर पे... "
"सॉरी... कल फोन करती हूं...."
"हं... बाय..."
"बाय.."
फोन ठेवला अन कानावर प्रश्न!
"कोण रे??"
"डीलर... " मी थाप मारली.
विषय तिथेच संपला!
दुसर्या दिवशी एक दीर्घ फोन झाला. का कोणास ठाऊक, पण दोघांनाही एकमेकांना अजिबात सोडावेसे वाटत नव्हते.
याच दरम्यान कोजागिरीचे (http://www.maayboli.com/node/27193) मेसेजेसही जोरात सुरू झालेले होते. 'रंगांच्या पौर्णिमेकडून' 'बेभानतेच्या अमावास्येकडे' जाताना दिशा चुकलेल्या जहाजासारखा हेलकावे खात मी नियंत्रणहीन अवस्था एन्जॉय करत होतो.
नियंत्रणहीन अवस्थेचे वेडच आहे मला! कोणतेही बंधन नको, कोणाला जाब द्यायला नको, मस्त जगावे, मात्र कोणाला त्रास न देता जगावे आणि त्रास सहनही करू नये! असे काहीतरी!
नाते ज्या आवेगात आणि वेगात जडले त्याच्या कितीतरी पटीने कमी वेगात आणि आवेगात संपत राहिले.
तेल अगदी संपताना ज्योत जशी मंद मंद होत जाते तशी!
याला जबाबदार होती कोजागिरी एन! बेभानतेची अमावास्या!
मंद सुगंधी झुळुकीतून आक्रमक दाक्षिणात्य वादळात खेचून तिने मला मनाने विवस्त्र केलेले होते.
बारामतीला अजून सप्लाय करतो आम्ही, पण भरतभाईने ठेवलेला एक नात्यातील मुलगा तो प्लॅन्ट बघतो. भरतभाई वेगळा बिझिनेस करतो.
कधीकधी ते हासणे आठवून रडू येते. आणि रडू आले हे पाहून हसू येते. मग धुराच्या रेषेसहीत मनातले विचार आकाशाला जाऊन पोचतात. आणि मग शेर निर्माण होतो.
मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो
-'बेफिकीर'!
(नांवे काल्पनिक)
=========================================
नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826
जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871
घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000
नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230
दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898
त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193
म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432
माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217
एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399
==================================================
-'बेफिकीर'!
पोहता मलाही येत नाही, पण ते
पोहता मलाही येत नाही, पण ते प्रत्यक्ष पोहण्याबद्दल!
सुंदर ! काही डायलॉग्स तर
सुंदर !
काही डायलॉग्स तर कायमचे लक्षात राहतिल असे आहेत ...
नियोजनाला घटकाभर आपला सर्वात जवळचा शत्रू मानून बघा, आयुष्य साष्टांग नमस्कार करावासा वाटावा इतकं आनंददायी होतं!
खरच, काही वेळ कसलंही प्लॅनिंग करू नका, नुसते 'हवे ते करा'! बघा! प्रथम छंद आणि मग वेड लागते.आणि मग जगाला वेड लागते, ते आपल्याला वेडे म्हणायला लागते. आणि शेवटी आपण मनाशीच हसून जगू लागतो.
नशा शराबमे होता तो नाचती बोतल! ट्राय करुन पहायला हरकत नाही काही वेळ
नैसर्गीक उर्मींना व्यक्त व्हायला वाट देणे हा मोक्ष मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मोठ्ठे वादग्रस्त वाक्य ! आपण " ओशो " वाचलाय का हो बेफी ??
लोक कुत्रा वगैरे पाळतात तसे मी मला पाळतो.
स्वतःचे लाड करणे हे मोठे पुण्य आहे. अर्थात, नॉट अॅट द कॉस्ट ऑफ समथिंग, एक्सेप्ट वन्स ओन हेल्थ! कल्पना आवडली !!स्वत्;च स्वतःचे लाड करणे ...:)
आणि अशी बरीच वाक्ये भावली !
सुंदर !!
mi tisara nasheeb falfalal
mi tisara
nasheeb falfalal vatat
mast ani vachaniy
mast ani vachaniy nehamipramane...
.
.
लेख आवडला परंतू थोडा अलिप्त
लेख आवडला परंतू थोडा अलिप्त राहून लिहील्यासारखा वाटला.
सीमा गैलाडवरती उठलेल्या वादळांमुळे डिफेन्सिव्ह स्टँड घेतलाय की काय अशी शंका मनात डोकावली.
आधिक उणे बोललो असल्यास क्षमस्व!!
नेहमी प्रमाणे छान्...पण
नेहमी प्रमाणे छान्...पण यावेळी थोड हातचा राखुन लिहिलयं अस वाटल्...कदाचित मी खुप अपेक्षा केल्या असतील्...पण मनाचा गोंधळ मस्त मांडलाय...
बेफिकीर, विदिपा म्हणतात तसा
बेफिकीर,
विदिपा म्हणतात तसा लेख अलिप्तपणे लिहिल्यासारखा वाटतो. 'बेफिकीर'ने न लिहिता 'भूषण'ने लिहिल्यासारखा वाटतो. हे माझं वैयक्तिक मत किंवा निरीक्षण आहे!
सीमा गैलाडवरून उसळणार्या वादळांचा कितपत परिणाम झालाय हे सांगता येत नाही मला. मात्र कलाप्रांतातील एक सर्वस्पर्शी वाद इथेही दिसून येतो. कलाकाराने ('भूषण') भूमिकेशी ('बेफिकीर') कुठवर तादात्म्य साधावं?
एका प्रथितयश मराठी (रंगभूमीवरील) नटाच्या बाबतीत असा वाद उत्पन्न झाला होता. नाव आठवत नाही!
तेव्हा त्याने सांगितलेलं की पूर्ण तादात्म्य पावलं तर नट ती भूमिका अजाणतेपणी प्रत्यक्ष आयुष्यातही जगू लागतो. कलाकार आणि कलेच्या दृष्टीने हे चांगलं नव्हे. नटाने भूमिकेत पूर्णपणे झोकून काम करू नये. थोडंसं स्वत:चं वेगळेपण जपावं.
वरील लेखाच्या बाबतीत कलाकार आणि भूमिका उलटपालट झाल्या आहेत. इथे कलाकार प्रत्यक्ष आयुष्य (=कलानुभव) अगोदरच जगलाय तर लेखक ही भूमिका तो अनुभव वाचकांसाठी कल्पनाबद्ध करतोय. मधल्या कालावधीत तादात्म्याचा प्रश्न इथे लागू पडत असावा.
निर्णय सर्वस्वी 'भूषण'चा आहे, हे सांगणे नलगे!
बेफिकीर, कथा चांगली रंगवली आहे. ऋत्विकापेक्षा तुमच्याविषयी तुम्ही अधिक बोललात! असं म्हणतात की, पुरुष स्त्रीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या स्त्रीपेक्षा स्वत:च्या प्रेमात अधिक पडलेला असतो. खरंय का हो?
आपला नम्र चाहता,
-गामा पैलवान
गामा पैलवान +१
गामा पैलवान +१
सर्व प्रतिसादकांचे आभार
सर्व प्रतिसादकांचे आभार
मला हा लेख नाही आवडला. खुप
मला हा लेख नाही आवडला. खुप तुटक आणि बरीचशी शैली व.पु. च्या जवळ जाणारी वाटते. वेग वेगळी वाक्ये बघीतली तर ग्रेट, पण एकत्रित परीणाम वेगळाच. वाक्ये छान आहेत. पण कथा नाही. ऋत्विकाचे व्यक्तिमत्व नीट खुलले नाही. तिचा स्वभाव "चालु" ह्या प्रकारात असेल तर त्याचे अजुन कंगोरे यायला हवे. प्रवाहात वहात असल्या सारखा कथानायक त्यात वाहुन गेला. पन्नास टक्के जबाबदारी झटकल्या सारखी वाटते. कथानायकाच्या प्रतारणेचे समर्थन वाटते. सीमा गैलाड मधील कथानायक हा तिच्या व्यक्तिमत्वाने हबकलेला वाटला. तिच्या वागण्याला लगाम घालणारा, तरीही सावध.
इकडे कथानायक "मिळतय म्हणुन खावुन घेवुया" किंवा "वाहात्या गंगेत हात धुवुन घ्यावे" ह्या व्रुत्तिचा वाटला. तिचीही काही बाजु असेल. ती कुठे गेली? ती बाई जर चालू असेल तर तीचे खुप मित्र असतील. तिच्या मुलाला ह्या गोष्टीची सवय हवी. किंवा निदान कल्पना तरी.
कथेचा शेवट तर अगदीच तुटक. ती बाई नंतर कुठेच भेटायचा प्रयत्न करत नाही? जी घरी फोन करु शकते, ती बाई जर इतकी जवळीक असेल आणि खरच सिड्युस असेल तर नक्किच चिकटायचा प्रयत्न करेल.
मी सो कॉल्ड सिड्युस अशा दोन बायका अगदी जवळुन पहात आहे. ते प्रकरण वेगळेच असते. त्यांच्या साठी त्यांची इछ्छा येवढेच सत्य असते, बाकी सब झुट. सगळे लक्ष स्वतः वर असते. इतरांना कसे खेळवायचे त्यांना फार चांगले समजते.
सॉरी पण नाही पटली ही
मनापासून आभार, अतिशय दिलखुलास
मनापासून आभार, अतिशय दिलखुलास व स्पष्ट प्रतिसादांसाठी!
गामा, नेहमीप्रमाणेच आपला प्रतिसाद माझ्या कथेपेक्षा जास्त भाव खाऊन गेला
मोहन कि मीरा - आपला प्रतिसादही फार आवडला. काहीतरि चुकले असावे बहुधा माझे
पुन्हा धन्यवाद!
-'बेफिकीर'!
मी खरे सांगतो. ह्या मालिकेतले
मी खरे सांगतो. ह्या मालिकेतले लेख वाचले की मला हसूच येते.
चक्क 'मज्जा' करूनसुद्धा माणूस हळहळतो; ह्याची मला खरी गम्मत वाटते.
लेखन आवडले !
हे ही वाचलं. खूप मनमोकळं
हे ही वाचलं. खूप मनमोकळं लिहिलय तुम्ही बेफी.
वाचताना बरेच विचार आले डोक्यात.. पण एक गोष्ट पक्की जाणवली की तुम्ही तुमच्या भावनांशी, लेखाशी आणि सर्वात जास्त स्वःताशी प्रचंड प्रामाणिक आहात.
या प्रकरणातले १-२ नकारार्थी मुद्दे सुद्धा तुम्ही सुरेख पद्धतीने मांडले आहेत.
सीमा गैलाड पेक्षा ही स्त्री अगदीच सो सो आहे असे वाटते.
बेफिकिर, >> नेहमीप्रमाणेच
बेफिकिर,
>> नेहमीप्रमाणेच आपला प्रतिसाद माझ्या कथेपेक्षा जास्त भाव खाऊन गेला
अहो, प्रतिसादाचं श्रेय कथेला आहे.
कारण कथा विचारचक्रास चालना देणारी आहे. अशाच कथा वाचायला मिळोत!
कळावे लोभ असावा.
आपला नम्र चाहता,
-गामा पैलवान
पुरुष स्त्रीच्या प्रेमात पडतो
पुरुष स्त्रीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या स्त्रीपेक्षा स्वत:च्या प्रेमात अधिक पडलेला असतो. खरंय का हो? >>>>
OMG...... Bummer !
रहस्य असलं की स्त्री अधिक
रहस्य असलं की स्त्री अधिक खुलून दिसते
खूप जबरदस्त लिखाण आहे तुमचं. कधी न कधी मायबोलीमुळे तुमच्याशी ईभेट झाल्याचा अभिमान वाटेल.
नियोजनाला घटकाभर आपला सर्वात
नियोजनाला घटकाभर आपला सर्वात जवळचा शत्रू मानून बघा, आयुष्य साष्टांग नमस्कार करावासा वाटावा इतकं आनंददायी होतं! >>> पुर्णसहमत!!!
बाकी सर्वांशी सहमत..!!!
धन्यवाद!!
छान कथा...
छान कथा...:डोमा:
धन्यवाद लोकहो
धन्यवाद लोकहो
टॉप !!
टॉप !!
भरत मुनोतचा उल्लेख भरतभाई असा
भरत मुनोतचा उल्लेख भरतभाई असा करायला नको होता, कारण मग ऋत्विका मुनोत सोबत वहिनीचं नातं होईल.