वाचून नाही होत ती कादंबरी आहेस तू

Submitted by बेफ़िकीर on 3 December, 2011 - 02:42

===============================

खुलते तुझ्या रंगात ती अलवार साडी नेस तू
झटकायला येऊन जा गच्चीत ओले केस तू

कोणी घडी मोडायची करणार नाही धाडसे
माझी गझल नेसेल इतकी भरजरी आहेस तू

एकेक पानाची नशा कित्येक वर्षे राहते
वाचून नाही होत ती कादंबरी आहेस तू

हज्जारदा शोधूनही मी सापडत नाही मला
तेव्हा कुठे मी भेटतो जेव्हा मला दिसतेस तू

हे सांग ना, म्हणतेस तितकी जर खरी आहेस तू
त्याची तरी आहेस का ज्याच्या घरी आहेस तू

================================

अजून ती तिथेच राहते म्हणे
अजून केशरात नाहते म्हणे

उदास चेहरा करून हासते
मनातल्या मनात साहते म्हणे

तिच्या कणाकणातली अभेद्यता
अजूनही हवेत वाहते म्हणे

स्वतःच संपवून टाकले तरी
स्वतःच रोज वाट पाहते म्हणे

तुझी मजा करून गाजले जगी
तुझेच 'बेफिकीर' चाहते म्हणे

-'बेफिकीर'!

================================

गुलमोहर: 

खुलते तुझ्या रंगात ती अलवार साडी नेस तू
झटकायला येऊन जा गच्चीत ओले केस तू..>>>..सॉलिड मतला.. सुटे मिसरे तर जबरीच

एकेक पानाची नशा कित्येक वर्षे राहते
वाचून नाही होत ती कादंबरी आहेस तू>>> आ हा हा ..जबर

================================

अजून ती तिथेच राहते म्हणे
अजून केशरात नाहते म्हणे>>>> मिसरे भिन्न वाटले... अजून ती तशीच राहते म्हणे..असेही वाचून पाहिले

उदास चेहरा करून हासते
मनातल्या मनात साहते म्हणे>>>>>तुम इतना जो मुस्कुरा रहे हो...आठवली

स्वतःच संपवून टाकले तरी
स्वतःच रोज वाट पाहते म्हणे>>>>काय ते स्पष्ट नाही होत

तुझी मजा करून गाजले जगी
तुझेच 'बेफिकीर' चाहते म्हणे>>>क्या ब्बात..बढिया

...............................................................
अप्रतिम शेर

शुभेछा Happy
..................................शाम

?????

एकेक पानाची नशा कित्येक वर्षे राहते
वाचून नाही होत ती कादंबरी आहेस तू

कोणी घडी मोडायची करणार नाही धाडसे
माझी गझल नेसेल इतकी भरजरी आहेस तू

अप्रतिम !!

तिच्या कणाकणातली अभेद्यता
अजूनही हवेत वाहते म्हणे

एकदम वेगळा!!! आवडला...

निव्वळ अफलातून...
बेफी... कधीकधी असं वाटतं... तुमचा निवांत मूड लागला कि तुमची खरी ताकद ही अशी समोर येते. तुम्ही ग्रेट आहातच. असाच मूड नेहमी लागत राहो ही सदिच्छा ! Happy

दोन गझलांच कॉकटेल... नवीन प्रयोग का हा ? ( सिरीअसली विचारतोय बेफीजी )

सर्व शेर आवडले.
तुमच्या हल्लीच्या गझला फार आवडतात मला.

स्वतःच संपवून टाकले तरी
स्वतःच रोज वाट पाहते म्हणे

कातिल.

(बाकी हा गझल-युग्म उपक्रम मलाही कळला नाही.)

Happy ज्ञानेश आणि किरण्यके, तसे काही नाही. दोन चार फुटकळ शेर असतील तर ते आपले गझलेबरोबर वेगळे लिहिले इतकेच!

सर्व प्रतिसादकांच्या दिलखुलास प्रतिसादांसाठी मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

इतकी सुरेख गझल कि शब्दच नाही खूपच सुरेख. माझ्या डोळ्या समोर तर ती व्यक्तीच आली...खुलते तुझ्या रंगात ती अलवार साडी नेस तू.

एकेक पानाची नशा कित्येक वर्षे राहते
वाचून नाही होत ती कादंबरी आहेस तू>>>>>>>>. क्या ब्बात है! जबरदस्त शेर! फार्फार आवडला!...खरच त्या नशेला व्याख्येत उतरवणारे तुम्हीच! Happy हॅट्स ऑफ! Happy

स्वतःच संपवून टाकले तरी
स्वतःच रोज वाट पाहते म्हणे>>>>>>>> स्त्रीसुलभ स्वभाव दुसरं काय?? Happy

तुझी मजा करून गाजले जगी
तुझेच 'बेफिकीर' चाहते म्हणे>>>>>>> मस्त! मस्त! मस्त!

खुलते तुझ्या रंगात ती अलवार साडी नेस तू
झटकायला येऊन जा गच्चीत ओले केस तू

एकेक पानाची नशा कित्येक वर्षे राहते
वाचून नाही होत ती कादंबरी आहेस तू

हा$$य! मार डाला!
वाचून झाल्यावर मी आता कम्प्युटर बंद करतोय! यापेक्षा आणखी सुंदर/अप्रतिम पुढे काही वाचायला मिळेल असे वाटत नाही. तो कागद खरंच, किती भाग्यवान!, ज्यावर हे सुंदर शब्द आपण लिहले आहेत.
अभिनंदन!

एक शेर अ‍ॅड केला.

हे सांग ना, म्हणतेस तितकी जर खरी आहेस तू
त्याची तरी आहेस का ज्याच्या घरी आहेस तू

वाचकांचा आभारी आहे

स्वतःच संपवून टाकले तरी
स्वतःच रोज वाट पाहते म्हणे... आह ! दर्द है !!