एक स्वप्न साकारतंय - स्वदेश परतीचं

Submitted by sudu on 17 August, 2008 - 12:18

स्वप्न अमेरिकेचे

जून १९९७ ची एक रात्र. चेन्नईतल्या महाराष्ट्र मंडळाच्या हॉस्टेलमधून नुकताच फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो होतो. दमट, गरम, खारट हवेने हैराण होत आम्ही तिघं मित्र नवीन गाव, भाषा, "भातमय' जेवण आणि नवीन सॉफ्टवेअर कंपनी या सगळ्यांशी ऍडजस्ट करत नवीन येणाऱ्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत, एकमेकांची चेष्टा करत दिवस काढत होतो. अभी गोवेकर, विवेक दिल्लीकर आणि मी पुणेकर. घरचं भाडं जाऊन जेमतेम बचत व्हायची. तेव्हा आय.टी.मध्ये सध्यासारखे भक्कम पगार नव्हते. त्यात किचनमध्ये लाईट गेलेला आणि रॉकेलच्या स्टोव्हचा वास, त्यामुळे आमचं रात्रीचं जेवण बहुधा बाहेरच असायचं.
शेजारच्या सर्वांन्न भवन खानावळीत डोसा, सांबार, पायसम चोपून खायचं, झोपण्याआधी गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीवर बसून कधी गप्पा, कधी गाण्याच्या भेंड्या, तर कधी एकमेकांची थट्टामस्करी करत तारे बघत पडायचं, असा आमचा दिनक्रम होता. पण रात्री चेन्नई एअरपोर्टहून विमानं उडायला लागली, की डोक्‍यातली चक्रं चालू व्हायची. विमानाचे ते लुकलुकते दिवे त्या टिमटिमत्या ताऱ्यांच्या बॅकड्रॉपवर नाक उडवून ऐटीत निघून जाताना दिसली, की आमच्या रंगलेल्या गप्पा बंद व्हायच्या. तशातच शांतता भंग करत तिघांपैकी कोणीतरी ""कब जायेंगे यार यूएस को? आय कॅन नॉट वेट नाऊ!'' अशी कळ लावून जायचं. नंतर गप्पांना मूड नसायचा. मग मी जड मनाने गंजलेल्या जिन्यावरून खाली उतरून आणि अंगाला ओडोमॉस चोपडून अमेरिकेच्या स्वप्नांमध्ये रात्रभर हरवून जायचो.
उगवलेला दिवस मात्र रोजसारखाच अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा आणि मी ऑफिसच्या तयारीला लागायचो.

हे यूएसला जायचं भूत माझ्या डोक्‍यात बरीच वर्षं होतं... अगदी एक्‍क्‍याण्णव मध्ये मुंबईला शिकायला आल्यापासून. तसा मी अकोल्याचा... आय मीन नागपूरचा... नाही खामगावचा... छे छे नांदेडचा... छे... आयडेंटिटी क्रायसिस झालाय राव.... बाबा बॅंकेत असल्यामुळे दर दोन-तीन वर्षांनी बदली व्हायची. नवी शाळा, नवीन घर, नवे मित्र. या चेंजचीच नंतर सवय झाली. ऍडिक्‍शन झालं म्हणाना. बारावीला अकोल्यात असताना मला मुंबईचं प्रचंड वेड होतं. अमिताभ राहतो त्या जागी इंजिनिअरिंगला जायचा मनसुबा होता. अशी स्वप्नं घेऊन ऍक्‍टर लोक मुंबईला येतात म्हणे. असो! इमानदारीत अभ्यास केला आणि मेहनतीचं फळ मिळालं. विदर्भाला मुंबईकडून सप्रेम भेट मिळालेल्या पाच ओपन सीटपैकी एक सीट मला व्हीजेटीआयमधल्या प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंगकरता मिळाली... डोक्‍यातला यूएसए टायमर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षी वाजला. सीनिअर कॉम्प्युटर सायन्सच्या मित्रांकडून कळायचं, की अमेरिकेत जायचं तर फाडफाड इंग्रजी यायला हवं आणि "see' यायला हवं. त्याला "c' म्हणतात हे नंतर समजलं. मी अस्सल मराठीतून शिकलेलो. आता नवीन भाषा शिकणं आलं - बोली इंग्लिश आणि "सी'.

मी प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंगच्या गरम प्रयोगशाळेत भल्या मोठ्या मशिन्सवर घाम टिपत काम करत होतो. पण मनाच्या कोपऱ्यात मात्र त्या एअरकंडिशन्ड खोलीतला छोटासा संगणक मला सारखे 'कूल कॉल' देत होता. इंजिनिअर बनलो आणि पुणेकर व्हायचं ठरवलं. प्रॉडक्‍शन इंजिनिअर्सची पंढरी - टेल्कोमध्ये चिकटलो; पण यूएस अँड आयटीचं खूळ काही डोक्‍यातून गेलं नव्हतं. तेव्हा नुकताच पुण्यात सी-डॅकचा डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग सुरू झाला होता. मी नोकरीला रामराम ठोकला आणि सी-डॅकची पायरी गाठली. माझी दुसरीच बॅच. त्या वेळी सॉफ्टवेअर ट्रेनिंगचं एवढं पेव फुटलं नव्हतं आणि पुढे नोकरीची शाश्‍वतीही नव्हती. पण मोठा भाऊ खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आणि मी हिंमत केली. जो होगा देखा जाएगा!

आणि मग आले ते मंतरलेले दिवस, प्रोग्रॅमिंग करताना मी हरवून जायचो. एखाद्या लहान मुलाला जर त्याचं खूप आवडीचं खेळणं दिलं तर तो कसा हरवून जातो तस्सच. मॅजिकल... फंडू. ट् रेनिंगचे सहा महिने कसे गेले कळालं पण नाही. कोर्स संपल्यावर पुढील दोन वर्षं भारतीय आयटी कंपनीतून अनुभव घेत चेन्नईला पोचलो. पाण्याच्या टाकीवर, यार दोस्तांबरोबर, घिरघिरणारी विमानं आणि अमेरिकेची स्वप्नं पाहत.

स्वप्नातल्या देशात, यूएसमध्ये अखेरीस डॉट कॉम बूम झाला आणि आमची स्वप्नपूर्ती झाली. एकापाठोपाठ एच १ बी व्हिसा घेत आम्ही तिघंही कॅलिफोर्नियाला पोचलो... स्वप्नातल्या जागी. आमची चेन्नईची गॅंग आता सनिवेलात जमली. आता नवीन घरी रॉकेल स्टोव्हच्या जागी कुकिंग रेंज आली, पायी-गाडीच्या ऐवजी मोटारगाडी आली. व्हॅक्‍युम क्‍लिनर, डिशवॉशर आले. सगळ्या अद्ययावत सोयी होत्या. भांडी कोणी घासायची आणि घर कोणी झाडायचं हे वाद आता कमी व्हायचे. आता स्वीमिंग, टेनिस, हायकिंग, मूव्हीजला बराच वेळ मिळायला लागला. आमची मैत्री पण अजून दृढ झाली. खरंतर आमच्यात बरेच फरक... अगदी भाषेपासून ते खाण्याच्या सवयीपर्यंत. पण एक धागा आम्हाला धरून होता- स्वप्नांच्या क्षणी एकमेकांकडून मिळालेल्या साथीचा आणि त्यातून निर्माण झालेल्या स्नेहाचा, आठवणींचा.

काळ बदलत होता.
"तुम्हाला गव्हर्न्मेंट कॉलेजमधून शिकून यूएसला नोकरी करताना लाज कशी वाटत नाही?" असा युक्तिवाद करणारे "जीवलग' स्वतःचा बायोडाटा देऊन यूएसमध्ये नोकरी शोध म्हणायला लागले होते. इकडे मंडळी फटाफट लग्नाचे बार उडवून आमचं अपार्टमेंट रिकामं करत होती. मलासुद्धा अमेरिकेतल्या एकटं जगण्याचा कंटाळा आला होता. आपलंस, ज्याच्याकरिता ऑफिसमधून घरी जायची ओढ लागेल असं कोणीतरी मलाही हवं होतं. शेवटी मी खडा टाकला.

आई, मी "स्पेसिफिकेशन्स' पाठवतो तश्‍शी बायको शोधून दे. माझी स्पेसिफिकेशन्स पण काय हो... टिपिकल... सुंदर, सोज्वळ, सुशिक्षित, मनमिळाऊ, लांब केस... वगैरे. डॉक्‍टर आणि त्यात आर्टिस्टिक असेल तर काय... सोने पे सुहागा आणि कमाल म्हणजे मिळाली... अगदी हवी तश्‍शी... आणि त्यात मुंबईकरीण... डॅशिंग. म्हणजे मी अभिमानानं म्हणतोय हो. उगाच गैरसमजुती नकोयत.

संसार सनिवेलात सुखात सुरू झाला. एकमेका साह्य करू दोघे करू "मार्स्टस' धर्तीवर, सौ आणि मी एमएस आणि एमबीए केलं. दोघांची शिक्षण संपली आणि तोवर आम्ही "हम दो हमारे दो' झालो होतो.

एव्हाना नोकरीत स्थैर्य आलं, कॉन्फिडन्स आला, जिवाची अमेरिका करून घेतली, चार गाड्या बदलल्या, सॉफ्टवेअरमधून बिझनेस मॅनेजर म्हणून उडी घेतली. सौं'नी सक्‍सेसफुल योगा बिझनेस सुरू केला. छान हवा, पाणी, निसर्गरम्य देखावे, जगभरातले क्‍युझइन्स, मुलांसाठी बेस्ट शाळा, खूप जीवलग मित्र, मोठाल्ले पब्लिक पार्क्‍स, पब्लिक लायब्ररीज, झक्कास जॉब, दिमतीला वर्ल्डक्‍लास गाड्या... सगळं छान होतं. नथिंग टू कम्प्लेन अबाऊट. बट...

इंडियन ड्रीम

हे सगळं असतानादेखील काही तरी मिसिंग आहे, असं सारखं वाटायचं. आपलं शब्दकोडं सुटलं नाही की चुकचुकल्यासारखं वाटत राहतं ना तसंच काहीसं. खरं तर आयुष्याच्या कोड्याची बरीच उत्तरं सापडलेली होती. बायको, मुलं, घर, नोकरी, स्टॅबिलिटी, मॅच्युरिटी, कॉन्फिडन्स वगैरे. पण मन मात्र भारतातच राहिलं होतं.

दर वेळी भारतात गेलो, की वाटायचं, की परत येऊच नये. खरं तर सिलिकॉन व्हॅलीत राहणं म्हणजे स्वच्छ सुंदर पुण्यात राहण्यासारखंच आहे. पण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहूनदेखील जशी 'घरी' जायची ओढ लागते ना तसं वाटायचं. भारतातील धूळ, गर्दी, अस्वच्छता, ध्वनिप्रदूषण हे जाणवायचं. पण इथं खूप आपलेपण, आपुलकी, प्रेम, जिव्हाळादेखील जाणवायचा.

अमेरिकेत माणसं दिसायची खोटी! सगळीकडे गाड्या पाहून जीव उबायचा - छोट्या, मोठ्या, स्वस्त, महाग, जॅपनीज, जर्मन, हम्मर, हायब्रीड. कोणाला भेटायचं म्हणजे अपॉइंटमेंट घेणं आलं. तसा मी काही फार लोकंवेडा आहे अशातला प्रकार नाहीये; पण आपल्या 'स्पीसीज' मध्ये राहायला आवडतं. कार्सच्या इंडिव्हिज्युअलिस्टिक कृत्रिम जगात विचित्र वाटायचं. इथून आई-बाबा "तुमचं करिअर सांभाळा, आमच्याकरता कॉम्परमाईज करून भारतात येऊ नका" असा प्रेमापोटी (पण माझ्या दृष्टीने रुक्ष) सल्ला द्यायचे. तसं करिअरचं म्हणाल तर आम्हा दोघांना भारतातही जबरी स्कोप आहे. "आफ्टर ऑल वुई आर द सेकंड फास्टेस्ट ग्रोईंग नेशन इन द वर्ल्ड!' एक महासत्ता बनण्याच्या मार्गावर.

मी परदेशी गेलो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता आम्हा परतणाऱ्या भारतियांवर ऑपॉर्च्युनिस्ट हा शिक्का मारणं सोपं आहे. मात्र, परदेशस्थ भारतीयांनीही भारताच्या प्रगतीला फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि क्रॉस पॉलिनेशन ऑफ आयडियाजतून हातभार लावलेला आहे, ही विचाराची बाब आहे.

मार्च २००८ - आम्ही अमेरिका सोडली

शेवटी आम्ही ठरवलं - फॉलो द हार्ट. भारतात परतायलाच हवं. नाऊ ऑर नेव्हर. जोवर मुलं लहान आहेत तोवर ते शक्‍य होतं. मोठी झाली, की त्यांची ओपिनियन्स फर्म होतात, अमेरिकन कम्फर्ट झोनमध्ये जातात. पालकांना धमकावतात, की अमेरिकेतच राहायचंय आणि नंतर रुखरुख लागून राहते, की लवकर जायला हवं होतं. (मित्रांच्या अनुभवाचे बोल). डोकं अमेरिकेत, तर हृदय भारतात अशा त्रिशंकू राहण्याचा पण कंटाळा आला होता. तर फायनल एका वर्षाचं प्लॅनिंग आणि एका दशकानंतर मार्च २००८ ला परतलो. फॉर गुड.

आम्ही अमेरिकेतलं समृद्ध आयुष्य सोडून काय मिळवलं...

दोन महिने भारतात रुळल्यावर मुलांनी परवा चक्क मराठीत माझ्याशी बोलायला सुरवात केली आणि मला चक्कर आली. संस्कृत श्‍लोक म्हणून दाखवले तेव्हा भरून आलं. खरं तर मी जसा मराठी "ओन्ली' शाळेत शिकलो तसंच माझ्या मुलांनीही शिकलं पाहिजे अशा मताचा मी नाहीये. त्यांनी 'वर्ल्ड सिटिझन' व्हायला हवं आणि 'सुसंस्कृत' होण्याकरिता संस्कृत श्‍लोकच म्हटले पाहिजेत या विचारांचा तर अजिबात नाहीये. पण आपण ज्या भाषेत, ज्या लोकांत, ज्या विचारात, ज्या वातावरणात वाढलो तेच अनुभव जर मुलांना मिळाले तर छान वाटतं. हा आमच्या 'कम्फर्ट'चा प्रश्‍न आहे. इतर एनआरआयइजला असाच अनुभव यायला हवा, असा हट्ट तर मुळीच नाही. जर कोणी म्हटलं, "आम्हाला काही परत जायचं नाहीये भारतात" तर वुई कम्प्लिटली अंडरस्टॅंड देअर पर्स्पेक्‍टिव्ह.

मुलं मात्र खूप खूष आहेत. नातेवाइकांत राहून, खूप मित्रांमध्ये खेळून आणि आजी-आजोबांच्या अटेन्शनमध्ये ती 'ऐष' करतायत. त्यांना घरबसल्या आजी-आजोबा मिळाले आहेत आणि आई-बाबांना नातवंडं. घर आता भरून गेलंय. आणि त्यात हापूसचे आंबे, मॉन्सूनचा पाऊस, सिंहगडावर हाईक आणि नंतर झुणका-भाकरी, घरकामाला मदतीचा हात, बादशाहीचं जेवण (हो मला आवडतं!) पहिल्या पावसानंतरचा आपलासा वाटणारा सुवास, भाजी बाजारात जाऊन भाव करण्याची इच्छापूर्ती (सौंची, माझी नव्हे.) हे सगळं अमूल्य. प्राईसलेस.

कळत-नकळत मन मात्र तुलना करत असतं. "मै और मेरी तनहाई, अक्‍सर ये बातें करते है, यूएस मे होता तो कैसा होता?". सिग्नल बंद पडला तरीही चौक 'तुंबले' नाहीत आणि ग्रीन सिग्नल पडताच मागून हॉर्न देऊन उगाच 'हॉर्नी'पणा केला नाही, तर काय मजा येईल राव! परवा दत्तवाडीतून जाताना दुमजली इमारतीएवढ्या लाऊडस्पीकरने मी उडालो... लिटरली!
नुकताच आरटीओत एजंट न वापरता जायचा हौशी उपक्रम केला. माझ्या इंडियन लायसेन्सवरील पत्ता बदलायचा किरकोळ हट्ट होता. तीन फॉर्म्स, चार तास, पाच खिडक्‍या आणि शिव्यांची लाखोली वाहत रिकाम्या हाताने परतलो. त्यात मी विसरलेलो, की सौपण सोबत होती. "तुझा भारतात परतल्यापासून तोंडावरचा ताबा सुटलाय. जरा शिव्या कमी कर'' हा सल्लाही मिळाला. नशिबाने मुलगा सोबत नव्हता नाहीतर त्याने "व्हॉट डिड बाबा से आईऽऽऽ?'' असा सवाल करून मला प्रॉब्लेममध्ये टाकलं असतं. शेवटी सौने माझा वीक पॉइंट... उसाचा रस... बिगर बरफ, प्यायला घालून माझं डोकं आणि पोट थंड केलं.

अमेरिकेत पर्सनल लायबिलिटी, प्रॉपर्टी राइटस, राइट टू इन्फॉर्मेशन, लॅक ऑफ करप्शन (किमान सामान्य माणसाकरता तरी), वक्तशीरपणा, स्वच्छता आणि पॅडस्ट्रियअन राइट ऑफ वे (पादचाऱ्यांना आधी रस्ता द्या) याची इतकी सवय झालीय की खरं सांगतो त्याची पदोपदी आठवण होते. रस्त्यावरून चालताना तर अगदी... 'पदो...पदी.'

मी आणि सौ प्रत्येक आल्या दिवशी ऍडजस्ट होतोय. इथली माणुसकी, आपलेपण, गोडवा, जिव्हाळा यांनी बहरतोय, तर इतर काही गोष्टींनी कोमेजतोय. "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है" हा शाहरुखचा बोध मला पटलाय. पण आता एनआरआयचा मुखवटा उतरवून, नॉर्मल वावरायचं आहे. 'आपल्याकरता', 'आपल्यांकरता' जगायचं आहे. नाटकं पाहायची आहेत, सामाजिक कामात भाग घ्यायचा आहे. आई- बाबांसोबत राहायचं आहे, टोटल बीस साल बाद! परवा आम्ही हाताने आधार देत बाबांना पर्वतीवर घेऊन गेलो तर काय खूष होते. अपार्टमेंटच्या वॉकिंग ट्रॅकला प्रदक्षिणा मारायचा कंटाळा येतो म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताजेपणा पाहून आम्हाला अमेरिकी आठवणींचा विसर पडला. थोडा हारकर भी हमने बहोत कुछ पाया था.

म्हणतात ना, "इरादे नेक हो तो सपने भी साकार होते है..." आमचं पण स्वदेशपरतीचं स्वप्न हळूहळू साकारतंय. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.

*** सध्या अमेरिकि-नोकरीतुन भारतात बदलीच्या ट्रान्झिशनमध्ये आहे. So far, so good. भारतात नोकरीच्या अनुभवावर स्वतंत्र लेख लिहायचा बेत आहे. Coming soon in theaters near you***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुदर्शन. तुमची पोस्ट/ प्रतिसाद आवडले. आम्हीही परतण्याच्या विचारात आहोत. त्यामुळे तुम्ही सुचवलेल्या मुद्द्यांवरच विचारमंथन सुरू आहे.
माझी मुलगी ७ वर्षाची आहे. ती भारतात कशी adjust होईल असा प्रश्न पडला होता. पण तुमची पोस्ट वाचून बराच दिलासा मिळाला.
आमच्याकडे अमेरिकन नागरिकत्व नाही. आणि ते इतक्यात मिळण्याची काही शक्यताही नाही. त्यामुळे परत येण्याचा चान्स मिळणे अवघड आहे.
पण भारतात राहून अमेरिकन कंपनीतला जॉब टिकवून ठेवायला मात्र जमेल असं वाटतयं.

अमेरिकन कंपनीतला जॉब टिकवून नक्कीच सोप्पं होईल.
७ वर्ष वय म्हणजे लगेच तिला आपलस होईल. मोठ्या लोकांना जास्त त्रास होतो ऍडजस्ट व्हायला. खेळायला लहान मुलं आहेत हे पाहून राहायची जागा घ्या म्हणजे 'नो प्रोब्लेमो'

' फायनान्शियल इंडिपेन्डेन्स ' हा भारत परतीचा सगळ्यात मोठा फायदा (परदेशी तुम्ही बचत केली आहेत व योग्य वेळी राहणेबल घर घेतला आहेत हे गृहित धरून). भारत परतीनंतर मागल्या ९ वर्षात आम्ही प्रत्येक वर्षी नवीन देश पाहतो (आधी नवीन अमेरिकन स्टेट पाहायचो), कॉलेजात शिकवतो, पुस्तक लिहितो , गाणं शिकतो, नाच शिकतो, बाकी बानगडींना बराच वेळ मिळतो (अमेरिकन कंपनीत नोकरी टिकवून ... जी संध्याकाळी असते).

नीट प्लॅन केलात, पोषक वातावरण निर्मिती केलीत तर नक्कीच होऊ शकत (राहणेबल घर व मुलांसमोर भारताबद्दल सकारात्मक विचार महत्वाचे).
सदिच्छा !
सुदर्शन

>>कॉलेजात शिकवतो, पुस्तक लिहितो , गाणं शिकतो, नाच शिकतो, बाकी बानगडींना बराच वेळ मिळतो >> त्याचं काय? हे सगळं बाहेर राहूनही करायला भरपूर वेळ मिळतो. मुळात इंटरेस्ट हवा.

>>>Stay on US pay, India stay as much as possible.

हाहाहा, You want best of both the worlds. Anyway, to each his own.

भारतात रहाणेबल घर घेतलं होतं. पण सध्या ते तितकसं रहाणेबल वाटत नाही. नवर्‍याच्या ऑफिसपासून बर्‍यापैकी लांब पडणार आहे.
अमेरिकन जॉब टिकवला तरी त्या कंपनीचं भारतात ऑफिस असल्याने नवर्‍याला अठवड्यातले काही दिवस तरी ऑफिसला जायला लागेल असं वाटतयं. भारतात राहून अमेरिकन पगार मिळण्याचीही फारशी शक्यता नाही. त्यामुळे financial independence काही फार मिळेल असं वाटतं नाही. Happy
मुलांसमोर भारताबद्दल सकारात्मक विचार महत्वाचे > हे मात्र सतत करत असतो. त्यामुळे अजून तरी मुलीला भारतात जायला आवडतं. पण नुसतं सुट्टीला जाणं वेगळं आणि तिथल्या शाळेत जाऊन शिकणं वेगळं.

https://www.maayboli.com/node/46315 ही माझी ४ वर्षापूर्वीची पोस्ट. त्यानंतर तिथे अजून दीड वर्ष राहिलो. ग्रीन कार्ड सोडायचं नव्हतं
त्यामुळे परत आलॉ इथे.
परत जायचं आहे, मुलं अजुनही रागावतात का परत आलो अमेरिकेत म्हणून. दर्वर्षी भारतात सुट्टीला गेले की परत येताना त्रास देतात. त्यामुळे परत जायचं आहे. मुलं लहान असतना त्यांना आजारपनाचा खूप त्रास व्हायचा भारतात. आता कमी होत आहे. अजून दोन वर्षात जायची इछ्छा आहे.
कुणी हसतं, म्हणतं नाही जाणार तुम्ही. मीही सोडून देते, कारन तेव्हा काय परिस्थिती असेल कोणी सांगावं. असो. अपलं घर, नोकरी असली की त्रास कमी असतो. नाहीतर कुणाकडे राहायचं म्हटलं की खूप व्याप होतात. एक वर्ष लागतं सेट व्हायला. आणि हो आपली गाडीही हवी. रिक्षा किन्वा लोकांवर विसंबून नको राहायला मग सोप्पं पडतं.

रिक्षा किन्वा लोकांवर विसंबून नको राहायला मग सोप्पं पडतं. >> मला भारतात गेल्यावर public transport ने प्रवास करायला फार आवडतं. मी बरेचदा बस/ रिक्षा/ ट्रेन ने फिरते पुण्यात आणि मुंबईत. एवढ्या traffic मधे स्वतःची कार चालवायची माझी मुळीच हिंमत होत नाही.
अर्थात सुट्टीवर असल्याने specific वेळेला पोचायचं बंधन नसतं. Rush hours टाळून घराबाहेर पडलं तरी चालतं.
मात्र तिकडे जाऊन रहायचे तर सुट्टीसारखं relaxed schedule नसणार ह्याची जाणीव आहे.

बिग नो नो फॉर रश आवर ट्रॅफिक. म्हणून अमेरिकन नोकरी पडते.
बहूतांश घरून काम होत. ऑफिसला जायच का तर, घरी कल्ला झाला तर, किंवा कंटाळा आला तर.
दुपारी ३-४ ला जायचा आणि ११-१२ ला परत. थोडा आपल्याला चेंज होतो आणि थोडा घरच्यांना (घरचीला) !!
दिवस भर बाकी भानगडीला मिळतो. ते अमेरिकेत मिळतो त्यापेक्षा वेगळ आहे.
पण तुम्ही, घरचे खुश नसाल तर मुळीच परत येऊ नका. अमेरिका इस ऑफकोर्स अमेझिंग.

तुम्ही काय करावे, काय करू नये, हे मी तरी सांगू शकत नाही. पण माझा अनुभव सांगतो. लांबलचक प्रतिसादाबद्दल क्षमस्व. (हा प्रतिसाद आधी मिपाच्या या धाग्यावर दिला होता.)

मुळात "भारतीय" म्हणजे काय, याच्याबद्दलच माझ्या मनात संभ्रम आहे. केवळ भारतात जन्मलो, म्हणून मी भारतीय असे मलातरी वाटते. भारतात वाढलो, तिथल्या गोष्टींची मला सवय आहे, तिथे (जवळजवळ फुकटात) शिक्षण झाले त्याबद्दल आदर आहे, तिथले जेवण मला आवडते वगैरे वगैरे. पण खरं सांगायचं तर मी इतर कुठेही जन्मलो असतो (अमेरिका असो वा पनामा), तर माझ्या जन्मभूमीबद्दल आणि कर्मभूमीबद्दल मला असेच वाटले असते, याबद्दल मलातरी शंका नाही. मी बरेच वर्षे हॉस्टेलवर राहिलो (आई-वडील आणि नातेवाईकांपासून दूर), कामानिमित्त बरेच वर्षे फिरतीचा प्रवास असे, त्यामुळे "आपल्या" लोकांबद्दल फारशी ओढ नाही. जे सोबत आहेत, तेच मित्र आणी तेच नातेवाईक अशी वृत्ती झाली. कदाचित त्यामुळेच भारत हा "सोईस्कर देश" इतपतच प्रेम वाटते, पण पराकोटीचा अभिमान वगैरे काही वाटत नाही. तसेच, अमेरिकेलाच काही सोनं लागलं आहे, असे पण वाटत नाही. उद्या गरज पडली किंवा आवडले तर स्कँडेनेवियन देशात राहायची तयारी आहे आणि साउथ अमेरिकेत एखाद्या भारताहून गरीब देशाची पण तयारी आहे. आहे त्या परिस्थितीत समाधान मानायची तयारी असली आणि नावडत्या परिस्थितीतून मार्ग काढायची तयारी असली की त्रास होत नाही. मी या मताचा आहे. (आरक्षण या निव्वळ एका कारणासाठी भारताबाहेर वास्तव्य करावे असे माझे स्पष्ट मत आहे. भारतामधील जीवघेणी स्पर्धा, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार आणि आरक्षण यांच्या जाळ्यात तुमच्या मुलांना टाकावेसे वाटते का, याचा विचार प्रत्येक पालकाने केला पाहिजे. सर्वत्र टीका होत असली तरीही भारतात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते, असे माझे मत आहे. पण तरीही इतर बाबींचा विचार केला तर भारताबाहेर पडणे तितकेसे वाईट नाही. असो, तो मुद्दा वेगळा आहे.)

शिक्षण झाल्यावर मी भारतात नोकरी केली. सरकारने माझ्यावर इतका पैसा खर्च केला, सगळेच जर परदेशात गेले तर कसं काय होणार वगैरे विचार तेव्हा मनात होते. रग्गड पैसे मिळत होते, भारताबाहेर जायची गरजच न्हवती. हळूहळू मतपरिवर्तन होऊ लागले. कामानिमित्त चपराशापासून ते आय.ए.एस.पर्यंत सगळ्यांना पैसे चारून झाले. एकसे एक दिव्य अश्या बॉसबरोबर काम करून झाले, खिशात पैसे असूनही रेल्वेची तिकिटे मिळत नाहीत म्हणून "जुगाड" केले, "चलता है" म्हणणार्‍या सप्लायर्सचे लाड पुरवून घेतले. ( मी भारतातल्या इंफ्रास्ट्रक्चरबद्दल काही म्हणत नाहीये. भारतात राहाणार्‍यांनी धूळ आणि गर्दीबद्दल कितीही नावे ठेवली तरी इतरांनी जराही काही म्हणले की आवडत नाही, असा अनुभव आहे आणि त्यामुळे मी बोलतही नाही.) मग मनात विचार आला, की आज मी तरुण आहे, लग्न झालेलं नाही, पण हे असं किती दिवस चालणार? आपल्याला आयुष्यभर हे जमणार आहे का? आवडणार आहे का? मग मी भारताबाहेर पडण्याचा विचार केला. अमेरिकाच पाहिजे असं काही नाही, आधी ऑस्ट्रेलियाला प्रयत्न केला. सिंगापूर, मिडल ईस्ट, कॅनडा यांची पण तयारी होती. नोकरी इतक्या भरभक्कम पगाराची होती की दुसरे कुणी ऑफरच द्यायचे नाही.पण शेवटी बॉसला कंटाळून ३५% कमी पगारावर दुसरीकडे गेलो आणि मग तिथून परदेशात.

माझे काही मित्र अमेरिकेतून परत भारतात परत गेले आहेत. एकाने ६ वर्षात भरपूर पैसे कमवले आणि तो पुण्यात ४२ व्या वर्षी रिटायर झाला. अजून एक जण असाच पैसे कमवून आता मुंबईत नोकरी करतो, पण स्वतःच्या नियमानुसार. सकाळी ११ ते ८ अशी वेळ आहे, तर नेमक्या त्याच वेळात काम करतो. शनिवार-रविवार फक्त फॅमिलीसाठी. सांगायचे काय तर पुरेसे पैसे असले तर स्वतःच्या इच्छेनुसार जगता येते, मग ते भारतात असो किंवा अमेरिकेत किंवा अजून कुठे. माझ्या मुलीने सांगितले की तिला अ‍ॅकेडमीमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली पण तिला जायचे नाही, कारण तिथे फक्त अभ्यास आहे, तिचे आवडते पेंटिंग हा विषय नाही. मी म्हणालो, जायचे नसेल तर जाऊ नको. आम्ही घरी मराठी टीव्ही बघतो, भारतीय जेवण बनवतो, पण का? तर ते सहज जमते आणि सवय आहे म्हणून. "भारतीयत्व" जपण्यासाठी इथे कित्येक आई-वडील बळंबळं मुलांना टेंपलमध्ये नेतात, भारतीय कपडे घालायला लावतात, भारतीय जेवणच खायचे ही सक्ती करतात. अरे कशाला? मराठी शिकण्याऐवजी स्पॅनिश किंवा चायनीज (मँडॅरिन) शिकवा ना त्यांना. समरमध्ये अट्टाहासाने भारतातच जायचे त्यापेक्षा दुसर्‍या कुठल्या देशात सर्वांनी जा, असे माझे मत आहे. मुलांसाठी पुरेसे पैसे कमवले की त्यांना त्यांच्या मनासारखे शिकवता पण येईल, बरेच भारतीय-वंशाचे पालक, त्यांच्या मुलांना डॉक्टरच बनले पाहिजेस असे सांगतात, तसे तरी करावे लागणार नाही. शेवटी काय, प्रत्येक जण त्याच्या नशीबाने जगतो, योग्य दिशा दाखवणे इतकेच आपण करू शकतो.

थोडक्यात काय? फ्लेक्सिबल राहा. जिथे संधी मिळेल तिथे जा. आणि एकदा निर्णय घेतला की त्याबद्दल दु:ख करू नका कारण "त्या परिस्थितीत" तुम्ही "त्या वेळी योग्य" असा निर्णय घेतलेला असतो. कमी पैशाने त्रास जरूर होतो, पण उत्पन्न $७५,००० असले की आयुष्यातला आनंद फारसा वाढत नाही. मॅस्लोच्या पिरॅमिडप्रमाणे, एकदा बेसिक गरजा भागल्या की मग तुम्ही तुमचा जीवनातला आनंद (Self-actualization) कुठे शोधायचा ते ठरवा. तेच खरे समाधानी जीवन.

Boka +1

उपाशी बोका उत्तम पोस्ट !
इथल्या कुणालाही उद्देशुन नाही पण कुणाच जिसी झाल्, कुणि घर घेतल की" तुमच काय बरय, इथेच राहणार नक्की आहे आम्ही मात्र परत जाणार" अशा बाता मारणारे जेव्हा त्याच मार्गाने जातात तेव्हा हसुच येत मला...

बोका - छान लिहिल आहेस. तुझ मत पटलं.
जिथे राहाल तिथे खुशाल रहा.

मात्र भारत यायची ओढ लागली असेल, तर जरूर परत या.
मुलांच म्हणाल तर ग्लोबल सिटीझन झाल्या खेरीज पर्यंत नाही (जगाच्या कोणत्याही ठिकाणी राहात असाल तरी)

My new book is now available around the topic of R2I, American Dream and Marathi sentiments of parents left behind in India. Do consider reading it!
Love Trumps All! - Tale of Cultural Crossovers
❤❤❤❤❤
Five friends, five religions, five ideologies, five inseparable interwoven stories of transformation and self-discovery on a global stage.
A story that cuts across Y2K opportunities of the late 90s to the current backdrop of Trump election.


Anant Joshi, a dreamer who chases the American dream during Y2K rush and leapfrogs from a small Indian town to start-up innovative Silicon Valley venture.


Chris O’Brian, an energetic and creative high-tech sales leader from New York who is driven by his passion for life, creativity and making it big.
Sameera Qureshi, a young gynecologist from Hyderabad attending her medical residency in California, trying to find love and her true human identity.


Amy Cohen, a lively, articulate, compassionate pediatrician from Tel Aviv who is ready to ride on larger than life waves and build a legacy.


Madhura Sharma, journalist and social worker from Mumbai driven by her nationalistic ideals and drive to help others.


What happens when their paths intersect and blend amidst their divisions across nationality, religion, and ideals?
An interwoven story of these five unlikely friends, over two decades of tracing their paths and connecting their dots across the globe in Silicon Valley, New York, Mumbai, Pune, Hyderabad, Kathmandu and Khamgaon (small-town India full of youth with stars-and-stripes in their eyes) in a world powered by immigration and ‘reverse immigration’.


“Fresh global perspectives and zesty cross-cultural romance in a gripping plot with a twist in the tail!”

“A story of unification and humanism in times of growing divisions over religion and nationality”

Amazon https://www.amazon.com/dp/9352019911
Goodreads https://www.goodreads.com/book/show/36557578-love-trumps-all
#IndiaBornCEOs #AmericanDream #AmericaLovesTrump #LoveTrumpsHate #FirstWomanPresident
#Trump #AmericaFirst #MakeInIndia #Return2India #GlobalPolitics #LiberalMedia #NPR #GlobalCitizenship
#FourMoreYears #MakeAmericaCompetitiveAgain #WorldIsFlat #Humanism #HighTechCharity

आजच हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आहे.
First Impression: पुस्तकाचे मुखपृष्ठ तितकेसे आकर्षक नाही. Yin and yang ची सरळसरळ नक्कल मारली आहे ते कळून येते. कदाचित उद्देश तोच असेल, माहीत नाही.
लेखन सफाईदार वाटले नाही. पुस्तकात बरीच वाक्ये म्हणजे मराठीचे शब्दशः भाषांतर वाटले.
six months long trip is typically written as six month long trip.
अमेरिकेतल्या लोकांना मरीन ड्राइव्हचा फूटपाथ समजणार नाही, साईड वॉक कळेल.
So, now you find time to talk to me? A week before you leave?.... I guess you meant..(So now you found the time to talk to me? A week before you are leaving?) मग आत्ता वेळ मिळाला का माझ्याशी बोलायला? एक आठवडा जायच्या आधी?
११ वीच्या रॅगिंगमध्ये गुलाब देण्याबद्दल वाचून ऋन्मेषच्या ४ की ५ वर्ष सिनियर मैत्रिणीची आठवण झाली, हा एक विरंगुळा. Lol
इंग्रजी लेखनाचे उदाहरण म्हणून रोहिंग्टन मिस्त्री याची पुस्तके वाचावीत, असे मी सुचवीन.

प्रस्तावनेत वाचले की तुम्हाला १०००असे ४+ स्टार अभिप्राय मिळाले तर तुम्ही पूर्ण वेळ लेखन करणार आहात. राग नसावा, पण माझ्या मते नजीकच्या भविष्यात तरी शक्यता दिसत नाही.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

बरेच भारतीय-वंशाचे पालक, त्यांच्या मुलांना डॉक्टरच बनले पाहिजेस असे सांगतात>>>>>
अरे देवा... तिकडेही हेच? Happy

छान पोस्ट.

Pages