सदस्य प्रवेश |
तेच माझेकाल सत्यजीतच्या अकाउंटवर गजल गजल खेळण्याचा परिणाम आहे हा की काय कोण जाणे. उत्तररात्री जाग आल्यावर सुचलेलं देतोय खाली. ही गजल असते काय ? सूर माझा बिंब माझे शब्द त्यातिल भाव माझे शोधते काळीज जे जे पीळ हृदयाचेही माझे पाहणे स्वप्नातले हसण्यातले संगीत माझे ....................अज्ञात |
|
थोडा प्रयत्नं केल्यास हीच उत्तम गजल होऊ शकते, अज्ञात.
सूर माझा बिंब माझे शब्दं त्यातिल भाव माझे
गाल गागा गाल गागा गाल गागा गाल गागा (२८ मात्रा)
सापडेना ठाव काही हरवलेले गाव माझे
गालगागा गाल गागा गालगागा गाल गागा
आता ही जमी तयार झाली तर.
शोधते काळीज जे जे पीळ हृदयाचेही माझे
गालगा गागाल गा गा गाल गागागागा गागा (इथे हृदयाचेही मधे 'ही' ला गुटली खाल्ली. तिथे एक लघू मात्रा हवी. म्हणजे हृदयाचेच सारखा शब्दं)
ह्याची दुसरी ओळ शेवटी 'आव माझे' मध्ये संपायला हवी.
जसे- गाव माझे, भरधाव माझे, भाव माझे, नाव माझे, डाव माझे इ.
हाच नियम पुढल्या प्रत्येक शेराला लागू.
इथे मायबोलीवर एक गजल कार्यशाळा झाली होती. त्याची ही लिन्क (स्लार्टींनी दिलेल्या एका अभिप्रायातून)-
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/123104.html
तसच लघु-गुरू विषयी इतरत्र झालेली ही चर्चा (नचिकेत ने दिलेल्या एका अभिप्रायातून)-
http://www.marathigazal.com/node/542
अज्ञात तुम्ही अतिशय आशयघन लिहिता... व्याकरणाचं तंत्र सोडल्यास, गजलेचा आशयघनता हा आत्मा आहे. सुरेख गजला लिहू लागाल. खरच सुरू करा.
दाद,
प्रथम, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
दुसरं, मी 'अरे तुरे' करतोय आणि तू 'आहो जाहो'. मला 'अरे तुरे' केलेलं आवडेल मात्र तू मला 'आहो जाहो' करणार असशील तर मीही तुला आहोच म्हणेन. असो.
अग मी ही सुचली तशी लिहिली. नंतर मला वाटलं कदाचित हिला गजल म्हणता येईल म्हणून विचारलं. तसं तू दिलेल्या लिंक्स्वर जाऊन थोडंसं वाचलंय. मी फक्त 'आव माझे' ऐवजी 'माझे' एवढाच अंत्य यमक बघितला. शिवाय तो यमक 'माझे' हा एकच शब्द असल्याने मी संभ्रमित होतो. शंका वाटली म्हणूनच तिला 'गजल' सदरात टाकलं नाही. बघतो हिच्यावरच प्रयोग कारून कांही जमतंय का.
.......................अज्ञात
अज्ञात,
तुमच्या कवितेची मध्यवर्ती कल्पना सुंदरच आहे. पण तीला मारून मुटकून गझलेत बसवलेच पाहीजे का? 'गझल नुमा नग्मा' हाहि एक काव्यप्रकार आहेच की!
'आशयघनता' हे कोणत्याही कवितेचे, फार कशाला, कोणत्याहि कला-कृतीचे, अत्यावश्यक लक्षण असते. ती काही 'गझल'ची मिरासदारी नाही. कोणत्याहि 'फॉर्म' मधे आशयघन काव्य होउ शकते.
तसे पाहू गेले तर गझलेतल्या पाच शेरांचा [आशयाच्या दृष्टीने] एक मेकांशी संबंध असणे आवश्यक नसते. प्रत्येक शेर ही एक स्वयंपूर्ण कविताच असते. ते शेर एकमेकांशी फक्त 'व्याकरणा'च्या नियमांच्या पालनाने जोडलेले असतात. एखाद दुसरा शेर आशयघन आणि उरलेली निव्वळ कारागिरी अशाही कित्येक गझला असतात. एक दोन आशयघन शेरांमुळे संपूर्ण गझलेला आशयघन म्हणायचे का हा एक प्रश्नच आहे.
कित्येक शायर असेही आहेत की ते काही वेळा फक्त एक शेर लिहून थांबतात. त्या शेराचा विस्तार गझलेत करत नाहीत. आपण आपल्या एखाद्या मित्राला बर्याच दिवसांनी भेटतो तेंव्हा अनेक विषयांवर बोलतो पण ज्या विषयाचा आवाका लहान त्या विषयावर मोजकेच बोलतो. विषय मोठा किंवा महत्वाचा असेल तेंव्हा थोडे विस्ताराने बोलतो, खरे ना? एक चांगली कल्पना एका शेरात [किंवा दोन - ते- चार ओळीत] सांगून संपली तर तिथेच थांबणे बरे, असे नाही तुम्हाला वाटत?
'उत्कटता' आणि 'उत्स्फूर्तता' ह्या दोन गोष्टी, माझ्या मते, कोणत्याही उच्च दर्जाच्या कलाविष्काराच्या 'अनिवार्य' कारक प्रेरणा असतात. कवितेतला 'कंटेंट' [आशय] महत्वाचा, 'फॉर्म' [घाट] ती कविता आपली आपणच घेऊन येते.
एखादा 'जर्म' लघुकथेचा असतो किंवा एकांकिकेचा. ती कथा किंवा एकांकिका लोकांना खूप आवडते, मग तीचे रुपांतर कादंबरीत किंवा तीन अंकी नाटकात करण्याचा मोह होतो [किंवा आग्रह होतो]. पण तो प्रयत्न, नाही म्हटले तरी, कृत्रिमच असतो, त्यामुळे तो बहुदा कलागुणांच्या कसोटीवर खरा उतरत नाही.
एक चमकदार शेर सुचून गेला की मग त्याच वृत्तात आणि यमकात आणखी तीन- चार शेर खटपटी- लटापटी करून जमवायचे आणि महत प्रयासाने एक गझल 'पाडायची', हा एक चांगला व्यायाम-प्रकार होउ शकतो पण त्याला उतम कला- आविष्काराचा दर्जा मिळू शकेल का?
सुरेश भटांना मिळालेले अभूतपूर्व यश आणि लोकप्रियता पाहून, 'मी सुद्धा' जातीचे खूप कवि पुढे सरसावले.
चार पावशेरांचा एक शेर होतो आणि पाच पावशेरांचा सव्वाशेर. 'शेरास सव्वा शेर' ह्या मापाने पाच-पाच [पाव] शेरांच्या गझला पाडणारे बरेच जण निघाले, अजूनहि निघतायतच. त्यांच्या पंक्तित जाऊन बसण्याचा मोह टाळावा, हा प्रेमाचा [अनाहूत] सल्ला.
बापू करन्दिकर
बापू,
आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभारी आहे. मी कवितेचा कुठलाच प्रकार ठरवून असा लिहिण्याचा कधीच प्रयत्न केला नाही/करत नाही. जे जसं आणि जेंव्हा सुचतं तसं लिहीत जातो. माझा कवितेच्या कुठल्याच प्रकारासाठी अट्टाहास नाही. त्या दिवशी सत्यजीतच्या कविता/गजल आणि त्या संदर्भातलं इतर लिखाण वाचत होतो आणि रात्री जे काय आलं ते माझ्या नेहमीच्या लयीपेक्षा वेगळं वाटलं आणि गजल सदृश दिसलं म्हणून मायबोलीवरच्या जाणकारांना आवाहन केलं की "ही गजल आहे काय" इतकंच.
..........................अज्ञात