"मी सिगरेट ओढत असले तरी पेटवत कधीच नाही"
'गैलाड' हे न ऐकलेले आडनांव धारण करणार्या आणि 'सीमा' हे तसे आधीच्या पिढीतील नाव धारण करणार्या त्या एक्स्प्लोझिव्ह रसायनाकडे बघत आणि वरील वाक्य ऐकत मी विचारात बुडलो.
'अत्यंत ज्वालाग्रही'
!!
मनातील विचारांना गाइड करण्याचे यंत्र निर्माण व्हायला हवे.
माझ्या फोर आर्मवरील केस त्या थंडीमुळे आणि गार वार्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखवत निवडणुकीच्या उमेदवारासारखे उभे राहिले होते. त्यांच्या मुळाशी होते त्वचेचे अनेक थर! बाहेरच्या थराचे काम आतल्या थरापेक्षा वेगळे होते. केसांची मुळे बहुधा रक्तात पोचलेली असावीत किंवा नसावीतही! पण त्यांच्या मुळांशी आग होती. ही आग ऐंद्रिय अतृप्तीच्या अजरामर भडकण्यामुळे असलेली आग होती. रक्ताला उसळ्या मारायला लावणारी!
मी स्वतःच्या आत जायला लागलो. जातच राहिलो.
थर, आत थर, त्या आत थर!
'मी' असे नेमके काहीच नाही. आणि सगळे काही 'मी'च!
बाहेर दिसणारी माझी त्वचा आतमध्ये लालसर होती. त्या आत होती हाडे, मांस, स्नायू, रक्त आणि अनेक अवयव, जे आपले अस्तित्व दाखवत राहतातच!
यात कोठेतरी मी होतो. हृदयातील धडधड, डोळ्यांची आग, जिभेवरची कडवट चव, मेंदूत होणारी विचारांची उलाढाल आणि खालच्या मातीवर पायाच्या अंगठ्याने काढलेली निरर्थक अक्षरे किंवा आकृत्या! ज्या दिसत नव्हत्याच कारण दिवा अगदीच मंद होता आणि रात्रीचे दहा वाजलेले होते.
पद्मावती ढाबा!
पुणे बारामती रस्त्यावर असलेला पद्मावती ढाबा चोरून आमच्याकडे पाहात होता.
'बाई? इथे बाई? आणि अशी वागते?'
त्या सगळ्या नवलाच्या गर्दीत माझे एकटेपण डचमळत राहिले. माझ्या आत आत इतका गेलो की जिकडे पाहीन तिकडे मीच मी दिसायला लागलो. काही रस्ते होते, काही नद्या, काही तळी, काही गटारे, काही डबकी, काही लाल मातीच्या वाटा, काही माणसे, काही पशू, काही पक्षी जे उडून दूर जाऊ पाहात होते, काही ओकावेसे वाटेल असे दुर्गंध आणि काही नाचावेसे वाटेल असे सुगंध! एक असह्य भयाण खेडे! जे तडफडत होते मुक्त होण्यासाठी!
हळूहळू ते खेडे पंख असल्यासारखे उडू लागले. ढाब्यात असलेल्या ज्या 'हट'मध्ये आम्ही बसलेलो होतो त्या हटच्या एका भिंतीवर असलेल्या एका पालीच्या शेजारी जाऊन बसले. तिथून मला पाहू लागले. मग हळू हळू ते मलाच पाहीनासे झाले. मग हळूहळू माझे मीपण विस्तारत विस्तारत, माझ्यातून मला नष्ट करत करत पद्मावती ढाब्याला व्यापू लागले. आणि शेवटी आसमंतात भरून राहिले.
गुडांग गरमच्या धुरासारखे!
जो सीमा गैलाडच्या तोंडातून शिव्यांसकट बाहेर पडत होता.
"पुरूषही ओढतेस तू, पण पेटवत नाहीस"
माझे हे वाक्य सीमा गैलाडचे यौवन गदगदवत राहिले.
तोंडात अडकलेला धूर, हासण्याची इच्छा आणि नेहमीच शर्टचे वरचे एक बटन उघडेच ठेवण्याची बिनधास्त सवय यामुळे सीमा गैलाड ज्वालाग्रही दिसत होती.
मी जसा माझ्याशी वागतो तितक्याच मोकळेपणाने 'वयात आल्यानंतर' आजवर मी एकाच व्यक्तीशी वागलो आहे.
'सीमा गैलाड'!
सीमाबरोबर 'आपल्याला खरेखुरे आपण ' होता येणे हा अद्वितीय फायदा मी दोन वर्षे घेत राहिलो. नाहीतर परक्याबरोबर, या परक्यात आई, बाप, बायको, पोरे, मित्र सगळे आले, अशा परक्यांबरोबर आपल्याला 'आपण स्वतः' होताच येत नाही. आपण त्यांचे कोणीतरी आणि ते आपले कोणीतरी असतात. सीमा गैलाडचे मात्र तसे नाही. ती सीमा गैलाड असते, आपली कोणीही नसते, आपण आपण असतो, तिचे कोणीही नसतो आणि तरीही...
... सीमा गैलाड आणि आपण मिळून एक पूर्णपणे वेगळेच जग असते... जे इतरांना लांबून पाहून जाणवतच नाही.
सीमा गैलाड ज्या पुरुषांच्या जीवनात येईल त्यांनी जर तोवर लग्न केलेले नसेल तर ते कधीच करणार नाहीत.
सीमा गैलाड थुंकते या विश्वावर! पचाककन!
"पुरुषाला काय पेटवायचंय... च्युतमारीचे आईला पाहून चळतात"
पुरुषांना लावलेले हे विशेषण तिथल्या एकेकाने ऐकले. सगळेच जण एकमेकांकडे पाहून हासत होते गालातल्या गालात! पण सीमा गैलाड बहुधा त्यांना महिला पोलिस वाटत असावी. कारण ती तशीच दिसते. अर्थात, तिचा अवतार नेहमीच तसा असतो हे तिथल्या लोकांपैकी फक्त मलाच माहीत होते. तिच्याच भाषेत 'झाटभर मेक अप' न करता राहायची ती! केस खांद्यांच्या खाली जेमतेम पोचायचे. पुरुषाला मोहीत करणारे, तेही पहिल्याच दर्शनात, तिच्याकडे सगळे काही उत्तम होते. पण एक कुठलातरी शर्ट, एक टाईट जीन्स आणि पुरुषासारखीच बिनधास्त वावरण्याची अंगात भिनलेली सवय! यामुळे पुरुषच पहिल्यांदा वचकून असायचे.
"ओत... डोळे काढ बाजूला"
बहुधा माझी नजर नको तिथे आहे असे वाटून ती बिनदिक्कत तसे म्हणाली. तेही रिकामा ग्लास आपटत आणि दारू मागत. हेही सगळ्यांनी ऐकले असे दिसल्यावर मात्र मी ताडकन वेटरला बिल आणायला सांगितले.
"ए... नाईन्टी आण"
सीमाने परस्पर दिलेली ऑर्डर पाहून मात्र वेटर माझ्याकडे अजिबात न बघता नाईन्टी आणायला गेला. खरे तर दोघांत मिळून एकच क्वार्टर झालेली होती. पण सीमाची जीभ न पिताही अशी चालायची हे माहीत असल्यामुळे मी तिला बाकीची लॉन्ग ड्राईव्हवर पाजायचे ठरवलेले होते. अ व्हेरी.... व्हेरी लॉन्ग ड्राईव्ह! आमचा प्लॅन्ट त्या विभागात आहे तिथपासून ते पार पुण्यातल्या वाडिया कॉलेजपर्यंत!
त्या क्षणी एखाद्याने जरी तिला छेडले असते तर तिला वाचवायची हिम्मत माझ्यात अजिबात नव्हती. रस्त्यावर दिसलेला एक निर्जन ढाबा या क्वालिफिकेशनवर तो तिनेच जाता जाता निवडलेला होता आणि आम्हाला अंदाज नसला तरी केवळ गेल्या वीस एक मिनिटांत तिथे अचानक बारा पंधरा जण वेगवेगळ्या हट्समध्ये किंवा अंगणातील टेबलांवर बसलेले होते. आणि आत्ता प्रत्येक गिर्हाईक आणि स्टाफ तसेच मालक चोरून चोरून आमच्याचकडे पाहात होता.
"हा ग्रामीण विभाग आहे... आपण पुण्यात जाऊन बसू"
"तिकडे सगळे सज्जन असतात??? बघणार नाहीत माझ्याकडे??"
"तू तरी सज्जन आहेस का??"
मी कुजबूजत विचारले, कारण ती सज्जनच नाही असे इतरांचे उगाच मत व्हायला नको होते. प्रॉस्टिट्यूट सहज वाटते ती अगदी!
खणखणीत उत्तर दिले सीमाने!
"मी जगाला फाट्यावर मारते"
'कशाच्या फाट्यावर मारते' हे सांगितले नाही हे नशीब!
टेबलवर नाईन्टी येऊन पडली.
"तुला सगळे माहितीय... नाटकं करू नकोस... मी मुलगी असले तरी खरा मुलगाच आहे मी... क्काय???"
ते वाक्य तिने मला उद्देशून पण वेटरकडे आणि माझ्याकडे आळीपाळीने बघत विचारल्यामुळे वेटरने पुन्हा एकदा तिच्या उघड्या बटणाकडे पाहिले आणि मग माझ्याकडे पाहात निघून गेला.
"तू पहिल्यांदा ते बटन लाव..."
"का? आपल्याला जे पाहायला मिळते ते दुसर्याला पाहायला मिळू नये म्हणून???"
"उघडीच राहा मग! शर्ट तरी कशाला घालायचा??"
माझ्या कुजबुजीला व्हॉल्यूमच सापडू शकत नव्हता.
"मच्छर येतील ना घोंघावायला.. हां बास बास.. सोडा जास्त टाकून मारू नकोस माझी"
सीमा गैलाड म्हणजे त्सुनामी!
"अशी पण मारता येते??" - मी किंवा माझी लज्जा!
" बर ते जाऊदेत.... बांदलचं मटन लुसलुशीत होतं का?"
सातारा रोडवरच्या एका मांसाहारी हॉटेलात तिला यायचं होतं, पण ते जमले नाही आणि मी एकटाच जेवून आलो हे तिला समजल्यामुळे आत्ताचा प्रश्न होता.
"एकदम..."
"कॉस्टलीय का?"
"होय... बोकडाला कॉस्टली पडतं... माणसाला नाही..."
"तुझ्यायला तुझ्या... "
सीमा गैलाडने हासत हासत अर्धा पेग एकाच घोटात ढकलला.
ती पुर्वी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर होती. तिथे एक भयानक प्रकार झालेला होता. कॉलेजचे नांव मुद्दाम लिहीत नाही आहे. चार मुलांनी तिला कॉलेजमागच्या गवतात ओढून नेले होते. त्या आधी ती अशीच बिनधास्त असली तरी कॉलेजला व्यवस्थित वागायची. शिव्या वगैरे द्यायची नाही. साडी नेसून जायची. तिला दारू आणि स्मोकिंगचे व्यसन तिच्या भावामुळे लागले होते. आई वडील नव्हतेच. भावाचे लग्न झाल्यावर मात्र भावाने सगळे सोडले आणि हिची व्यसने तशीच राहिली. लग्न होईना! दिसायलाही तशी तोंडावळ्याने सामान्यच! वहिनीने हाकलून द्यायची वेळ आणली. मग एका फ्लॅटमध्ये दोन बायकांबरोबर राहू लागली. तिघी मिळून भाडे भरायच्या त्या फ्लॅटचे! पण कॉलेजमध्ये मुलामुलींशी समान मोकळेपणाने वागत असल्यामुळे दिल्लीहून आलेल्या एका मुलांच्या ग्रूपला गैरसमज होऊन तिचा फायदा घ्यावासा वाटला. ते सरळ तिच्यावर लाईन मारायला लागले. तेव्हा तिने सावध होऊन त्यांना झापले. पण पुरुषी अहं दुखावला गेला. वर्कशॉपशी तिचा संबंध नव्हता. पण पार्किंग तिकडेच होते. ती संध्याकाळी सात वाजता स्कूटर घ्यायला पार्किंगपाशी गेली तेव्हा बॉयलर सूट घालून हे चौघे मिलिंग मशीनवर जॉब करत होते. एकाला ती दिसली. त्यांच्यात काहीतरी ठरले. दर बुधवारी तिचे एक प्रॅक्टिकल उशीरा असते हे लक्षात आले. एका बुधवारी अंधारात सरळ तिला उचलले अन मागच्या गवतात नेले. सीमा गैलाड महानच! तिचे तोंड दाबून धरले असले तरीहि तिने दोघांना लाफा लगावल्या. त्या गडबडीत एकाचा हात सुटला तसे तिने खच्चून बोंब मारली. पण उपयोग नव्हता. जवळपास जे होते ते वर्कशॉपमध्ये म्हणजे जवळपास सत्तर एक मीटर्सवर मशीन्सच्या आवाजात होते. पण सीमा घबरली नाही. तिने आणखीन एकाला फटके टाकले. आता हे सगळे तीच म्हणते म्हणा! पोरेच हादरली. उद्या काही प्रकार कोणाला समजला तर आपला बाप दिल्लीहून येऊन आपला मुडदा पाडेल हे त्या पोरांना समजले. सगळे पळून जायला लागले तर एका अशक्त पोराचा पाय हिने धरला. त्याचा बूट आला तिच्या हातात आणि तो तसाच पळत गेला. आवाज हिने ऐकून ठेवले.
दुसर्या दिवशी पोरांनी आळीमिळी गूपचिळी पाळली तरी ही प्राचार्यांकडे गेली. बूट दाखवला अन म्हणाली हा बूट ज्याचा आहे त्याला पोलिसात द्या! प्राचार्य हादरले. काही बोलेनात! पॉलिसी मॅटर झाले होते. ही टीचर्स रूममध्ये आली आणि तीन चार लेडी प्रोफेसर्सना आपले म्हणणे सांगितले. तिकडे प्राचार्यांनी संस्थापकांना फोन लावला. संस्थापकांनी हिला फोनवर बोलावले. हिने त्यांना प्राचार्यांसमोर आणि एका लेडी प्रोफेसरसमोर सांगितले.
"आमची इज्जत घालवायला कॉलेज काढलय काय?? थुंकते मी या नोकरीवर! मला नुकसान भरपाई पाहिजे नाहीतर चालले चौकीवर"
दमदार नुकसान भरपाई घेऊन ही दुसर्या किरकोळ कॉलेजला जॉईन झाली आणि मी बसवत असलेल्या एका नाटकाची जाहिरात पाहून तिने मला कॉन्टॅक्ट केला. त्या नाटकात तिच्यासाठी कोणताच रोल मॅच होत नव्हता. पण आणखीन एका पटकथेमध्ये मात्र एक रोल होता. हिचा एकंदर वावर मला व आमच्या ग्रूपमधील एकांना इन्टरेस्टिंग वाटला. काही कारणाने भेटी होत राहिल्या. ग्रूपमधील एका मुलीच्या लग्नात परत भेट झाली. तेव्हा जरा अधिकच जवळीक झाली. तिच्या बिनधास्त स्वभावात तेव्हापासून एक थरारक आणि आक्रमक व्यक्तीत्व आहे व ते अब्जावधी स्त्रियांपेक्षा खूपच वेगळे आहे हे जाणवायला लागले. मला काय, तिच्याच भाषेत बोलायचे तर कशातही काही ही जाणवेल भडव्याला!
तिच्या शिवराळ भाषेचे एक कारण होते. भावामुळे तिला अनेक सवयी लागल्या होत्या. त्या तिने सोडल्याच नाहीत. ती स्वतःला पुरुष समजत असल्यासारखीच वावरत राहिली. भावाने मात्र सगळ्याच सवयी सोडल्या. आता ही भावाचे थोबाडही पाहात नव्हती. जगात अगदीच एकटी होती असे नाही, इतर अनेक नातेवाईक होते, पण ते अधेमधे संपर्कात असायचे. फ्लॅटवरच्या दोन मैत्रिणी हे तिचे विश्व झाले होते. त्या मैत्रिणींना हिचे अती साहसी वागणे अत्यंत अप्राप्य असल्याने अत्यंत आकर्षक वाटत राहायचे. मात्र! सीमा गैलाड काही विशिष्ट लोकांच्या संगतीतच अशी अती साहसी वगैरे वागायची. अन्यथा ती सौम्य असायची. पण ती सौम्य असायची तेव्हा तिच्यात काही अर्थच वाटायचा नाही. आत्ताच्या कॉलेजमध्ये तिची जुन्या कॉलेजमधली बातमी पसरली होती. पण ती खाली मान घालून ते सहन करून व्यवस्थित नोकरी करत होती. मात्र जीवनात इतक्या कमी वयात आलेल्या घाणेरड्या अनुभवांमुळे तिच्यात असलेला कडवटपणा भावाने शिकवलेल्या शिव्यांच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त व्हायचा.
पण एक मात्र होते! सीमा गैलाड हा देवाने स्त्री जगतावर केलेला एक मोठा उपकार होता. आत्ताच्या कॉलेजमध्ये एका ट्रीपमध्ये एका मुलीला उद्देशून बोलणार्या एका विद्यार्थ्याच्या तिने सर्वांदेखत कानफटात वाजवली होती. आणि नंतर तिला भेटायला आलेल्या आणि त्या मुलाची तक्रार करू नयेत अशी विनंती करणार्या मुलांना तिने त्यांनाही जमणार नाहीत अशा शिव्या दिल्या होत्या, मात्र त्यांच्याशिवाय आसपास कोणी नाही हे पाहूनच! दातखिळी बसलेली ती पोरे निघून गेली होती. मात्र सीमा गैलाडने त्या विद्यार्थ्याचे करीअर बरबाद केले नाही, कारण ती मुलगीही काहीशी त्याच्यात गुंतल्याचे तिला संध्याकाळीच समजले होते.
सीमा गैलाड तिच्या फ्लॅटवरील दोन मैत्रिणींशी आणि माझ्याशी बोलताना मात्र 'नेमकी सीमा गैलाड' असायची. नो मुखवटा, नो खोटेपणा!
काहीही बोलायचो आम्ही!
एकदा इतर फ्लॅटधारकांनी सीमाच्या फ्लॅटमध्ये व्यसने चालतात व अधूनमधून शिव्या ऐकू येतात अशी तक्रार फ्लॅटच्या मालकाकडे केली. तो आला. त्याने विषय काढला. सीमा अतिशय सालसपणे त्याच्याशी बोलली. त्याही वेळेस फ्लॅटमध्ये सिगारेटचा वास येत होता. ते पाहून तो माणूस सरळ म्हणाला की तुम्ही सिगारेट ओढताय की? त्यावर ती म्हणाली ती भाडे देत असलेल्या फ्लॅटमध्ये आतमध्ये सिगारेट ओढतीय, तुम्हाला काय त्रास? तो काहीतरि अधिक बोलू लागला तसे तिने त्याला बजावले. 'एक तर मला नांव सागा कोणी तक्रार केली ते, नाहीतर मीच तक्रार करेन'! आता ही बया आधीच दिसायला अशी, त्यात तिचे बोलणे वागणे आणि पेहराव तसा! तो हादरला आणि निघून गेला. तो गेल्यावर हिने शेजारच्या तीनही फ्लॅट्सची दारे वाजवली. प्रत्येक घरातला एकेक माणूस दारात आल्यावर हिने निक्षून सांगितले.
"मी दारू पिते आणि विड्या फुंकते. मी जगावर थुंकते. तक्रार केलीतर ***********.... एकदाच सांगतीय"
जो तो सभ्यपणे दार लावून आत गेला. मैत्रिणी हिच्याकडे बघतच बसल्या. तेव्हापासून सीमा गैलाड सरळ टेरेसमध्ये बसूनच बिड्या फुंकायला लागली. आजूबाजूच्या फ्लॅटमधले लोक तेव्हापासून फारसे टेरेसमध्ये येणे कमी झाले.
शनिवार संध्याकाळ आली की एकमेकांना आठवण यायची आम्हाला! कारण ती पिते हे मला कळल्यानंतर एकदा आम्ही दोघे आणि काही ग्रूपमधील सदस्य एकदा गेलो होतो तेव्हा धमाल आली होती. तेव्हापासून शनिवारी ती एसेमेस वगैरे करायची. एसेमेस तरी काय?
'ढकलायची का आज थोडी?'
'कुठेयस रे टवळ्या?'
'शनिवार आहे, निजवायची का व्हिस्कीची आई?'
मला तर दुसरा छुपा मोबाईल फोन घेऊन ठेवावा असेच वाटायला लागले होते.
मी शक्य तितक्या वेळा नाही आणि शक्य तितक्या वेळा हो म्हणायचो. मी नाही म्हणालो की ती डायरेक्ट पुढच्या बुधवारी वगैरेच बोलू लागायची. मी हो म्हणालो की काही वेळा तिलाच काही ना काही अडचण येऊन तिचेच रद्द व्हायचे. तेव्हा मात्र अगदी माफीनामा असल्यासारखे एसेमेस करायची रात्रीपर्यंत! आणि दोघांचेही हो असले आणि कुणालाच कसलीच अडचण नसली तर हे असे संवाद व्हायचे.
"तू एरवी शिव्या वगैरे न देता कशी काय बोलतेस गं? आणि मीच भेटलो की तोंड कसे सुटते?"
"थोबडाच तसाय तुझा... पुढे बघून गाडी चालव... "
"समजा... मी इथेच थांबलो आणि कुठे गेलोच नाही तर..."
" ************ "
संपला विषय!
आज आम्ही असेच बसलो होतो कुठेही जाऊन!
मी म्हणालो.
"आपलं काय ठरलवतं?? गाडी चालवताना लावायची"
"मी इथे पिणार... तू जा गाडीतून"
"अन तू एकटी इथे बसणार??"
"बिडी दे.."
गुडांग गरमने ओठ बदलले. आणि दोन तीन झुरक्यांनंतर पुन्हा गुडांग गरमने ओठ बदलल्यावर मी ओठाला लावत म्हणालो.
"ह्यॅ... कडवट लागायला लागली च्यायला बिडी आता.."
"घरी जाऊन निजलास की बायकोही म्हणेल... काय करायचं ते खाली करा.. तोंड आणू नका जवळ"
मी अनेक क्षण हादरून नुसता बघत बसलो. ती या लेव्हलला जायची हे मला माहीत असले तरी सगळ्यांसमोर जाईल याची कल्पना नव्हती. पब्लिक बघत होते माझ्याकडे! मी उठलो.
"सीमा... उठ.... उठ... ताबडतोब उठ..."
"जमणार नाही... "
"मग आता एक शब्द बोलायचा नाही"
"तेही जमणार नाही..."
"मला एक समजत नाही... कुणाचं थोबाड पाहतो मी सकाळी म्हणून तुला भेटायची मला बुद्धी होते..."
"आपण कुठे भेटलोयत??"
खरे होते! मी सीमाला कधीच भेटलो नव्हतो. खर्या अर्थाने! तिने एकदा भेटायची संधीही दिली होती आणि सुचवलेही होते. मला जमणे शक्यच नव्हते. तेव्हा तिने माझी साले काढली होती. नंतर सकाळी तिच्याच लक्षात आले की ती बहुधा चुकीची वागली. मग एसेमेस चा सपाटा सुरू करून माफीबिफी मागीतली आणि मैत्री पुढे सरकवली.
मला ती संध्याकाळ आठवते. सोलापूर रोडवरील चौफुला की कुठून आम्ही असेच गाडीतून येत होतो. तिने तिची स्टोरी मला सांगितली होती. वयाची पहिली दहा वर्षे तिला मुलाप्रमाणेच वाढवले होते. दोन मोठे भाऊ होते. आई वडील तिच्या जन्मानंतर पाच वर्षातच गेले. मोठा भाऊही वारला. मधल्या भावाने सांभाळले. गल्लीत थट्टा व्हायला लागली तसे तिला जाणवू लागले की फ्रॉक, स्कर्ट असे काहीतरी घालायला हवे. तोवर ती जीन्स टीशर्ट घालून क्रिकेटच खेळायची. पोषाख बदलला तरी आवडिनिवडी तशाच राहिल्या. अजूनही मुलांमध्येच खेळायची. अगदी शरीराने वेगळेपण दाखवून दोन वर्षे होईपर्यंत आणि गल्लीतल्या काही जणांनी तिचा आणि भावाचा जाहीर अपमान करेपर्यंत ती तशीच वागली. यात दोष तिचा नव्हता. तिला शिकवलेच गेलेले नव्हते. मग ती अगदी शालीन मुलीसारखी वागू लागली. पण तिच्याबाबतीत त्याच बेधडकपणाची आठवण मनात असल्यामुळे काही मुलांनी वारंवार त्रास द्यायचा प्रयत्न केला. तसे मात्र तिने तिचे सिंहिणीचे स्वरूप दाखवले. पण यामुळे बदनामी झाली ती झालीच! तिकडे भाऊ व्यसनी झाला आणि त्याने हिलाही शिकवले. बाविसाव्या वर्षापासूनच ती स्मोक करू लागली, पण फक्त घराच्या आतच! विचारणारे कुणीच नाही. भावाचे लग्न ठरले तसा त्याने आधी हिच्या लग्नाचा प्रयत्न सुरू केला. हिची कथा येणार्या स्थळांना हळूहळू कळू लागल्यामुळे कोणालाच पसंत पडेना! त्यातच दिसायला अतीव सुंदर नव्हती. चारचौघींसारखीच! पण हिला कधी नीट वागावे, लग्न करावे असे वाटलेच नाही. लग्न ठरतच नाही म्हंटल्यावर तिने आणखीन काही अटी धुडकावल्या. आता ती पुन्हा यथेच्छ स्मोक करू लागली घरातच! त्यातच शर्ट पॅन्ट शिवाय काही घालेना! सरळ गल्लीच्या टोकाशी असलेल्या पानाच्या टपरीवरून सिगारेटचे पाकीट आणू लागली. अर्थातच वहिनी भडकून भांडणे काढू लागली. पर्यवसान भावाने हिला भाड्याची खोली घेऊन देऊन हाकलून देण्यात झाले. मात्र या दरम्यान तिने इंजिनियर होऊन सिव्हिल डिपार्टमेन्टची लेक्चरर म्हणून नोकरी तेवढी मिळवलेली होती. अर्थातच खासगी कॉलेज असल्यामुळे पगार चांगलाच होता. सुट्या भरपूर, फ्लॅटवरील मैत्रिणी व्यसनांची निंदा न करता सांभाळुन घेणार्या आणि मोकळा वेळच वेळ! मग काहीतरी करू, काहीतरी करू म्हणत लिहू लागली. चित्रे काढू लागली. शेवटी नाटकात काम करायला माझ्याकडे आली होती. तिला वाटले असावे हा साला बराच मोठा कोणी आहे. तिच्याच भाषेत सांगायचे तर मला नाटकातले 'झाट काही समजत नाही'!
हे सगळे मला सांगताना ती अतिशय गंभीर आणि उदास झाली असली तरी भाषा तशीच टपोरी राहिली होती.
"सीमा... तू... अशी का बोलतेस मवाल्यासारखी?? तुला राहायचे तसे राहा पण भाषा का बदलत नाहीस??"
"मस्त वाटतं! आई बहीण काढायला एकेकाची"
"आई बहिण??? तूही बहिण आहेस, आई होऊ शकशील... तुला चालेल का तुझ्या भावाला कोणी असं बोललं तर??"
"लई वेळा! त्याला तर मीच शिव्या घालते तोंडावर"
"आणि उद्या तुझ्या मुलाला कोणी असं बोललं तर??"
"मुलगा व्हायला चढणार कोण आहे??'
"हे तुझं बोलणं अत्यंत घाणेरडं आहे.."
"तूही बोलतोस की असा??"
"हो, पण मी मित्रांमित्रांमध्ये बोलतो... मी कधीच शिव्या देत नाही..."
"मी देते... चीअर्स"
"चीअर्स... सीमा... तुला कधी एखादा पुरुष आवडला का गं?"
"दोन! दोन पुरुष आवडले मला.."
"कोणते??"
"एक माझा बाप! आणि दुसरा मन्या! वाड्यात एक मन्या होता मन्या! मस्त होता. लाईन द्यायचा! पण त्याच्या आईने आई घातली"
"व्वा! वा वा! काय शब्द आहेत! आणि बाप का आवडायचा??"
"कारण तो लवकर मेला... "
बराच वेळ मी धीम्या धीम्या गतीने गाडी चालवत राहिलो. नंतर विचारले.
"मन्याप्रमाणे कोणीच आवडले नाही??"
" नाही. शेपूटघाले साले सगळे! त्यापेक्षा ते कॉलेजमागे नेऊन दाबणारे बरे, **त दम तरी होता त्यांच्या"
"...... हो.... पण तसे कोणीच आवडले नाही??"
"तसे काय! अनेक आवडतात. हा दिसायला बरा, तो बोलायला, तो हसायला, तो फिरवायला, हा चढवायला, तो खर्चाला, एखादा स्वभावाने बरा, एखादा ********"
"मग??"
"मग काय???"
"मग कोणाशी तरी विषय का काढत नाहीस??"
"कसला???"
"लग्नाचा??"
सीमाने जहरी शिवी हासडली.
"का गं???"
"का काय का?? मी लग्न करीन असं वाटतं तुला??'
"का?? लग्न का करणार नाहीस म्हणे??"
"पुरुषाशी कसं लग्न होईल माझं??"
"म्हणजे काय??"
"मीच पुरुष आहे.. "
"पहिल्यांदा तू बाईसारखी वागायला लाग... "
"म्हणजे काय करू?? साडी नेसू?? डोक्यावरून पदर घेऊ??? पावलापावला लाजू??? स्वयंपाक करू??? पोरांना जन्माला घालू?? नवर्याचे पाय चेपू?? सासरच्यांची सेवा करू?? महिला मंडळात जाऊ?? पाकक्रिया शिकू?? कीर्तन करू?? कष्ट करू?? आई *** त्या लग्नाची ... अॅन्ड आय होप यू आर नॉट गोईन्ग टू टेल मी दॅट लग्नाने स्त्रीच्या आयुष्याला अर्थ बिर्थ मिळतो... "
मला व्यक्तीशः सीमाचे विचार फार.... फार..... फार पटायचे.
पण स्वतःच्या बायकोने माझ्याशी लग्न केल्यावर तिला हे वरचे सगळे करायला लागू नये असे मात्र माझ्या मनात येत नव्हते. एक पारंपारिक पुरूष! सीमाच्याच भाषेत *****!!!!!!
लग्नाने आयुष्याला अर्थ मिळतो ही समाजाची धारणाच चुकीची आहे. लग्नाने फक्त आणि फक्त स्त्रीला एक सामाजिक स्टेटसच मिळते हे दुर्दैव दुर्दैवाने खरे आहे. इतकेच, की त्या स्त्रीकडे पाहण्याचा लांडग्याच्या डोळ्यांच्या आणि कोल्ह्याच्या मेंदूच्या पुरुषांचा दृष्टिकोन फक्त आणि फक्त 'किंचितसा' बदलतो. नवरा आपल्या बायकोचे रक्षण करू शकेलच असे मुळीच नाही.
जगातील सर्व संस्कृती स्त्रीला मध्यवर्ती ठेवून डिझाईन केल्या गेल्या. आणि स्त्रीला मध्यवर्ती ठेवून म्हणजे स्त्रीला प्राधान्य देऊन मुळीच नव्हे, तर स्त्रीला वस्तू बनवण्यास प्राधान्य देऊन!
सीमा अशा धारणांवर नियमीतपणे थुंकायची.
आणि आज ज्या ढाब्यात बसलेलो होतो तिथे ती तिच्या प्रत्येक श्वासागणिक अशीच थुंकत होती.
स्त्री दारू पीत नाही, सिगारेट ओढत नाही, शिव्या देत नाही, बारमध्ये किंवा ढाब्यावर अशी बसत नाही या सर्व धारणांमुळे पब्लिक गालातल्या गालात हसत असताना ती त्यांना हासत हासत आणि मला चिडवत चिडवत त्या धारणांना 'फाट्यावर मारत' होती.
"आणि मला हे सांगण्यासाठी तू पुरुषासारखा वागायला नकोस का??? निदान 'नवर्यासारखे'??? आत्ता तू घरी असायला हवास ना? निदान माझ्याबरोबर गाडीत दारू ढोसतोयस हे तुझ्या बायकोला किंवा घरातल्यांना माहीत तरी असायला हवे ना?? "
मी गाडी गंभीरपणे घराच्या दिशेला, म्हणजे फुरसुंगीकडे न नेता स्वारगेटच्या दिशेने न्यायला लागलो तेव्हाही ती सॉरी म्हणाली नाहीच आणि तिने सॉरी म्हणायलाच नको होते. ती मला बोलली म्हणून मी रागावलो असलो तरी ती खरे बोलली होती. तिने हेही विचारले नाही की तू रागावला आहेस म्हणून लगेच घरी जायचे आहे का! नुसती पीत बसून राहिली.
शेवटी मलाच लाज वाटली. तिला सल्ले देत असताना मी मला दिलेल्या सल्ल्यामुळे मात्र रागावलो होतो. पण नंतर असाही विचार आला की मी तिला असे कुठे काय चुकीचा सल्ला देत होतो? निदान लग्नामुळे मन गुंतण्याची एक प्रदीर्घ सोय तरी होतेच ना? आणि मूल वगैरे झाल्यावर जीवनाबाबतचा दृष्टिकोन पूर्णतः बदलतो यामध्ये काहीतरी तथ्य असणारच ना? आता पुन्हा मलाच राग आला, पण तोवर तिचा राग शांत झाला होता.
"मी तुझी ठासली असे मानू नकोस... एकंदर बोलले मी..."
"आत्ताही तू ठासली, मारली असल्याच भाषेत बोलतीयस..."
"राधिका आणि वैशू नाहीयेत आज.."
"का???"
"राधिका बहिणीकडे गेलीय... वैशू गावाला!"
"ओह... मग आज तुला एकंदर समाजातील रूढी, प्रथा यांना शिव्या घालायला रात्र मोकळी आहे तर..."
"........."
"..... आता काय झाले???"
" मला दोनच पुरुष आवडले"
"... म्हणजे??... मग??"
"तिसरा नाही आवडला.."
"........... त्या... तिसर्यालाही तू नाही आवडलीस..."
"विचारतंय कोण तुझ्यायला तुझ्या... "
"तुला कोण सांगतंय पण तुझ्यायला तुझ्या?"
"तुला माझ्यात काय आवडतं???"
"काहीही नाही... "
"मग येतोस कशाला फिरायला ???" (थोडक्यात ** घालायला असे तिला विचारायचे असावे)
"तुला नेणार कोण नाहीतर फिरायला??"
" *********** "
"घातली! घातली शिवी पुन्हा! "
"येतोस का???"
"कुठे??"
"फ्लॅटवर??"
"फ्लॅ... आणि??"
"आणि काय??? मला परत शिव्या द्याव्याश्या वाटणारच नाहीत असं काहीतरी कर..."
".... मी नाही येऊ शकत.."
"का??? "
" कोणी पाहिलं बिहिलं म्हणजे काय??"
" ******* "
"नीट बोल हं सीमा.. आधीच सांगतोय"
" म्हणजे कोणी पाहणार नसतं, बायको विचारणार नसती तर आला असतास...."
"म्हणजे??"
"म्हणजे मनातून असं नाही वाटत की आपण शुद्ध राहावं... आई ****** पुरुषांची..."
मला आता हसू यायला लागलं होतं!
मी हासत आहे हे तिला समजले.
"गाडी थांबव... "
"का??"
"थांबव..."
मी गाडी थांबवून तिच्याकडे बघितले. तिने हिंस्त्रपणे माझे तोंड स्वतःकडे ओढून घेतले. मला स्वतः दारू प्यायलेलो असूनही तिच्या ओठांना येणार्या दारूच्या वासाची शिसारी आली तसे जाणवले की माझी कोणालातरी कितीवेळा तरी शिसारी येत असेल. चोवीस तासात चोवीसशे शिव्या देणारी, पुरुषासारखी वागणारी सीमा गैलाड त्या प्रसंगी मात्र हळव्या स्त्रीसारखी वागली आणि नंतर मला दूर करून सरळ गाडीबाहेर जाऊन उभी राहिली. मी हादरलो, हा काय नवीन प्रकार!
"काय गं??"
"सॉरी..."
"म्हणजे??"
"मी तुला नासवलं..."
"मला कसलं घंट्याचं नासवलंस?? मी हे जग नासवण्यासाठी जन्माला आलेलो आहे."
" घाण वाटली मला तुझी..."
"का??"
"मढ्यासारखा किस घेतोस..."
"मढ्या... म्हणजे??"
"काही आवेश बिवेशच नाही.."
"तिच्यायला एक तर नाही ते करायला जायचे... चल आता..."
"मला फ्लॅटवर सोड.."
"मग काय घरी नेणारे?? दार लावून घे..."
"ऐक ना??? नगर रोडवर ** घालायची का??"
"नको... नगर रोडला आई नाहीये.."
"परवा मी टेरेसमध्ये असताना पाहिले... रस्त्यावर एका कुत्र्याच्या पायावरून कार गेली... ते कॅ कॅ करत होते.."
"मग??"
"तू तसेच करतोयस..."
"असूदेत..."
"दारू आहे का दारू??"
"आता मात्र मीच शिव्या देईन हां?? गपचूप बस..."
त्या दिवशी तिला फ्लॅटवर सोडल्यावर तिने मागे वळून पाहिले आणि जमीनीवर पच्चकन थुंकली. आणि निघून गेली. मी संतापून घरी आलो. च्यायला बायकांनी वेळ मिळाला की आपल्या घरी बोलावून घ्यावा असा माणूस आहे का काय मी??
दुसर्या दिवशी सकाळी एसेमेस आला.
काल तिचा वाढदिवस होता आणि भांडणे कायमची मिटवण्यासाठी भाऊ आणि वहिनी फ्लॅटवर राहायला आले होते. त्यांच्याशी माझी ओळख करून देण्यासाठी आणि मला आणलेला एक शर्ट मला देण्यासाठी ती वर बोलावत होती.
चोवीस प्रकारांपैकी 'जीझस... कॅरोल' नंतर पहिल्यांदाच मी एकांतात थोडासा रडलो.
नंतर विचार केला, तिच्या भावाला आणि वहिनीला अचानक कशी काय उपरती झाली असावी??
मी एसेमेस केला. तर म्हणाली... वहिनीलाही नोकरी करायची आहे आणि लहान भाच्याला सांभाळण्यासाठी मी घरी कायमचे यावे म्हणून भांडणे मिटवायला आले होते. तुला वर नेऊन मी दाखवणार होते की मनाने चांगला असलेला एक माणूस तरी स्वतःच्या डोळ्यांनी बघा! पण आता माझ्यामते तू मनाने चांगला नाहीस. संधिसाधू आहेस. सगळे सुरक्षित वातावरण असले तर माझी *********
आणि त्यानंतर आज आम्ही तीन महिन्यांनी लॉन्ग म्हणजे अतीच लॉन्ग ड्राईव्हला जाऊन पद्मावती ढाब्यावर बसलेलो होतो.
"ते जाऊदेत... शर्ट कुठे आहे माझा??"
"**त गेला..."
'का??"
"लायकी नाही तुझी माझी गिफ्ट स्वीकारण्याची..."
" तुझी मात्र आहे लायकी माझ्याबरोबर फिरण्याची..."
"निघू का मी??"
"बस... मी निघू म्हणतोय तर आणखीन बटणं काढून बसायला तयार होतीयस... आणि म्हणे आता निघू का मी??'
"शर्ट भावाला दिला मी... त्याचाही बेचाळीसच साईझ आहे.. मन्याचा जास्त आहे... चव्वेचाळीस "
"मन्याचा काय संबंध इथे??"
"कारण त्याचा घटस्फोट झाला..."
मी अक्षरशः अर्धवट उठून उभाच राहिलो धक्का बसून!
"घटस्फोट झाला???? कसा काय??"
माझा अंदाज सरळ होता, हिनेच त्याच्या घरी जाऊन अर्वाच्य बडबड केलेली असणार कधीतरी!
" कारण तो तिला **यचा तेव्हा त्याच्या मनात मी असायचे..."
हसून हसून मुरकुंडी वळली माझी.
"आणि हे त्याने तुला येऊन सांगितले असेल... नैक्कॅ???"
"नाही.... तो चुकून तिला 'आय लव्ह यू सीमा' म्हणायचा..."
मला किती हसावे तेही समजेना!
" हास भडव्या तू.. "
हे सीमाचे वाक्य ऐकून मात्र ढाब्याचा मालक आमच्या टेबलपाशी आला आणि मला म्हणाला...
"सैब शक्यतो श्यीगाल करू नका... फ्याम्ली बस्तात हितं"
"नाही नाही... सॉरी... आता नाही करणार"
मी माघार घेतली मालकापुढे!
पण सीमाने उसळून त्याला बोलावले... बोलावले तेही कसे???
"अय.. फॅमिली बसतात म्हणजे काय??? ही फॅमिली नाहीये का?? आं??? तुझ्यायला तुझ्या... "
मालक भंजाळून माझ्याकडे पाहू लागला. दिसायला तर काही सीमा 'तशी' वगैरे दिसत नव्हती. पण वागत 'तशी'च होती. मी तिला आवर घातला तसा तो निघून गेला.
"तुला अक्कल नाही का गं??? हे हॉटेल त्यांचंय... हाकलून देतील ... हळू बोल जरा... तू ग्रेट आहेस हे जगाला समजायला नकोय..."
सीमा उठली आणि माझ्या शेजारी येऊन बसली आणि कुजबुजत बोलू लागली.
"हा हॉटेलचा मालक ***** आहे... हं... तर मी काय सांगत होते .... हां.. तो *** मन्या.."
मीच उठून तिच्या खुर्चीवर बसलो. आता खुर्च्यांची अदलाबदल झाली.
"हं... आता तिथेच बसून बोल... फक्त शिव्या देऊ नकोस.. "
"हं... तर त्याच्या बायकोला मागचं कळालं सगळं.."
"काय कळालं?? काही झालं कुठे होतं तुमच्यात???"
"झालं कुठे होतं म्हणजे?? दिवस गेले होते मला..."
मी निर्जीव झालो होतो निर्जीव!
"हे... हे कधी झालं होतं???"
मला वाटले मन्याच्या लग्नाआधी झालं असेल!
"त्याच्या लग्नाला सात वर्षं झाल्यावर..."
".... त... तुझं तुला कळतंय का काय बोलतीयस ते??? का तारेत बोलतीयस??"
"आणखीन मागव... हेच सांगेन..."
"पण हे कसं काय झालं??"
"त्याचं माझ्याशी लग्न न करून त्याच्या आईने जो ******** केला होता त्याचा मी सूड घेतला..."
"हा सूड घेणे आहे???"
"तुला मगाशीच नाही का म्हंटलं मी??? पुरुषांना कुठे पेटवावे लागते??"
"अगं पण... "
"मी त्याला भेटत राहिले होते... भरीस पाडलं... यायचा फ्लॅटवर.. मग केला एक दिवस तमाशा मी त्याच्या घरासमोर.. त्याच्या आईचं तोंड हे एवढंसं झालं होतं... तुला माहितीय??? बाई बोलत नाही म्हणून बदनाम होत राहते... बाई जर बोलली ना??... तर जळून जाईल हे जग... बोलत नाहीत बायका... मी बोलते.. ***********... मन्याची आई सगळ्यांसमोर पाया पडायला आणि तोंड धरायला आली.... म्हंटलं रांड समजता का काय मला?? पण त्याची बायको फुत्कारत होती... वर्षात घटस्फोट झाला... अख्ख्या वस्तीत बदनाम झाला मन्या... "
"हे... काय तू बोलतीयस..???"
"नवीन तर ऐक?? हे झालं जुनं..."
"पण... हे सगळं होत असताना मला कसं माहीत नाही??"
'तू काय नवरा आहेस काय??? गेलास ****** "
"नाही पण आपण भेटायचो तेव्हा काही बोलायचीच नाहीस म्हणजे तू???"
"मला तू आवडतोस... मला तुला घालवायचे नव्हते... "
"मला काय घेणंय का देणंय तुझ्याकडे तो आला तर??"
"तरीही तू आवडतोस मला.."
"पण आता झालंय काय???"
"काल भाऊ आणि वहिनी म्हणाले घरी चल... मन्या तुला स्वीकारायलाही तयार आहे.. तिथेच माहेर आणि तिथेच सासर..."
"क्काय??? मग???"
"म्हंटलं ** *****.... "
"बरोबरच्चे..."
"हे असलं चाललवतं त्या दिवशी फ्लॅटवर... म्हणून म्हंटलं तुला वर न्यावं आणि त्यांची ** ***.... माझा वाढदिवस होता ते वेगळंच... काय रे भाडखाव??? माझ्यासाठी काही गिफ्ट आणलीस का??"
"तू बाई आहेस का बुवा ते मला समजत नाही... म्हणून गिफ्ट म्हणून ही पार्टीच मान्य कर.."
"काय करू रे मन्याचं???
"काहीही कर... "
"मला काय वाटतं माहितीय का भूषण? मला वाटतं की... "
".... काय??"
"तेव्हाच... तेच मूल मी जन्माला येऊ दिलं असतं तर रे???"
"का? असं का वाटतं?? पुरुषाला मूल होतं कधी??"
"त्या अडीच महिन्यात मात्र मला पहिल्यांदाच वाटलं तिच्यायला.."
"काय? की तु बाई आहेस??"
"हां! भेंचोद काय फीलिंग होतं ते"
"किती सुंदर वाक्य आहे हे नाही? 'भेंचोद काय फीलिंग होतं ते'! वा वा! आणि फीलिंग कुठलं? तर ह्यांना दिवस गेले होते ते फीलिंग! ते फीलिंग भेंचोद होतं????"
'तवायफ' वगैरे हासते तशी जोरात हासली सीमा गैलाड! दचकून सगळे पाहू लागले.
"मग आता काय मन्या स्वीकारणार आहे म्हणा तुला! आता कुठला मित्राला भेटायला वेळ मिळणार?"
माझ्यातलं नुकतंच जन्माला आलेलं मांजरीचं पिल्लू कुचकुचलं!
"मन्या स्वीकारणार म्हणजे उपकार आहे क्काय??"
"सीमा... ऐक ना! आय वॉन्ट टू स्पीक टू यू..."
"बोल.."
"तू मन्याला स्वीकार! तुझ्यात खूप फरक पडेल..."
"मी आहे तशी तुला आवडत नाही का?"
"मला तू भयंकर आवडतेस, तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण एका निराळ्या धुंदीत जातो, पण बायका अशा नाही वागत! उगाच बदनाम जीवन का जगतीयस??"
"प्रत्येक नात्याच्या हिर्याला एका नावाच्या कोंदणात बसवून त्याची आई का *** रे तुम्ही?"
"तसं नाहीये! तू तुझ्या फ्लॅटवर एकटी, आता तर काय, तोही एकटाच, त्याच्या मुलाबाळांचं काय ते मला माहीत नाही, पण त्यांना हे सगळे समजण्याच्या वयाची ती असणारच! असतील की बारा एक वर्षापर्यंतची! आं? आता मन्या एकटाच! तो तुझ्या मैत्रिणी नसताना तुझ्या फ्लॅटवर येत राहणारच! नाहीतर तुला बाहेर नेत राहणार! तुला त्याच्या बायकोचे स्थान कधीच नसणार! आणि प्रेम तर असणार! हे असे प्रेम वासनेच्या अस्तित्वावर अवलंबून असते. समाज मन्याला काय म्हणणार? समाज बोलणार तुला! तुला पब्लिक कॉलगर्ल समजू लागेल. "
बराच वेळ गंभीरपणे ती व्हिस्की सिप करत राहिली आणि नंतर 'चल, निघू' म्हणाली.
मात्र गाडीत बसल्यावर पुण्याऐवजी ती उलट्या दिशेला जाऊ म्हणाली.
आजची रात्र आही बरेच दिवस प्लॅन करत होतो. खूप खूप लांब ड्राईव्हला जायचे. ड्रिन्क्स घ्यायची आणि दम लागेपर्यंत बडबडत बसायचे, खिदळायचे, एकमेकांना शिव्या द्यायच्या. थोडक्यात, आपण जसे मुळात आहोत तसेच व्हायचे. त्यामुळे आज मी पुण्याबाहेर ऑफीसच्या कामाला आहे असे घरी सांगितलेले होते. माझी वाट कोणीच बघणार नव्हते आणि सीमाची वाट बघायला कोणी नव्हतेच!
कित्येक मिनिटे भरधाव वेगाने जाणार्या गाडीत बर्फाळलेल्या वार्याच्या भपकार्यांना चेहर्यावर सोसत ती तशीच बसलेली होती. नंतर बोलू लागली.
"च्युत्या तत्वज्ञान स्सालं! माझ्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत कोणालाही नाही. मी समर्थ आहे माझी काळजी घ्यायला! आणि नवरा असला की तो चोवीस तास बारा महिने बायकोची काळजी घेऊ शकतो किंवा घेऊ इच्छित असतो असे काही नाहीच! त्यातही तो नवरा, ज्याला मुळातच मुले आहेत आणि निम्मा संसार त्याने तिसर्याच यड**बरोबर केलेला आहे. त्याने मला स्वीकारायची तयारी दाखवली की मी बोहल्यावर चढायचे आणि नंतर तो माझ्यावर! ****** ! कोण ठरवणार हे सगळं?? तुम्हाला लहान मूल आहे आणि आता नोकरी करायची आहे म्हंटल्यावर बहिणीची आठवण झाली का? की आता तिने आपल्या घरी परतावे असे आता वाटू लागले का? लहानपणी माझ्या बापाने साठवलेल्या पैशावर जगले आणि आता माझ्या स्वतःच्या! आय अॅम नॉट डिपेंडंट अॅट ऑल... ऑन एनी वन! मी आणि तू फिरायलाबाहेर पडलेलो आहोत, त्यातसुद्धा कित्येक आठवड्यांनी, कारण आपले वाद झाल्यानंतर आपण भेटलोच नव्हतो! आजच्या भेटीतून मला काय अपेक्षित असेल??? तर केवळ भन्नाट मजा! गप्पा, दारू आणि फिर्णे! वाट्टेल तिथे, वाट्टेल तेव्हा आणि कसेही! चालत नाहीतर कारने! तुला काय अपेक्षा असेल आजच्या भेटीतून?? तर जवळपास तीच..... प्लस.... माझी कहाणी ऐकून द्रवल्यामुळे मला तत्वज्ञान शिकवणे!
बाई म्हणजे तुम्हाला बेअक्कल माणूस वाटते का रे? तिला काही विचार नसतील? तिच्या काहीच पॉलिसीज नसतील ?? तिचे अस्तित्व एका मंगळसूत्रावर अवलंबून??? का?
माझ्या आयुष्याबाबत माझ्या पॉलिसीज ठरलेल्या आहेत. तुझ्यासारख्या मित्रांबरोबर मजा करायची, आवश्यक तितके पैसे मिळवायचे, वाचन करायचं, मुख्य म्हणजे इतर कसलीही जबाबदारी घ्यायची नाही, एकटं राहायचं, बिड्या फुंकायच्या आइ एक दिवस मरून जायचं! मरण्यापुर्वी आजार झाला की अॅडमीट व्हायचं! नाहीतर वय झालं की सरळ वृद्धाश्रमातच राहायला जायचं! आणि हो... भरपूर भरपूर चित्रे काढायची. चित्रांचं एक प्रदर्शन ठेवायचं! त्याची ******* बातमीच छापून आनायची स्साली! फोटोबिटोसकट!
विचार का असं म्हणून! विचार ना! सांगते मी! सगळे सांगते, पण पहिल्यांदा तुला ते धक्कादायक किंवा तिरस्करणीय वाटेल. म्हणून मला मधे तोडू नकोस! पूर्ण बोलूदेत!
भूषण! माणूस चुकतो. त्याला काय हवे असते तेच भेंचोद त्याला समजत नसते.
आनंदाचे प्रकार असतात. दारू पिण्याचा एक आनंद्! सिगारेटचा एक! नाचण्याचा एक! मैत्री निभावण्याचा एक! फिरण्याचा एक! कुटुंबाचा भाग बनून राहण्याचा एक! मुलांना जन्म देण्याचा एक! शिकण्याचा आणि नोकरी करण्याचा एकेक! नवे कपडे घेण्याचा, दागिन्यांचा एक! सेक्सचा एक! प्रतारणेचा एक! विश्वास जपण्याचा एक!
माणसाचं काय चुकतं माहीत आहे का????
या समाजाने केलेल्या नियमांमुळे त्याला हे सगळे आनंदाचे प्रकार एकाच व्यक्तीकडून शोषावे लागतात.
सीमा गैलाड तशी नाही. मी तशी मुळीच नाही. मी तुझ्याबरोबर फिरेन, दारू ढोसेन, तुला किस करेन, पण बेडमध्ये मन्याबरोबर जाईन! शेजारच्या कौमुदी या दोन वर्षाच्या मुलीला खेळवेन, पण स्वतःच्या भाच्याला खेळवेनच असे नाही. मी सगळे आनंद वेगवेगळ्या व्यक्तींकडून मिळवते आणि तेच आनंद त्याच व्यक्तींना देतेही! मी याला माझी बदनामी समजत नाही. समाज समजत असेल! *** **** समाजाची! मी पर्समध्ये एक बारीक हत्यार ठेवूनच फिरते. मला कोनताही आनंद 'शोषावा' लागत नाही. फक्त बोटाने मध चाटावा तसा मी त्या माणसाकडून तो सहजगत्या मिळवते. त्या माणसाचे काहीही नुकसान करत नाही. त्याचा माझ्यावर विश्वास असावा असे मला वटत नाही. माझाही त्याच्यावर नसतो.
हे सगळे करत असताना स्थैर्य मात्र घालवून बसते मी असे वाटेल! पण माझ्यासाठी आयुष्य एक लॉन्ग ड्राईव्ह आहे. ज्यात मुळातच स्थैर्य नाही, सातत्यही नाही. मग मी काय घालवते म्हणे?? काहीही नाही. घालवतात त्या बायका, ज्यांना हे साधे तत्व समजत नाही की एक व्यक्ती म्हणून जगायला गेलो तर आपल्यासाठी आयुष्य हा वसंत ऋतू आहे.
मन्याच्या मिठीत असताना मला तुझी आठवण येऊन जातेही, पण ती त्यासाठी नाही, ती येते ती इतरच कशानेतरी! तुझ्याबरोबर रात्री बेरात्री भटकताना मी आज कित्येकवेळा मन्या, मन्या असे म्हणाले. पण त्याने तुला दु:ख झाले नाही.
भूषण, नाती निर्माण करताना आपण खूप खूप प्रॉब्लेम्स निर्माण करत असतो. फालतू जबाबदार्या आणि फालतू कर्तव्ये! मला ती नको आहेत. मी फ्री आहे आणि तशीच राहणार! एकटी स्त्री म्हणून वाकड्या नजरेने बघणार्या पुरुषांच्या हातून मी कधीही बरबाद होणार नाही. कारण मी समर्थ आहे. शरीर थकले की मरून जाणार! मला या खूप प्रदीर्घ लॉन्ग ड्राईव्हमध्ये कंटाळायचे नाही आहे. मला एन्जॉय करायचे आहे.
एका क्षणी मात्र वाटले होते की आई व्हावे. पण माझ्या विचारसरणीतून जन्माला आलेले आणि बापाचे नांव नसलेले मूल नको होते. खूप क्रूरपणे वागले. पण आता वाटते मी त्या आत्म्यावर दयाच केली.
मी वाईट आहेच! पण मी मूल ठेवावे असे सांगण्याची मन्याच्या **त हिम्मत होती का? कोणत्या बेसवर तो मला असे सांगू शकत होता? शपथा घेऊन त्या मोडल्यावर आणि कित्येक वर्षे संसार केल्यावर माझ्याकडे कोणत्या अधिकाराने यायचा? केवळ मी एक एकटी, तरुण, जुन्या जमान्यापासून जवळची आणि स्वतःच आमंत्रण देणारी स्त्री आहे म्हणून? म्हणजे अगदी तुझ्यासारखंच की? म्हणजे जोपर्यंत आपण वाईट वागतो हे कोणाला कळत नाही तोवर वाईट वागायचे, वागत राहायचे! नाही का? पकडा गया वो चोर है!
थुंकते मी असल्या समाजावर! ही अशी!
पुरुषांची मजा बघायला फार आवडते मला! कारण मला केवळ एक स्त्री इतकीच ओळख देतात ते! म्हणून! म्हणून मी मन्याचा संसार नष्ट केला. म्हणून मी पद्मावती ढाब्याच्या वेटरला हवे ते दिसेल म्हणून हे वरचे बटन ओपन करून ठेवले. म्हणून मी भावाच्या विनंतीवरून घर गेले नाही. म्हणूनच मी व्यसनेही करते आणि शिव्याही देते!
मला स्त्री म्हणून जगायचेच नाही. आत्यंतिक तिटकारा आहे मला अशा पांगळ्या स्त्रीत्वाचा! "
खूप वेळ गाडी नुसती जातच राहिली. दोन विचारांमध्ये गढलेल्या व्यक्तींचे डोळे रस्त्याकडे लागलेले, एक सिगारेट पेटलेली आणि वार्याने अर्धवट शरीरे गोठलेली.
शेवटी घाट उतरायला लागलो तेव्हा तीच बोलू लागली.
"तू फायदा का घेतला नाहीस माझा?? "
"मला तू... तशी आवडत नाहीस... मला तू एक बेधडक बाई म्हणून आवडतेस.. पण प्रोफेसर असून अशी वागतेस ते मात्र आवडत नाही...."
"माझ्या व्यवसायाचा संबंधच नाही.... पण तुला तशी का आवडत नाही मी?? म्हणजे सहज जाणून घ्यायचंय!"
" माझ्या मनात असलेली स्त्रीची किमान प्रतिमा शिव्या देत नाही... दारू स्मोकिंग ठीक आहे.. "
"आणि पुरुष देतात त्या प्रत्येक शिवीत उल्लेख मात्र स्त्रीचाच असतो... "
"त्याचा इथे काही संबंध वाटत नाही... "
"आज तू रात्रभर मोकळाच आहेस... तर त्याचा अर्थ असा होऊ शकतो की तुझ्या मावशीच्या रिकाम्या फ्लॅटवर जाऊन चोरून एकटेच झोपायच्या ऐवजी तू माझ्याही फ्लॅटवर राहू शकतोस आणि मला हातही न लावता रात्र काढू शकतोस... नाही का??"
"मी तुझ्या फ्लॅटवर नाही येणार... मला कोणी पाहण्याची भीती जितकी वाटते त्यापेक्षा मला तुझी भीती जास्त वाटते.."
"का???"
"कारण तू आत्ता केलीस ती सगळी बडबड, तुझे एकंदर वागणे, वगैरे!"
"हं!... म्हणजे.... आता संपलं सगळं.... नाही का???"
"अगदी तसंच नाही सीमा... "
"प्लीज शट अप.... प्लीज..."
"वुई आर फ्रेन्ड्स... पण मैत्रीत हे प्रकार मला तरी...."
"तुला आवडत नाहीत आणि मला आवडतात यातील नेहमी तुलाच काय आवडते तेच का महत्वाचे??? त्याचा अर्थ असा होतो ना की मी गरजू आहे???"
"मैत्रीत गरज बिरज नसते... "
"पुस्तकी वाक्ये फेकू नकोस ******* "
"मी मला जे योग्य वाटत आहे ते बोलत आहे... "
गप्प बसली ती! पण गप्प बसणे तिच्या स्वभावात नव्हते. ती कशी काय गप्प बसली समजेना!
बर्याच वेळाने तिच्या घराखाली गाडी थांबली. गाडीत बसूनच ती बोलू लागली पुन्हा!
"यानंतर फक्त एसेमेस आणि कॉल्स वगैरे करत जाऊयात... भेटायला नको... कारण तुला माझ्या अनेक गोष्टी आवडत नाहीत... आजवर मला सहन केलेस त्याबद्दल थॅन्क्स... ही आपली...... "
माझ्या डोळ्यात पाणी आले होते. का माहीत नाही. माझ्यातले खेडे माझीच थट्टा करत होते. मी तिच्याकडे पाहिले तर.. मला कधीही न पाहायला मिळालेले दृष्य दिसले... ती रडत होती... तिच्या डोळ्यातून काही थेंब गालांवर आलेले मला अंधुक प्रकाशात जाणवले... तिचा आवाजही भरून आलेला होता...
"ही आपली शेवटची भे..... भेट... मी वर जाऊन तुझ्यासाठी आणलेला शर्ट घे... ऊन येते... तोपर्यंत थांब... आणि हं.... आणखीन एक... मी... मी मन्याला स्वीकारणार आहे... तू म्हणतोस तशी वागणार आहे... थाब इथेच... आले मी"
मला ते सहन होईना! मीही गाडीबाहेर येऊन लॉक करून तिच्या मागे चार पावले चाललो.
"तू का येतोयस वर??"
"मला... मला वर यायचंय.."
ती आणि मी अजूनही तशाच मनस्थितीत होतो.
"का???"
"मला तो शर्ट घालूनही बघायचाय... तुला घालून दाखवायचाय सुद्धा... "
एक अक्षरही न बोलता ती लिफ्टकडे गेली. आम्ही दोघे तिच्या फ्लॅटपाशी गेलो. लॅचच्या किल्लीने तिने दार उघडले.
"अरे राधिका?? तू जागी आहेस???"
सीमा गैलाडने आत असलेल्या मैत्रिणीकडे बघत विचारले. ही राधिका फ्लॅटवरच असताना मगाशी सीमा मला कशाला बोलावत होती ते समजले नाही. मी खूप ओशाळलो होतो. त्या दोघी अॅट ईझ होत्या मात्र!
पण राधिकानेच तो प्रश्न सोडवला. हासत हासत म्हणाली..
"आय जस्ट वॉन्टेड टू सी हिम... कोण आहे तो ज्याच्या विषयावर तू आमचे कान किटवतेस आणि ज्याच्यासाठी तू मन्याचा प्रस्ताव नाकारत आहेस...."
स्टन्ड!
तीव्र धक्का बसून मी सीमा गैलाडकडे पाहात होतो. ती राधिकाकडे हादरून आणि अविश्वासाने! आणि राधिका माझ्याकडे खेळकरपणे आणि लाजरे हासत म्हणाली...
"नॉट अ बॅड चॉईस सीमा... आय नो ही इज मॅरिड..बाय... गुड नाईट...."
राधिका वीजेसारखी आतल्या खोलीत निघून गेली.
आपण कोणालातरी प्रमाणाबाहेर आवडत असणे आणि त्याला आपण पूर्णपणे प्राप्त न होणे ही भावना सुद्धा खूप खूप दु:खदायक असते.
सीमा गैलाड सोफ्यावर आदळली तसा मीअलगद तिच्या शेजारी बसत म्हणालो...
"तू... हे मला काहीच माहीत नव्हते... मी तुला... इत..."
"हो! आवडतोस... अप्राप्य आहेस हे माहीत आहे... पण आवडतोस... मन्याशी लग्न केले तर आपण कसे भेटणार???"
स्वतःहून आणि अगदी स्त्रीसुलभपणे तिने माझ्या खांद्यावर मान टेकवली. त्या क्षणी जरी आपण कोणालातरी फार फार आवडतो याचा मला अभिमान वाटत असला तरी तिच्या त्या दु:खाने आणि येऊ घातलेल्या प्रदीर्घ विरहाच्या कल्पनेने मी स्वतःही खूप दु:खी झालो.
करकचून मिठी मारली आणि ती मिठी कितीतरी वेळ तशीच होती. जोवर मी तिला असे म्हणालो नव्हतो की...
"प्लीज डोन्ट मॅरी हिम... आय लव्ह यू टू....."
क्षणभरातच ती बाजूला झाली आणि माझ्याकडे बघत म्हणाली... अगदी कोरडेपणाने...
"हा शर्ट... घाल बरं?"
मी शर्ट घातला... मला आणि तिलाही आवडला...
मीपुन्हा तिच्या जवळ जायला लागलो तेव्हा तिने आश्चर्यकारकरीत्या अत्यंत वेगळ्याच स्वरात मला फटकारले....
"लांब हो... तुझ्या थेंब थेंब प्रेमाच्या शिडकाव्यासाठी मी एकटी राहू होय रे ******????"
सीमा गैलाडचे आडनांव आता बदलले आहे. एक मुलगी आहे तिला! भेटणे केव्हाच बंद झाले. दोन घरे सोडली की लगेच माहेरही आहे तिचे!
शर्ट अजूनही ठेवला आहे मी! घालत मात्र कधीच नाही... उगाच खराब व्हायचा!
तिची आठवण आली की हृदय क्षणभर थांबतेच!
नो संपर्क!
आई निजवली मैत्रीची स्सालीने!
एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो
-'बेफिकीर'!
(नावे काल्पनिक)
====================================================
नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826
जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871
घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000
नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230
दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898
त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193
म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432
माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217
==================================================
-'बेफिकीर'!
लिखाणाचा फ्लो चांगला आहे.
लिखाणाचा फ्लो चांगला आहे. भाषा अंगावर येत असली तरिही असं बोलणार्या स्त्रिया अस्तित्वात असाव्यात असं मी धरून चालते.
सगळ्यात जाणवलेली गोष्ट म्हणजे आपण जसे आहोत तसेच (स्वत:ला न बदलता, कोणताही मुखवटा न घालता) वावरता येणं हे सीमासाठी फार महत्वाचं होतं. आणि ते तिला तुमच्या सानिध्यात करता यायचं...
दक्षे, अनुमोदन (मी कथा अर्धीच
दक्षे, अनुमोदन
(मी कथा अर्धीच वाचली आहे. पुढची वाचत आहे)
ती- टॉम बॉईश वागण्याचा अतिरेक होऊन घडलेली पर्सनॅलिटी वाटते आहे आणि इथे हे ही महत्त्वाचे की, नायक तिच्या सान्निध्यात "तो"च म्हणून वावरू शकत होता- तिच्याचप्रमाणे.. आयुष्यात असा एक जरी व्यक्ती कमावला की पुरे असावे (वैम) !
दक्षिणा, आपण काहीशी पाठ
दक्षिणा,
आपण काहीशी पाठ थोपटल्याबद्दल मनापासून आभार व भाषा अंगावर येणारी वाटल्याबद्दल दिलगीर! ती तशीच होती हे मात्र खरे! पण मीही जरा घाबरत घाबरतच ते सगळे लिहीत होतो. खरे तर कालपासूनच तयार होती ही सत्यकथा लिहून, पण जरा विचारच करत बसलो लिहावे की नाही हे!
माझ्या सान्निध्यात अनेक लोक, मित्र, नातेवाईक, ऑफीसमधील सहकारी हे काहीसे ओपन अप होतात हा माझा अनुभव खरा आहे. कदाचित हे दुराभिमानी विधान वाटू शकेल, पण ते सत्य मात्र आहे.
आपल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा मनापासून आभार!
-'बेफिकीर'!
व्वा बागेश्री, आपला
व्वा बागेश्री, आपला प्रतिसादही आवडला. आपण दोघींनी पहिले प्रतिसाद दिल्यामुळे मला थोडेसे शांत वाटत आहे, खरे तर मला जरा भीतीच वाटत होती.
>>ती पुर्वी इंजिनिअरिंग
>>ती पुर्वी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर होती. तिथे एक भयानक प्रकार झालेला होता. कॉलेजचे नांव मुद्दाम लिहीत नाही आहे.<<
>>सीमा गैलाडचे आडनांव आता बदलले आहे. एक मुलगी आहे तिला! भेटणे केव्हाच बंद झाले. दोन घरे सोडली की लगेच माहेरही आहे तिचे!<<
हि सत्यकथा आहे...की कल्पनाविलास?
हि सत्यकथा आहे...की
हि सत्यकथा आहे...की कल्पनाविलास?>>>>>>
९० % सत्यकथा! काही गोष्टी लिहिताच आल्या नाहीत.
आभारी आहे.
बेफी काळजी नसावी.. भाषा
बेफी काळजी नसावी.. भाषा माझ्या अंगावर आलेली नाही. इतरांच्या येऊ शकते या अर्थाने ते वाक्य मी लिहिले आहे.
>>माझ्या सान्निध्यात अनेक लोक, मित्र, नातेवाईक, ऑफीसमधील सहकारी हे काहीसे ओपन अप होतात हा माझा अनुभव खरा आहे. कदाचित हे दुराभिमानी विधान वाटू शकेल, पण ते सत्य मात्र आहे. >> खूप चांगली गोष्ट आहे. कारण लोकांना मुखवटे पांघरायचा खरंच कंटाळा असतो.
धन्यवाद बेफ़िकीरजी छान लिहलय,
धन्यवाद बेफ़िकीरजी
छान लिहलय, भाषा आक्षेपार्य असली तरी....
मला वाटतं आक्षेपार्य भाषा
मला वाटतं आक्षेपार्य भाषा वापरली नसती तर सीमा गैलाड व्यक्तच झाली नसती....जगाची काळजी न करता जगता येण हे खुप अवघड आहे आणि ती ते जगत होती ...Hats off to her...khup mast personality ahe ...
दक्षिणा आणि बागेश्री या
दक्षिणा आणि बागेश्री या दोघींना अनुमोदन. वाचल्यावर मला जे वाटलं तेच या दोघींनी लिहील्यामुळे अधिक काही बोलण्यासारखे शिल्लक नाही.
मला वाटतं आक्षेपार्य भाषा
मला वाटतं आक्षेपार्य भाषा वापरली नसती तर सीमा गैलाड व्यक्तच झाली नसती....>> अनुमोदन १००%
शोनु - कुकु, (नांव मस्तच आहे
शोनु - कुकु,
(नांव मस्तच आहे आपले)
प्रतिसादाबद्दल खूप आभार व आता आपण म्हंटल्यावर मलाच वाटू लागले आहे की ते आवश्यक होते.
मंदारराव,
मनापासून आभारी आहे. आपण नेहमीच दिलखुलास दाद देता.
-'बेफिकीर'!
सीमा गैलाडची व्यक्तीरेखा मी
सीमा गैलाडची व्यक्तीरेखा मी एका चित्रपटात पाहिल्यासारखे अंधुक आठवत आहे..... बाकी तिच्या अश्या भाषेमुळेच ती प्रखरपणे व्यक्त होत आहे.
फार आवडलं हे लेखन.
मस्त लिहीलय बेफिकीरजी.
मस्त लिहीलय बेफिकीरजी.
आयला बेफी........परत जाळ
आयला बेफी........परत जाळ काड्ला राव.....लै भारि!!
तुमचं ऑब्झर्वेशन खूपच भारी
तुमचं ऑब्झर्वेशन खूपच भारी आहे राव....!!!
>>>
आनंदाचे प्रकार असतात. दारू पिण्याचा एक आनंद्! सिगारेटचा एक! नाचण्याचा एक! मैत्री निभावण्याचा एक! फिरण्याचा एक! कुटुंबाचा भाग बनून राहण्याचा एक! मुलांना जन्म देण्याचा एक! शिकण्याचा आणि नोकरी करण्याचा एकेक! नवे कपडे घेण्याचा, दागिन्यांचा एक! सेक्सचा एक! प्रतारणेचा एक! विश्वास जपण्याचा एक!
या समाजाने केलेल्या नियमांमुळे त्याला हे सगळे आनंदाचे प्रकार एकाच व्यक्तीकडून शोषावे लागतात.
>>>
>>>
"तुला आवडत नाहीत आणि मला आवडतात यातील नेहमी तुलाच काय आवडते तेच का महत्वाचे??? त्याचा अर्थ असा होतो ना की मी गरजू आहे???"
>>>>>
आधी अर्धवट वाचून सोडलं होतं.... आता निवांतपणे सलग वाचलं..... आवडलं....!!!
किती ओघवते लिहिले आहे तुम्ही
किती ओघवते लिहिले आहे तुम्ही ...आवडलं !
भाषा जरी रानटी असली तरी कृत्रिम पणा न्हवता ! विलक्षण व्यक्तिरेखा उभी राहिली सीमाची समोर !शेवट वाचून डोळ्यात पाणी आले..मैत्रीला सलाम!
मनातले सारे शब्दात गुंफणे खरच खूप मोठी कला आहे.
सीमाबरोबर 'आपल्याला खरेखुरे
सीमाबरोबर 'आपल्याला खरेखुरे आपण ' होता येणे हा अद्वितीय फायदा मी दोन वर्षे घेत राहिलो. नाहीतर परक्याबरोबर, या परक्यात आई, बाप, बायको, पोरे, मित्र सगळे आले, अशा परक्यांबरोबर आपल्याला 'आपण स्वतः' होताच येत नाही. आपण त्यांचे कोणीतरी आणि ते आपले कोणीतरी असतात. सीमा गैलाडचे मात्र तसे नाही. ती सीमा गैलाड असते, आपली कोणीही नसते, आपण आपण असतो, तिचे कोणीही नसतो आणि तरीही...
>>> वा.... वा.....कटकरराव हा लेख समजायला अगदी मला हवी होती अशी वाटली ही वाक्ये.
सिमा चे विचार पटले...
<सीमा गैलाड तशी नाही. मी तशी मुळीच नाही. मी तुझ्याबरोबर फिरेन, दारू ढोसेन, तुला किस करेन, पण बेडमध्ये मन्याबरोबर जाईन! >
ते काही असो भूषणराव..., पण लिहण्याची ईस्टाईल एकदम 'रापचीक' आहे.....नाही तर 'सिमा गैलाड' म्हणजे काय?...... हे 'झाट' समजलं नसतं
वा वा!! एकंदरीत लोकांना
वा वा!!
एकंदरीत लोकांना आपणहून स्वतःचं आयुष्य उघड्यावर मांडायचा सोस असतो आणि इतरांना ते चघळायचा!
रिप्ल्याय म्हणजे "शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्याच्या घरात" असा प्रकार आहे जनोबा!
सत्यकथा म्हटलं की वाचायचा अँगलच बदलून जातो दादा!!
नेहेमीप्रमाणे छान!
नेहेमीप्रमाणे छान!
बेफी, तुम्च्या लिखाणाने अनेक
बेफी, तुम्च्या लिखाणाने अनेक जण "इन्स्पायर" होण्याची शक्यता नाकारता येत नाही. what say???
फोर आर्मवरील म्हणजे?
फोर आर्मवरील
म्हणजे? तुम्हाला चार चार हात आहेत?
'आपल्याला खरेखुरे आपण '
असे आहात तुम्ही खरेखुरे? इतर लोकांच्यात वावरताना तुम्हाला फार त्रास होतो का?
का दारू पिणे, सिगारेट पिणे, शिव्या देणे म्हणजे काहीतरी 'उच्च' दर्जाची कला आहे असे म्हणायचे आहे का? इथे लिहून वेळ कशाला वाया घालवता? सरळ सरळ पोर्नॉग्राफी लिहा ना. खूप पैसे मिळतील. चित्रे पण काढा त्यात!!
आर्ट फिल्मच्या नावाखाली घाणेरडे सिनेमे काढून भरपूर तिकीट लावून पैसे मिळवण्याचा धंदा पण चांगला चालेल तुमचा!!
ही सगळी आपली माझी वैयक्तिक मते हो. तुम्हाला वाटले तर म्हणा बुरसटलेला. पण असले काही न करता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन जीवन यशस्वी केलेली माणसे आहेत जगात!
तुम्ही वेगळ्याच लोकांत वावरता!!
म्हणजे? तुम्हाला चार चार हात
म्हणजे? तुम्हाला चार चार हात आहेत?>>>>
असे आहात तुम्ही खरेखुरे?>>>> बराचसा आहे.
इतर लोकांच्यात वावरताना तुम्हाला फार त्रास होतो का?>>>> बरेचदा होतो. मी स्वतःबरोबर व अशा (म्हणजे वर उल्लेखलेल्या प्रसंगासारख्या ) प्रसंगी सर्वाधिक कंफर्टेबल असतो.
का दारू पिणे, सिगारेट पिणे, शिव्या देणे म्हणजे काहीतरी 'उच्च' दर्जाची कला आहे असे म्हणायचे आहे का? >>>>
व्यसनांचे उदात्तीकरण वरील ललितामध्ये केले नाही मी! तसे वाटत असल्यास क्षमस्व!
इथे लिहून वेळ कशाला वाया घालवता? >>>>
आयुष्य म्हणजे वेळ वाया घालवणेच असते. माणूस जर संत किंवा खराखुरा शास्त्रज्ञ यापैकी एक झाला नाही तर तो आयुष्यातील सर्व वेळ वायाच घालवत असतो. संत व खराखुरा शास्त्रज्ञ कसलातरी असा शोध लावतात जो इतरांसाठी महत्वाचा ठरतो व त्यांच्या त्या शोधक प्रवृत्तीमुळे त्यांना मिळालेल्या जन्माचे ते काही प्रमाणात सार्थक करतात.
सरळ सरळ पोर्नॉग्राफी लिहा ना. खूप पैसे मिळतील. चित्रे पण काढा त्यात!!>>>>
अवश्य! आपल्या संपर्कात काही निर्माते, दिग्दर्शक व यशस्वी कलाकार असतील तर मला विपू करावीत. पटकथा जवळपास तयार आहे. एक शेवटची नजर आपण फिरवलीत की झाले. (हलके घ्यावेत) . आपल्या या विधानावरील हा गंमतीचा प्रतिसाद सोडला तर मला खरे असे म्हणायचे आहे की आयुष्य ही पोर्नोग्राफिक कथाच असते. माणूस सतत स्वतःच्या कृतींचा ठरवल्या गेलेल्या जीवनमूल्यांशी संभोग करून ते दृष्य मिटक्या मारत बघत असतो. याला लिंग, वय, देश, संस्कृती, शिक्षण, वंश या कशाचेही बंधन नाही. आपणच बघा, आपण हे ललित वाचून निघून जाऊ शकला असतात. पण 'दुसर्याला स्वतःहून मनस्ताप देऊ नये' या मानवी जीवनमूल्याला आपल्या 'मनस्ताप देणार्या कृतीबरोबर' आपण एका शय्येवर झोपायला लावलेत व आता मिटक्या मारत त्या मूल्यावर होत असलेला बलात्कार बघत आहात किंवा असाल.
आर्ट फिल्मच्या नावाखाली घाणेरडे सिनेमे काढून भरपूर तिकीट लावून पैसे मिळवण्याचा धंदा पण चांगला चालेल तुमचा!!>>>
या अनुभवी आशीर्वादासाठी माझा नमस्कार!
ही सगळी आपली माझी वैयक्तिक मते हो.>>>>
होय! मला त्याची कल्पना आहे.
तुम्हाला वाटले तर म्हणा बुरसटलेला. >>>>
मला आपल्यावद्दल आदर वाटतो.
पण असले काही न करता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन जीवन यशस्वी केलेली माणसे आहेत जगात!>>>
वरील ललितामध्ये कोठेही मी असे म्हणालेलो नाही की हे असे काही करून मी किंवा कोणी यशस्वी झालेले आहे. हा फक्त एक अनुभव आहे. जीवन यशस्वी करणे म्हणजे काय याबाबत तुमचे व माझे विचार जुळणे अवघड वाटते, पण आपल्या वयाचा विचार करता मी त्याबाबत बोलणे हा लहान तोंडी मोठा घास होईल.
तुम्ही वेगळ्याच लोकांत वावरता!!>>>>
असं दिसतंय खरं!
======================
झक्की महोदय,
वरील ललित, त्या स्वरुपाची मी आजवर लिहिलेली इतर ललिते व इतर जे काय लिहिले असेल त्याबाबत :
जसा मला लिहिण्याचा अधिकार दयाळूपणे मिळाला आहे तसाच तुम्हालाही! मी माझ्या वैयक्तीक आयुष्यात पिवळ्या कथा लिहून पैसे खेचावेत हा आपला सल्ला व तत्सम मते अतिशय व्यक्तीगत वाटली. अर्थात, मीच माझे खासगी जीवन चव्हाट्यावर आणल्यावर इतरांनी त्यावर टिपण्णी करणे हे काही चुकीचे ठरू शकत नाही. पण जागतिक मराठी काव्य, सुखनवर बहुत अच्छे, वादात या कुणीही सहसा पडू नये ही गझल, काही वाहती पाने, काही ज्वालाग्रही धागे, पैशासाठी अमेरिकेला इतके गेले ही रचना व वरील ललित या सर्वांखाली आपण माझ्यावर यथेच्छ टीका केलेली आहेत व ती सर्व व्यक्तीगत स्वरुपाची आहे. मी लहान असल्याने मी काही बोलणे योग्य होणार नाही. बाकी परवाच आपण मला केलेल्या विपूनंतर मला वाटले की आपण बालकाला येथे बागडू द्याल व तशी परवानगीही द्याल! पण आपला अनाकलनीय राग अजून गेलेला दिसत नाही.
झक्की महोदय तसेच सर्वच सहृदय प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार मानतो.
-'बेफिकीर'!
एक्स्प्लोझिव्ह बट टचिंग!! जसे
एक्स्प्लोझिव्ह बट टचिंग!!
जसे आहे तसे व्यक्त होणे हे सगळयांनाच जमत नाही. आपल्याला ते जमते ह्याचा हेवा वाटतो.
कैलासराव व कंसराज - खूप आभारी
कैलासराव व कंसराज - खूप आभारी आहे.
नानासाहेब -
जाळ काढला
भुंगाजी व दिव्ति - खूप आभार!
चातकराव - '**' समजलं नसतं!
बहिर्जी, निलिमा - आभारी आहे.
चंचल - खरं सांगू का? सीमा याहीपेक्षा भयंकर होती व असेलही! खरे तर स्त्रीने असे व्हावे असे मलाच वाटते राव! खूप आभारी आहे.
कणखर - धन्यवाद!
-'बेफिकीर'!
बेफी, सीमा खरी वाटली नाही.
बेफी, सीमा खरी वाटली नाही. दारू पिणार्या, सिग्रेट ओढणार्या, शिव्या घालणार्या किंवा सेक्सबद्दल इतकी स्पष्ट मते असणार्या स्त्रिया नसतात अस मी म्हणत नाही. पण तिचं अंतरंग आणि तिचा बाह्य मुखवटा ह्यात तफावत आहे. जगाला फाट्यावर मारणार्या स्त्रीला मनातल्या गोष्टी तोंडावर बोलता येत नाहीत हेच मुळी पटलेलं नाही. कसं जगेन याबद्दल ती जे बोलली तसं जगणं तिला सहज शक्य होतं असं मला तरी वाटतं. आयुष्याच्या तत्वज्ञानाचे इतके डोस पाजणार्या सीमाने शेवटी चाकोरीबद्ध गोष्टीच आपल्याश्या केल्या. त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की साधी 'मैत्री' तिला राखता आली नाही. त्यामुळे मला तुमची सीमा काही खरी वाटत नाही.
वाचताना मला वाटलं की सीमा
वाचताना मला वाटलं की सीमा म्हणजे एक काल्पनिक प्रकरण असावे, पण अशी स्त्री अस्तित्वात आहे हे ऐकून आश्चर्य वाटले, मन्याला स्वीकारण्याचा निर्णय मात्र सीमाची ओव्हरऑल पार्श्वभूमी पाहता चुकीचा वाटला. अर्थात हेमावैम.बाकी स्त्रीजातीसाठी सीमा म्हणजे ''स्त्री कशी असावी( वैयक्तिकदृष्ट्या) तसेच कशी नसावी ( सामाजिकदृष्ट्या)'' ह्या दोन्हींचे एकमेव उत्तम उदाहरण आहे.
पुलेशु.
दक्षिणा अन बागेश्रीला अनुमोदन.
मला वाटतं आक्षेपार्य भाषा वापरली नसती तर सीमा गैलाड व्यक्तच झाली नसती.>>>>> पूर्णत: अनुमोदन.
छान आहे...... आवडल
छान आहे......
आवडल नेहमीप्रमाणे......
बेफी, सीमा खरी वाटली नाही >>
बेफी, सीमा खरी वाटली नाही >> अनुमोदन. सीमाच काय पण चोविसपैकी बाकीच्या एक्-दोन (एक गोड ख्रिस्ती रिसेप्शनिस्ट - गोव्याची बहुतेक अन दुसरी आत्ता आठवत नाही) वगळता - कल्पनाविलास किंवा दोन आण्याच्या कोंबडीला बारा आण्याचा मसाला टाईप वाटल्या.
हे मा वै मत. 
छान आहे...
छान आहे...
Pages