शासन हे सुस्त
प्रशासन व्यस्त
कायद्याच अस्त
तरिही "जय महाराष्ट्र" मस्त
फासावर शेतकरी
गॅसवर कष्टकरी
वसुलीवाला दारी
कर्जदार फरारी
तरिही "जय महाराष्ट्र" ललकारी
सर्वत्र भारनियमन
अंधाराचं आंदण
वीजबिलाचं दडपण
शुल्कांची पखरण
तरिही "जय महाराष्ट्र" जागरण
समाजकंटक मुक्त
वर्दीवरती रक्त
हाती दांडा फक्त
लढण्याची ताकीद सक्त
तरिही "जय महाराष्ट्र" भक्त
पाण्यासाठी वणवण
हंड्यामागे दहाजण
कालव्याचे वळण
बिन पाण्याचे धरण
तरिही "जय महाराष्ट्र" दळण
कामगारांना आराम
उद्योगाला विराम
सरळ मार्ग हराम
रावणामुखी राम
तरिही "जय महाराष्ट्र" सलाम
विद्यार्थ्यांची ओळ
चाचण्यांचे मोहोळ
शिक्षकात घोळ
शिक्षण बट्ट्याबोळ
तरिही "जय महाराष्ट्र" कल्लोळ
निवडणुका बेरंग
आचारसंहिता भंग
युती आघाड्या तंग
मतदारराजा भणंग
तरिही "जय महाराष्ट्र" अभंग
खड्ड्याखड्ड्यात रोड
अडथळ्यांची चढाओढ
ट्रॅफिकची घोडदौड
सिग्नलला तडजोड
तरिही "जय महाराष्ट्र" बेजोड
मेगाब्लॉकमध्ये रेल
लोंबकळणार्यांची रेलचेल
सिस्टीम सारी फेल
२४ तास लेट मेल
तरिही "जय महाराष्ट्र" आलबेल
मराठी माथी ताज
चिंध्यात झाकली लाज
संमेलनांचे साज
श्रीमंतीचा खोटा माज
तरिही "जय महाराष्ट्र" आवाज
जय महाराष्ट्र
Submitted by कौतुक शिरोडकर on 12 August, 2008 - 07:10
गुलमोहर:
शेअर करा
मस्त जमलं
मस्त जमलं बॉस.
बॉस म्हणुन
बॉस म्हणुन लाजवताय राव.
कृपया असं
कृपया असं समजू नये. यात कुठलीच उपहासाची भावना नाही. प्रत्येक जण आपापल्या प्रांतात दादा असतो. जिथे त्याची दादागिरी दिसते तिथे हा शब्द आपोआप येतो. जे माझ्या मर्यादेत खरं आहे तेच मी लिहिलं आहे.
.........अज्ञात
नवीन
नवीन महाराष्ट्र गीत?
फँटॅस्टिक रे..
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!
कौतुक,
कौतुक, साधे, सोपे पण चपखल शब्द वापरलेस. मस्त.
कौतूक,
कौतूक, खरचं तुझं नाव सार्थक आहे. नावाप्रमाणे कौतुकास पात्र आहेत तुझ्या कविता. मजा आली.
खरंय. *** Skating
***
Skating away on the thin ice of the new day...
आभारी आहे.
आभारी आहे.
मराठी माथी
मराठी माथी ताज
चिंध्यात झाकली लाज
संमेलनांचे साज
श्रीमंतीचा खोटा माज
तरिही "जय महाराष्ट्र" आवाज
हे मस्त