......विद्या सारखी आरशात बघून मेकअप् नीट झाला कां बघत होती व मनासारखा न वाटल्याने स्वतःवरच सारखी चीडत होती. अर्धा तास मी हा तिचा स्वतःवरील त्रागा बघत होते.
......शेवटी न राहवून मी विद्यास म्हणाले, "अगं किती वेळ आरशासमोर घालवणार आहेस? वक्तृत्व स्पर्धा आहे, सौंदर्यस्पर्धा नाही. एवढा मेकअप् करून तुझा चेहरा त्रासिक ठेवलास तर तो मेकअप् काय कामचा? नुसत्या चांगल्या मेकअपने किंवा सुंदर दिसण्याने व्यक्तिमत्व उठावदार दिसेल हा तुझा गैरसमज आहे. अगं सुंदर सुंदर दिसण्यासाठी फक्त बाहेरून वापरली जाणारी क्रिम्स, औषधे वगैरेच उपयोगाची असतात असं नाही. त्यासाठी प्रथम हवं "प्रसन्न तणावरहित मन.." प्रत्येक व्यक्तीची पहिली ओळख त्याच्या चेह-याने होते. चेहरा मनांतील भाव अगदी स्पष्टपणे व्यक्त करतो. आरशांत आपलं प्रतिबिंब दिसतं नां तसंच मनातल्या भावनांचं प्रतिबिंब चेह-यावर झळकते. मन आनंदी असेल व मेकअप् केलेला नसेल तरी चेहरा प्रसन्न दिसतो. अगं आत्मविश्वासाने व उत्साहाने बोलायला लागलं की चेह-यावर आपोआपच एक तेजस्वी झळाळी येते. ती आपलं व्यक्तिमत्व सुंदर अन् उठावदार बनवते. छोट्या छोट्या गोष्टीमुळे टेन्शस घेऊन आपण दु:खी राहिलो तर कितीही मेकअप् केला तरी चेहरा सुंदर दिसुच शकत नाही. अगं, आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांचं जाळं पसरलेलं असतं. पाच इंद्रियांच्या मदतीने बाह्य जगाच्या सर्व सूचना मेंदूपर्यंत सतत पोहचत असतात. त्यामुळं घाबरणं, भीती, आत्मविश्वासाची कमतरता या गोष्टींचे परिणाम चेह-यावर तातडीने दिसतात. अति विचार केल्याने किंवा टेन्शन घेतल्याने डोके दुखते. त्यामुळे इतके सारे बदल शरीरांत झाल्यावर चेहरा सुंदर कसा दिसणार? जेव्हा माणसाच्या शरीरात आनंद, उत्साह असतो तेव्हा त्याला आपोआपच कार्यरत होण्याची इच्छा होते व संपूर्ण शरीरही त्याला साथ देतं. संपूर्ण शरीरामधून एनर्जी वाहू लागते. रक्तप्रवाह जलद वाहू लागतो व सर्वत्र पोहोचतो. या सगळ्या गोष्टींचा परिणाम होवून माणसाचं व्यक्तिमत्व आपोआपच सुंदर दिसतं. उत्साही..... आनंदी व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात एक वेगळेपणा आपोआपच जाणवून येतो. समोरच्या माणसांच्या मनांत तो चटकन् भरतो. मेकअप कितीही केलेला असला व तुमचं मनच प्रसन्न नसेल तर तो मेकअप तुम्हला सुंदरता देऊ शकत नाही."
......"काकू, अगं तुझं सगळं म्हणणं पटतय गं....... पण तरीही दिसण्यालाही बरेच जण खूप महत्व देतातच नां?" विद्या मला म्हणाली.
......"अगं पण हे महत्व कायमस्वरूपी टिकणारं नसतं......., वरवरचं असतं. काही वेळा मनांतील रागामुळे किंवा टेन्शनमुळे आपण आपलेच भान हरपून बसतो. त्यामुळे आपल्याला इतर विचार कांही सुचतच नाही. अशावेळी आपल्याला अशा राग आलेल्या व्यक्तीला आपण क्षमा करायला शिकायलाच हवी. आत्मपरिक्षण करायला हवे. त्याचा फायदा आपणांसही खूप होतो. त्यामुळे मनांवरील ताण कमी होतो. सतत कोणत्या ना कोणत्या खोट्या बुरख्याखाली टेन्शनने वावरण्याची गरज नाही. संबंधात जास्तीत जास्त मोकळेपणा हवा. आपल्या अंर्तमनाचा आवाज ऍकून सकारात्मक विचारांबरोबरच शरीराचा आदर करायला शिकलं पाहिजे. तर शरीरही तुमचा आदर करेल. त्यामुळं तुमचं मन आनंदी राहिल. प्रसन्न चेह-यावरील आनंद व हास्य यामुळं एक वेगळंच प्रभावी व्यक्तिमत्व तयार होतं. आनंद हाच सौंदर्याचा मूळमंत्र आहे. तोच तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक बनवतो." मी विद्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
......"अगं तू म्हणतीयस ते खरय पण.... माझी प्रतिस्पर्धी रीना आहे नं, ती दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे तिची छाप लगेचच बघणा-या व्यक्तीवर पडते. त्यामुळं सारखं वाटतं, मी आपली दिसायला सामन्य..... माझी वक्तृत्व स्पर्धेची तयारी चांगली झाली असली तरी माझ्या सावळ्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव कसा पडणार? याची काळजी वाटते." विद्या म्हणाली.
......"अगं वेडा समज आहे तुझा...... कितीतरी वेळा आपण दिसायला सामान्य पण प्रभावी वक्तृत्व असणा-या व्यक्ती पाहतो. अशावेळी त्यांच्या दिसण्याचा काहीही संबंध न राहता त्यांच्या वक्तृत्वाने भारावून नाही कां जात? त्यावेळी अशा व्यक्तीचं व्यक्तीमत्वही आपोआपच उठावदार दिसू लागतं. तू तुझ्या मनांतील हा न्यूनगंड प्रथम काढून टाक, तू वक्तृत्व स्पर्धेत प्रसन्न, आनंदी, तणावरहित मनाने व आत्मविश्वासाने जा. तुझी तयारी खूप चांगली झालीय. तुझ्या वक्तृत्वाच्या प्रभावाने तुझं व्यक्तिमत्व आपोआपच उठावदार बनेल. अब्दुल कलाम, किरण बेदी, लता मंगेशकर यांच्याकडे फार मोठं सौंदर्य नाही.... पण त्यांच्या कर्तबगारीने त्यांचे आहे व्यक्तिमत्व उठून दिसतंच नां? म्हणून सांगते, सातत्याने फार मेकअपची गरज नसते. मेकअप आणि निटनेटकेपणा यातील फरक समजून घे. तसंच तू निश्चितच यशस्वीही होशील. पण वेळ आली तर अपयश पचवायची देखील तयारी हवी. अगं कुणीतरी हरायचं कुणीतरी जिंकायचं. शेवटी पहिला नंबर एकाचाच येऊ शकतो. दोघांचा नाही. परंतु आयुष्यातील ही काही अंतिम स्पर्धा नव्हे. समजा हरलीस तर.... वाईट वाटेल्.....पण पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागायचं. पराभवही खिलाडू वृत्तीने घेता यायला हवा नं..!" मी विद्यास म्हणाले.
.......विद्या माझ्या या बोलण्याने भारावून गेली. त्याच्या प्रभावाने तिच्या चेह-यावर आपोआपच आनंद..... समाधान झळकून तिचं सावळं सौंदर्य ऊठावदार दिसू लागलं. आत्मविश्वासाच्या आनंदामुळे ती मला नेहमीपेक्षा जास्तच सुंदरही भासू लागली.....!
आपल्या जवळपासही अशी सावळी सौंदर्ये खूप असतील....... ती निरखून नक्की पहात जा......
पटलं!!!!!!!!!!!!!!!! मनापासून पटलं!!!
एक छोटिशी गोष्ट....
सगळी माणसं सुंदर रंगीत फुलांकडेच लक्ष्य देत.
त्यामुळे रंग नसलेली फुलं हिरमुसली अन देवाकडे गेली,
देवबाप्पा म्हणाला "अरे !!! एवढंच ना? मी तुम्हाला छान सुगंध देतो ज्यामुळे माणसं तुमच्याकडे आकर्षित होतील."
तात्पर्यः रंगामुळे तुमची योग्यता ठरत नाही तर तुमच्या अंगभूत गुणांमुळे ठरते.
खरय .. साक्षी..
मला माझ्या मैत्रिणीची आठवण झाली.. चार बहिणींमध्ये तीच खूप सावळी होती... खूप हळवी
मनानं खूप छान...