फ़्रॅन्कफ़र्ट ते वॉशिंग्टन डीसी
माझा मुंबई ते फ़्रॅन्कफ़र्ट प्रवास छानच झाला. आता फ़्रंकफ़र्ट ते वॉशिंग्टन डीसी या प्रवासासाठी सज्ज झाले. सामान थ्रू ऍंन्ड थ्रू असल्याने हातात फ़क्त एक पर्स आणि तब्बल चार तास!
पुढच्या फ़्रॅन्कफ़र्ट ते वॉशिन्ग्टन डीसी फ़्लाइटला चार तासांचा अवकाश होता. आतापर्यंतचे सगळे सोपस्कार काहीही चूक न होता पार पडले होते. आणि मी फ़्रॅंकफ़र्ट विमानतळावर होते. आता एकदा नक्की गेट नंबर बघून घेतला. आणि इकडे तिकडे फ़िरायला सुरवात केली.
बसून बसून पाय आखडले होते. सगळी ड्यूटी फ़्री शॉप्स पालथी घातली. (घ्यायचं काही नव्हतंच!) वेगवेगळ्या नॅशनॅलिटीची, म्हणजेच वेगवेगळ्या साइझची, रंगांची, डोळ्यांची, केसांची माणसं दिसत होती. भरपूर चालून झाल्यावर एके ठिकाणी बसकण मारली. अर्थातच योग्य त्या गेट नं. समोरच! हो नंतर काही चुकायला नको! आजूबाजूला नजर फ़िरायला लागली. समोरच एक हाफ़पॅन्टीतली उंचीपुरी, सोनेरी केसांची गौरांगना आपल्या लेकरासह बसलेली दिसत होती. लेकरू कॉन्स्ट्ंट चरत होतं. नीट लक्ष गेलं तर लक्षात आलं की ती तरुणी हातातली जपमाळ ओढत तोंडाने काही तरी पुटपुटत होती. हातात खूण घालून ठेवलं एक धार्मिक पुस्तकही होतं. त्याचाही रेफ़रन्स मधे मधे घेत होती. नक्कीच जप करत होती किंवा देवाचं काही तरी म्हणत होती.
एक कृष्णवर्णीय, डोक्यावर काळ्याभोर केसांच्या स्प्रिंग्ज असलेलं गुटगुटीत बालक मातेने घट्ट धरलेला हात हिसडून पुन्हा पुन्हा चॉकोलेटच्या एका स्टॉलकडे धाव घेत होतं. त्याची आई त्याला पुन्हा पुन्हा ओढत होती...............!
अश्या काही काही नयनरम्य दृश्यांचा आस्वाद घेत वेळ घालवणं चाललं होतं.
शेवटी एकदा तब्बल चार तास टाइम पास केल्यानंतर आमचं विमान डीसीच्या दिशेने मार्गस्थ झालं. म्हणजेच अस्मादिक योग्य त्या विमानात स्थानापन्न झाले होते.
उजव्या बाजूला एक जर्मन तरूण बसला होता. तो जर्मन पेपर वाचत होता, त्यावरून आमचा आपला अंदाज, की तो जर्मन असावा.
डाव्या बाजूला साधारण भारतीय/पाकिस्तानी/बांगला देशी वाटणारी मुलगी बसली होती. प्रवासाच्या अगदी सुरवातीलाच विमानातलं तापमान इतकं कमी करून टाकलं होतं की अगदी हुडहुडी भरली. सीटवर आधीच एक प्लॅस्टिक पिशवीतलं पार्सल ठेवलेलं होतं ते घाईघाईत कुडकुडत उघडलं, पण हाय रे दैवा! त्यातून एक नॅपकिन सदृश वस्तू निघाली. तरीही तेच पांघरण्याचा प्रयत्न केला. पण कालांतराने पाय आहेत की नाहीत हे, दर दोन मिनिटाला हलवून पहायला लागलं. कारण थंडीने पाय गारठून गेले. हवाईसुंदराला (हो....आमच्या सेवेशी एक अत्यंत वैतागलेला आणि चेहेऱ्यावर उर्मट भाव असलेला, गोरा, फ़्लाइट पर्सर होता.) पाचारण केले. आधीच आपण इकॉनॉमी क्लासात, त्यात आपलं मराठी इंग्लिश! मला काय पाहिजे हे त्याला कळायला अंमळ वेळच लागला. ते कळल्या कळल्या त्याने एक झटका देऊन खांदे वर घेतले आणि तो म्हणाला, "सॉरी मॅम, वुई डोन्ट हॅव एक्स्र्टा ब्लॅंकेटस!" आणि चालू लागला.
अरे माझ्या कर्मा...........या हातभर नॅपकिनला तो ब्लॅंकेट म्हणत होता. माझा अंघोळीचा पंचासुद्धा याच्यापेक्षा मोठा आहे.
आता मी तो नॅपकिन अंगावरून काढून पायावर टाकला. कारण आता वेळोवेळी पाय हलवूनही अंदाज येत नव्हता की पाय आहेत नाहीत. विमानात जणू बर्फ़च पडत होतं! नाही नाही....आता काही तरी करायला हवंच होतं....कारण मला प्रवास संपल्यावर आपल्या पायांनीच विमानातून पायउतार व्हायचं होतं.
मग एका हवाईसुंदरीला पकडून तिला परिस्थिती समजावून सांगून, तिच्याकडून एक ब्लॅंकेट(!) हस्तगत केलं. आणि मग तो छोटा नॅपकिन पायावर आणि अंगावर मोठा असं अदलून बदलूनचा खेळ करत राहिले तेव्हा कुठे शेजारच्या बांगला देशी मुलीच्या लव्ह स्टोरीत जरा इंटरेस्ट यायला लागला.
म्हणजे आमच्या गप्पा चालू होत्याच. पण कमी तापमानाने घात केला. तरी प्रवासाच्या आधीच मला आप्तेष्टांकडून एक स्वेटर/जॅकेट हॅंड लगेजमधे कॅरी करण्याचा सल्ला मिळालेला असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे हे दुष्परिणाम! तर आता निश्चिंत मनाने बांगला देशी मुलीची लव्ह स्टोरी पुढे सरकू लागली. त्या बांगला देशी मुलीचा फ़ियॉन्सी स्विडिश होता. तो कॅलिफ़ोर्नियात होता. आणि ही त्याला भेटायला चाललेली होती. संभाषणात स्विडिश, भारतिय, बांगला देशी आणि बंगाली भारतिय अश्या विविध संस्कृतींबद्दल वैचारिक देवाण घेवाण झाली. खूप नवीन गोष्टी कळल्या. असो.............................
त्या जर्मन मुलाने(साधारण माझ्या चिरंजिवांच्याच वयाचा) मुठभर चॉकोलेट्स पुढे केली. मी त्यातली दोन उचलली. एक मटकावण्याचा विचार होता. त्याने माझ्या पलिकडच्या बांगला देशीला मुलीलाही विचारलं. तिने अत्यंत हसतमुखाने त्याचे आभार मानून त्याला नकार दिला. ते पाहून चॉकोलेटची चांदी काढून ते तोंडात टाकणारा माझा हात थांबला. प्रवासात अनोळखी व्यक्तीने दिलेले खाऊ नये. ही उक्ती अचानक आठवली आणि मी त्या जर्मन मुलाला हसऱ्या चेहेऱ्याने "थॅंक्यू" म्हणून गुपचुप ते चॉकोलेट पर्समधे टाकले.
डीसीचे ढग दिसायला लागले. मनातली खळबळ (एक्साइटमेंट) चेहेऱ्यावर दिसू नये याची काळजी घेत बसून राहिले.
हळूहळू ढगांच्या जागी आता डीसीतली जमीन, घरं, पोटोमॅक नदीची वळणं सर्व दिसू लागलं. आता काही मिनिटातच...फ़ार फ़ार तर एक तासाभरातच लेक आणि जावई भेटणार याबद्द्ल खात्री झाली. आणि अगदी भरून यायला लागलं.
विमानातून खाली उतरल्यावर सगळे गेले, त्यांच्या मागोमाग एका ट्रेनमधे बसले. ती ट्रेन जिथे थांबली तिथे उतरले. नॉन युएसए सिटिझन्स या बोर्डासमोर उभी रहिले. तिथल्या ऑफ़िसरने विचारलेल्या सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे दिली. तिथून बॅगेज क्लेमकडे निघाले आणि कन्वेअर बेल्ट समोर सामानाची वाट बघत उभी राहिले. खूप वेळ गेला, पण आलंच नाही सामान! मनातल्या मनात हवालदिल झाले. कन्वेअर बेल्ट जवळच्या कर्मचाऱ्याला विचारलं, "फ़्रॅंकफ़र्ट फ़्लाइटचं सामान कुठे येईल?"
त्याने मला विचारलं," हे तुमचं लास्ट डेस्टिनेशन का?" मी "हो" म्हट्ल्यावर त्याने माझ्याकडे एक हताश आणि करुणार्द्र द्रुष्टीक्षेप टाकला व म्हणाला," देन यू हॅव लॅंडेड इन् अ रॉंन्ग बिल्डिंग!" आणि तो क्षणार्धात अंतर्धान पावला.
पोटात गोळा आला. काउंटरवर साधारण भारतिय दिसणारा एक माणूस होता. त्याच्याकडे गेले, त्याला सर्व सांगितलं. त्याला विचारलं," मी तिकडे (योग्य बिल्डिंगमधे) जाऊ शकते का...सामानासाठी?"
तो म्हणाला," इट विल् टेक ऍट लीस्ट ४५ मिनिट्स मोअर.......यू कान्ट गो देअर".
शांतपणे त्याने माझे सगळे डीटेल्स (माझं नाव, बॅगेचा रंग वगैरे) ऐकून घेतल्यावर एक फ़ोन लावला आणि नंतर मला म्हणाला, "तुमचं सामान इथेच येईल. फ़क्त जरा वेळ लागेल."
मी वाट पहात बसले. कन्वेअर बेल्टकडे डोळे लावून बसून राहिले. मनातल्या मनात त्या कन्वेअर बेल्टकडे पाहिल्यावर एकच गाणं आठवायला लागलं, "मेरा वो सामान लौटा दो!" छे....काय हा हिंदी सिनेमाचा प्रभाव! प्रसंग काय आपण आहोत कुठे आणि गाणं कोणतं?
माझ्याबरोबर आणखीही काही लोक होते त्यांचं सामान यायचं होतं. त्यात दोघी स्त्रिया होत्या. फ़्रॉक घातलेल्या पण अमेरिकन वाटत नव्हत्या. आणि खूप गोंधळलेल्या दिसत होत्या.
अखेरीस कन्व्हेअर बेल्टवरच्या पडद्यामागून माझ्या बॅगेने एंट्री केली. सामान आलं. झडप घालून मी ते उचललं! आता मला माझ्या प्रिय सामानाची आणि माझी फ़ारकत होऊ द्यायची नव्हती.
अब दुनियाकी कोई भी ताकत मुझे और मेरे सामानको एकदूसरेसे जुदा नही कर सकती! विजयी मुद्रेने सामान ओढत चालू लागले. ट्रॉली घेण्याच्याही फ़ंदात पडले नाही. वाटेत एके ठिकाणी चेक पोस्ट होतं. तिथे विमानात भरलेला फ़ॉर्म सबमिट केला. तिथल्या ऑफ़िसरने फ़ॉर्म नीट चेक केले आणि मग मी समोर एक रांग दिसत होती तिकडे निघाले.
तेवढ्यात आणखी एक कन्वेअर बेल्ट दिसला. एक कर्मचारी तिथून जाणाऱ्या सगळ्याच प्रवाश्यांच्या बॅगा रीचेकिंगसाठी काढून घेत होता. कारण हे प्रवासी कनेक्टिंग फ़्लाइट्स साठी निघालेले होते. मला वाटलं इथून एखादा असा गुप्त रस्ता सापडावा जिथून मला सामानासह पलायन करता येईल. मनावर दगड ठेऊन सामान त्या दुष्ट राक्षसाच्या तावडीत दिलं. पुन्हा फ़ारकत! बाप रे.................काय काय करून मी चटण्या,लोणची, भाजणी, चकल्या, करंज्या इथपर्यंत आणल्या होत्या ..............! आता तो कन्व्हेअर बेल्ट मला अगदी शत्रूसारखा वाटायला लागला. त्या बेल्टवरून हळूहळू अंतर्धान पावणाऱ्या माझ्या सामानाकडे फ़क्त पहात रहाण्याशिवाय मी काहीही करू शकले नाही.
परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली होती. त्या आधी भेटलेल्या दोघी ललनाही(नॉन अमेरिकन वाटणाऱ्या) अश्याच भरकटल्यासारख्या इकडे तिकडे फ़िरत होत्या. आतापर्यंत त्यातल्या एकीने रडायला सुरवात केलेली दिसत होती. स्वता:चं पोटचं मूल हरवल्यावर आई जशी सैरभैर होईल, तश्शीच तिची अवस्था झालेली दिसत होती.
एकंदरीत परिस्थिती हाताबाहेर गेलेली दिसत होती. समोरच्या रांगेतल्या माणसांकडे नजर टाकली. कुणाच्याच जवळ जास्ती सामान नव्हतं. फ़क्त हॅंड लगेज होतं. थोडा जिवात जीव आला. वाटलं, चला... यांचं सामान जिथे येईल तिथेच आपलंही येईलच.
खरं म्हणजे माझी हीही समजूत धादांत चुकीची होती. पण ते नंतर कळलं. तेवढ्यात लेक जावयाची आठवण आली. पर्समधून सेलफ़ोन काढला. अरे देवा.. रेंजच नाही! परत पर्समधे कोंबला. खिश्यातून रुमाल काढून घाम पुसला. रूमाल पूर्ण ओला झाला. मोठ्या धाडसाने रांगेत उभी राहिले. रांग बऱ्यापैकी वेगात पुढे सरकत होती. पुढे एक पंजाबी ड्रेसातली ललना उभी होती. "हाय हॅलो" झाल्यावर तिने चौकश्या सुरू केल्या. आणि पुन्हा माझा ठोका चुकला. ती म्हणत होती की ही रांग फ़क्त कनेक्टिंग फ़्लाइटसाठीची आहे. "यू आर इन् अ रॉन्ग क्यू ...इफ़् धिस् इस् युवर लास्ट डेस्टिनेशन........" माझ्याकडे अतिशय करुणामयी कटाक्ष टाकत ती म्हणाली.
अरे देवा, धरणीमाता दुभंगून पोटात का नाही घेत?.....काय करावं? शेजारीच एक एशियन दिसणारा(चिनी, जपानी, कोरियन, इंडोनेशियन या पैकी काहीही असू शकतं) एअरपोर्ट कर्मचारी उभा होता. त्याला परिस्थिती विशद केली. त्याने निर्विकार चेहेऱ्याने(सूरतही वैसी है!) सांगितलं की इथून बाहेर पडण्याचा हा एकच रस्ता आहे. तुम्हाला आता कुठेही जायचं असलं तरी याच रस्त्याने जावं लागेल.
मी पुन्हा रांगेत. उगीचच "शिवाजी महाराजांचे भुयारी मार्गाने पलायन" हा इतिहासातला धडा आठवू लागला.
रांग बरीच पुढे सरकली होती. तरी अजून पंजाबी ड्रेसचं लक्ष माझ्यावरच! तिने मला तिच्या जागेवरून पुन्हा ओरडून सांगितलं, "यू आर इन् रॉंन्ग क्यू!"
"अगं बाई ते मला केव्हाच कळलंय, पण हे तरी सांग राइट क्यू आहे कुठे?" असं त्या पंजाबी ड्रेसला विचारावंसं वाटत होतं
पण् "बट जस्ट नाऊ आय हॅव आस्क्ड् द एअरपोर्ट ऑफ़िशियल, ऍन्ड ही टोल्ड मी टु जॉइन धिस क्यू." एवढंच मी तिला म्हणू शकले.
मला वेड लागण्याची वेळ जवळ येत चालली होती.
"ही इज् मिसगायडिंग यू!" पंजाबी ड्रेसचं रांगेतून पुढे सरकता सरकता, मान वळवून, लांबूनच ओरडून उत्तर. रांग पुढे सरकत चालली होती. तरी बऱ्याच माना माझ्याकडे वळलेल्या!
आता माझी पूर्ण खात्री पटली की संपूर्ण डलस इंटरनॅशनल एअरपोर्टच्या परिसरात माझ्याविरुद्ध काहीतरी कॉन्स्पिरसी चाललीये. मला अडकवण्याचा प्रयत्न चाललाय. घश्याला कोरड! सम्पूर्ण शरिराला घाम फ़ुटलेला! ऱ्हदयाचे ठोके शंभर मीटर रनिंग रेसमधे सुद्धा कद्धी पडले नाहीत इतके फ़ास्ट् पडत होते.
तेवढ्यात कन्व्हेअर बेल्टजवळच्या भारतिय माणसाची आठवण झाली.....ज्याने माझं सामान पहिल्यांदा फ़ोन करून मिळवून दिलं. रांग सोडून उलटी पळत काउंटरपाशी पोचले. परत पळताना मागे पाहिलं तर पंजाबी ड्रेसबरोबर इतरही अनेक माना माझ्याकडेच वळलेल्या. पण आता पटकन काही तरी ऍक्शन घेण्याची जरूरी होती.
त्या भारतिय दिसणाऱ्या कर्मचाऱ्याला सगळं नीट समजावून सांगितलं. तो म्हणाला, "तुम्ही त्याच रांगेतून जा. कारण तुम्ही लास्ट डेस्टिनेशनच्या बिल्डिंगमधे न जाता कनेक्टिंग फ़्लाइटच्या बिल्डिंगमधे आला आहात. आता त्याच रांगेतून गेलात तरच बाहेर पडाल".
पुन्हा उलटी वळले. आता एक नवीन संकट उभं राहिलं. सर्वात आधी सामान मिळाल्यावर एका लेडी ऑफ़िसरकडे एक निळ्या रंगाचा फ़ॉर्म भरून दिलेला होता. पण नियमाप्रमाणे इथून पास होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो फ़ॉर्म सबमिट करावाच लागतो.
आणि एकदा तो फ़ॉर्म सबमिट केल्यावर परत उलटं यायला लागतंच नाही. आणि मी मात्र त्या भारतिय ऑफ़िसरची मदत घेण्यासाठी उलटी फ़िरले. चूक झाली. आता फ़ॉर्म सबमिट करण्याच्या टेबलवर मगाचची ऑफ़िसर नव्हती. ती बदलली होती. मी तिथून जायला लागल्यावर त्या दुसऱ्या ऑफ़िसरने मला फ़ॉर्म मागितला. मी म्हणाले मी मगाशीच सबमिट केला. पण नियम म्हणाजे नियम! तरी तिला परिस्थिती समजावून सांगितली, तरी ती ऐकायलाच तयार नाही. तिने मला एक फ़ॉर्म्सचा गठ्ठाच दिला हातात. आणि म्हणाली, "याच्यातून शोधून दे तुझा मगाशी सबमिट केलेला फ़ॉर्म!"
आता तेवढ्या वेळात किती तरी प्रवासी तिथून गेलेले. तरी दुसरा एक कर्मचारी मदतीला आला. त्याने माझ्या नावाचं स्पेलिंग विचारलं आणि प्रयत्नांति तो फ़ॉर्म सापडला आणि मी गुन्हेगार, ड्रग ट्रान्सपोर्टर किंवा इल्लिगल इम्मिग्रन्ट नाही हे सिद्ध झालं.
"हुश्य" करून रांगेत शिरले. तरी काही हेवीवेट माणसांमागे लपून प्ंजाबी ड्रेसला शोधण्याचा प्रयत्न करू लागले. मी या रांगेत आले तर तिला काय प्रॉब्लेम होता हेच कळेना. पण पंजाबी ड्रेस पुढे सरकला होता. त्यामुळे पुढची प्रश्नोत्तरं टळली.
पुन्हा सिक्युरिटीचा सव्यापसव्य झाला. आणि मी सहीसलामत बाहेर आले.
आता पुढची स्ट्रॅट्जी.......................! पुन्हा सेलफ़ोन पाहिला..........नो रेंज! आता सामानासाठी कुठे जायचं? मोठा यक्ष प्रश्न होता. परत कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय काहीच झालं नसतं. पुन्हा एका कर्मचाऱ्याला पकडलं. त्याला सगळं नीट समजावून सांगितलं. त्यानं सगळी स्टोरी अतीशय पेशंटली नीट ऐकून घेतली. मग हळूहळू लक्षात आलं की याच्या नेमप्लेटवर काही तरी "सिंग" दिसतंय. तोपर्यंत त्या दोघी ललनाही सैरभैर अवस्थेत, नाक डोळे रडून रडून लाल झालेले, अश्या तिथे पोचल्या.
मिस्टर सिंग खूपच सऱ्हदय निघाले. माझ्या मराठी इंग्रजीतली संपूर्ण कथा ऐकून झाल्यावर त्यांनी मला विचारलं, " डु यू फ़ॉलो हिंदी?" ....
चला............आता संभाषण हिंदीत सुरू झालं. सगळं जरा सोपं वाटायला लागलं!
"आपको कोई लेने आया होगा, उनका फ़ोन नंबर है आपके पास?" सिंगसाहेबांनी मला विचारलं. आणि स्वता:चा सेलफ़ोन खिश्यातून काढला. मी त्यांना माझ्या सेलफ़ोनमधून पाहून लेकीचा नंबर दिला.
"इज धिस ******'ज नंबर?आय ऍम कॉलिंग फ़्रॉम डलस एअरपोर्ट, वॉशिंगटन डीसी. " असं म्हणत सिंगसाहेबांनी लेकीला परिस्थिती समजावून सांगितली. लेक आणि जावई कधीचे इंटरनॅशनल एअरपोर्टवर बाहेर वाट बघत थांबले होते. त्यांना सिंगसाहेबांनी मला कुठे भेटायचं ते समजावून सांगितलं आणि मला तिथपर्यंतचा रस्ता! हा रस्ता बराच लांब होता. आणि अजून कमीत कमी ३०/३५ मिनिटे तरी, वेगवेगळ्या ४/५ एस्केलेटर्सवरून चढत उतरत, अनेक ठिकाणी डावीउजवीकडे वळून, एके ठिकाणी एक ट्रेन घ्यायची होती. त्या ट्रेनचा पहिला स्टॉप सोडून देऊन, दुसया स्टॉपला उतरायचं होतं. तिथून आणखी थोडं चालल्यावर मग माझी सुटका होती. मग तिथे मला माझं सामान आणि माझी माणसं भेटणार होती.
चालायला सुरवात केली. मनातल्या मनात, "आधी ५०० फ़ीट चालायचं, मग डावीकडे आधी "स्टारबक्स", नंतर "वेंडी".....असं पुटपुटत स्पीड वाढवला. आजिबात इकडे तिकडे न पहाता सिंगसाहेबांनी सांगितलेला पत्ता पाठ करत राहिले. तरी इच्छित पत्त्यापर्यंत पोचणार का नक्की?...... अशी थोडी शंका होतीच.
तेवढ्यात त्या दोघी ललना एका एअरपोर्ट ऑफ़िशियल बरोबर घाईघाईने मागून येताना दिसल्या. त्यांचं रडणं आता आटोक्यात आलेलं दिसलं.
"एक्सक्यूज मी ऑफ़िसर........!" मी चान्स घेतला.
"ओह्... आय ऍम नॉट ऍन ऑफ़िसर............" तो पटकन म्हणाला...पण थांबला तरी. त्या दोघी ललनाही थांबल्या.
मी मनात म्हटलं ...अरे हो बाबा....जो काही असशील तो ...............!
थोडी प्रस्तावना झाल्यावर कळलं की आम्ही सारे एकाच पंथाचे प्रवासी होतो. त्या दोघीही त्यांच्या सामानासाठी फ़िरत होत्या. त्यांनीही माझ्यासारखीच चूक केलेली होती. माझ्या जिवात जीव आला. बहुतेक त्या दोघींचं हवालदिल रडणं बघून हा एअरपोर्ट कर्मचारी त्यांच्याबरोबर आला होता. अब हम सब हमारी मंझिल तक जाकेही रुकेंगे.......याचा मला विश्वास वाटायला लागला होता. इतक्या वेळा या परिसरात या दोघींची आणि माझी भेट झाली होती की मला एवढंच लक्षात आलं होतं की यांना इंग्लिशचा गंधही नाही. फ़क्त "नो इंग्लिश" एवढंच इंग्लिश त्यांना येत होतं.
अखेरीस आम्ही सारे वर उल्लेखलेला संपूर्ण रस्ता पार करून एका कन्व्हेअर बेल्टपर्यंत पोचलो होतो. तरी कुठून कसे आणि नक्की कुठे आलो काहीच प्रकाश पडला नव्हता. पण समोरून एक चेहेरा दिसला आणि नंतर जे काही वाटलं ते शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. तो चेहेरा जावयाचा होता.
लेक आणि जावई यांनी मला शोधण्यासाठी एकमेकात "आधे इधर आधे उधर बाकी सब मेरे पीछे" ही स्ट्रॅटेजी अवलंबलेली दिसत होती. कारण दोन तीन मिनिटांनी बरोब्बर उलट दिशेने लेक येताना दिसली.
गळाभेट झाली पण कुछ मझा नही आया! कारण माझे डोळे सामान शोधत होते. लेकीला वाटलं, एवढी भेट झाली पण आईला काहीच कसं वाटत नाही.....!
असो............दोघांनीही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
"आई, अगं सामान मिळेल नक्की..........इथे कुणीही दुसऱ्याचं सामान नेत नाही. आणि मिसप्लेसही शक्यतो होत नाही. आज नाही मिळालं तर उद्या नक्की मिळेल. अगदी आपल्या पत्त्यावर घरी येईल."
आणि ते दोघेही तिथेच काउंटरवर चौकशी करत राहिले. तेवढ्यात कन्वेअर बेल्टवर पुन्हा एकदा माझं सामान दिसलं.
जावई पुढे झाला. त्याने सामानाचा ताबा घेतला आणि पाण्याची बाटली पुढे करत म्हणाला, "आई आता जरा बसा. पाणी प्या."
आत्ता कुठे माझं लक्ष लेकीने आणलेल्या सुंदर फ़ुलांच्या गुच्छाकडे गेलं................ज्याच्यातली फ़ुलं आता मान टाकणाच्या मार्गावर होती. हो.................जवळजवळ ३ तास तो गुच्छ तिने सांभाळला होता. अजूनही लेक सांगते," मी समोर दिसले तरी आईला काहीच आनंद झाला नाही. ती आपली सामानाच्या काळजीत!"
अजूनही त्या दोघी ललनांचं सामान आलेलं दिसत नव्हतं. आता मी पुढे गेले, आता मी त्यांची चौकशी करू शकत होते! अंदाजाने विचारलं.." आर यू रशियन?"
"नो इंग्लिश्!" अजूनही त्यांचं तेच उत्तर होतं. म्हणजे त्या रशियनही नाहीत की काय? तेवढ्यात त्यांचंही सामान आलं. त्या खूष झाल्या.
आता त्या पुढे होऊन आम्हाला त्यांच्या हातातला एक कागद दाखवत होत्या. पण काय बोलत होत्या ते काहीच कळत नव्हते. त्यावरचा बहुतेक फ़ोन नंबर असावा. लेकीने तो नंबर पाहिला.
माझ्या लेकीबरोबर तिच्या कामाच्या ठिकाणी बरेच वेगवेगळ्या वंशाचे लोक काम करतात. त्यामुळे तिला थोडा अंदाज आला होता की या रशियनच असाव्यात.
आता तिने परिस्थितीचा ताबा घेतला. मी आपलं सरळ मराठी इंग्लिशमधे त्यांना "आर यू रशियन?".. असं अति स्पष्ट विचारलेलं कळलं नाही. पण लेकीने "राSSSश्याSSS?" असं हेल काढून विचारलं. त्याबरोबर त्या दोघींचा चेहेरा इतका खुलला! माना होकारार्थी हलल्या. आता लेकीच्या डोक्यात विचारचक्रं चालू झाली की यांना कशी मदत करावी!
तिने तिचा आयफ़ोन काढला. आणि एक नंबर लावला आणि म्हणाली, "हे वाल्या, ******* हियर. लिसन वाल्या, राइट नाऊ आय ऍम ऑन डलस इंटरनॅशनल एअरपोर्ट. हिअर आर टू रशियन लेडीज. दे नीड हेल्प् ...टॉक टू देम".
"वाल्या" ही माझ्या लेकीची ऑफ़िसातली आधीची मॅनेजर. आपल्या रामायणातल्या "वाल्या कोळ्या"शी हिचा काहीही संबंध नाही.
नंतर फ़ोन त्या ललनांपैकी एकीला दिला. वाल्या आणि ती रशियन ललना यांचं त्यांच्या रशियन भाषेत एक प्रेमपूर्ण संभाषण झालं. रशियन ललनेचे डोळे बोलतानाही गळत होते आणि चेहेयावर हास्य! नंतर वाल्याने सर्व संभाषणाचं भाषांतर माझ्या लेकीला सांगितलं. लेकीने वाल्याचे आभार मानले आणि फ़ोन बंद केला.
लेकीने मग त्या ललनेला तिचा कागदावर लिहून आणलेला फ़ोन नंबर लावून दिला. तिचेही नातेवाईक एअरपोर्टच्या याच विशाल परिसरात कुठे तरी होते. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला. या दोघी ललना कुठे आहेत ते त्यांना कळलं. आमचंही काम झालं होतं. आता रशियन ललनेने आनंदाश्रु भरल्या डोळ्यांनी माझ्या लेकीला एक घट्ट मिठी मारली आणि जाताना तिचे इतके पापे घेतले की क्षणभर माझी लेकही थोडी इमोशनल झाली.
मग लेक म्हणाली, "आई आता रिलॅक्स............सामान मिळालंय!" मग मात्र मी लेकीला घट्ट् मिठी मारली, दोन घोट पाणी प्यायले, गुच्छ हातात घेऊन त्याचा वास घेतला. आणि लेक जावयासह वर्तमान आमची गाडी घराच्या दिशेने निघाली.
फ़्रॅन्कफ़र्ट ते वॉशिंग्टन डीसी
Submitted by मानुषी on 27 August, 2011 - 21:11
गुलमोहर:
शेअर करा
मस्तच लिहिलंयत सगळं.
मस्तच लिहिलंयत सगळं.
धन्स आडो!
धन्स आडो!
छान लिहिलंय... गळाभेट झाली पण
छान लिहिलंय...
गळाभेट झाली पण कुछ मझा नही आया! कारण माझे डोळे सामान शोधत होते.>>> माझी माय अगदी असंच वागली असती. तेव्हा तुमच्या लेकीची खट्टू झाल्याची भावना मला माहिती आहे.
छान लिहिलय. एकेक अनुभव असतात.
छान लिहिलय. एकेक अनुभव असतात. ते घ्यावेच लागतात.
निदान मागचा तरी शहाणा होईल.
छान लिहिलंय. बरीच चुकामुक
छान लिहिलंय. बरीच चुकामुक झाली म्हणायची.
मस्तच लिहिलंय. एवढे दिवस
मस्तच लिहिलंय. एवढे दिवस मेहेनत करुन लेकीसाठी काय काय वस्तू भरुन आणल्या असणार. मग त्या सामानात जीव नाही का अडकणार.
मस्त, खुसखुशीत वर्णन
मस्त, खुसखुशीत वर्णन
सुरेख वर्णन!!!
सुरेख वर्णन!!!
मानुषे..अगं पाय दुखायला
मानुषे..अगं पाय दुखायला लाग्ले नं तुझी पायपीट वाचून
अगदी सगळं सगळं डोळ्यासमोर आलं
मस्त लिहिलंयस..
वरदा- अगदी अगदी!!!!
धारा, वरदा दिनेशदा शिल्पा
धारा, वरदा दिनेशदा शिल्पा वरदा आशुतोष जिप्सी वर्षू सर्वांना धन्यवाद!
धारा वरदा ...पोरींना कळलं बगा मायचं काळिज!
वर्षे....................आता पाय चेपून घे.................हाहाहाहाहा!
भरपूर सामानाची चुकामुक. गोंधळ
भरपूर सामानाची चुकामुक. गोंधळ . पण शेवट गोड. हुश्श .मस्त वर्णन
<<तरी काही हेवीवेट माणसांमागे लपून पंजाबी ड्रेसला शोधण्याचा प्रयत्न करू लागले. मी या रांगेत आले तर तिला काय प्रॉब्लेम होता हेच कळेना.>>:D
खुसखुशीत लिहीलय.
खुसखुशीत लिहीलय.
मस्त वर्णन ...
मस्त वर्णन ...
मस्त वर्णन.. सुरवातीला मी
मस्त वर्णन.. सुरवातीला मी विमानतळावर काढलेले ४ तास असं वाचायला मिळणार असंच वाटत होतं..
अनिश्चिततेतून ज्या धैर्याने
अनिश्चिततेतून ज्या धैर्याने तुम्ही मार्ग शोधून काढलात ते खरोखरीच वाखाणण्यासारखे आहे!
त्याशिवाय वाखाणण्यासारखी आहे ती त्यांची, हव्या त्या ईप्सित स्थळावर सामान व्यवस्थित पोहोचवणारी व्यवस्था! तिचेही मला कौतुक वाटते!!
मस्त लिहिलय! एकदम थ्रिलर!!
मस्त लिहिलय! एकदम थ्रिलर!!
सर्वांना धन्यवाद! हो नरेंद्र
सर्वांना धन्यवाद!
हो नरेंद्र ...त्यांची व्यवस्था (सिस्टिम)जबरदस्तच!
छान लिहिलय!! ह्या प्रसंगात
छान लिहिलय!!
ह्या प्रसंगात तूमच्या मुलीने रशियन स्त्रियांना मदत केली हे कौतूकास्पद आहे.
आपल्या रामायणातल्या "वाल्या
आपल्या रामायणातल्या "वाल्या कोळ्या"शी हिचा काहीही संबंध नाही. >> मानुषी, तुम्हीपण ना .....
मस्त, प्रसंग डोळ्यासमोर आला आणि अश्याच काही आठवणी ताज्या करुन गेला.
च्चं !! बरं झालं सामान
च्चं !!
बरं झालं सामान मिळालं.
मानुषी, वाह ! भन्नाट अनुभव
मानुषी,

वाह ! भन्नाट अनुभव !
लिहिताना छान जमलयं, नविन माहिती मिळाली.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
छान लिहिलत! तुमच्या सोबत
छान लिहिलत!
पण मला तुमची बॅग ऑळखायला कशी येणार?:स्मित:
तुमच्या सोबत आम्हालापण फिरवून आणलत की. मी पण मनातल्या मनात त्या कन्वेअर बेल्टकडे पहात होते, तुमची बॅग कधी येतेय म्हणून.
नलिनी..............!
नलिनी..............!
जबरीए ......
जबरीए ......
खरंच भन्नाट अनुभव आहे. तुमची
खरंच भन्नाट अनुभव आहे. तुमची लेखनशैली एकदम मस्त!!!!!!!!!!!!!!!!!
भन्नाट!
भन्नाट!
छान ..मस्त लिह्लय..
छान ..मस्त लिह्लय..
ओह............सर्वांना
ओह............सर्वांना धन्यवाद!
छान लिहिलय ! लय धावपळ झाली
छान लिहिलय ! लय धावपळ झाली तुमची, पण हिम्मत नही हारी ...
Pages