नवविवाहित मुलीस पत्र

II श्री II

प्रिय चि. सौ. गौतमीस,
अनेक उत्तम आशीर्वाद-

माझ्या आठवणीत तुला लिहिलेलं हे पहिलंच पत्र असावं. जरी या पूर्वी लिहिलं असेल तरी 'सौ. गौतमी खडकतकर' साठी हे नक्कीच पहिलं आहे.

आजच सायंकाळी आम्ही नाशिकला परतलो. एखादं गोड स्वप्न बघून जागल्यावर, गहिवरलेल्या साखरझोपेच्या आठवणीसारखं कांहीसं होतंय. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आम्हाला आयुष्यभर समाधान देणारी, अतिशय अनमोल भेट तू आम्हाला दिलीस !!

तू जन्माला येतांनाच काय ती थोडीशी रीतीला धरून रडली असशील कुणास ठऊक; पण मला आठवतंय ते, तू कधीही झोपेतून उठलीस ती हसंतच. ते तुझं प्रसन्न हसु लग्नात अधिकच मंगल भासत होतं. तुझ्या लाघवाचा अखंड वर्षाव चि. केदार आणि त्याच्या कुटुंबियांवर होईल यात शंकाच नाही.

तुझ्या दोन्हीही आजी आजोबांच्या संस्कारांचं अधिष्ठान तुझ्यापाशी आहे. तुझ्या सौ. आईचं सदाबहार हसणं, बोलणं-वागणं तुला मुळातच अवगत आहे.या सर्वांचा उपयोग खडकतकर परिवाराच्या घरातली 'मुलीची' उणीव भरून काढण्यासाठी पुरेपूर व्हावा.

सतत बदलणार्‍या परिस्थितीनुसार दोन पिढ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत फरक नक्कीच पडतो, परंतु जुन्या पिढीचा विचार हा कधीही अनुभवसिद्ध आणि परिपक्व असतो. त्याच्याच आधाराने, तुमचे विचार अधिक निकोप आणि सकस कसे करावेत, ह्याचे उच्च शिक्षण तू घेतले आहेस. कमावलेली बौद्धिक श्रीमंती जितकी वाटली जाईल; तितकी ती तुमच्याशी अधिक एकनिष्ठ रहाते हे व्यस्त परिमाण कधीही विसरू नकोस. घडलेली वाईटात वाईट घटनाही कांहितरी चांगले शिकवतेच ह्या विश्वासाने तिच्याकडे पाहिले तरच तुमचा अनुभव समृद्ध बनतो हे लक्षात ठेव.

तुला तुझ्या स्वप्नातला राजकुमार मिळाला आहे. तुझं गंगेसारखं खळखळतं वास्तव, कायम; चि. केदारच्या अथांगतेत समरस होण्यासाठी असू दे. जगामधे इतरांसाठी आणि दोघांमधे एकमेकांसाठीही, "तुम्ही एकच आहात" ही जाणीव जपणं अतिशय महत्वाचं आहे. कुठलाही निर्णय घेण्यासाठी तुम्ही दोघंही तोलामोलाचे समर्थ आहात. चुकून कधी एखादा घोटाळा झालाच तर त्याच्या कारणमिमांसेतून व्यर्थ दोषारोप करण्याऐवजी त्यातून मार्ग काढण्यासाठी एकरूप व्हा. त्यात तुझी जबाबदारी जास्त आहे कारण त्या घराच्या कर्तृत्वाशी तू नवपरिचित आहेस.

जगातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व आणि स्थैर्य हे फक्त त्यांच्या परस्परांतील संतुलित आकर्षणावर अवलंबून आहे हा वैश्विक सिद्धांत उमजणं हीच खरी सुखी आणि यशस्वी संसाराची गुरुकिल्ली आहे.

'पाठक-कुलकर्णी' वारसा लाभलेल्या 'कन्याकुमारीने' चार घराण्यांचे रेशिमबंध गुंफण्यासाठी 'मुळे-खडकतकरांच्या' उंबरठ्याचे माप 'महालक्ष्मीच्या रूपात ओलांडले आहे. या संबंधांच्या गाठी दृढचिरंजीव करण्यासाठी तुला शुभेच्छा, भरभरून आशीर्वाद आणि ईश्वरचरणी प्रर्थना.

तुझ्या सुखद आठवणींचा इतिहास आणि भविष्यातील तुमच्या वलयांकित कर्तॄत्वाचा चढता आलेख, हेच आमच्या पुढच्या आयुष्याचं प्रमुख आकर्षण असणार आहे.

अजून काय लिहू ?
सर्वांना यथोचित नमस्कार, चि. केदारला शुभाशीर्वाद.

सदैव तुमचेच,

आई/बाबा


गौतमीला दिलेले खूपच छान अनमोल शब्दरूपी अलंकार........ गौतमीला माझ्याही शुभेच्छा...... कल्पना



हे पत्र तुमची लेक तिच्या लेकीला सासरी पाठविताना दाखवेल, यात शंकाच नाही.
खरं तर प्रत्येक नवविवाहित लेकीला मिळावं असं हे पत्र आहे.
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!



>>> कमावलेली बौद्धिक श्रीमंती जितकी वाटली जाईल; तितकी ती तुमच्याशी अधिक एकनिष्ठ रहाते हे व्यस्त परिमाण कधीही विसरू नकोस. घडलेली वाईटात वाईट घटनाही कांहितरी चांगले शिकवतेच ह्या विश्वासाने तिच्याकडे पाहिले तरच तुमचा अनुभव समृद्ध बनतो हे लक्षात ठेव.....
>>> जगामधे इतरांसाठी आणि दोघांमधे एकमेकांसाठीही, "तुम्ही एकच आहात" ही जाणीव जपणं अतिशय महत्वाचं आहे. कुठलाही निर्णय घेण्यासाठी तुम्ही दोघंही तोलामोलाचे समर्थ आहात. चुकून कधी एखादा घोटाळा झालाच तर त्याच्या कारणमिमांसेतून व्यर्थ दोषारोप करण्याऐवजी त्यातून मार्ग काढण्यासाठी एकरूप व्हा.
.
व्वा !!! अज्ञात, केवळ सुरेख !!! अनुभव आणि परिपक्वतेचा इतका गाळीव सारांश क्वचितच बघायला मिळतो. खरे सांगू का ? हे लिहीलेले तर सर्वांनीच वाचणे आवश्यक आहे, मुलगा असो वा मुलगी.

    ***
    We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus



    अज्ञात, तुम्ही लिहीलेले छानच आहे. नवविवाहित मुलासाठी नाही का एखादे पत्र ?



    कल्पना, सजिरा, स्लर्टी,
    तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

    सिंड्रेला,
    तुझी कल्पना छान आहे. हे माझ्या डोक्यात आलं नसतं कदाचित. आता नक्की लिहीन स्मित

    ...............अज्ञात



    खुपच सुन्दर! मनाला प्रेरणा देणारे...