चिमणे चिमणे दार उघड.... थांब माझ्या बाळाला......"

पूर्वी म्हटलं जायचं,
"पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन.....
मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी वसेन..... "
" सध्या सुखाच्या कल्पना बदलल्यात....... व ह्या पोटाची भूक जरा जास्तच लोकांना दूरदेशी जायला भाग पाडतेय. माझाही एक मुलगा देशात व एक परदेशात आहे. (अमेरिकेत) पण एकटेपणाचा प्रश्न फारसा जाणवत नाही. याला कारणे दोन...... मुलांशी फोन, चेट, ई-मेल, वेब केमेरा...... या द्वारे सातत्याने जवळ जवळ रोजच संपर्कात असल्याने तसे दूरपण व एकटेपण जाणवत नाही...... मुलगा व सून दोघेही या सर्वासाठी भरपूर वेळ देतात...... इंटरनेटचा पुरेपूर उपयोग करून घेऊन आम्ही यामध्ये भावनिक स्थैर्य मिळवले आहे. अगदी छोट्या बाळाच्या बाळलीलांचाही वेबकेम द्वारे आनंद आम्ही घेतो. जमतील तशा आमच्या तिकडे जाऊन भेटी व जमेल तसे त्यांचे भारतात येणे...... हेही ओघाने होतेच.
सुख मानण्याचा भाग असतो हा विचार मनांत ठसवताना आजूबाजूला भारतात राहणा-या परंतु पालकांबरोबर न राहणा-या मुलांची संख्या इतकी प्रचंड दिसते......., तसेच घरात राहूनही शारीरिक द्दॄष्ट्या जवळ पण मनाने दूरच असल्याची उदाहरणेही खूप दिसून येतात. सूख नक्कीच मानण्यावर आहे...... अत्यंत गर्दितही एकटे वाटू शकते...... व मन कशा ना कशात गुंतून ठेवले असेल तर एकटेपणातही आनंदी मार्ग निघू शकतो. भावनिक स्थैर्याचा प्रश्न त्यामुळे आम्हाला कधी जाणवलाच नाही. या निमित्ताने एक अनुभव आवर्जून सांगावा वाटतो.......
अमेरिकेचा वास्तव्यामध्ये चार वर्षाच्या नातवाला गोष्ट सांगणे ही माझ्या दॄष्टीने करमणुकीची तसंच आव्हानात्मक गोष्ट होती. आव्हानात्मक अशासाठी.... गोष्ट सांगताना मराठी अवघड शब्दांच्या अर्थाचे इंग्रजी शब्द त्याला सांगावे लागायचे... अन् माझा काही "फाड्फाड इंग्लीश" चा कोर्स झाला नव्हता नं..... पण त्या निमित्ताने लहानपणी ऍकलेल्या गोष्टीची उजळणी झाली........ या गोष्टीमधून झालेले संस्कारही जाणवले. माझा नातू 'जय्' व माझ्या सांगण्याच्या गोष्टीची सुरुवातही नेहमीप्रमाणेच "चिमणी-कावळ्याच्या" पुरातन काळापासून चालत आलेल्या गोष्टीपासून झाली. 'चिमणी म्हणजे चतुर शहाणी व कावळा म्हणजे मूर्ख' असं मनावर लहानपणी बिंबवलं गेलेलं..... मेण आणि शेण या दोन्ही गोष्टी नातवाला समजावण्याच्या फंदात मी न पडता मी त्याचे आधुनिकीकरण करून 'सेंड आणि मड' केले.... पण चिमणी जेव्हा "थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे..... कपडे घालू दे..... जेवायला घालू दे.." अशी अनेक कारणे सांगून कावळ्याला काही दार उघडतच नाही हे ऍकून मात्र माझ्या नातवाला.... जयला..... कावळ्याची खूप दया आली..... अन् चिमणीचा खूप राग आला. (आम्हाला लहानपणी कसा काय आला नाही बुवा कुणास ठावूक?) "पण चिमणी कावळ्याला डोअर लवकर ओपन करत का नाही?" हा त्याचा वार्ंवार प्रश्न असायचा. शेवटी कावळ्याला कळावे...... "घर कसं बांधायचं...? पक्कं.... सँडचं....! यासाठी चिमणी कावळ्याला दार लवकर ओपन करत नाही" असं मी त्याला पटवण्याचा खूप प्रयत्न केला..... पण त्याला ते काही फारसं पटलं नाहीच. त्याचा आपला रोज तोच प्रश्न चालू असायचा..... आणि मग त्याच गोष्टीतली चिमणी मलाही लबाड वाटू लागली. खरंच तिने कावळ्याला दार उघडायला एव्हडा वेळ लावायला नको होता असं वाटू लागलं...... एका क्षणात माझ्या नातवाने लहानपणापासून माहित असलेल्या गोष्टीचा माझ्यावर 'कावळ्याविषयी मनांत प्रेम उत्पन्न करून' उलटा परिणाम करून टाकला.
.......आणि नकळत मला अमेरिकेत रहाताना प्रत्येक भारतीयाच्या मनांतही "चिमणे चिमणे दार उघड.... थांब माझ्या बाळाला......" हे द्वंद्वयुध्द्च चलू आहे असं जाणवून आले. शिकायला म्हणून अमेरिकेसारख्या परदेशात जायचं... मग त्यासाठी लागणारा प्रचंड खर्च.... मग निदान तो खर्च तरी वसूल करायला हवा म्हणून काही काळ तरी नोकरी..... नंतर हळूहळू या काळात तिकडच्या जीवनशैली... राहणीमानाची इतकी सवय होवून जाते की नंतर तशी जीवनशैली भारतात आल्यावरही उप्भोगायला मिळावी म्हणून 'इतका' पैसा... (डौलर्स) गाठीशी हवा म्हणून परत तेथील राहणे लांबणीवर.... डौलरची कमीकमी होत जाणारी किंमत.. मग हळूहळू तेथील ग्रीन कार्डचा मोह.... तेथील सिटिझनशिपचा मोह...... अन् मग ह्या काळात रोज मनांत "थांब माझ्या बाळाला..."चा जप अखंड चलूच..... आता 'हे झालं की नक्की भारतात परतायचं.....! आता 'ते झालं की नक्की भारतात परतायचं.....! आणि हळूहळू या नविन पीढीच्या पुढच्या पीढीला.... त्यांच्या मुलाबाळांना तिकडची इतकी सवय होते की बहुतेक मुले परत भारतात यायला तयारच होत नाहीत अशा वस्तुस्थितीला या परदेशी पालकांना सामोरं जावं लागतं. "थांब माझ्या बाळाला......"ची यादी काही संपतच नाही..... अन् परदेशाळलेली ही चिमणी काही या पालकरूपी कावळ्याच्या तळ्मळीला दाद काही देत नाही...... तान्ह्या बाळांचे किशोर होतात..... पण भारतात येण्यासाठी मनाची कवाडे मात्र काही ना काही कारणांनी बंदच ठेवली जातात.....! मात्र मनांत दूर राहून भारताविषयीचे प्रेम जरा जास्तच उफाळून येतं..... मग आपल्या देशात लोकसंख्या, गरीबी, स्वच्छता, अन् वाहतुकीच्या समस्यांची यादी भले किती मोठी का असेना......! (कधी कधी याच कारणांचा न येण्यासाठीही उपयोग केला जातो.......) आणि मनांत विचार आला...... परदेशात असो वा आपल्या देशात..... आयुष्य म्हणजे सर्वत्र सारखंच आहे... एकदा का लहानपण संपलं की वेगवेगळ्या कारणांनी जगण्याची कारणं बदलतात...... स्वतःसाठीचे आवडीचे जगणे "थांब माझ्या बाळाला...... नंतर हे करू...... ते करू....." करत त्याची यादी संपतच नाही... अन् बघता बघता जीवनाचा पैलतीर दिसू लागतो..... आणि लक्षात येते.... दुस-यांसाठी.... समाजात सन्मान मिळावा म्हणून..... जीवनातील वेगवेगळ्या भूमिका पार पाडता पाडता... वेगवेगळ्या इच्छाआकांक्षांचे समाधान करण्याच्या गदारोळात आपल्या मनासारखे जगायचे राहूनच गेले......! परदेशी मुले असलेल्या पालकांना हे राहून गेलेले जगायचे ..... जगण्यासाठी ...... आनंदाने जगून एकटेपणावर नक्कीच मात करता येइल. तसंच बाळाचे मोठे होणेही वेळेवरच जाणायला हवे..... पंख फुटल्यावर घ्यायची झेप बाळालाच ठरवू द्यावी...... त्यासाठी "ज्ञानचक्षूंची कवाडे" योग्य वेळीच उघडायला हवीत..... त्यासाठी चिमणीसारखा फार उशीर करून उपयोगी नाही...... नातवाला गोष्ट सांगता सांगता जीवनाचे हे महत्वाचे तत्वज्ञान या "चिमणी-कावळ्याच्या" गोष्टीतून उशीरा का होईना..... पण नव्याने मला उमगले...... हा विचार..... अनुभव...... परदेशी मुले असलेल्या पालकांना सांगावा वाटला म्हणून ह्या पत्रप्रपंच.......
सौ. कल्पना रमेश धर्माधिकारी, पुणे.


छान लिहिलय.. साप्ताहिक-सकाळमधे वाचला होता तुमचा हा लेख..

http://www.saptahiksakal.com/esakal/07102008/PailtirF4FF377F78.htm

इकडे येणार्‍या बहुतेक सगळ्यांची स्थिती सिंहाच्या गुहेत अडकल्यासरखी असते. बाहेर पडायला मार्ग सापडतच नाही. परत गेल्यावर काय ? ही भिती असतेच. दिवसेंदिवस कठीणच होत चाललय हे खरय..



कल्पना
किती सुंदर लिहिलय तुम्ही अणि किती सत्य. तेही कसल्या समर्पक शब्दात, उदाहरणासह! हॅटस ऑफ, तुम्हाला.
ते 'थांब माझ्या बाळाला...' चं (रड)गाणं गाताना किती दाटून येतं...
कसल्यातरी गप्पांमध्ये मध्येच एकदा माझा मुलगा म्हणाला होता, ... 'पण मी तुमच्याजवळच राहीन असं का वाटतय तुला?'
त्याक्षणी आत नक्की काय काय तुटलं आणि काय काय नव्याने जोडावं लागलं....
एका झटक्यात दुरावणारं आणि ठरवलं तर जवळ करू शकू.... अशा रितीने झपाट्याने बदलणार्‍या जगात नात्यांच्या जोडणीचे नवे टाके आणि, टिकवण्याच्या नव्या पाकक्रिया अवलंबायला हव्यात नाही?
छान लिहिता, कल्पनाताई.



खूप छान! कल्पनाताई, तुमचे लिखाण मी नेहमी "सकाळ" मधल्या शिदोरीत वाचत असते. पण प्रतिसाद द्यायची संधी आज तुम्ही दिलीत. मला खूप आवडतात तुमचे विचार.. क्षणभर स्वतःला थांबवून विचार करायला भाग पाडणारे असतात. तुमचे असेच लिखाण आम्हाला नेहमी वाचायला मिळो.
(बाकी.. धर्माधिकारी नाव वाचूनच थोडी आपुलकी आपोआप वाटते. मी पण धर्माधिकारी बरं!)
स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा



भारता बाहेर राहाणा-या आई - वडिलांचे मनोगत छान मांडले आहे. लिहित रहा .... एकदम पटले....



लिखान आवडल.



छान आहे विषय आणि लेख स्मित
.
हे झालं की नक्की भारतात परतायचं >>>> असं हे ना ते चालुच राहतं. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. त्या दोघा नवरा-बायकोचे आई-वडील आणि बाकी कुटुंबीय भारतात आहेत. ह्यांनाही परत जायचे आहे. पण असे काही "target" ठरवले की जाणे होत नाही म्हणुन त्यांनी वर्ष २०१० च्या सुरुवातीला परत जायचे ठरवले आहे. मग तेव्हा सांपत्तीक स्थिती, इ इ काय असेल ते असो. तोपर्यन्त जेव्ह्ढे फिरणे होइल, बघणे होइल ते करत आहेत. आई-बाबांना पुढच्या वर्षी सफर घडवणार आहेत.



माझ्या भाचीची पण गंमत सांगते..या गोष्टीची. ती आहे ५ वर्षाची. तिला मी ही गोष्ट सांगत असताना ती म्हणाली," मावशी , कावळ्याला बाहेर एवढा मुसळधार पाऊस पडत असतानाही चिऊनी घरात का नाही घेतलं पटकन!! त्याला थंडी वाजत असेल ना!" आणि मग जेव्हा पुढची गोष्ट सांगितली..की कावळ्याने चिऊच्या घरात हरभर्‍याच्या डाळीत..... तेव्हा ती म्हणाली,"बघ, म्हणूनच तो इतक्या वेळा दार वाजवत असेल मगाशी. तिने तेव्हाच दार उघडलं असतं तर...."
हे ऐकून मला तिच्या विचारशक्तीचं खूप कौतुक वाटलं!! आणि मी अंतर्मुखही झाले. परंपरागत चालत आलेल्या अशा गोष्टींचा आपण पुन्हा एकदा डोळे उघडून विचार करायला हवा..आणि त्या आजच्या पिढीला पटतील अशा बदलायला हव्यात!
स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है



वा! मस्त लिहिलं आहे!



हे वाचल आणि आई - बाबा एकदम डोळ्यासमोर आले .....
विकि



छान लिहीलत... सुंदर.



कल्पना तुम्ही कीती छान लीहलय
हे वाच्तान्ना मला मी गोषटी मधल्या काव्ळा आहे असे जाणवले
माझी च गोषट आहे असे वाटु लागले
माझे दोन्ही मुले अमेरिकेत आहेत
आणी मी रोज सकाळी म्हण्जे त्यान्च्या रात्री त्यन्च्या online येण्याची आतुर्तेने वाट बघत असते
पण
मी पण कधीतरि ती चीमणी होते .
आता कर्त्व्या पुर्ती च्या आन्नदात आहे, आणी जे जगाय्चे राहुन गेले होते ते जगत आहे. आणी आपलेे अत्रुप्त राहिलेले शौक पुर्ण करत आहे.
आणी त्या मुळे मी खूप आन्नदात असते
रोज मुले पण भेटतात त्यान्चा हाल्हवाल रोज कळत असतो.
आणी त्री देखील मी स्वतन्त्र आहे
"घरी मुले वाट बघत असतिल "ही चीन्ता बाहेर अस्तानना नसते
त्या मुळे मी आप्ल्या कामाला जास्त वेळ देऊ शकते
मीरा देशपान्डे