एक बोचरी आठवण (उत्तरार्ध)

Submitted by प्रज्ञा९ on 3 June, 2011 - 14:43

इथे मायबोलीवर मी काही वेळापूर्वीच ललित लिहिलं, त्याला मिळालेला प्रतिसाद बघून, उरलेल्या आठवणी लिहून मन मोकळं करावंसं वाटलं म्हणून पुन्हा लिहिलं नव्याने. गेल्या लेखात जे लिहिलं त्यात माझी चूक नव्हती, यात जे शेअर करतेय त्यात मात्र मी कुठेतरी कमी पडत होते हेही कबूल करायला हवं. असो.

मी डिप्लोमाला खूप छान मार्क्स मिळवून नाशिकच्या जवळ, सिन्नरमधे इंजि. ला प्रवेश मिळवला. पूर्णपणे मेरिटवर. Happy

पण मधल्या काळात, कदाचित माझ्या मनातल्या रागामुळे, आणि ताईचं लग्न, आजीचं आजारपण या सगळ्यामुळे, सब्कॉन्शस माईंडमधे गडबड झाली असावी, कारण ताईने लग्नानंतर एकदा नवीन स्टेथो आणि बीपी मशीनचा पहिला चा प्रयोग माझ्यावर करून बघितला तेव्हा माझं बीपी चक्क वाढलं होतं!!

झालं!!!!!!! Youngers Abnormal Hypertension अशी काहीतरी अगम्य भाषेत व्याख्या सांगून ताईने मला धीर दिला. आयुष्यभराचा त्रास नाहिये, बीपी म्हणून तुला जे वाटतंय तसं नाही हेही सांगितलं...थोडे दिवस आयुर्वेदिक गोळ्या घ्यायला सांगितल्या.

नाशिकला गेले तेव्हा तिथली कोरडी हवा मानवेना. जुलै मधे सुरु झालेली सर्दी जायला पुढच्या वर्षीचा फेब्रुवारी उजाडला. बीपी हाय होतं, पण त्याचा कसलाच त्रास होत नव्हता. डिप्लोमानंतरची उशीरा झालेली अ‍ॅड्मिशन, सर्दीचा त्रास, मेसचं घशाखाली न उतरणारं जेवण आणि सर्वांत महत्त्वाचं....माझी डिप्लोमाच्या वेळी उपयोगी असूनही इथे ठार निरुपयोगी ठरलेली अभ्यासाची पद्धत, याचा परिणाम म्हणून मला सेकंड इअरच्या परीक्षेत अपयश आलं. त्या परीक्षेच्या अगोदर, आई-बाबा सेवानिवृत होत होते, त्यांना माझ्या खाण्या-पिण्याचे हाल, तब्येत याची काळजी होती. सुदैवाने निवृत्तीनंतर काही जबाबदारी नव्हती, त्यामुळे माझी शिकायची उरलेली २ वर्ष नाशकात तात्पुरता मुक्काम करायचा हे त्यांनी अगोदरच ठरवलं. माझा विरोध होता. त्यांनी निवृत्त झाल्यावर, केवळ माझ्यासाठी, इतक्या दूर, अनोळखी गावी का यावं! आणि मी कॉलेजला गेले की ते काय करणार दिवसभर! रत्नागिरीत नुसतं घरातून बाहेर पडलं तरी कोणी ना कोणी ओळखीचं भेटतं. शिवाय इतकी वर्षं नोकरीच्या रामरगाड्यात न केलेल्या गोष्टी, कुठे फिरणं वगैरे... म्हणून त्यांनी येऊ नये असं मला वाटत होतं. शिवाय ते मला किती ठिकाणी पुरतील...माझं मला मॅनेज करता यायला हवं असंही वाटत होतं. पण सगळ्यांचं मत, की २ वर्षाचा प्रश्न आहे, जातील निघून पटकन!

मग माझी सेकंड इअर ची परीक्षा झाली, मी सुटीला घरी आले आणि परत जाताना सामानचा ट्रक घेऊन आम्ही तिघं आणि मोठी ताई आली बरोबर. १ महिना झाला असेल-नसेल आणि पुन्हा एकदा तसाच काळा दिवस माझ्या पुढ्यात येऊन ठेपला! प्रचंड अपयश! ५ विषयांत!

त्या वेळची अवस्था तशीच... फक्त मी जास्त निगेटिव्ह होते यावेळी. परत हे घडलं याचा अर्थ माझ्यतच काहीतरी प्रॉब्लेम आहे, मीच चुकतेय हे मी नक्की केलं मनाशी. पण पुन्हा कुठून कसं कोण जाणे, या दोघांना बळ आलं, आणि मला त्यांनी सावरलं. या वेळी मात्र बाकी काहीही करता येण्यासारखं नव्हतं. एकतर वर्षभर मी नरम-गरम तब्येतीमुळे हैराण होते. त्यात अभ्यास कसा करावा आणि इंजि.चे सेमिस्टरच्या दृष्टीने पेपर लिहायची पण एक पद्धत असते वगैरे बाबतीत मी मागे पडले होते. माझ्याकडूनही कुठेतरी प्रयत्नांत चूक झाली होती. खरं तर ११-१२वी ची वर्षं वाया गेली म्हणजे मी जास्त अ‍ॅलर्ट रहायला हवं होतं, तशी राहिलेही होते. एक क्षणसुद्धा मला काय मिळवायचंय याचा विसर पडू दिला नव्हता. पण या वेळी मार्ग चुकला होता. हार्ड वर्क होतं, पण थोडं स्मार्ट वर्क कमी पडलं. बरं, प्रॅक्टिकल्स मधे कायम ५० पैकी ३५-४० वगैरे...म्हणजे येत नाही असं नव्हतं! पण ते पेपरात लिहिण्यात कमी पडत होते मी.

माझ्या विचारांतून मी जरा बाहेर पडले आणि लक्षात आलं की माझ्या वर्गातली ६० पैकी ३२ मुलं पुढच्या वर्गात गेली. म्हणजे जवळजवळ ५०% मुलं मागेच राहिली! हा अजून एक धक्का होता. पण हाती घेतलेलं पुरं करायचं ही शिकवण...त्यामुळे घरी राहून अभ्यास केला. डिसेंबरमधे पुन्हा ५ पेपर दिले आणि पुढचे ६ महिने योगा शिकणं वगैरेसाठी परत आम्ही सगळे रत्नागिरीत आलो. नाहीतरी नाशिकच्या उन्हाळयात ६ महिने करणार काय होतो तिथे! Uhoh पण त्या काळात बीपी नॉर्मल आलं ते आजतागायत. Happy
पेपर चांगले गेले होते, पण अपयशाने पोळले होते मी. पण भित्यापाठी ब्रह्मराक्षस.....कारण फेब्रुवारीत रिझल्ट लागला त्यात खरंच पुन्हा अपयश आलं होतं. अगदी संपूर्ण अपयश! Sad
इथे मात्र मी पूर्ण खचले. आता कोणीही कितीही समजावलं किंवा रागावलं तरी नवी उमेद नव्हती माझ्यात अभ्यास करायची. थोडे दिवस मी पुस्तकांपासून लांब होते. मग हळूहळू पुन्हा अभ्यास सुरु केला. रत्नागिरीत काही लोकाचं मार्गदर्शन घेतलं, अगदी ३ तास वेळ लावून पेपर सोडवणे आणि ते तिथल्या प्राध्यापकांकडून तपासून घेऊन, काही दुरुस्त्या करणे, आवश्यक तिथे लिहायची, अभ्यासाची पद्धत बदलणे हे सगळं केलं. एवढं केल्यावर मी निर्धास्त झाले आणि मे मधे परत परीक्षा दिली. या वेळी मी खुशीत आहे हे बघून घरीपण सगळे निवांत होते. एक दुष्टचक्र संपलं म्हणून....

या वेळी मीच पेपर देउन आल्यावर म्हटलं होतं, की कोणीही जरी पेपर तपासले तरी ४० च्या आत मार्क्स मिळत नाहीत, ४०+ असतील नक्की.
पण कुठे माशी शिंकली देव जाणे!
रिझल्ट लागला. एका वेळी मागच्या वर्षीच्या जास्तीत जास्त ३ ATKT चालतात, माझ्या या परीक्षेत ४ होऊन पुन्हा वर्ष वाया! मी जीवच द्यायची बाकी होते. किंवा शिक्षण सोडून डिप्लोमावर नोकरी करायची वगैरे...
पण नशीबात काहीतरी वेगळं होतां. या वर्षी मी पुन्हा पेपर रिव्हॅल्युएशनला देऊन प्रोव्हिजनल अ‍ॅड्मिशन घेतली. (म्हणजे रिव्हॅलचा निकाल लागेल तोवर रेग्युलर कॉलेज करायचं. निकाल चांगला लागून विषय सुटले तर आपोआप नवीन वर्षात कंटिन्यू.. नाहीतर आपोआप ती अ‍ॅड्मिशन कॅन्सल, फी रीफंड घ्या, कम नेक्स्ट इअर!)
नशीब जोरावर होतं. एका विषयात मार्क वाढून माझं वर्ष वाचलं. अ‍ॅड्मिशन घेतल्याचा फायदा झाला. अर्थात ३ मागचे आणि ५ नवे विषय होते, पण माझा आत्मविश्वास परत आला होता. मी खूप अभ्यास केला परत. अगदी मन लावून. आणि फळ मिळालं...

पण अजून बहुतेक माझी कसोटी संपली नव्हती. नव्या वर्षाचे सगळे विषय मी उत्तम मार्कांनी पास झाले होते, पण राहिले ते पुन्हा मागचेच. आणि या वेळी जर ते मे-जूनच्या च्या परीक्षेत नाही सुटले तर पुन्हा एक वर्ष वाया!
कधीकधी आपण अपयशालाही सरावतो आणि केवळ कर्तव्य म्हणून काही करतो आणि उरलेला भार देवावर घालून मोकळे होतो! मी काहीशी चिडचिडी, बरीच निराश झाले होते. पण हार मानायची नाही हे सारखं मनात होतं. आई एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे वागत होती. रोज देवीला साकडं घालत होती. माझं अभ्यासातून लक्ष उडू नये म्हणून अथक प्रयत्न करत होती. बाबा कुठून धीर गोळा करत होते देव जाणे! देवच जाणे....कारण मी नीट अभ्यास करतेय ना, प्रयत्न योग्य दिशेत आहेत ना, कमी पडत नाहिये ना....या सगळ्याबरोबरच ते रोज देवाजवळ माझ्यासाठी प्रार्थना करत होते. मी पेपर ला गेले की दुपारी पुन्हा आंघोळ करून ते देवासमोर बसून ३ तास अथर्वशीर्ष म्हणत हे आईने मला शेवटचा पेपर झाल्यावर सांगितलं होतं.

मे-जूनच्या परीक्षेच्या वेळी माझ्या मोठया ताईच्या बाळंतपणासाठी आई ८ दिवस कोल्हापूरला गेली आणि ताईला आणि बाळाला घेऊन आली. माझे पेपर चालू होतेच. शेजारचा ब्लॉक रिकामा होता, तिथे मी त्या मालकांची परवानगी घेऊन रात्री अभ्यासाला जायचे. बाळ रडायचं खूप म्हणून. पण एकूण माझी गाडी मार्गी लागत होती.

त्या परीक्षेतही नशीबाने साथ दिली. मागचे २ अतिमहत्त्वाचे, ज्यावर माझं वर्ष अवलंबून होतं ते दोन्ही विषय सुटले... खरं म्हणजे मला आता पेपर इतक्या वेळा दिल्यामुळे सगळं पाठ झालं होतं. आणि गमतीची गोष्ट ही की मागच्या वेळचे बरेच प्रश्न रिपीट होते. रिझल्ट बघून मी म्हटलं, "गेल्या वेळी हेच प्रश्न होत, मी अशीच उत्तरं लिहिली, तेव्हा नाही मर्क्स दिले. आता बरे दिले!" पण एकूण सगळ्या चक्रातून मी सुटले होते!

शेवटच्या वर्षी मागच्या ६ वर्षांचा राग, अपमान (१२वीत झालेला मी अपमानच मानला होता), माझ्याकडून कमी पडलेले प्रयत्न, चुकलेले मार्ग, "त्या वेळी का नाही सुटला हा विषय, आणि आता तसंच सगळं असून बरा सुटला"....असे प्रश्न..."अरे यार....२५ मार्कांचा पेपर लिहिला मी आणि परत द्यायचा म्हणून तयारी करत होतो....५५ मार्क्स कसे मिळाले मला?" असे कोणाचेतरी उद्गार आणि माझ्या डोळ्यांत येणारं पाणी... कधीतरी कुणीतरी लागट काही बोललेलं आणि त्यावेळी हात दगडाखाली होते म्हणून मुठी घट्ट मिटून दाबलेला संताप ....सगळं धुमसत होतं मनात. खरंच पेटून उठले होते मी!

हीच ती वेळ आहे एवढंच कळत होतं. अर्जुनाला कसा पक्ष्याचा डोळाच फक्त दिसत होता, तसं मला माझं संपूर्ण यशस्वी शिक्का असलेलं मार्कशीट दिसत होतं फक्त.

आतापर्यंत आई-बाबांनी खरंच माझ्यासाठी चौकटीबाहेर जाऊन केलेली तडजोड, तायांनी केलेला सपोर्ट, प्रसंगी कठोर होऊन रागावणं, चुकांची जाणीव करून देणं, प्रसंगी आत्मपरीक्षण करायला भाग पाडणं, माझं अपयश मी कुरवाळत नाहिये ना हे वेळोवेळी तपासणं, मला कुठल्याही प्रकारे चुकीच्या किंवा नैराश्याच्या मार्गावर न जाऊ देणं...
या काळात या सगळ्यांनी जे केलं ते असं यादीत मावण्यासारखं नाही. मला फक्त तेच दिसत होतं शेवटच्या वर्षी.

आणि पुन्हा एकदा जीव ओतून मी अभ्यास केला. माझे सगळे उच्च ग्रह एकवटले असावेत..

(मधे एक राहिलं. ते हे, की ते मागचे २ विषय राहिलेले असून, १ ड्रॉप माथी असून, १२वी-डिप्लोमा चं वळण घेउनही, आणि हे सगळं अगदी प्रामाणिकपणे सांगूनही माझं एका सॉफ्टवेअर कंपनीत पहिल्या प्रयत्नात कॅम्पस सिलेक्शन झालं!!!!!!! थर्ड इअर असताना. मी फक्त अ‍ॅप्टिट्युड टेस्ट देउन येते म्हणून डबा पण न घेता गेले, कारण ती टेस्ट फेल होऊन दुपारी घरीच येईन ही २००% खात्री! Happy आणि मग लास्ट इअर चालू झालं, ते मागचे २ विषय सुटल्यावर! काय योग म्हणावा हा! भगवान देता है तो छप्पर फाड के!)

तर, तेव्हाच मला तो सर्वोत्तम आणि अभिमान वाटावा असा रिझल्ट समजला. इतकी वर्षं जे होते ते 'निकाल' होते.... हा खरा न्याय होता, खरा ;रिझल्ट' होता.

तो क्षण फक्त जगण्यासारखा होता, शब्दांत मांडता येणार नाही तो.

*************************************

मनातलं सगळं लिहिल्यावर मी तटस्थपणे याकडे बघते, तेव्हा वाटतं की मी हेच शिक्षण घ्यायचा हट्ट का केला असेन? खरंतर मी १०वीच्या बोर्ड परीक्षेत संस्कृत मधे प्रथम आले होते (आता तो इतिहास झाला Sad ), आणि अवांतर वाचनाची खूप आवड. मग आर्ट्स ला का नाही गेले? घरून सक्ती होती की इंजि. चं खूळ/ ट्रेंड/ फॅड/ पैसा आणि नोकरी सहज मिळेल म्हणून? (माझ्या या अपयश मालिकेतही हा प्रश्न खर्‍याखुर्‍या काळजीने अनेकांनी विचारला होता आणि मला रागही नव्हता आला.)

तर यातलं काही नाही! मला भाषेची आवड होती त्याहून जास्त Elect and Telecom ची होती. नस्ते उद्योग म्हणून घरातले पेन्सिल सेल उघडणे, बरं काम म्हणून टेपरेकॉर्डर दुरुस्त करणे, रेडिओ बंद पडला असेल तर तो चालू करणे वगैरे लहानपणापासून आवडायचं. आणि हेच शिकायचंय हे १२वीत नक्की केलं. भाषेची आवड ही निबंध लिहिणे किंवा इतर वाचन यापुरती होती. प्रत्यक्ष शिकताना माझा इंटरेस्ट संपला असता याची मला खात्री होती.

मग इतकं अपयश का आलं? याचं ज्ञात असलेलं उत्तर वर दिलंय मी. मार्ग चुकणं वगैरे....पण अपयशातही सातत्य कसं हे मलाही न उलगडलेलं कोडं आहे!
बरं अजून एक गंमत म्हणजे, मला प्रोग्रॅमिंग अजिचबात आवडत नाही. पण त्या टेस्टमधे माझं लॉजिक फार स्ट्राँगली चाललं असावं.... "We can see a god programmer in you" अशी कॉम्प्लिमेंट मिळाली होती मला मुलाखत झाल्यावर! आणि इतकं करून मला ते करायचं नव्हतं म्हणून त्याच कंपनीत (सुदैवाने) नोकरी चालू झाल्यावर मी टेस्टिंग्मधे स्विच केलं. मग जर मी इतकी जिद्दी होते तर प्रोग्रॅमिंग का नाही शिकले... तर मला खरंच त्यात रस नाही! आणि कितीही सोप्या भाषेत ते शिकवलं कोणी, तरी मला एका पॉइंटपलिकडे ते झेपत नाही! तिथे मात्र I just gave up!

असो!

अगोदरचं ललित वाचून माझ्या जिद्दीला ज्यांनी सलाम केला त्यांचे मनापासून आभार, पण आता हे वाचून माझ्या बुद्धीबद्दल शंका यायला खूप वाव आहे! Wink

आज मी अत्यंत आनंदात आहे. कुठलेही रिग्रेट्स नाहीत. जे शिकले त्याबद्दल तक्रार नाही. जे हवं ते मिळवताना घरच्यांना त्रास झाला याची खूप खोलवर जाणीव आहे, पण आजवर मी कुठल्याच इतर बाबतीत त्यांना दुखावलेलं नाही.
शैक्षणिक यश-अपयशाच्या पलिकडे जाउन मी जगाच्या शाळेत थोडंफार शिकले या ७ वर्षांत. अर्थात अजूनही खूप शिकतेय, शिकायचंय. पण माणसं खूप चांगली भेटली या प्रवासात. अगदी ११वी पासून बीई होईपर्यंत! आमच्या सुखदु:खात सामील झालेली..

त्यामुळे ज्या काही थोड्याफार माणसांमुळे त्रास झाला, त्याची बोच जरा कमी झाली. आता मी पूर्वीसारखी जरा काही झालं की घाबरून सोडून दिलं अशी नाही राहिली. माझे पेशन्स वाढले जरा. Happy

हे सगळं इथे लिहायचं कारण एकच, की असे अपघात होत असतात, त्यावरून संपूर्ण माणूस जज करू नये. काही जणांच्या बाबतीत माझ्यासारखी अपघातांची मालिकाच घडते. चुकाही घडतात. पण गरजेचे असतात ते पेशन्स, आणि माणसांतल्या चांगुलपणावरचा विश्वास.

आई नेहेमी म्हणते, रात्री झोपताना "श्रीकृष्णार्पणमस्तु" म्हणावं आणि दिवसभरात घडलेलं सगळं त्याच्या पायाशी वहावं. त्याला जे द्यायचं जे पवित्र आणि चांगलंच हवं ना? मग कितीही वाईट घडलं तरी मनात कटुता न ठेवता, आणि कर्तव्याला न चुकता, ते त्याला अर्पण करावं!

हे पुन्हा तत्त्वज्ञानच झालं आणि एक शंभरांश सुद्धा आचरणं कठीण! पण हे शिकायला मिळालं जे आयुष्यभर उपयोगी पडेल मला!

गुलमोहर: 

तुझे दोन्ही अनुभव / आठवणी आत्ताच वाचल्या. पहिली वाचुन मनं इतकं अस्वस्थ झालं कि काय सांगु.

अश्या गोष्टी जगात घडतं असतात आणी बर्‍याचं जणांना घरून सपोर्ट नसेल तर किती डिप्रेशन येत असेल असा ही लगेच विचार आला. तुला बरेच वेळा ह्यातुन जाताना मनात कित्येक वेळा वाटलं असेल कि "why me ?" पण तो विचार मनातून काढून टाकून तू इतक्या जिद्दीने ह्या सगळ्या ला इतक्या कोवळ्या वयात सामोरी गेलीस आणी त्या बद्दलं कुठ्लीही कटूता मनात ठेवली नाहीस ह्या बद्दल तुझं मनापासून कौतुक.

तुझ्या आई वडिलानी कसं हे सगळं निभाऊन नेलं, कसं तुला सततं एनकरेज केलं, हे पण वाचायला आवडेल. तसं तू लिहिले आहेसच पण त्यानी पण लिहिलं तर ?

तू लिहिले आहेसच पण त्यानी पण लिहिलं तर ?>>>> Happy
आई तर त्या आठवणीही नको काढू म्हणते आता.. कसं झेपलं सगळं असंच वाटतं आता तिला.

प्रज्ञा, तुला आलेल्या अडचणी वाचुन खरच फार वाईट वाटलं.
पण खरं सांगु का इंजि आणि मेडीकल दोन्ही मधे असे बर्‍याच वेळा होते. पेपर लिहिलेलाच नसतो पण मुलं पास होतात किंवा पुर्ण सोडवुन नापास . हे कसे आणि का होते ते तपासणारेच जाणे. शिवाय आमच्याकडे एक वंदता होती की पेपर तपासताना उत्तर फुटपट्टीने तपासतात. जितके मोठे उत्तर तितके मार्क. कितीतरी ओळखीची काहीही येत नसलेली मुले मुली प्रश्नातला एक शब्द ओळखीचा वाटला तर त्याबद्दल पान्भर लिहित (काय ते तेच जाणे) आणि पास होतं.
अर्थात चांगले पेपर लिहुन छान मार्क मिळवणारे आहेतच पण असेही होते म्हणुन खरच फार वाईट घेऊ नकोस.

प्रज्ञा आत्ता सकाळी दोन्ही भाग वाचले. खरच फार वाईट वाटलं.
एका निरागस मुलीचे आणि सज्जन कुटुंबाचे निराशावादी माणसांत परिवर्तन होण्याला पुरेसा होता हा अनुभव. तरीही निराशेत आणि खास करून "why me" मध्ये गुंतून न पडता या सर्व क्लेशदायक अनुभवांना इतक्या कोवळ्या वयात तू सामोरी गेलीस आणि त्यावर मात करून वर सकारात्मक वृत्ती कायम ठेवलीस याबद्दल तुझे आणि तुझ्या पाठीशी उभे रहाण्यासाठी तुझ्या सगळ्या कुटुंबाचेच खास कौतुक.
शिक्षणक्षेत्रामधला भ्रष्टाचारामुळे अतिशय चीड आली आणि खूप अस्वस्थही वाटलं.

तुझे दोन्ही लेख वाचले. पहिला भाग वाचून खूप वाईट वाटलं.. चीडही आली.. पण शेवटी जे व्हायचं होतं तेच तुझ्याही बाबतीत झालं.

कुणाच्या बाबतीत असं होऊ नये आणि झालं तरी तुझं हे ललित त्यांच्या हाती वेळीच पडावं ही सदिच्छा !

"हे सगळं इथे लिहायचं कारण एकच, की असे अपघात होत असतात, त्यावरून संपूर्ण माणूस जज करू नये."

~ ही फिलॉसॉफी फार आवडली आणि ती अत्यंत अनुकरणीय अशीच आहे. दोन्ही भाग एकत्रीत पुन्हा वाचले....तुमच्या (ज्यावेळी तुमच्या म्हणतोय त्यावेळी समस्त कुटुंब त्यात गृहीत धरावे) सहनशक्तीचे शक्य असेल तर मीटर काढून त्याचे रीडिंग घेतले तर खुद्द तुम्हीच विस्मयचकित व्हाल.

अनुभव मांडण्याची धाटणी सरळसरळ संकेत करते की ही मुलगी 'आर्टस' मध्ये किती Shine झाली असती ! (शिवाय संस्कृत मध्ये अव्वल !). पण असो, ज्या क्षेत्रात तुमची वाटचाल चालू आहे तिथे ही 'कविता' निर्माण करता येतेच....ती तुम्ही निश्चितच कराल.

छान

जबरदस्त लिहिले आहे
तुझ्या प्रांजळपणाला मनापासून सलाम. आपल्या संघर्षाकडे इतक्या तटस्थने पाहता येणे आणि त्याबद्दल अभिनिवेषविरहीत लिहीता येणे अवघड असते.
लिहीत रहा!!!

शेवटी असली रणछोडदास छांचड यशस्वी होतोच. Happy त्याचे मार्क घेऊन कुणी काही का करेना.. बोला रँचो बाबा की जय..

खरय अनुभवातुन माणुस समृद्ध होतो.परिस्थिती माणसाला घडवते.
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा Happy

बापरे प्रज्ञा! दोन्ही लेख आत्ता एकत्रच वाचले. कधीकधी एखाद्याच्या मागे खरंच उगाच कटकटी लागतात, त्या अनेक वर्षं संपतच नाहीत.पण तुझी आणि घरच्यांची जिद्द जबरदस्त!!

दोन्ही आठवणी वाचून खूप कौतुक वाटलं....

आमच्या अकाउंट्सच्या भाषेत बोलायचं झालं तर, एकीकडे 'डेबीट' आलं की त्याचं 'क्रेडिट' दुसरीकडे कुठेतरी यायलाच पाहिजे... तेच तुमच्या बाबतीत दिसतंय. Happy

दोन्ही लेख प्रचंड आवडले . माझ्याही अशा काही आठवणी जाग्या झाल्या .
.
पुर्वार्धः
मला बारावीत ८५% होते ...पीसीएम ला ९०% ...पण इन्जीनीयरींगला अ‍ॅडमीशन नाही मिळाली Sad अन माझ्या पेक्षा तब्बल १०% कमी असलेल्या काही खास मुलांना अ‍ॅडमीशन मिळाली (शिवाय सरकारी स्कॉलरशीपही ) मला ठेंगा दाखवत "ते" इन्जीनीयर झाले
.
मी खचुन गेलो नाही , म्हणलं "बाप्पाची" इच्छा असेल की आपण डॉक्टर व्हावं ..
जोरदार अभ्यास केला सी इ टीचा
पण तिथेही तेच ...माझ्यापेक्षा १००० रॅन्क खाली असणार्‍या काही खास मुलांना अ‍ॅडमीशन मिळाली (शिवाय सरकारी स्कॉलरशीपही ) मला ठेंगा दाखवत "ते" डॉक्टर झाले .

मी खचुन गेलो नाही , म्हणलं "बाप्पाची" इच्छा असेल की आपण सायंटीस्ट व्हावं ....

म्हणुन बी. ए. स्सी ला अ‍ॅडमीशन घ्यायला गेलो ...तिथेही तेच !!
आता मात्र खचलो ...कळेनाच आपला दोष काय आहे ??
तेव्हा माझे एक हितचिंतक मला म्हणाले होते " "गोडबोलें" असणं हाच तुझा दोष आहे " Light 1

असो . मग म्हणलं ...."बाप्पाची" तुझी इच्छा काय आहे ते कळतच नाहीये ...बाळाला सांभाळुन घे !!

उत्तरार्धः
तेव्हा पासुन "बाप्पानं " सांभाळुन घेतलय !!

प्रज्ञा, तुझे कौतुक वाटतेच पण तुझ्या आई-वडिलांनी, बहिणींनी तुला या संघर्षात जी साथ दिली त्याला तोड नाही. ग्रेट ! Happy

कुटुंबसंस्थेचं महत्त्व अश्यावेळी समजतं. तटस्थपणे लिहिलेलं आवडलं. अस्सल गुणवत्ता कधीच मोडून पडत नाही. Happy

प्रज्ञा आज दोन्ही अनुभव वाचले, माझ्या अनुभवांशी मिळते जुळते वाटले म्हणून जास्त आपलेसे वाटले, आणि तू त्या वेळी कुठल्या मानसिक अवस्थेतून गेली असशील याची पूर्ण कल्पना आली. तरीही तुझ्या जिद्दीला सलाम. आणि तुझ्या कुटूंबियांच्या सहकार्यालाही!

त्यावेळी तुझ्या वडीलांच्या पोझिशनमुळे निदान तुम्हाला शोधकार्यपद्धती माहीत होती. मी मात्र दहावीला माझीच चूक आणि नशीब यांमुळे जाऊदे म्हटलं आणि पुढच्या तयारीला लागले.

मराठी विषय ज्यामध्ये मला स्कॉलरशिपलाही सर्वात जास्त गूण होते आणि प्रत्येक वर्षी ऐंशीच्या वर गुण मिळूनही दहावीला फक्त ४० गुण! संस्कृत आणि इंग्रजीमध्ये प्रथम क्रमांक आणि मराठी मध्ये इतके कमी??? मग रिचेकींगच्या भानगडीत पडलेच नाही, म्हटलं जाऊदे इंजिनिअरिंगला मराठीच्या गुणांचा तसा काही उपयोग नसतो आणि आता हौस म्हणून माबोवर, मटामध्ये आणि इतर मॅगझिनमध्ये लिहीतेच ना मराठी Happy

समाधानाची बाब म्हणजे डिप्लोमा आणि डिग्रीला लास्ट इयरला डिस्टिंग्शन मिळालं पण कधीतरी त्या बोचर्‍या आठवणीवरची खपली निघतेच!

Pages