जगण्यासाठी (दोन कफियाची गजल)

Submitted by निशिकांत on 2 May, 2011 - 10:19

जे जे घडले ते विसारावे जगण्यासाठी
दु:ख मनीचे कुरवाळावे हसण्यासाठी

ग्रिष्म उन्हाळा तगमग भारी नाराजी का?
वेड वसंताचे लागावे फुलण्यासाठी

क्षितिजापुढती काय असावे ओढ मनाला
मजला देवा पंख मिळावे उडण्यासाठी

दु:खच होते, कोणी कोठे दु:खी बघता
ओठावरती स्मीत फुलावे दिसण्यासाठी

देणे घेणे खाते लिहिणे बंद करू या
शुन्यामध्ये स्वप्न बघावे जपण्यासाठी

दरवळ घेउन आली, कानी कुजबुजली ती
रेतीवरती नाव लिहावे पुसण्यासाठी

व्यक्त कराया भाव मनीचे शब्द कशाला?
भाव तरल डोळ्यात दिसावे कळण्यासाठी

शस्त्र शिकारीसाठी तुजला हवे कशाला?
नजरेने नजरेस भिडावे फसण्यासाठी

"निशिकांता"ला राग जगाचा चिडचिड भारी
केंव्हा केंव्हा प्रेम करावे रुसण्यासाठी

निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा

गुलमोहर: 

अतिशय सुरेख!!!
प्रत्येक शेर आवडला. दोन काफियाची गझल, पहिल्यांदाच पाहिलीये मी. मलाही आता असे काही लिहावे असे वाटू लागले आहे.

निशिकांतजी नमस्कार,

दोन काफियांची गझल होवूच शकत नाही. आपल्या उपरोक्त गझलेत रदीफ नाही. त्यामुळे अण्यासाठी हाच काफिया होतो. त्यामागील 'आवे' हा सामायिकपणे वापरलेला अक्षरसमूह काफिया होवू शकत नाही. कारण काफियाच्या उजव्या बाजूला सामायिक अक्षरसमूहाचीच आवश्यकता असते. इथे तशी नाही किंवा कोठेही नसूच शकते. इथे हस, जग, फुल असे वेगळे शब्द आहेत. त्यामुळे इथेही दोन काफिये होत नाहीत.

**** दोन काफियांची गझल असूच शकत नाही. ****

कसाही का दिला होता सहारा वाहण्यासाठी
प्रवाहाला कसे सोडू किनारा गाठण्यासाठी

समजा केली दोन काफियांची गझल! कुणाचा विरोध आहे? बाराखडीचा? बाराखडीत खाली बाबी कुठे म्हंटलेल्या आहेत?

१. दोन काफियांची गझल असू नये.

२. 'तेरा'खडी निघणारच नाही.

???????

-'बेफिकीर'!

कसाही का..! दिला होता सहारा वाहण्यासाठी
प्रवाहाला कसे सोडू किनारा गाठण्यासाठी?

अता पाऊस हक्काचा कुठेही पाडता येतो
अता लांडोरही मागे पिसारा नाचण्यासाठी

मला झाले कळेनासे तुझे संदेश डोळ्यांचे
इशारा देत जा सोपा, 'इशारा' वाटण्यासाठी

जुना वाडा बिर्‍हाडांना मिजासी देत कोसळला
फिरे आनंद पुर्वीचा, निवारा मागण्यासाठी

पुन्हा जातो जगामध्ये उभारी घेत आशेची
पुन्हा येतोच मी येथे ढिगारा टाकण्यासाठी

कधी विश्वास माझा वाटला नाही नशीबाला
हजारो यत्न केले मी 'बिचारा' भासण्यासाठी

तुला बोलावले नाही मनाला हासण्यासाठी
तुला बोलावले होते पसारा लावण्यासाठी

दिला आहे मनाने वेग स्वप्नांना प्रकाशाचा
जरी काळाकडे आहे खटारा हाकण्यासाठी

पुन्हा येणे, पुन्हा जाणे, कुणाची कैद आहे ही?
कुणाला अर्ज धाडावा पहारा काढण्यासाठी?

अशा मुर्दाड लोकांच्या मनी रोमांच आणावा
मरावे 'बेफिकिर'ने मग शहारा आणण्यासाठी

ही माझी प्रकाशित गझल असून माझे असे म्हणणे आहे की यात दोन काफिये आहेत.

कोण कुठल्या बेसिसवर विरोध करणार?

-'बेफिकीर'!

व्यक्त कराया भाव मनीचे शब्द कशाला?
भाव तरल डोळ्यात दिसावे कळण्यासाठी>> वा वा!

केव्हा केव्हा प्रेम करावे रुसण्यासाठी>>> अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम!

निशिकांतराव,

पहिल्या दोन शेरात व मक्त्यात जरा व्याकरण बिघडले का?

ग्रीष्म

विसरावे

राग जगाचा , (स्वल्पविराम) चिडचिड भारी!

चांगली गझल!

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

"कुणाच्या धीट शापाने जिवाला पालवी आली,
कुणाची कौतुके होती- धुमारा छाटण्यासाठी..>>>

हा डॉ.ज्ञानेश पाटील यांचा माझ्या 'सदर' गझलेवरील आणखीन एक बांधलेला शेर!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मला गझलेतलं अजिबात कळत नाही. पण एकापेक्षा जास्त यमक असू शकतात. त्याने सुरेख नादनिर्मिती होते. अनुप्रासानेही नाद निर्माण होतो. तेव्हा यमक एकच काय दहा देखील घेऊ शकता. पण कविता पूर्ण करण्याची हिंमत पाहीजे.. Happy

मस्त गझल!!

व्यक्त कराया भाव मनीचे शब्द कशाला?
भाव तरल डोळ्यात दिसावे कळण्यासाठी>>> हा शेर मस्तच!!

सर्व शायर मित्रांना धन्यवाद उत्तम प्रतिसादासाठी. आता दोन काफियाच्या गजलेसंबंधात थोडे. मी ब-याच वेळी उत्तरदाखल लिहिलेल्या स्पष्टीकरणात नमूद केले आहे की माझा गजलेचा शास्त्रोक्त अभ्यास नाही. एकदोन वृत्ताची माहिती घेवून गजल लिहिण्यास सुरुवात केली. हळूहळू नवीन वृत्तात लिहिण्यास सुरू केले. त्यामुळे दोन काफियाची गजल असतेकी नसते याबद्दल मी मत प्रदर्शन करणार नाही कारण ते दु:साहस ठरेल. विविध शायरांच्या गजला वाचून त्यातील वैविध्य माझ्या गजलात आणायचा प्रयत्न करतो.
दोन काफियाच्या दोन गजला खाली उदाहरणार्थ देत आहे. या दोन्ही गजला श्रेष्ठ गजलकार इलाही जमादार यांच्या आहेत.

पान कवितेचे कुणी हे फाडले की फाटले?
घर कशाने पेटले हे पेटले की जाळले?

अस्मिता अभिमान ज्यांच्या दरवळे रक्तातुनी
प्रश्न हा येतो कुठे ते मोडले की वाकले?

नित्य नेमाने फुले मी आठवांची वेचतो
अंतरी हे रोप कोणी लावले की उगवले?

होउनी नाराज ती गेल्यावरी दिसता पुन्हा
आज त्याने भेटण्याचे टाळले की सोडले?

पाहिले आहेत बहुरुपी "इलाही" मी असे
सोंग ज्यांनी घेतले ते झोपले की जागले?

दुसरी गजल त्यांचीच पण उर्दूतील आहे. त्या गजलेचा मतला आणी दोन शेर फक्त खाली देत आहे.

शहर की आबादियाँ बढने लगी
अम्न की परछाइयाँ घटने लगी

मौत की आहट से खुश है जिंदगी
रूह की अब बेडियाँ खुलने लगी

आसमाँ आ जाएगा कदमों तले
शोहरतें अब सीढियाँ चढने लगी

वर दोन गजला मुद्दाम दिल्या आहेत. उर्दू गजलेत रदीफ आहे आणी मराठी गजलेत माझ्या गजले प्रमाणे रदीफ नाही. आता सूज्ञ वाचक आणी गजल्कारांनीच निर्णय घ्यावा की गजल दोन काफियाची असते का नाही.

सहज जाताजाता नमूद करू इछितो की मला एकदा इलाहींनी एका भेटीत त्यांची एक अशी गजल वाचून दाखवली की त्याच्या प्रत्येक शेरात मक्त्या प्रमाणे शायराचे नाव होते. ती गजल त्यांची स्वतःचीच होती. मी त्यांना असे करता येते का? असा प्रश्न केला असता त्यांची प्रतिक्रिया आदरणीय भूषणजी सारखीच होती. त्यांनी मला प्रतिप्रश्न केला की असे असू नये असे कोठे लिहिले आहे? हे विधान बेफिकिरांच्या तेरा बाराखडी या
concept च्या फार जवळचे आहे याची प्रकर्षाने जाणीव होत आहे.

काय योग आहे हे कळत नाही, अशात माझ्या ब-याच गजलेवर प्रतिक्रियेचे मोहोळ उठत आहे. कदाचित भित्याच्या पाठी ब्रह्मराक्षस हे खरे असावे. मी याकडे सकरात्मक दृष्टीकोनातुन बघतो. घुसळण झाली म्हणजे नवनीत निघलेच ना!

भूषणजी,
आपण म्हणता ते खरे असावे. जमादारांनी आपले नाव रदीफ म्हणूनच वापरले आहेही बाब लक्ष देऊन मक्ता वाचल्या नंतर ध्यानात आली. सहजच त्याच्या गजलेचे मतला, मक्ता आणी एक शेर खाली देत आहे.

कळला कधी न तुजला व्यापार इलाही
घेईल विकत तुजला बाजार इलाही

सुकल्या कळ्या फुलांचा सन्मान अनोखा
खुंटीस टांगलेले बघ हार इलाही

उरला तुझा न कोणी साथी न सगाही
आता तुला "इलाही" अधार इलाही

धन्यवाद

माझ्या माहितीप्रमाणे जुलकाफिया गझल म्हणजे एकापेक्षा जास्त कव्वाफी असलेली गझल.
उपरोक्त लिन्क मधील गझल देखील तशीच आहे.
(http://www.marathigazal.com/node/205)
यापेक्षा वेगळे असल्यास कृपया कळवा.
कुणालाही न दुखावता आपली मते द्यावीत ही कळकळीची विनंती!