श्रीराम रानडे

मराठी नाट्य, चित्रपट, रेडियो आणि दूरदर्शन क्षेत्रातले एक अष्टपैलू कलाकार. 'परदेसाई' या माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, म्हणून त्यांची ओळख झाली, खरं तर त्यांच्या कन्येने करून दिली, पण नंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेला, 'एक होता विदुषक' वर लिहिलेला त्यांचा एक लेख आठवला. सहज म्हणून त्यांना त्याविषयी विचारलं आणि त्यावेळी झालेल्या गप्पागोष्टीतून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आवाका लक्षात येऊ लागला. आरती रानडे (rar) ही त्यांची कन्या तर आपल्यातलीच मायबोलीकर, तेव्हा त्यांना मायबोली माहीत आहे का? हा प्रश्न आम्हाला विचारावा लागला नाही. सध्या ते न्युजर्सीत आहेत, तेव्हा त्यांची एक छोटीशी मुलाखत घेतली, त्यातला काही भाग.

ShriramRanade.jpg
\- आपल्या बालपणाच्या काही आठवणी सांगा.

\- माझं मूळ गांव सांगली. पण वडिलांचं आणि आजोबांचं पटेना, त्यामुळे तिथे फारसं वास्तव्य नसे. आम्ही वाढलो मिरजेला. सुरुवातीला मी म्युनिसीपालिटीच्या शाळेत होतो, म्हणजे १९४६ साली. मधले काही दिवस, वडिलांच्या नोकरीमुळे आम्ही फलटण संस्थानमध्ये होतो, पण तिथे मी दुसरीत नापास झालो, त्याला कारण म्हणजे माझा पाय मोडला होता, आणि पाय मोडायचं कारण म्हणजे आम्ही मारामारी केली होती. आणि पाय बरा होण्यासाठी सात आठ महिने ससून हॉस्पिटलमधे झोपून काढावे लागले होते. त्या दरम्यान वडिलांची नोकरी गेली आणि आम्ही मिरजेला परत आलो. त्यानंतर इंग्रजी पहिली दुसरी करत १९५६ साली मी मिरज हायस्कूल म्हधून SSC झालो.

\- त्यानंतर तुम्ही कॉलेज शिक्षण केलं का?

\- मला SSC ला सायन्सचा शेवटचा पेपर फारच कठीण गेला. पुढचे दोन तीन महिने काय करावं याचा विचार करत काढले, आणि गम्मत म्हणजे त्या विषयात मला सत्तर गूण पडले. तेव्हा पासून माझा परिक्षेवरचा विश्वासच उडाला. मला असंही वाटायला लागलं की मला सायन्स चांगलं येतं. म्हणून मी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. तेव्हापासून पुढची आठ वर्ष मी नापास होत गेलो. शेवटी कंटाळून पुण्यात येऊन नोकरी धरली, आणि मग चौशष्ठ साली मी B.A. झालो.

\- तुम्ही नोकरी किती वर्षं आणि कुठे कुठे केलीत?

\- एकदा कळलं की सायन्स आपल्याला येत नाही, तेव्हा मग मी शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. तेव्हा मी फक्त इंटरसायन्स शिकलो होतो. त्यानंतर मी STC शिकलो. तेव्हा निळू फुलेंचा एक तमाशा चालला होता, 'येर्‍या गबाळ्याचे काम नव्हे', तो रात्री करून मी कसा बसा परिक्षेला पोहोचलो, आणि काय लिहिलं ते मला माहीत नाही, पण मी त्याही परिक्षेत पास झालो. Economics च्या सहाही पेपरात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 'भारत हा कृषिप्रधान देश आहे' याने केलेली आठवते. फक्त मी मोठ्ठं अक्षर काढून भरपूर लिहायचो. परीक्षकाने कंटाळून मला पास केला असावा.

\- तुमचा नाटक क्षेत्राशी संबंध कसा काय आला?

\- वयाच्या सहाव्या वर्षापासून नाटक, कीर्तन, तमाशा आणि संगीत याची गोडी लागली. एक तर मिरज हा तालमीचा गाव होता, तिथे संध्याकाळी पोरं रस्त्याऐवजी तालमीत दिसायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 'वसंत व्याख्यान माला' असायची. अगदी टिळकांपासून पु. ल. देशपांड्यांपर्यंत वेगवेगळे लोक तिथे येऊन भाषणं गेऊन गेलेले आहेत. तेव्हा तिथे भाषण ऐकायला जाणं ही पर्वणीच असायची. बरीच मोठी मोठी माणसं तिथे पहायला ऐकायला मिळाली. पुढे गोवा मुक्ती, आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही फार जवळून बघायला मिळाली. त्यात मोठ्या बंधूंकडे मोठ मोठ्या कलाकारांचं जाणं येणं असायचं. आणि मलाही आपल्याला अभिनय थोडाफार येतो असं वाटत होतं. त्यामुळे या क्षेत्राकडे वळणं सहाजिकच होतं.

\- तुमचा पहिला नाट्यप्रयोग कोणता?

\- मी पुण्याला आलो तो सिनेमालाईन डोक्यात घेतलेली होती. नोकरी वगैरे सगळं निमित्त होतं. दुर्दैवाने मी पुण्याला गेलो आणि सिनेमावाले सगळे कोल्हापूरला गेले. मग 'दुधाची तहान ताकावर' म्हणून मग नाटकाच्या मागे लागलो. सुरुवातीला तिकडेही कुणी उभं केलं नाही, पण राष्ट्र सेवादलात हळू हळू शिरकाव मिळाला. पुढे तर मी निळूभाऊंचा asistant होतो. 'बिनबियांचं झाड', 'पुढारी पाहिजे', 'चीनी आक्रमणाचा फार्स' असे बरेच प्रयोग आम्ही केले. तिथे काम करताना एक अशी सवय लागली की सगळ्यांच सगळं नाटक तयार. भुमिका ठरलेल्या नसायच्या, आणि आयत्या वेळी जो हजर असेल त्याने ती भूमिका करायची. त्यामुळे आता कुठलंही काम करताना दडपण येत नाही. मग समोर पाच प्रेक्षक असोत, किंवा पाच हजार असोत.

B.Ed करताना आमच्या एका मित्राने जब्बार पटेलांशी ओळख करून दिली. आणि मग ७२ साली Progressive Dramatic Association तर्फे घाशीराम कोतवाल हे नाटक उभं राहिलं. त्याचे पहिले १९ प्रयोग अगदी छान झाले, पण नंतर जे वादळ उठलं ते आमच्या संस्थेच्या चिंध्या चिंध्या करून गेलं. नाटकाच्या सुरूवातीपासूनच थोड्या फार कुरबुरी चालू झाल्या होत्या, आणि त्यातल्या मंडळींचे त्यात दोन गट झाले होते. पहिले काही प्रयोग होईपर्यंत सगळे एकत्र होते, पण नंतर त्यांचं पटेना. आम्हाला पु. ल. देशपांडे, शरद पवार, डॉ. लागू अश्या लोकांचा पाठिंबा होता. मग पुन्हा Theater Acedemy च्या नावाखाली ते नाटक उभं राहिलं ते १९७४ ला. पहिला प्रयोग फ़िल्म इंस्टिट्युटला झाला आणि मग मात्र ते नाटक थांबलंच नाही. सुरुवातीच्या प्रयोगाना मात्र बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवावा लागायचा, आणि आपल्याला कधीही मार खावा लागेल हे माहित होतं. खरं तर कर्तारसिंग थत्त्यानी तेंडुलकराना मारलं ही होतं.

त्यानंतर १९८० मध्ये जर्मनीला आमंत्रण आलं, तेव्हा दोन नाटकं जर्मनीला गेली, घाशिराम आणि सखाराम बाईंडर. इकडे गणपती विसर्जनाची मिरवणूक चालू असताना, आम्ही गुपचुप सटकलो आणि जर्मनीला गेलो. जाताना जरी लपत छपत गेलो असलो तरी येताना मात्र आम्हाला अगदी Red Carpet Treatment होती, आणि गम्मत म्हणजे जे लोक आम्हाला विरोध करत होते, त्यातल्या एकाच्या कँसरच्या शल्यक्रियेसाठी आम्ही 'घाशीराम' चा प्रयोग केला होता. त्यापुढे मग घाशिरामचे सातशे प्रयोग झाले. त्यानंतर महानिर्वाण, तीन पैशाचा तमाशा बेगम बर्वे अशी बरीच नाटकं केली. मग मोरूची मावशी, रामशास्त्री, नाथ हा माझा अशी काही व्यावसाईक नाटकं ही केली.

\- मग तुम्ही सिनेमाकडे कसे काय वळलात?

\- हातात तेंडुलकरांचं स्क्रिप्ट आणि डोळ्यासमोर डॉ. लागू, निळू फुले अशी नटमंडळी एवढ्या भरोश्यावर जब्बर पटेलांना सामना करता आला. तेव्ह्या त्यांच्याच गटातून आम्ही रुपेरी पडद्यावर आलो. जब्बारची खासियत अशी की प्रत्येकाची कूवत ओळखून ते लहान मोठी कामं देतात. त्यांच्या चित्रपटातून मी काही कामं केली. त्या नंतर 'जैत रे जैत', 'उंबरठा' असे काही चित्रपट केले. तुम्ही ज्याविषयी वाचलंत त्या 'एक होता विदुषक' मध्ये एक तमासगिराची भूमिका केली. मग 'कथा', 'एक डाव भुताचा' असे काही इतर चित्रपट केले.

\- आता तुम्ही काही चित्रपटात काम करताय का?

\- गौतम जोगळेकरांचा 'पक पक पकाक' मध्ये मी काम केलंय. आता तो नवीन चित्रपट काढतोय त्यातही मी आहे. 'दहावी फ' मध्ये मी शिक्षकाची भूमिका केलीय. 'नितळ' हा 'कोड' या विषयावर बेतलेला, 'बाधा' हा धनगरांचं जीवनावर बेतलेला चित्रपट असे काही वेगळे चित्रपटही मला मिळाले. पण चित्रपटात भूमिका ही माझी मीठभाकरी कधीच नव्हती. माझी नोकरी होती, बायकोची नोकरी होती, त्यामुळे या कामावर मला अवलंबून रहावं लागलं नाही.

\- TV सिरीयलशी तुमचा संबंध कधी व कसा आला?

\- ते फार उशीरा सुरू झालं. एक तर TV Center मुम्बईला आणि आम्ही पुण्याला. आम्हाला पुण्याहून मुम्बईला मुद्दाम न्यावं इतका आमचा भाव नाही. पण तरीसुध्दा विनय आपटे, स्मिता तळवलकर अशी मंडळी मधनं मधनं बोलावतात. पूर्वी कधीतरी त्यांच्याबरोबर काम केलेलं असल्यामुळे त्यांनाही आमची आठवण होते.

\- मोठ्या कलाकारांबरोबर काम करताना दबाव येतो का?

\- मोठे काय आणि छोटे काय, काम करताना नटावर दबाव येतोच, आणि तो यावाच. निळूभाऊंच उदाहरण घेतलं तर मग तो नाटकाचा पहिला प्रयोग असो किंवा ५०० वा असो. पहिला प्रवेश संपेपर्यंत आणि आवाज लागेपर्यंत त्यांचे पाय थरथरत असतात. याचाच अर्थ कुठेतरी त्या भुमिकेचा विचार चालू असतो. हे त्या नटाच्या प्रगतीचं लक्षण आहे. नाटकात तुमचं प्रेक्षकांशी एक नातं जोडावं लागतं. सिनेमाला रीटेक असतो पण नाटकात ती सोय नसते. एकदा बाण सुटला की सुटला. आत्ताचं आमचं नाटक घेतलंत तर 'लालन सारंग' यांचा मला फोन येतो 'रामभाऊ आपले संवाद परत म्हणूया का?' श्रीधर फडके अजूनही प्रेक्षकांपुढे जाण्यापूर्वी तासभर रियाज करतात. सुधीर फडके तर 'अ आ इ ई अशी' बाराखडी म्हणायचे.

\- घाशीराम मध्ये तुम्ही काही गाणी म्हटलीत तेव्हा त्यासाठी तुम्ही संगीताचा अभ्यास केला होता का?

\- मला संगीतातलं काहीही कळत नाही. फक्त मला कुठेतरी संगीताचा sense आहे, आणि सेवादलामुळे लोकसंगीताशी परिचय आहे. जब्बार पटेलांनी माझ्यातलं जे काही होतं ते घेऊन प्रेक्षकापुढे आणलं, आणि जे नव्हतं तो भाग रविंद्र साठे, आणि चंद्रकांत काळे याना दिला. मूळ नाटकात सूत्रधार एक होता, पण त्याचे तीन सूत्रधार करून त्यांनी प्रत्येकाकडून योग्य ते काम करून घेतलं आहे. जब्बारचा यात हातखंडा होता. चाळीस टक्के नटाला त्याच्या लायकीचं काम देऊन त्याचे पन्नास टक्के कसे करायचे ते त्यांना बरोबर जमतं. 'उंबरठा' मध्ये तर त्यानी एका मेकपमनच्या बायकोला भूमिका करायला लावली आहे. मिटींगमध्ये बसून स्वेटर विणणे एवढंच काम ती करते, पण भूमिकेत चपखल बसली आहे.

\- तुमच्या आत्ताच्या नाटकाबद्दल म्हणजे 'शेजारी' बद्दल काही सांगा.

\- 'शेजारी' एक Challenge होतं. मी १९९८ पासून नाटक केलं नाही. मुम्बई पुणे मुम्बई पुणे प्रवास करणं मला जमेना. बाकी बहुतेक सगळे मुम्बईचे आणि मी एकटा पुण्याचा. त्यामुळे प्रवासाचं Tension . पण मग विचार केला की आपण किती दिवस घाबरून बसायचं? कारण हत्यार जसं वापरलं नाही तर गंजून जातं तसं काहीसं कलेचं आहे. हे नाटक आलं, आणि त्यात दोनच पात्रं होती. कुठेतरी माझ्या अभिनयाला challenge होतं. म्हणून मग तालमी सुरू केल्या, आणि नाटक उभं राहिलं. मला त्यात एक Confidence आला, आणि आता मी कोणतही नाटक करू शकेन असं वाटायला लागलंय. डॉ. लागूनी 'लमाण' मध्ये म्हटल्याप्रमाणे वाजवणारा ही तूच आहेस, आणि वाद्य ही तूच आहेस. त्यामुळे हे वाद्य मीच वाजवायचं असं ठरवलंय. दुसरी एक गोष्ट त्यानी त्यात म्हटलीय, की नाटकाला एक विशिष्ठ पातळी असायलाच हवी. त्यापेक्षा चांगला प्रयोग झाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण प्रयोग त्या पातळीच्या खालच्या दर्जाचा होता कमा नये. मी यावर विचार करतोय. नाटक, सिनेमाच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला Switch on Switch off होता आलं पाहिजे. उद्या नाटक आहे म्हटल्यावर आज पासून Tension , मग त्यामुळे होणारा त्रास असं करून चालत नाही. नाटकाच्या आधी किंवा कॅमेरा सुरू होईपर्यंत, अगदी Relaxed रहावं, आणि एकदा काम सुरू झलं मी मनापासून करावं, आणि पुन्हा Relax होता आलं पाहिजे. 'श्वास' चा बाल कलाकार 'अश्विन चितळे' त्याला हे जमतं तर मला का जमू नये? मी आता मला हे शिकवतोय. आपण खरं तर एका प्रयोगासाठी तीन तीन महिने तालीम करतो, कष्ट घेतो, तेव्हा प्रयोग हा तर ठणठणीत झालाच पाहिजे. मग त्या प्रयोगाच्याच Tension मुळे तो बिघडून काय फायदा?

\- तुमचे पुढचे प्लॅन?

\- आता कितीही उड्या मारायच्या म्हटल्या तरी शरीर फार उड्या मारायला देणार नाही. तेव्हा मला काय करता येईल तर हातात लेखणी धरता येईल. त्यातून मी खलनायक निर्माण करू शकेन, लहान मूल निर्माण करू शकेन, आणि प्रेयसीही निर्माण करू शकेन. तेव्हा मी हाती लेखणी नक्कीच धरेन. दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः मनाच्या रंगमंचावर मी कित्येक खेळ करू शकेन. आपलं काय असतं, 'नटसम्राट' म्हटला की आपल्या डोळ्यासमोर डॉ. लागू उभे राहणार. स्वतःला कधीतरी विचारा, मी का नाही 'नटसम्राट'? प्रेक्षकांपुढे उभा राहून नटसम्राट होणार नाही मी, पण त्याला मनाच्या रंगमंचावर उभा करीन. त्या भूमिकेचा विचार करीन, उलगडून बघीन. त्यातून कितीतरी पैलू मला कळतील की नाही? मी श्री. ना. पेंडश्यांचं 'लेखक आणि माणूस' वाचतोय. वयाच्या नव्वदाव्या वर्षी हा माणूस अजून एवढं चांगलं लिहू शकतो, तर मी तर अजून तरूणच आहे, मी का लिहू शकत नाही?

\- आता लिहिण्यावरून आठवलं, की ज्या तुमच्या व्यवसायामुळे आपली ओळख झाली, तो प्रकाशन व्यवसाय तुम्ही केव्हा, कधी आणि कसा सुरू केलात?

\- आमचे वडील हे अतिशय कष्टाळू होते, पण दुर्दैवाने त्याना कधीही यश मिळालं नाही. राम गणेश गडकरी, वि. स. खांडेकर हे त्यांचे जवळचे मित्र. गडकर्‍यांचा पहिल्या पुण्यतिथीला त्यानी गडकर्‍यांच्या सहा कविता पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या. ते भारद्वाज प्रकाशनाचं पहिलं पुस्तक. त्यानंतर त्यांनी श्री. कृ. कोल्हटकर आणि न. चि. केळकर यांचं एक पुस्तक प्रकाशित केलं. दुर्दैवाने त्यांना कुठेही यश मिळालं नाही आणि अत्यंत विपन्नावस्थेत ते १९६० साली वारले. १९९६ हे त्यांच शताब्धीचं वर्ष. त्यांची आठवण म्हणून एकाद्या संस्थेला देणगी देण्यापेक्षा 'भारद्वाज' प्रकाशन पुन्हा चालू का करू नये असा एक विचार आला आणि आम्ही ते चालू केलं. त्यांच्यावर माहीती लिहावी तर पुस्तक अगदी लहान झालं असतं. मग पु. ल. ना जऊन भेटलो. त्यानी त्यांचा एक लेख छापायला दिला. त्यांचे बडोद्याचे मित्र रामभाऊ जोशी म्हणून, त्यांनी गडकर्‍यांबद्दलची इतर लेखकांची मतं असा एक लेख लिहिला होता तो ही हाती आला. मग आचार्य अत्र्यानी गडकरी गेल्यावर त्यांच्यावर केलेली कविता असं सगळं गोळा करत करत एक शंभर पानी पुस्तक तयार झालं. त्यात ९६ पानं गडकर्‍यांवर आणि चार पानं आमच्या वडिलांवर होती. ते पुस्तक आम्ही प्रथम प्रकाशित केलं. त्यानंतर मग दिलीप प्रभावळकरांनी आपल्या दहा एकांकिका मला दिल्या. मग इतर काही तुमच्यासारखे लेखक मिळाले. त्यांची पुस्तकं आली. असं करत करत आम्ही प्रकाशन चालू ठेवलं आहे. आता म्हणजे २००५ साली आम्ही 'माऊली' हे आमच्या आईच्या शताब्धीच्या निमित्ताने काढलेलं आहे. खरं तर १९०३ साली जन्माला आलेल्या स्त्रिया अश्या विषयावर ते पुस्तक काढायचं होतं पण त्याला फार काही प्रतिसाद मिळाला नाही. गेल्यावर्षी 'गोडी अपूर्णतेची' हे एका डॉक्टरच्या जीवनावर त्यांच्या बायकोने लिहिलेलं पुस्तक, आणि यावर्षी 'हरवले ते' हे जुन्या जुन्या वस्तूंची आठवण करून देणारं एक पुस्तक आम्ही काढलं आहे.

\- आता तुम्ही जे जे काही केलंत ते तुम्ही न ठरवता करत गेलात हे दिसतंच आहे. पुन्हा तुम्हाला ही इंनिंग खेळायला मिळाली तर तुम्हाला काय करायला आवडेल?

\- फिल्म डिरेक्टर. ते माझं स्वप्न आहे. अगदी राजा परांजपेंच्या पठडीतला फिल्म डिरेक्टर.

\- काही वर्षांपूर्वी रंगभूमीची फार वाईट अवस्था होती, प्रेक्षक येत नव्हते, नाटकांचा Trend पण बदलला होता, त्याचं कारण काय असेल?

\- या गोष्टीचा थोडा चुकीचा अर्थ लावला गेलाय. एक असं मत आहे, की TV त काम करण पाप, मी फक्त नाटकातच काम करेन, असं करून चालणार नाही. शास्त्रीय संगीत तेवढं चांगलं, लावणी वाईट असं म्हणता येत नाही. जे जे तुमच्या समोर येतील त्यात तेव्ढ्याच तयारीने करणं महत्वाचं आहे. एक वेळ एकादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर द्या सोडून पण म्हणून ते वाईट आहे हे म्हणणं चुकीचं आहे. आता TV माध्यमाचं काय आहे, की साडेचार वाजता तुम्ही सेटवर येता, पावणेपाच वाजता तुम्हाला गरम गरम कागद हातात दिले जातात, आणि ते लगेच पाठ करून पाच वाजता एका टेक मध्ये तुम्ही तो शॉट देता. दुसरा टेक लागला की ते तुम्हाला हाकलून लावतात. हे काम म्हणावं तेवढं सोपं नाही. त्यांचं काय असतं, की दिवसाला ठरलेले वीस शॉट त्यांना घ्यायचे असतातच. 'छापते रहो' हे त्यांचं धोरण असतं. नाटक असलं की आपण तालमी करतोच, पण काळाप्रमाणे तुम्हाला बदलता आलं पाहिजे तरच तुम्ही टिकू शकाल असं मला वाटतं.

\- तुमच्या आत्तापर्यंतच्या भूमिकेतली सर्वात आवडती भूमिका?

\- अजून नाही सापडलेली मला.

\- पण सर्वात गाजलेली भूमिका, म्हणजे घाशीराम मधला सूत्रधार

\- नाही. नाही म्हटलं तरी ती सर्कस आहे, त्यात मुक्त अभिनयाला वाव नाही, ते सगळं संगीताच्या तालावर बसवलेलं आहे. एक गम्मत सांगतो, की हे सगळं चालू असताना मला वाटलं की शिक्षकी पेशा बास झाला, म्हणून मी १९९० साली निवृत व्हायचं ठरवलं. तेवढ्यात मला निरोप आला की आत्ता सोडू नका, तुम्हाला नॅशनल अवार्ड मिळणार आहे, आणि ते मला मिळालं आदर्श शिक्षक म्हणून. म्हणजे शिक्षणाची काय अधोगती बघा, मी ते अवार्ड आजही परत द्यायला तयार आहे, कारण मी मुलांना काहीही शिकवलं नाही, उलट त्यांच्याकडून मी बरंच काही शिकलो. पण अजूनही मला कशातही यश मिळवलेलं नसलं तरी मी मस्तीत जगतोय. बायकोला सांगितलं आणि नोकरी सोडली. एक मात्र खरं, की मी सगळ्या क्षेत्रात मित्र मात्र मिळवले.

\- मी पुण्यात आलो असताना मला हे जाणवलं, की नुसते मोठ मोठ्ठे कलाकारच नाही, तर आताचे नवीन उगवते कलाकारही तुम्हाला माहीत असतात.

\- हे माझं भाग्य आहे, आणि मी सांगण्यापेक्षा ते सांगतात की हा माझा मित्र आहे.

\- तुमचा आत्ताचा उद्योग?

\- ग. दि. माडगुळकर माझे अत्यंत आवडते, सुधीर फडके हे एक आवडते गायक. लहानपणापासून यांचे संस्कार आमच्यावर झाले. गेल्या दोन तीन वर्षांपासून मला असं जाणवलं की मी चांगल्या रचना करू शकतो. मागच्या वर्षी आनंद माडगुळकरांबरोबर एका शुटिंगला सातार्‍याला गेलो. दोन शुटिंगच्या मध्ये त्यानी काही गोष्टी मला सांगितल्या. मुळात ग. दि. मांची छप्पन गाणी आहेत 'गीत रामायणात'. पण रामायणात असे अनेक प्रसंग आहेत ज्यावर गाणी होऊ शकतील. दोन शॉटमधल्या वेळात मी कागद घेऊन बसलो, आणि काही ओळी लिहिल्या. घरी आल्यावर ते गाणं पूर्ण केलं. मग ६ अप्रिलला रामनवमीला गीत रामायणाला पन्नास वर्षं पूर्ण झाली. गीतरामायण हा हिमालय आहे, पण त्याभोवती कितीतरी अशी गाणी आहेत, जी रामायणावर आहेत पण गीत रामायणात नाहीत. अशी पंधरा गाणी मी एकत्र केली, त्यात पाच सहा गाणी माझी होती, आणि काही इतरांची होती, एक माडगुळकरांच होतं. त्यावर आम्ही एक कार्यक्रम केला. काहीतरी नवनवीन करतोच आहे. वरती गेल्यावर त्यांनी आम्हाला विचारलं की 'तुम्ही काय केलंत?' तर आम्हालाही सांगता आलं पाहिजे.

.... समाप्त ....