कधी वाटतं...

कधी वाटतं सालं आपलं नशीबच खडतर
सात मैलात अडचणी सत्तर.

कोणत्याही कार्याची सुरुवात शंकरपटागत दणक्यात असते...
पाठराखणीची प्रत्येक आरोळी
थोडी डोक्यात, थोडी अंगात,
रोमारोमात भिनत जाते.

मन वेगावर असतं स्वार..
प्रत्येक क्षणी विजयाचा हुंकार.

मग कैफ चढतो, उन्माद चढतो.
झगडेन, कष्टेन.
अविरत, दिनरात.
वामनाचा वंशज मी,
त्रिभुवन मिळवीन तीन पावलात.

पण तिसर्‍या पावली बली..
छे, आडवा येतो एक पत्थर.
सालं आपलं नशीबच खडतर..

मग हा एकांत..

एकांतात पुन्हा एकदा अडथळ्यांची शर्यत दिसते.
स्वप्नातल्या बुडबुड्यांमागे धावणारी हर एक रात दिसते.

वेगावर स्वार मी,
यश म्हणजेच श्वासोश्वास.
कुठून आलं हे बळ?
कुठला एवढा आत्मविश्वास?

अंतर्नाद घणाणतो...
'अरे, तू तर त्याचाच स्वर.
तूही एक ओंकार.
देह तुझा त्याची वीणा
मन मृदू झंकार.

त्याची प्रेरणा म्हणजे
स्त्रोत तुझ्या अनुभवाचा
अडथळ्यात सापडलास म्हणून काय?
भय नको, दंश न होईल पराभवाचा.'

पानीपतावर दत्ताजीनं
आंदण दिली अमरवाणी.
आता ओठी रुजणार ती,
रणांगणी, क्षणोक्षणी.

अडथळ्यांची शर्यत
अखेर मीच जिंकणार तर...

अडथळ्यांची शर्यत
अखेर मीच जिंकणार तर.
सात मैलात जरी अडचणी सत्तर...
बेहेत्तर ...बेहेत्तर.


वा ! महिन्याच्या सुरवातीला जरा स्फुरण आलं

झगडेन, कष्टेन.
अविरत, दिनरात.
वामनाचा वंशज मी,
त्रिभुवन मिळवीन तीन पावलात.

हे सही आहे
गोदेय



सुरेख!



अमरावतीचे की काय ? शंकर पटाचा उल्लेख केलाय म्हणून म्हटलं. माझा जन्म आणि आजोळ अमरावती. असो. कविता छान !!
..................अज्ञात