Submitted by निशिकांत on 28 February, 2011 - 23:28
पुन्हा नव्याने जुन्याच जागी तसेच सारे जमूत मित्रा
लहानपणच्या यथेच्छ गप्पा पुन्हा जरा आठवूत मित्रा
पहाट होता सुरेल ओव्या पडून कानी सुखावलो मी
दळावयाला कुठेय जाते ? प्रदर्शनी ते बघूत मित्रा
पिकात सळसळ फुलात दरवळ नदीत खळखळ दिसे न आता
लहानपणचा वसंत हिरवा कवेत थोडा धरूत मित्रा
उगाच आपण तिला चिडवता उदास होई "शकू" बिचारी
रुसून लटके अबोल होणे स्मरून खळखळ हसूत मित्रा
जलाशयी त्या असंख्य आठव तुडुंब भरले अजून ताजे
बसून काठी खड्यास टाकून तरंग उठता रडूत मित्रा
चटावलेल्या जिवास शहरी उजेड झगमग हवाहवासा
पहावया काजवे चमकते लहान गावी विझूत मित्रा
उतावळा तू मनात इतका कशास "निशिकांत" भेटण्याला ?
कुणास ठावे उद्यास कोठे असूत किंवा नसूत मित्रा
निशिकांत देशपांडे मो.नं. :-- ९८९०७ ९९०२३
E Mail :- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
गुलमोहर:
शेअर करा
वो बारिशका पानी, वो कागझकी
वो बारिशका पानी, वो कागझकी कश्ती! याची आठवण झाली.
शेवटच्या शेरातील दुसरी ओळ थबकवून गेली.
वृत्त हाताळणी आवडली. काफिये गडबडल्यासारखे वाटले. एक दोन शेर स्वतंत्र वाटले नाहीत व त्या शेरांमध्ये रदीफही जुळली नसावी असे वाटते.
पण एक कविता म्हणून पाहिले तर आठवणींनी गलबलवणारी रचना वाटली.
धन्यवाद व चुभुद्याघ्या
-'बेफिकीर'!
आशय सुंदरच!! काफिया बाबतीत
आशय सुंदरच!!
काफिया बाबतीत भूषणजींशी सहमत!! 'ऊ' आणि 'त' ह्यामधे 'या' हा शब्द मिसींग असल्यासारखा वाटतो.
सुंदर..
सुंदर..
पिकात सळसळ फुलात दरवळ नदीत
पिकात सळसळ फुलात दरवळ नदीत खळखळ दिसे न आता
लहानपणचा वसंत हिरवा कवेत थोडा धरूत मित्रा >>>> मस्तच... मक्ता पण छान..
बाकी ते जमूत, बघूत असे अपभ्रंश असलेले कवाफी कानांना रुचले नाहीत
(वैयक्तिक मत)
बेफिकीरजी, कणखरजी आणी
बेफिकीरजी, कणखरजी आणी मिल्याराव,
मी अगदी मोकळेपणाने कबूल करतोकी कफियावरील प्रतिक्रिया वाचून मी चक्रावून गेलो. याच गजलेवर मराठीगजल.कॉमवर एका शायर बंधूने दिलेल्या प्रतिक्रियेवरून एकदम डोक्यात प्रकाश पडला. ती प्रतिक्रिया खलील प्रमाणे आहे :-
"बसून काठी खड्यास टाकून तरंग उठता रडूत मित्रा
का?
मुसलसल गझल
जमूत, आठवूत, बघुत, धरूत...
आपली भाषा,इतर भागातील-पुण्यातील लोकांच्या गळ्यातून उतरेल?
मला मात्र घरीच बोलल्यागत वाटले,धन्यवाद!
रामकुमार"
मी मराठवाड्यातील रहिवासी आहे. "जमूयात, आठवूयात" यांचे शॉर्टफॉर्म्स "जमूत, आठवूत" असे सर्रास वापरले जातात. चुकीचे समर्थन करत नाही पण प्रादेशीक भाषेचा फ्लेवर येण्यास मज्जाव नसावा. हे कफिया प्रयत्न न करता सहजपणे आले आहेत.
आशय खूप छान आहे.. जुन्या
आशय खूप छान आहे..
जुन्या आठवणीत रमायला लावणारी आहे रचना.
निशीकांतजी, प्रादेशीक भाषेचा
निशीकांतजी, प्रादेशीक भाषेचा फ्लेवर यायलाच पाहिजे......
असे प्रयोग होत आहेत......
आणि व्हायलाच हवेत.....
अनिल पाटिल नावाचे शायर आहेत ते लिहीतात,
कोकिळेचा सूर गेला कावळ्याची काव आता
कालचा तो ओयखीचा गाव नाही गाव आता
सांज होता सांज वक्ती माय सांगे आज लेकी
नेम नाइ चांद्ण्याचा दार खिड्क्या लाव आता
ओठ माहे, दात माहे, गाव माहा देश माहा
सांग कोनालेच दावू कायजाचे घाव आता
भाषेचा प्रश्न वेगळा आहे. ही
भाषेचा प्रश्न वेगळा आहे.
ही रचना जेव्ह मी वाचली तेव्हा मला निश्चीतपणे आठवत आहे की काही ठिकाणी काफिया जमूत, आठवूत असे तर काही ठिकाणी जमून, आठवून, असे होते. त आणि न यात असलेल्या फरकामुळे मी तसे म्हंटलेले होते.
धन्यवाद!
(अवांतर - माझ्या बघण्यात चूक झाली असली तर क्षमस्व! पण मला तरी असे आठवत आहे.)
-'बेफिकीर'!
जमूत, आठवूत, बघूत हे शब्द जरी
जमूत, आठवूत, बघूत हे शब्द जरी पुणेरी मराठीत नसले तरी त्यांचा अर्थ समजतोच!
पुणेरी/इतर भागातील मराठी असा
पुणेरी/इतर भागातील मराठी असा काही प्रश्न नसावा असे वाटते. आणि असा प्रश्न निर्माणही केला जाऊ नये असे वाटते.
एकंदरीतच लिखित मराठीत असे शब्द ऑड वाटतात हे माझे वैयक्तिक मत आहे.. नवीन प्रयोगांबद्दल नक्कीच कौतुक आहे.
भाषा वगैरे जाऊ देत. विचार
भाषा वगैरे जाऊ देत.
विचार चांगला असला तरी गझल म्हणून मला फारशी आवडली नाही. असो.
शेवटचा शेर आवडला.
पहाट होता सुरेल ओव्या पडून
पहाट होता सुरेल ओव्या पडून कानी सुखावलो मी
दळावयाला कुठेय जाते ? प्रदर्शनी ते बघूत मित्रा
हे चालते का गझलेत
सुंदर गझल. नव्या यमांची नवीन
सुंदर गझल.
नव्या यमांची नवीन भाषा
या माझ्या गझलेत
"पुन्हा नव्याने" हा शब्द आला आहे. तो नकळत आला असावा. एरवी मी वापरलाच नसता.
तुमची गझल वाचल्यानंतर तो शब्द मनात घोळत राहिला असावा.
वाचकाच्या मनात घोळत राहणे हिच खरी कोणत्याही काव्याच्या यशाची पावती असते.
एकंदरीतच लिखित मराठीत असे
एकंदरीतच लिखित मराठीत असे शब्द ऑड वाटतात हे माझे वैयक्तिक मत आहे.>>>>> क्षमस्व पण असहमत
हे सर्रास वापरले जाणारे शब्द आहेत, सर्व प्रकारच्या लेखनात पाहायला मिळतात. 'जमूयात, आठवूयात' हे शब्द पुणे-मुंबईसारख्या शहरगावातून वापरले जातात नक्कीच. पण ग्रामीण भागात अजूनही जमूत ना, भेटूत ना यार एकदा, त्या जुन्या आठवणी आठवूत ना राव...हे शब्दप्रयोग आजही सर्रास ऐकायला, वाचायला मिळतात.
निशिकांतजी मला तर ही गझल आवडली म्हणूनच मला तिच्यावर विडंबन करावेसे वाटले. अर्थात मी केलेल्या विडंबनाचा दर्जा मुळ गझलेच्या एक शतांशही नाहीये.
विशाल, क्षमस्व काय
विशाल,
क्षमस्व काय त्यात...वैयक्तिक मत मतांतरे असायचीच....
वन्स हेनरी फोर्ड टोल्ड हिज सबॉर्डीनेट "इफ यू अॅन्ड मी थिंक अलाईक, वन ऑफ अस इज नॉट नीडेड" (जस्ट गंमत म्हणून सांगीतले...गै. न.)
खुपच आवडली
खुपच आवडली