कथा चायनीज नववर्षाची-१

Submitted by वर्षू. on 23 February, 2011 - 02:00

चीन मधे लूनार कॅलेंडर मानले जाते त्यामुळे चायनीज नववर्ष ,दर वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीत साजरे केले जाते.यावर्षी दोन फेब्रुवारी ला हा सण साजरा केला गेला. हा इथला सर्वात महत्वाचा सण आहे.
या सणानिमित्त चीन मधे सर्वात जास्त दिवसांची सुट्टी दिली जाते. लांबच्या प्रॉव्हिंसमधून आलेले कामगार आपापल्या गावी जातात. जवल जवळ महिनाभर सर्व फॅक्टरीज बंद असतात्,बँक्स आठेक दिवस बंद असतात. बाकीच्या ऑफिसेसना दहा,बारा दिवस कंपलसरी बंद ठेवण्यात येतात. रेस्टॉरेंट्सही दोन दिवस बंद असतात. या दिवसांत कामावर येणार्‍या सरकारी/गैर सरकारी लोकांना ( वेटर्स,सफाई कामगार ,ड्रायव्हर इ.इ.) डबल पगार द्यायचा कायदा आहे.
या सणापासून थंडी कमी होत जाते आणी वसंतऋतुचे आगमन सुरु होते,म्हणून या सणाला स्प्रिंग फेस्टिवल ही म्हणतात.
प्रत्येक सणाच्या मुळाशी अनेक कथा असतात..त्यातली एक जास्त प्रचलित कथा अशी,कि फार फार पूर्वी ,दरवर्षी कुठूनतरी एक महाकाय ,सिंहासारखा बलशाली आणी दैत्यासारखा क्रूर , 'निएन' नावाचा प्राणी एका गावात येई आणी अर्ध्या आधिक माणसांचा फडशा पाडून सकाळी निघून जाई. एका वर्षी गावकर्‍यांनी,त्यांना वाचवण्याकरता देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. वर्षाच्या शेवटच्या दिवशी सकाळी एक अति वृद्ध माणून त्या गावात आला. त्याने सर्व गावकर्‍यांना गाव सोडून जाणाची तयारी करतांना पाहून ,त्यांना असे न करण्यास सांगितले. गावकर्‍यांना त्याने निएन चा कायमचा बंदोबस्त करण्याचा उपाय सांगितला.
त्याप्रमाणे लोकांनी गावभर लाल रंगाचे आकाश कंदील लावले,रात्रभर फटाके लावले,गावभर प्रखर दिवे लावले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'निएन' आला पण गावभर चाललेला कल्लोळ, फटाक्यांचे आवाज,झगझगीत रोषणाई पाहून घाबरून पळून गेला.
सकाळ झाल्यावर गावकर्‍यांच्या लक्षात आले कि यावेळी एकही माणूस निएन चे भक्ष्य बनला नव्हता. ही गोष्ट गावभर समजताच सर्व गावकर्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जो तो एकमेकांना शुभेच्छा देऊ लागला. जेवणावळी ऊठू लागल्या.सर्वांनी आपापल्या कुटुंबियांसमवेत,मित्रपरिवारासमेत हा दिवस अतिशय आनंदाने साजरा केला. या सर्व गडबडीत तो वृद्ध मनुष्य निघून गेल्याचे कुणाच्या लक्षातही आले नाही.

त्या दिवसापासून नववर्ष साजरे करण्यात येऊ लागले.
अजूनही चीनी लोकं नववर्षाच्या पूर्वसंध्येला घरं स्वच्छ करतात मग झाडू गुंडाळून ठेवतात. लहान लहान लाल रंगाच्या पाकिटांतून ऐपतीनुसार कोर्‍या नोटा ठेवतात. हे 'होंग पाओ' घरातील ज्येष्ठ मंडळी लहानांना वाटतात. मालक आपल्या कामगारांना ही बोनस व्यतिरिक्त ही लाल पाकिटे वाटतात. ही पाकिटे मिळणे म्हणजे अतिशय शुभ मानले जाते. यावेळी लोकं बिल्डिंग्सच्या सर्व वॉचमन्स,सफाई कामगार,मॅनेजमेंटस्टाफ्,इल्लेक्ट्रिशिअन्स इ.कामगार वर्गापैकी प्रत्येकाला लाल पाकिटे देतात.

या दिवशी लोकं घरं, बहरलेल्या समृद्धीचे प्रतीक असलेल्या, फुलांनी भरून टाकतात. घराचे दरवाजे लाल,केशरी,सोनेरी, अश्या तेजस्वी रंग असलेल्या क्युप्लेट्सनी सजवतात. लाल,केशरी हे रंग आनंदाचे तर सोनेरी रंग संपत्तीचा सूचक आहे.लहान ऑरेंजेस नी लगडलेली झाडे खास विकत आणली जातात्,कारण ही झाडे कुटुंबियांच्या आपसातील घनिष्ठतेचे प्रतीक आहेत्.फळांनी लगडलेले हे झाड , बाळगोपाळांनी भरलेल्या घराचेही प्रतीक आहे.
या दिवसांत प्रत्येक चीनी माणसाच्या घरी एक गोल ट्रे,चॉकोलेट्स,कँडीज नी भरलेला हवाच. आल्यागेल्याला या ट्रे मधून स्वीट्स देऊ केले जातात . हा ट्रे ही आपसातले संबंध घनिष्ठ करण्याचे सिंबल आहे.
आदल्या दिवशी सर्व कुटुंबियांनी एकत्र जेवण केलेच पाहिजे असा समज आहे. मग रात्रभर जमून गावभरातील रोषणाई पाहात फिरणे हा यांचा आवडता उद्योग आहे. या दिवसांत खरोखरच एकही चेहरा उदास,दु:खी दिसत नाही. नाईट मार्केट्समधून स्वस्त,महाग कपडे, सुका मेवा, फळं,घरोपयोगी वस्तू भरभरून विकल्या जात असतात. या वस्तू खरेदी करण्यासाठी लोकं मोठ्या संख्येने गर्दी करतात. अश्या वेळी इकडल्या महाकाय लोकसंख्येचा अंदाज येतो..

नववर्षाच्या दिवशी मात्र अजिबात केर बीर काढायचा नाही.. आदल्या दिवशी घरात शिरलेलं चांगलं नशीब न जाणो चुकून कुठे झाडलं न जावं म्हणून..
या दिवशी लहान मुलांना लाल,सोनेरी रंगाचे ट्रेडिशनल कपडे घातले जातात. सर्व एकत्र जेवण करतात. एकमेकांच्या घरी शुभेच्छा द्यायला फळे,वाईन,बिस्किटे,ऑरेंजेस ची झाडे घेऊन जातात.
संपूर्ण दिवस आनंदाने घालवतात.
आपल्या दिवाळीप्रमाणे हा सण ही ५ दिवसांचा असतो. शेवटच्या दिवशी देवळात जाऊन बुद्धाची प्रार्थना करतात .यादिवशी 'युएन श्याओ' हा गोड पदार्थ कुटुंबियांसमवेत खाणं आवश्यक मानतात.. कारण एकच,कुटुंबात आपलेपणा,आत्मीयता टिकून राहावी म्हणून.
युएन श्याओ- चिकट तांदूळाच्या पिठीपासून केलेल्या या गोळ्यात काळे तीळ ,ब्लॅक बीन्स आणी गुळापासून केलेलं सारण भरलेलं असतं.

yuan-xiao1.jpglantern-3_0.jpglantern-1_0.jpgspring-2.jpgspring-1.jpgspring-7.jpg

क्रमशः

गुलमोहर: 

मस्त कथा. (अरे वा तिथे पण PROTEA आहेतच कि.)
ते लोक अंड्यालापण शुभ मानतात का ?
चीनचा उच्चार फ्रेंच लोकाना जमत नाही. त्यांच्या भाषेत सिना असा शब्द आहे वाटतं. मला वाटतं चीन पण स्वतःला चीन म्हणवून घेत नाही. हो ना ?

छान. अगदी आपली दिवाळीच की हो. आणि ते सारण भरलेले म्हणजे आपले उकडीचे मोदकच जणू.
काही काही रीति थेट आपल्यासारख्याच आहेत. शेवटी बौद्द धर्म आपल्याकडूनच तिकडे गेला ना म्हणुन तर हे साधर्म्य नव्हे ? असो दिवाळीच ती. लेखन आवडले.

एकदम मस्तच Happy खुप मजा येते आहे वाचताना एक वेगळाच फिल येतोय. ..
साध्या शब्दात म्हणायच झाल तर चीनची दिवाळीच अनुभवायला मिळतेय Happy
धन्यवाद निलूताई... Happy

वर्षु नील अप्रतिम माहिती. थोडेसे मन स्वप्नात गेले.
फोटो पण छान आहेत .लिहिलेली माहिती जास्त आवडली. फारच छान.
एकंदर चीन म्हणजे जवळ जवळ भारतच वाटतोय मला. त्यांची अभिरुची खूप वरची वाटते . आवडले .अशाच लिहित रहा.

मस्त लिहिलेयस वर्षू... Happy

यानिमित्ताने काही आठवलं...

आम्ही इकडे जुन्या घरातून नवीन घरात शिफ्ट होत होतो, तेंव्हा जुन्या भाडेकरुने घर सोडतांना आम्हाला त्याला मिळालेला चायनीज लाल कंदिल आमच्या बल्बसाठी आवरण म्हणून वापराल का, असे विचारले. चायनीज देवाची प्रतिकृती असलेला तो लालबुंद गोल आम्हाला त्यावेळी हवासा वाटला म्हणून आम्ही ठेऊन घेतला. त्याने सांगितले होते, वापरणार नसलात तरी कधीच फेकू मात्र नका... श्रद्धा असतात ना एक-एक...

आता त्या आवरणाने बल्बचा प्रकाश डिम होतो, म्हणून आम्ही तो वापरत नाही, पण त्या भाडेकरुच्या शब्दाचा मान राखायचा, म्हणून तो कंदिल अजूनही घरातच ठेवला आहे. Happy

सो स्वीट सानी.. Happy
तुला आश्चर्य वाटेल पण हे खरंय कि इकडे फेंगशुई च्या वस्तू फार्फार कमी लोकं घरी ठेवतात.. फारफार तर लाल,काळे मासे,काचेच्या मस्त्यालयात, मुख्य दारातून आत शिरल्यावर ठेवतात..
इकडे फेंगशुई करता बनत असलेल्या सर्व वस्तू भारतात एक्स्पोर्ट होतात असं वाटतं.. Happy

तुला आश्चर्य वाटेल पण हे खरंय कि इकडे फेंगशुई च्या वस्तू फार्फार कमी लोकं घरी ठेवतात.. फारफार तर लाल,काळे मासे,काचेच्या मस्त्यालयात, मुख्य दारातून आत शिरल्यावर ठेवतात..>>> हे मला खरंच माहिती नव्हतं...
आणि अगं वर्षू, ही जी गोष्ट मी सांगितली ना, ती भारतातली नसून जर्मनीतली आहे आणि तो भाडेकरु साऊथ अमेरीकन होता... बघ, कोणा-कोणाकडून आणि कुठून कुठे चायनीज परंपरा जपल्या जातायत Happy

खूप सुन्दर माहिती देता. फोटोहि छान आहेत. ह्याच्या अगोदरचे
फोटोही छान होते. तुमचा लेख वाचला की चीन फिरूनआल्यासारखं वाटतं.

मस्तच वर्णन.

'युएन श्याओ' किती गोड दिसतय - उकडलेल्या अंड्यांसारखं. अशासारखा एक प्रकार सिंगापूरला ब्रेकफास्टला खाल्ला होता. पण तो एवढा तुळतुळीत नव्हता. वर्षुताई, तुम्ही जर असे छान छान चाईनीज पदार्थ बनवायला शिकला असाल तर त्या रेसिपीजही टाका ना!

दिनेशदांची प्रोटिया आहेत. किती सुंदर दिसतायत ती या फोटोत.

छान Happy

सर्वांना धन्स..
आह्हा..या फुलांचं नांव केंव्हापास्नं दिनेश ना विचारायचं होतं.. Happy
ओ..सानी.. जर्मनी.. विसरलेच होते..सॉरी.. अ‍ॅग्री विथ यू .. साऊथ अमेरिकन नी असं म्हटलं?? खरच आहे ,कुठून कुठे चायनीज परंपरा जपल्या जाताय,..
मामी.. मी इकडले काही पदार्थ शिकले पण ग्वाडाशी वाकडं असल्याने गोडात काय नाय.. Wink

वा मस्त. आमच्या इथे पण चायनीज लोक खूप आहेत त्यामुळे रेस्टॉरेंट्स मध्ये खास नववर्षाचे मेन्यू होते. मेनलॅंड चायना मध्ये तो चायनीज ड्रॅगन फिरवला होता. मी जमेल तसे फेंग शुई पाळते. एनर्जी फ्लो नीट हवा हे तत्व पट्ते मला. हपिसातील दाराला तीन कॉइन्स लाल धाग्यात, तसेच पाकिटातपण. तो लकी म्हातारा पण आहे.

काल टीवीवर युजलेस नावाची चीनी कपडा उद्योगावर चित्रफित बघताना खूप आठ्वण आली तुझी. एक बारकी पण अतिशय आत्मविश्वासाने बोलणारी डिझाइनर मुलगी तिचे तत्वज्ञान सांगत होती. फार छान फिल्म होती. चीन किती हिरवे गार आहे ते ही त्यात दाखविले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.