क्वांटास - एक मजेदार अनुभव भाग २

Submitted by दिनेश. on 20 January, 2011 - 03:17

या आधीचा भाग, इथे वाचा p://www.maayboli.com/node/22781

माझे येतानाचे विमान ऑकलंडहून सकाळी पावणेसहा ला सुटणार होते. त्यासाठी आदल्या रात्रीच मी
तिथे जायचे ठरवले होते. तो एअरपोर्ट रात्री उघडा असतो याची खात्री करुन घेतली (त्या एअरपोर्टला
जगातील पहिल्या १० क्रमांकाच्या विमानतळात गणले जाते. हा मान गेली २ वर्षे ऑकलंड विमान
तळाला मिळाला आहे. छोटासा असला तरी तो सुंदर आहे. खास विमानांची उड्डाणे बघण्यासाठी
म्हणून तिथे एक वेगळा डेक आहे. तिथे उतरलेले पहिले विमान, मूळ रुपात तिथे ठेवलेले आहे.)

तर मी रात्रीच तिथे जाऊन बसलो. अधूनमधून मायबोलीवर डोकावत होतो. जाणारि नसली तरी
येणारी विमाने होती, त्यामूळे जाग होती. दुकाने वगैरे उघडी होती. अगदी व्हेज जेवण पण होते.
माझ्या आयटनरीप्रमाणे माझे ऑकलंड ते मेलबर्न हे विमान, जेट कनेक्ट हि कंपनी चालवणार
होती.

सकाळी ४ वाजता, क्वांटासच्या चेक ईन काऊंटरवर एक आज्जीबाई डूलत डूलत आल्या. अगदी
थेट मिसेस डाऊटफ़ायर वाटाव्या अशा. तस्सेच लाडीक लाडीक बोलणे. अग्ग बाई, रात्रीच येऊन
बसला होतास का ? आमचे ऑकलंड अगदी सेफ़ बरं, मध्यरात्री आला असतास तरी काही धोका
नव्हता, अशा गप्पा.

गप्पा मारता मारता मी बघितलं तर तिने बॅग फक्त मेलबर्न पर्यंतच टॅग केली होती. मी तिला
विचारले तर म्हणाली, कि ती दुसरी एअरलाईन असल्याने तिथे तूला वेगळी टॅग देतील.माझा
मेलबर्न ते सिंगापूर बोर्डिंग पास पण मला मेलबर्नलाच मिळणार होता.
केबिन लगेज मधे काही आक्षेपार्ह नसले तरी माझ्या चेक्ड ईन बॅगेत थोडेफ़ार ड्राय फ़्रूट्स होते.
त्यामूळे मला ती ऑस्ट्रेलियात बाहेर काढायची नव्हती.
तिच्या वयाचा मान ठेवून मी जास्त हुज्जत न घालता, डेक वर गेलो. जेट कनेक्ट चे विमान
कुठे दिसत नव्हते, क्वांटासचे मात्र होते. तिथे टाईमपास करायला मस्त जागा होती.

शेवटी गेटवर क्वांटासचेच विमान लागले. लेकीला फ़ेसबुक वर मेसेज टाकून मी निघालो. ते
फ्लाईट मी मस्त एन्जॉय केले. त्या फ्लाईटमधेच डेस्टीनेशन गाईड म्हणून व्हीडिओ दाखवला
त्यात मेलबर्नच्या माहिती बरोबर, ज्यांना पुढे जायचे आहे, त्यांनी बॅगेज क्लीयर करायची
गरज नाही, असेच दाखवले.

मेलबर्न ला उतरल्यावर इंटरनॅशनल ट्रान्सफरचा मार्ग घेत मी गेलो, कारण व्हिडीओत
तसेच दाखवले होते. तसा जायला अगदी अरुंद बोळ होता, आणि त्यात प्रचंड गर्दी होती.
बराचवेळ लाईन पुढे सरकेना, तेव्हा कळले कि, तिथले स्कॅनींग मशीन बंद पडलेय. तिथली
बया म्हणाली, कि ३ तास तरी काही ते सुरु होत नाही. पण विंडोज कसे, काहिही न करता
रिस्टार्ट केले कि आपोआप सुरु होते, तसे झाले.

ते पार करुन मी बाहेर पडलो ते थेट डिपार्चर गेट कडे. पण मला जरा शंका आली, म्हणून
मी उलट फ़िरत, कस्टम्स च्या काऊंटरवर गेलो. खरे तर तिथल्या मुलीचे ते काम नव्हते, पण
तिने जेटस्टार ला फ़ोन करुन, माझी बॅग ट्रान्सफर करत असल्याची खात्री करुन दिली. ती
ज्या व्यक्तीशी बोलली, तिचे नाव पण मला तिने लिहून दिले.

मग मी जरा निर्धास्त झालो. माझा बोर्डींग पास गेटवरच मिळणार होता. म्हणून मी जरा
तिथल्या तिथेच घुटमळत होतो. त्या मेलबर्न विमानतळावरुन दिसणारे दृष्य सुंदर असले
तरी स्वच्छता जेमतेमच होती. स्वच्छतागृहात उपकरणे तूटक्या अवस्थेत होती (या
बाबतीत दुबई आणि सिंगापूरला तत्परतेने स्वच्छता करत असतात.) पिण्याच्या पाण्याचे
कारंजे इतक्या कमी दाबाचे होते, कि ते तोंडाने ओढल्याशिवाय पाणी पिता आलेच नसते.
याबाबतीत तिथले प्रवासी मजेदार प्रयोग करुन बघत होते. एका मूलाने त्यात स्ट्रॉ
खूपसून बघितली, एकाने त्यात रुमाल भिजवून घेतला, एकाने, बाटली लावून बघितली.
(बेअर ग्रिल्स चे चेलेच जणू) हे सगळे प्रकार बघून मला तिथे पाणी प्यावेसे वाटेना.
आणि तो तिथला एकमेव वॉटर फाऊंटन होता.

बोर्डींग गेटवर जी पहिली मुलगी उगवली, तिला मी परत बॅगेचे सांगितले. आता परत घोळ
कुठली बॅग, कुठून आली, कुठे जाणार असे सगळे सुरु झाले. (कल्पना करा, अतिरेकी या
भोंगळ कारभाराचा फायदा घेऊ शकले तर.) मग तिने परत फोनाफोनी सुरु केली. आणि
माझी बॅग सापडत नसल्याचे शुभवर्तमान तिने मला दिले. खरे तर ती जेट स्टार ची
कर्मचारी होती, पण तिने माझ्यासाठी बरेच प्रयत्न केले. क्वांटास माझी बॅग शोधून देणार
याची तिने मला खात्री करुन दिली, पण शेवटी, यू नो क्वांटास, असा शेरा मारलाच, मी
पण आय स्वेअर, शिवाय काय बोलणार होतो ?

जेट स्टार हि अतिस्वस्त एअरलाईन (लो कॉस्ट हो.) त्यात तर सगळ्यासाठी पैसे मोजावे
लागत होते. कल्पना करा आठ तासाच्या फ्लाईटवर ही विमानसेवा चालते. खाण्यापिण्या
साठीच नव्हे तर इअरफोन, टिव्ही, ब्लॅंकेट सगळ्यासाठीच पैसे मोजावे लागत होते. पण
माझे क्वांटासचे बुकिंग असल्याने, मला मात्र खाणेपिणे आणि ब्लॅंकेट चकटफ़ू मिळाले.

यथावकाश आम्ही सिंगापूरला उतरलो. एका टर्मिनल वरुन दुसरीकडे धावत सुटलो. स्काय
ट्रेन असली तरी अंतर बरेच होते. फ़ारशी अपेक्षा न ठेवता, तिथल्या ट्रान्सफर डेकवर
परत बॅगेचे पुराण लावले.

आणि तिथे मला सुखद धक्का बसला. फोनाफोनी व चॅट वगैरे करुन तिथल्या माणसाने
मला माझ्या बॅगेचा शोध लावून दिला. क्वांटासला ती बॅग सापडली असून, ती थेट
मुंबईलाच मिळेल असे सांगितले. इतकेच नव्हे, तर त्या फ्लाईटचा नंबर वगैरे लिहून
दिला. आता प्रॉब्लेम असा होता, कि त्या विमानाची उतरायची वेळ, २४ तासाने होती,
आणि त्यानंतर केवळ तीन तासाने माझे पुढचे विमान होते. त्या माणसाचे आभार
मानावे तितके थोडेच होते. सिंगापुरी कार्यक्षमतेला सलाम करुन मी तिथल्या नवीन
आकर्षणांचा आनंद घेऊ लागलो. तिथे आता बटरप्फ़्लाय पार्क केलेले आहे, आणि
तिथे मला पहिल्यांदा पीचर प्लांट प्रत्यक्ष बघायला मिळाले. पण माझ्या कॅमेरातल्या
बॅटरीने मान टाकल्याने, मला काही फोटो काढता आला नाही. तिथल्याच एका रसिक
मुलीला मी ते मुद्दाम दाखवले. (तूमच्यापैकी कुणी एवढ्यात तिथे जाणार असाल
तर एक फोटो माझ्यासाठी....)

जेट एअरवेज ची सेवा छान होती, आणि ते विमान वेळेआधीच मुंबईला उतरले. मी
थेट कस्टमवाल्याकडे धाव घेतली आणि बॅग न आल्याचे सांगितले. इतक्या आत्मविश्वासाने
बॅग न आल्याचे सांगणारा त्याने आधी बघितला नसावा. अजून सामानाचा बेल्ट पण
सुरू झाला नव्हता.

एका जेट एअरवेजच्या माणसाला पकडले. त्याच्याकडून लॅंडीग सर्टीफ़िकेट सारखे
सोपस्कार पूर्ण करुन घेतले.
जवळ काहीच सामान नसणारा प्रवासी, तिथल्या प्रीपेड टॅक्सीवाल्यांना पण अनोखाच
वाटला असावा.

घरातला शेवटचा दिवस तसा बैचैनीतच घालवला. उगाच दुसरी बॅग खरेदी करण्यात
अर्थ नव्हता. माझ्या वेळेच्या आधी ती बॅग मिळाली नसती तर, जेट वाल्यांनी ती
नैरोबीला पाठवायची तयारी दाखवली होती.

त्या बॅगेत महत्वाचे असे काही नव्हते, पण माझ्या लेकींने स्वत:च्या बचतीतून
माझ्यासाठी घेतलेले पुस्तक, आणि तिचे फोटो असलेले मेमरी कार्ड त्या पुस्तकात
होते. त्यात माझा जीव अडकला होता. शिवाय माझ्या नव्या कॅमेराचा बॅटरी चार्जर
त्यात होता.

मुंबईत तो चार्जर मिळवण्यासाठी मी लॅमिंग्टन रोडवर धाव घेतली. पण कॅमेराचे
ते नवे मॉडेल असल्याने, माझ्या नेहमीच्या दुकानात तो मिळू शकला नाहि. त्याने
बराच शोध घेतला, पण व्यर्थ. त्याने हिरापन्ना ला जायचा सल्ला दिला, पण मला
खात्री वाटेना. तो चार्जर मिळाला नसता, तर मला कॅमेरा वापरता आला नसता.
मग शेवटी दादरला प्रयत्न करावा, म्हणून तिथे आलो. तर सुदैवाने, आयडीयलच्या
बाजूच्या दुकानात तो मिळाला.

आता सगळे सामान एका वेगळ्या बॅगेत भरले. मला विमानतळावर कुणाची तरी
मदत लागणार होती. पुतण्या आणि वहिनी आनंदाने तयार झाले. (एरवी मी
कधीही कुणाला विमानतळावर येऊ देत नाही.)

तिथे पोहोचल्यावर डिपार्चर गेटजवळ, सामानापाशी वहिनीला उभे केले, आणि
अरायव्हल इन्फ़ॉर्मेशन बघायला खाली आलो. क्वांटासचे विमान पहाटे २ वाजता
उतरणार होते, आणि मला पहाटे ५ चे विमान पकडायचे होते.

सुदैवाने, ते क्वांटासचे विमान, ब्रिस्बेन मुंबई, वेळेआधी पोहोचले. आता मला
जेट एअरवेजच्या माणसाची गरज होती. परत वर डिपार्चर गेट वर जाऊन,
दोघा तिघांना पिडले. सिक्यूरिटीवाले पण गेट सोडून आत जाऊ शकत नाहीत,
पण त्यांनी एका मुलीला बाहेर आणली. तिला सगळे कागदपत्र दाखवले आणि
तिच्या सांगण्यावरुन परत अरायव्हल वर येऊन उभा राहिलो.

हे लिहायला शरम वाटतेय कि तिथले सुरक्षा अधिकारी, पिऊन तर्र होते.
तिथे हुज्जत घातली असती, तर त्याने मला नाहीतर मी त्याला गोळीच
मारली असती. एक मुलगी तिथल्या जेटच्या काऊंटरवरुन बाहेर आली, तिला
गाठले तर ती म्हणाली, मी जेटची नाही.

दुसरा एक मुलगा आला, त्याच्या शर्टावर जेटची पिन बघून मी त्याला
अडवले. त्याने पण मी त्या लेफ़्ट लगेज डिपार्टमेंटचा नाही, असे सांगत
मला उडवून लावायचा प्रयत्न केला. मग मात्र मी आवाज चढवला.
मी म्हणालो लेफ्ट लगेज म्हणू नकोस, मिस हॅण्डल्ड म्हण.घाबरला
बिचारा. त्याने त्या खात्याला फ़ोन करुन कुणाला तरी बाहेर यायची
विनंति केली.

शेवटी सव्वा दोन वाजता एक मुलगा बाहेर आला. तो खरेच नम्र होता. त्याने
मला तिथेच थांबायची विनंति केली. आणखी अर्ध्या तासाने, मला माझी बॅग
मिळाली. पावणेतीन वाजले होते. तशीच ती बॅग घेऊन वर गेलो. सामान तिथेच
परत पॅक केले. आणि वेळेवर पुढच्या काऊंटरवर पोहोचलो.
खरेच एक वेगळा अनुभव. क्वांटासला दोष देण्यात वा लिहिण्यात काही अर्थ नाही.
ट्रांझिट पॅसेंजर्स हाताळणे त्यांना जमत नसावेच, कारण न्यू झीलंड सोडले, तर
बाकिच्या देशांसाठी, तो ट्रांझिट पॉइंट असू शकत नाही.

पण असो, बाकिच्यांनी हि काळजी घ्या.

गुलमोहर: 

एकूण वाइट एअर लाइन आहे हो ना. तू त्यांच्यावर खटला भरला पाहिजेस मानसिक त्रास दिल्या बद्दल. मुलीने दिलेले पुस्तक व फोटो हे अमुल्य आहे. त्या एअर्लाइनचा अनुल्लेख कर रे पुढील प्रवासात. सर्वच ट्रिप
फार दगदगीची झाल्यासारखी वाट्ते. ए ३८० आतून कसे आहे? त्याचे सविस्तर वर्णन लिही की.

ओ बापरे.. टू मच!!! क्वांतास चं किती नाव ऐकलं होतं पूर्वी.. पण आताशी त्यांचाही बोजवारा उडालेला दिस्तोय!! सावधानीच्या इशार्‍याबद्दल धन्स दिनेश दा Happy

यापायी क्वांटासलाच किती त्रास झाला तो बघा. मी बॅगेची आठवण मेलबर्नला विमानाच्या वेळेच्या तीन तास आधी करुन दिली होती. एक तासभर आधी पुन्हा करुन दिली होती. त्यावेळी तिथल्या व्यक्तीने जर हालचाल केली असती, तर माझ्याच विमानात ती बॅग चढवणे सहज शक्य होते.

पण नाही केले तसे. त्यामूळे ती बॅग मेलबर्न वरुन ब्रिस्बेन ला आणि तिथून मुंबईला पाठवावी लागली.
अनअकंपनीड बॅगेज म्हणून वेगळे सोपस्कार करावे लागले असणारच. एका व्यक्तीच्या अकार्यक्षमतेपायी, त्या कंपनीला किती काम करावे लागले ?

याबाबतीत, येताना अदीस अबाबा ला फार छान अनुभव आला, दिल्लीहून येणारे विमान लेट आल्यामूळे आमचे विमान अर्धा तास लेट झाले. पण ते का लेट होतेय याची माहिती आम्हाला वेळोवेळी देण्यात येत होती. दिल्लीचे फ्लाईट उतरल्याबरोबर अगदी पाच मिनिटात, खास बसने २२ प्रवासी आणण्यात आले आणि त्यांचे सामानही. एका हार्ट पेशंटसाठी तर दुसर्‍या बाजूचाही दरवाजा उघडण्यात आला.

हम्म! आत्ताच ह्या "मिस हॅण्डल्ड" लगेज चा अनुभव घेतला रॉयल डच एअर लाईनचा. मागच्या महिन्यात युरोपला जाताना तोक्यो एअरपोर्टवर चेक-इन केलेली बॅग ब्रुसेल्सला आलीच नाही आणि आजपर्यंत परत दिसलीच नाहीये मला. त्यामानानी तुम्ही नशीबवान Happy

मंजिरी,
टॉम हँक्सच्या, टर्मिनल - लाईफ इज वेटींग, या सिनेमात असे बरेच "विसरलेले / राहिलेले " सामान दाखवलेय. मला वाटतं, असले सामान बरेच जमा होत असणार. या मोठ्या विमान कंपन्यांचे, नाव मोठं लक्षण खोटं, असंच आहे सगळं.
खरे तर त्यांचे सॉफ्ट वेअर चांगलेच आहे. कुठलीही बॅग त्यांना सहज ट्रॅक करता येते, पण क्लेरिकल जॉब करणारे असे माठ असतील, तर लोडर्स कसे असतील ?

<<कित्ती व्याप!>> सहमत. दिनेशदा, जगभर विमानप्रवास करणार्‍यांचा जो हेवा वाटायचा, तो हे वाचून जरा "डायल्यूट" झाला !

तसे नाही स्वाती आणि भाऊ, असे अनुभव विरळा असतात. उत्तम सेवा देणार्‍या विमान कंपन्या नक्कीच आहेत. अशा अनुभवाने शहाणपण येते, एवढेच.

नशीब! मी भेटायला आलो नाही. ट्रान्सिट ह्या गोंधळात तुम्हालाच मागे ठेवले असते ! Happy
तुम्हाला हि कंपनी कोणी सुचवली होती?

एकदम 'वंटास' सेवा आहे ह्यांची! आम्हाला सिंगापुरात पाच तास अडकवले.

उदाहरणार्थ सुचना अश्या दिल्या जात होत्या:

१) विमान काही कारणास्तव अर्धा तास उशीरा जात आहे.
२) विमानाचा एक भाग बिघडल्याने विमान अजुन १ तास उशीरा जाईल.
३) विमानाचा 'तो' भाग आता तृअ‍ॅक्टर वर चढवला आहे.
४) आमच्या इंजिनिअर्सेनी तो भाग तपासला आहे....
५) माफ करा, चुकीचा भाग विमानाला बसवला गेल्याने विमान अजुन एक तास उशीरा जात आहे.
६) आमच्या इंजिनअर्सनी योग्य तो भाग ओळखला आहे, अन लवकरच तो भाग विमानाला जोडला जात आहे.
७) तो भाग आता जोडला जात आहे. फक्त एकाच तासात विमान रवाना होईल.

तोवर एक कॉफी अन एक चहा दिला फक्त! चंपी तिथेच लॉन वर लवंडली.... आखी फ्लाईट झोपली तिथेच!

अगोदर ५ तास सांगितले असते, तर किमान सिंगापुर पाहुन तरी झाले असते......दर अर्धा एक तासाने नवी घोषणा करत होते!

पुन्हा यांची सेवा नकोच! Sad

चंपक,
एकदम 'वंटास' सेवा आहे ह्यांची!
आपल्या एस.टी. बद्दल असे अनुभव पाहिले होते,पण विमानाबद्दल पहिल्यांदाच तुमच्याकडुन ऐकलं ..
आता वाहक,चालक यांच्या वरचा माझा राग जरा कमी होईल ...
Happy

चंपक, यावरुन जनरल ऑसी लोकांच्या मठ्ठपणाची कल्पना करु शकतो का ?

सुनील, फोटो वेगळे टाकलेत.