सदस्य प्रवेश |
कोऑपरेटीव समस्याया कोऑपरेटीव सोसायटीला कुठलेही नाव द्या.. चालेल. कारण प्रसन्ग, प्रश्ण, लोक(ही?) प्रातिनिधीक आहेत. त्यातून मुम्बैतील अगदी मध्यभागी, म्हणजे अवतीभोवती कायम गोन्गाट, वर्दळ, आणि एखाद्या वडापाव केन्द्रापासून अलीशान गाड्यान्च्या शोरुम पर्यन्त अनेक नावाजलेली दुकाने या सोसायटीच्या त्रिज्य्येत येतात. त्यामूळे सर्व प्रश्णान्च्या केन्द्रस्थानी असलेले मूळ मुद्दे इथे रोज सापडतात. सोसायटीला Prince of Wales Museum इतका जुना इतीहास नसला तरी तीची पन्नासी उलटायला आली आहे, अन वरून कितीही मेकप चढवला तरी आता काही सुरकुत्या, भेगा, किन्चीत वाकलेला बान्धा जवळून लपत नाही. तरी सणा सुदीला ती नटून बसली तर अजूनही तीच्या जुन्या यौवनाचा अन्दाज बान्धता येईल. पण एकन्दरीत काळाच्या ओघात तेव्हा टोलेजन्ग असलेली ही चार मजली इमारत आता बाजूच्या तीस मजली कुतूब मिनारान्पूढे बिबीका मकबरा सारखीच दीन दिसते. सोसायटीच्या इतीहासातील मानाचा बिन्दू म्हणजे एकाच ब्यान्केमधिल कर्मचार्याना ब्यान्केने बान्धून दिलेली ही तेव्हाची पहिली कोऑपरेटीव सोसायटी. तेव्हा अवघ्या वीस हजारात घरे घेताना फुटलेल्या घामाने सर्वजण एकमेकास चिकटून राहिले तोवर ही सोसायटी कोऑपरेटीव. आता ती पहिली पिढी रीटायर होवून उरली अन नविन पिढी IT च्या रथावर स्वार होवून केव्हाच बाहेर पडली. पूर्वी एकाच्या घरातील साखरेच्या मुन्ग्या शेजाराच्या घरी हमखास सापडणार असा घरोबा आता मुन्गीलाही पाय ठेवायला जागा नसलेल्या गर्दीत हरवला... कोऑपरेटीव चा मानबिन्दू असा पुसला गेला अन अजूनही पन्नास पैकी अठ्ठे चाळीस घरे मराठी असूनही या सहकारी सोसायटी मधे मात्र सोसायटी पाडून टॉवर बान्धायचा प्रश्ण अजूनही चिघळलेलाच आहे. आजकाल मराठी माणसाचा कुठलाही प्रश्ण चिघळतो कारण काहीही असो. आता हेच बघा ना या टॉवर बनवण्यावरून तीन गट पडलेत. तसे आर्थिक दृष्ट्या सुबत्ता असूनही दर पावसाळ्यात तळागाळात जमा होणारे खालचे लोक. उन्हाळ्यात पाम तेलागत कायम घामात गळलेले अन पावसाळ्यात वरून गळणार्या पाण्यात भिजणारे सर्वात वरच्या मजल्यावरील वरचे लोक, अन कुणाच्याही अध्ध्यात मध्ध्यात सहसा नसणारे (कारण यान्ची घरे कायम सुरक्षित), आपण बरे आपले घर बरे असणारे इतर मधल्या मजल्यावरील लोक. या खालच्या अन वरच्या गटातील लोकाना एका मुद्द्यावर एकत्र आणायचे काम निसर्गाने केले अन भारतीय लोकशाहीच्या तत्वानुसार टॉवर बान्धणे या common minimum program वर सर्वानी हेवेदावे बाजूला ठेवून शिक्कामोर्तब केले. तर इतर मजल्यावरील लोकान्चे हो नाही असे अपक्ष उमेदवारान्सारखे तळ्यात मळ्यात चालू राहिले. या विषमभूज त्रिकोणाची तिसरी बाजू म्हणजे सोसायटीत अलिकडेच नव्याने राहिला आलेली काही कुटुम्बे. नुकतेच इतके लाख भरल्यावर पुन्हा टॉवर बान्धायला पैसे कुठून आणायचे हा यान्चा बाजू सपोर्ट करणारा विशालकोन. या टॉवर महाभारताची ही ठळक क्षणचित्रे.. तळमजल्यावरील मोने काकूनी आज सोसायाटीच्या Meetingमधे इस पार या उस पार करायचे ठरवलेच होते. सोसायटीची एक प्रदक्षिणा करून तळ मजल्यावरील इतर सर्व घरान्ची आतून अन आतून जमली नाही तर हळूच बाहेरून डोकावून त्यानी कोकणस्थी पहाणी केली होती. बाजूच्या भालेरावान्च्या बेडरूममधे भिन्तीवर किती भेगा पडल्या आहेत पासून दुसर्या इमारतितील अजगावकरानच्या स्वैपाघरातील पोट्माळ्याच्या सळ्या गन्जून त्यातून किती माल बाहेर पडत आहे याची माहिती मोने काकूना अधिक. "अहो पण इमारतीन्चे अजून किमान वीस वर्शे तरी निर्धोक आयुष्य शिल्लक आहे असा आपल्या consultant engineers नी रिपोर्ट दिलेला आहे, फारतर पुन्हा एकदा थोडी डागडूजी अन पायाभरणी करून घेता येईल", हे नेहेमीचे ब्रम्हास्त्र त्यावर सोसायटीच्या कमिटीवरील तज्ञ इन्जीनीयर मालशे यानी काढले. मोने काकू engineer नाहीतच पण मालश्यान्चा आणि त्यान्च्या त्या कन्सल्टन्टस्चा उच्च्वर्णीयान्वर पहिल्यापासून राग हे एकच कारण यामागे आहे अशी त्यान्ची पक्की मनोधारणा होती. वरच्या मजल्यावरील भाई शिन्देनी सुत्रे हातात घेतली. ईमारतीन्च्या पायाच ठीक आहे हो पण वरून गच्च्या गळतात, एक बाजू खराब होते, हे दर वर्षीच नाटक आहे त्याच काय? मालशे तुम्ही एक पावसाळा राहून बघा आमच्या घरी मग बोला. या गच्ची मेन्टेनन्स चे पैसे आम्ही देतोच आहोत अजून किती देत रहायचे..? देवधर तसे मधल्या मजल्यावरचे पण टॉवर च्या बाजूनी बोलणारे फार थोड्यान्पैकी एक.. त्यानी आपला रथ पुढे दामटला " मि तर स्पष्टच सान्गतो".. आमच्या एका खोलीत वाळवी निघाली, pest control वाले आले पाच दहा हजाराचे औषध मारून गेले पण हा problem इमारतीचा आहे हेच सान्गून गेले.. आमच्या दोन मुलिन्च शिक्षण, लग्न अजून व्हायचे आहे.. आम्ही इथेच अनेक वर्षे राहिलो, इथेच मरू, पण दर वर्षी हा वाळवीचा त्रास अन खर्च कोण सहन करणार? माझी आई आमच्या बरोबर रहाते तीला भिन्तीन्च्या ओलाव्याने सर्दी, दम्याचा त्रास होतो.. अरे आम्ही सहन करतो म्हणून किती करायचे? तिथे देवधरान्ची म्हातारी आई बरोबर टायमिन्ग ला खोकली.. "आज आजी खास या meeting साठी जिने उतरून आल्या वाटत" टॉवर विरोधी एक आवाज. सोसायटीतील सर्वात ज्येष्ट अन सर्वात वरच्या मजल्यावर राहणारे माईनकर आजोबा डोळ्यात पाणि आणून बोलले.."हे पहा निदान आयुष्याच्या सन्ध्याकाळी तरी चार जिने चढून "वर" जायला लागू नये इतकीच अपेक्षा आहे. टॉवर बरोबर लिफ्ट येईल तेव्हा आम्च्या सारख्याना "ये जा" करायला सोपे होईल. माईन्करनाची बायको, सोसायटीच्या माईनकर आजी गेल्याच महिन्यात निवर्तल्या होत्या. त्यान्च्या अन्त्ययात्रेला खान्दा द्यायला खर तर अख्खी सोसायटी हजर होती पण टॉवर च्या मुद्द्यावर मात्र आजोबाना याच लोकान्कडून अपेक्षित सपोर्ट मिळत नव्हता. माईन्कर आजोबान्ची अवस्था महाभारतातील आपल्याच आप्त स्वकीयान्चे झगडे हताशपणे पाहणार्या भिष्मान्सारखी झाली होती, सुखाने जगता येत नाही अन सोसायटी सोडून जाताही येत नाही.. टॉवर वाल्यान्ची बाजू भारी पडते आहे हे लक्शात येताच गजकरानी आपले घोडे पुढे दामटले. Look, at this point आम्हाला कुठलाही खर्च करायचा नाहीये. एक पावसाळा सोडला तर तसा काही त्रास होत नाही. आता आम्ही retire माणसे. टॉवर बान्धायला कमित कमी घरटी दहा ते वीस लाख तरी भरावे लागतील. आता इतके कर्ज कुठून काढायचे आणि कशाला? असे अजून किती आयुष्य शिल्लक आहे? मी आणि बायको सुखात आहोत, दोघाना पुरेल एव्हडी जागा आहे. So we are not interested. गजकर हे खर तर bank मधून वरच्या पदावरून निवृत्त झालेले. त्यान्चा शब्द एकेकाळी खरच मोलाचा होता..पण आता त्यान्चे दिवसही सम्पले, काळही बदलला तरी गजकर बदलले नाहीत. "गजा बरोबर बोलतोय".. गजकरान्च्या बरोबरीने काम केलेले त्यान्चे अनेक वर्षाचे सहकारी सुर्वे बोलले. ब्यान्केत साहेबाची हाजी करणारे सुर्वे सोसायटीतील इतर समवयस्कान्पेक्षा लवकर वरच्या पदावर गेले ते याच मूळे. पुन्हा एकदा तळ मजल्यावरील ताम्बे काकूनी एका नविन मुद्द्याला हात घातला. "मी याना (मिस्टराना) सान्गितल आहे"... एकदा काय ते टॉवर च ठरवा. नाहितर आम्ही दुसरीकडे जागा घेणार आहोत, एकतर बाजूच्या जागान्चे भाव वाढत आहेत, उशीर केला तर नुकसान आमचेच आहे. इथे दर वर्षी या समस्याना तोन्ड देण्यापेक्षा आम्ही जातो दुसरीकडे. एकदा हो का नाही काय ते ठरवून टाका ना.." "अरे पण इथला block तुझ्या बाबान्च्या नावावर आहे".. तेव्हा त्यान्च काय मत आहे टॉवर बद्दल? नव्या पिढीच्या प्रगतीवर असा आडून प्रहार करायचे काम सोसायटीचे accountant साने चोख करत होते. कुचकट अन खडूस या त्यान्च्या नावलौकीकात त्यान्ची मुले मात्र उगा होरपळून निघाली. सान्यान्च्या मुलाशी मैत्री म्हणजे मैत्री करणारा सर्कीटच असणार अशी ख्याती होती. दुसर्या मजल्यावरील मालवणचे जगन्नाथ दळवी लुन्गी सावरत कडाडले.. "अरे कोण तो भोxxx contractor गेल्या वर्षी आणला होता..काम करताना भxxxxxने इथली चार झाडे तुडवली. मी तुम्हाला सान्गतॉ इथली नारळी अन अम्ब्याची झाडे आम्च्या अण्णान्नी लावलेली.. साल आयुष्य आम्च गेला रोज झाडाना अन मैदानावर पाणी घालण्यात. आपण कुणाच्या बापाच खाल्ल नाही.. ही सगळी झाड अन बाग तो contractor टॉवर च्या बाजूला लावून देणार आहे का? पर्यावरणाचा साला बोम्ब मारून ठेवलाय.. तिसर्या मजल्यावरील पुणताम्बेकरानी आपल्या भजनी सुरात मत मान्डले. पुणताम्बेकर फार देवभक्त. आजच्या युगात सोसायटीत दर एकादशीला चक्क ते मिरवणूक काढत, ग्यानबा तुकाराम स्टाईल नाचत गात त्यान्चे सम्पूर्ण कुटुम्ब अन इतर लोक एक परिक्रमा करत. एरवी कधिही कुणाच्या अध्यात मध्ध्यात नसलेल्या पुणताम्बेकरान्च्या शब्दाना एक खास वजन होत. "अहो डोक्यावर छत शिल्लक आहे तोवर ठीक आहे.. पण उद्या इमारत चुकून कोसळलीच तर कुणाकडे जाणार आहात? सध्ध्या बान्धकाम व्यवसाय तेजीत आहे, दैवयोगानेच ही सन्धी चालून आलीये.. तोवरच बान्धून टाकू. फक्त नविन टॉवर मधेही आम्च्या दर शनिवारच्या भजनाला परवानगी अन एक community room असल की झाल. भाटे अन कोतवाल यान्चा खर तर छत्तीस चा आकडा. त्यात लहान्पणापासून भाट्यान्ची मेधा अन कोतवालान्चा रवी एकाच शाळेत जायचे, मैदानात एकत्र खेळायचे आणि सोसायाटीच्या गणेश उत्सव, रन्ग पन्चमीत एकत्र खेळता खेळता दोघानी नको ते रंग उधळले अन दोन्ही घरच्या मर्जीविरुध्ध ल़ग्न करून पसारही झाले. पण दोन्ही घरातील ही एकुलती एक आपत्त्य असल्याने वय उतरलेल्या आई बापाना त्यान्चा सहवास आता हवा हवासा वाटु लागला.. टॉवर च्या निमित्ताने पुन्हा एकत्र येतील या आशेवर ही दोन्ही कुटुम्बे या मुद्द्यावर एकत्र आली होती. मधल्या मजल्यावरील पेठे तापट अन तर्कट. मनुष्य कितिही हुशार असला तरी लोकसंग्रहाच्या बाबतीत उदासीन. किम्बहुना कामाशिवाय त्यान्च्याशी कधी कुणी जास्त बोलतही नसे. नाही म्हणायला दोन वेळा सोसायटीचे यशस्वी सेक्रेटरी म्हणून त्यानी कारकीर्द सम्भाळली. पै अन पै च्या हिशेबात पक्के असल्याने सर्व कामे चोख पुन्हा नाव ठेवायला कुणाला वाव दिला नाही. अलिकडे बेडेकर सेक्रेटरी झाल्यापासून पेठ्यान्चा रन्ग बदलला होता.. बेडेकराने पूर्वी कधी सेक्रेटरी म्हणून काम बघताना पैसे इकडे तिकडे केले असा पेठ्यान्चा आरोप. आता त्यान्च्या कारकीर्दीत टॉवर सारखे मोठे बान्धकाम होवू द्यायचे नाही हा विचार कुठेतरी पेठ्यान्च्या डोक्यात रुन्जी घालत असावा.. मालशेन्च्या खान्द्यावरून मग पेठे आपली बन्दूक चालवत असत.. पुन्हा एकदा डोक्यात अनिश्चीततेचा कल्लोळ अन शन्का कुशन्कान्चा धूर मनात कोन्डून सर्व जण आपापल्या छावणीत परत गेले. नक्की आपण कुणाच्या बाजूने लढतोय, कुणाच्या बाजूने लढावे या विचार मन्थनातच आजचा एक अध्ध्याय पुन्हा अर्ध्यावरच सम्पला.. याची फलशृती कधी होईल ते सान्गता येत नाही पण अजूनही आपापल्या राहुटी तम्बूत छोटी छोटी खलबते, चर्चा शिजत होत्या, त्या अशा. १. पेठ्यान्चे शेजारी: अरे या पेठ्यान्च्या शेजारी रहायचे आहे कुणाला? यान्च्या तोन्डी शहाण्याने लागू नये.. अहो मी काय म्हणतीये, टॉवर झाला तर आपण दुसरा मजला बदलून घेवूया. खर तर आज ना उद्या इथे टॉवर होणारच हे सर्वाना माहितच आहे, ती काळाची गरज आहे. किम्बहुना "होईल तेव्हा होईल" या मध्ध्यमवर्गीय मानसिकतेशी सर्वान्चे इमान कायम असले तरी एका विचीत्र त्रिशन्कू अवस्थेत लटकल्यासारखे इथले लोक भासतात. तुम्हाला दिव्यदृष्टी प्राप्त असेल तर नर्मदा प्रदक्षिणा न करताच या सोसायटीत एक प्रदक्षिणा मारलीत तर ही टॉवर ची जखम कपाळावर घेवून फिरणारे कित्त्येक अश्वत्थामा भेटतील अन थोडी आपुलकी दाखवलीत तर या टॉवर महाभारताचे याची देही याची डोळ वर्णनही करतील.. फक्त प्रदक्षिणेला तेल न घेवून जाता निदान मराठी माणसाना एकत्र आणणारी एक युक्ती बरोबर घेवून जा. दुर्दैव! अजून अश्वत्थामाची जखम भरणारी सन्जीवनी पैदा व्हायची आहे तशीच बहुदा मराठी मनाना एकत्र आणणारी जादूची छडी बनायची आहे.. तोवर हे सर्वच असेच कपाळावरील जखम घेवून अनेक काळ फक्त आयुष्य ढकलत राहणार? ही "कोऑपरेटीव" समस्या कधी सम्पेल का? योग. |
अतिशय उत्कृष्ट ललित लेखन. विचार करायला लावणारं. तोंडी लावायला विनोदही आहे.
योग, खूप सुंदर. शेवट तर अप्रतिम. मी अनेक वर्षं सिडनीत आहे, त्यामुळे मुंबईतल्या ह्या 'घडा' आणि 'मोडींशी' फार जवळून संबंध नाही. पण नातेवाईकांकडून आणि आता भावाकडून कळतात ना... बदललेले संदर्भ.
सुंदर लेख, योग!
छान लिहिले आहे! ही समस्या मुंबई मध्ये आ वासून उभी असली तरीही बाकी शहरातही थोड्याफार प्रमाणात आहे. कोणताही निर्णय घेताना चालढकल, १०० चर्चा आणि शून्य कृती.
छान लिहीले आहे.
फक्त एक गैरसमज दुर करावास वाटतो.
आम्चे घर मधल्या मजल्यावर होते पण आम्च्याकडे पण पाणि गळायचे ते बाजुच्या भिंतीमधुन कोप्र्यातुन यायचे
मधल्या मजल्यावर लीक होत नाही असा बर्याच जणांचा गैरसमज असतो.
वालावलकरान्चा निन्या: आई आपल्या सोसायटी सारख मोठ ग्राऊन्ड नाही कुठे.. टॉवर झाल्यावर हे ग्राऊन्ड राहील का..?>>
दिल कि बात छिन ली रे
योग! खुप दिवसानी (का होईना !) लिखाण केलेस्...अगदी मनातल लिहलस्..वाचताना वाटल आपल्याच सो.सा.च वर्णन्..आमच्या़कडे पाणि प्रश्न एरणीवर यायचा(अजुनही येतो)
योग, फारच छान, वास्तववादी. नावे आणि काही तुरळक संदर्भ बदलले तर माझ्याच सोसायटीबद्दल लिहले आहे इतके तंतोतंत मुद्दे मांडले आहेत. खरोखर बदल हा हवाच पण ही कोऑपरेटीव समस्या कधीही न सुटणारी.
योग, आमच्या सोसायटीत आणखी काहि वर्षानी, हे चालू होणार आहे. त्याची झलकच दिसली इथे.