आज्जीच्या कविता -१
खूप दिवसांपासून लिहायचं होतं, माझ्या आज्जीबद्दल- बाईंबद्दल.
बाई- माझ्या वडिलांची आई. घरात सगळेच त्यांना बाई म्हणतात. त्यांच नाव तोळाबाई खंदारे. वय ८४ च्या आसपास. अशिक्षित, मराठवाड्यातल्या एका खेड्यात, मराठ्यांच्या घरात उभा जन्म गेला त्यांचा. अतिशय देवभोळ्या आणि साध्या सरळ स्वभावाच्या. खरंतर सगळ्यांना घाबरुनच रहाणार्या. महिन्यातले १५-२० दिवस कोणता ना कोणता उपास करत असतात, या वयातही.
लहान वयातच आत्याच्या मुलाशी लग्न झालं अन त्यांचा सासुरवास सुरु झाला. मुलं थोडीशी मोठी झाली कि गावात शाळा नसल्याने शिकायला केज, अंबाजोगाई, लातूर, औरंगाबाद, पुणे अशी कुठे ना कुठे जावून राहिली. पाटलाचं घर असलं तरी हातात पैसे कधी नसायचेच. वर्ष न वर्ष पोरांच्या भेटी व्हायच्या नाही. पत्र वैगरेपण नाही.
त्याचकाळात त्यांनी कविता करायला सुरवात केली. त्यांच्या शब्दात गाणी रचायला लागल्या. जात्यावर दळण दळताना, घरात सारवण करताना असं काहीतरी म्हणायच्या. लिहून घेणारं कुणी नव्हतंच, पण सुचलेलं सगळं त्यांना लक्षात रहातं. त्यांच्या आवडीची बहुतेक गाणी / कविता त्यांना अजूनही पाठ आहेत. त्यातली देवांची गाणी बाकीच्यांना पण ऐकवायच्या. कधीतरी गावातल्या मठात म्हणायच्या. आरत्या रचायच्या.
आजुबाजुला काय चाललय, जगात काय होतंय हे त्यांना माहित असण्याचा काही संबंधच नव्हता कधी. तरीही कुणाच्या तरी कडून ऐकलं, माणूस चंद्रावर गेला आणि आणि त्यांच्या गाण्यात त्याचा उल्लेख आला. रझाकारांनी केलेले अत्याचार बघितले /ऐकले होते, स्वातंत्र्यलढ्याबद्दल कधीतरी कुणाकडूनतरी काही ऐकले अन त्यावर गाणं तयार. कधीतरी असंच कळलं की आपल्या लेकराला पोलिसांनी मारलंय. तो काहीतरी आंदोलनं करतो. तो नक्की काय करतो ते माहीत नव्हतंच. कदाचीत अजूनही माहीत नसेल पण ऐकल्याबरोबर आपल्या मुलाची थोरवी सांगणारं गाणं लगेच तयार केलं त्यांनी.
सगळी गाणी / कविता अश्या देवाच्या किंवा गंभीर प्रकारच्याच केल्यात असं नाही. लहान मुलांसाठी गाणी बनवलीयेत, चहा, बायकांचा बदललेला श्रुंगार अशा विषयांवर विनोदी गाणं रचायचाही प्रयत्न केलाय. त्यांच्या वहीमध्ये सध्या १५ देवाची गाणी, २७ कविता आहेत. ३-४ कविता लिहिलेल्या नाहीत.८-१० गवळणी लिहिलेल्या नाहीत. अन बर्याच कविता न लिहिल्यामूळे विसरून गेल्या आहेत.
गाण्यांमध्ये मांडलेल्या कल्पना, कदाचीत आपल्याला आता रुचणार नाहीत,पण त्यांनी त्या त्या वेळी त्यांना जे वाटलं ते त्यांच्या गाण्यात गुंफलं. त्यांच्या गाण्यामध्ये, कवितेमध्ये यमकही जुळत नाही बहुतेकवेळा. भाषा बर्यापैकी अशुद्ध असु शकते. बर्याचदा त्यांनी सांगितलेला शब्द लिहिणार्याला माहित नसेल, तर लिहिणार्याने तिथे आपल्या पदरचा शब्दही घातलाय. एकूण काय तर तुम्हाला कदाचीत कविता म्हणून या कविता फारश्या चांगल्या वाटणार नाहीत, बालिश वाटू शकतिल. पण माझ्यासाठी त्यांची पार्श्वभुमी लक्षात घेतली तर त्यांचं खूप महत्व आहे.
वीसएक वर्षांपूर्वी त्यांनी आपली गाणी लिहून ठेवायला सुरवात केली, कारण काही गाणी त्या विसरायला लागल्या होत्या. आपल्या नातवंडांकडून एका डायरी मध्ये गाणी लिहून घेतली. बाईंनी हे लिहिलय ते छान आहे हे समजत होतं आम्हाला पण तरीही बाईंची गाणी लिहिणं कंटाळवाणं व्हायचं बर्याचदा. मग आम्ही टाळंटाळ करायचो. बाई पण नेहेमी कुणाला त्रास तर होत नाहीये ना हेच आधी बघायच्या. त्यामूळे खरंतर बरीच गाणी अशीच राहून गेली असतिल. आता मात्र खूप पश्चाताप होतो याचा.
गेल्या ४-५ वर्षांमध्ये त्या वाचायला शिकल्या. पूर्वी पण आम्ही लहान असताना त्या वाचायचा प्रयत्न करायच्या. मला आठवतंय, लहान असताना बाई कधी कधी पेपर हातात घेवून हा शब्द कोणता आहे हे आम्हाला विचारायच्या. शब्दाला शब्द जुळवत जुळवत त्या बर्यापैकी वाक्य वाचायच्या. छापलेले शब्द कळतात म्हणायच्या, पण लिहिलेले शब्द समजायचे नाहीत. त्याकाळात त्या वर्षातले १५-२० दिवस, जास्तित जास्त महिनाभर आमच्या घरी असायच्या आधी अंबाजोगाईला आणि नंतर औरंगाबादला. १०-१२ दिवस केजच्या काकांकडे. बाकी पूर्णवेळ गावाकडेच. बहुतेक त्यामूळेच त्यांना शिकवावं हे कधी लक्षात आलं नाही.
नंतर नंतर जरा जास्त दिवस असायच्या त्या आमच्याकडे अन काकांकडे, पण तोपर्यंत आम्ही बरेच मोठे झालो होतो, शाळा-कॉलेजात व्यस्त असायचो. त्यांनाही मोतीबिंदूमूळे दिसणं कमी व्हायला लागलं. आजोबांची आजारपणं सुरु झाली. यासगळ्यात त्यांच्या कविता, त्यांचं शिकणं याकडे सगळ्यांचंच, अगदी त्यांचं स्वतःचही दुर्लक्ष्य झालं.
मोतीबिंदूच्या शस्रक्रियेनंतर त्यांनी परत वाचयला शिकणं सुरु केलं. स्वतःचं स्वतः. ज्ञानेश्वरी वाचायला सुरवात केली. आता रोज किमान तासभर तरी ज्ञानेश्वरी वाचतात त्या. पेपरमधले शब्द ओळखू शकतात. पण हातानी लिहिलेलं मात्र नाही वाचता येत नीट. लिहिताही येत नाही. आता शिकवतो तुम्हाला म्हटलं तर म्हणतात, आता या वयात कुठे शिकु?
गेल्या वर्षभरात एक नविन छंद शोधलाय. चिंध्यांच्या बाहुल्या बनवायचा. एका टोपल्यात चिंध्या, कापूस, नवा-जुना कपडा, जे मिळेल ते घेवून सुई दोर्यानी शिवत असतात. आत्तापर्यंत ८-१० बाहुल्या बनवल्यात. एक शिवाजी महाराजपण बनवलेत.
त्यांच्या काही कविता मी इथे देतेय. रोज एखादी तरी कविता टाकेन इथे.
हे आम्ही लहान असताना, आमच्यासाठी रचलेलं गाणं. (मला त्या ताई म्हणतात अन माझ्या दुसर्या एका चुलत बहिणीला माई. ) आता नातवंडांना ऐकवतात.
माई, ताई, मैत्रिणी आल्या घरी
त्यांना खायला काय मी देवू
छोट्या गोट्या, माझ्या मैत्रिणीचे भाऊ
त्यांना खायला काय मी देवू
देवा माझ्या नवसाला पाव
खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव
खाऊच्या झाडाला आइसक्रिमचे तुरे
तशी जमली तिथे सारी ही पोरे
चॉकलेटची पाने अन साखरपण लाव
देवा माझ्या नवसाला पाव
खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव
माई ताई आनंदल्या फार
आइसक्रिमच्या झाडाला चॉकलेटचा आहे भार
असले दार दे सार्या मैत्रिणींच्या दारोदार
देवा माझ्या नवसाला पाव
खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव
http://www.maayboli.com/node/19532 इथे अजून काही कविता दिल्या आहेत.
सुंदर! बहिणाबाईंची छोटी
सुंदर!
बहिणाबाईंची छोटी बहीणच म्हणायचे का आज्जींना ?
ह्या कविता, मला आता घरात म्हणुन दाखवायला चान्स आहे
छान दस्ताऐवजीकरण. आज्जींना
छान दस्ताऐवजीकरण.
आज्जींना सांग नक्की.
मस्त रचना आहेत. ओवी,
मस्त रचना आहेत. ओवी, पारंपारीक गाणी (हादगा वगैरे) यांचा प्रभाव रचनांवर वाटतो. सहज आणि सुटसुटीत आहेत.
(फक्त कवीता वाचल्या.)
अल्पना, तुझ्या आजीला तू
अल्पना,
'ए आजी' म्हणत नाहीस का? बाकी खाऊच्या झाडाची कल्पना मस्तंय 
तुझ्या आजीला तू अहो-जाहो करतेस का?
अग आईच्या आईला अगं-तुगं करते,
अग आईच्या आईला अगं-तुगं करते, पण वडलांच्या आईला अहो-जाहो करते. मी लहान असताना त्या गावाकडेच जास्त असायच्या. खूप कमी राहिलेय त्यांच्याजवळ. त्यामूळे लहानपणी त्यांच्याशी खूप जवळीक नव्हतीच. त्यामूळे असेल कदाचीत.
माझ्या गावाकडच्या चुलतबहीणी आणि बाबा-काका फक्त ए बाई म्हणतात त्यांना. बाकी सगळेजन अहो बाई.
छान आहे गं कविता..... तुझा हा
छान आहे गं कविता..... तुझा हा उपक्रमही आवडला.... त्यांना नक्की सांग हे खाऊचे झाड आवडल्याचे!
बाईंना आठवत असणारी, स्वरचित नसलेली इतर गाणी, ओव्या, पारंपरिक गीतेही लिहून घेतलीस की नाही?
अल्पना सगळं एकत्र लिहून
अल्पना
सगळं एकत्र लिहून ठेतेयस हे छानच. आज्जीनी केलेल्या बाहुल्यांचेपण फोटो काढून ठेव आणि इथे टाक.
अल्पना, खूप आवडले. रुनीलाही
अल्पना, खूप आवडले. रुनीलाही अनुमोदन.
आजींना सांग गं.
अल्पना, खूप छान कविता! रुनी
अल्पना, खूप छान कविता! रुनी म्हणते तसे बाहुल्यांचे फोटो नक्की टाक.
छान आहे कविता! बाईंना माझा सा
छान आहे कविता! बाईंना माझा सा न नक्की सांग!
अलिकडे लिहा वाचायला शिकल्या म्हणजे ग्रेटच!!
मस्तच. कविता टाकत रहा गं इथे.
मस्तच. कविता टाकत रहा गं इथे. बाहुल्यांचे फोटो पण टाक.
सिंडी, शैलजा, रुनीला अनुमोदन
सिंडी, शैलजा, रुनीला अनुमोदन
मस्तच.
छानच... पुढच्या कवितांची अन
छानच... पुढच्या कवितांची अन बाहुल्याच्या फोटोची वाट बघतेय.
अरे... या म्हातारीला (हा शब्द
अरे... या म्हातारीला (हा शब्द आदरार्थीच वापरला आहे) भेटलं पाहिजे. लिहीत रहा. वाचतोय.
बाकीच्या कविता पण वाचायला
बाकीच्या कविता पण वाचायला आवडतील.
बाहुल्यांचे फोटो पण हवेत.
अशा माणसांबद्दल ऐकून, म्हातारपणाची भिती वाटेनाशी होते !
छान आहे आजीबद्दलची माहिती आणि
छान आहे आजीबद्दलची माहिती आणि कवितापण, अल्पना !
अजुन वाचायला आवडेल.
अल्पना, कविता आवडली म्हणून
अल्पना, कविता आवडली म्हणून सांग नक्की आजीला आणि अजून कविता येऊ देत आणि बहुल्यांचे फोटो पण. ह्या वयात त्या वाचायला शिकल्या हे खरच खूप कौतुकास्पद आहे!
खुप खुप छान ग. आवडले. आज्जीना
खुप खुप छान ग. आवडले. आज्जीना सांग. रुनी म्हणते तसे बाहुल्यांचे फोटो टाक इथे.
धन्यवाद. बाईंना आज फोन करुन
धन्यवाद. बाईंना आज फोन करुन सांगेन सगळ्यांच्या प्रतिक्रिया.
आणी टाकेन त्यांच्या कविता नक्की. बाहुल्यांचे फोटो आत्ता नाहीयेत माझ्याकडे. पण लवकरच टाकेन.
अल्पना आजींची कविता फार छान
अल्पना आजींची कविता फार छान आहे. लहान मुलांना एक्दम आवडेल अशी. आणखी पण कविता टाक. वाचायला आवडतील. आणि बाहुल्यान्चे पण फोटो असतील टाक ना.
ग्रेटच आहे रे तुझी आजी...
ग्रेटच आहे रे तुझी आजी... उपक्रम देखील छान आहे, आणि तु लिहितेस देखील छान. Engineering ऐवजी Literature घेतले असतेस तर आता पर्य्न्त मोठ्ठी लेखीका झाली असतीस रे... पन ठिके, आजुनही वेळ गेली नाहीये...
ही खाऊच्या झाडाची कविता
ही खाऊच्या झाडाची कविता प्रसिद्धपण केलीय का कुठे? माझा मावसभाऊ अशीच (खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव, नवसाला पाव - अशा शब्दांची ) एक कविता त्याच्या लहानपणी (१०/१२ वर्षांपूर्वी) म्हणायचा. ती त्याची आवडती बालकविता होती त्यामुळे सारखीच म्हणायचा त्यामुळे माझ्या लक्षात राहिल्या आहेत या ओळी.
आवडली अगदी. काय कल्पना आहे!
आवडली अगदी. काय कल्पना आहे! पुस्तक काढा ग त्यांच्या कवितांच. लिहित रहा कविता इथे. आणि हो बाहुल्या पहायला आवडतील. तसच त्यांचा फोटो ताक न ज्ञानेश्वरी वाचता, बाहुल्या करताना वगैरे. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देवूनही शिकण्याची हौस आणि ह्या वयात नवीन गोष्टी करण्याची तयारी आपल्याला केवढं शिकवून जाते. नमस्कार सांग माझा.
छान आहे गं कविता अल्पना..
छान आहे गं कविता अल्पना.. त्या कवितांचा संग्रह केलास ते उत्तम केलस..
काय मस्त आहे!!!!
काय मस्त आहे!!!!
ग्रेट! दिनेशदा, अनुमोदन! खरच
ग्रेट!
दिनेशदा, अनुमोदन! खरच ही अशी उदाहरणे ऐकली की त्यान्चे अनुकरण केल अस्ता कशाचीच भिती बाळगायचे कारण नाही
माबोवर हे अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद
नाही ग मृदुला. त्यांच्या
नाही ग मृदुला. त्यांच्या कविता कुठेही प्रसिद्ध नाहीयेत. तुझा मावसभाऊ म्हणत असलेल्या गाण्यात तेच शब्द असणं हा कदाचित योगायोग असु शकतो किंवा त्यांनी जर कुठे हे गाणे ऐकले असेल तर (ही शक्यता फारच कमी ), ते शब्द /ओळी आवडल्यामूळे वापरल्या असु शकतिल.
मस्त...सहीए आज्जी आणि कविता
मस्त...सहीए आज्जी आणि कविता पण
कविता मस्तच आहे, त्यामुळे
कविता मस्तच आहे, त्यामुळे लक्षात राहिलीय ..
ही अशी म्हणायचा तो (गूगल्कृपेने सापडलेला दुवा)
http://majhiyamana.blogspot.com/2010/05/blog-post_31.html
मस्त आहे कविता.. व इतक्या
मस्त आहे कविता..
व इतक्या उशीरा वाचायला शिकल्या म्हणजे खरंच कमाल! बाहुल्यांचेही फोटो नक्की येऊदेत..
Pages