सलिलदां च्या 'गाण्याशी' पहिली ओळख झाली,कॉलेज जीवनात. त्यांच्या आनंद चित्रपटातल्या गाण्यांनी अक्षरश: वेड लागल होत, अगदी कॉलेजच्या गॅदरींग मधे म्हणायला सुद्धा ' ना जिया लागे ना' गाण्या ची निवड केली होती. त्या गाण्याच्या सुरावटींनी, चालीने अगदी भुरळ घातली होती. गाण तयार करताना त्यांच्या 'हटके' संगीत शैलीची साधारण कल्पना आली .
तशी त्यांच्या संगीताची माझी ओळख, आनंद, छोटीसी बात,काबुलीवाला,मधुमती इ. चित्रपटातल्या गाण्यांपुरतीच आणि एखाद्या कार्यक्रमा साठी गाणी तयार करण्यापुरतीच मर्यादित होती, किंवा कदाचित तेव्हढ्या पुरतीच मर्यादितही राहिली असती.
पण बर्याच वर्षा नंतर, त्यांना वाहिलेली http://www.salilda.com ही साईट मिळाली आणि त्यांच्या विविध शैलीतल्या गाण्यांचा जणू खजिनाच अचानक हाती लागला. पुन्हा एकदा नव्याने सलीलदां च्या गाण्याशी, त्यांच्या शैलीशी ओळख झाली. त्या साईट मुळे आणि त्यात सापडलेल्या अप्रतिम गाण्यांमुळे. त्यांनी संगीत दिलेल प्रत्येक गाण ऐकताना अगदी अलीबाबाच्या गुहेत शिरल्या सारख वाटल.
१९ नोव्हेंबर १९२२ साली पश्चिम बंगाल मधल्या, गंजीपूर मधे त्यांचा जन्म झाला. त्यांच बरचस बालपण आसाम मधे गेल.तिथेच संगीताची पाळमुळं खोलवर त्यांच्या मनात रुजली गेली, त्यांच्या डॉक्टर वडीलांमुळे. त्यांचे वडीलही वेस्टर्न क्लासिकल संगीताचे भोक्ते होते. लहानपणापासून त्यांच्यावर झालेल्या वेस्टर्न क्लासीकल संगीताचा आसामी,बंगाली लोकगीतांचा प्रभाव त्यांच्या बर्याच गाण्यातून दिसून येतो. हिंदी चित्रपट संगीतात वेस्टर्न क्लासिकलचा इतक्या लवचिकतने वापर करणारे ते बहुधा पहिलेच संगीतकार होते.
त्याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोझार्टच्या ४० व्या सींफनी वर बेतलेल छाया चित्रपटातल "इतना ना मुझसे तु प्यार बढा" हे लताजीं आणि तलतच्या आवाजातल अफलातून गाण. मला वाटत सलिलदांच्या संगीता मुळे ह्या गाण्यातून व्यक्त होणारे भाव शब्दां इतकेच, कदाचित जास्त प्रभावी ठरतात. खाली दिलेल्या लिंक मधे मूळ धुन ऐकु शकता.
http://www.youtube.com/watch?v=aZD9nt_wsY0
त्यांच्या एकेका गाण्यातून त्यांची अनोखी शैली उलगडत गेली, दरवेळेस नविन अनूभूती देणारी, आता आपल्याला समजली अस वाटेपर्यंत परत कोड्यात टाकणारी,अचंबीत करणारी,कुठलाही साचेबद्धपणा नसलेली, एखाद्या अवखळ झर्या सारखी प्रवाही.
त्यांनी कुठल्या ही प्रकारच शास्त्रीय संगीताच शिक्षण घेतल नव्हत,पण ते एक उत्तम गायक , बासरी वादक होते. वयाच्या आठव्या वर्षा पासून ते बासरी वाजवायला लागले. त्यांच्या ऑर्केस्ट्रॉ मधे काम करणार्या भावा मुळे त्यांचे तबला,सतार,व्हायोलिन अशा काही वाद्यांशी सुर जुळले होते एवढच, पण परख चित्रपटातल लताजींच्या स्वर्गीय आवाजातल अजरामर गाण "ओ सजना बरखा बहार आई" (हे लताजींच्या सुद्धा आवडत्या दहातल एक गाण) छाया चित्रपटातल बसंत बहार रागात रचलेल "छम छम नाचत आई बहार" , जागते रहो मधल "ठंडी ठंडी सावन की " किंवा चांद और सुरज मधल " झनन झनन बाजे" ही शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी ऐकल्या नंतर, त्यांनी शास्त्रीय संगीताच शिक्षण घेतल नव्हत ह्या गोष्टी वर विश्वास बसत नाही, पण "दैवी देणगी" ह्या संकल्पने वर मात्र विश्वास बसतो
"छम छम नाचत आइ बहार " या गाण्यात त्यात वापरलेली निरनिराळी वाद्य आणि त्याचा अत्यंत संयमित वापर अचूक परिणाम साधतात.
झनन झनन बाजे, मधल कळत नकळत जाणवणार फ्युजन अफलातून आहे. गाण्यात मुखडा पूर्ण हिंदुस्तानी क्लासीकल आणि अंतर्याची चाल, किंचीत पाश्चिमात्य ढंगा कडे झुकणारी, त्यातल्या मुखड्याच्या वेगवेगळ्या जागा ...हे असल जबरदस्त काँबीनेशन केवळ त्यांनाच सुचु शकत.
त्यांनी "कोरस" चे वेगवेगळे प्रयोग आपल्या गाण्यात यशस्वी पणे केले. त्यांची अनेक गाणी याची साक्ष देतात, जशी परख मधल "मेरे मन के दिये", किंवा छोटीसी बात मधल "न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ" किंवा अन्नदाता मधल "रातों के साये घने" मधला उत्तरार्धातला भाग . त्यात वापरलेल्या कोरस मुळे नायिकेच्या मनातली आंदोलन जास्त प्रभावी पणे व्यक्त होतात.
ते स्वतः उत्कृष्ट कवी,लेखक नाटककार होते , त्यामुळेच कदाचित त्यांच्या प्रत्येक गाण्यातुन, त्यातले भाव नेमक्या स्वरातून उमटतात आणि थेट हृदया पर्यंत पोचतात. "ए मेरे प्यारे वतन " हे एकच गाण सलिल म्हणजे काय ते जाणून घ्यायला पुरेस आहे. घराच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या पठाणाची तडफड इतक्या प्रभावी पणे कुठल्या गाण्यातून व्यक्त होऊ शकेल ?
गाण्यातल्या शब्दांना जिवंत करणार्या लांबच लांब पल्लेदार चाली ही त्यांची खासीयत होती. लताजींच्या आवाजातल हनिमून चित्रपटातल "अहा रे मगन मेरा चंचल मन" ,परख चित्रपटातल "ये बन्सी क्युं गाये" किंवा झुला मधल "सजना मेरा दिल तेरा दिल गया मिल" सारखी गाणी ही त्याचीच उत्कृष्ट उदाहरणं.
लहान पणापासून आपण वेगवेगळ्या प्रकाराच संगीत ऐकतो. त्याचा कळत नकळत एक विशिष्ट परिणाम आपल्या कानावर झालेला असतो ,त्यामुळे गाण्याची सुरवात ऐकली की पुढच्या विस्ताराची साधारण कल्पना आपण करू शकतो. बहुतेक संगीतकारांच्या चाली ह्या कल्पनेशी फारकत घेणार्या नसतात .सलीलदांची चाल मात्र प्रत्येक वळणावर थक्क करून जाते. आपल्याला ही सुरावट कळल्याच पुरेस समाधान मिळत न मिळत तो पर्यंत पुढची सुरावट आपल्याला गुंतवून टाकते.
त्यांच 'जीना यहाँ 'चित्रपटातल्या "ओ शाम आई रंगो मे रंगी हुई " हे त्याच एक उत्कृष्ट उदाहरण लताजीं च्या आवाजातल्या ह्या गाण्याची सुरावट अक्षरशः वेड लावणारी आहे . खास सलिलदांची सिग्नेचर असणार गाण, त्या गाण्यातून व्यक्त होणारी नायिकेचीह हुरहुर, तिच आशादायी स्वप्न थेट भिडतं, ते केवळ त्यांनी दिलेल्या अनवट अशा चाली मुळे.
प्रयोगशीलता आणि नाविन्य हा त्यांचा स्थायी भाव असावा,जो त्यांनी संगीत दिलेल्या प्रत्येक गाण्यातून जाणवतो. अनेकप्रकारच्या वाद्यांचा, लोकसंगीताचा प्रभावी वापर हे त्यांच्या गाण्यात ठळक पणे जाणवणार वैशिष्टय . त्यामुळेच बहुतेक आजही त्यांच प्रत्येक गाण चिरतरुण वाटत.
आवाज चित्रपटातल "दिल धितांग धितांग बोले" गाण ऐकून पहा. या गाण्यात सुरवातीची ढोलकी नंतरच्या गाण्याच्या चालीशी थोडी विसंगत वाटते, पण नंतरची संपूर्ण गाण्याची चाल गोव्यातल्या लोकगीताची आठवण करुन देते.
चांद और सुरज चित्रपटातल्या " उनकी मेरी प्रीत पूरानी " ह्या गाण्याला दिलेल्या संगीतात त्यांनी लावणीचे बारकावे इतके अचूक टिपलेत, की बंगाली संगीतकाराची रचना आहे ह्यावर विश्वास बसण कठीण जाव . आशा बाईं च्या धारदार आवाजात ही लावणी हिंदी असून ही मराठी लावणी इतकीच खणखणीत वाटते.
त्यांना स्वतःची अशी पठडी बाहेरची स्वतंत्र शैली निर्माण करायची होती. एकाच वेळी गीतकार,संगीतकार ,संयोजक म्हणून काम करणार्या ह्या संगीतकाराचे सुर, निरनिराळ्या सुरावटी,त्यातल नाविन्य ह्या बद्दल चे विचार , संशोधन , व्याप्ती अक्षरश: थक्क करणारी होती, जी त्यांच्या प्रत्येक गाण्यातून जाणवते, व्यक्त होते. त्याचा पूरेपूर प्रत्यय देणारी ही त्यांची काही अप्रतिम गाणी -
१)चांद रात तुम हो साथ - हाफ टिकीट
२)वो एक निगाह क्या मिली - हाफ टिकीट
३)आंखो मे तुम दिल में तुम - हाफ टिकीट
४)जा तोसे नही बोलु कन्हैय्या - परिवार
५)ओ हाय कोई देख लेगा - एक गांव की कहानी
६) अकेला तुझे जाने ना दूंगी - चार दिवारी
७)बाग में कली खिली - चांद और सुरज
८)जागो मोहन प्यारे - जागते रहो
९)घडी घडी मोरा दिल धडके - मधुमती
१०)चढ गयो पापी बिछुआ - मधुमती
११)न जाने क्यूं होता है ये जिंदगी के - छोटीसी बात
१२)जिंदगी कैसी ये पहेली हाए- आनंद
सलिलदांनी काही चित्रपटांना आणि माहिती पटांना फक्त पार्श्वसंगीत दिलय,केवळ त्या पार्श्वसंगीता वरून चित्रपटाच्या कथानका ची कल्पना यावी इतक प्रभावी त्यासाठी ही ते फार प्रसिद्ध होते , त्यामुळेच कदाचित बिमल रॉय नी त्यांच्या कडून देवदास साठी फ़क्त पार्श्व संगीत करून घेतल असाव. अस संगीत देणारे ते पहिलेच संगीतकार होते.
मुकेश च्या आवाजाचा उपयोग सलीलदां एवढा उत्कृष्ट पणे, कदाचित कुठल्याही संगीतकाराने करून घेतला नसेल. त्यांनी संगीत दिलेली गाणी मुकेश च्या आवाजात ऐकताना ती केवळ त्याच्या आवाजासाठीच त्यांनी बनवली असावित अस वाटत . अतिशय गोड आणि मधुर अशा चालींची भावपूर्ण, प्रसन्न गाणी त्यांनी मुकेशच्या आवाजात गाउन घेतली. तरल ,भावपूर्ण पण तरी ही विशेष लोकप्रिय नसलेल मुकेश आणि लताजींच्या आवाजातल पूनम की रात चित्रपटातल द्वंद्व गीत " तुम कहां ले चले हो " , अतिशय प्रसन्न सुरावटींच छोटीसी बात चित्रपटातल मधल "ये दिन क्या आये" , हनीमून मधल "मेरे ख्वाबो मे खयालो में", तर छाया मधल "दिलसे दिल की डोर बांधे", ही गाणी ऐकल्या नंतर, मुकेश म्हणजे 'दर्दभरी' गाणी हे समिकरण पूर्ण पणे विसरायला होत.
संगीतात ,प्रतिभेला भाषेचा अडसर नसतो , त्यांनी तेलगू ,मल्याळम , कन्नड़ ,गुजराती ,उडीया, मराठी अशा अनिकविध भाषेतील गाण्याना संगीत दिल. मल्याळम चित्रपट "चेमिने " मधल्या एका गाण्यासाठी ह्या बंगाली संगीतकाराला केरळ सरकारने श्रेष्ठ संगीतकार पुरस्काराने गौरवल होत.
५ सप्टेंबर ला ह्या अष्टपैलू संगीतकाराला काळाच्या पडद्या आड जाऊन पंधरा वर्ष होतील, तरी
आजही त्यांच संगीत चिरतरुण वाटत, त्यांनी संगीतबध्द केलेली गाणी कितीदा ऐकली तरी प्रत्येक वेळेला नाविन्याची अनुभूती देतात. त्यांच्या प्रत्येक गाण्यातून उलगडत गेलेल्या त्यांच्या प्रवाही शैलीच आकर्षण कधी ही न संपणार आहे, म्हणूनच त्याचा शोध ही कधी न लागणारा न संपणारा ,आपणही त्या प्रवाहात फक्त सामावून जायच बस्स तेवढच फक्त आपल्या हातात आहे.
टीपः वर दिलेली सगळी गाणी तुम्हाला www.salilda.com ह्या साईट वर ऐकायला मिळतील
चिमण च्या मदती मुळे हा लेख तुमच्या पर्यंत पोहोचवण शक्य झाल, तेव्हा चिमणला अनेक धन्यवाद.
सुंदर लेख स्मिता तुझा लेख
सुंदर लेख स्मिता
तुझा लेख म्हटल्यावर आधी वाटलं शास्त्रीय संगीतावर आधारीत काहीतरी असणार आणि मला बाऊन्सर जाणार
पर ये तो मेरे एकदम आवडीका निकला 
मस्तच लेख स्मिता! त्याची एक
मस्तच लेख स्मिता! त्याची एक एक गाणी वैविध्यपूर्ण आणि अफलातून आहेत.
सुंदर लेख! हाफ टिकट मधली माझी
सुंदर लेख!
हाफ टिकट मधली माझी दोन आवडती गाणी..
चील चील चिल्लाके
आके सीधी लगी दिल पे..
सलीलदाना सलाम!
त्यामुळे गाण्याची सुरवात ऐकली
त्यामुळे गाण्याची सुरवात ऐकली की पुढच्या विस्ताराची साधारण कल्पना आपण करू शकतो. बहुतेक संगीतकारांच्या चाली ह्या कल्पनेशी फारकत घेणार्या नसतात .सलीलदांची चाल मात्र प्रत्येक वळणावर थक्क करून जाते.>>एकदम बरोबर.
सुंदर लेख स्मिता!!! तलत
सुंदर लेख स्मिता!!!
तलत महमूदच्या आवाजाला असलेल्या मर्यादा ओळखून सलीलदांनी त्याला जी काही गाणी दिली ती अजरामर आहेत.उदा. रातने क्या क्या ख्वाब दिखाये - एक गांव की कहानी
'दो बिघा जमीन' मध्येही सलीलदांनी मन्ना डेच्या आवाजाचाही सुरेख वापर करुन घेतलाय.
स्मिते,जयदेव, मदनमोहन अशा संगीतकारांवर ही लेख येउ देत.
सलीलदांची आनंद मधली सर्व गाणि
सलीलदांची आनंद मधली सर्व गाणि माझी फेवरीट आहेत.... लेख आवडला.
१)न जाने क्यूं होता है ये
१)न जाने क्यूं होता है ये जिंदगी के - रजनीगंधा
<<< हे गाणं 'छोटीसी बात' मधलं आहे.
सलील चौधरी माझे पण अतिशय आवडते संगीतकार :).
ना जिया लागेना, रजनीगन्धा फुल तुम्हारे , जानेमन जानेमन तेरे दो नयन पण खूप आवडतात गाणी !
छान लिहिलय.
सुंदर लेख. हाफ टिकटचे संगीत
सुंदर लेख.
हाफ टिकटचे संगीत सलिल चौधरांचे होते हे कधी लक्षात आले नव्हते. ऐकताना किशोरकुमारच दिसतो....
सलीलदा माझे पण अत्यंत आवडते.
सलीलदा माझे पण अत्यंत आवडते. ते आणि लता, एकत्र आले कि नेहमीच काही जादू घडत असे.
मस्त झालाय गं लेख. एकदम त्या
मस्त झालाय गं लेख. एकदम त्या जमान्यात नेलंस
खरच... मस्त!!! आम्हा
खरच... मस्त!!! आम्हा संगितातल्या ठोंब्याना थोड शानपन आल.
छान लिहीलंय .. हृदयनाथ
छान लिहीलंय ..
हृदयनाथ मंगेशकर सलीलदांचे शिष्य ना? त्यांच्याही बर्याचशा चालीत, 'त्यामुळे गाण्याची सुरवात ऐकली की पुढच्या विस्ताराची साधारण कल्पना आपण करू शकतो. बहुतेक संगीतकारांच्या चाली ह्या कल्पनेशी फारकत घेणार्या नसतात .सलीलदांची चाल मात्र प्रत्येक वळणावर थक्क करून जाते' हे जाणवतं ..
जागो मोहन प्यारे जागते रहो..
जागो मोहन प्यारे
जागते रहो..
ऑडिओमधील गाणे आणि पिक्चरमधील गाणे यातले इन्टरल्युड चे म्युसिक पीसेस वेगळे वेगळे आहेत... दोन्ही छान आहेत..
सुरेख लिहील आहे. माझे पण
सुरेख लिहील आहे. माझे पण आवडते.
खास करुन न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ हे तर माझ्या टॉप १० मधले.
धन्यवाद सगळ्यांनाच
धन्यवाद सगळ्यांनाच !!
दिपांजली धन्यवाद बदल केला आहे .
जामोप्या
हृदयनाथ मंगेशकर सलीलदांचे शिष्य ना? >>> हो काही काळ त्यांनी सलिल चौधरींकडे संगीत शिक्षण घेतल अस ऐकल आहे.
सुंदर लेख. न जाने क्यों होता
सुंदर लेख.
न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ हे तर माझ्या टॉप १० मधले.>>>>>माझ्यापण
आणि "ओ सजना बरखा बहार आयी" हे तर ऑल टाईम फेवरीट
(ऐकायला आणि बघायलापण खुप आवडते)
वावावा ! सलील चौधुरींची आठवण
वावावा ! सलील चौधुरींची आठवण म्हणजेच अहाहाहाहाहा.
अचूक टिपले आहेस स्मिता. अवखळ झर्याबद्दल अगदी अगदी.
एक मला जाणवणारी खासियत म्हणजे अवरोहात वळणावळणाने उतरत येणारी चाल. लै ड्येंजर राव. नवखा गायक सूर शोधत पाय घसरुन धपकन पडु शकतो.
उदा- न जाने क्यु मधील - टुटे रे हाय रे सपनो के महल...
आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये मधील- हवा कहे क्याSSSS SSSS, घुंगर बोले ..
शिवाय ती लताबाईंच्या सुवर्णतारेसारख्या आवाजातली, तलत च्या अतितरल आवाजातली कापरी कापरी होत जाणारी गाणी. काळी चार मध्ये गाण्याच्या लायकीचीच नाही.
त्या 'नयनोकां कजरा पिया तेरा गम' ला तर हे भगवंता.
खुप छान सुरवात झाली दिवसाची.
खुप छान सुरवात झाली दिवसाची. आनंद, मधुमती ऑल टाईम फेवरेट.

आणि "ओ सजना बरखा बहार आयी" हे तर ऑल टाईम फेवरीट स्मित (ऐकायला आणि बघायलापण खुप आवडते)>>>> अरे हे राहिलेच, पाऊस सुरु झाला की हेच गाणे आठवते.
मस्त लेख.
मस्त लेख.
मस्त लेख. मुळातच, जुनी हिंदी
मस्त लेख.
मुळातच, जुनी हिंदी गाणी हा जिव्हाळ्याचा विषय.
लेख वाचताना प्रत्येक नवीन गाण्याची ओळ दिसली की मनात ते गाणं सुरू होत होतं.
:चेष्टा मोड ऑनः
न जाने क्यूं होता है ये जिंदगी के - रजनीगंधा
<<< हे गाणं 'छोटीसी बात' मधलं आहे
>>> ही बाब चिमणच्या नजरेतूनही सुटावी?? शोभत नाही हो चिमण तुला... वय झालं तुझं हेच खरं
:चेष्टा मोड ऑफः
"मुकेश च्या आवाजाचा उपयोग
"मुकेश च्या आवाजाचा उपयोग सलीलदां एवढा उत्कृष्ट पणे, कदाचित कुठल्याही संगीतकाराने करून घेतला नसेल"
पटलं. जागते रहो मधलं जिंदगी ख्वाब है ,खाब में झुठ क्या, और भला सच है क्या...स......ब सच है...!
सुंदर लेख!
सुंदर लेख!
स्मिते.. लेख आवडला..
स्मिते.. लेख आवडला..
स्मिते, लेख आवडला कारण
स्मिते, लेख आवडला कारण सलिलदांची गाणी अत्यंत आवडीची आहेत. सगळीच.....कुठलंही एक असं सांगता येणार नाही.

लले, चेष्टा मोड मधे मी पण मी पण
खूप छान आणि उपयूक्त असा
खूप छान आणि उपयूक्त असा लेख.
<< मल्याळम चित्रपट "चेमिने " मधल्या एका गाण्यासाठी ह्या बंगाली संगीतकाराला केरळ सरकारने श्रेष्ठ संगीतकार पुरस्काराने गौरवल होत. >> हे पहिल्यादांच कळाले.
मस्त लेख! सगळी गाणी आठवून
मस्त लेख!
सगळी गाणी आठवून एकदम मजा आली.
हाफ टिकीटची गाणी किशोरच्या पर्सनॅलीटीत इतकी मिसळून गेली आहेत की संगीतकार कोण आहे हा प्रश्न आजपर्यंत पडला नव्हता. 'आके सिधी लगी' मधला डबल व्हॉईस निव्वळ अफलातून.
"मुकेश च्या आवाजाचा उपयोग सलीलदां एवढा उत्कृष्ट पणे, कदाचित कुठल्याही संगीतकाराने करून घेतला नसेल>> एकदम मान्य, अपवाद असलाच तर काही प्रमाणात एसडीचा.
सर्व सलील प्रेमींनी ऐकायलाच
सर्व सलील प्रेमींनी ऐकायलाच हवीत अशी काही गाणी खालच्या दुव्यांवर सापडतील :
अहा रे मगन मेरा चंचल मन -- http://salilda.com/filmsongs/hindi/honeymoon.as
ये बन्सी क्युं गाये आणि मिला है किसीका झुमका -- http://salilda.com/filmsongs/hindi/parakh.asp
ओ शाम आई रंगो मे रंगी हुई -- http://salilda.com/filmsongs/hindi/jeenaayahaan.asp
तुम कहां ले चले हो -- http://salilda.com/filmsongs/hindi/poonamkiraat.asp
लेखात अजून एक चूक सापडली, ओ शाम आई रंगो मे रंगी हुई हे गाणं 'जीना यहाँ' या चित्रपटातलं आहे.
ललिता आणि मंजिरी - तुम्हाला कसले कसले मोड आणायला/घालवायला आणि वरती माझ्या वयाचा उद्धार करायला फुल्ल स्कोप!
स्मिता, मस्त लेख
स्मिता, मस्त लेख
>>>>त्यांच्या एकेका गाण्यातून
>>>>त्यांच्या एकेका गाण्यातून त्यांची अनोखी शैली उलगडत गेली, दरवेळेस नविन अनूभूती देणारी, आता आपल्याला समजली अस वाटेपर्यंत परत कोड्यात टाकणारी,अचंबीत करणारी,कुठलाही साचेबद्धपणा नसलेली, एखाद्या अवखळ झर्या सारखी प्रवाही.
अगदी अगदी....
सुंदर लेख ! खूप आवडला.
चिमण गुरुजी चूक सुधारलीय,
चिमण गुरुजी चूक सुधारलीय, धन्यवाद !
सद्ध्या मार्क जाऊन ग्रेडेशन पद्धत आल्या मुळे तुम्ही पण पेपर नीट तपासला नाहीयात.
Pages