सदाबहार संगीत कट्यार काळजात घुसली

Submitted by नितीनचंद्र on 17 August, 2010 - 13:13

Katyar1.JPG

बरेचसे चित्रपट नाटके सहजपणे काळाच्या पदद्याआड जातात. साधारण एक वर्षानंतर चित्रपट साफ विसरले जातात. अनेक वर्ष लोकांना आठवतात. लोक पुन्हा आवर्जुन पहातात असे फारच थोडे चित्रपट व नाटके असतात.

चित्रपट पुन्हा पहायला काहीच अडचण नसते. ज्यांना चित्रपटगृहातच जाऊन चित्रपट पहायचे असतात त्यांच्यासाठी सदाबहार चित्रपट पुन्हा पुन्हा येत रहातात. आजकाल सी.डी./डी.व्ही.डी च्या युगाततर हा पर्याय आणखीनच सोपा झालाय.

नाटकाच तस नसत. कलाकारांचा तो संच उभा करण आणि नव्या संचात ते नाटक प्रेक्षकांना आवडण आणि त्याचे प्रयोग चालु रहाण ही एक मोठी परिक्षा असते. खास करुन अकरा पात्रे असलेल्या आणि जवळ जवळ सर्वच गाणारी पात्र असलेल्या कट्यार साठी नाटक पुन्हा उभे करणे ही सर्वात मोठी परिक्षा असते.

मराठी नाटकांमध्ये ही अवघड परिक्षा नटसम्राट या नाटकाने पाच सहा नटसम्राटांच्या साक्षीने ही अवघड परिक्षा पुन्हा पुन्हा पास केली. सुर्याची पिल्ले चे पुनरागमन झाले आहे. पण ही यादी फारशी मोठी नाही.

संगीत नाटकांचे पुनरागमन केवळ या नाटकांवर प्रेम करणार्‍या कलाकारांच्या बरोबर प्रेक्षकांच्याही प्रेमामुळे शक्य झाले आहे. या यादीत मानाचे नामांकन मिळवुन आज पर्यंत माझ्या माहीतीत पाच खा साहेबांच्या साक्षीने संगीत कट्यार काळजात घुसलीचे प्रयोग गेले ३५ वर्षांहुन अधिक काळ होत आहेत.

कै. वसंतराव देशपांडे यांच्या अजरामर खा साहेबांच्या भुमीकेने व त्यांच्या अजोड गायकीने गाजलेले हे नाटक आहे. राजे रजवाडे यांच्या काळातल्या कालखंडातली राजगायक पदाची स्पर्धा. संगीताची घराणी व त्यांच्यातल्या स्पर्धा यांच सुरेख वर्णन या नाटकात आलेल आहे.

या नाटकाचे विषयी लिहीताना लेखक : पुरुषोत्तम दारव्हेकर आणि संगीत : पं. जिंतेद्र अभिषेकी हा उल्लेख अत्यंत आदरपुर्वकच करावा लागेल. पुरुषोत्तम दारव्हेकर, पं जितेद्र अभिषेकी आणि कै. डॉ. वसंतराव यांची प्रमुख भुमिका यांच्या एकत्र येण्यानेच हा सदाबहार, अजरामर नाटक रंगमंचावर आले.

मला माहित असलेल्या पाच जणांनी केलेल्या खासाहेबांच्या भुमिकापैकी चार जणांच्या भुमिका पहाण्याचा मला योग आला.

मला माहित असलेले खा साहेबांची भुमीका केलेले कलाकार खालील प्रमाणे.

१) कै. डॉ.वसंतराव देशपांडे.
२) पं पद्माकर कुलकर्णी.
३) डॉ. रविंद्र घांगुर्डे.
४) चारुदत्त आफळे.
५) राहुल देशपांडे.

कै. डॉ.वसंतरावांच्या अस्तित्वाची उणीव जाणवु न देता बाकीच्या चौघा खासाहेबांच्या भुमीका दमदार झाल्या आहेत होत आहेत.

वरील पैकी राहुल देशपांडे यांची भुमीका पहाण्याचा माझा योग अद्याप नाही आला पण लवकरच हा योग साधण्याचा विचार आहे.

कै. डॉ.वसंतरावांच्या हयातीतच त्यांचे शिष्य पं. पद्माकर कुलकर्णी यांनी नाट्यस्पर्धेसाठी ह्या नाटकात काम करुन मोठ यश संपादन केल होत. पं पद्माकर कुलकर्णी आणि डॉ रविंद्र घांगुर्डे दोघेही चिंचवडचे रहिवासी आहेत.

चिंचवड मध्ये जेव्हा नाट्यगृहच नव्हत अश्या काळात खास चिंचवडकरांकरता जैन शाळेच्या प्रांगणात याचा प्रयोग झाला होता. माझ्या कल्पने प्रमाणे पं पद्माकर कुलकर्णी व डॉ. रविंद्र घांगुर्डे यांनी खुपच कमी प्रयोग केले. त्या मानाने चारुदत्त आफळे यांच्या भरत नाट्य संशोधन मंदीराच्या संचाने खुपच प्रयोग केले आहेत. यावर्षी मध्ये या नाटकाचा अमेरीकेतही प्रयोग झाला.
http://www.youtube.com/watch?v=IZqUCvKKNXE&feature=related

आता तो वारसा कै. डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातु राहुल देशपांडे दमदार पणे चालवतील यात शंकाच नाही.

http://www.youtube.com/watch?v=pnmrhREJ91Y

खासाहेबांच्या भुमीकेसारख्या इतर प्रमुख कलाकारांच्या ही पिढ्या येऊन भुमीका गाजवुन गेल्या. झरीनाच्या भुमीकेत फैय्याज, कविराजांच्या भुमीकेत प्रकाश इनामदार या सारखी नावे लक्षात रहातात.

कट्यारची नाट्यपद, त्यांचे वेगळेपण, त्यात झालेले वेगवेगळे प्रयोग हा एक अभ्यासाचा आणि लेखाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो. माझ्या सारख्या संगीताची जाण नसलेल्याने यावर भाष्य करणे चुक ठरेल.

१) घेई छंद मकरंद दोन वेगळ्या चालीतीले.
२) या भवनातील गीत पुराणे
३) तेजोनिधीलोह गोल
४) दिन गेले भजनाविण सारे
५) सुरत पिया की
६) लागी कलेजवा कटार

ही नाट्यपद प्रेक्षकांच्या मनात वर्षानुवर्ष घर करुन आहेत.

या नाटकाच नेपथ्य प्रकाश योजना सुध्दा दर्जेदार आहे. राजगायकाची हवेली, धर्मशाळा आणी शंकराच मंदीर या ठिकाणी हे नाटक घडत. पुर्वी बहुदा फिरत्या रंगमंचावर आणि आता वेगाने सेट बदलण्याच्या तंत्राने हे बदल सहज घडुन येतात व फ्लॅश बॅक सुध्दा अतिशय सुरेख साधला जात नाटकाची परिणामकता वाढते.

१५ ऑगस्ट २०१० ला हा प्रयोग चारुदत्त आफळेंच्या खासाहेब भुमिकेत प्रथमच पहाण्याची संधी मला मिळाली.

माझ्या कल्पनेप्रमाणे बहुदा वय चाळीस ते ज्यांना जेमतेम प्रेक्षागृहात चालत येऊन तीन तास बसुन हा प्रयोग पहाता येईल असे प्रेक्षक भरत नाट्यगृहात असतील ही माझी कल्पना होती.

प्रत्यक्षात वय पंधरा पासुन मुले -मुली आईवडीलांच्या आग्रहास्तव नाहीतर उत्सुकतेने नाटक पहाताना दिसली. मध्यंतराला ते आपल्या आई वडीलांना पुढे काय होत याबाबत प्रश्न विचारताना दिसत होते.

या नाटकाला स्वतःचा एक वेगळा प्रेक्षक निर्माण झालेला आहे असा माझा समज आहे. बदलत्या काळात सुध्दा तरुणांच्या रुपाने तो मिळतोय यामुळे हे एक सदाबहार आणि अजरामर नाटक आहे यात मात्र शंका नाही.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितिन राव तुम्ही मला एकदम पं.वसंतरावांचीच 'याद' दिलीत. 'याद' त्यांचाच शब्द! अगदी खरंय. कट्यार हे मराठी रंगभूमीला मिळालेलं लेणं आहे. तेथे जनरेशन गॅप हा प्रकार असेल असे वाटत नाही. अजून एक आठवण जागी झाली. शंकराच्या देवळात पं.भार्गवराव आचरेकरांचं गाणं. नेपथ्य सुरेख्,आवाज भरदार हे पद दुसर्‍या कोणाच्या गळ्यात अजूनही फिट्ट बसत नाही. मागील वर्षात पिं.चि. नाट्यग्रूहात रविंद्र कुलकर्णी,अलकनंदा वाडेकर्,पं.घांगुर्डे यांच्या संचात हे पहाण्याचा योग आला.पैकी रविंद्र अप्रतिम्,वाडेकर वयामुळे थकल्या होत्या पण प्रयत्न झकास होता. आशा आहे सुनिल बर्वे ला यश लाभेल आणि मराठी रंगभूमीला पुन्हा एकदा सुवर्णवैभव प्राप्त होइल.

माझ्या कडे कट्यार ची सीडी आहे. त्यात पं. चंद्रकांत लिमये, अमोल बावडेकर, प्रकाश इनामदार इत्यादी कलाकार आहेत. पंडीतजींची भुमिका रघुनंदन पणशीकरांनी केली आहे. एकंदरीत संग्रही ठेवण्याजोगी सीडी आहे.

खरोखर सुरेख आहे नाटक,
वसंतराव देशपांडे नी काम केलेल कट्यार खूप लहान्पणी पाहिलय एकदाच, अगदी शाळेत असताना तेव्हा पासून त्या नाट्यपदांच वेड आहे ते आजतागायत . पद्माकर कुलकर्णी, चारुदत्त आफळे आणी राहुल देशपांडेच ही बघायचा योग आला

कै. डॉ.वसंतरावांच्या अस्तित्वाची उणीव जाणवु न देता बाकीच्या चौघा खासाहेबांच्या भुमीका दमदार झाल्या आहेत होत आहेत.>>> हे मात्र तितकस पटल नाही, अजूनही ही नाट्यपद वसंतरावांच्या तोडीची होतात किंवा होतील (हे माझ मत, कदाचित मी त्यांची जबरद्स्त फॅन असल्यामुळे असेल) अस मला तरी वाटत नाही,
राहुल देशपांडें चा प्रयोग मात्र नक्कीच सरस आहे, त्यांचा आवाज, स्टाईल, वसंतरावांची आठवण करुन देतात

स्मिताजी,

वसंतरावांनी अजरामर केलेली भुमीका करणे यात आधी मोठा तयारीचा भाग आहे. दुसरा धाडसाचा. कै. डॉ.वसंतराव देशपांडे यांना सही सही पर्याय अस होणे अशक्यच. या चारही खासाहेबांनी कै. डॉ.वसंतराव देशपांडे यांची कमतरता जाणवु दिली नाही इतकी यांची तयारी निश्चीतच आहे.

राहूल देशपांडेंचे नाटक २ महिन्यापूर्वी पाहिले.. सध्या रोज जाहीरात पहातो... बघू पुन्हा कधी योग येतो.... आता असलेले नाटक २ अंकी आहे.... पूर्वी ते तीन अंकी -४ तासांचे होते.. त्याची डी वी डी मिळते....

दीनानाथ ला नाटक होते. तेंव्हा त्याच्या बाहेरच स्टॉल होता. तिथे डी वी डी घेतली.... ही डी वी डी , पीसी वर लागत नाही ! Sad त्यामुळे अजुन पाहिली नाही...

पं. जितेंद्र अभिषेकी हे नावही न विसरता येणार्‍या लोकांच्या यादीत हवे...

नितीन, अगदी मस्त वाटलं बघा वाचून. डि.वी.डी मिळाली तर बघायला नक्की आवडेल.

माझ्या कल्पनेप्रमाणे बहुदा वय चाळीस ते ज्यांना जेमतेम प्रेक्षागृहात चालत येऊन तीन तास बसुन हा प्रयोग पहाता येईल असे प्रेक्षक भरत नाट्यगृहात असतील ही माझी कल्पना होती.

प्रत्यक्षात वय पंधरा पासुन मुले -मुली आईवडीलांच्या आग्रहास्तव नाहीतर उत्सुकतेने नाटक पहाताना दिसली. मध्यंतराला ते आपल्या आई वडीलांना पुढे काय होत याबाबत प्रश्न विचारताना दिसत होते.

या नाटकाला स्वतःचा एक वेगळा प्रेक्षक निर्माण झालेला आहे असा माझा समज आहे. बदलत्या काळात सुध्दा तरुणांच्या रुपाने तो मिळतोय यामुळे हे एक सदाबहार आणि अजरामर नाटक आहे यात मात्र शंका नाही.

हे वाचून विशेष आनंद झाला.

- - -

जामोप्या, ते कायसं सॉफ्टवेअर असतं डी.वी.डी. वाचायचं ते इन्स्टॉल करावं लागतं बहुतेक.

व्वा नितीनदा..., काळजालाच हात घातलात कि राव...

मला यातली ....

या भवनातील.... आणि सुरत पिया की ही गाणी प्रचंड आवडतात. धन्यवाद.

जामोप्या, ते कायसं सॉफ्टवेअर असतं डी.वी.डी. वाचायचं ते इन्स्टॉल करावं लागतं बहुतेक.>>>>

संगणकाला जर डिव्हीडी रॉम असेल तर "पॉवर डिव्हीडी" वापरुन बघा, ते चांगलय.

मी दोन वर्षांपुर्वी पाहिला होता प्रयोग चारूदत्त आफळे यांचा...
खुपच उत्तम संच होता, मला अजुन एक कलाकार खुप आवडला संजीव मेहेंदळे.

>>संगणकाला जर डिव्हीडी रॉम असेल तर "पॉवर डिव्हीडी" वापरुन बघा, ते चांगलय.

हो हो, तेच नाव आहे. आठवलं.

अप्रतिम!!!

कट्यार काळजात घुसली, फार लहानपणी.... टीव्हीवर दाखवले होते नाटक... तेव्हाच Happy

एक से एक गाणी.. अजुन सारखी ऐकत असते...

यातल, तेजोनिधी लोहगोल आणि सुरत पिया की.. खास आवडती Happy

धन्यवाद नितीन Happy

देशात आले की डीव्हीडी घेतलीच पाहिजे Happy

पं. अभिषेकी बुवांच्या आवाजातलं "लागी कलेजवां..." माझ्या मोबाईल मधे आहेच. १६ मिनिटांचं गाणं आहे, पण मझा येतो यार ऐकताना! Happy

सर्वांचे आभार, माझ्या मनात एखादा प्रयोग मायबोलीकरांकरता काही जागा राखीव ठेऊन पहाता येईल का ? असे चालले आहे. अर्थात हे पुण्यातल्या प्रयोगाबाबत आहे.

२५ तारखेला बालगंधर्वला 'कट्यार..' चा प्रयोग पाहिला. दोन अंकी नाटक अतिशय नेटकेपणाने सादर केले होते, सगळीच नाट्यपदे या कलाकारांनी ताकदीने सादर केली. सगळ्यांची कामे देखील उत्तम. सेट (नेपथ्य) मस्त होता.

एक शंका या प्रयोगात जुन्या नाटकाप्रमाणे प्रत्यक्ष पदे गायली गेली असतील तर जबरदस्तच किंवा ध्वनीमुद्रित केलेल्या पदांवर सिंक्रो केला असेल तर मग सगळ्याच कलाकारांना सलाम, इतका उत्कृष्ट सिंक्रो केल्याबद्दल.

प्रयोग संपल्यानंतर, पडदा पडला व वसंतरावांनी गायलेले 'लागी कलेजवा कटार' पद लावले गेल्यामुळे जबरदस्त वाटलं. बुवांनी गायलेले "घेई छंद" वगळता बाकीची सगळी नाट्यपदं मी पहिल्यांदा ऐकली Sad .
त्यामुळे मित्राकडून या नाटकाची सगळी पदे घेतलीत व सध्या तीच ऐकत आहे.

अवांतर : या नाटकाची निर्मिती सुबोध भावेची आहे ना?

अप्रतिम नाटक!!! माझ्याकडे पण सीडी आहे याची. कितीही वेळा बघायला आवडेल असं आहे नाटक.

मी हे नाटक रत्नागिरीला असताना, २ दिवसांवर माझी डिप्लोमाची सेकंड यिअर ची फायनल व्हायवा असताना गेले होते!!! Happy

चारुदत्त आफळे, संजीव मेहेंदळे असे कलाकार होते. मी आल्यावर तीच गाणी गुणगुणत होते. परीक्षेत उत्तर म्हणून मी गाणंच म्हणेन की काय अशी काळजी वाटली होती आईला!!