भरदिवसा आज रात झाली .....कवी नारायण सुर्वे यांना श्रद्धांजली

Submitted by झुम्बर on 16 August, 2010 - 01:40

"माणसाच्या मध्यराती हिंडणारा सूर्य मी
माझिया साठी ना माझा पेटण्याचा सोहळा"

असा व्यक्तिमत्व कवी नारायण सुर्वे .....मराठी साहित्य विश्वातल एक आदराच नाव ....कामगारांची भूक पोटात घेऊन आणि आणि त्यांच्यावर होणार्या भांडवलशाहीचा अत्याचार काळजात घेऊन फिरणारा हा माणूस ...लेखणी जितकी तेज तितकाच हृद्य संवेदनशील .... नारायण गंगाराम सुर्वे... एका गरीब गिरणी कामगाराला सापडलेला हा अनाथ मुलगा त्याने आपल नाव देवून सांभाळला ....प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीतही त्यांना ७ वी पर्यंत शिक्षण मिळाले, पुढे कळू लागल्यावर त्यांनीही गिरणी तच काम सुरु केले ...." डबा घेऊन साच्यावर गेलो,घडवतो लोहार हातोध्याने ,तसच घडत गेलो..." असा वर्णन ते स्वतः त्यावेळेच करतात ......
पुढे जगण्यासाठी धडपड करताना अक्षरश: पडेल ते काम केले. कधी हमाली तर कधी शाळेत शिपायाची नोकरी केली. तिथे आणखी शिकून ते प्राथमिक शिक्षकाचे काम करू लागले. एवढ्या कष्टमय वातावरणत वाढूनही या कवीमनाच्या हृदयात फारशी कटूता दिसत नाही. उलट माणसातील माणुसकीवर अपार श्रद्धा ठेवून मानव्याची जोपासना करणारा हा कवी होता .....
मार्क्सवादाचा प्रचंड पघडा होता त्यांच्यावर ...कामगारांच्या भावनेला शब्दरूप मूर्तरूप देण्याच काम त्यांनी केल.....मराठीतील चाकोरीबध्द , वृत्तबद्ध कवितेला त्यांनी चाकोरी बाहेरच नुकत आकाश दाखवलं ......त्यांच्या कळत मराठी कवितेने गरुड भरारी घेतली ..केवळ गोड गाणी आणि वर्नात्मक कविता जाऊन ....धगधगीत वास्तव लोकांपुढे आलं आणि ह्या कवी मुळेच पुढे अनेकांनी ही हे धाडस केल .....
कामगार मी आहे, मी तळपती तलवार, असे म्हणत आपलेच भावविश्र्व ते कवितेतून करारीपणाने मांडतात तर,
माझेही एक स्वप्न होते रे। जे मला पुरे करता आले नाही।
रोजच्या दमगिरीने तेवढी उसंतच दिली नाही, पण पुढचे जग तुझेच आहे... असा पुढच्या पिढीप्रती असणारा आशावादही ते कवितेतून मांडतात.
ऐसा गा मी ब्रह्म (१९६२) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतरच्या माझे विद्यापीठ (१९६६) या संग्रहाने साहित्यविश्र्व खळबळून टाकले. मुंबईसारख्या महानगरीत पोटासाठी पडेल ती कामे करणार्या वेगवेगळ्या स्तरांतील माणसांचे अनुभवविश्र्वच त्यातून त्यांनी उभे केले. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झालेल्या आणि राबता-खपता आयुष्य मेणबत्तीसम विझवून घेणार्या कामगारांचे वास्तव त्यांनी जगासमोर आणले. त्यांच्या मुंबई, तुमचंच नाव लिवा, तेच ते तेच ते, जाहीरनामा, माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय, मर्ढेकर... या आणि अशा अनेक कविता खूप लोकप्रिय ठरल्या. माझे विद्यापीठ ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झाला.
असा हा वलय विरहित काव्यसूर्य ,कुठलेही वलय मागे नसताना आणि परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना स्वतेजाने तळपला .... या काव्यसूर्याला भावपूर्ण श्रद्धांजली ......" अश्रू आणि घाम ज्यांनी मिसळूनी रक्तामधुनी ....
लाख पेले फस्त केले अन स्वतःला मस्त केले
त्या बहकाल्या माणसांची त्या कलंदर भंगडांची
ही नशा आकाश होते सर्जनाचा कोश होते
ही अशी व्यसने ज्यांची ही धरा दासी तयांची ....."

भावपूर्ण आदरांजली ........

गुलमोहर: 

झुम्बर,
खरंय, खरंय. मराठी भाषा, कविता, आणि जाणीवा त्यांच्या आजन्म ऋणी राहतील. त्यांच्या कविता आणि जाणीवा माझ्या सतत सोबत राहतील. फार मोठा माणुस हो.
दु:खाचा बाजार न मांडणारी कविता होती. अस्सल. शब्द न् शब्द वाजवून घ्यावा. नुसताच विद्रोह नव्हता त्याच्यात, आणि नुसताच स्वीकारही. तो टोन फार अलैकिक होता.

खरं सांगायचं तर एखाद्या मोठ्या माणसाच्या निधनाने खूप दिवसांनी व्यक्तिगत दु:ख झाले. Sad

(नारायण गंगाराम सुर्वे नावाची चित्रफीत जरुर संग्रही ठेवा लोकहो. )

.

सुर्व्यांना श्रद्धांजली. Sad

सुर्वे आणि त्याहीपेक्षा त्यांच्या पत्नी ही किती मोठी माणसं होती हे समजून घ्यायचं असेल तर कृपया 'मास्तरांची सावली' हे पुस्तक वाचा.

खरेच खुप मोठा माणुस होता. त्यांची.."भाकरीचा चंद्र......" ऐकताना आजही अंगावर शहारा उभा राहतो.

सुर्वेसाहेबांना मनःपूर्वक आदरांजली Sad

संपलाच नाही,
भाकरीचा मार्ग..
ग्रंथातले स्वर्ग-
कशापायी?!

शब्दांचं झणझणीत अंजन घालत 'माणूस बना' सांगणारा, मराठी कवितेत चंद्राचे जगावेगळे संदर्भ जन्माला घालणारा, व्यथांची आपली कधीच माहिती न झालेली निराळीच दुनिया उलगडून दाखवणारा असा माणूस विरळाच.

surve.jpg

नारायण गंगाराम सुर्वेंना भावपूर्ण श्रद्धांजली.

माणसातील माणुसकीवर अपार श्रद्धा ठेवून मानव्याची जोपासना करणारा हा कवी होता .....
भावपुर्ण श्रध्दांजली .

अत्यंत वाईट वाटले. भाकरीसाठीचा संघर्ष करतांना त्यांनी कवित्व जपले आणि माझे विद्यापीठ उभे राहिले.मी स्वतःला भाग्यवान मानतो की त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कविता मला सांगली येथे १९७४ च्या दरम्यान ऐकायला मिळाल्या आणि त्यांच्याच कवितासंग्रहावर त्यांची स्वाक्षरी पण...
एक महान कवी,तत्ववेत्ता आणि अत्यंत साधा महापुरुष जो कुठल्याही साहित्यिक कंपूशाही मधे अडकला नाही आणि कवित्वाचा बाजार मांडला नाही. ज्ञानपीठ देण्याची सुबुध्दीनेहमीप्रमाणेच सरकारला कधीही झाली नाही की आपल्या राजकारण्यांना त्यांच्यासाठी दिल्लीत भांडायची बुद्धी {?} झाली नाही. हाच या देशाचा घोळ आहे.
माझी त्यांना विनम्र श्रध्दांजली !!

http://www.esakal.com/esakal/20100817/5722432018591541834.htm
ज्या खोलीत त्यांनी कविता लिहील्या त्या खोलीचा फोटो पहा. पुढे काहीच म्हणवत नाही.

सकाळ मधील अग्रलेख आणि पान ८ पहा.
एवढ्या कवितांमधुन ही एकच का सापडली त्यांना. Sad

'किती वाचलेत चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात
इथे सत्य एक अनुभव, बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात

खूप सोयरीक करतों आता ग्रंथांची; वाटते तेही आपणासारखेच बाटगे निघाले
हवे होते थोडे परिचारिकेसम, कामगारासम निर्मितिक्षम, पण दुबळेच निघाले.'