१९९७ साली, १० वी नंतर स. प. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणी आता आपण कॉलेज कुमार झालो या भावनेने पोटामध्ये गुदगुल्या व्हायला लागल्या.
स. प. विद्यालयात दोनच वर्ष होतो मी, पण माझ्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत स. प. महविद्यालयाचा प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष असा फार मोलाचा वाटा आहे.
मी आणि माझा मित्र सुशांत दोघेही मध्यमवर्गीय घरांमधुन. म्हणजे खिशामधे एक बसचा पास आणि ५ किंवा १० रुपये जास्तीत जास्त. दोघेही स. प. कॅंटीनमधे दुपारी डबा खाण्यासाठी जमत असु. पण डबा खाता खाता कँटीनमधे दरवळणारा विविध पदार्थांचा सुवास आम्हाला आशाळभुतासारखा इतरांच्या ताटाकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडायचा. आपणही काहितरी घ्यावे असं खुप वाटायचं... पण ऐपतच नाही तर काय करणार! यावर आम्ही दोघांनी एक उपाय शोधुन काढला. आम्हाला कळलं की तिथे एक वाटी सांबार एक रुपयाला मिळतं. मग काय, रोज आळीपाळीनं मी आणि सुशांत एक वाटी सांबार मागवायचो आणी डब्यातली चपाती त्यात थोडी थोडी बुडवुन दोघे खायचो. काय स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद असायचा त्यात. (तुम्ही हसताय!...पण एक वाटी सांबारकी किमत तुम क्या जानो रमेशबाबू!!!) तसं ते सांबारही तितकंच स्वादिष्ट होतं.. किमान आमच्यासाठी तरी. दोनतीन महिन्यांतून एकदा एक 'बनवडा' घ्यायचो आणि तो दोघांत अर्धाअर्धा खायचो. त्या दिवशी आनंदाने दिवसभर आमची गाडी हवेत असायची.
अजुनही सुशांत, मी आणी आमच्या बायका (बायकोचं अनेकवचन 'बायका'च ना वो?) ते दिवस आठवून खुप हसतो आणी जुन्या आठवणींमध्ये बुडून जातो.
खरे तर स. प. महाविद्यालयाच्या बाहेर असलेलं S.S. Canteen हेच कॉलेज कँटीन नावाला साजेसं होतं. तिथं असलेल्या so called modern ललनांकडे पाहुन आम्ही दोघंही अचंबित व्हायचो. आणी दोघेही त्यांच्या नावाने शंख करायचो. काय करणार्..कोल्ह्याला द्राक्षे आंबट!.. हडपसरचा बस स्टॉप निलायम चौकात असल्याने आम्हाला रोज S. S. समोरुनच जावे लागायचे आणी खिसे चाचपुन कधी कधी गाडी आतमधेही वळायची आमची. त्यावेळी कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त कसं हादडता येईल याचं गणित चालायचं डोक्यात. एकदा हे गणित कायमचंच सोडवलं आम्ही दोघांनी मिळुन. S S मध्ये 'समोसा-पाव' नावाचा प्रकार मिळत असे. त्यासोबत चिंचेची आंबट-गोड चटणी आणि तळलेल्या मिरच्या आपल्या हातानेच घ्यायच्या असा शिरस्ता होता. मग काय, आम्ही भरपुर चटणी ताटात वाढून घ्यायचो आणी पावातून समोसा बाजुला काढुन ठेवून फक्त मिरची आणि पावाबरोबर सगळी चटणी सफाचट करायचो. त्यानंतर मग पुन्हा जाउन चटणी आणायची आणि या वेळी ती मिरची अन समोशाबरोबर खायची!!! तर अशा रितीने एकाच पदार्थाच्या किमतीत दोन पदार्थ खाल्ल्याचे समाधान आम्ही मिळवत असू.
खिशात पैसे नसल्याची कसर आम्ही मनात भरपुर 'समाधान' भरुन घेउन भरुन काढायचो. मागे वळून पहाताना आता वाटतं, स्वतःच स्वतःच्या मनाला समजावनं खुप सोपं होतं तेव्हा. एक वाटी सांबारानं हॉटेलमधे जेवल्याचं समाधान.... भरपुर चटणी-मिरची खाउन पोट भरल्याचं समाधान.... मनातल्या मनात 'एखादी'वर जीव टाकुन प्रेमात पडल्याचं समाधान... कधी मधे J M Road आणि Ferguson Road वर चकरा मारुन आपणही मॉडर्न असल्याचं समाधान.... आणि असंच बरंच काही. मुळात आईवडिलांनी पोटाला चिमटा काढुन आपल्या शिक्षणासाठी केलेली खटपट पाहून आपोआपच जबाबदारीनं आलेलं शहाणपण असावं या समाधानामागं. वडिल दहावी तर आई चौथी पास..पण त्यांनी आपल्या मुलांसाठी पाहीलेलं स्वप्न आणि त्याच्या पूर्ततेसाठी केलेली परिस्थितीशी लढाई हे नेहमीच आम्हा मुलांसाठी प्रेरणादायी होतं. आजही आई जेव्हा "माझी तीनही मुलं 'साप्टेर इंजीनर' आहेत" असं अभिमानानं सांगते तेव्हा, आईवडिलांच्या अपे़क्षांना आपण खरं उतरु शकलो या जाणीवेनं मिळणारं समाधान हे खरंच खुप मोलाचं असतं...'अलौकीक' असतं.
अविकुमार,
अविकुमार, खुप सुंदर उतरलयं!!
इतक्या कठीण परिस्थीतीतुन तुम्ही तिन्ही भावंड इथवर आलत, ह्याबद्दल तुमचं मनःपुर्वक अभिनंदन!! शेवटली ओळ हलवुन गेली आतुन पण समाधानानं!! तुमच्या आईवडीलांच्या लढाईलापण माझा सलाम.
छान! अगदी
छान! अगदी साध सरळ पण मनाला भिडणार लिहिताय तुम्ही.
पुढचे भाग येऊ देत.
अविकुमार
अविकुमार चांगल लिहिताय.
मुळात आपल्या आईवडिलांनी आपल्या पोटाला चिमटा काढुन आपल्या शिक्षणासाठी केलेली खटपट पाहून आपोआपच जबाबदारीनं आलेलं शहाणपण असावं या समाधानामागं. वडिल १० वी तर आई ४ थी पास..>>>>>>>>
हे अगदी सेम टू सेम
अविकुमार,
अविकुमार, मस्तच लिहिले आहे. खरं सांगायचे तर खिशात पैसे नसताना अगदी ५,१० पैसे जमा करून खल्लेल्या वडापावाची चव काय अप्रतीम असायची नाही? आज खिशात पैसे आहेत पण तसल्या चवीचे वडापाव कुठे मिळतच नहीत!
khup sundar ...
khup sundar ...
एकदम
एकदम साध्या सरळ भाषेत छान लिहिलं आहे तुम्हि.
मी स प मधे नसले तरि नु म वि मधे असल्याने एस एस कैंटिनशी बर्याच आठवणी जुळल्या आहेत.
पाव समोसा प्रकार मी फक्त तिथेच शाळेत असताना खाल्ला.
शाळेच्या मागे फिरत फिरत गेल्यावर तिथल्या पदार्थांचा वास यायचा.
अजुनहि आठवतो तो वास.
तुमच्या ललित मुळे मला शाळेचे ते दिवस परत आठवले.
त्याबद्दल धन्यवाद.
आप्रतीम्!छ
आप्रतीम्!छान लिहिले आहे.तुम्चे अभिनन्दन आणि बेस्ट लक!
अवीकुमार.....
अवीकुमार......फार भिडणारं लिहितो आहेस. झालर जरी विनोदाची असली तर डोळ्यात पाणी आलंच .
खुपच छान
खुपच छान लिहिलय
खुप खुप
खुप खुप आवडले.
सगळ्यांचे
सगळ्यांचे धन्यवाद. पण खरंच हे पोस्ट केलं आणि मी दुसर्या कामामध्ये अडकल्याने हे कधी काळी पोस्टलं होतं हेच विसरून गेलो. आज सापडलं
मला सीओईपी
मला सीओईपी च्या दिवसांची आठवण झाली. रविवार संध्याकाळी "पांचाली" त जायची ऐपत नव्हती.
मग काहीतरी "जोशी वडेवाले" कडुन वडापाव घेउन भागवायचो. त्याची चव काही न्यारीच होती.
माझ्या आयुष्यातले सोनेरी दिवस होते ते!
अविकुमार,
मला परत त्या दिवसात घेउन गेल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या मातापित्यांचे आणि तुम्हा भावांचे अभिनंदन!
आपले आईवडील आणि आपले कुटुंब हेच आपले खरे वैभव!
सस्नेह
छान
छान लिहल्या आहेत आठवणी
अविकुमार,
अविकुमार, साध्या सोप्या शब्दात लिहिलय, त्यामुळेच भिडलं. साधे आनंद नाही त्या वयातले?
कधीतरी आणून कित्तीतरी वेळ चोखत चोखत खाल्लेल्या पॅप्सिकोलाची "मजा" आज "डेझर्ट" म्हणत, भरमसाठ पैसे देऊन खाल्लेल्या कसल्याही आईसक्रीममधे नाही. अर्थात त्यातही काहीतरी गंमत आहेच.... ती बहुतेक मला सत्तरी-बित्तरीला आल्यावर, थंड काहीच सोसवेनासं वगैरे झाल्यावर आठवेल
छान आठवणी जाग्या केल्यात.
अवि, ते
अवि, ते दिवस पुन्हा जागवलेस मित्रा. सपचे कँटीन म्हणजे... नॉस्टॅल्जिया ........!!!!
मी COEP ला होतो, पण सेळ मिळाला की सप ला पडिक, कारण ११ वी, १२ वी सप ला झालेली.
पैशाची कायम बोंब असायची, मग आम्ही बाहेरच्या आण्णाच्या गाडीवर तिघात एक आम्लेटपाव हाणायचो. ज्या दिवशी घरुन मनीऑर्डर येइल त्या दिवशी "बादशाही"ला भेट असायची. इतर वेळी सकाळचे जेवण म्हणजे शनिवारवाड्यासमोरचा इडलीवाला झिंदाबाद. तीन रुपयात पोट भरायचे. ही ९२-९३ ची गोष्ट आहे.
ते दिवस खासच होते मित्रा.
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही )
धन्यवाद
धन्यवाद पुन्हा एकदा.
mansmi18, खरंच सोनेरी दिवस होते ते.
दाद, पेप्सिकोला..अगदी अगदी. त्याचबरोबर बर्फाचा गोळाही मिळत असे तेव्हा साखरेचे रंगीत पाणी टाकून. त्या गोळ्यातून तो थंड आणि गोड रस ओठांनी ओढून खाताना लाल आणि बधिर झालेले ओठ...मटका कुल्फी म्हणून मिळणारी एका गोलाचे उभे सहा भाग केलेली कुल्फी... सगळं कसं जसंच्या तसं आठवतं. मन भुतकाळाच्या अशा गोड आठवणीत रमायला लागलं की आवरणं कठीणच होतं ना जरा?
मन वढाय वढाय्...उभ्या पिकातलं ढोर.. किती हाकता हाकता.. फिरी येत पिकावर...
विशाल, खिशाची बादशाही साजरी करण्याचं ठिकाण म्हणजे 'बादशाही'! पण ते काऊंटरवरचे आजोबा (आमच्या तेव्हाच्या भाषेत 'म्हातारा') म्हणजे पुणेरी तर्हेवाइकपणाचा नमुनाच. तेही चांगलेच वाटतात आता!
ती बहुतेक
ती बहुतेक मला सत्तरी-बित्तरीला आल्यावर <<< दाद, अजून तू त्या वयाला आली नाहीयेस ?
मिलिंदाची
मिलिंदाची पोस्ट वाचून मिश्किली... क्या बात कर रहे हो.. अभी तो मैं तुम्हारी बेटी की उमर की हूं!
अवि, फार
अवि, फार मजा आली वाचायला. मी एस्. पी. आणि नु. म. वि. मधे असल्याने अनेक आठवणी दाटुन आल्या.
मस्त
मस्त लिहीलय. मीपण एस.पी.चीच. त्याकाळात एस.एस.चा वडापाव हेच आमचे राष्ट्रीय खाद्य होते.
पुढचा भागपण टाका लवकर
एस्,एस,
एस्,एस, हम्म्म..... खुप वेळा खाल्लय तिथे.आणी नु.म्.वि .च्या दारात काकुंच्या दुकानातला सामोसा,आणी वडा . मला वाटत एस्.एस. यायच्या आधी त्यांच्याकडे गर्दी असायची
काही भाग संपादित करुन
काही भाग संपादित करुन पुनःप्रकाशित!
हे एस. एस. बहूदा १९९२-९३ च्या
हे एस. एस. बहूदा १९९२-९३ च्या सुमारास सुरू झालं. त्यावेळी, समोर दातार क्लास सुट्ल्यावर तिथे वडा-पाव खायला जायचो कधितरी. तिथे 'स्वयं-सेवा' अशी एक सुचना होती. त्याचंच पुढे एस. एस. झालं.