तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

Submitted by ह.बा. on 26 July, 2010 - 04:53

तुझ्याहून मोठा गुन्हेगार आहे
तुला लोकशाही नमस्कार आहे

जरी देश दिसला कफल्लक तुला हा
तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

किती मर्द झिंगून मेले तरीही
बुळ्याचीच बाईल गरवार आहे

कसे लोकसंख्या नियंत्रण करावे
घरी लोड शेडींग... अंधार आहे!!!

अशी टाळते का मला भेटणे ती?
(तिला मी असे काय करणार आहे?)

तिला मारले अन हिचा रेप झाला
तिलाही मलाही भिती फार आहे

कसा माग काढू खर्‍या माणसांचा
कुणाच्या घराचे खुले दार आहे?

-ह. बा.

गुलमोहर: 

कसे लोकसंख्या नियंत्रण करावे
घरी लोड शेडींग... अंधार आहे!!!

Happy

हबाजी पंत आगे बढो..

डॉ.कैलास

कसा माग काढू खर्‍या माणसांचा
कुणाच्या घराचे खुले दार आहे?

चांगला शेर.
शेवटचा शेर वगळता, ही हझल आहे. मस्त वाटली !

एकदम छान गझल!!
सर्वच शेर छान आहेत.
शेवटचा शेर तर खूप आवडला.

एक शंका आहे...

<<अशी टाळते का मला भेटणे ती?
(तिला मी असे काय करणार आहे?)

तिला मारले अन हिचा रेप झाला
तिलाही मलाही भिती फार आहे >> ह्या दोन्ही शेरात "ती" एकच आहे याची जाणिव होते.

कसा माग काढू खर्‍या माणसांचा
कुणाच्या घराचे खुले दार आहे?

खुप सुंदर. Happy

ज्ञानेशजी, मिल्याजी,
गणेशजी, (ती एकच आहे असे वाटते हा एक वेगळा दृष्टीकोण मिळाला. थ्यांक्स)
गंगाधरजी,
आनंदयात्रीजी, (शिकतो आहे)

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.

ज्ञानेशशी सहमत आहे. ही गझल मुशायर्‍यातही सामाजिक / विडंबने या फेरीतच घेतली गेलेली होती.

मी गझल म्हंटले हे कदाचित पूर्ण योग्य नसावे.

धन्यवाद ज्ञानेश!

ही हझल आहे या ज्ञानेशजींच्या मताशी दर्शविलेली सहमती मी मागे घेतो आहे.

ही गझल मुशायर्‍यातही सामाजिक / विडंबने या फेरीतच घेतली गेलेली होती.

बेफिकीरजी आपल्या प्रतिसादानंतर पुनः विचार केला. सामाजिक हा शब्द जास्त योग्य होईल असे वाटते. कोणत्याच दृष्टीकोणातून ही हझल नाही वाटत. मार्गदर्शन अपेक्षीत.

१. मार्गदर्शन मी करू शकत नाही.

२. चित्त यांनी मला पुर्वी सांगीतले होते ते आठवते. ' हझल ' ही ग्राम्य भाषेत किंवा ग्राम्य उल्लेख असलेली (कदाचित अश्लील - हा माझा अंदाज) असते.

३. शेवटचा शेर सोडला तर ही रचना तंत्राने गझल ठरत असली तरी नेमकी गझल नाही व विषय सामाजिक आहे असे माझे मत!

४. (थोडासा विनोद ) - कंसात लिहिणे ही गझललेखनाची एक पायरी आहे की काय असे वाटले. :-))

<<'हझल' ही ग्राम्य भाषेत किंवा ग्राम्य उल्लेख असलेली (कदाचित अश्लील - हा माझा अंदाज) असते.>> माझ्या माहितीप्रमाणे हझल म्हणजे ग़ज़लेचे विडंबन! ग्राम्य भाषा, ग्राम्य / अश्लील उल्लेख हे ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजे that is not a criteria. Happy

बाकी ग़ज़ल चांगलीच आहे ह.बा. (तुमची भाषा मला पटत नसली तरी!)

१. मार्गदर्शन मी करू शकत नाही. >>> आभारी आहे.
२. चित्त यांनी मला पुर्वी सांगीतले होते ते आठवते. 'हझल ' ही ग्राम्य भाषेत किंवा ग्राम्य उल्लेख असलेली (कदाचित अश्लील - हा माझा अंदाज) असते.
ग्राम्य या शब्दाची फोड आणि ती संकल्पना तुम्ही स्पष्ट करणार नाही हे मला माहिती आहेच. हे चित्तजींच मत असो वा तुमचं मी नम्रपणे नमूद करू इच्छीतो की ते अत्यंत बकवास आहे. हझल की गझल हे निर्माण होणार्‍या मूड वर/आशयावर ठरत असावे. भाषा ग्राम्य की शहरी यावर नाही.

३. विषय सामाजिक आहे असे माझे मत! >> आणि तो मी कुठेही हसवण्यासाठी मांडलेला नाही. म्हणुनच ती हझल नाही असे म्हणतोय. धन्यवाद!

धन्यवाद!

बाकी ग़ज़ल चांगलीच आहे ह.बा. (तुमची भाषा मला पटत नसली तरी!) >>> ती आजवर बर्‍याच जणांना पटली नाही. पण त्या यादित तुम्ही कसे आलात समजले नाही. असो धन्यवाद!

ग्राम्य भाषेत एखादी गझल माहीत असल्यास कृपया नमूद व्हावी. मी वाचलेली नाही. माझी नम्र अट एवढीच आहे की गझल असावी व दुसरी नम्र अट अशी आहे की मी म्हणत आहे म्हणून ती खास नव्याने रचून सादर होऊ नये, आधीच अस्तित्वात असावी.

सत्वर पाव गे मला ।
(भवानी आई) रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥

सासरा माझा गावी गेला ।
तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥

सासू माझी जाच करिते ।
लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥

जाऊ माझी फडफड बोलति ।
बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥

नणंदेचे पोर किरकिर करिते ।
खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥

थोडी मजा Happy

ग्रामिण महाराष्ट्राला गझल हा काव्यप्रकार माहिती होऊन किती दिवस झाले असावेत? किती ग्रामिण साहित्यीक कविंनी गझल हा साहित्य प्रकार हाताळला असावा? मराठी साहित्यात गझल हा काव्यप्रकार येताना त्याची सुरूवात कोणत्या (शहरी/ग्राम्य) भाषेत झाली? या सगळ्याचा परिणाम म्हणून कदाचित अशी गझल असेलही किंवा नसेलही पण म्हणून ग्रामिण भाषेतली वृत्तबध्द रचना म्हणजे हझल ठरणार नाही.

माझी नम्र अट एवढीच आहे की गझल असावी व दुसरी नम्र अट अशी आहे की मी म्हणत आहे म्हणून ती खास नव्याने रचून सादर होऊ नये,>>> कुणालातरी किंवा मला पण ती नव्याने रचाविच लागेल बेफिकीरजी. फार थोडा प्रवास केलाय मराठी गझलेने आणि त्यातही तीला भाषाभेदाचे अडथळे अडवू लागलेत. आपल्या अटी पाळायला कोणी बंधिल नाही. ज्या साहित्य प्रकारात आपण लिहीतो त्याचा संगोपांग विचार करूनच चर्चा करावी. लहान मुलासारखं हेच करून दाखवं.... तेच म्हणून दाखव अशा चर्चेतून मी तुमच्याक्डून काय शिकणार?

चांगल्या गझलेच्या विडंबनास '' हजल '' म्हणतात या शरद यांच्या मताशी बराचसा सहमत.... पण केवळ तोच एक निकष नाही....... हास्य गझल...... म्हणजे कवितेत जशी '' वात्रटिका असते.... तशी गझलेत ''हजल'' असते....... ती सामाजिक सुद्धा असू शकेल.... म्हणजे,महागाईवरील्,तरुणाईवरील्,क्रिकेटवीरांच्या सुमार कामगिरीवरील्,किंवा असंच काहिसं.....

तुझ्याहून मोठा गुन्हेगार आहे
तुला लोकशाही नमस्कार आहे

जरी देश दिसला कफल्लक तुला हा
तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

या दोन शेरांत मला तरी हजलेचे.... किंवा हजलीश मटेरियल आढळले नाही....

किती मर्द झिंगून मेले तरीही
बुळ्याचीच बाईल गरवार आहे

कसे लोकसंख्या नियंत्रण करावे
घरी लोड शेडींग... अंधार आहे!!!

हे दोन शेर निर्विवाद हजलेचे आहेत......

ग्राम्य... यावर मी जास्त भाष्य करु इच्छीत नाही..... पण माझ्या एका गझलेचा नुसता मतला वाचून एक जाणकार मला म्हणाले की ही '' हजल'' आहे. मतला आहे..

आपले गाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे,ते चुना लावून गेले

''चुना लावून जाणे'' हे रुपक '' ग्राम्य'' आहे असे ते म्हणाले आणि त्यामुळे आपण तीस हजल म्हटले असेही ते म्हणाले......

मी त्यात असा बदल केला.....

तेच रडगाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे,ते मला फसवून गेले

तर हा शेर हजलेतला निश्चित नाही असे ते म्हणाले.....

यास्तव मी असा निष्कर्श काढला की एखादा अर्थ्/संदेश ग्राम्य वाक्प्रचार वापरून पोचवला तर त्या हजलीश रूप प्राप्त होते.

असो...

डॉ.कैलास

'हझल ' ही ग्राम्य भाषेत किंवा ग्राम्य उल्लेख असलेली (कदाचित अश्लील - हा माझा अंदाज) असते.

वरच्या ओळीत आणि

एखादा अर्थ्/संदेश ग्राम्य वाक्प्रचार वापरून पोचवला तर त्या हजलीश रूप प्राप्त होते.

या दोन ओळीत खूप महत्वाचा फरक आहे. तेवढा आपण सर्वच गझलकारांनी लक्षात ठेवायला हवा एवढीच इच्छा.

१. गझलेचे विडंबन म्हणजे हझल नव्हे.

२. ह. बा. - बालीश पळवाटा खूप झाल्या. आता जरा गंभीर बोलू. आपल्या गझलेची शक्ती व आपल्या मर्दुमकीच्या प्रतिसादांची शक्ती यात भलतीच तफावत आहे. गझल या विषयाचा माझा अभ्यास अतिशय कमी आहे. (लगेच हे वाक्य कॉपी पेस्ट करून 'हे मला माहीतच आहे' असे उर्मटपणे लिहू नयेत.) कित्येक लोक अवतीभवती असे आहेत ज्यांनी गेले कित्येक वर्षे गझल अभ्यासली आहे, लिहीली आहे. मात्र मी हे निश्चीत सांगू शकतो की आपण प्रथम 'आहे त्याहून चांगली' गझल रचण्याकडे लक्ष देणे इष्ट ठरावे. प्रतिसादांमधील मारामारी सगळ्यांनाच करता येते. लोक ते करत बसत नाहीत. कारण त्याचा कंटाळा येतो व वैताग येतो. आपली वरील रचना (शेवटचा शेर वगळता) ही तंत्रात बसवलेली व काहीशी काँट्रॅस्टमधे अडकलेली रचना आहे.

३. आपल्याला एका ज्येष्ठ जाणकारांनी हेही सांगीतलेले मी वाचले आहे की 'आपण प्रतिसादांमधे अधिक अडकत आहात'. त्यावर आपण 'मी तटस्थपणे वागू शकलो तर वागेन व ऑम्लेट्स' असला काहीतरी प्रतिसाद दिलेला होतात. (दोन स्थळांचा विषय मिक्स करण्यामधे एक हेतू आहे.) आपली गझल अजून बाल्यावस्थेत आहे. तोवरच आपण मुरारबाजीने तलवार चालवावी असे प्रतिसाद देत सुटला आहात. चित्त यांनी मला जे सांगीतले ते मी वर लिहिले. त्याला 'बकवास' असे संबोधण्याइतका आपला अभ्यास आपल्या गझलेत मला अजिबात दिसत नाही. तेव्हा अती उत्साहात वाटेल ते लिहू नका. बाकी तुमचे भले तुम्हाला!

४. मी नुसता तखल्लुसपुरता 'बेफिकीर' नाही याचा अनुभव अनेकानी घेतलेला आहे. हे इथे नोंदण्याचे कारण म्हणजे मला असल्या चर्चा, घटना यातून नवीन स्फुरते. ते जरा प्रॉब्लेमॅटिक असते इतकेच!

-'बेफिकीर'!

प्रतिसादात कोण अडकले आहे.... अभ्यास कुणाचा किती.... गझल कुणाची किती चांगली... हे आजवर बर्‍याच वेळा आपण बोललो आहे व वरील चर्चेतूनही दिसून येईलच.

मला असल्या चर्चा, घटना यातून नवीन स्फुरते. ते जरा प्रॉब्लेमॅटिक असते इतकेच!
>>> कशानेतरी तुम्हाला काहीतरी सुचते आहे हेच फार झाले. यासाठीच आपण वाह्यात मते नोंदवून नव्या गझलकारांना भांडावून सोडता हे आज कळले.

मी आजवर असे समजत आलो होतो की आदरनिय भट साहेबांनी जी (मराठी)गझलेची बाराखडी लिहून ठेवलीय त्यानुरुप रचना केली की ती गझल असते.
त्यापुढेही काही गझलेचे अलिखित नियम आहेत हे मला आतापर्यंत ठाऊकच नव्हते.
ग्राम्य भाषा किंवा सामाजीक आशय आहे म्हणुन ती गझल न ठरता हझल ठरते हे मला सुमारे २० गझला लिहून झाल्यानंतर माहीत झाले.
त्यामुळे मी आजवर गझलेच्या नावाने सामाजीक आशय घेऊन लिखान केलेय ते गझल स्वरूपाचेच नसावे अशी मला आता दाट शंका आहे.
यानंतर पुन्हा मी शे-पाचशे गझला लीहिन आणि सगळं लिहून झाले की कोणितरी नविनच क्रायरेटेरीया माझ्या गझलांना लावून म्हणेल की या गझलाच नाहीत.... सगळ्या गझला एका झटक्यात कचर्‍याच्या टोपलीत.

या निमित्ताने मी त्या सर्वांना-ज्यांना असे वाटते की गझलेतले त्यांना बरेच काही कळते- त्या सर्वांनी सामुहिकपणे गझलेची एक नविन नियमावली तयार करावी.
म्हणजे माझ्यासारख्या नवशिक्यांना त्यानुरूप रचना करता येईल.

आणि

हत्ती म्हणजे
कोणि म्हणे खांबासारिखा, कोणि म्हणे सुपासारिखा

या प्रकाराला पुर्णविराम बसेल. Happy

गंगाधर मुटे,

आपल्याला आपल्या स्वतःच्या रचनांबद्दल काय वाटावे यावर निदान माझे नियंत्रण नाही.

भटसाहेबांची बाराखडी फक्त तंत्र समजावते. गझलेचा आशय 'कसा / काय' असावा याबाबत त्यात (किमान 'फारसे किंवा हेतूपुरस्पर') भाष्य नाही.
,
एका विशिष्ट चौकटीबाहेरच्या रचनांना समाजाने 'गझल' म्हणून स्वीकारूच नये हे सांगण्याचे काम बाराखडीने केलेले आहे.

बाकी - त्यांचे 'बाराखडी' सोडून इतर लेख वाचलेत तर निश्चीतच आपल्याला 'खरी गझल म्हणजे काय' हे लक्षात येईल. ते लेख त्यांच्या नावाने असलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ह.बा. - भंडावून जायचे कारण नाही, सध्या करता त्याहून अधिक चांगली गझल रचण्यावर लक्ष नियंत्रीत केल्यास प्रतिसादांची काळजी वाटणार नाही.

(अवांतर - मला खरोखरच या चर्चेतून काहीतरी सूचले, पण ते तुमच्यासाठी 'हानीकारक' नाही हे विशेष! ते मी प्रकाशीत करत आहे.)

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी,

सर्वांनी सामुहिकपणे गझलेची एक नविन नियमावली तयार करावी.

या मुद्द्याला तुम्ही स्पर्श देखिल केलेला नाही. त्यामुळे माझा हा मुद्दा अजुनही पेंडीग आहे.

आदरनिय ज्ञानेशजींना फक्त नाउमेद करणारे किंवा अनुल्लेख करणे एवढेच जमते काय?
त्याऐवजी ही गझल नसून हझलच का आहे, याचे स्पष्टीकरण देणे जास्त इष्ट नाही का?
मुद्दा त्यांनीच उपस्थित केला तर हझलेची व्याख्या काय हे सांगणे त्यांचीच नैतीक जबाबदारी नाही का?

इतर लोकही गझलेचे तंत्र शिकलेत तर ते नको आहे का?

..........................................................................

सुरेश भटांनी बाराखडी लीहिली नसती तर काय झाले असते, याची कल्पना करणेही कठीण आहे.

Pages