सदस्य प्रवेश |
परमेश्वरी - एक अविस्मरणीय मैफिलशनिवार सकाळची नवाची प्रसन्न वेळ. आम्हाला नम्रपणे नकार देत, आपापली आयुधं म्हणजे सतार आणि स्वरमंडल आपणच घेऊन हे दोन कलाकार म्हणायचे ते दोन तरूण आमच्या गाडीत बसले. अगदीच जुजबी बोलणं होता होताच आम्ही ज्यांच्या घरी कार्यक्रम ठरवला होता, तिथे पोचलोही. एक अर्ध्या तासात कार्यक्रम सुरू होणार. आम्ही आतल्या खोलीत वाद्य जुळवायला बसलो. स्वरमंडल आणि सतार लावून होईपर्यंत तो राग परमेश्वरी आहे हे म्या पामराच्या ध्यानी आलं.. माझा हा एक अत्यंत आवडता सकाळचा राग. मी तबला लावला. कार्यक्रम जरी सिडनीत असला तरी समोरचे ऐकणारे हे सिडनीतले शास्त्रीय संगीताचे गायक-वादक आणि दर्दी आहेत ह्याची कल्पना मी देबप्रिया(गायक) आणि समन्वय (सतारवादक) दोघांनाही आधीच दिली होती.... थोडक्यात काय तर कार्यक्रम ’गर्दी’ साठी नसून दर्दींसाठी आहे.... असा ’सोंदेश’ द्यायचा प्रयत्नं केला होता. बरोबर दहा वाजता, जमलेल्या सगळ्यांचं मनापासून हसत स्वागत करीत देबप्रियाने राग परमेश्वरीने सुरूवात करीत असल्याचे सांगून स्वरमण्डल छेडलं सुद्धा.... स्वत:ची ओळख नाही, कुठे कुठे कार्यक्रम झालेत, दौरे झालेत, सभा गाजवल्यात... काही काही नाही.... एक निखळ निकोप..... निव्वळ ’सा’. त्या षड्जाला नुस्ताच आवाज नव्हता तर एक गाभार्यातून आल्यासारखा ’घुमारा’ होता. त्याचा स्वर संपता संपता, समन्वयने मिंडने ’सा’ लावला... निषाद आणि तिथून मिंड घेऊन षड्जं.... अगदी सहज. सुंदर सुरात लावलेलं वाद्यं काय करू शकतं त्याचं उत्तम उदाहरण! दोन्ही स्वरांच्या वेळी तरफेच्या तारा स्वत:हून झणकारल्या.
आता सुरू झाला आलाप. संथ लयीत, ’तब्येतीत’ म्हणतात ना, तसं. कधी एकमेकांना खुलवत, प्रोत्साहन देत तर कधी हुलकावणी देत, चिडवत... गळा आणि सतार एका रागाचं अतिशय सुंदर मूर्तं उभी करीत होते. आलाप हा रागाबद्दलचा कलाकाराचा मूळ विचार स्पष्टं करण्याचा प्रदेश.... मूर्तीच्या भाषेत सांगायचं तर आलापीत रागाची मूर्ती ही एखाद्या मान खाली घालून कटी घट घेऊन निघाल्या स्त्रीची आहे की, हाती आयुध घेऊन आवेशाने निघाल्या योद्ध्याची आहे हे ध्यानी येतच पण... आलापीची कलाकुसर अशी की, त्या स्त्रीचं मान खाली घालून उभं रहाणं, कदाचित घुंघट ओढलेला, आपल्यातच संकोचून घेतलेले अवयव.... हे ही सारं दृश्यमान व्हावं. आलापीचा प्रदेश हा स्वर लावण्याच्या संयमाचा... होय! संयमाचा! संयम अशासाठी की, आलापीत "लय मात्रांना" जागा नाही. शुद्ध स्वरानंद. वेगवेगळ्या प्रकारांनी स्वर आणि स्वर-समुह ह्यांच्या सागरात मुक्तपणे लहरत निर्माण केलेल्या लाटा. मुक्तं पण स्वैर नाही.... म्हणजे काय तर इथे मूर्तं घडविणे आहे.... पण एकदा हात, एकदा पायाचं बोट... मग भुवई असलं विस्कळीत बांधकाम नाही... रागाच्या आरोहाची म्हणजे चढणीची अन अवरोहाची म्हणजे उतरणीची बंधनं आहेत.... स्वरांचा त्या क्रमाने लगाव अपेक्षित आहे...
आलापी ही खास करून गायकीची गल्ली. सतारवादक, जे गायकी ढंगाने वाजवतात तेच ह्या रस्त्याने जाऊ धजावेत. देबप्रियाने गळ्याच्या वाटे शोधल्या गल्ल्यांमधूनही सतारीला गायकी अंगाने मुरकत समन्वय फिरवत तर होताच पण जमेल तिथे आपल्या स्वत:च्या नागमोड्या पायवाटा रेखून देबप्रियाला चकवाही देत होता. कधी देबप्रियाने सरळ लावलेला स्वर, समन्वय मिंडने खेचून दाखवत होता तर कधी समन्वयच्या सतारीने शोधलेली अवघड जागा अजून अवघड करून देबप्रिया गळ्यावरची हुकुमत दाखवत होता. समन्वयने वरच्या सप्तकात लावलेले स्वर खालच्या सप्तकात आपल्या निकोप स्वरात देबप्रियाने दाखवणं आणि देबप्रियाचे स्वर लगाव तशाच पद्धतीने पण वेगळ्या सप्तकात समन्वयच्या सतारीने बोलणे....
जवळ जवळ पन्नास मिनिटं नुस्ती आलापी झाली. त्यानंतर सुरू झाला ’जोड’ म्हणजे लयीचा अविष्कार. पण तबल्याची साथ न घेता. ह्यात दिसून येते त्या त्या घराण्याची राग विस्तार, राग मांडणी, विशिष्टं पद्धतीने लयीशी खेळणं. अजून शब्दांचं अवतरण झालेलं नाही. मूर्तीच्या हर एक भागाची चढ, उतरण, गोलाई, कोपरे, कंगोरे.... ह्यावरचं कुसरीचं काम. हा खास करून वादकांचा मोहल्ला. सतारीचं मिंडकाम इथे नुस्तं स्तंभित होऊन बघत रहायचं. कधी कधी समन्वयची सतार एका एका स्वराचा मोती गुंफित होती तर कधी अनेक सुरांच्या पागोळ्यांचा लयीत झिरमिळणारा पडदा.... एखादं वाद्य एखाद्या कलाकाराच्या शरीराचाच एक भाग बनतं म्हणजे काय... तर वाद्यं आणि कलाकार हे ’एक’ होऊन वाजतात... सतारीच्या तारांतून निघणारी मिंड आधी समन्वयच्या बाहूतून निघताना दिसत होती.... सतार समन्वयचा गळा झाली होती!
ह्या दोघांचं ह्या लयीच्या साम्राज्यात एकमेकांना द्वंद्वासाठी आव्हान नव्हतं... अहं! अनेकानेक फुलांनी बहरल्या एखाद्या विस्तीर्ण पठारावर हुंदडणाया अवखळ दोन मित्रांसारखं..... अरे हे बघ.... अरे ते बघ... हात धरून ओढून ओढून नेऊन कवतिक एकमेकांना दाखवणं, कधी थांबून गुढग्यांवर बसत एखाद्या सुंदर फुलाला जवळून निरखणं तर कधी हातात हात गुंफुन नुस्तं सैराट पळत सुटणं.... जवळ जवळ अर्धा तास जोड वाजवून जेव्हा ते थांबले.... तेव्हा स्तिमित झालेल्या समोरच्यांना भानावर यायलाही थोडा वेळ लागला.... मध्य लयीत तीन तालात एक सुंदर बंदिश सुरू झाली ती ही ह्या दोघांनी बांधलेली. शब्दांच्या साम्राज्यात शब्दांचे अर्थं सतारीवर नुस्तं स्वरात उकलून दाखवणं... सतार बोलते म्हणजे काय ते प्रत्यक्ष पाहिलं.
हे सारं दाखवणं अन ते ही कशा संयमात... स्वर, ताल, राग, शब्दं ह्यांची बांधिलकी न सोडता. गाणारा गळ्याच्या सीमा ओलांडू बघतोय पण गायकीची बूज राखून तर सतारिया सतारीच्या.... पण वादनाचे किनारे न ओलांडता... स्वातंत्र्य आहे पण स्वैराचार नाही. बंदिश गायकीची आणि वादनाची सगळी सगळी अंग खुलवली दोघांनी मिळून... कधी एकमेकांना पूरक होत तर कधी चेतावत.
ह्यानंतर त्या दोघांनी चार वेळा लय वाढवली.... सतारीचं एक ठीकय. पण गायकी ह्या लयींमध्ये ऐकायला मिळत नाही. ह्या लयीत देबप्रियाने गायलेल्या स्वरतानांसाठी शब्दं नाहीत. म्हणजे 'सा रे ग म' असे स्वर वापरून घेतलेल्या ताना. त्याही सतारीच्या अंगाने! केवळ अप्रतिम. अन, देबप्रियाने सुरू केलेलाच लयीचा बाज उचलून समन्वयने दाखवलेल्या हरकती.... त्याला तोड नाही. ह्या दोघांचं एकमेकांच्या विचारांत विचार करणं, हे ऐकायलाच हवं बघायलाच हवं.
ह्या दोघांनी, अवघ्या पंचविसाव्या वर्षी मिळवलेल्या ह्या हुकुमतीला माझा सलाम! बाबांनो, असेच आणि अजूनही करीत रहाण्यासाठी जे काही हवं ते सारं सारं तुमच्यासाठी उपलब्धं होवो... हे एकच एक मनात येत राहिलं. जवळ जवळ दीड-पावणे दोन तासांनी त्यांनी एक राग संपवला तेव्हा समोरच्यांना टाळ्या वाजवायचही भान राहिलं नाही. कशातरी दोन-पाच जणांनी टाळ्या वाजवल्या... तेव्हा इतर भानावर आले... आणि मग वाजली ती अशी टाळी वाजली.... ******************************************************** त्यानंतर जवळ जवळ तासभर भीमपलासी आणि एक होरी-ठुमरी सादर करून मगच थांबले हे पठ्ठे. अजून एक गोष्टं आवर्जून सांगायची म्हणजे, कुणीतरी त्यांना त्यांच्याबद्दल "काही सांगा" असा आग्रह केला.... तेव्हा "सांगितलं की इतका वेळ" असं म्हणाले. आजच्या कार्यक्रमात काही उत्तम हातून घडलं असल्यास, ती गुरुंची कृपा आणि चुका झाल्यात त्या आमच्या... बाकी माहिती वेबसाईटवर वगैरे मिळेलच.... असलं! हा कार्यक्रम घडायला काही तशीच खास माणसं, ठिकाणं, घटना कारणीभूत आहेत. त्याची कथा ही अशी - एका बुधवारी संध्याकाळी, घरचं सगळं आवरून नुक्ती टीव्ही नावाच्या बिनडोक खोक्यासमोर त्याहीपेक्षा "खोकं" झालेलं डोकं घेऊन बसले आणि फोन वाजला.... थोडा आनंदच झाला. "आप आईये कल.... हा तबला लेके ही तो बुला रहे है।...कोलकातासे है। हा। जुगलबंदी. सितार और गायन....", इथेच कुठेतरी मनात नकारघंटा वाजायला लागली होती. सतार कितीही गायकी अंगाने वाजवली तरी.... गायनाबरोबर नको वाटतं. किंबहुना ह्या दोन गोष्टी कितीही स्वतंत्रपणे छान वाटल्या तरी जुगलबंदीत अगदीच "चढा-ओढ" वाटते. एकाच जेवणात श्रीखंड आणि पुरणपोळी ठेवल्यावर मला जितका राग येतो तितकाच. पण निमंत्रण करणारे वेदांत केंद्राचे सिडनीतले स्वामीजी आहेत. त्यांचा मान राखायला हवा, जायल हवं. मला स्वत:ला नं, असं 'देखल्या देवा दंडवत' एकवेळ देवाला घालायला चालतं पण "ऐकण्याशी प्रतारणा"?.... ती क्लेशदायी असते. असो.... गुरूवारी कामावरून तडक आश्रमातच पोचलो. अजून एक असेच ऐकणारे मित्रवर्य होते बरोबर. जाताना डोक्यात अठ्ठावन्न तरी प्रश्नं- कसे असतील कलाकार, नावं एकलेली नाहीत, शिवाय आज वीकडे, उद्याचं कसं, काय काय, परत घरी कधी पोचणार आता.... हे आणि असले अनेक ऐहिक प्रश्नं शिरावर घेऊन निघालो होतो.... ह्यासारखे प्रश्नं किती निरर्थक असतात ते उत्तरं मिळाल्यावरच कळतं हा विनोदाचा भाग झाला. ह्या आश्रमाची जागा भर सिडनीत अशा ठिकाणी आहे, की आवारात पाऊल ठेवताच एकेक आवरणं गळून पडायला लागतात. रामकृष्णांच्या देवायतनापाशी जाईपर्यंत, तिथल्या झाडीने, आतून येणार्या उदबत्तीच्या सुवासाने, कधी नाम-जपाने आपला कब्जा केलेला असतो..... नुसता नमस्कार करे करे पर्यंत आपण तिथले झालेले असतो. तिथे हे दोन "कलाकार" म्हणायचे ते..... चांगल्या शब्दांत ’तरूण’ आणि माझ्या भाषेत सांगायचं झालं तर अजून जमिनीतून पूर्णपणे न उगवलेली वीसा अधिक जास्तीत जास्तं पाच.... वर्षांची कोवळी रोपटी.... बसले होते. नमस्कार-चमत्कार झाले.... त्यानंतर त्यांनी ’सेवा’ म्हणून गायला-वाजवलेला आणि आम्ही अनुभवलेला चमत्कार आमच्या इतर दर्दी मित्र-मंडळींना ऐकवला नाही तर तेव्हढ्या पापासाठी अजून काही जन्मं परत परत यावं लागेल.... हे इतकं पटलं की दोन दिवसात शनीवार सकाळची ही घरगुती मैफिल जमवली.... (त्यांना चालेल पेक्षा इतक्या थोड्या अवधीत चांगला तबलावादक/दिका मिळण्याची शक्यता नाही म्हणता तबला मीच वाजवला झालं.... तेव्ह्ढं एक वळतं करून घेतलं बुवा त्यांनी) मैफिलीत काय घडलं.... ते पुढलं तुम्हाला आता माहीतच आहे. आणि इतका समृद्ध अनुभव तुम्हाला कथला नाही तर अजून एक दीडतरी जन्मं परत.... म्हणून हा लेख-प्रपंच! हे गुणी कलाकार लंडनच्या दौर्यावर लवकरच जाणार असल्याचं त्यांच्या बोलण्यात ऐकल्याचं आठवतय.... कुणा कानसेनांना माहीती हवी असल्यास कळवा.... विचारून नक्की सांगेन... (या लेखातला पुष्कळसा भाग श्रवणीय असून लेखाचा पूर्ण आस्वाद घेण्यासाठी आपल्या संगणकावर MP३ प्रकारचे कार्यक्रम ऐकण्याची सुविधा आवश्यक आहे. ही सुविधा सध्या फक्त IE न्याहाळकात चालत असून Firefox किंवा इतर न्याहाळकात दिसणार नाही. तसेच तुमच्या IE settings मधे Activx control वापरायला परवानगी द्या) |