अरे संसार संसार : १. भांडा सौख्यभरे!

Submitted by dreamgirl on 16 July, 2010 - 09:00

नवरा-बायकोचं नातं हे तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना असंच असतं... प्रत्येक नवर्‍याला बायको म्हणजे असून अडचण नसून खोळंबा वाटते. कधी आंबटगोड भांडणे, कधी विरह, कधी लाघववेळा... या नात्याचे असंख्य पदर... काही मला अनुभवायला मिळाले... तुमच्यासोबत शेअर करते *(अर्थात नवर्‍याची संमती घेऊनच Happy )

मी हा लेख सुमारे वर्षभरापूर्वी लिहीला होता. अशाच आशयाचा एक लेख माबोवर होता.. म्हणून टाकला नव्हता. (तसंही तेव्हा माबोवर काही लिहीत नव्हते प्रतिसादांव्यतिरिक्त) तरी धाडस करतेय. लेखमालिका करायचा विचार वगैरे नाही केलाय अजून. पण करावी लागेल असं दिसतंय एकंदरीत... कारण नवरा बायकोचं नातं सात जन्मांचं! एका लेखात संपणारं थोडंच असतं? सध्या भांडणापासून सुरूवात... कारण घरोघरी...

अरे संसार संसार : १. भांडा सौख्यभरे!

"हे असं किती दिवस चालू राहणार आहे?"तो करवादला पण पुन्हा लगेच टप्पोर्‍या काळ्याभोर पाणीदार डोळ्यांमध्ये गाईचे करूण भाव उतरले. "का असं वागतेस राणू? कधीतरी सांग ना गं मनातलं... तुझ्या अशा गप्प बसण्याने मला किती त्रास होतो माहीतेय नं?"

मी क्षणभर अशा व्याकूळ डोळ्यांकडे बघीतलं. त्या आरस्पानी निरागस डोळ्यांतले प्रामाणिक व्याकूळ भाव मलाही अस्वस्थ करतात. क्षणभर वाटलं की त्याला अस्सं कुशीत ओढून घ्यावं आणि केसांतून अलगद हात फिरवत लहान बाळाप्रमाणे थोपटत राहावं_! पण - क्षणभरच! या नाटकीपणाने पुरूष बायकांना हातोहात फसवतात. त्यांना 'बायको' या प्राण्याची कमजोर नस बरोब्बर सापडलेली असते. डोळ्यांत थोड्डसं पाणी आणून नाकाने सुईंग सुईंग आवाज करत चेहर्‍यावर बापुडवाणे भाव पांघरले की बायका कशा लोण्यासारख्या वितळतात.

चेहरा जमेल तितका निर्विकार ठेऊन "मला अज्जिबात वेळ नाही तुझ्याकडे बघायलासुद्धा! असं एक एक शब्द रागामध्ये खमंग घोळून चावत चावत ठणकावून त्याला सांगितलं आणि हातातला चहाचा कप आणि बिस्कीटांची डिश टेबलावर आपटून स्वयंपाकघरात वळले.

नवर्‍याबरोबरच माझ्या हातातली भांडीही निमुटपणे माझा राग सहन करत होती. (मी भांड्यांची आदळआपट करत होते आणि नवरोजी मात्र मी दिलेला कमी साखरेचा चहा चकार शब्द न काढता निमुटपणे ढोसत होते. "यात साखर अंमळ कमीच झालेय" या वाक्याच्या हवनाने आमचा क्रोधहोम कसा धडधडतो याचा पूर्वेतिहास त्यास ज्ञात होताच.)

हल्ली अधूनमधून हे असंच होतं बर्‍याचदा. मी तरी काय करणार बरं? रात्रीचं सगळं आवरून झोपायला नेहमीच साडेअकरा बारा होतात. त्यापुढे मग माझा नवरा लाडात येतो-'केसांतून हातच फिरव गं, पायच दुखतायत गं, डोकंच चेपून दे गं...' थोडे दिवस केलं सगळं कौतुकाने, पण रोजरोजच काय? मीपण दमूनथकून येते. आल्यावर जेवणखावण, स्वयंपाक - घरातील आटपाआटपी (हल्ली बर्‍याचवेळेस आपटाआपटी चालायची ती वेगळी गोष्ट!) करेपर्यंत अंग नुसतं मोडून जायचं.

सक्काळी भल्यापहाटे साडेपाचला (!) मोबाईलचा गजर ठणाणा (हो! ठणाणाच! पाच-साडेपाच तासांच्या एवढ्याशा साखरझोपेतून निर्दयीपणे उठवणारा आवाज कितीही किणकिणणारा नाजूक असला तरी तो ठ्णाणाच वाटतो, विचारा तमाम स्त्रीवर्गाला..) तर हा तो गजर ठणाणा ओरडतो आणि आमचा दिवस सेकंदकाट्यावर पळू लागतो.

सूरी अन भाजीशी झगडत, अधे मधे बोटं कापत, पेंगुळल्या डोळ्यांनी चिरलेली भाजी फोडणीला टाकत मी फ्रीजमधला कणकेचा डबा काढून भराभर चपात्यांसाठीचे गोळे करायला घेते. "तुझ्या चपात्या आईएवढ्या पातळ होत नाहीत.." नवर्‍यानं नाक मुरडत म्हटलेलं वाक्य मनःपटलावर क्षणात चमकून जाते आणि निदान आजतरी मस्तपैकी पातळ लुसलुशीत चपात्या करून दाखवायच्या असा मी चंग बांधते. पण माझ्याकडे चपात्यांचं पातळ आणि लुसलुशीत यांचं कायम व्यस्त प्रमाण का असतं कुणास ठाऊक! असो.

मध्येच चहाचं आधण ठेवणं आणि दूध तापवणं या लहानसहान पण अतिमहत्वाच्या प्रक्रिया आल्याच. माझ्या नवर्‍याला दात घासायच्या आधी चहा लागतो. "कसली मेली घाणेरडी सवय!" असं सवयीने दहावेळा करवादूनही "पेस्टच्या टेस्टमुळे मला चहाची चवच लागत नाही", या युक्तीवादापुढे मी बर्‍याचदा माघार घेतली आहे. आणि मग उतू जाणारं दूध, करपणारी चपाती आणि तळाला लागणारी भाजी अशा त्रिवेणी संगमावरच्या दिव्यांशी झगडताना मी मध्येच घड्याळाचे काटे चाचपडते.

इकडे आमचे नवरोजी मोबाईलचा गजर snoozवर टाकत कुसा बदलत असतात. अस्साSSS राग येतो नं... पण तो त्या भाजीच्या फोडणीत मिसळून जास्त खमंग होतो. राग जास्तच झाला की करपते फोडणी कधी कधी आणि भाजीच्या जळकट वासाने नवरोजींची झोप चाळवते. "अरे आमच्यावरचा राग त्या बिच्यार्‍या भाजीवर का बरे?" नवरोजी खवटपणे विचारतात. (त्यांना भाजीपेक्षा जीभेची अन पोटाची जास्त काळजी असते...)

मी मध्येच धावत जाऊन अंघोळीचे गरम पाणी चालू करते आणि गजराच्या घ्ड्याळाशी स्पर्धा करेल अशा कर्कश्यपणे ओरडते, "उठा आताSSS सव्वासहा वाजून गेले..." नवरा बिचारा दचकून (माझ्या कर्कश्य आवाजाने घाबरून) धडपडत उठतो आणि टॉवेल खांद्यावर टाकून बाथरूममध्ये घुसतो. रात्रीचे नवर्‍याच्या मिठीत विरघळणारे गुलाबी प्रसंग हलकेच माझ्या डोळ्यांपुढून रांगत जातात्.... "दमतेस ना राणी फार! मी ना उद्यापासून लवकर उठत जाईन. बादल्या पाण्याने भरून ठेवेन. भांडी पुसून फळ्यांवर लावेन. जमलंच तर देवाला दिवा बिवा पण लावेन हं (:अओ: !) मला जमण्यासारखी छोटी छोटी सगळी कामं मी करेन हा बाबू! (कित्ती गुणाचा बाई माझा नवरा!) गरम पिझ्झ्यावर पडलेल्या चीझसारखी वितळून मी नवर्‍याला आणखीनच प्रेमाने बिलगते. पण सकाळी त्या रात्रीच्या गुलाबी आश्वासनांचा मागमूसही शिल्लक उरलेला नसतो.

सेंटचे फवारे उडवून, केसांना सुगंधी क्रीम चोपडून नवरोजींचं साग्रसंगीत सजून होईपर्यंत मी त्यांच्या दप्तरातला (!) डबा काढून घासून पुसून (डबासाद्धा घासायला देता येत नाही असं सवयीने करवादून) डबा भरून, चहा - पाणी - बिस्कीटे असा सारा सरंजाम जय्यत तयार करून पुढची आवराआवर करण्यासाठी माझ्या कार्यक्षेत्राकडे वळणार एवढ्यात _ "इथे ये ना गं जानूSS" अशा नवर्‍याच्या विरघळणार्‍या लाडीक हाकेने मी पिसासारखी हलकी होते. (आता हे वाक्य वाचून माझा नवरा सातमजली गडगडाट करत खिंकाळेल ती वेगळी गोष्ट! त्याच्या मते 'मी पिसासारखी हलकी' ही अतिशयोक्तीलाही पुरून उरणारी बाब आहे. असो बापडी! पण नवर्‍याच्या मधाळ शब्दांनी रागबिग विसरून पिसासारखं तरंगायला 'बायकोच' व्हावं लागतं!)

चहा पिताना माझ्या नवर्‍याला दोन घटका मी शेजारी बसायला हवी असते. "अहाहा! कित्ती भाग्याची बाई! यात तक्रार करण्यासारखं काय आहे? बाकीच्या पुरूषांना तर पेप्रात डोकं खुपसून बसल्यावर ओ द्यायलाही सवड नसते..." वगैरे वगैरे हेवामिश्रीत बोल गुलालासारखे हवेत उधळले जाणार हे वाटलंच होतं मला. शेजारी बसवून घेण्याचं निमित्त फक्त आणि फक्त प्रेमापोटीच असतं असं नव्हे हं! आपल्या वेंधळ्या बायकोला रोजच्या सगळ्या सूचना पढविण्यासाठी असतं. खोटं वाटतेय? "कपाटाची चावी सोबत घेऊन जा, विसरू नकोस. सगळ्या खिडक्या व्यवस्थित लावून जा. जाताना केराचा डबा न विसरता बाहेर ठेव. गॅस बंद करून जा. गीझर चेक कर बंद केला आहेस का. कुलूप दोनदा ओढून बघ. रात्री भाजी काय करणारेस? घाई करू नकोस. उशीर झाला तरी चालेल पण सगळं व्यवस्थित चेक करून जा. इ. इ." मी यांत्रीकपणे मान डोलावते. (पण अस्मादिकांनी आयत्या वेळी उशीर झाल्यामुळे गोंधळ करून ठेवलेला असतो हे चलाख वाचकांना सांगायलाच नको.) आणि मी मान डोलावली तरी हवा तो गोंधळ घालणारच अशी माझ्या इतर कुठल्याही बाबतीत नाही पण वेंधळेपणाबाबत खात्री असलेला माझा नवरा सारख्या सूचना देण्याचं सासूबाईंचं काम इमानेइतबारे रोज सकाळी मला शेजारी बसवून घेऊन पार पाडतो.

नवरोजी रोज माझ्या आधी घरी परततात आणि "तू घरात नसलीस नं की मला अज्जिबात करमत नाही" असं मधाळ आवाजात माझ्या मोबाईलवर ऐकवून समोर (त्याच्या) मावशीकडे टी. व्ही. बघायला पळतात. 'टी. व्ही. सध्यातरी नको डेड इन्व्हेस्टमेंट आहे आणि टी. व्ही. आणला की माझी कामं होणार नाहीत." या माझ्या दोन मुद्द्यांवर मात्र माझ्या नवर्‍याचं माझ्याशी अगदी एकमत होतं.

विरार लोकलमध्ये आठवड्याच्या भाज्यांच्या बोचक्याबरोबर शरीराचंही बोचकं धडपडत फेकायचं आणि घामाचे उबट कुबट चिकचिकीत ओघळ, धक्के, तारस्वरातील भांडणांचे किचकिच आवाज यांचाच एक भाग बनून, आपल्या इच्छीत स्थळी उतरणार्‍या लोंढ्यासोबत हे बोचकं पुन्हा उतरवून घ्यायचं. धावतपळत घर गाठायचं. हातपात धुवून, चेहर्‍यावर गार पाण्याचे हबके मारून, गाऊनचे चिलखत अंगावर चढवून आधी देवाला दिवाबत्ती करायची आणि रात्रीच्या जेवणाची नव्याने सुरूवात करताना स्वयंपाक घरातील शस्त्रास्त्रं परजायची... यातील तोच तोच रटाळपणा आणि कंटाळवाणी दमछाक, कंपनीच्या गाडीतून फुलासारखा अल्लद प्रवास करणार्‍या नवरेबुवांना कशी बरे कळणार? त्याच्या आरामदायी जीवनाबद्दल हेवा नाही पण बायको दमून येते, तिला आपल्या मदतीची गरज आहे याची जाणीव जरी त्याला झाली तरी खूप रिलॅक्स वाटते. मग कधीतरी त्याच्या गुलाबी मिठीची आणि "दमतेस ना राणू" या आश्वासक मधाळ शब्दांची प्रकर्षाने आठवण होते. आपल्या कष्टाची समोरच्याला कदर आहे यापेक्षा दुसरे मोठे सुख नसावे.

चॅनेल्सवर भराभर सर्फींग करूनही टि. व्ही. वर पाहण्याजोगं काहीच न सापडल्यानं नवरेबुवा कंटाळून घरी परततात. (रिमोट ही गोष्ट एका पुरूषाने अन्य पुरूषांसाठी लावलेला अत्यंत उपयुक्त शोध आहे, अन्यथा समोर डेली सोप्सचा कितीही रटाळखाना चालू असेल तरीही महीलावर्ग भक्तीभावाने त्या पाहत, त्यातील मठ्ठ बायकांचा कैवार घेत हळहळत असतात... आणि माझ्यासारख्या काहीजणी काहीही पाहायचं म्हणून जाहीरातीही तोंड उघडं टाकून पाहत असतात; त्यांना कधी पाहीलेय सर्फींग करताना? मी कधी कधी टि. व्ही पाहायला जाते त्याच्या मावशीकडे आणि त्याच्या अशा सर्फिंगने वैतागते... "नशीब टि.व्ही. ला तरी रिमोट आहे, कंटाळा आला तर चॅनेल बदलू शकतो.." असं काहीसं पुटपुटताना ऐकलेलं नवर्‍याला आणि मी तावातावाने भांडणार तितक्यात मावससासूबाईंचे आगमन झाल्याने एका चिमट्यावर अस्मादिकांना समाधान मानावे लागते.)

"जरा घरी थांबत जा नाSSS रोज रोज काय असतं मावशीकडे? मला नाही का बघावासा वाटत टि. व्ही., पण मी जाते...?" असे घासघासून गुळगुळीत झालेले प्रश्न तोंडातून क्वचित बाहेर निसटतात. त्यावर नवर्‍याची प्रतिक्रिया म्हणजे अस्मादिकांनी ऑफीसातून ओळखीवर आणलेल्या (पण वाचावयास कधीही सवड न मिळणार्‍या) पुस्तकांमध्ये तोंड खुपसण्यापलिकडे आणि क्वचित माझ्या रागावलेल्या चेहर्‍याकडे नजर जाताच केविलवाणे भाव चेहर्‍यावर पांघरून आणि मधाळ प्रेमाने डोळ्यांची बुधली तुडुंब भरून अस्मादिकांना मिठीत ओढण्यापलिकडे नसतात. पण या मधाच्या बुधल्यांमध्ये मनसोक्त डुंबायच्या आधी अस्मादिकांना स्वयंपाकाची लढाई लढवायची असते.

क्वचित केव्हातरी नवरेबुवा स्वयंपाकघरात डोकावतात आणि त्यांच्या आदर्श प्रिय व.पुं.पासून स्फूर्ती घेऊन तत्वज्ञानाचे डोस पाजायचे महान कार्य पार पाडू लागतात. (माझ्या नवर्‍याप्रमाणे व.पूं.चे निस्सीम भक्त असलेल्या सर्व पंख्यांची क्षमा मागते.) मग उकडून काढणार्‍या स्वयंपाकखोलीत घामाच्या चिकचिकीत धारांनी सचैल न्हालेली माझ्यामधली झांशीची राणी कशी बरं मागे हटेल? "मैं मेरी झांशी नहीं दूंगी |"च्या चालीवर मीही लढाईला सरसावते.

"लवकर येऊन साधा देवाचा दिवापण लावता येत नाही. पाणी ढोसायला दहावेळा फ्रीज उघडता येईल पण कुठल्या भाज्या संपल्यात ते जरा बघता येत नाही. सगळीकडे बायकोनेच मेलं पाहीजे. लवकर येऊन तंगड्या पसरून टी.व्ही. बघता येतो. बायको ट्रेनमधून कशी चिरडून येत असेल, एवढ्या गर्दीतून कसं आणत असेल ते काSSही नाही. कधी भाजीची एक जुडी आणायची माहीती नाही..."

तोंडाच्या पट्ट्यासोबत पातेली, झारे, चमचे या शस्त्रास्त्रांचा खणखणाट असतोच. माझ्या शेवटच्या वाक्यावर मात्र नवरा जोरदार प्रतिहल्ला चढवतो. "दादरला भाज्या स्वस्त मिळतात, मीच येताना आणत जाईन; असं तुच तर म्हणालेलीस." "तू भाज्या शिळ्या आणि जून आणतोस, पारखून घेत नाहीस" हा मुद्दा सोयिस्करपणे गाळण्यात आलेला असतो. जबाबदारीतून हात वर कसे करायचे आणि कुठल्या टोल्याला शाब्दिक मार्मिक प्रतिटोला हाणायचा या गोष्टी 'नवरा' या प्राण्याकडून शिकाव्यात.

राग आणि कीव (माझी, नवर्‍याची की आपटल्या गेलेल्या भांड्यांची कुणास ठाऊक!) या संमिश्र भावनेने कांदा-सूरीची मारामारी करायला मी सज्ज होते. ओघळणारे अश्रू हे कांद्यामुळे, अगतिकतेमुळे की माहेरच्या लोभस आठवणींमुळे आहेत हे ना तर मला कळत ना माझ्या बिच्चार्‍या (!) नवर्‍याला!

......................भांडणे सौख्यभरे चालूच राहतात.......................

"सुट्टीच्या दिवशीपण मीच पाणी भरायचं का?" अस्ताव्यस्त लोळणार्‍या नवर्‍याला चापटी मारून उठवण्याचा निष्फळ प्रयत्न होतो. पण कूस बदलत तो दोन्ही कानांवर उशीचे संरक्षक आवरण ओढून घेतो. पुढचा त्रागा करून आता काही फायदाच नसतो. माझ्याच तोंडाची वाफ दवडली जाणार. (बरोबर बोलले ना बाई वाक्प्रचार? "ह्यांच्या" कानावर गेलं - जाणारंच कानांवर! माझ्या चूका अशा एकाच काय पण शंभर उशींची आवरणे भेदून त्याच्या कानात शिरणार. तर ह्याच्या कानावर पडलं तर काम करण्यासाठी नाही पण माझ्या अज्ञानाची कीव करत गडगडाटी खिंकाळण्यासाठी आणि 'मराठी भाषा आणि मराठी माणसाचे मराठी भाषेविषयी अज्ञान आणि अनास्था' यावर लंबचवडं भाषण द्यायला नक्की जाग येईल. मराठी असल्याबद्दलचा त्याचा अभिमान वाखाणण्यासारखा आहे... दिलसे, दिमागसे, मनसे टिप्पीकल मराठी आहे तो! पण म्हणून का गरीब बिच्चार्‍या बायकोला असं सतत हिणवायचं का?)

अगतिकतेने आणि त्राग्याने नवर्‍याला गदागदा हलवून उठवलं आणि 'मला थोडीतरी मदत कर ना रे' असं काकुळतीने विनवलं तर "स्वयंपाकघरामध्ये मला कोणाचीही लुडबूड चालणार नाही, असं मला फार पूर्वीच 'कोणीतरी' ठणकावून सांगितलं आहे.." असं बचावात्मक वाक्य तोंडावर फेकून तो पुन्हा कूस बदलून झोपी जातो आणि आपणच हे वाक्य आवेशामध्ये बोलून गेल्याचं मान्य करण्यापलिकडे आणि स्वतःच्या गाढवपणाबद्दल चरफडण्यापलिकडे मी करू तरी काय शकते?

आणि मग - कधीतरी मात्र माझ्या हाती ब्रह्मास्त्र सापडतं - मौनाचं! कोणीसं म्हटलंय ना-'मौनं सर्वार्थम साधनम|' घरी आलेल्या नवर्‍याचं थंडपणे निर्विकार चेहर्‍याने स्वागत झालं की तो समजून जातो; काहीतरी बिनसलंय राणीसरकारांचं! तेवढा मात्र नवरा हा प्राणी फार चलाख असतो. बायकोचं कधी बिनसलंय आणि बिनसल्यावर काय उपाययोजना कराव्यात हे शिकायला त्याला कुठल्याही कोर्सेसची गरज लागत नाही. पण मुळात बायकोचं कशामुळे बिनसलंय हे काही त्या बापड्याला कधी कळत नाही आणि त्याच्या विनवण्यांकडे साफ दुर्लक्ष करून त्याला भंडावून सोडण्याचा खासा उपाय बायको हा प्राणी कधी चुकवत नाही.

"जानूSSS काय झालंय माझ्या सोनूला? बरं वाटत नाहीये का राणू?" असं नशील्या मधाळ आवाजात विचारून अवतीभवती बागडून हसवण्याचा निष्फळ प्रयत्न होतो. पण मी त्याची सगळी अस्त्रं 'निकामी' करून टाकते आणि मग समजूत काढता काढता कधी अनवधानानं 'अमकी-तमकी'च्या समजूतदारपणाचं उदाहरण या आणीबाणीच्या प्रसंगी काढलंच- तर मग जो क्षोभाचा डोंब उसळतो आणी इतक्या दिवसांचा कोंडलेला ज्वालामुखी उद्रेक होऊन अखंड पाझरू लागतो. (आणि मग नवर्‍याला बिचार्‍याला वाटते, गप्प होती तेच बरं होतं...)

कुठल्याही बाईशी तुलना होणं - त्याहीपेक्षा जास्त म्हणजे दुसर्‍या बाईचं कौतुक नवर्‍याच्या तोंडून ऐकावं लागणं यापेक्षा दुसरं दु:ख नसावं. रागाने अन दु:खाने मी थरथरत असते. जमदग्नीचा क्रोध डोळ्यांत उतरलेला असतो. पण मग अगतिकतेने फुस्सकन तो वितळून क्रोधाच्या ठिणग्यांची अश्रूंची फुले बनून कधी बरसू लागतात आणि नवर्‍याच्या मिठीत त्याला चिंब न्हाऊ कधी घालतात समजतच नाही.

रात्रीची गुलाबी गोंडस स्वप्ने पुन्हा ओल्या पापण्यांआडून रांगत सरकायला लागतात. आपण चिडचिड करत केलेला बेचव स्वयंपाक 'ठीक होता' म्हणत खालच्या मानेनं जेवणारा नवरा आठवतो. आपल्या क्रोधाग्नीने केलेल्या वाग्बाणांनी घायाळ होऊनसुद्धा चकार शब्द न काढणारा नवरा आठवतो. आपण आजारी पडल्यावर आठवणीने आणि जबरदस्तीने औषधं घ्यायला लावणारा नवरा आठवतो. खोकला झालेला असताना, गरमागरम हळद टाकलेलं ग्लासभर दूध हातात देऊन जबरदस्तीने प्यायला लावणारा नवरा आठवतो. 'खूप दमतेस नं राणू?' असं आपल्या कपाळावरचा घाम पुसत लाडीक विचारणा करणारा नवरा आठवतो. मजेमजेचे चेहरे करून अवतीभवती बागडणारा निरागस अल्लड नवरा आठवतो. रूसलेल्या बायकोला मनवण्यासाठी गरम गरम स्वादिष्ट सूपाने भरलेला वाडगा देणारा नवरा आठवतो आणी मी पुन्हा पिझ्झ्यावरच्या चीझसारखी वितळून त्याला घट्ट बिलगते.

'बाबापुता' करून माझी समजूत घालण्यात एकदाचा माझा नवरा यशस्वी होतो आणि खालच्या आवाजात हळूवारपणे हलकेच परवानगी मागतो,"जानू आजपासून ...... matches चालू होताहेत. मी जाऊ बघायला?" त्याच्या मधाळ डोळ्यांच्या बुधल्यांत आणि चेहर्‍यावरच्या निरागस केविलवाण्या भावांमध्ये विरघळून मी त्याला होकार कधी देऊन टाकते आणि हरणाच्या पाडसाच्या अल्लड उत्साहाने दौडत तो कधी गायब होतो समजतही नाही.

लग्नाच्या दिवशी थोरामोठ्यांनी नक्की काय बरं आशीर्वाद दिला होता-'नांदा सौख्यभरे' की 'भांडा सौख्यभरे' या घोळात पडत मी मात्र पुढच्या आवराआवरीला सरसावते.

..................................................शेवट??? ह्म्म्म न संपणारा!!!..........

गुलमोहर: 

dreamgirl,
घरोघरी गॅसच्याच शेगड्या!! (काही पाईप गॅसच्या तर काही सिलेंडरच्या)

खूपच छान लिहीले आहेस

खूप वाक्य आवडली

>आपल्या कष्टाची समोरच्याला कदर आहे यापेक्षा दुसरे मोठे सुख नसावे.
>मला नाही का बघावासा वाटत टि. व्ही., पण मी जाते...?" असे घासघासून गुळगुळीत झालेले प्रश्न तोंडातून क्वचित बाहेर निसटतात
>पण माझ्याकडे चपात्यांचं पातळ आणि लुसलुशीत यांचं कायम व्यस्त प्रमाण का असतं कुणास ठाऊक!
> साखरझोपेतून निर्दयीपणे उठवणारा आवाज कितीही किणकिणणारा नाजूक असला तरी तो ठ्णाणाच वाटतो
>अस्साSSS राग येतो नं... पण तो त्या भाजीच्या फोडणीत मिसळून जास्त खमंग होतो.
>आणि मग उतू जाणारं दूध, करपणारी चपाती आणि तळाला लागणारी भाजी अशा त्रिवेणी संगमावरच्या दिव्यांशी झगडताना मी मध्येच घड्याळाचे काटे चाचपडते.

अगदी....
तू विनोदाची झालर लावायचा प्रयत्नं केलायस... पण दुखरा विषय आहे गं, काही जणींसाठी. चिपाडं होऊन जातात ह्या मुली...

भारतात जराही मदत न करणारा माझा नवरा, इथे मात्रं खूप कामं करतो. मी सुद्धा लेकाला सवय लावतेय.... भारतातल्या नात्यातल्या अनेक मुलींचं हे आयुष्यं ऐकते तेव्हा खरच वाईट वाटतं.
"हे अस्लं माझ्या सुनेच्या बाबतीत झालेलं मलाच खपणारच नाही... आपली भांडणं होतील", हे त्याला आधीच सांगून ठेवलय.

पुढल्या लेखांची वाट बघते... छान होणारय मालिका.

एक मुलगी, किशोर, रचु, किरण, रेशमा, कविता, चिमुरी, दाद खुप आभार...

किरण..घरोघरी गॅसच्याच शेगड्या!! (काही पाईप गॅसच्या तर काही सिलेंडरच्या)>> Lol खरंय!

दाद... अगदी अगदी..

माझं लग्न व्हायच्या आधी आम्ही मुंबईतला फ्लॅट बघायला गेलेलो... आगाऊ भाडं, डिपॉझिट वगैरे देऊन झालं पण ते घर अरे बापरे... मी त्या दिवशी तीन्ही खोल्या झाडून, लाद्या पुसून माझ्या रूमवर (आम्ही चौघी राहायचो तिथे) परत गेले... नवरा मागून सूचना देत होता... आणि तू कित्ती छान केर काढते वगैरे गुलाबपाणी शिंपत होता...

त्या दिवसापासून अगदी तो सिंगापूरला जायच्या १ महीना आधीपर्यंत मीच सगळी कामं करायचे... जेवण करणं राहू दे जेवणासाठी ताट-पाणी घेणं, जेवल्यावर स्वतःचं ताट उचलणं, गाद्या घालणं अशी कामेही तो करायचा नाही... मला सकाळी खायलाही वेळ मिळायचा नाही... कपभर दूध घशात ढकलून पळावं लागे... महिलाविशेष चुकली की मग मरण... मिरारोडवरून लटकत जाणे म्हणजे मरणच... रोज ओकत ओकत जायचे. तिथल्या बायका चिडवायच्याही... अरे चक्कर आते है, उलटी हो रही है, "कुछ" है क्या... कप्पाळ म्हटलं लग्नाला पुरते ६ महीनेही नाही झालेत...

एकदा चपात्या करतानाच खाली पडले चक्कर येऊन तेव्हा नवरोजी खडबडून जागे झाले, दवाखान्यात गेले तर ती डॉक्टरीण दोघांना ओरडली... बी. पी. खूप लो झालेलं... घरी आल्यावर मी रडत रडत सांगितलं "मी पण माणूस आहे रे... बायको म्हणजे सुपरवूमन नसते, तिला मदतीची गरज असते... तुझी आई घरी होती म्हणून तुम्हाला कामाची सवय नाही लावली, पण मी नोकरी सांभाळून काय काय करू... तू मागून चार वेळा फिरशील आणि खाली पडलेलं ताट उचलायला सांगशील पण फिरताना तूच का नाही ते उचलून ठेवत..." त्याचे डोळे भरून आले... त्या दिवसापासून त्याने मला मदत करायला सुरूवात केली... ते येईलच पुढच्या लेखांमध्ये...

कधी कधी घरातून्च मुलगा-मुलगी असा भेद न करता सगळी कामे शिकवावीत... आणि नवरा मदत करत असेल तर इतर नातेवाईकांनी त्याला टोमणे मारून बायकोचा बैल वगैरे बोलून हिणवू नये...

कविता... खरं तर संसार हा विषय न संपणारा(जबरदस्तीने न संपवला तर)... चार दिवस सासूचे आणि क्योसाकबथी..पेक्षाही जास्त भागात चालणारा... Happy विचार तर केलाय लेखमाला बनवण्याचा पाहू कसं जमतेय... हा लेख पूर्ण करेनच लवकर... जमला तर पुढचा टाकायचा विचार करेन... Happy

समस्त कैवारी जनांना एक सवाल.......

ह्या लेखावर उत्तर कोण देणार आहे ? सवाल जवाब, कलगी तुरा जे काही म्हणतात ते.... कोण सुरु करणारे ?

होउन जाउद्या..... आम्ही वाचतोय.

मस्त...

विशाल, सुमेधा, रैना, रोहीत धन्स.

सुकि... खरंय लग्न झाल्यावर सुटतातच तुफान.. मी आत्ता सुटलीये... लग्न झाल्यावर ड्रम वाजवायची काडी झालेले... मीरारोड - दादर अपडाऊन करून आणि नवरेबुवांची मदत नव्हती... Happy

ड्रीमगर्ल, छान लिहिलं आहेस..... अगदी घड्याळाच्या काट्यावर जिवानिशी धावणार्‍या समस्त नोकरीदार विवाहित बायकांच्या आयुष्यात घडणारं! तूर्तास तरी मला ह्या चित्रात हळूहळू का होईना, बदल होत असल्याचं दिसतंय! लहान वयापासून मुलांना व मुलींना आपापली कामे करण्याची, घरात थोडीफार मदत करण्याची सवय लागली तर भविष्यात नक्कीच ह्या चित्रात अजून सुधारणा होईल. पुलेशु! Happy

सुमेधा??? वाट चुकलात अरूंधती
की सुमेला नी मला दोघींना कॉमन प्रतिक्रिया दिलेय??? Uhoh
असो, धन्यवाद! Happy

सही...! कमीतकमी स्वताचे आवरणे / घेतलेली वस्तु जागेवर ठेवणे / लहान सहान कामात मदद करणे हे प्रत्येकाला (मुला / मुली ला) आलंच पहिजे. मुद्दामुन कोणी करत नही पण असे होते खरे Happy

सवाल जवाब, कलगी तुरा जे काही म्हणतात ते.... कोण सुरु करणारे ?
>> असुदे! Lol

बाकी रैनाच्या/दादच्या प्रतिक्रियेशी सहमत!

Pages