वेगवेगळे परीघ, व्यास एक आपला

Submitted by बेफ़िकीर on 12 July, 2010 - 03:36

वेगवेगळे परीघ, व्यास एक आपला
एवढाच दैवदुर्विलास एक आपला

वाटते अनंतकाळ जो जिवंत ठेवतो
अंत आणतो असाच श्वास एक आपला

साहसे खरे लिहायची इथेच आटली
कागदात आखला समास एक आपला

मी मला सहाय्य द्यायला पुढे न धावलो
हाच वाटला मला विकास एक आपला

रागवू नकोस तू... नसेनही मनात मी
मांडला असाच मी कयास एक आपला

मी तुला न शोधणे नि तू मला न भेटणे
छंद वेगळे असून त्रास एक आपला

भोवतालच्या परिस्थितीस नांव ठेवणे
विस्मरायचा तुला प्रयास एक आपला

खोल खोल जात मी तुझाच भाग होउदे
रोज लागुदे मला तपास एक आपला

त्यास काळजी असेलही म्हणून राहतो
हा तुझा सुवास आसपास एक आपला

पोहचेल तोवरी घडेल खूप कायसे
पोचला मुखात तोच घास एक आपला

चालतो मधेमधे नि थांबतो मधेमधे
राहतो जगात मी उदास एक आपला

हा कुठे सरावलो विषण्णतेस मी जरा
लागला तुला वसंतमास एक आपला

काय पाहिले तुझ्यात हे कुणास माहिती?
तू हवीस तू हवीस ध्यास एक आपला

मन रमायला तुझे बदल करून बघ जरा
टाक ना कटाक्ष दिलखुलास एक आपला

'बेफिकीर' जीवनात जान आणलीस तू
अंत कर असाच तू झकास एक आपला

गुलमोहर: 

वाटते अनंतकाळ जो जिवंत ठेवतो
अंत आणतो असाच श्वास एक आपला

पोहचेल तोवरी घडेल खूप कायसे
पोचला मुखात तोच घास एक आपला

बेफिकीर' जीवनात जान आणलीस तू
अंत कर असाच तू झकास एक आपला

हे तिन शेर खू............प आवडले... भन्नाट रचना ,अभिनंदन.

मन रमायला तुझे बदल करून बघ जरा
टाक ना कटाक्ष दिलखुलास एक आपला

-- पून्हा एकदा कातिल शेरांची अप्रतिम गझल.

वाटते अनंतकाळ जो जिवंत ठेवतो
अंत आणतो असाच श्वास एक आपला

साहसे खरे लिहायची इथेच आटली
कागदात आखला समास एक आपला
दोन्ही सहजसुंदर शेर

मी मला सहाय्य द्यायला पुढे न धावलो
हाच वाटला मला विकास एक आपला
खासच..!

रागवू नकोस तू... नसेनही मनात मी
मांडला असाच मी कयास एक आपला
मस्त..!

खोल खोल जात मी तुझाच भाग होउदे
रोज लागुदे मला तपास एक आपला

एकंदर गझल अप्रतिम..!

वाटते अनंतकाळ जो जिवंत ठेवतो
अंत आणतो असाच श्वास एक आपला

रागवू नकोस तू... नसेनही मनात मी
मांडला असाच मी कयास एक आपला

सुरेख गझल!

एक तांत्रिक शंका :

>>वेगवेगळे परीघ, व्यास एक आपला
परीघ = π X व्यास (as C = π X d) आणि π हे काँस्टंट आहे तर एका व्यासासाठी वेगवेगळे परीघ कसे?

बाकी गझल छान Happy

वेगवेगळे परीघ, व्यास एक आपला
एवढाच दैवदुर्विलास एक आपला

क्या बात है. मला कल्पना फार आवडली. पण दुसर्‍या ओळीत वाचायला त्रास होतोय असे वाटते. म्हणजे गझलेत चुक आहे असे अजिबात नाही तर लयीसाठी म्हणतोय मी.

साहसे खरे लिहायची इथेच आटली
कागदात आखला समास एक आपला

हा पण आवडला.

डॉ कैलास,

आपले धन्यवाद!

मात्र आपण दिलेले उत्तर मला अभिप्रेत नाही. मी एकाच व्यासाची वेगवेगळी वर्तुळे म्हणत नाही आहे. व्यास म्हणजे आपल्या कोणत्याही प्रकारच्या क्षमता असे गृहीत धरले (धावपळ, कम्युनिकेशन, ताण सहन करणे, भावनिक ताण सहन करणे, अपयश, अपेक्षा वगैरे वगैरे सोसणे, पूर्ण करणे इ.) तर आपल्याला (म्हणजे कोणत्याही आम माणसाला) इतक्या अनंत व विविध अटींची पूर्तता करावी लागते की जणू (उदाहरणार्थ) आपला व्यास वर्तुळाच्या परीघाप्रमाणे कमी करावा लागतो तर कधी जास्त! (अनेक प्रकारच्या व्यक्तीमत्वांशी, प्रसंगांशी जुळवून घेत बसावे लागते, ताण येतो.)

आपल्याला 'सूट' होईल अशी परिस्थिती कधीही न लाभणे हा एकमेव दैदुर्विलास आहे असे म्हणायचे आहे.

केदार,

हे चामर वृत्त आहे व सर्व ओळी एकाच अक्षरगणवृत्तात असल्यामु़ळे त्यात लयीत वाचताना त्रास होणे तांत्रिकदृष्ट्याच संभवत नाही. पुन्हा एकदा वाचून पहावेत. तरीही, आपले मनापासून आभार!

धन्यवाद बेफिकिर जी...... आपण अर्थ अवगत केल्या नंतर मी तसा विचार केला... अन्यथा मला लागलेला अर्थ
'' वेगवेगळे परीघ = पति,पत्नी यांची वेगवेगळी विचारसरणी ''
''व्यास एक असणे = विवाह बंधनामुळे एकत्र रहावे लागणे ''

डॉ.कैलास

मस्त !

कैलासरावांनी गृहीत धरलेल्या अर्थानेच मी वाचला शेर अन त्याच अर्थाने खुप आवडलाही,

अन हा शेर आठवला...

लिखाणावर लेखकाचे प्रभुत्व असले तरी...
अर्थावर वाचकाची मक्तेदारी असावी

Happy

गझल अफलातूनच...नेहमीप्रमाणे! Happy

धन्यवाद!

छान

Pages