सावळ्या घना...

Submitted by अवल on 19 June, 2010 - 06:10

सावळ्या घना जरा, बरसून जा
माझिया प्रियेला जरा, सजवून जा

हिरवा मखमली गालिचा, पसरूनी जा
रानफुलांच्या बिंद्या त्यावर, फुलवून जा

इंद्रधनुष्याच्या मखरी, मांडून जा
जलधारांचा धूसर पडदा, ओढून जा

कडाड वीजांचा ताशा, वाजवून जा
सावळ्या घना जरा, बरसून जा

माझिया प्रियेला जर, सजवून जा
विभोर तिच्या कुंतलांना, भिजवून जा

भांगात दवबिंदूंची बिंदी, लावून जा
पापण्यात स्वप्ने नवी रेखून जा

मोत्यांच्या थेंबांची कुंडले, अडकवून जा
श्वासात मृदगंधाचा सुवास, पेरून जा

लालिमा कुंकवाचा गाली, पसरून जा
मोत्यांच्या माळेसम थेंब, ओवून जा

निळी सावळी ओढणी, ओढून जा
उन्हाची किनार तिला, लावून जा

लाटांचे पैंजण पावलात, घालून जा
माझिया प्रियेला जरा सजवून जा

सावळ्या घना जरा, बरसून जा
माझिया प्रियेला जरा, सजवून जा

गुलमोहर: 

आरती,
सहीच..!

<भांगात दवबिंदूंची बिंदी, लावून जा
पापण्यात स्वप्ने नवी रेखून जा
मोत्यांच्या थेंबांची कुंडले, अडकवून जा
श्वासात मृदगंधाचा सुवास, पेरून जा>
अप्रतीमच..! त्यावरचे चित्रदेखिल ...!

आरती खुपच छान कविता. मेजर आवडली. Happy

लालिमा कुंकवाचा गाली, पसरून जा
मोत्यांच्या माळेसम थेंब, ओवून जा>>>>> क्लासच!!!!!

भांगात दवबिंदूंची बिंदी, लावून जा
पापण्यात स्वप्ने नवी रेखून जा

मोत्यांच्या थेंबांची कुंडले, अडकवून जा
श्वासात मृदगंधाचा सुवास, पेरून जा

काय मस्त लिहिलीये.. आरती.. अन चित्रं तर भन्नाट आहे. प्रिया सजली आता प्रियकराचा टर्न.. तो बेंधुद होणार यात शंकाच नाही तेव्हा मी प्रयत्न करीन त्याला बेधुंद करण्याचा माझ्या शब्दातून.