आज २८ जानेवारी सुमनताईंचा वाढदिवस. सर्व मायबोलीकरांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! नुकताच त्यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन!
(सौजन्यः नेट)
सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धिपासुन अलिप्त राहिल्या. अनेक वर्षे अज्ञातवासात असलेल्या सुमनताई "झी गौरव्"च्या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने समोर आल्या.
सध्या बांग्लादेशात असलेल्या ढाका येथे २८ जानेवारी १९३८ साली सुमन हेमाडी यांचा जन्म झाला. १९४३ साली त्यांनी मुंबईत येऊन संगीताचे रितसर प्रशिक्षण घेतले. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी मो. शफी यांनी संगीत दिलेल्या "मंगु" (१९५४) या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले. गाण्याचे बोल होते "कोई पुकारे धीरे से तुझे". त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड
हि चालुच राहिली आणि लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या गाण्याचा तारकामंडळात त्यांनी मानाचे स्थान मिळवले.
सुमनताईंच्या आवाजाने एका पिढीला अक्षरशः वेड लावले होते. "जिथे सागरा धरणी मिळते" असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, "घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात" असे म्हणणारी सासुरवाशीण, "निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाहि" हि अंगाई, "कशी गवळण राधा बावरली" हि गवळण, "सांज आली दुरातुनी, क्षितीजाच्या गंधातुनी" हे विरहगीत, "नाविका रे वार वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे", "केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर" हे भावगीत, "केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा", "जगी ज्यास कोणी नाहि त्यास देव आहे", "देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा" सारखी भक्तीगीते, "उठा उठा चिऊताई", "या लाडक्या मुलांनो या" सारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. किंबहुना आजही तितकीच गोड वाटतात. पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो.
सुमनताईंनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी श्री दशरथ पुजारी यांच्याकडे गायली. किंबहुना दशरथ पुजारी यांच्या गाण्यांमुळेच आज मराठीभावगीतांमध्ये सुमनताईंची गाणी मैलाचा दगड ठरली आहेत.
सुमन कल्याणपुर यांनी मराठे व हिंदी व्यतिरीक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी ओरीया भाषेत सुद्धा गाणी गायली आहे.
"न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया", "ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा", "तुमसे ओ हसीन कभी मोहब्बत न मैने करनी थी", "परबतो के पेडो पर शाम का बसेरा है", "अज हु ना आये बालमा", "तुमने पुकारा और हम चले आये" "मेरे मेहबुब न जा" या आणि अशा असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीहि गाजवली होती. आणि लोकप्रियतेच्या या शिखरावरच असताना त्यांनी एकदम गाणे गायचे सोडुन दिले. काहि अंतर्गत वादामुळे रफी यांनी लतादिदि बरोबर गाण्याचे सोडुन दिल्याने लतादिदिंची काही गाणी सुमनताईंच्या वाटेला आली आणि त्यांनी त्या गाण्याचे अक्षरशः सोने केले. (मनात कधे कधी असा विचार येतो की हा वाद अजुन काहि काळ असता तर सुमनताईं आणि मो. रफी यांची आणखी काहि गाणी ऐकायला मिळाली असती :)). कारण काहिहि असो पण त्याकाळच्या स्पर्धेच्या युगात एका चांगल्या गायिकेचा आवाज दबला गेला असे मला वाटते. कधी असेहि वाटते कि त्यांना अजुन संधी मिळाली असती तर त्यांच्या नावने सुद्धा आज एखादा पुरस्कार दिला गेला असता....... असो.......
आजही इतक्या वर्षांनीहि सुमनताईंची गाणी परत परत ऐकावीशी वाटतात. तेंव्हा सुमनताई तुम्ही परत एकदा या, सारे काहि विसरून पुन्हा मनमोकळेपणाने गा. आम्ही सर्व रसिक, तुमचे चाहते या क्षणांची आतुरतेने वाट पाहत आहे.
सुमनताईंनी गायलेली काहि मराठी गाणी:
आई सारखे दैवत सार्या जगतात नाहि
अक्रुरा नेऊ नको माधवा
आकाश पांघरून जग शांत झोपलेले
आली बघ गाई गाई
केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर
वाट इथे स्वप्नातील संपली जणु
अरे संसार संसार
असावे घर ते आपुले छान
चल उठ रे मुकुंदा
देवा दया तुझी
दिपक मांडले
एक तारे सुर जाणे
एकदाच यावे सखया
गेला सोडुनी मजसी कान्हा
घाल घाल पिंगा वार्या
हाले हा नंदाघरी पाळणा
हि नव्हे चांदणी हि तर मीरा गाते
जिथे सागरा धरणी मिळते
जगी ज्यास कोणी नाहि
जुळल्या सुरेल तारा
का मोगरा फुलेना
कुणी निंदावे वा वंदावे
कशी गवळण राधा बावरली
कशी करू स्वागता
केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा
क्षणी या दुभंगुनी
मज नकोत अश्रु घाम हवा
मस्त हि हवा नभी
मी बोलले काहि
मी चंचल होऊनी आले
मृदुल करांनी छेडित तारा
नकळत सारे घडले
नंदाघरी नंदनवन फुलले
नाविका रे वार वाहे रे
निंबोनीच्या झाडाखाले
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
पहिलीच भेट झाले
पाखरा जा दुर देशी
पैलतीरी रानामाजी
पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय
पाण्यातली परी मी
पिवळी पिवळी हळद लागली
प्रीत हि डोळ्यात माझ्या
प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे
रिमझिम झरती श्रावणधारा
सांग कधी कळणार तुला
सहज तुला गुपित एक
सावळ्या विठ्ठला
शब्द शब्द जपुन ठेव
श्रीरामाचे चरण धरावे
लिंबलोण उतरता
जाग रे यादव
ते नयन बोलले काहि
तुझ्या बोटाला कृष्णा
तुझ्या कांतीसम
तुला ते आठवले
उघडले एक चंदनी दार
उर्मिला मी
उठा उठा चिऊताई
वार्यावरती घेत लकेरी
विसरशील तु सारे
या झोपल्या जगात
या कळ्यांनो या फुलांनो (मंत्र वंदे मातरम)
या लाडक्या मुलांनो
असे हे जगचे फिरे चक्र बाळा
वल्हव वल्हव रे वल्हव रे होडी
गणाधिपा हो उठा लवकरी
ओम नमो हा सुर
जो त्रिगुणांची मुर्त जाहला
पार्वती वेचिती बिल्वदळे
देवगृही या भक्तजनांना गौरीनंदन पावला
टिपः सुमनताईंच्या गाण्यांचा निस्सिम चाहता असल्याने हा लेख प्रपंच.चु.भु.द्या.घ्यावी.
योगेश मस्त लेख .घाल घाल पिंगा
योगेश मस्त लेख .घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात आणि केतकीच्या बनी
माझी सगळ्यात आवडती गाणी. इथे मराठी गाण्यांची लिस्ट दिल्या बद्दल धन्यवाद.
सुंदर लेख योगेश, या सगळ्या
सुंदर लेख योगेश, या सगळ्या गाण्यांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद
सुमनताईंचा वाढदिवस... हार्दिक
सुमनताईंचा वाढदिवस... हार्दिक शुभेच्छा!
====================
मराठी गाण्यांची लिस्ट : अप्रतिम
योगेश, मस्त लिहिलंय. अगदी
योगेश, मस्त लिहिलंय. अगदी मनातलं!
योगेश.. फारच मस्त लेख..
योगेश.. फारच मस्त लेख.. सुमनताईंना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...
त्यांनी हिंदी आणि मराठी शिवाय इतर भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत..
मस्त लेख आहे. >>पण दुर्दैव
मस्त लेख आहे.
>>पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो. <<
खरय. या लेखामुळे हा गैरसमज दूर झाला. धन्यवाद.
सुमनताईंना वाढदिवसाच्या
सुमनताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मस्त लेख! सुंदर गाणी
मस्त लेख! सुंदर गाणी गाणार्या सुमनताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि परतण्याची आर्जवं.
छान लेख ... लिस्ट साठी
छान लेख ... लिस्ट साठी धन्यवाद योगेश.
विविध भारती वर या महीन्यातच, 'सुमन कल्याणपुर' स्पेशल 'मेहेक' नावाचा कर्यक्रम झाला, एक से बढकर एक गाणी सलग अर्धातास ऐकली.
मस्त लेख त्यांच्या
मस्त लेख
त्यांच्या गाजलेल्या गाण्यांबद्दल अजून जरा जास्त लिहायला हवं होतं असं वाटलं
सुमनताईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
योगेश, मस्तच!!!
योगेश, मस्तच!!!
पण दुर्दैव असे की सुमनताईंनी
पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो.
अगदी खरं.... मनमोहन मन मे हो तुम्ही. मोरे अंग अंग तुमही समाये..... हे गाणे कितीतरी वेळा मी ऐकले आणि लता मंगेशकरना मनातल्या मनात वाहवा दिले. नंतर समजले की गाणे सुमन कल्याणपुरचे आहे.... तेंव्हा खूप वाईट वाटले होते.
धन्यवाद!!! (लेखात त्यांचा
धन्यवाद!!!
(लेखात त्यांचा उल्लेख करशील का प्लीज? आग्रह नाही, पण त्याविना लेख अपुरा वाटतो म्हणून सुचवलं. राग नको मानूस. मी पण सुमनताईंच्या गाण्यांचा निस्सिम चाहता आहे.)
प्रयोग मी लेख अपडेट केला आणि "वल्हव वल्हव रे वल्हव रे होड" गाणे हि यादित सामविष्ट केले. खरं तर हे गाणे माझ्या संग्रहात नाहि हो :(. हा लेख लिहिताना वरील सर्व गाणी ऐकत होतो.
धन्यवाद योगेश.. उत्तम
धन्यवाद योगेश.. उत्तम माहितीपूर्ण लेख.. मी देखील ह्यातली बरीच गाणी मंगेशकर भगिनींपैकीच एकीने म्हटली आहेत ह्या समजाखाली होतो..
(No subject)
योगेश धन्यवाद. माझ सुमन
योगेश धन्यवाद.
माझ सुमन कल्याणपुरनी गायलेले आवडत गाणं म्हणजे "वाट इथे स्वप्नातील संपली जणू" आणि "केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर बाई".
मस्त वाटलं वाचुन योगेश,
मस्त वाटलं वाचुन योगेश, धन्यवाद!!
मस्त लेख योगेश.. मधे विविध
मस्त लेख योगेश.. मधे विविध भारती वर सुमन कल्याणपुर ह्यांच्या गाण्यांचा विषेश कार्यक्रम लागला होता.. सहज रेडियो लावला म्हणून ऐकायला मिळाला.. एका पेक्षा एक सुंदर गाणी ऐकता आली..
तू केलेली लिस्ट पण सही आहे...
मस्त लेख योगेश. सुमन
मस्त लेख योगेश. सुमन कल्याणपुरचा आवाज मला फार आवडतो.
सुंदर लेख योगेश! धन्यवाद येथे
सुंदर लेख योगेश! धन्यवाद येथे हे लिहील्याबद्दल. अनेक सुंदर गाणी आठवली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मलाही त्यांची गाणी अतिशय आवडतात. पुत्र व्हावा ऐसा मधे 'जिथे सागरा...' तर लोकप्रिय आहेच पण 'बघता हसुनी तू मला...' हे ही मला आवडते. तसेच गणपतीची गाणी "तुझ्या कांतीसम..." आणि 'ओंकार प्रधान' वरती तू दिलेली आहेत, पण 'देवगृही या भक्तजनांना गौरीनंदन पावला" आणि "गणाधिपा हो उठा लवकरी पूर्वदिशा उमलली..." ही सुद्धा माझी आवडती आहेत.
'कृष्णगाथा एक गाणे...' हे ही एक सुंदर आहे ('एकतरी सूर जाणे'). 'घाल घाल पिंगा वार्या' ही आम्हाला कविता होती, ती एवढ्या गोड आवाजात आणि सुंदर चालीत असली असती तर केव्हाच पाठ झाली असती :). 'निंबोणीच्या झाडामागे', 'पक्षिणी प्रभाते...', 'नाविका रे', 'सावळ्या विठ्ठला','केशवा माधवा', 'चल उठ रे मुकुंदा' - आणि इतर बरीच माझी अत्यंत आवडती आहेत, सर्व लिहीणे शक्य नाही. पण सर्वात आवडणारे म्हणजे 'वधू लाजरी झालीस तू गं' - वसंत प्रभूंकडची त्यांची गाणी फारच सुरेख आहेत.
तूच कर्ता आणि करविता म्हणजे 'शरण तुला भगवंता' का? ते खरोखरच लताचे आहे ना? अजून तरी माझा तसा समज आहे
अजून एक मला खूप आवडते आणि
अजून एक मला खूप आवडते आणि पूर्वी पहाटे आकाशवाणीवर ऐकल्यानंतर फारसे ऐकले नाही असे 'दीनांचा कैवारी, दु:खिता सोयरा, मुलामाणसात माझा विठठल साजेरा', हे कोठे ऐकायला मिळेल का?
मस्त लेख. माझ्या आवडत्या
मस्त लेख. माझ्या आवडत्या गायिकांपैकी एक. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
मला त्यांचे "पिवळी पिवळी हळद लागली..." आणि "केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा..."फार आवडते.
मस्तच लेख योगेश... खरोखर
मस्तच लेख योगेश... खरोखर अतिशय गोड गळ्याच्या गायिका आहेत सुमनताई... आपल्या आवाजाने त्यांनी बरीच गाणी अजरामर करून ठेवली आहेत.. प्रयोग म्हणतोय ते बरोबर आहे सुमनताईंवरचा लेख संगीतकार दशरथ पुजारींच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे..
आकाश पांघरून जग शांत झोपलेले,केतकीच्या बनी आणि जगी ज्यास कोणी नाही ही माझी अत्यंत आवड्ती गाणी.
सुमनताईना वाढदिवसानिमित्त अनेकविध शुभेच्छा...
धन्यवाद!! तूच कर्ता आणि
धन्यवाद!!
तूच कर्ता आणि करविता म्हणजे 'शरण तुला भगवंता' का? ते खरोखरच लताचे आहे ना? अजून तरी माझा तसा समज आहे
फारएण्ड बरोबर हे गाणे लता मंगेशकर यांनीच गायले आहे. "गणाधिपा हो उठा लवकरी" आणि इतर अजुन काहि गाणी लिस्टमध्ये अपडेट केली आहे.
नमस्कार योगेश, तुझा लेख खुपच
नमस्कार योगेश,
तुझा लेख खुपच अप्रतिम आहे. सुमन कल्याणपुर यांच्या बद्दल खूप काही माहिती अजून स्पष्ट झाली ....सुमन ताईंच्या अस्तिवावर पडलेले काळाचे मळभच जणू तुझ्या लेखणीने दूर केले आहेस त्या बद्दल शतश: आभार.
असाच छान छान लिहित राहा मित्रा!!
प्रसाद
सुन्दर लेख व माहिती. असेच
सुन्दर लेख व माहिती. असेच लिहा.
पण त्याकाळच्या स्पर्धेच्या
पण त्याकाळच्या स्पर्धेच्या युगात एका चांगल्या गायिकेचा आवाज दबला गेला असे मला वाटते. कधी असेहि वाटते कि त्यांना अजुन संधी मिळाली असती तर त्यांच्या नावने सुद्धा आज एखादा पुरस्कार दिला गेला असता....... असो >> अगदी खरेय मित्रा..
त्यांचे नाव प्रसिद्धीपासुन दुरच राहिलेय.. सारेगमप सारख्या कार्यक्रमात देखील त्या कधी आमंत्रित परिक्षक म्हणून दिसल्या नाहीत
एका चांगल्या गायिकेचा आवाज
एका चांगल्या गायिकेचा आवाज दबला गेला असे मला वाटते.
मला पण आजवर तसेच वाटत आले आहे.नाहीतर एव्ढी सुमधुर आवाजाची देवी बरीच पुढे आली असती.
दादा या चित्रपटातील "अल्लाह तू रहम करना" हे गीत मला जीवापाड आवडते.
काय गोडवा आहे या गाण्यात.
योगेश विषय छान आणि लिहीलंत ही
योगेश विषय छान आणि लिहीलंत ही छान.
सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो. >>>खरंय दोघींच्या आवाजातला फरक सहजासहजी नाही कळत.
कारण काहिहि असो पण त्याकाळच्या स्पर्धेच्या युगात एका चांगल्या गायिकेचा आवाज दबला गेला असे मला वाटते. >>> ५००% सहमत.
प्रतिसादाबद्दल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या "चांद" ह्या हिंदी चित्रपटाकरीता एकत्र गायल्या होत्या. (बहुदा पहिले आणि शेवटचेच):(.
गाण्याचे बोल होते कभी आज कभी कल कभी परसो, ऐसे हि बीते बरसो.
Pages